धिक्कार ते अधिकार : माझा प्रवास व्हाया..३
धिक्कार ते अधिकार : १ http://www.misalpav.com/node/17920
धिक्कार ते अधिकार :२ http://www.misalpav.com/node/17974
मेन्सचा रिझल्ट आल्यावर कळले, की ३४-३५ मार्कांनी इन्टरव्ह्यू कॉल हुकला. (तेव्हा ते फक्त ३०-३५ मार्क्स वाटले, पण नंतर पुढे त्यांचं महत्त्व कळालं...)
*************************************************************
मेन्स देऊन परत आल्यावर मी माझा दिल्लीतला मुक्काम हलवला.. तसंही तिथं राहून आता काही फायदा नव्हता. मी नागपूरला आलो, आणि S.I.A.C. नावाच्या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेत राहून अभ्यास करायला लागलो. पुन्हा प्रीलिम्स दिली. ह्यावेळी मात्र वेळ वाया घालवायचा नाही म्हणून लगेच दादाकडे अभ्यासाला निघून गेलो. प्रीलिम्सचा रिझल्ट जवळ आला, तसा आमच्या (प्रिपरेशनच्या) ग्रुपने मुंबईतून परीक्षा द्यायची असे ठरवलं. आता आली पंचाईत !!
माझी ही मुंबईची, आणि दादाला हे माहीत असल्याने तो काही जाऊ देणार नाही हे वाटतंच होतं. तो बोललाही तसं, पण मी अभ्यास करण्याचं सांगून, ग्रुपचा फायदा वगैरे सांगत त्याला कन्व्हीन्स केलं. वहीनींनी पण मला मदत केली. आलो मुंबईला..
इथे आल्यावर हिने खुप समजून घेतलं. खरंतर आम्ही जवळपास दोन वर्षांनी एवढे जवळ राहत होतो, पण तिने कधीच भेटायचा वगैरे हट्ट केला नाही...
ह्या वेळी माझ्या मित्रांना वाटायचं, की मी खुप टाईमपास करतोय. कारण की, ऑलमोस्ट दर दुसर्या-तिसर्या दिवशी मी हिला कॉलेजला जातांना भेटायचो. (ती सांभाळून घेत असली तरी मला चैन पडायला पाहीजे ना ;-)) तसंच, मी रोज संध्याकाळी मरीन ड्राइव्हवर पळायला आणि व्यायाम (इन्क्लूडींग डोळ्यांचा :D) करायला जायचो. त्यामुळे सगळ्यांना वाटतं होतं, की मी सिरीयस नाहीये अभ्यास आणि परीक्षेबद्दल म्हणून.. पण खरंच सांगतो, ह्याचा मला खूप फायदा झाला. तसाही दिवसभर अभ्यास करण्याचं नाटक करत बसण्यापेक्षा, स्वतःशी प्रामाणिक राहून, एन्जॉय करत अभ्यास केलेला कधीही बरा... मित्रांशी गप्पा मारत, कचर्याचा निचरा करत केलेला अभ्यास मेंदूवर कोरलाही जातो आणि तुम्ही कंटाळत पण नाही.
.....झालं. होल्ले होले Mains आली आणि आम्ही लिहून घालवली. नागपुरला परतलो. आता पुढचं टेन्शन यायला लागलं. ह्याही वेळी नाही झालं तर काय? एक तर आपण नुस्ते बी.एस्सी., त्यातही सेकंड क्लास.. म्हणून मग एम. बी. ए. साठी CET दिली. पुन्हा DUची Lawची परीक्षाही दिली.. आंणि पुढच्या भविष्याकडे वाट लावून बसलो.
मेन्स ते तिचा रिझल्ट ह्यात खूप वेळ जातो, जवळपास चार महीने. आपण परीक्षा दिली हेही विसरायला होतं कधी कधी...
४ मार्च २००९ :
आई-पप्पांना नात्यातल्या एका ठिकाणी जायचं होतं. मी त्यांना बस-स्टँडवर सोडायला जाणार, एवढ्यात मित्राचा फोन आला, "मेन्सचा रिझल्ट आलाय. पण सर्व्हर बिझी आहे." मी म्हटलं, बरं... आतून भिती वाटत होती. आईला सांगितलं. आईनी धीर दिला, "जास्त टेंशन घेऊ नकोस, जे होईल ते बघता येईल." मी त्यांना सोडून परत आलो. गावात कुठलं आलंय नेट्-बीट?? दादाला फोन केला नी रोल नंबर सांगितला. थोडा वेळ गॅसवर... दादानी फोन केला नी बोलला, " कॉन्ग्रट्स ! मेन्सचा किल्ला मारला तू." मी पुन्हा चेक करायला सांगितलं. नंतर भैयाला फोन करुन पुन्हा बघ म्हटलं... झालो होतो, आम्ही मेन्सच्या दरवाज्याला खिंडार पाडून इंटरव्ह्यूच्या खोलीकडे रवाना झालो होतो... काही दिवसातच इंटरव्ह्यूची तारीख सांगणारं पत्र आमच्या हातात पडलं...
४ एप्रिल २००९:
माझा इंटरव्ह्यू सकाळच्या सत्रात होता.. सकाळी सकाळी सजून UPSC च्या दरवाज्यातून आत शिरलो. आजपर्यंत ह्या गेटला फक्त आसुसल्या नजरेने बघत आलो होतो. आत येवून एका हॉलमधे आम्हाला गोलाकार टेबलांभोवती, इंटरव्ह्यू बोर्डप्रमाणे बसवण्यात आलं. मला श्री. चलम ह्यांचा बोर्ड होता. एक बोर्ड सहा जणांच्या मुलाखती घेणार, आणि माझा नंबर पाचवा.. ऑब्व्हियसली, टरकत होतीच... शेवटी माझा नंबर आला. आधीच्याचा इंटरव्ह्यू सुरु असतांनाच तुम्हाला बोलावून बाहेर बसवतात. मी बाथरुममध्ये जावून, सगळी ताकत लावून हलका होवून आलो. काही लोक एकदम "कूल" बनत होते. आपण टेंस होतो ब्वॉ... बोलावणं आलं..
दारावर टकटक करुन, "मे आय कम इन, सर" करुन आत शिरलो. इशारा केल्यावर खुर्चीत बसलो. तिथेही एका गोलाकार टेबलाभोवती सहा जण बसले होते. चेयरमन समोर, आणि दोघं जणं तर अगदीच पाऊण हाताच्या अंतरावर.. (ही जनरली तुमच्या हावभावांवर वगैरे नजर ठेवतात.)
चलम गुरुजींनी सुरुवात केली. "सो मिस्टर चिन्मय"
मी "यस सर" बोललो. मला वाटत होतं की माझ्या नावाच्या अर्थापासून सुरवात करतील. मी प्रॅक्टीस पण केली होती तशी... ;-)
चलम : "Chinmay, Yesterday was Ramnavmi."
मी : "Yes sir"
चलम : "It is celebrated at a few places even today"
मी: "May be, Sir"
चलम : "So tell about any large, ancient temple of Ram"
मी गप....
नंतर बोललो, "Do you want to know about any temple in and around Nagpur, Sir?"
ते म्हणे, "No. Tell me about a very famous temple, throughout India. It should be a large one, and atleast thousand years old"
मी मनात विचार करतोय. काही आठवेचना. एकदा मनात आलं की अयोध्येचं नाव घ्यावं, पण म्हटलं नको, अजून सब-ज्युडाईस आहे जागा. तेव्हढ्यात सरच बोलले, "Don't tell about Ayodhya as it is a disputed site."
मी काहीच बोलत नाही हे पाहून त्यांनी प्रश्न विचारला,
"Is Rama an ancient persona, or a modern one?"
मी उत्तर दिलं,"According to Hindu mythology, Ram is God and an ancient persona."
"So, tell me."
मी बोललो, "सॉरी सर, आय कान्ट रिकलेक्ट."
चलम : "Ok. It is Bhadrachalam, on the banks of Godavari in Andhra pradesh."
मी म्हणालो, "थॅन्क यु, सर."
त्यांनी पुढची तोफ डागली, "हू वॉज परशुराम?"
सगळे मेंबर्स त्यांच्याकडे बघायला लागले. त्यांनी 'ऐसेईच' टाईपमधे खांदे उडवले. मी मनात म्हणालो, "च्यायला, हे येडं मला IAS बनवायला बसलंय का पुजारी बनवायला?"
मी उत्तर दिलं, " परशूराम वॉज सन ऑफ सेज जमदग्नी अॅन्ड रेणूका. अॅन्ड ही किल्ड हीज मदर ऑन द ऑर्डर्स ऑफ हिज फादर."
चला, समाधान झालं असेल असं वाटत असतांनाच पुढचा प्रश्न, "विल यु डू दॅट?"
म्हटलं, "नो सर. अॅन्ड माय फादर वोंट एव्हर टेल मी टू डू सो." सगळे हसले.
त्यानंतर क्लायमेट चेंज, क्योटो प्रोटोकॉल वगैरे वर प्रश्न विचारुन त्यांनी मला बाजूच्या मॅडमच्या हातात सोपवलं. मॅडमनी गोध्रा, ऑनर किलींग वगैरे गोष्टींवर पिद्दा पाडला. त्यानंतर अरुणाचल, वंशवाद, भाजपाचा इलेक्शन मेमोरेंडा (जो त्याच दिवशी आला होता) वगैरे वर पिडून झालं. शेवटी एकानी माझ्या ग्रॅज्युएशन कॉलेजचे ३ प्लस आणि ३ मायनस पॉईंट विचारले.
सगळ्यात शेवटच्या सदस्याने प्रश्न विचारला," एवढ्यात कुठलं नवीन पुस्तक वाचलयंस?"
मी उत्तर दिलं, "ययाति, वि.स. खांडेकरांचं. पुस्तक जुनं आहे, पण मी आताच वाचलंय."
म्हणे, "ते तर मराठीत आहे."
म्हटलं," मी तेच लिहीलंय छंद म्हणून".
मला संक्षिप्त कहाणी विचारली पुस्तकाची. सांगितली. मला म्हणे, " तू काय शिकला ह्यातून ?"
म्हटलं, "भौतिक सुखं उपभोगण्यात काही वाईट नाही. पण कर्तव्य आलं, की ड्युटी प्रिसाईड्स ओव्हर प्लेजर."
फंडा भारी झाल्याने असेल कदाचित, एका मिनिटानी मला बाहेर पाठवण्यात आलं...
झालं... इन्टरव्ह्यू नंतर मी नागपूरला परत आलो. पहील्या वेळी प्रीलिम्सला उडलो, दुसर्या वेळी मेन्सला, त्यामुळे ह्यावेळी इन्टरव्ह्यूत दांडी उडणार अशी मला आशंका होती...
४ मे २००९:
प्रीलिम्स पून्हा जवळ आली होती. पण अभ्यासात काही मन रमेना.. म्हणून मग मावशीकडे जावून तिला आणि बहीणींना पिडत बसलो होतो. अडीच-तीनच्या दरम्यान मित्राचा फोन आला. (ही पण एक गंमत.. ह्या वर्षी सगळे रिझल्ट्स मला फोनवरच कळले.) "रिझल्ट आलाय. तुझी १३५वी रँक आहे." माझा विश्वासच बसेना. पुन्हा दादा, वैनी, भैय्याला फोन करुन बघायला सांगितलं.. नंतर SIACला आलो. सगळे अभिनंदन करत होते. मी त्यांना बोललो," थांबा रे बाबांनो, मला स्वतःच्या डोळ्यांनी बघु द्या एकदा.." बघितला रिझल्ट... काय वाटत होतं ते सांगता येत नाही...
वयाच्या १९व्या वर्षी २४चा गणला गेलेला, आणि वयाच्या ४०व्या वर्षी ग्रॅज्यूएट होण्याचं भविष्य वर्तवल्या गेलेला मी, २६व्या वाढदिवसाच्या महीनाभर आधी UPSCच्या फायनल मेरीट लिस्ट मधे आलो होतो !!
मला आधी माझ्या त्या "मातीत हात" वाल्या आजोबांना आणि त्या ज्योतिष्याला पेढे द्यायचे होते. आजोबांना ते दिलेही नंतर... ज्योतिषिबुवा मात्र माझं वर्तमान कळल्याने आणि आपलं भविष्य चुकल्याच्या धक्क्याने असेल, आधीच भुतकाळात जमा झाले होते.. :-(
नेमका दिवस आठवत नाही...
मी आईसोबत तुळजापुरला भवानी मातेच्या दर्शनाला गेलो होतो. मातेचं दर्शन घेऊन, गाभार्या बाहेरच्या आरतीमंडपात आलो. तेव्हढ्यात माझ्यासोबत सिलेक्ट झालेल्या मित्राचा फोन आला... मला IAS अलॉट झाली होती. I finally became an IAS Officer :-)
**************************************************************
हा लेख लिहीण्यामागे फक्त तोपगिरी वा आत्मस्तुती हा उद्देश नाही. तो थोडाफार असेलच. पण मुख्य कारण हे आहे की आता रिझल्ट्सचा वेळ जवळ येतोय.. कुणीही अपयशी ठरु नये ही सदिच्छा असली तरी कुणाला ना कुणाला अपयशाला सामोरं जावंच लागेल. कदाचित त्यातला कुणी आपल्या ओळखीतलाही असेल. अशावेळी एखाद्या खचलेल्या, ढेपाळलेल्या जीवाला, जो आत्मघाताच्या टोकावर उभा आहे त्याला, माझ्या ह्या प्रवासातून काही आधार मिळावा म्हणून हा खटाटोप. पालकांनीही अपयशाचे प्रामाणिक विश्लेषण करुन त्यांना पुढे लढायला आधार द्यावा ही विनंती..
माझ्या सिलेक्शन नंतर एका ठिकाणी मी बोललो होतो.
"अपयशानंतर आत्महत्या करुन स्वतःचा फोटो घरात टांगवून घेण्यापेक्षा, आय. ए. एस. बनून फोटो पेपरात झळकावून घेण्यात जास्त मजा आहे."
शेवटी सुरेश भटांच्या ह्या ओळी आहेतच की लढायची ताकत द्यायला....
"आजचे अमुचे पराभव पचवतो आम्ही उद्यास्तव
विजय तो कसला, उरावर जखम जो करणार नाही !!"
लढो....
***********************************************************
समाप्त !!
Book traversal links for धिक्कार ते अधिकार : माझा प्रवास व्हाया..३
वर्गीकरण
प्रतिक्रिया
झक्कास. आय. ए. एस. होणे ही
+१
मस्त रे चिगो .. सहि जा रेला
थँक्यु बॉस...
शिका काहीतरी प्यारे....
अधिकारानंतर
नक्कीच...
हरकत नाही
नक्कीच...
अभिनंदन! छान गोष्ट आहे तुमची.
अभिनंदन
अभिनंदन चिगो!
चिन्मय, अभिनंदन, खरोखर अभिमान
आई शप्पत! अभिनंदन, खरोखर
धन्यवाद...
उत्तम. श्रामोंशी सहमत.
सुरेख लिहिलं आहे. खूप आवडलं
भारी रे!!
खूप खूप
अभिनंदन! प्राथमिक खडतर
चिअर्स चिन्म्या :)
थँक्स धमुण्णा...
मस्त,प्रेरक आणी वास्तव
अभिनंदन सर.
भारी रे चिगो.. तुझ्या
मस्तच लेखमालिका. तुमच्या
हाहाहा...
काय सांगता?
थोडंफार बरोबर...
भारी रे!!! अभिनंदन तुझ ...
जबरदस्त रे मित्रा ! तुझ
शाब्बास!!!!!!
भारी
अभिनंदन, साहेब!
अरे बापरे...
कुठलेही देदीप्यमान (आपल्यासारखे) यश मिळवायचे
अजित जोशी - डहाणूकर काॅलेज का
अजित जोशी म्ह. तेच का ते
*आयएएस.
बरोबर..
ओह अच्छा, धन्यवाद. बाकी तो
अभिनन्दन!!!
पहील्या दोन भागात निर्माण
बाप रे..
अभिनंदन
अगदी असेच म्हणतो.
|| कौन कहता है, के आसमां में
छान!
मस्त
अभिनंदन!