Skip to main content

चिव चिव चिमणी छतांत ...

चिव चिव चिमणी छतांत ...

Published on शुक्रवार, 10/06/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
ऑफिसमधून संध्याकाळी मी घरी आलो. दारावरची बेल वाजवली. दार माझ्या मुलीनं - वल्लरीनं उघडलं. बाहेरच्याच खोलीत ती अभ्यास करंत बसलेली असावी कारण दिवाणावर पुस्तकं, वह्या अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. तिची दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली होती. परीक्षेच्या अभ्यासाची सुट्टी कधीच चालू झालेली होती. मला बघितलं तशी हिरमुसला चेहरा केला. मी विचारलं " काय झालं ?". "आजही बाबा एकसुध्दा चिमणी आली नाही." "त्यात काय झालं. येतील उद्या-परवा. फिडर आणून तीन तर दिवस झालेयत". बुर्‍हाणी फौंडेशनने काही हजार बर्ड फिडर्स वाटायचे ठरविले होते. त्याचे वाटप आमच्या भागात गरवारे कॉलेज, कर्वे रोड इथे सहा मार्च, रविवारी होणार होते. मी सकाळीच नेहमीपेक्षा लवकर उठून, आवरून गरवारे कॉलेजला गेलो. भल्यामोठ्या रांगेत उभा राहिल्यानंतर जवळपास तासाभराने माझा नंबर लागला. मला एक बर्ड फिडर, त्यात ठेवण्यासाठी अर्धा किलो बाजरी आणि संस्थेचे आणि फिडरच्या वापरासंबंधीचे माहितीपत्रक एवढे मिळाले. घरी आल्यावर वल्लरीने माझ्याकडच्या बर्ड फिडरचा ताबा घेऊन त्यात ती बाजरी घालून उत्साहाने तो मागच्या अंगणातल्या चांदणीच्या झाडाला सावलीत बांधला होता. अंगणात बरेच पक्षी येत असतात. नेहमीचे म्हणजे कावळे, पारवे, चिमण्या, साळुंक्या येतातच पण त्या व्यतिरिक्त महिन्यातून सरासरी दोनदा तरी खंड्या ( किंगफिशर ), भारद्वाज ( क्रो पिझंट ) बुलबुल ( रेड व्हेटेड बुलबुल ), नाचण ( फॅनटेल फ्लायकॅचर ) हे पक्षी येतात. सूर्यपक्ष्याने तर अबोलीच्या दाट रोपांमध्येतर अनेक वेळा घरटी केली आहेत. हॉलच्या खिडकीतून विशिष्ट कोनातून टांगलेला फिडर व्यवस्थित दिसत असे. पण तिथे एकसुध्दा चिमणी फिरकली नव्हती. वल्लरी परीक्षेच्या अभ्यासासाठी हॉलमध्येच ठाण मांडून बसली होती. एकसारखी खिडकीतून वाट पाही. एखादी तरी चिमणी फिडरमधली बाजरी खायला येईल. ह्याला झाले होते तीन दिवस. तीन दिवसांत एकदेखील चिमणी तिकडे फिरकली नव्हती. चिमण्यांच्या नादात ह्या चिमणीचा अभ्यास होणार कां ? दहावीचा पालक ह्या नात्यानं मला काळजी वाटणं साहजिकच होतं. त्यातून वल्लरी अभ्यासात तशी यथातथाच. मार्कांच्या रेसमध्ये नकळतपणे शिरकाव झालेला. आवडो न आवडो. पण आवश्यक. मी तिला म्हणालो " चिमण्यांना त्या फिडरमध्ये खाण्यासाठी काहीतरी आहे ह्याची जाणीव व्हायला आठ-दहा दिवसतरी जातील. तुझा अभ्यास महत्वाचा आहे. तू फिडरकडे बघूसुध्दा नको. एक दिवस अचानक तुला चिमण्या तिथं चिवचिवताना दिसतील". 'अहो बाबा, पण चिमण्या तिथे फिरकंतच नाहीत. दुसरेच किटक, मध खाणारे पक्षी चांदणीवर येतात. चिमण्या येतंच नाही. त्यांना कळणार कसं कि इथे खायला काहीतरी आहे म्हणून. आपण फिडरची जागाच बदलून बघू नां" जोपर्यंत एखादी चिमणी तिथे येत नाही तोपर्यंत वल्लरीचा अभ्यास धडपणे परत सुरू होणार नाही. हे माझ्या लक्षात आलं. मी म्हणालो " ओके, तुला वाटेल त्या जागेवर आपण फिडर बांधू". मग दुसर्‍या दिवशी आम्ही दोघांनीही तो फिडर काढून तगरीच्याखाली फांदीला घट्ट बांधला. अगदी योग्य ठिकाण आम्हाला गवसंल होतं. तगरीच्या चारपाच छोट्या फांद्या फिडरला खेटल्यागत होत्या. त्यामुळे तिथे थवे बसू शकतील एवढी जागा होती. फिडरला चारपाच चिमण्या बसतील अशी एक दांडी केलेलीच होती म्हणा. पण आता जरा जास्त मोकळी जागा आसपास झाली. फिडरची हि जागादेखील हॉलच्या खिडकीतून व्यवस्थित दिसंत होती. विशेष म्हणजे फिडर अंगणात फिरण्यार्‍यालासुध्दा सहजपणे दिसंत नसे. "चला, आता अभ्यासाकडे लक्ष दे. चिमण्या नक्की येतील आता इथं. तू दररोज वाट पहायला लागलीस कि त्या येणारच नाहीत. तू दुर्लक्ष करं. एक दिवस तुला चिवचिवाट ऐकू येईल. मग बघ. आणि मी कुठे बाहेर असलोच मला नक्की फोन कर" मी म्हणालो. " बाबा, तुम्ही नेहमी बिझी असता. तुम्ही कामात असला आणि तुम्हाला आम्ही फोन केला तर तुम्ही काही ऐकायच्या आतंच - महत्वाचं असेल तर पटकन सांग, नाहीतर मी नंतर तुला फोन करीन असं म्हणता आणि फोन कट करून टाकता" " हा फोन मी कुठेही असलो तरी घेईन आणि बोलेनसुध्दा" - मी "नक्की नां बाबा ? कारण तुम्ही कधी मिटींगमध्ये असता त्यावेळी फोन बंद करून ठेवता." "नक्की. म्हणजे अगदी प्रॉमीस. मी कुठेही असलो तरी फोन घेईन म्हटलं ना. बास...?" पुढे दोन दिवसातच तशी वेळ आली. मी एका कंपनीत मिटींगमध्ये होतो. खरंतर त्यात माझ्या कामाचा विषय नव्हताच. उगीच भरीस भर. मिटींग सुरू होऊन दहापंधरा मिनीटंच झाली असतील तेवढ्यात वल्लरीचा फोन. मी चेअरपर्सनला नम्रपणे सांगितलं हा फोन फार महत्वाचा आहे. मला घ्यावाच लागणार आहे. असं म्हणून मी कॉन्फरन्स रुमच्या बाहेर आलो. "बाबा, एक चिमणी फिडरच्या दांडीवर बसून बाजरी खातेय" वल्लरी अगदी हर्षोन्मादाने बोलत होती. "अरे व्वा ! अभिनंदन" मीपण ओरडत म्हणालो. ऑफिसमधल्या मिस् चिटणीसनी दचकून माझ्याकडे पाहीलं नंतर हसंत म्हणाली " काय सर, कसलं अभिनंदन करताय एवढ्या मोठ्यानी ?" "चिमणी बाजरी खातीये" मी म्हणालो. चिटणीस चक्रावूनच गेली. 'येडबीड लागलय काय ह्या माणसाला' असा चेहरा करून परत कामात गर्क झाली. हा प्रसंग तसा साधाच. पण महत्वाचे हे की चिमणी ह्या पक्ष्याची घरातून हकालपट्टी झाल्याने त्यांची संख्या कमी झाली आता बर्ड फिडरचे आमिष लावून बोलवावे लागते हे चिंताजनक. मुळात चिमणीला हाऊस स्पॅरो म्हणतात ते तिच्या घरात असणार्‍या वावरण्यामुळे. भिंतीच्या भोकात, पत्र्याच्या खाली, पोटमाळ्यावर, पोष्टाच्या पेटीत असणारी, सुतळी, कापूस, काथ्या, केरसुणीच्या काड्या, चिंध्या वापरून केलेली चिमण्यांची घरटी आता दिसेनाशी झाली. घरातल्या स्वच्छतेच्या आणि नीटनेटकेपणाच्या हव्यासापायी चिमण्यांची हकालपट्टी झाली. चिमणी ही बालपणापासूनची मैत्रीण. तिच्याबरोबर तर जेवणाचे घास शेअर केलेले आहेत. लहानपणी आईच्या तोंडून चिऊकाऊच्या गोष्टी, गाणी ऐकत झोपायचो. त्यातलं एक गाणं म्हणजे भा.रा. तांब्यांची सुंदर साधी कविता ; चिंव चिंव चिमणी छतांत, छतांत, अरसा लोंबे भिंतीला, भिंतीला चिमणी बघते सवतीला, सवतीला चिऊताई, चिऊताई काय करता हो.. हि तर तुमची पडछाया, पडछाया, उगाच शिणता कां वाया, कां वाया (मूळ कविता थोडी मोठी आहे.) म्हणजे घरातच काय कलासाहित्यातसुध्दा चिमणीचा वावर खूप आहे. शांतता कोर्ट चालू आहे नाटकात बेणारेंची व्यथा मांडताना विजय तेंडुलकरांनी ज्या जुन्या कवितेच्या ओळी वापरल्या होत्या, त्या हल्ली खरोखरच्या चिमणीला लागू आहेत "चिमणीला मग पोपट बोले, कां ग तुझे डोळे ओले ? काय सांगू बाबा तुला, माझा घरटा कोणी नेला पूर्वी तिचं घरटं नेणारे निदान कावळे, साप, मांजर हे प्राणी तरी असायचे. आता . . . . ?
लेखनप्रकार

याद्या 4656
प्रतिक्रिया 27

सुंदर....सुंदर ...लिहिलय....मार्मिक..' पूर्वी तिचं घरटं नेणारे निदान कावळे, साप, मांजर हे प्राणी तरी असायचे. आता . . . . ? आता मनुष्यप्राणी????????

खुपच छान लिहिले आहे... साध्या सरळ शब्दात छान प्रसंग उभा केला सत्यघटनाच वाटते आहे ही.. छान वाटले वाचुन. वल्लरी नाव पहिल्यांदाच ऐकले आणि आवडले ही. चांदणीचे झाड मला माहित नाहि कसे असते ?

प्रसंग तसा साधाच. पण महत्वाचे हे की चिमणी ह्या पक्ष्याची घरातून हकालपट्टी झाल्याने त्यांची संख्या कमी झाली आता बर्ड फिडरचे आमिष लावून बोलवावे लागते हे चिंताजनक. .... बालपणापासूनच्या मैत्रिणीची हकालपट्टी .... मनांत खरंच कुठेतरी आता खुपत आहे खरं !

परवाच कंपनीमध्ये सहकार्यांसोबतच्या चर्चेमध्ये हा विषय निघाला होता. शहरातुन काय निमशहरांतुनही चिमण्या गायब झाल्या आहेत. एकाने त्याचे एक कारण सांगितले आणि ते म्हणजे मोबाईल फोन्सच्या फ्रिक्वेन्सीज. मी जिथे राहतो त्या घरासमोरच एक बाग आहे तिथेही कधीही एकही चिमणी मला दिसली नाही. कावळे पण गायब झालेत. पण कबुतरे मात्र पुष्कळ दिसतात.

लेख आवडला... वाचताना माझ्या बालपणात घेऊन गेला. मला अंगणात उडणार्‍या, खेळणार्‍या चिमण्यांची फार गंमत वाटायची. मी एका जागी बसून शांतपणे जेवण करावं म्हणून आई ताटातला थोडा भात ओट्यावर टाकायची. ते खायल्या चिमण्या आल्या की मी त्यांना बघत-बघत अजिबात त्रास न देता जेवण करायचे, असं आई सांगते. आज काल मात्र चिमण्या दिसतच नाहित. मोबाईल फोन्सच्या फ्रिक्वेन्सीजमुळे चिमण्यांना त्रास होतो म्हणून त्या शहरात आढळत नाही असं ऐकलं होतं. त्यामानाने पॅरीसमध्ये तरी चिमण्या दिसतात आणि कबूतरे तर खूपच जास्त!

वर स्मिताने म्हटल्याप्रमाणे खूप मागे घेऊन गेला, घरातली, वळचणीतली चिमण्यांनी केलेली घरटी, त्यांची ती चिंध्या,काड्या गोळा करण्याची धडपड, चिमणी, चिमणी फिक्या करड्या रंगाची अंडी आणि मग त्यातून आलेल्या बाळचिमण्या... सगळं आठवलं... स्वाती

चिमण्यां वर नववी का दहावी ला एक धडा होता तो आठवला

सर्वेजण या माझ्या घरि, दररोज सकाळी शाळा आणि दुपारि माझ्या लेकाबरोबर जेवायला लै गुरदाळा असतोय इथं. घरात दोन तीन घरं पण आहेत चिमण्यांची. कावळे तर जरा जास्तच सोकावलेत. जानेवारितले काही फोटो इथं टाकले होते पहा. http://misalpav.com/node/16302. हल्ली पावसानं घरात घरात जास्त असत्यात सगळ्या. जरासं दाण्याचं भगरं कुट ९८ % आणि ओवा बारीक करुन२% टाका, इतर वे़ळी माती अन छोटे दगड खाउन पोटं साफ ठेवणारे आमचे मित्र पावसात मातीला चोच नाहीत लावत. पण लोकहो आमच्या घरी यायला विसरु नका बरं.

लहानपणी तांदूळ ठेवायचो चीमण्यांसाठी आणी आल्या की एकीला तरी पकडता यावे म्हणून खूप प्रयत्न करायचो. पण मग मला सज्जड दम दीला गेला की जर मी चिमणीला शिवलं तर कंपूतल्या इतर चिमण्या त्या चिमणीला टोचून टोचून मारून टाकतील, म्हणून त्यांचा मागे जाउ नकोस.... हे खरं आहे काय ?

ग्रेस यांचा लेख आठवला. 'चिमण्यांचा बहिष्कार' किंवा असंच काहीसं शीर्षक होतं त्याचं. आनंद यांनी वर उल्लेख केला तो धडा बहुदा हाच असावा. ग्रेस यांचा चर्चबेल या नावाचा ललित लेख संग्रह आहे. त्यात हा लेख आहे.

In reply to by श्रावण मोडक

पण त्यात उलटं आहे. चिमण्यांच्या त्रासाला कंटाळून घरटं जाळल्याने चिमण्यांनी टाकलेला बहिष्कार त्यात दाखवला आहे. प्रस्तुत लेख मात्र मला छान आशावादी आणि हृद्य वाटला.

होय! चिमण्या, कावळे आणि छोटे पक्षी निघून जाण्यासाठी आपण जबाबदार आहोतच. शहरातील वड, पिंपळ, उंबर अशी पक्ष्यांना आवडणार्‍या फळांची आणि सावली देणारी झाडे तुटत आहेत आणि त्याजागी निव्वळ शोभेची झाडे आणि फुलझाडांच्या कुंड्या दिसत आहेत. सिमेंटच्या उंच इमारतींमध्ये कबूतर वगळता कोणताही पक्षी राहात नाही. आमच्या संकुलात कबूतरे (पारवे) खूप आहेत. मला ती आवडत नाहीत कारण एकतर दिवसभर ती घुम्म-गुटर्र असा अस्वस्थ करणारा आवाज काढत बसलेली असतात आणि उडताना पंखांचा कर्कश्श फडफडाट करतात. परवा चुकून एक हळद्या पक्षी गच्चीतील जास्वंदावर आला आणि आरामात झोके घ्यायला लागला. तेवढ्यात शेजारच्या डक्टमधून पारवा फडफडला आणि हळद्या घाबरुन उडून गेला. चिमण्या जाण्यामागे ही त्रासदायक कबूतरे हेही एक कारण असावे, असे मला वाटते.

In reply to by योगप्रभू

मला ती आवडत नाहीत कारण एकतर दिवसभर ती घुम्म-गुटर्र असा अस्वस्थ करणारा आवाज काढत बसलेली असतात आणि उडताना पंखांचा कर्कश्श फडफडाट करतात. मलाही याच कारणांमुळे कबूतरे अजिबात आवडत नाहीत. एखादे कबूतर जरी शेजारून उडून गेले तरी त्या पंखांच्या फडफडाटाने घाबरायला होते. त्यात भर म्हणजे ते बाल्कनीत खूप घाण करून ठेवतात.

In reply to by रणजित चितळे

सहमत. नुकतीच आमच्या घराजवळ चिमणी दिसली (रंग किंचित वेगळा होता), माझ्या मुलाने लगेच विचारले की हा बर्ड कुठला आहे. फार वाईट वाटले. जालावर त्याला चिमणी दाखवावी हा विचार केला पण नंतर विसरले.

शहरातून चिमण्या गायब झाल्या आहेत हे वास्तव आहे... आणि याला आम्हीच कारणीभूत आहोत... - धनाजीराव वाकडे

बदलापूरला सुद्धा असाच एक उपक्रम राबवण्यात येतोय.....खूप स्तुत्य उपक्रम आहे. आमच्या ठाण्यात असला उपक्रम कधी राबवणार आहेत कोण जाणे? अवांतर : तुम्ही बदलापूरचे आहात काय?

लेख आवडला. मस्तच लिहिले आहे.