✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ठाणे खादाडी - क्षणचित्रे..

ग
गवि यांनी
Mon, 04/11/2011 - 14:19  ·  लेख
लेख
आमच्या कट्ट्याचा जीव छोटा आहे हे माहीत असल्याने पुरेपूर कोल्हापूरमधे असलेलं चोवीस जणांची व्यवस्था असलेलं छोटंसंच ए.सी. कंपार्टमेंट आम्ही अडवून ठेवलं होतं. मी आणि स्पावड्या साडेसातालाच तिथे पोचलो. स्पावड्यासोबत सुधांशू आणि वपाडाव आलेले होते. नंतर बराच काळ डोक्यांचा काउंट चारवरच स्थिर होता. सगळेजण जमेपर्यंत म्हणजे साडेआठपर्यंत आम्ही चौघे तिथेच खड्या पारश्यासारखे पण गप्प न राहता गप्पा हाणत उभे राहिलो. आम्ही सर्वच जण (स्पावड्या धरुन) एकमेकांना पहिल्यांदाच बघत होतो. मग "ओळखा पाहू" चा मस्त राउंड झाला. आपापल्या टोपणनावांविषयी प्रत्येकाने (खरे काय त्याचा थांग लागू न देता) डीटेलवार सांगितलं. तेवढ्यात मदनबाण तिथे येऊन रुतला. पुन्हा "ओळखा पाहू"चा मजेदार सोहळा आणि "मदनबाण" या नावाची चिरफाड झाली. विश्वनाथ मेहेंदळे असे नाव सांगत एक तरुण हजर होताच आम्ही सर्व अचंबित झालो. मेहेंदळे यायचे बाकी आहेत हे माहीत असल्याने मलमलीचा सदरा लेंगा घातलेले, हातात भाजीची पिशवी असे एखादे नुकतेच रिटायर्ड गृहस्थ पाहण्याच्या तयारीत आम्ही उभे होतो आणि हे काहीतरी वेगळेच. मग लीमाउजेट आली. तिचे नाव "लीमाउजेट" का आहे? याचा पत्ता मात्र अज्जिबात लागला नाही बॉ. त्याच सुमारास मिसळलेला काव्यप्रेमी हजर झाला. मग मात्र आम्ही आपली रिझर्व केलेली जागा हातची जाऊ नये म्हणून हॉटेलात घुसलो. स्थानापन्न होऊन ऊर्दू वाचनपद्धतीने मेन्यूकार्डावर नजर टाकताक्षणीच उजव्या बाजूचे आकडे वाढलेले आहेत हे लक्षात आलं. धाग्यात आम्ही टाकलेलं मेन्यूकार्ड नोव्हेंबर वीसशेदहातलं होतं. त्यानंतर ही वाढ झालेली दिसून गोंधळाने सुरुवात होण्याची प्राचीन परंपरा आपण पार पाडणार हा समाधानकारक विचार माझ्या आणि स्पावड्याच्या मनात आला. पण उपस्थित मिपामित्रगणांनी त्यावरून मनात आलेले स्वल्पगालिप्रदान मनातच ठेवले आणि चेहर्‍यावर येऊ दिले नाही. उदाहरणार्थ हे पहा: सुधांशू, वपाडाव, लीमाउजेट आणि विश्वनाथ मेहेंदळे यांनी मेन्यू पाहूनही चेहर्‍यावर ठेवलेलं हसू.. तदनंतर हात्तेच्या म्हणायची वेळ मजवर आली. कारण स्पावड्या धरुन पाच सहा जण आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत असे म्हणू लागले. रे देवा..आधी माहीत असते तर "पुरेपूर कोल्हापूर" ऐवजी कर्व्यांच्या "स्वाद थाळी"तच गेलो असतो की.. असो.. पण व्हेज थाळीचा मेनू पाहून मजसारखे "पोहणारे, धावणारे आणि सरपटणारे जीव पोटात घालण्यास उत्सुक (आभार: शिरीष कणेकर)" सामिषाहारी मेंबर्सही व्हेज खाण्याचा विचार करु लागले. आम्ही तासभर उभ्याने वाट पाहून अखेरीस लाभलेले विजुभाऊ मात्र "रामदासकाका आल्याशिवाय आणि त्यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय मी अन्नाला स्पर्श करणार नाही", असं म्हणू लागले. (त्यामुळे बहुधा समोर बसलेल्या मदनबाण आणि मिसळलेल्या काव्यप्रेमींनाही काही मागवता येईना.) शेवटी मदनबाणांनी नुसतीच सोलकढी मागवली. आणि मिसळलेल्या काव्यप्रेमींची शाकाहारी थाळी समोर येऊन हजर झाली तरी एकट्यानेच कुठे खायचे म्हणून उगीच पापड कुरडया खाऊन त्यांनी भागवाभागवी करायला सुरुवात केली. पण तेवढ्यात अखेर रामदासकाका आले.. त्यांच्या सोबत गुलाबी पानांची डायरी होती. (मी फक्त निरिक्षण नोंदवले..). त्यांनी आल्या आल्याच आपण जेवणार नाही असे जाहीर केले. मी आणि मेहेंदळे हे दोघेच मांसाहारी उरलो होतो. त्यामुळे विजुभाऊंना मांसाहाराच्या गळास लावून आपली संख्या वाढवण्यासाठी तातडीने धनगरी मटणताट मागवून आम्ही दोघे त्यांच्यासमोर चापू लागलो. अखेरीस विजुभाऊ आमच्या क्लबात आले. मधेच जयपालही येऊन थोडावेळ गप्पा मारुन गेले. तेवढ्यातच खादाड अमिता स्वहस्ते घरी बनवलेले चॉकलेट मार्बल केक्स घेऊन घटनास्थळी पोहोचली. (एव्हाना ठ्ठोठ्ठो हसण्याच्या आवाजाने आणि एकूण गप्पागोंधळ घालून मिपाकरांनी त्या लहानशा खोलीचे "घटनास्थळ" बनवले होते..) हे केक जेमतेम फोटो काढेपर्यंत टिकून राहिले. नंतर दहावीस सेकंदात रिकामा डबा उरला. केकची चटणी नावाची उत्स्फूर्त पाकृ समस्त उपस्थितांनी बनवली. मग मात्र गप्पा आणि बडबडीने थकलेले सर्वजण गपागप खाण्यात गुंगले. तेवढावेळ एकदम शांतता झाली. रामदासकाका उपास सोडायला तयार नाहीत हे लक्षात आल्यावर बाजूला बसलेल्या स्पावड्याने त्यांचा नाद सोडून आपली थाळी रिकामी केली आणि हात वाळवत बसला..मागे खादाडताईही उगीच मला जेवायचं नाही म्हणत पोळीभाजी घ्यावी तशी काहीतरी थोडंसं घेऊन बसली. अशा अल्पाहारी मेंबरांना आधी चोवीस तास उपास ठेवण्याची वेगळी सूचना यापुढे सर्व कट्टा करणार्‍यांनी द्यावी अशी विनंती. शेवटी साग्रसंगीत जेवण झाल्यावर आणि बाहेर वेटिंगलिस्ट वाढतेय असं दिसल्यावर अत्यंत नाईलाजाने कट्टेकरी हात धुवून रस्त्यावर आले. मदनबाण "निघतो" म्हणून गायब झाले. अमिताताईलाही निघावे लागले. सर्वसाक्षी, विजुभाऊ आणि रामदासकाकांनी गप्पांना पुन्हा तोंड फोडले. फोटो काढण्यासाठी अनेकदा सर्वांचे कोंडाळे फोडून चेहरे कॅमेर्‍याकडे वळवावे लागत होते, इतका गप्पांना जोर चढला होता. तुमच्या जीवनातले तुमचे प्रियकर / प्रेयसी यांच्या बाबतीत दोन गोष्टी होतात : "एकतर तुमचं त्यांच्याशी लग्न होतं, किंवा ते तुमचे आयडी, पासवर्ड होतात..", इति विजुभाऊ.. वगैरे अशी उपयुक्त वचने ऐकताना धमाल येत होती. कट्टा सार्थकी लागत होता आणि पाय मात्र दुखायला लागले होते. तरीही दर दहा मिनिटांनी कोणीतरी म्हणायचं, "चला.निघूया आता..मजा आली..वगैरे.." आणि तरीही कोणीच तिथून न हलता परत गप्पा पुढे सुरु व्हायच्या. असाच तास सव्वा तास गेला. मग नाईलाजाने एकेक गडी गळायला लागला. स्पावड्या, वपाडाव, सुधांशू वगैरे सांसारिक वेसणीत न अडकलेली मंडळी मध्यरात्र उलटून गेली तरी कट्ट्यात आणि गप्पांत रंगली होती. (त्यांनी नंतर एकट्याने आइस्क्रीम खाल्ले असे ऐकतो.. नोंद घेतली आहे. योग्य वेळी कारवाई करण्यात येईल.) एकूण कट्टा आनंदात पार पडला. खूप मोठा कट्टा नव्हता, अगदी छोटासाच. पण जवळजवळ सर्वच जण एकमेकांना पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटत होते. रोजच्या नोकरी आणि घर अशा साच्यात अडकून गेलेल्या लाईफमधे नवीन मित्र मिळणं ही किती गरजेची गोष्ट होती हे या कट्ट्यामुळे जाणवलं. कॉलेज संपल्यापासून अशा मनसोक्त गप्पा कोणाशीच कधी झाल्या नव्हत्या. तात्यांची अगदी निघण्याच्या वेळेपर्यंत वाट पाहूनही ते आलेच नाहीत याचं मात्र खूप वाईट वाटलं.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
प्रतिसाद
प्रतिक्रिया
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
37664 वाचन

💬 प्रतिसाद (119)

प्रतिक्रिया

ब्बॉर!

मी ऋचा
Tue, 04/12/2011 - 10:58 नवीन
ब्बॉर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

क्यों बेटा? मन में लड्डू

स्पा
Mon, 04/11/2011 - 16:32 नवीन
क्यों बेटा? मन में लड्डू फूटा? हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments

तेजायला विजूभाऊंचा जेवणाच्या

नितिन थत्ते
Mon, 04/11/2011 - 16:37 नवीन
तेजायला विजूभाऊंचा जेवणाच्या कार्यक्रमाखेरीज फोटो खूप काळात पाहिल्या गेलेला नाही.
  • Log in or register to post comments

अगदी राम बनाये जोडी दिसते ही

वाहीदा
Mon, 04/11/2011 - 16:53 नवीन
विजुभाऊ मात्र "रामदासकाका आल्याशिवाय आणि त्यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय मी अन्नाला स्पर्श करणार नाही", असं म्हणू लागले. रामदास काका अन विजुभाऊ ,म्हणजे अगदी राम बनाये जोडी दिसतेय जिवश्च कंठश्च मित्र !
  • Log in or register to post comments

विजु भाउ ...

कुंदन
Mon, 04/11/2011 - 17:14 नवीन
विजु भाउ हळुच तिरप्या नजरेने मेन्यु कार्ड अन त्यावरील किंमतींचा अंदाज घेत आहेत असे दिसत्येय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

>>>>जिवश्च कंठश्च मित्र ! जीव

प्यारे१
Tue, 04/12/2011 - 09:29 नवीन
>>>>जिवश्च कंठश्च मित्र ! जीव जाईपर्यंत कंठ दाबून धरणारा मित्र अशीही एक व्याख्या प्रचलित आहे. मी आपलं सांगितलं हो.....;) बाकी एवढे सगळे शाकाहारी असताना 'पुरेपुर कोल्हापूर'ला जाणे म्हणजे .... काय कारण काय हो गवि????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

एवढे सगळे

गवि
Tue, 04/12/2011 - 09:49 नवीन
एवढे सगळे शाकाहारी आहेत हा साक्षात्कार घटनास्थळीच झाला. ज्याने माझ्यासोबत मिळून प्लॅन केला तो स्पासुद्धा त्यातलाच निघेल असं वाटलं नव्हतं. इतरांचा तर काहीच अंदाज नव्हता. मूळ धाग्यावर फक्त वपाडावने आपण शुशा असल्याचं जाहीर केलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

काय गवि मीसुद्धा म्हणालो होतो.

सूड
Tue, 04/12/2011 - 13:55 नवीन
काय गवि मीसुद्धा म्हणालो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हार्दिक अभिनंदन

नि३सोलपुरकर
Mon, 04/11/2011 - 17:14 नवीन
पुढच्या कट्ट्याला शुभेच्छा!!. आयडींमागच्या व्यक्ती पाहण्यास मिळाल्या.. छान अवातर : पुण्यातील नियोजीत कट्ट्याचे वर्णन.(५० फक्त याचेकडून हे वेगळे सागणे न लागे) आणि फोटो (आयडींमागच्या व्यक्ती ) पाह्ण्यास उत्सुक....
  • Log in or register to post comments

मस्त कट्टा आनि व्रुत्तंत बाकि

मुलूखावेगळी
Mon, 04/11/2011 - 17:57 नवीन
मस्त कट्टा आनि व्रुत्तंत बाकि मेहेन्दळे बद्दल माझा पन असाच अंदाज होता. पन ह्या कट्ट्याचा निषेध. काल स्पाने लिन्क दिली अन फोटु बघुन मी टरबुजा वर नाही राहु शकले. मला सॅन्डविच वर भागवावे लागले :(
  • Log in or register to post comments

मस्तच!!

स्मिता.
Mon, 04/11/2011 - 18:09 नवीन
ठाणे कट्टा एकदम जोरदार झाला म्हणायचा!! फोटोंसहीत वृतांत आवडला. आयडींचे चेहरे बघून छान वाटलं. असेच कट्टे आणखि जमू द्यात. आता पुढच्या कट्ट्याच्या प्रतिक्षेत...
  • Log in or register to post comments

फोटू आणि कट्टा वर्णन

रेवती
Mon, 04/11/2011 - 18:12 नवीन
फोटू आणि कट्टा वर्णन झकास! तेवढ्यात मदनबाण तिथे येऊन रुतला. खी खी खी. विश्वनाथ मेहेंदळे ही व्यक्ती वयस्कर नाही हा अंदाज होताच पण इतका चुकेल असे वाटले नव्हते. अमिताबाईंनी कट्ट्यास हजेरी लावूनही काही फारसे न खाता सगळ्यांसमोर डाएटींगचा आदर्श ठेवला आहे......अजिबात घोटाळा न करता!;) केक हा लो फ्याट होता की नाही? सगळ्यांचे फोटू छान आलेत. रामदास उशिरा येण्याचं कारण म्हणजे त्यांना सध्या मिपा आणि सामना यातील लेखनाला भरपूर वेळ द्यावा लागतो. पुढील कट्ट्यास शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

हेच म्हणते.. खादाड बाई तेथे

प्राजु
Mon, 04/11/2011 - 20:29 नवीन
हेच म्हणते.. खादाड बाई तेथे येऊनही न खाताच राहिल्या!! दॅट्स द स्पिरिट! :) बाकी फोटो पाहून काही अंदाज साफ चुकले आहेत याचि खात्री झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ठाणे कट्टा एकदम जोरदार झाला

निवेदिता-ताई
Mon, 04/11/2011 - 18:32 नवीन
ठाणे कट्टा एकदम जोरदार झाला म्हणायचा!! फोटोंसहीत वृतांत आवडला!!!!!!!!
  • Log in or register to post comments

जब्रा. I miss

नरेशकुमार
Mon, 04/11/2011 - 19:05 नवीन
जब्रा. I miss yaaaaaaaaaaaaaarrrrrrrrrrrrrrrrrr !!!!!!!!!!!!!!!!!!!!
तुमच्या जीवनातले तुमचे प्रियकर / प्रेयसी यांच्या बाबतीत दोन गोष्टी होतात : "एकतर तुमचं त्यांच्याशी लग्न होतं, किंवा ते तुमचे आयडी, पासवर्ड होतात..",
ह्म्म्म्म्म्म.
  • Log in or register to post comments

क ड क!!!

प्रभो
Mon, 04/11/2011 - 19:11 नवीन
क ड क!!!
  • Log in or register to post comments

आँ?

धमाल मुलगा
Mon, 04/11/2011 - 19:46 नवीन
काय रे? काय पाहतोयस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

मटणताट......बाकी कोणते फटू

प्रभो
Mon, 04/11/2011 - 19:50 नवीन
मटणताट......बाकी कोणते फटू दिसलेच नाहीत... ;) असो कालच अंजापार-चेट्टीनाड हाटेलात जाउन उत्तम असा मटण खिमा पराठा हादडून आल्याने जास्त जळजळ झाली नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

कट्ट्याला खरोखरच धमाल आली.

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 04/11/2011 - 19:27 नवीन
कट्ट्याला खरोखरच धमाल आली. स्पा ने स्वतःचे वर्णन केले होते तसाच तो दिसतो हे बघून आश्चर्य वाटले (म्हणजे तो धागा मनापासून काढला होता. च्यामारी, हल्ली कुणाला डू आयडी गृहीत धरायची सोय उरली नाही.) गवि जसे दिसत असतील असे वाटले होते तसे अजिबात दिसत नाहीत, त्यामुळे आश्चर्य हे दुतर्फा होते. पुढील वेळेस त्यांनी खरे विमान आणल्यास मी पण मलमलीचा सदरा लेंगा घालून आणि हातात भाजीची पिशवी घेऊन हजर होईन हे वचन. ;-) "खादाड अमिता" चा केक मस्तच आणि कोल्हापुरी जेवण पण फर्मास. धनगरी मटण सहीच. त्या दिवशी प्रथमच वजरी खाल्ली, तो नक्की काय प्रकार आहे हे माहित असून सुद्धा. (वजरी चा अर्थ जिज्ञासूंनी खव मध्ये विचारावा) कट्टा आयोजित केल्याबद्दल स्पा आणि गवि या जोडीचे आभार. आणि हो कट्ट्याच्या शेवटी त्यांनी दिलेल्या सरप्राईज बद्दल पण ;-) सर्वांना भेटून बरे वाटले. पुन्हा भेटू, पुढील कट्ट्याला !!! ता.क. :- एक दोन जणांकडून (हे कोण आहेत ते त्यांना आणि कट्टेकरांनाच कळेल) शिव्यांची लाखोली आणि प्रत्यक्ष भेटल्यावर लाथा मिळणार आहेत, असे गृहीत धरत आहे.
  • Log in or register to post comments

>>>> एक दोन जणांकडून (हे कोण

बबलु
Tue, 04/12/2011 - 10:37 नवीन
>>>> एक दोन जणांकडून (हे कोण आहेत ते त्यांना आणि कट्टेकरांनाच कळेल) शिव्यांची लाखोली आणि प्रत्यक्ष भेटल्यावर लाथा मिळणार आहेत, असे गृहीत धरत आहे. खि: खि: खि: !!!!!! खा मार खा आता लेका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

ठाणे तिथे काय उणे असे

निनाद मुक्काम …
Mon, 04/11/2011 - 20:28 नवीन
ठाणे तिथे काय उणे असे म्हणावेसे वाटते . ठाणेकर मिपाकरांची कट्याला गैरहजेरी जाणवली . मेहंदळे ह्यांच्याविषयी वर उल्लेख केलेले वर्णन योग्य आहे. .विशेष कोणतेही प्रयत्न न करत केवळ सकस प्रतिसाद देऊन मेहेंदळे ह्यांचे एक व्यक्तिचित्र मिपाकरांच्या मनात नकळत उभे केले. .ते तरुण आहेत ह्यांचा गौप्य स्फोट एका व्यनी मध्ये आधीच झाला होता. त्यांना जेव्हा मी काका असे संबोधिले तेव्हा'' अरे मी तुझा समवयस्क आहे .'' हे वाक्य वाचताच मी तीनताड उडालो . अल्पकाळात कट्टा जमवून यशस्वी केल्याबद्दल कट्टा वीरांचे अभिनंदन
  • Log in or register to post comments

निनाद ने एवढा सुरेख प्रतिसाद

स्पा
Mon, 04/11/2011 - 20:03 नवीन
निनाद ने एवढा सुरेख प्रतिसाद दिल्याचे पाहून खूप बरे वाटले... निन्या आभार रे
  • Log in or register to post comments

कट्टा आवडला!

चतुरंग
Mon, 04/11/2011 - 20:14 नवीन
एकेक वीर आणि वीरांगना बघून धन्य झालो! मदनबाणा समोर सध्या दुसरे 'लक्ष्य' असले तरीही तो कट्टयात येऊन रुतला हे विशेष! ;) आणि रामदासकाका उशिरा येण्याचे कारण त्यांच्या हातातली गुलाबी डायरी असावे! ;)
  • Log in or register to post comments

झकास

चिरोटा
Mon, 04/11/2011 - 20:16 नवीन
झकास कट्टा.
  • Log in or register to post comments

पुण्याच्या कट्ट्याची खादाडी

निनाद मुक्काम …
Mon, 04/11/2011 - 20:40 नवीन
पुण्याच्या कट्ट्याची खादाडी सचित्र वृतांत सह पाहण्यास उत्सुक ह्यात नवे, जुने पुणेकर खादाडीत रंगत आणतील ह्यात शंका नाही . माझ्या आख्यानात माझे एवढे फोटो असतात की मला प्रत्यक्ष न भेटता देखील माझ्या विषयी समग्र माहिती बर्याच मिपाकरांना आहे डू आयडी चा प्रश्नच नाही . ..( कदाचित प्रत्यक्ष भेटता येत नाही म्हणून माझी माझ्या परिवारातील सदस्यांची सातासमुद्रापलीकडून जवळीक साधण्याचा केविलवाणा प्रयत्न असतो .) च्यायला येथे बऱ्याच मराठीचा एक शब्द कानावर पडेल तर शपथ . ह्या आयटी मध्ये सगळे सायाबराबाद मधील लोक असतात .आमच्या मराठी आयटी वीरांनी दिनेश दा सारखी जर्मनीला का बरे आपली कर्मभूमी करून घेत नाही ? .
  • Log in or register to post comments

पुढील कट्ट्याला पुन्हा नक्की भेटू.

सूड
Mon, 04/11/2011 - 20:52 नवीन
मी, वपाडाव आणि स्पा ठाकुर्लीहून एकत्र ठाण्याला यायचं ठरलं होतं. ठाकुर्लीला मी ज्या ट्रेनमधून उतरलो त्यातूनच वपाडाव उतरला. दोघे एकाच इंडिकेटर खाली उभे राहून स्पा ला कॉल करत होतो. स्पा चा फोन व्यस्त, तो गविंशी बोलत होता. मीही सारखा डिस्कनेक्ट करुन कॉल ट्राय करतोय हे वपाडाव शेजारी उभा राहून बघत होता, त्याचा समज झाला की मीच स्पा आहे आणि आम्ही दोघे एकमेकांना कॉल करतोय. अशी सगळी मजा मजा झाली. कट्ट्याला जमलेल्या पहिल्या तीनात मी होतो (अधोरेखित करावं का ?). नंतरची गंमत म्हणजे नाक्यावर उभी, पत्ते विचारणारी, चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह असलेली मंडळी पाहिली की, हे पण कट्ट्यालाच आलेले दिसतायत असे भाव चेहर्‍यावर येत. आश्चर्य म्हणजे विश्वनाथ मेहेंदळे, आम्हाला (म्हणजे निदान मला तरी) वाटलं हे आजोबा कट्ट्याला काय म्हणून येतायत देव जाणे. एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे कट्ट्याला आलेल्या सर्वांनी स्पा यांना अगदी न चुकता ओळखले आणि स्पा हे 'स्पा ' आयडी का मिरवतात तेही कळले. आयडींच्या मागच्या व्यक्ती आणि वल्लींची भेट घडली. कट्टा संपला तरी ठाणे स्टेशनवर आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या. साडेबाराच्या कर्जत गाडीने शेवटी घराकडे कूच केले. इतक्या उत्साहाने कट्टा आयोजित केल्याबद्दल आणि शेवटच्या सरप्राईजबद्दलही स्पा, गविंचे आभार. पुढील कट्ट्याला पुन्हा नक्की भेटू.
  • Log in or register to post comments

धमाल कट्टा झाला म्हणायचा!!

शिल्पा ब
Mon, 04/11/2011 - 21:39 नवीन
धमाल कट्टा झाला म्हणायचा!! मटनताट अन शाकाहारी ताट दोन्हीही चवदार दिसताहेत... बाकी विमे, गवि,लीमाउजेट वगैरे अंदाज चुकलेच म्हणायचे :) खादाडीसाठी जमुन न खाताच निघुन गेलेल्या अन स्वतःला खादाड अमिता म्हणवणार्‍या अमिताबाईंचा निषेध.
  • Log in or register to post comments

असे कट्टे वारंवार होवोत! फोटो

बिपिन कार्यकर्ते
Mon, 04/11/2011 - 21:48 नवीन
असे कट्टे वारंवार होवोत! फोटो छान आले आहेत. काही अंदाज भलतेच चुकले आहेत तर काही काही अंदाज भलतेच बरोबर आले आहेत. चालायचंच. थत्तेचाचांशी सहमत आहे. ;) रामदासकाकांची गुलाबी डायरी बघून आश्चर्य वाटले नाही... गोडबोलेच ते शेवटी. असो. त्याच दिवशी, त्याचे वेळेस आम्हीही एक उत्स्फूर्त छोटेखानी कट्टा केला. हॅहॅहॅ!!!
  • Log in or register to post comments

बहुत संतोष जाहला..

धमाल मुलगा
Mon, 04/11/2011 - 22:09 नवीन
श्रीमन् स्पा, श्रीमन् गगनविहारी ह्या कट्टायोजक द्वयीचे कवतिक करणे तितुके तोकडे! ऐसेच समस्त मिपाजन मेळवावा, मिपाधर्म वाढवावा!! कोणे एके काळी मिपागावाचा आद्यकट्टा योजुन मिपाधर्माचा बंधूभाव वाढविणेच्या भावनेस प्रयत्न करणार्‍या मज, आज ह्याची चिंता नोहे. तिकडे स्पा, गवि तैसेच, इकडे हर्षद, वल्ली ऐसि रत्ने मिपाधर्मास मिळाली ह्याचा बहुत संतोष आहे. ------ लेको, जंक्षान मजा केली की रे..निस्त्या चैन्या केल्या म्हणायच्चं की! आणि, साक्षात सर्वसाक्षीदेवांचं दर्शन झालं म्हणजे काय हो...ब्येष्टच की. :) उदंड कट्टे व्हावे, मैत्र जिवांचे वाढावे ही तो श्रींची इच्छा! -(आद्य कट्टाकारक ;) ) ध. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------- मिसळपाव मस्तकी धरावा| अवघा कल्लोळ माजवावा|| मिपाजन तितुका मेळवावा| मिपाधर्म वाढवावा|| :)
  • Log in or register to post comments

सचित्र वर्णन फारच मजेशीर आहे.

शुचि
Tue, 04/12/2011 - 02:21 नवीन
सचित्र वर्णन फारच मजेशीर आहे.
  • Log in or register to post comments

शेवटचे सरप्राईज

स्मिता.
Tue, 04/12/2011 - 02:31 नवीन
हे शेवटचे सरप्राईज काय प्रकार आहे? काय होते ते? की आम्हा न येऊ शकलेल्या लोकांना उगाच विचारात टाकायला ठाणे कट्ट्यावाल्यांची चाल आहे??
  • Log in or register to post comments

मटणताटा मुळे जीभ लाळेच्या

इरसाल
Tue, 04/12/2011 - 10:57 नवीन
मटणताटा मुळे जीभ लाळेच्या सागरात पोहायला लागली. बाकी गविंचे वर्णन आणि फोटो दोन्ही मस्तच
  • Log in or register to post comments

>>>>गविंचे वर्णन आणि फोटो

प्यारे१
Tue, 04/12/2011 - 11:35 नवीन
>>>>गविंचे वर्णन आणि फोटो दोन्ही मस्तच काय माणूस आहे राव 'भारी'च नै..... ;) (घाबरु नका हो 'गवि'. आम्ही पण 'गवा'च आहोत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

वा वा वा.. झक्कास वर्णन.

llपुण्याचे पेशवेll
Tue, 04/12/2011 - 11:15 नवीन
वा वा वा.. झक्कास वर्णन.
  • Log in or register to post comments

वा !

प्राजक्ता पवार
Tue, 04/12/2011 - 22:36 नवीन
एकदम जोरदार झाला कट्टा . फोटो व वर्णन दोन्ही मस्तं .
  • Log in or register to post comments

वा!!

पिवळा डांबिस
Tue, 04/12/2011 - 23:31 नवीन
छान कट्टा आणि सुरेख वर्णन!! अभिनंदन!! आमचे परममित्र श्री. रामदास आणि श्री. विजुभाऊ हे शिंगे मोडून वासरांत यशस्वीपणे वावरतांना पाहून डोळे पाणावल्या आहेत!! :)
  • Log in or register to post comments

मस्त वर्णन आणि फोटो, ते

पुष्करिणी
Wed, 04/13/2011 - 00:14 नवीन
मस्त वर्णन आणि फोटो, ते शेवटचं सरप्राइझ काय होतं ते सांगा की कोणीतरी..
  • Log in or register to post comments

+ १

मेघवेडा
Wed, 04/13/2011 - 00:43 नवीन
मलाही हाच प्रश्न पडला आहे केव्हाचा. बादवे, कट्टावृत्तांत झकास हो गवि! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

च्यायला हा "कट्टा काळजात

माझीही शॅम्पेन
Wed, 04/13/2011 - 23:19 नवीन
च्यायला हा "कट्टा काळजात घुसला" , पुढचा कट्टा ठाण्यात जून मध्ये असेल तर नकीच हजर होईन च्यायला सरप्रईझ काय असाव माथेरांच खरडिस्तान झाल १. गविनि सगळ्याच बिल दिल ? २. पुरेपूर कोल्हापूर माझाच मालकीच आहे हे जाहीर केल ? ३. अवलिया हा माझाच डू-आयडी आहे अस जाहीर केल ? कुणीतरी लवकर सांगा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

हे गविच सांगू शकतील.

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 04/14/2011 - 00:49 नवीन
हे गविच सांगू शकतील. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

तेजायला विजूभाऊंचा जेवणाच्या

विजुभाऊ
गुरुवार, 04/14/2011 - 11:04 नवीन
तेजायला विजूभाऊंचा जेवणाच्या कार्यक्रमाखेरीज फोटो खूप काळात पाहिल्या गेलेला नाही. नितिन थत्ते मलादेखील ते जाणवलय. पण काय कर्णार... नोंद घेतल्या गेली आहे. ... नेक्ष्ट टैम मी पोहोण्याच्या ड्रेस मध्ये पोज देईन आणि रामदसकाका आईस स्केटिंग च्या पोशाखात ( खात खात) पोज देतील प्रभू मास्तर स्वतः परीक्षा देतानाचा फोटो देतील आणि त्या कट्ट्याला नितीन थत्ते चाचा बील देण्याच्या पोज मध्ये फोटो देणार देतील ;)
  • Log in or register to post comments

... नेक्ष्ट टैम मी

टारझन
गुरुवार, 04/14/2011 - 11:11 नवीन
... नेक्ष्ट टैम मी पोहोण्याच्या ड्रेस मध्ये पोज देईन
=)) =)) =)) नहीईईईईईईईईईईईईईई ... ये देखने से पैले उठा ले रे बाबा ..
आणि त्या कट्ट्याला नितीन थत्ते चाचा बील देण्याच्या पोज मध्ये फोटो देणार देतील
त्यांनी गप्प रहाण्याचे ठरवले आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

शेवटचे सरप्राईज म्हणजे

खादाड अमिता
Fri, 04/15/2011 - 20:23 नवीन
शेवटचे सरप्राईज म्हणजे गवि आणि स्पा ह्यांनी सगळ्यांचे बिल दिले. आम्हाला कोणाला पैसे द्यावे लागले नाहीत. गवि : किती छान निरुपण केलंय (माझ्या जेवणाविषयी ची टिप्पणी सोडता :( ) स्पा: कट्ट्याचे आयोजन आणि फोटो बद्दल अभिनंदन. दोघांचे खूप आभार. आता पुढचा कट्टा कुठे?
  • Log in or register to post comments

ओके धन्यवाद ! माझा एक अंदाज

माझीही शॅम्पेन
Fri, 04/15/2011 - 20:38 नवीन
:) ओके धन्यवाद ! माझा एक अंदाज खरा ठरला तर (तोडलेल्या अनेक तार्या पैकी एक ) !!
दोघांचे खूप आभार. आता पुढचा कट्टा कुठे?
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खादाड अमिता

वरून चौथ्या फोटो मध्ये नेमका

खटपट्या
गुरुवार, 10/24/2013 - 21:10 नवीन
वरून चौथ्या फोटो मध्ये नेमका मदनबाण कोण आणि मिसळलेला काव्यप्रेमी कोण ?
  • Log in or register to post comments

वरून चौथ्या फोटो मध्ये नेमका

मदनबाण
Fri, 10/25/2013 - 09:29 नवीन
वरून चौथ्या फोटो मध्ये नेमका मदनबाण कोण आणि मिसळलेला काव्यप्रेमी कोण ? पांढरा शर्ट घातलेला चष्मिश म्हणजे मी, आणि माझ्या बाजुला मिका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

काहीतरी गफलत आहे काय

प्रमोद देर्देकर
Mon, 10/28/2013 - 15:19 नवीन
हे सगळं लै मिस करतोय इथे विजुभाऊ - Thu, 24/10/2013 - 19:28 नवीन हे सगळं लै मिस करतोय इथे जोहान्सबर्गात. सोबतचे एकतर गुलटे आहेत. नायतर अफ्रीकन. जर विजुभाऊ जोहान्सबर्गात आहेत तर कोणते विजुभवु तुम्हाला येवुन मिळाले,लेखात काहीतरी गफलत आहे काय? शिवाय गविंचा स्वत:हाचा फोटो कुठेच नाहीये. जरा विस्ताराने शेवटचे दोन फोटोतील ओळख डावीकडून उजवीकडे अशी सांगल काय ?
  • Log in or register to post comments

>>जर विजुभाऊ जोहान्सबर्गात

सूड
Mon, 10/28/2013 - 16:12 नवीन
>>जर विजुभाऊ जोहान्सबर्गात आहेत तर कोणते विजुभवु तुम्हाला येवुन मिळाले,लेखात काहीतरी गफलत आहे काय? आन्ना, जरा त्यो लेख लिवल्याची तारीक आन ईजुभौंच्या पर्तिसादाची तारि़ख बगा की!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

विजुभाऊ स्थूलदेह तिकडे ठेवून

गवि
Mon, 10/28/2013 - 18:03 नवीन
विजुभाऊ स्थूलदेह तिकडे ठेवून सूक्ष्मदेहाने आले असतील.. हॅ हॅ हॅ.. :) ते तसेही चैतन्यरुपाने आमच्यात सदैव असतातच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

श्री.रा.रा. प्रमोद देर्देकर

गवि
Mon, 10/28/2013 - 18:07 नवीन
श्री.रा.रा. प्रमोद देर्देकर यांचे शंकासमाधानः Image removed. डावीकडूनः विजुभाऊ, मिसळलेला काव्यप्रेमी, वपाडाव (कुठे गेलास रे. जिथे असशील तिथून परत ये. तुला कोणी काही बोलणार नाही),गवि, लीमाउजेट, सूड (वड्या फेम), विश्वनाथ मेहेंदळे, सर्वसाक्षी. आता तुमचा फोटो टाका इथे.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा