✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेनची चित्रशैली: एक धावता परिचय

च
चिंतातुर जंतू यांनी
Sat, 06/11/2011 - 15:34  ·  लेख
लेख
हुसेनच्या मृत्यूची बातमी कळताच अपेक्षेनुसार या संस्थळावर सडक्या प्रतिक्रियांचा एक ओघ येऊन गेला. काहींनी मेल्या माणसाबद्दल हे असं बोलणं कसं रुचिहीन आणि सभ्यतेची पातळी सोडून आहे हे सांगितलं. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी किंवा वृद्ध हुसेनना जो देशत्याग करावा लागला त्याविषयी अनेक उदारमतवादी लोकांनी अनेक ठिकाणी या निमित्तानं पुन्हा एकदा खेद व्यक्त केला. पण मुळात चित्रकार म्हणून हुसेन यांचं कर्तृत्व काय याचा थोडा परिचय करून द्यावा यासाठी हा लेख लिहिला आहे. त्याआधी थोडी स्वातंत्र्यपूर्व भारतातली कलासंस्कृती पाहणं गरजेचं आहे. इंग्रजांनी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. त्याच साली जे.जे. कला महाविद्यालयही निर्माण केलं. त्यात कलाविषयक शिक्षण हे इतर विद्याशाखांनुसार एका आखीव चौकटीत बांधलं गेलं. स्वत:च्या हुशारीविषयी गर्व असणाऱ्या जगज्जेत्या इंग्रजांना तेव्हा आपलीच कला श्रेष्ठ आहे आणि भारतीय कला कनिष्ठ आहे असा विश्वास होता. त्यामुळे या कलाशिक्षणात युरोपियन पद्धतीचं शिक्षण अंतर्भूत होतं. म्हणजे युरोपात तेव्हा प्रचलित असणारी वास्तवदर्शी शैली त्या शिक्षणातला अविभाज्य भाग होती. ती आकर्षक होती याविषयी वादच नाही. त्याचा एक नमुना पहा: सॉक्रेटिसचा मृत्यू (१७८७) – जाक लुई दाविद (फ्रेंच) सॉक्रेटिसचा मृत्यू (१७८७) – जाक लुई दाविद (फ्रेंच) पण यात झालं असं की भारतीय शैलींचा परिचय शिक्षणचौकटीत होत नव्हता. भारतात हजारो वर्षं अनेक प्रकारची कला निर्माण होत होती. मोहेंजोदारो, भीमबेटका आणि अजिंठा-वेरूळ अशा काळापासून ते मधुबनी किंवा कांगरा अशा आपल्या परंपरेतल्या अनेक शैलींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कलाविष्कार होत होता. भीमबेटका भीमबेटका अजिंठा अजिंठा मधुबनी मधुबनी अगदी खेड्यातल्या घरांपुढे काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या किंवा भिंतींवर रेखाटले जाणारे देखावे यांत भारताची कलापरंपरा दिसत होती. यांपैकी कशाचा त्या शिक्षणात समावेश नव्हता. थोडक्यात कलाक्षेत्रातसुद्धा निव्वळ पाश्चिमात्य शैलीच्या नकलीत निपुण असे ब्राऊन साहेब निर्माण करणारं ते शिक्षण होतं. गंमत म्हणजे खुद्द युरोपात यानंतर लगेचच म्हणजे १८७०च्या आसपास वास्तवदर्शी चित्रणाला छेद देऊन वेगळी इम्प्रेशनिस्ट शैली निर्माण झाली. वास्तवदर्शी म्हणजेच चांगलं हा विचार हळूहळू मागे पडत गेला. १९०७मध्ये पिकासोच्या Les Demoiselles d'Avignon या चित्रानं क्रांती घडवली. त्यात पिकासोनं आफ्रिकन मुखवट्यांवरून प्रेरणा घेतली होती. यापूर्वी व्हॅन गॉघसारख्यांनी जपानी कलेपासून प्रेरणा घेतली होती. म्हणजे पश्चिमेनं पूर्वेकडून उसनं घेण्याचा एक उलटा प्रवास चालू झाला होता. पण आपल्याकडे आता पूर्व-पश्चिम संगम वेगळ्या पद्धतीनं होत होता. रविवर्मानं पाश्चिमात्य शैलीमध्ये आपल्या मिथ्यकथा आणि पौराणिक कथांमधले प्रसंग चित्रित केले होते. हे एक प्रकारे पाश्चिमात्य श्रेष्ठत्व मान्य करणं आणि आपली समृद्ध परंपरा सोडून देण्यासारखं होतं. उदा: हे चित्र पहा: वर दाखवलेल्या दाविदच्या चित्राचं या चित्राशी असलेलं नातं लक्षात येईल. फाळक्यांनी चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली. त्यातही परदेशी तंत्रज्ञान वापरून आपल्या पौराणिक कथा आणि त्यातले चमत्कार वगैरे दाखवण्याचे प्रकार सुरु झाले. पण त्याच वेळी आपण स्वातंत्र्यासाठीसुद्धा लढत होतो. आणि त्यातही पूर्व-पश्चिम असे दोन ध्रुव होतेच. एकीकडे गांधीजी देशीवादाला अनुसरून खेड्याकडे चला वगैरे सांगत होते, तर नेहरूंना विज्ञान-तंत्रज्ञान आणून आधुनिक भारत घडवायचा होता. जर सर्वांना बरोबर घेऊन पुढे जायचं असेल तर दोनही गोष्टींचा संगम होणं आवश्यक होतं. कलेतही हे व्हायला हवं होतं. तसे काही प्रयत्न होत होते. उदा: टागोरांच्या प्रभावाखाली शांतीनिकेतनमधून असे प्रयोग होत होते. बिनोद बिहारी मुकर्जी बिनोद बिहारी मुकर्जी नंदलाल बोस नंदलाल बोस या बेंगाल स्कूल व्यतिरिक्त जामिनी रॉय यांनी कालीघाट शैलीशी साधर्म्य राखत आपली शैली बनवली. जामिनी रॉय अमृता शेरगिल यांनी पाश्चिमात्य प्रभाव घेऊन आपली एक वेगळी पण खास भारतीय शैली घडवली. अमृता शेरगिल अमृता शेरगिल पण १९३०-४०च्या सुमाराला काही तरुण या सर्वाविरोधात बंडखोरी करायला उभे ठाकले. प्रोग्रेसिव्ह आर्टिस्टस ग्रुप नावानं हे ओळखले जातात. त्यांच्या मते हे आधीचे प्रयत्न एकतर फार देशी होत होते किंवा पूर्णत: पाश्चिमात्य प्रभावाचे होत होते. त्यांना वेगळं काहीतरी करायचं होतं. जे खास भारतीय वाटेल, पण तरीही परंपरागत शैलींशी त्याचं अगदी उघड नातं लागणार नाही आणि त्यावरचा पाश्चिमात्य प्रभाव इतकाही नसेल की त्यात काही भारतीय उरणारच नाही असं त्यांना साधायचं होतं. आता ही तारेवरची कसरत कशी साधणार होती? प्रत्येकानं आपापलं उत्तर शोधलं. आपण फक्त हुसेनचं उत्तर थोडं खोलात जाऊन पाहू. वेगवेगळ्या भारतीय शैलींमध्ये वरवर पाहता साधर्म्य दिसत नाही. पण नीट विचार केला तर त्याची काही वैशिष्ट्यं लक्षात येतात. भारतीय रंगसंगती पाश्चिमात्यांपेक्षा खूप झगझगीत असते. (म्हणून कदाचित या संस्थळावरची रंगसंगती काहींना भडक वाटते ;-)) कडक उन्हाच्या प्रदेशात रंग नीट उठून दिसावे म्हणून ते नकळत अधिक भडक होत असावेत. कदाचित त्वचेच्या काळ्या रंगावर ते अधिक उठावदार वाटत असतील. राजस्थान किंवा दक्षिण भारत वगैरे ठिकाणी हे प्रकर्षानं लक्षात येतं. उदा: हे पहा, किंवा हे पहा: हुसेन यांनी हे झगझगीत रंग आपलेसे केले. अर्थात त्यांनी आधी हिंदी सिनेमाची पोस्टर्स चितारलेली असणं याचादेखील या गोष्टीशी संबंध आहे. (हे हुसेन यांनी रंगवलेलं नव्हे. शैलीचा परिचय होण्यासाठी म्हणून एक प्रातिनिधिक पोस्टर निवडलेलं आहे.) अवास्तव चित्रण, वास्तवाहून भडक रंग आणि तपशीलांचा काला ही वैशिष्ट्यं पारंपारिक भारतीय कलेत दिसतात, पूर्वीच्या सिनेमाच्या पोस्टर्समध्ये दिसतात आणि हुसेन यांच्या चित्रातही दिसतात. आधुनिक कलेत या रचना आल्या तेव्हा त्या अशा पुरातन आणि खास भारतीय परंपरेशी नातं जोडत आल्या. याशिवाय अगदी अजिंठा-वेरूळ काळापासून प्रचलित असलेल्या शरीरचित्रणाचे अनेक विशेषसुद्धा त्यांनी आत्मसात केले. हे सर्व अर्थात जे. जे. मध्ये शिकवल्या जाणाऱ्या वास्तवदर्शी शरीरचित्रणाहून वेगळं आणि अधिक भारतीय होतं. पण याशिवाय हुसेन यांनी पाश्चिमात्य कलेत तोवर झालेला आधुनिक विचार उचलला. विशेषत: काही ठळक रेषा वापरून चित्र कशाचं आहे हे पटकन कळावं ही पिकासोची शैली त्यांनी उचलली. Picasso- Demoiselles d'Avignon पिकासो - दम्वाजेल द'आविन्यो (१९०७) गंमत म्हणजे तपशीलांचा काला पिकासोच्या गेर्निकासारख्या चित्रांतदेखील दिसतो. त्यामुळे आधुनिक चित्रणशैली उचलतानासुद्धा हुसेन यांनी आपली भारतीयता जपत ती उचललेली दिसते. Picasso - Guernica पिकासो - गेर्निका (१९३७) आणि अर्थात प्रत्यक्ष विषयाच्या निवडीतसुद्धा समकालीन किंवा कालातीत पण परिचित भारतीय विषय त्यांनी निवडले. त्यांत घोडे, हत्ती, गाई असे भारतीयांचे आवडते प्राणी होते; गांधीजी, इंदिरा गांधी, मदर तेरेसा अशा प्रसिद्ध व्यक्ती होत्या. त्यात सामाजिक विषय होते (उदा. गरीबी, भ्रष्टाचार, शिक्षणाचा अभाव); सांस्कृतिक घटक होते. उदा: ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक पाहून त्यांनी काही अप्रतिम चित्रं रंगवली आहेत. त्या काळात मुंबईत अलेक पदमसी, इब्राहिम अल्काझी अशा अनेकांनी जे नवनवीन नाट्यप्रयोग केले ते पाहून काढलेली त्यांची चित्रं गाजली. वाराणसीच्या घाटांवरची त्यांची एक अख्खी मालिका आहे. अशा पुष्कळ गोष्टी सांगता येतील. हुसेनच्या चित्रांच्या बाबतीत विशेष लक्षात येण्यासारखी अजून एक गोष्ट होती: अनेकदा मुंबईच्या फोर्ट भागात विविध कलादालनांत अनेक आधुनिक चित्रकारांची प्रदर्शनं भरायची. मध्यवर्ती भाग असल्यामुळे कलेविषयी पूर्णत: अनभिज्ञ असे सर्व सामाजिक थरांतले अनेक लोक जाताजाता ही प्रदर्शनं पहायला यायचे. ते हुसेनच्या चित्रांकडे जितके पटकन आकर्षले जायचे तितके क्वचित इतरांच्या चित्राकडे जाताना दिसत. हुसेनच्या चित्रांमध्ये त्यांना काहीतरी आपल्या परिचयाचं दिसायचं. यामागे हुसेनची भारतीय दृष्टीची जाण दिसत असे. (असे अनुभव आता येत नाहीत. कारण हुसेनची चित्रं प्रदर्शित करायला कलादालनं घाबरतात. असो.) पुष्कळ महागात ज्या कलाकृती विकल्या जातात त्यांच्या बाबतींत येणारी एक अडचण म्हणजे त्या बाजाराच्या काल्यामध्ये आणि खाजगी संग्रहांमध्ये हरवतात आणि आंतरजालावर त्यांच्या प्रतिमा उपलब्ध नसतात. तरीही त्यातल्या त्यात हुसेनच्या मृत्यूच्या निमित्तानं ज्या काही थोड्याबहुत प्रतिमा उपलब्ध झाल्या त्या खाली देत आहे. पण त्याच्या कलेचा हा एक छोटा प्रातिनिधिक अंशही नाही हे लक्षात घ्या. (इथे लेख संपला आहे. आता फक्त चित्रांचा आस्वाद घ्या.)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
संस्कृती
इतिहास
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
माहिती
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
38606 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

वादग्रस्त

आबा
Sun, 06/12/2011 - 02:52 नवीन
आत्तापर्यंत फक्त वादग्रस्त माणूस एवढिच ओळख होती. लेख आवडला !
  • Log in or register to post comments

भारतीय आधुनिक चित्रकलेच्या परंपरेची ओळख

धनंजय
Sun, 06/12/2011 - 10:16 नवीन
भारतीय आधुनिक चित्रकलेच्या परंपरेची ओळख आवडली. रणजित चितळ्यांचा नाकाविषयी मुद्दा कळला नाही. बर्नार्ड शॉ हा अभिव्यक्ती आणि शारिरिक दुखापत यांच्यात फरक करत होता, असे वाटते. आणि त्यात "शरिराच्या इंद्रियाला दुखापत होते तेव्हा अभिव्यक्तिस्वातंत्र्य संपते" असे स्पष्टीकरण मला दिसते. "मला नावडेल= नाकाला लागले ही उपमा" मानली, तर बर्नार्ड शॉचे वाक्य पुरते निरर्थक होते. "मला आवडणार नाही असे काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य नाही" इतपतच अर्थ शिल्लक राहातो. (बर्नार्ड शॉ याने येशूच्या पात्राकडून येशूचे वर्णन "सुविचार ऐकावे म्हणून बारीकसारीक जादूचे प्रयोग करणारा, आणि लोक डोंबार्‍याच्या खेळांतच अडकले म्हणून अयशस्वी झालेला" असे काहीसे करवले होते. - स्रोत "ब्लॅक गर्ल इन सर्च ऑफ गॉड" कथा. "येशू हा अयशस्वी डोंबारी" म्हणजे कोणाच्या नाकाला बुक्का मारला होता का?)
  • Log in or register to post comments

काही प्रतिक्रिया वाचून लक्षात

अरुण मनोहर
Sun, 06/12/2011 - 13:42 नवीन
काही प्रतिक्रिया वाचून लक्षात आले की काही जणांनी ती घाणेरडी चित्रे पाहिली नसावित, निदान सगळी चित्रे पाहिली नाहीत. शाहरुखने त्या चित्रांवर कलाभ्यासक विवेचन व्हावे अशी साळसूद मागणी केली आहे. जगड्याने बहुदा खोल विचार न करता, त्या पैकी एक चित्र दिले देखील आहे. मग व्हायचे तेच झाले, त्या चित्रावर उहापोह होउन मते आली, आणि आमचे देव धुतल्या गेले. त्या चितार्याचा जो काहे उद्देश होता तो साध्य झाला. मागे एकदा एक बहुवितरण मेल मला आला होता. त्यात चितार्याचे ती सगळी सडकी कला होती. जवळ जवळ पंधरा एक चित्रे असावित. त्यामधली काही तर अगदी उल्लेख देखील करू नये असली होती. संदेश असा होता- असली चित्रे काढून, हिंदू धर्माचे विडंबन त्याने केले. हे सगळ्यांना समजावे म्हणून ही मेल तुम्ही सगळ्यांना पाठवून निषेध पसरवा. मी त्या सगळ्यांना उत्तर पाठवले, निषेध जरूर करा. पण ती घाण तुम्ही आपल्या मेलला का जोडता? तसे करून तुम्ही त्या मुर्खाचेच काम करत आहात. आता इथेही तेच होऊ द्या. हिंदू धर्म सहिष्णु आहेच. घोसळा त्याला हवा तेवढा. आपल्या महान धर्माचे आणि विशाल मनाच्या देवतांचे काहेच नुकसान अशा क्षुल्लक गोष्टींनी होत नाही हे म्हणणारे कैक भेटतील देखील!
  • Log in or register to post comments

ओह ! तुमच्या वरील

शाहरुख
Sun, 06/12/2011 - 18:57 नवीन
ओह ! तुमच्या वरील प्रतिक्रियेचा रोख आत्ता लक्षात आला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

काही प्रतिक्रिया वाचून लक्षात

अभिज्ञ
Sun, 06/12/2011 - 18:39 नवीन
काही प्रतिक्रिया वाचून लक्षात आले की काही जणांनी ती घाणेरडी चित्रे पाहिली नसावित, अगदि हेच म्हणतो. मला तर तो प्रकार फारच किळ्सवाणा वाटला होता. अन हि असली फालतु चित्रे काढायचे प्रयोजन देखिल समजले नाही. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

दुसरा भाग दिलेला आहे

चिंतातुर जंतू
Sun, 06/12/2011 - 18:59 नवीन
लेख जरा लांबलचक होतो आहे अशी जाणीव लिहिताना झाली होती. त्यामुळे तो शेवटीशेवटी थोडक्यात आटपला होता, हे कबूल करतो. पण शेवटचा भाग त्रोटक करण्यामागे त्याशिवाय अजून एक विचार होता: अखेर चित्रं ही डोळ्यांनी पहायची असतात. त्याविषयीचं विवेचन हे फार फार तर जरा मदत एवढ्यापुरतंच यावं असं मला वाटतं. असो. काही लोकांची तशी इच्छा दिसल्यामुळे थोडं अधिक विवेचन देत आहे. शिवाय प्रत्यक्ष लेखाच्या आशयाशी संबंधित अशा आलेल्या काही प्रश्नांचे प्रतिसादही दिले आहेत. हे सर्व लिहिता लिहिता ते पुन्हा लांब होऊ लागलं म्हणून मूळ धाग्यावर प्रतिसाद देण्याऐवजी पुढचा भाग म्हणून प्रकाशित करत आहे: मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेनची चित्रशैली (भाग २)
  • Log in or register to post comments

(वरातीमागून घोडं!)

बिपिन कार्यकर्ते
Sun, 06/12/2011 - 20:40 नवीन
अतिशय समयोचित आणि विवेचनात्मक लेखाकरिता चिंजंचे आभार. काही गोष्टी समजल्या. धन्यवाद! दुसरा भागही आलेला दिसतोय, नक्की वाचेन. वरील प्रतिक्रियांमधे, प्रदीप यांच्या प्रतिक्रियेशी सहमत आहे. इतक्या सुंदर आणि वेगळ्याच उद्देशाने लिहिलेल्या लेखात 'सडक्या' वगैरे शेलक्या विशेषणांचे प्रयोजनच काय? लेखकाला त्याच्या भावना शिष्टसंमत भाषेत मांडता आल्या असत्या. तो शब्द वापरल्याबद्दल मी माझी नाराजी नोंदवतो. जगड्या, चित्रा, योगप्रभू, प्रदीप यांचेही विशेष आभार. उत्तम चर्चा वाचायला मिळाली.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

मुक्तसुनीत
Mon, 06/13/2011 - 07:55 नवीन
प्रतिक्रिया उशीराच देतोय आणि ती आतापर्यंतच्या दोन्ही भागांनाही आहे. लेख आवडला हेवेसांनल. पहिल्या भागामुळे फारच सुरेख रीतीने पार्श्वभूमी कळली. गेल्या शतकातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या चित्रकाराच्या जगताला गवसणी घालण्याचा प्रयत्न - मग जरी कुणाला तो अपुरा किंवा उडता वाटला - तरी स्तुत्यच. एक माणूस आपल्या कामाकरता उणेपुरे ९५ वर्षांचे आयुष्य वेचतो. वयाच्या विशीच्याही आधीच उगम झालेल्या ऊर्मीला जो नव्वदीनंतर थांबवू शकत नाही, अनेक प्रकारचे प्रयोग , अनेक शैलींनी व्यक्त होतो. आणि आयुष्याच्या अखेरच्या दशकामध्ये ज्याला देशद्रोही ठरवण्यात येऊन , देशाबाहेर मृत्यूला स्वीकारावे लागते. या सर्वात खचितच भव्यताही आहे नि शोकांतिकाही आहे. चिंतातुर जंतूंनी कलाबाह्य बाबींना टाळून या माणसाच्या कामामागची पूर्वपीठिका, त्याच्या कामाचे स्वरूप , संदर्भ , याचा शोध घेण्याकरता हे लिखाण केले असल्याचे जाणवले. एकेका लेखनाचे प्रकार असतात. बर्‍याचदा आपले लेखन हे एक "एक्स्प्रेशन" असते. कधीकधीच त्याचे स्वरूप "आपल्याला काय जाणवले आहे, काय कळले आहे ते आजमावून पहावे, त्याचा आकार कसा उमटतो ते पहावे" असे असते. चिंतातुर जंतूंचे हे लिखाण या स्वरूपाचे वाटत आहे. आधुनिक भारतीय कलेचा प्रवाह कसा बनत गेला, कुठले कुठले फोर्सेस त्यात कार्यरत होते, निरनिराळे लोक या निमित्ताने एकत्र कसे आले ? कुठले तात्कालिक प्रवाह प्रभावशाली होते , जे नंतर क्षीण ठरले ? हा सगळा आशय एका छोट्या लेखमालेत सामावण्याजोगता नाही. मी चिंतातुर जंतूना असे सुचवतो की , अशा स्वरूपाचा अभ्यास करण्याकरता लागलेल्या संदर्भांची सूची त्यांनी द्यायचा प्रयत्न करावा. कला आणि समाज , कला आणि धर्म आणि राष्ट्रसंकल्पना आणि यातल्या कमिटमेंट्समधील आंतर्विरोध , कला आणि बाजार या सगळ्या गहन प्रश्नांकरताच मोठ्या चर्चा संभवतात. यातील कुठलीही गोष्ट व्हॅक्युममधे अस्तित्वात नसते आणि त्यामुळे त्यांच्याबद्दलची सुट्या सुट्या प्रश्नांवरील चर्चा कदापि अर्थपूर्ण, समग्र ठरणार नाही. हुसेन या सार्‍याच्या एपिसेंटरला होते. त्यांच्या व्यक्तित्वाचे वर्णन वादळी म्हणून करणे हे अपुरेच ठरेल.
  • Log in or register to post comments

प्र. का. टा. आ.

प्रदीप
Mon, 06/13/2011 - 21:10 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

दुर्दैव! आणि काय?

धमाल मुलगा
Mon, 06/13/2011 - 14:52 नवीन
मकबूल फिदा हुसेन ह्या भारतीय चित्रकाराचा, त्याच्या कलेचा एक छानसा परिचय ह्या लेखाच्या निमित्ताने वाचायला मिळाला. त्याबद्दल चिंतातूरजंतू ह्यांचे आभार. जंतू हे नेहमीच कलेच्या माध्यमांची मोठ्या अधिकारवाणीने आणि सुंदर अशी सफर घडवून आणत आले आहेत, त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेव्हढे थोडेच. परंतू....परंतू.. केवळ कला हा एकमेव निकष असू शकत नाही हे ह्या धाग्याच्या अनुशंगाने जाणवले. एका कलाकाराच्या कलाकृतींची आणि कलाप्रवासाची ओळख असलेल्या ह्या सुंदर लेखाच्या सुरुवातीलाच श्री. जंतू ह्यांनी लिहिलेलं पहिलं वाक्यच ह्या संकेतस्थळाच्या सभासदांप्रति अत्यंत हीनता प्रक्षेपित करणारं आहे. हुसेन त्यांच्या कलेच्या क्षेत्रात फार मोठे असतीलही. आम्हा सर्वसामान्यांना कल्पना नाही. परंतू, कलंदरपणाच्या नावाखाली वाट्टेल ते करायची, आमच्या देवदेवतांची बिभत्स चित्रं चितारायची परवानगी मिळत नाही. वर उल्लेख आला आहे, की तत्सम चित्रांच्याबाबत भारतीय इतर चित्रकारांनीही टोकाची भूमिका घेतली नाही किंवा त्यात त्यांना वावगं वाटलं नाही.. नसेल! पण म्हणून कुण्या मूठभर लोकांच्या वाटण्या-न-वाटण्याशी आम्ही बहुतांश लोकांनी आपल्या देवदेवतांबद्दलच्या भावना विकलेल्या नाहीत. त्यांनी क्लिन चिट दिली म्हणून आम्ही आमच्या देवतांचा अपमान सहन का करावा? जमणार नाही. आणि तसे करायची अक्कलही कुणी शिकवायची गरज नाही. तर मग मुद्दा उभा केला जातो तो खजूराहोच्या शिल्पांचा. देव खजुराहोच्या शिल्पांमध्ये आहेत की गाभार्‍यामध्ये? गाभार्‍यामध्ये नग्न/मैथुनावस्था असलेली शिल्पे आहेत का? मंदीरांच्या बाहेरील भिंतींवर कोरलेली शिल्पे ही नक्की कोणाची आहेत? सरस्वती? लक्ष्मी? विष्णू? महादेव? पार्वती? गणपती? ती कोणी कोरली? हिंदूंनी असतील तर त्यांनी बौध्द संस्कृतीची चित्र नंतर त्यात तशाच पध्दतीनं घातली का? तर नाही! शिवाय, वर प्रतिसादांत आलेला दुसरा मुद्दा आहेच, जर हिंदू देवतांची नग्न (आणि बरीचशी आक्षेपार्ह पध्दतीची) चित्रं काढता येतात तर मग, केवळ हिंदू देवतांचेच का? हा प्रश्न अनुत्तरीत का? एरवी धर्म-देव इत्यादी गोष्टींना कडाडून विरोध करताना आत्ताच मात्र सोयीस्कररित्या हिंदू संस्कृतीमधील 'मरणान्तानि वैराणि'च्या बुरख्याआडून विरोध करायची वेळ का यावी? ह्या संकेतस्थळावर हुसेन गेल्याची बातमी आल्याबरोबर धागाप्रवर्तकासकट, प्रतिक्रिया देणार्‍यांच्याही मनातला राग उत्स्फुर्तपणे बाहेर पडला.इथे तोंडावर बेगडी रंग फासून हिंडण्याची पध्दत नसल्यामुळं ही प्रत्येकाच्या मनातली भावना ताबडतोब प्रामाणिकपणे त्यानं व्यक्त केली. आणि विकृत गोष्टीला विकृतच म्हणणं हे चुकीच असावं असं वाटत नाही. ही समाजाच्या एका मोठ्या समुहाची प्रातिनिधीक उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती. आणि समाज हा इतरांपासून फटकून राहणार्‍या चार डोक्यांनी बनत नाही, तर प्रत्येक सामान्य-सर्वसामान्य-तळागाळातल्या मनुष्यापासून बनतो. हिंदू धर्मिय हे समाजाचा एक मोठा हिस्सा आहेत. त्यातल्या काही शेकडा लोकांनी आपल्या मतानुसार उर्वरित लक्षावधी/कोट्यावधी समुहाच्या सामुदाईक मताला हिणवणं आणि आपलंच बरोबर आहे असं म्हणणं हे पुर्णतः अयोग्य आहे.
"हुसेनच्या मृत्यूची बातमी कळताच अपेक्षेनुसार या संस्थळावर सडक्या प्रतिक्रियांचा एक ओघ येऊन गेला. "
ह्या वाक्याद्वारे श्री.जंतू ह्यांनी ह्या संकेतस्थळाच्या सदस्यांचा हीनतेने लेखून अपमान केलेला आहे. हा अपमान समुदायाचा अपमान आहे, एका मताशी बांधलेल्या कित्येक व्यक्तींचा प्रत्येकाचा व्यक्तिशः अपमान आहे, ह्या संकेतस्थळावर येणार्‍या सदस्य, त्या मतांशी सहमत असलेल्या वाचक ह्यांचाही अपमान आहे. ज्या पध्दतीनं श्री. जंतू ह्यांनी जाहीररित्या हा अपमान केला आहे त्याच पध्दतीनं त्यांनी समस्त मिपापरिवाराची ह्या अपमानकारक वाक्याबद्दल जाहीर माफी मागितलीच पाहिजे.
  • Log in or register to post comments

इर्शाद!!

Nile
Mon, 06/13/2011 - 15:42 नवीन
ह्या वाक्याद्वारे श्री.जंतू ह्यांनी ह्या संकेतस्थळाच्या सदस्यांचा हीनतेने लेखून अपमान केलेला आहे. हा अपमान समुदायाचा अपमान आहे, एका मताशी बांधलेल्या कित्येक व्यक्तींचा प्रत्येकाचा व्यक्तिशः अपमान आहे, ह्या संकेतस्थळावर येणार्‍या सदस्य, त्या मतांशी सहमत असलेल्या वाचक ह्यांचाही अपमान आहे. ज्या पध्दतीनं श्री. जंतू ह्यांनी जाहीररित्या हा अपमान केला आहे त्याच पध्दतीनं त्यांनी समस्त मिपापरिवाराची ह्या अपमानकारक वाक्याबद्दल जाहीर माफी मागितलीच पाहिजे.
हे वाचुन हसुन हसुन पोट दुखले, हिंदी सिनेमातले एक दोन हिरो सुद्धा डोळ्यांसमोर तरळून गेले. =)) =)) बाकी वादात (आत्तातरी) पडण्याची इच्छा नाही, पण मत नोंदवून ठेवतो. प्रतिक्रीया सडकी होती म्हटले म्हणजे सदस्यांचा अपमान होत नाही. थोडेसे इतिहासात खोदकाम केले तर याही पेक्षा जास्त शेलकी शब्द अनेकांनी (ज्यांचा आता अपमान झाला असा देखावा उभा केला जात आहे) वापरलेले आम्ही पाहिले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

चालायचंच की. शेवटी....

धमाल मुलगा
Mon, 06/13/2011 - 16:00 नवीन
:) चालायचंच की. शेवटी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

ह्या वाक्याद्वारे श्री.जंतू

परिकथेतील राजकुमार
Mon, 06/13/2011 - 16:07 नवीन
ह्या वाक्याद्वारे श्री.जंतू ह्यांनी ह्या संकेतस्थळाच्या सदस्यांचा हीनतेने लेखून अपमान केलेला आहे. हा अपमान समुदायाचा अपमान आहे, एका मताशी बांधलेल्या कित्येक व्यक्तींचा प्रत्येकाचा व्यक्तिशः अपमान आहे, ह्या संकेतस्थळावर येणार्‍या सदस्य, त्या मतांशी सहमत असलेल्या वाचक ह्यांचाही अपमान आहे.
ज्जे बात !! :) माफीवरुन जाता जाता आठवले की हुसेननी देखील काढलेल्या चित्रांबद्दल माफी वैग्रे मागीतली होती म्हणे. त्याचे काही चुकलेच नव्हते अथवा त्यानी सो-कॉल्ड वेगळ्या दृष्टीकोनातुन ती चित्रे काढली असतील (असे इथले काही महान विभुती म्हणत आहेत) तर मग त्यानी माफी का मागीतली बॉ ? आणि अरे हो... रामदेवबाबांच्या पलायनावर हॅ हॅ हॅ करुन दात काढणारे आणि खिल्ली उडवणारे आता पार्श्वभागाला पाय लावुन देशच सोडून पळालेल्या हुसेन विषयी काहीच कसे बोलले नाहित बॉ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

+१००१

मृत्युन्जय
Mon, 06/13/2011 - 16:11 नवीन
+१००१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

सडक्या ?

मराठी_माणूस
Mon, 06/13/2011 - 15:19 नवीन
हुसेनच्या मृत्यूची बातमी कळताच अपेक्षेनुसार या संस्थळावर सडक्या प्रतिक्रियांचा एक ओघ येऊन गेला नग्न देव/देवतांची चित्रे काढणारा मेंदु हा सुपीक समजायचा का ? वरील प्रतीसादातील "अपेक्षेनुसार" म्हणजे काय ? हा ह्या संस्थाळाचा सन्मान समजायचा का ?
  • Log in or register to post comments

सहमत आहे

आनंदयात्री
Mon, 06/13/2011 - 20:52 नवीन
धमाल मुलाशी, पराशी आणि बिपिनशी बराचसा सहमत. चिंतातुर जंतुंसारख्या उत्तम आणि आमच्या आवडत्या लेखकाकडून असा त्रागा अनपेक्षित होता, असे संयम सोडुन बोलणे मला वैयक्तिकरित्या धक्कादायक वाटले. त्यांची मिसळपाववर इतकी नाराजी आहे हे पाहुन अगदी वाईट वाटले. मिपाबद्दल साधारण अश्या प्रकारची तुच्छतादर्शक वक्तव्यं उपक्रमावर पहायला मिळतात.
  • Log in or register to post comments

बाकी

आनंदयात्री
Tue, 06/14/2011 - 01:12 नवीन
बाकी लेख पुन्हा वाचला, आणि आवडला हे नमूद करु इच्छितो. जंतुंनी पुढल्यावेळेस आम्हाला गाळणी हातात घेण्यास लाउ नये ही विनंती,
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: Ramgude Prakas…
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 16:44
  • सदस्य: kalash११
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 23:00
  • सदस्य: newexploring2020
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 22:15
  • सदस्य: अकोलेकर
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 18:00
  • सदस्य: राजा स्वामी
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 12:15
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा