चिव चिव चिमणी छतांत ...
ऑफिसमधून संध्याकाळी मी घरी आलो. दारावरची बेल वाजवली. दार माझ्या मुलीनं - वल्लरीनं उघडलं. बाहेरच्याच खोलीत ती अभ्यास करंत बसलेली असावी कारण दिवाणावर पुस्तकं, वह्या अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. तिची दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली होती. परीक्षेच्या अभ्यासाची सुट्टी कधीच चालू झालेली होती. मला बघितलं तशी हिरमुसला चेहरा केला.
मी विचारलं " काय झालं ?".
"आजही बाबा एकसुध्दा चिमणी आली नाही."
"त्यात काय झालं. येतील उद्या-परवा. फिडर आणून तीन तर दिवस झालेयत".
बुर्हाणी फौंडेशनने काही हजार बर्ड फिडर्स वाटायचे ठरविले होते. त्याचे वाटप आमच्या भागात गरवारे कॉलेज, कर्वे रोड इथे सहा मार्च, रविवारी होणार होते. मी सकाळीच नेहमीपेक्षा लवकर उठून, आवरून गरवारे कॉलेजला गेलो. भल्यामोठ्या रांगेत उभा राहिल्यानंतर जवळपास तासाभराने माझा नंबर लागला. मला एक बर्ड फिडर, त्यात ठेवण्यासाठी अर्धा किलो बाजरी आणि संस्थेचे आणि फिडरच्या वापरासंबंधीचे माहितीपत्रक एवढे मिळाले. घरी आल्यावर वल्लरीने माझ्याकडच्या बर्ड फिडरचा ताबा घेऊन त्यात ती बाजरी घालून उत्साहाने तो मागच्या अंगणातल्या चांदणीच्या झाडाला सावलीत बांधला होता. अंगणात बरेच पक्षी येत असतात. नेहमीचे म्हणजे कावळे, पारवे, चिमण्या, साळुंक्या येतातच पण त्या व्यतिरिक्त महिन्यातून सरासरी दोनदा तरी खंड्या ( किंगफिशर ), भारद्वाज ( क्रो पिझंट ) बुलबुल ( रेड व्हेटेड बुलबुल ), नाचण ( फॅनटेल फ्लायकॅचर ) हे पक्षी येतात. सूर्यपक्ष्याने तर अबोलीच्या दाट रोपांमध्येतर अनेक वेळा घरटी केली आहेत.
हॉलच्या खिडकीतून विशिष्ट कोनातून टांगलेला फिडर व्यवस्थित दिसत असे. पण तिथे एकसुध्दा चिमणी फिरकली नव्हती. वल्लरी परीक्षेच्या अभ्यासासाठी हॉलमध्येच ठाण मांडून बसली होती. एकसारखी खिडकीतून वाट पाही. एखादी तरी चिमणी फिडरमधली बाजरी खायला येईल. ह्याला झाले होते तीन दिवस. तीन दिवसांत एकदेखील चिमणी तिकडे फिरकली नव्हती.
चिमण्यांच्या नादात ह्या चिमणीचा अभ्यास होणार कां ? दहावीचा पालक ह्या नात्यानं मला काळजी वाटणं साहजिकच होतं. त्यातून वल्लरी अभ्यासात तशी यथातथाच. मार्कांच्या रेसमध्ये नकळतपणे शिरकाव झालेला. आवडो न आवडो. पण आवश्यक.
मी तिला म्हणालो " चिमण्यांना त्या फिडरमध्ये खाण्यासाठी काहीतरी आहे ह्याची जाणीव व्हायला आठ-दहा दिवसतरी जातील. तुझा अभ्यास महत्वाचा आहे. तू फिडरकडे बघूसुध्दा नको. एक दिवस अचानक तुला चिमण्या तिथं चिवचिवताना दिसतील".
'अहो बाबा, पण चिमण्या तिथे फिरकंतच नाहीत. दुसरेच किटक, मध खाणारे पक्षी चांदणीवर येतात. चिमण्या येतंच नाही. त्यांना कळणार कसं कि इथे खायला काहीतरी आहे म्हणून. आपण फिडरची जागाच बदलून बघू नां"
जोपर्यंत एखादी चिमणी तिथे येत नाही तोपर्यंत वल्लरीचा अभ्यास धडपणे परत सुरू होणार नाही. हे माझ्या लक्षात आलं.
मी म्हणालो " ओके, तुला वाटेल त्या जागेवर आपण फिडर बांधू".
मग दुसर्या दिवशी आम्ही दोघांनीही तो फिडर काढून तगरीच्याखाली फांदीला घट्ट बांधला. अगदी योग्य ठिकाण आम्हाला गवसंल होतं. तगरीच्या चारपाच छोट्या फांद्या फिडरला खेटल्यागत होत्या. त्यामुळे तिथे थवे बसू शकतील एवढी जागा होती. फिडरला चारपाच चिमण्या बसतील अशी एक दांडी केलेलीच होती म्हणा. पण आता जरा जास्त मोकळी जागा आसपास झाली. फिडरची हि जागादेखील हॉलच्या खिडकीतून व्यवस्थित दिसंत होती. विशेष म्हणजे फिडर अंगणात फिरण्यार्यालासुध्दा सहजपणे दिसंत नसे.
"चला, आता अभ्यासाकडे लक्ष दे. चिमण्या नक्की येतील आता इथं. तू दररोज वाट पहायला लागलीस कि त्या येणारच नाहीत. तू दुर्लक्ष करं. एक दिवस तुला चिवचिवाट ऐकू येईल. मग बघ. आणि मी कुठे बाहेर असलोच मला नक्की फोन कर" मी म्हणालो.
" बाबा, तुम्ही नेहमी बिझी असता. तुम्ही कामात असला आणि तुम्हाला आम्ही फोन केला तर तुम्ही काही ऐकायच्या आतंच - महत्वाचं असेल तर पटकन सांग, नाहीतर मी नंतर तुला फोन करीन असं म्हणता आणि फोन कट करून टाकता"
" हा फोन मी कुठेही असलो तरी घेईन आणि बोलेनसुध्दा" - मी
"नक्की नां बाबा ? कारण तुम्ही कधी मिटींगमध्ये असता त्यावेळी फोन बंद करून ठेवता."
"नक्की. म्हणजे अगदी प्रॉमीस. मी कुठेही असलो तरी फोन घेईन म्हटलं ना. बास...?"
पुढे दोन दिवसातच तशी वेळ आली. मी एका कंपनीत मिटींगमध्ये होतो. खरंतर त्यात माझ्या कामाचा विषय नव्हताच. उगीच भरीस भर. मिटींग सुरू होऊन दहापंधरा मिनीटंच झाली असतील तेवढ्यात वल्लरीचा फोन. मी चेअरपर्सनला नम्रपणे सांगितलं हा फोन फार महत्वाचा आहे. मला घ्यावाच लागणार आहे. असं म्हणून मी कॉन्फरन्स रुमच्या बाहेर आलो.
"बाबा, एक चिमणी फिडरच्या दांडीवर बसून बाजरी खातेय" वल्लरी अगदी हर्षोन्मादाने बोलत होती.
"अरे व्वा ! अभिनंदन" मीपण ओरडत म्हणालो.
ऑफिसमधल्या मिस् चिटणीसनी दचकून माझ्याकडे पाहीलं नंतर हसंत म्हणाली " काय सर, कसलं अभिनंदन करताय एवढ्या मोठ्यानी ?"
"चिमणी बाजरी खातीये" मी म्हणालो.
चिटणीस चक्रावूनच गेली. 'येडबीड लागलय काय ह्या माणसाला' असा चेहरा करून परत कामात गर्क झाली.
हा प्रसंग तसा साधाच. पण महत्वाचे हे की चिमणी ह्या पक्ष्याची घरातून हकालपट्टी झाल्याने त्यांची संख्या कमी झाली आता बर्ड फिडरचे आमिष लावून बोलवावे लागते हे चिंताजनक. मुळात चिमणीला हाऊस स्पॅरो म्हणतात ते तिच्या घरात असणार्या वावरण्यामुळे. भिंतीच्या भोकात, पत्र्याच्या खाली, पोटमाळ्यावर, पोष्टाच्या पेटीत असणारी, सुतळी, कापूस, काथ्या, केरसुणीच्या काड्या, चिंध्या वापरून केलेली चिमण्यांची घरटी आता दिसेनाशी झाली. घरातल्या स्वच्छतेच्या आणि नीटनेटकेपणाच्या हव्यासापायी चिमण्यांची हकालपट्टी झाली.
चिमणी ही बालपणापासूनची मैत्रीण. तिच्याबरोबर तर जेवणाचे घास शेअर केलेले आहेत. लहानपणी आईच्या तोंडून चिऊकाऊच्या गोष्टी, गाणी ऐकत झोपायचो. त्यातलं एक गाणं म्हणजे भा.रा. तांब्यांची सुंदर साधी कविता ;
चिंव चिंव चिमणी छतांत, छतांत,
अरसा लोंबे भिंतीला, भिंतीला
चिमणी बघते सवतीला, सवतीला
चिऊताई, चिऊताई काय करता हो..
हि तर तुमची पडछाया, पडछाया,
उगाच शिणता कां वाया, कां वाया
(मूळ कविता थोडी मोठी आहे.)
म्हणजे घरातच काय कलासाहित्यातसुध्दा चिमणीचा वावर खूप आहे. शांतता कोर्ट चालू आहे नाटकात बेणारेंची व्यथा मांडताना विजय तेंडुलकरांनी ज्या जुन्या कवितेच्या ओळी वापरल्या होत्या, त्या हल्ली खरोखरच्या चिमणीला लागू आहेत
"चिमणीला मग पोपट बोले, कां ग तुझे डोळे ओले ?
काय सांगू बाबा तुला, माझा घरटा कोणी नेला
पूर्वी तिचं घरटं नेणारे निदान कावळे, साप, मांजर हे प्राणी तरी असायचे. आता . . . . ?
याद्या
4656
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
चिंव चिंव चिमणी छतांत, छतांत,
खुपच छान लिहिले आहे... साध्या
सुंदर!
वा !
परवाच कंपनीमध्ये
चिमणी
लेख आवडला,
लेख आवडला.
सुरेख
सर्वेजण या माझ्या घरि, दररोज
छान लेख
प्रसंग साधाच! मांडणी उत्तम!!
लेखन आवडले.
धन्यवाद
ग्रेस
+१
In reply to ग्रेस by श्रावण मोडक
माझे निरीक्षण...
कबूतरे
In reply to माझे निरीक्षण... by योगप्रभू
अगदी! मलाही याच कारणामुळे
In reply to कबूतरे by स्मिता.
रविन्द्र पिंगे यांची कथा
कोठे आहेत आता चिमण्या
सहमत. नुकतीच आमच्या घराजवळ
In reply to कोठे आहेत आता चिमण्या by रणजित चितळे
छान लेख...
आवडले.
बदलापूरला सुद्धा असाच एक
अवांतर : तुम्ही बदलापूरचे
छान