✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्राचीन वैदिक भूगोल व शहरे

ई
ईश आपटे यांनी
Tue, 04/12/2011 - 14:00  ·  लेख
लेख
वैदिक भूगोल समजुन घेताना भारतीय ज्योतिष वाड्मयाचा व पुराणांचा अभ्यास आवश्यक आहे. अन्यथा निष्कर्ष विचित्र बनतात . जम्बु द्वीपाचा म्हणजे प्रस्तुत पृथ्वीच्या प्राचीन भूगोलाचा फक्त आपण विचार येथे करणार आहोत. पुराणे व ज्योतिष ग्रंथांनुसार एकंदर सप्त द्वीपे आहेत, जम्बु ,प्लक्ष, शाल्मल, कुश ,क्रौञ्च, शाक, पुष्कर . त्यातील केवळ जम्बु द्वीप मानवी दृष्टीगम्य आहे. इतर दुसर्‍या डायमेंशन मध्ये आहेत. अनेक संशोधकांची इथेच चूक झाली व ते इतर ६ द्वीपे ह्या पृथ्वीवरच शोधत बसले. पुराणात स्पष्ट उल्लेख आहे, की जम्बु द्वीप लवणसागराने वेढलेले आहे. इतर द्वीपांभोवती असलेले सागर वेगळ्या द्रव्याचे आहेत. तेव्हा दृश्य पृथ्वी म्हणजे केवळ जम्बु द्वीप होय. जम्बुनद् हा एका जांभळट रंगाचा सुवर्णाचा प्रकार आहे. हे सगळ्यात उच्च दर्जाचे सुवर्ण आहे , जे ह्या पृथ्वी वरच उपलब्ध होते.(अजुन ही असेल) . तर जम्बु द्वीपाची विभागणी नऊ वर्षात म्हणजे देशात केली आहे. संस्कृतमध्ये देशाला वर्ष असे म्हणतात जसे भारतवर्ष ! . त्यांची स्थाने मेरु पर्वताला केन्द्र ठेऊन सांगितली आहेत. मेरु पर्वत म्हणजे पृथ्वीच्या केन्द्रातुन जाणारा दक्षिण-उत्तर अक्ष होय.ह्या नऊ वर्षांची माहिती खाली देत आहे. १. भारतवर्ष- हिमालय ते कन्याकुमारी २.किम्पुरुषवर्ष- इंडोनेशिया,मलेशिया,कम्बोडिया आदि आग्नेय भाग, इथे रामोपासना चालायची. अजुन ही चालते ३.हरिवर्ष- इथे नृसिंह उपासना चालायची ४.रम्यक- इथे मत्स्य अवताराची उपासना चालायची ५.हिरण्यमय-इथे कूर्मरुपात उपासना चालायची ६.उत्तरकुरु- हे म्हणजे सध्याची दक्षिण अमेरिका . ह्याचा आकार भारतासारखा धनुष्याकार वर्णिलेला आहे. इथे वराहरुपात उपासना चालायची ७.भद्राश्ववर्ष- हे म्हणजे चीनचा अतिपूर्वेकडचा भाग. कदाचित आता तिथे पॅसेफिक सागर आहे. इथे घोड्याचे डोके असलेल्या विष्णुमूर्तिची (हयग्रीव)उपासना व्हायची. ८.केतुमाल वर्ष- इथे कामदेवरुपात उपासना व्हायची , हे म्हणजे आफ्रिका खंड किंवा युरोप ९.इलावृत्त वर्ष- हे उत्तर ध्रुवाभोवती आहे. इथेच गन्धमादन पर्वत आहे. इथुन चार पवित्र नद्या चार दिशेला गेल्या. त्यातील एक म्हणजे गंगा, अन्य नद्या चक्षू(फरात- इराक मधील) , सीता(रशिया/चीन) ,भद्रा (उ. अमेरिका). अरबांच्या इतिहासानुसार, ह्या पवित्र नद्या नील्,फरात्,जेहु,सेहु अशा आहेत. जिज्ञासुना अधिक शोधता येईल. हे झाले पुराणातील वर्णन, भास्कराचार्य सारखा गणिती ही ह्या वर्णनाला आपल्या ग्रंथात पुष्टी देतो. सूर्यसिध्दान्ता सारख्या प्रमाण ज्योतिष ग्रंथात तर प्राचीन शहरांची ही माहिती आहे. आपण जसे आता विषुवृत्त, रेखावृत्त इ. नकाशा करण्यासाठी संकल्पना वापरतो. तशाच कल्पना प्राचीन भारतीय ही वापरायचे. त्यांनी लंका हे प्राचीन बेट शून्य विषुवृत्तावर व शून्य पृथ्वी मध्य वृत्तावर मानले आहे. हे पृथ्वी मध्ये वृत्त आजच्या उज्जैन शहरातुन दक्षिण-उत्तर जाते. ह्या वृत्तावर दक्षिणेला हिन्दी महासागरात कुठे तरी लंका हे बेट होते .(कदाचित ते आताची लंका ही असू शकेल. सध्याची लंका विषुवृत्तापासुन ६ अंश उत्तरेला आहे) ह्या प्राचीन लंका ह्या दिव्य शहरापासुन ९० अंशावर पूर्व-पश्चिम दोन शहरे होती. व १८० अंश विरूध्द एक शहर होते. ही चार शहरे देवांनी बांधलेली व अत्यंत प्रगत होती असा ज्योतिष ग्रंथात उल्लेख आहे. सूर्यसिध्दान्तात खालील उल्लेख आहे. समन्तान् मेरुमध्यात् तु तुल्यभागेषु तोयधेः / द्वीपिषु दिक्षु पूर्वादिनगर्यो देवनिर्मिताः // भूवृत्तपादे पूर्वस्याम् यमकोटीति विश्रुता / भद्राश्ववर्षे नगरी स्वर्णप्राकारतोरणा // याम्यायाम् भारते वर्षे लङ्का तद्वन् महापुरी / पश्चिमे केतुमालाख्ये रोमकाख्या प्रकीर्तिता // उदक् सिद्धपुरी नाम कुरुवर्षे प्रकीर्तिता / तस्याम् सिद्धा महात्मानो निवसन्ति गतव्यथाः / {लंका ही भारतीय ज्योतिषानुसार ० अंश विषुवृत्तावर व ० अंश पृथ्वी मध्यवृत्तावर मानली आहे. हे मध्य वृत्त अवन्ती म्हणजे सध्याच्या ऊज्जैन शहरातून जात असे} (लंका)भारतवर्ष व (सिध्दपुरी)उत्तरकुरूवर्ष आणि (यमकोटी)भद्राश्ववर्ष व (रोमक)केतुमाल्वर्ष ही प्राचीन देवनिर्मित शहरे परस्परांच्या १८० अंश समोर आहेत. सध्याच्या नकाशानुसार सिद्धपुरी हे मेक्सिकोमध्ये, यमकोटी हे उत्तर पॅसेफ़िक मध्ये बेट असावे. रोमक हे प.आफ्रिकेमध्ये असेल, व लंका हे बेट एकतर सध्याची श्रीलंका असेल किंवा हिन्दी महासागरातील श्रीलंकेच्या खालचे एखादे बेट असेल. मी आजच्या नकाशानुसार ह्यांचे अक्षांश-रेखांश खाली देत आहे, ज्यांना उत्सुकता आहे त्यांना अधिक शोध घेता येईल. गुगल अर्थ तसेच इतर देशांच्या मायथोलोजिचा हि उपयोग करता येईल. लंका- ० अंश उत्तर, ९० अंश पूर्व सिध्दपुरी-० अंश उत्तर ९० अंश पश्चिम यमकोटी-० अंश उत्तर १८० अंश पश्चिम रोमक- ० अंश उत्तर ० अंश पूर्व (ग्रीनीच शहराच्या सरळ रेषेते दक्षिणेला हे शहर आहे) लाखो वर्षात समुद्र व इतर भूरचनेत वारंवार बदल झाल्यामुळे, वरील शहरे अचूक हुडकून काढणे अशक्यप्राय बनले आहे. तरी ही वरील माहिती कमी इंटरेस्टिंग नाही. ज्यांना प्राचीन इतिहासात रस आहे त्यांना मजेशीरवाटेल अशी आशा आहे. ता.क.- वरील भूगोलानुसार एखादा नकाशा बनवता आला तर मी ह्या लवकरच ह्या लेखातच अपडेट करेन संदर्भ- सूर्यसिध्दान्त विष्णु पुराण सिध्दान्त-शिरोमणी-भास्कराचार्य
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
28818 वाचन

💬 प्रतिसाद (103)

प्रतिक्रिया

तिरकस

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 04/13/2011 - 09:42 नवीन
ईश आपटे यांचे वरील लेखन तिरकस आहे काय ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

थोडासा असहमत

धनंजय
Tue, 04/12/2011 - 23:10 नवीन
प्रस्तुत लेखकाने कुठल्याही अन्य इन्टरप्रेटेशनविरुद्ध टोमणेबाजी असलेले लेख सुरुवातीला लिहिले. त्या प्रकारचे उल्लेख या लेखामध्ये नाहीत हे स्तुत्य आहे. पण आदल्या लेखांत सुरू झालेली/केलेली टोमणेबाजी ही प्रतिसादकांच्याच माथी बांधणे मला प्रशस्त वाटत नाही. हिरिरीने मुद्दे मांडतानासुद्धा अभ्यासाच्या बाबतीत तटस्थपणा आणि विश्वासार्हता असते, असा तुमचा जो नावलौकिक मिसळपावावर आहे, तो तुम्हाला कष्टाने कमवावा लागला होता. (नम्रपणामुळे तुम्हाला हे बहुधा आठवतही नसेल.) अमुक-अमुक ग्रंथात तमुक-तमुक तपशील आहेत, हे तटस्थ वर्णन तर माहिती म्हणून स्वागतार्हच आहे. तसेच त्या काळातले विद्वान त्या काळातल्या ज्ञानाच्या आधारे वादविवाद घालत : त्या युक्तिवादांना जोखताना त्या काळातल्या तथ्य-माहितीची मर्यादा राखली पाहिजे. ही अभ्यासपद्धत सुद्धा सुयोग्यच आहे. (कारण आपण तिथे युक्तिवादाची तार्किकता जोखत असतो, निष्कर्षाची अद्ययावत ग्राह्यता नव्हे. याचे उदाहरण म्हणून प्राचीन अणुवादाबद्दल विवादाची चर्चा येथे बघावी.) परंतु अशा प्रकारच्या लेखनामध्ये पुष्कळदा विपरितच दिसते : प्राचीन ग्रंथांमधली विविधता, त्यांच्यातील लेखकांची नवीन शोध लावण्याची पद्धत अणि जिज्ञासा, या सर्व सार्वकालिक प्रशंसनीय गोष्टी बाजूला ठेवून चांगली-वाईट-सगळीच-वाक्ये सत्य असल्याचे प्रतिपादन केले जाते. म्हणजे ना धड तटस्थ "रिपोर्टिंग" ना धड अभ्यासपूर्ण विवाद. एका प्राचीन ग्रंथाची ओळख करून देणार्‍या लेखाला प्रास्ताविक म्हणून मी एकदा असे लिहिले होते :
त्या काळातल्या ... अनेक विचारवंतांना, वैज्ञानिक दृष्टी होती हे सांगायचे होते. ... आजकल प्राचीन वैचारिक साहित्याची फाजील पूजा करून, पुष्कळदा आपण त्यातले कठोर प्रश्न विचारून सत्य पडताळणारे मर्म विसरतो. अशा अशिक्षित पूजेत त्या विचारवंतांचा अपमान होतो असे माझे मत आहे. "पुराणकाळात रॉकेटे आणि अणुबाँब होते" अशी आत्मप्रौढी बंद होऊन, "काटेकोर उलटतपासणी करून सत्याची शहानिशा करणारे तल्लख विचारवंत होते" असे आपण भारतीयांनी अभिमानाने सांगावे, अशी माझी इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

आदल्या लेखांचा संबंध नसावा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 04/13/2011 - 18:39 नवीन
आदल्या लेखांत सुरू झालेली/केलेली टोमणेबाजी ही प्रतिसादकांच्याच माथी बांधणे मला प्रशस्त वाटत नाही. आदल्या लेखाचे जाऊ द्या. पण याच लेखात असे काही प्रतिसाद आहेत जे लेखनातील विषयाबद्दल तुच्छतेची अशी भावना प्रतिसादातून दर्शवितात. प्राचीन अशा भारताचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा लेखनाच्या माध्यमातून शास्त्रीयदृष्ट्या फारसा आलेला नाही याबद्दल कुणाचे दुमत असणार नाही. प्राचीन काळातील इतिहास लेखनाकडे भारतीयांचे तसे दुर्लक्षच झाले असे म्हणतात. भारताच्या इतिहासाचा अभ्यास करतांना प्राचीन भारतीय साहित्याचाही साधन म्हणून उपयोग केलेला दिसून येतो. प्राचीन वाड;मयातील विचारांना आधुनिक जगाशी जोडण्याच्या प्रयत्नाच्या बातम्याही कधी-कधी वाचनात येतात. वैदिक वाड;मयातून येणारे विषय आणि त्याची मांडणी कालौघात चूक-बरोबर असूही शकेल. लेखक जेव्हा आपला मांडलेला विचार 'सत्यच' आहे असा आग्रह करत असेल तेव्हा वाचकांनी सद्य साधने,काळ, वगैरेंबरोबर 'विवेकाचा'ही उपयोग करुन मत बनविले पाहिजे. प्रतिसादातून प्रतिवाद करतांना उपलब्ध असलेली साधने आणि संदर्भांचे दाखले दिले पाहिजेत. नाही देता आले तर वाचनमात्र हा पर्याय असतोच. आणि हे सर्व करण्याऐवजी लेखन 'मनोरंजन' करते असे म्हणून प्रतिवाद होत नाही. लेखनात येणारी प्राचीन माहिती ही 'टाकाऊच' आहे असे म्हणून पाहण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या संदर्भांद्वारे चर्चा संवादी होण्याकरीता काही अधिक प्रयत्न झाले पाहिजेत. सांगायचा मुद्दा असा की, आदल्या लेखातील टीकेचा या लेखाशी संबंध आळशांच्या राजांनी जोडलेला नाही असे मला वाटते. जोडलेला असला तरीही तो प्रतिसाद सदरील धाग्यात 'स्वतंत्र' ठरावा आणि 'काहींसाठी' फिट्ट बसणारा असा झाला आहे, असो, चुभुदेघे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

असहमत

धनंजय
गुरुवार, 04/14/2011 - 01:18 नवीन
आदल्या लेखाचे जाऊ द्या.
तुमच्याबद्दल मिसळपावावर जो आदर आहे, त्याकरिता तुमचे पूर्वीचे लेखन आणि प्रतिसाद आठवणे महत्त्वाचे. नम्रतेमुळे या चांगल्या इतिहासाकडे तुम्ही दुर्लक्ष करीत असला, तरी ती वस्तुस्थिती आहे. तुम्ही किंवा मी आपले स्वतःचे विविध सदस्यांशी असलेले संबंध आठवून बघूया. लेखनाचा इतिहास तुम्ही किंवा मी संदर्भात घेत नाही काय? (तुम्ही प्रामाणिकपणे विचार करून उत्तर द्याल ही खात्री आहे. त्यामुळे तुम्ही "नाही" म्हटले तरी जुने लेख आणि प्रतिसाद शोधण्याच्या भानगडीत पडणार नाही.)
पण याच लेखात असे काही प्रतिसाद आहेत जे लेखनातील विषयाबद्दल तुच्छतेची अशी भावना प्रतिसादातून दर्शवितात. प्राचीन काळातील इतिहास लेखनाकडे भारतीयांचे तसे दुर्लक्षच झाले असे म्हणतात.
नाही. (पुढे बघा.) विरोध करणारे प्रतिसाद लिहिणार्‍या काही सदस्यांनी खुद्द भारतीय इतिहासाच्या संदर्भात आत्मीयतेने लिहिलेले आहे. त्यांच्या लेखनाचा इतिहास डोळ्याआड करूया, म्हणता? (हे ठीक नव्हे, असे मी मानतो, तरी) मग फक्त प्रतिसादावरून हे लोक याच लेखाला दोष देत आहेत की भारतीय इतिहास या विषयाला, हे तुम्ही कसे काय ठरवले?
भारताच्या इतिहासाचा अभ्यास करतांना प्राचीन भारतीय साहित्याचाही साधन म्हणून उपयोग केलेला दिसून येतो. प्राचीन वाड;मयातील विचारांना आधुनिक जगाशी जोडण्याच्या प्रयत्नाच्या बातम्याही कधी-कधी वाचनात येतात. वैदिक वाड;मयातून येणारे विषय आणि त्याची मांडणी कालौघात चूक-बरोबर असूही शकेल.
अर्थातच.
लेखक जेव्हा आपला मांडलेला विचार 'सत्यच' आहे असा आग्रह करत असेल तेव्हा वाचकांनी सद्य साधने,काळ, वगैरेंबरोबर 'विवेकाचा'ही उपयोग करुन मत बनविले पाहिजे.
ठीक. लेखकानेही साधनांचा सुयोग्य उपयोग करावा, अशी अपेक्षा रास्त आहे, आणि प्रतिसादकांनीसुद्धा.
प्रतिसादातून प्रतिवाद करतांना उपलब्ध असलेली साधने आणि संदर्भांचे दाखले दिले पाहिजेत. नाही देता आले तर वाचनमात्र हा पर्याय असतोच.
वर बघावे. साधनांचा उपयोग सुयोग्य नसला, तर ही चर्चा अभ्यासपूर्ण अशी नसतेच.
आणि हे सर्व करण्याऐवजी लेखन 'मनोरंजन' करते असे म्हणून प्रतिवाद होत नाही.
साधनांचा उपयोग सुयोग्य नसला, तर चर्चा अभ्यासपूर्ण नसते. मनोरंजक मात्र असू शकते. कल्पित कथा आणि ललित वाङ्मयाला साधनसामग्रीच्या शुचितेचे बंधन नसते.
लेखनात येणारी प्राचीन माहिती ही 'टाकाऊच' आहे असे म्हणून पाहण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या संदर्भांद्वारे चर्चा संवादी होण्याकरीता काही अधिक प्रयत्न झाले पाहिजेत.
शक्य आहे. साधनसामग्रीची शुचिता नसली, तर टाकाऊ आणि टिकाऊ माहितीमध्ये फरक करण्यासाठी साधने हवीत. याची प्राथमिक जबाबदारी लेखकाकडे असते. बारीकसारीक टाकाऊ-टिकाऊ विवेक मग वाचकाकडे सोपवता येतो. उदाहरणार्थ मराठी वाङ्मयाबाबत खालील परिच्छेद बघा : "फुलराणी" ही कविता कवी कुसुमाग्रज यांनी लिहिली आहे. "फुटकी तपेली" ही कविता बालकवी ठोंबरे यांनी लिहिली आहे. आता यात बरीचशी माहिती बरोबर आहे. "फुलराणी" आणि "फुटकी तपेली" या मराठी वाङ्मयातल्या दर्जेदार कविता आहेत, हे खरे आहे. कुसुमाग्रज आणि बालकवी ठोंबरे हे मराठी वाङ्मयातले शैलीदार कवी आहेत. इतकेच काय थोडेसे चुकीचे शब्द खोडले, तर उर्वरित वाक्य ठीकच आहे : "फुलराणी" ही कविता कवी कुसुमाग्रज यांनी लिहिली आहे. "फुटकी तपेली" ही कविता बालकवी ठोंबरे यांनी लिहिली आहे. हे सर्व असताना, परिच्छेद "टाकाऊ-नसलेला मानावा" असे कोण म्हणेल? तुम्ही तुमच्या सहकार्‍याकडून वरील वाक्ये खपवून घ्याल काय? नाही, अशी खात्री वाटते. मग या इतिहासाच्या बाबतीत अशी हेळसांड कशाकरिता?
सांगायचा मुद्दा असा की, आदल्या लेखातील टीकेचा या लेखाशी संबंध आळशांच्या राजांनी जोडलेला नाही असे मला वाटते. जोडलेला असला तरीही तो प्रतिसाद सदरील धाग्यात 'स्वतंत्र' ठरावा आणि 'काहींसाठी' फिट्ट बसणारा असा झाला आहे, असो, चुभुदेघे.
आळशांच्या राजा यांनी संबंध जोडला नाही, ही जर नजरचूक असेल, किंवा त्यांनी आदले लेखन बघितले नसेल. तर ती नजरचूक मी त्यांच्या लक्षात आणून दिली. "प्रतिसाद धाग्यात स्वतंत्र आहे" म्हणजे नेमके काय? हा धागा सोडल्यासही "काहीं"चे वर्तन सुयोग्य नाही, असा या "स्वतंत्र"चा मथितार्थ आहे काय? म्हणजे या धाग्यात नव्हे तर अन्यत्र "स्वतंत्रपणे" या "काहीं"चे वर्तन सुयोग्य नाही, असे म्हणायचे आहे काय? "अन्यत्र" म्हणजे त्या "काहीं"च्या लेखनाचा इतिहासाचा संदर्भ आहे काय? तर मग मला मुद्दा समजलाच नाही : या धाग्याच्या लेखकाच्या अन्य लेखांचा इतिहास संदर्भात घ्यायचा नाही, पण प्रतिसादकांच्या अन्य लेखनाचा इतिहास संदर्भात घ्यायचा? त्यातही भारताबद्दल आदर व्यक्त करणारा प्रतिसादकांचा इतिहास सोडून संदर्भात घ्यायचा? हे काही ठीक वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

रामपुरी
Wed, 04/13/2011 - 01:28 नवीन
डोळ्याला झापडे बांधून वाचण्यापेक्षा त्यातला पटेल तो भाग लक्षात ठेवणं चांगलं. थोडक्यात, माझं तेच बरोबर न म्हणता बरोबर ते माझं हा दॄष्टिकोन ठेवता आला तर पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

छान माहिती

प्रशु
Tue, 04/12/2011 - 21:24 नवीन
नविन माहिती समजली, असेच लिहत रहा...
  • Log in or register to post comments

येऊ द्यात अजून

गोगोल
Tue, 04/12/2011 - 21:40 नवीन
हे सगळ थोतांड आहे असे म्हणणार्या लोकांकडे लक्ष देऊ नका. मध्यंतरी अमेरिकेत SG-1 नावाच्या बर्याच डॉक्युमेंटरीज आल्या होत्या. त्यात परग्रहावरील लोक, प्राचीन संस्क्रुती ई. बर्याच गोष्टिंचा ऊहापोह करण्यात आला होता. पण मग हळूहळू त्या डॉक्युमेंटरीज दाबून टाकण्यात आल्या. खूप दूर च्या ग्रहांवर क्षणार्धात कस पोहोचता येत (जे आपल्याकडील योग्यांनी आधीच सांगून ठेवलय) त्याच प्रात्यक्षिक देखील करून दाखवल आहे. प्राचीन काळी शोध लावलेल्या एका तबकडी च्या आकाराच्या रिंगेतून आत शिरल की दुसर्या ग्रहावर निघता येत. अमेरिकेला हे सगळे फायदे फक्त त्यांच्या साठी हवे असल्याने त्यांनी ही माहिती दडपून टाकलेली आहे. भारताला आत्ता गरज आहे ती इस्रो सारखे खर्चिक प्रकल्प बंद करून आपल्या वेदग्रंथांचा खूप गम्भिर्याने अभ्यास करण्याची. आपल्या कडेच सगळ आधूनिक विज्ञान आहे .. पण आपण करंटे ते नासाचे अनूकरण करण्यासाठी पाण्यासारखा पैसा बरबाद करतोय. मला सांगा की त्या इस्रो मध्ये जितका पैसा ओतलाय त्यात वैदिक ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी कितीतरी शाळा महाविद्यालये यांना अनुदाने देता आली असती.
  • Log in or register to post comments

ठ्ठो......

मन१
Tue, 04/12/2011 - 21:51 नवीन
मेलो. फुटलो. पडलो खालती जमिनीवर. भन्नाट वक्रोक्ती लिहिलित साहेब. --मनोबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

वक्रोक्ती??

गोगोल
Tue, 04/12/2011 - 21:59 नवीन
हे ह्या बुद्धिजिवी लोकांची अजून एक खेळी. कुणी काहिही गाम्भिर्याने सांगितल की वक्रोक्ती म्हणून त्यातील हवा काढून टाकायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

कोण बुद्धीजीवी?

मन१
Tue, 04/12/2011 - 22:28 नवीन
हा शब्द बर्‍याचदा वाचतो, पण नक्की कुणाला म्हणतात ते काही कळलं नाही. असो. मला खरोखर वक्रोक्ती वाटली. कुणीही वाकडं बोलताना एखादी गोष्ट जरा अतिच करुन सांगतं, तसा प्रतिसाद वाटला. आता तसं वाटुन घेणं बंद घ्यावं काय? --मनोबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

तुम्ही म्हणाताय ते SG1

चतुरंग
Tue, 04/12/2011 - 22:15 नवीन
म्हणजे डॉक्यूमेंटरी नसून अमेरिका-कॅणडा संयुक्त विद्यमाने चालवलेली सायन्स फिक्शन मालिका होती - हा घ्या विकीचा दुवा http://en.wikipedia.org/wiki/Stargate_SG-1 सायन्स फिक्शन मालिका असल्याने त्यात भरपूर कपोलकल्पित गोष्टींचा भरणा असणारच. काहीच्या बाही खरे मानून चालणे आपल्या अजिबातच फायद्याचे नाहीये. भारतीय संस्कृतीचा डोळस अभिमान असणे जास्त योग्य ठरेल. -(तिसर्‍या मितीतला)मीतरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

सायन्स फिक्शन मालिका

गोगोल
Tue, 04/12/2011 - 22:34 नवीन
आहे हे सांगणे म्हणजेच अमेरिकन सरकार ची दड्पून टाकण्याची खेळी होय. मी या डॉक्युमेंटरीज प्रत्येक भाग बघितला असून मला तरी आपल्या वेदीक संस्क्रुतीच्या जवळचे निष्कर्ष वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

<<खूप दूर च्या ग्रहांवर

शिल्पा ब
Tue, 04/12/2011 - 23:32 नवीन
<<खूप दूर च्या ग्रहांवर क्षणार्धात कस पोहोचता येत (जे आपल्याकडील योग्यांनी आधीच सांगून ठेवलय) त्याच प्रात्यक्षिक देखील करून दाखवल आहे. काय सांगता? लिंका देता येत असतील तर पहा. आम्हालाही त्या डॉक्युमेंटर्‍या पहायला आवडतील. काही नतद्रष्ट लोकं सायंटॉलॉजीची सुद्धा अशीच खिल्ली उडवतात हे पाहुन आम्हाला अतीव वेदना होतात. बाकी आपला प्रतिसाद क्या कहने!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

अमेरिकेत असाल

गोगोल
Tue, 04/12/2011 - 23:33 नवीन
तर हुलु वर बघायला मिळ्तील. नसाल तर http://www.fastpasstv.eu/ येथे जाऊन स्टारगेट प्रोग्रॅम बघा. फक्त जरा जपून .. अमेरिकन सरकारला जर कळल की तुम्हाला त्यांच्यावर संशय आला आहे तर तुम्हाला विसा मिळायाला प्रॉब्लेम येऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

<<<फक्त जरा जपून .. अमेरिकन

शिल्पा ब
Tue, 04/12/2011 - 23:42 नवीन
<<<फक्त जरा जपून .. अमेरिकन सरकारला जर कळल की तुम्हाला त्यांच्यावर संशय आला आहे तर तुम्हाला विसा मिळायाला प्रॉब्लेम येऊ शकतो. मला काय प्रतिसाद द्यावा हेच सुचत नाही. कोणीतरी मदत करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

+१

पिवळा डांबिस
Tue, 04/12/2011 - 22:44 नवीन
सायन्स फिक्शन मालिका आहे हे सांगणे म्हणजेच अमेरिकन सरकारची दडपून टाकण्याची खेळी होय!!!! ठो!! :) कित्ती खेळकर आहे अमेरिकन सरकार!!! (खुद का माथा पटककर बातां: अगर अमेरिकन सरकार को दडपना होना तो मालिकाच टीव्हीपर कायकू दिखाना?)
  • Log in or register to post comments

हे गोगोल महाराजांच्या

पिवळा डांबिस
Tue, 04/12/2011 - 22:45 नवीन
हे गोगोल महाराजांच्या प्रतिसादाला होतं, मूळ लेखाला नाही... शिंचं चुकुन डावीकडे सरकलं!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अमेरिकन सरकार असले म्हणून काय झाल?

गोगोल
Tue, 04/12/2011 - 23:04 नवीन
> (खुद का माथा पटककर बातां: अगर अमेरिकन सरकार को दडपना होना तो मालिकाच टीव्हीपर कायकू दिखाना?) त्यांच्या पण चुका होतातच की. चुका लक्षात आल्यावर त्यांनी त्या सुधारल्या. ह्याच डॉक्युमेंटरीज चा तिसरा भाग (SGU) आहे. ज्या मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञ एका प्राचीन यानावर कसे जातात आणि काय करतात ते दाखवले आहे. पण जेव्हा त्यांच्या लक्षात येऊ लागले की लोकांना मुर्ख बनवणे येव्हढे सोपे नाही तेव्हा त्यांनी तो प्रोग्रॅम चक्क कॅन्सल केला. बोला आता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

काय बोलणार? आम्हाला वाटलं की

पिवळा डांबिस
Wed, 04/13/2011 - 00:00 नवीन
काय बोलणार? आम्हाला वाटलं की ते टीव्हीचं लो टीआरपी वगैरे लफडं असेल... पण आता तुम्ही छातीठोकपणे म्हणताय कान्स्पिरन्सी, तर कान्स्पिरन्सी!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

लो टीआरपी

गोगोल
Wed, 04/13/2011 - 00:15 नवीन
म्हणजे नुसत्या गफ्फा आहेत हो गफ्फा. अमेरिकन सरकारची धूळफेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हम्म!

पिवळा डांबिस
Wed, 04/13/2011 - 21:50 नवीन
अहो काल तुम्ही ते दडपण्याचं म्हणालात म्हणून मुद्दाम चेक केल!! (आम्हालातरी काय खाज बघा!!:)) साय-फाय चॅनलवर अजून ही दाखवताहेत सटारगेट-१!!! एन्जॉय!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

याय

गोगोल
गुरुवार, 04/14/2011 - 05:32 नवीन
परत बघणार... कर्नल ओ नील झिंदाबाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

आजकाल मिपावर सॉल्लिड उहापोह

प्राजु
Wed, 04/13/2011 - 00:25 नवीन
आजकाल मिपावर सॉल्लिड उहापोह होतोय ना! आणि कोणत्याही धाग्यावर, कथेवर, रामायणावर!! जिवंतपणाचं लक्षणच जणू!! ;)
  • Log in or register to post comments

हो हो!

पंगा
Wed, 04/13/2011 - 00:39 नवीन
आजकाल मिपावर सॉल्लिड उहापोह होतोय ना! आणि कोणत्याही धाग्यावर, कथेवर, रामायणावर!!
अगदी! गोडा मसाला घरी आणण्याच्या कृतीवरही होतो. (लिहिणारा/री) जिवंत असल्याचे लक्षण! ;) 'मी काहीबाही लिहितो, म्हणजे मी आहे.' (देकार्तची क्षमा मागून.) (कोणी याचे ल्याटिनीकरण करणारा तज्ज्ञ आहे काय रे???)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

स्क्रीबो एर्गो सुम्

धनंजय
Wed, 04/13/2011 - 01:04 नवीन
स्क्रीबो एर्गो सुम् scribo ergo sum
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

आभार, पण...

पंगा
Wed, 04/13/2011 - 09:46 नवीन
...scriboमध्ये ती काहीबाही लिहिण्याची अर्थच्छटा कितपत येते, याबाबत साशंक आहे. जिवंतपणाचा निर्देशक म्हणून नुसते काहीतरी लिहिणे उपयोगी नाही. काहीबाही (किंवा काहीतरीच) लिहिणे महत्त्वाचे. या अनुषंगाने, कृपया त्या scriboचे पुनर्ल्याटिनीकरण करू शकाल काय? (Illegitimi non carborundumच्या धर्तीवरचे स्यूडोल्याटिन असले तरीही चालू शकेल.) (पहिला कच्चा खरडा म्हणून Bullshito ergo sum सुचले होते, पण त्यात मजा नाही. नको तितके थेट आहे. थोडे साटल्य बरे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

जम्बोजेट जम्बोजेट झुईंग ची

llपुण्याचे पेशवेll
Wed, 04/13/2011 - 09:55 नवीन
जम्बोजेट जम्बोजेट झुईंग ची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

वेगळे

आंसमा शख्स
Wed, 04/13/2011 - 04:45 नवीन
वेगळे लेखन वाचून चांगले वाटले. (इतिहास पाहतांना वेगळ्या गोष्टी समोर येतात. काही संप्रदायांमध्ये एका विशिष्ट घटनेआधी काहीच अस्तित्त्वात नव्हते असे मानल्यामुळे काही वेळा चमत्कारिक परिस्थिती होते. माझ्या वडिलांनाही या अभ्यासाचा छंद होता. पण त्यांच्या अभ्यासावर समाजाकडूनच कडक टिका आणि नियंत्रण आले. मजहब इमानपेक्षा वेगळे काही बोलतो म्हणून नातेवाईक आणि मित्रांकडूनही त्रास भ्जोगावा लागला हे सत्य आहे. हे सगळे माझ्या डोळळ्यासमोर घडले आहे.) वर आलेले काही प्रतिसाद माझ्या वडिलांना त्रास देणार्‍यांच्या सारकेच आहेत. त्यांना वेगळे काही सहन होत नाही. खुदा त्यांना चांगली बुद्धी दे. वेगळे विचार मांडायला त्रास सहन करावाच लागतो. पण माझ्यात तरी माझ्या वडिलांसारखे आयुष्य जगण्याची हिम्मत नाही. म्हणून खुदाच्या क्रुपेने फक्त तुमच्या लेखनाची पढाई आहे.
  • Log in or register to post comments

सूर्यसिध्दान्त

निनाद
Wed, 04/13/2011 - 05:36 नवीन
लेख रोचक आहे. मते पटली किंवा न पटली तरी हे मांडायला माझी काहीच हरकत नाही. किंबहुना सर्व इतिहास अभ्यासकांनी लेखाचे स्वागत केले पाहिजे असे वाटते. उत्सुकता म्हणून सूर्यसिध्दान्त असा शोध विकीवर घेतला असता. अजून काही मनोरंजक माहिती सापडली. हा ग्रंथ स्वतः सूर्याने दिला असे एक पौराणिक मत आढळते. तर आधुनिक मतानुसार सूर्यसिध्दान्त याचा लेखक माहिती नाही. किंवा लेखक कोण याविषयी मतभिन्नता आढळते असे म्हणता येईल. या ग्रंथाचा काळ इ.स पूर्व ६०० असावा असे मानले जाते. किंवा कदाचित त्या आधीचाही असेल. म्हणून या ग्रंथावर, 'ग्रीक किंवा मेसापोटामिया येथील तत्त्वज्ञांची भारतीय प्रत' असा आक्षेप घेतला जाऊ शकत नाही, असे मानणारा एक मतप्रवाह आहे. इस.पूर्व तिसर्‍या शतकातील बौद्ध ग्रंथात याचे उल्लेख आहेत. पैतमाह सिद्धांत, पौलिश सिद्धांत आणि रोमक सिंद्धांत या ग्रंथात याचा उल्लेख आहे. तसेच वराह मिहीर आणि आर्यभट्ट यांच्या लेखनात या ग्रंथाचे संदर्भ आढळतात. एका वर्षात पृथ्वीच्या भ्रमणाला लागणारा काळ, याची अचूक माहिती या ग्रंथात नोंदवलेली आहे, ती ३६५.२५६३६२७ दिवस अशी आहे. ही माहिती आजच्या मान्यतेनुसार जवळपास अचूक आहे. या ग्रंथात ग्रहगोल आणि त्यांचे आकार यावर माहिती आहे. ग्रहांचे आकारमान - शुक्र - सूर्यसिध्दान्तानुसार शुक्राचा आकार ३००८ मैल आहे. (विकीवर सूर्यसिध्दान्तातील एकक दिलेले नाही. पण ते बहुदा योजने असावे.) आधुनिक खगोलशास्त्राची सद्य मान्यता म्हणते की शुक्राचा आकार ३०३२ मैल आहे. शनी - त्याचप्रमाणे सूर्यसिध्दान्तानुसार शनीचा आकार ७३८८२ मैल आहे. आधुनिक खगोलशास्त्राची सद्य मान्यता म्हणते की ७४५८० मैल आहे. म्हणजे फक्त सुमारे १ टक्क्याचा फरक यात दिसला आहे. तसेच सूर्यसिध्दान्तातच साईन व कॉस यांचे संदर्भ किंवा मूळ दिसून येते. ग्रहणे आणि त्याची कारणे याचा उहापोहही या ग्रंथात आहे. एकुणच सुर्यसिद्धांत हा ग्रंथ रोचक आहे. या ग्रंथाचा आवाका वैश्विक मिती या संदर्भात आहे/असावा. त्यामुळे त्यातील संदर्भ गंभीरतेने अभ्यासण्यास हरकत नसावी. सुर्यसिद्धांत या ग्रंथात कपोलकल्पित गोष्टी नाहीत असे मला वाटले. अजून अभ्यास व्हायला हवा. खरे तर अनेक पाश्चात्य विद्यापीठात हा ग्रंथ अभ्यासला जातो आहे, असे जालावर दिसून आले. या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर बर्जेस (Burgess ) या अभ्यासकाने Surya-Siddhanta; a text-book of Hindu astronomy या नावाने इ.स. १८५८ मध्ये केले. अभ्यासूंना हे भाषांतर प्रमुख ग्रंथालयात उपलब्ध आहे असेही दिसते. आशा आहे या माहितीचा उपयोग होईल.
  • Log in or register to post comments

आकार म्हणजे काय? आकाराचे एकक

Nile
Wed, 04/13/2011 - 05:49 नवीन
आकार म्हणजे काय? आकाराचे एकक मैल असते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

डायामिटर

निनाद
Wed, 04/13/2011 - 06:01 नवीन
डायामिटर... (परिघ हा नेमका शब्द का?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

डायमीटर म्हणजे व्यास.

Nile
Wed, 04/13/2011 - 06:09 नवीन
डायामीटर म्हणजे व्यास. पेरीमीटर म्हणजे परीघ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

अच्छा

आनंदयात्री
Wed, 04/13/2011 - 06:10 नवीन
अच्छा !! मग आकार म्हणजे काय ? (पळा मारतोय आता.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आकार म्हणजे

Nile
Wed, 04/13/2011 - 06:12 नवीन
जो फार सुटतो तो. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

प्रत्युत्तराची अपेक्षा

श्रावण मोडक
Wed, 04/13/2011 - 11:10 नवीन
प्रत्युत्तराची अपेक्षा आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

सर्वद्वेष्टे

आनंदयात्री
Wed, 04/13/2011 - 19:51 नवीन
सर्वद्वेष्टे माझा द्वेष करत नाहीत आणि ते फार जहाल तुच्छतावादीही नाहीत म्हणुन ते जवळचे :) वैयक्तिक हल्लास्वरुपी विनोदावर हसणे ही प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हाहाहाहा

श्रावण मोडक
Wed, 04/13/2011 - 20:24 नवीन
हाहाहाहा... उत्तर बाकी भारी आहे. त्यात जवळचे, लांबचे असे मीतीदर्शक शब्द दिसले आणि भरून पावलो रे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

आकार म्हणजे..?

खुसपट
Wed, 04/13/2011 - 23:59 नवीन
शनिचा आकार = शनि ची व्याप्ति. द्विमितीमध्ये (लांबी व रून्दी) मोजमापाचे एकक मैल हे बरोबरच आहे. दृश्य स्वरुपात व्याप केवढा हे सांगताना आकार हाच शब्द वापरला जातो. वर्तुळाकार वस्तूच्यासाठी 'व्यास' हा व्याप्ति निदर्शक शब्द वापरतात.असो. खुसपट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

धन्यवाद

आनंदयात्री
Wed, 04/13/2011 - 06:02 नवीन
धन्यवाद निनाद. पुरक माहिती अत्यंत उत्तम आहे. आपट्यांनी दिलेली माहितीही रोचक विस्मित करणारी आहे (फक्त चाळणी लाउन वाचली :) ) धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

अजून काही मनोरंजक माहिती

Nile
Wed, 04/13/2011 - 11:14 नवीन
अजून काही मनोरंजक माहिती सापडली.
वरील प्रतिसादातील माहितीची लेख आपटे तर नव्हेत? ;-) (ह. घ्या. ) ही माहिती तुम्ही कॉपी पेस्ट केली आहे की तपासून पाहिली आहे? तुम्ही दिलेल्या विकीपानावर काही श्लोक दिसले त्यात ही माहीती आहे का? आकडे तर कुठे दिसत नाहीत. बाकी सगळं जाउद्या, फक्त त्या पुस्तकात पृथ्वीच्या सुर्याभोवतीच्या परीवलनाचे गणित कसे केले आहे तेव्हढे इथे कॉपी पेस्ट करा म्हणजे कुणा 'इशाने' का सुर्याने ते पुस्तक लिहले आहे ते कळण्यास मदत होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

?

निनाद
Wed, 04/13/2011 - 11:26 नवीन
huh?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

काय huh?

Nile
Wed, 04/13/2011 - 11:29 नवीन
काय huh?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

वर

निनाद
Wed, 04/13/2011 - 12:01 नवीन
आकडेवारी मी कुठून देणार? मी मला जे सापडले ते दिले. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही तुमचे शोधा. हे कुठून घेतले आहे ते हवे असल्यास - इंग्रजी विकी पाहा - http://en.wikipedia.org/wiki/Surya_Siddhanta विकीसोर्स - सूर्यसिद्धान्त http://wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A4 आकडेवारी कुठे आणि कशी ते ग्रंथकर्त्याला किंवा इंग्रजी विकिच्या पानकर्त्याला विचारावे, तेथे चर्चा होऊ शकते. या ग्रंथाचा अभ्यास करून माहिती योग्य नाही असे आढळल्यास ती बदलण्याची शक्यता असू शकते. इंग्रजी विकीची माहिती योग्य नसेल तर बदलण्याची मुभा सर्वांना असतेच. या पानाला कुलुपही घातलेले नाही. अभ्यासासाठी सूर्यसिद्धान्त विकीसोर्स दुवा वर दिला आहे. विकीसोर्स वरील लिखाणही योग्य नसल्यास तशी चर्चा तेथे करून इच्छुकांना ते ही बदलता येईल. वरवर इंग्रजी भाषेतले काही दुवे वाचून हा ग्रंथ महत्त्वाचा असावा असे वाटले इतकेच. तसा तो सर्वांनाच वाटावा असाही आग्रह माझ्या प्रतिसादात नाही. आशा आहे माझा मुद्दा स्पष्ट झाला असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हम्म. माझा मुद्दा इतकाच होता

Nile
Wed, 04/13/2011 - 12:32 नवीन
हम्म. माझा मुद्दा इतकाच होता की तसे गणित केलेले असेल तर विश्वासार्हता वाढेल. मला दुव्यात फक्त श्लोक दिसले. इतर दुवे तपासतोच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

प्रतिसाद

निनाद
Wed, 04/13/2011 - 12:03 नवीन
२ दा झाल्याने काढला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

येथे

निनाद
Wed, 04/13/2011 - 06:02 नवीन
मुळातून वाचण्यासाठी सूर्यसिद्धान्त विकीसोर्सवर http://wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A4 उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments

रंजक लेख! या शहरांचा काळ

नगरीनिरंजन
Wed, 04/13/2011 - 09:22 नवीन
रंजक लेख! या शहरांचा काळ कोणता ते लेखावरून समजले नाही. भूगोलाच्या पुस्तकात गोंडवन वगैरे वाचलेले आठवते. पण ते फारच प्राचीन (कोट्यवधी वर्षांपूर्वी) असावे. काही हजार वर्षांमध्ये या खंडांमध्ये हजारो मैलांचे अंतर पडेल असे वाटत नाही. लेखात सांगितलेले सप्तद्वीप आणि समुद्र वगैरे कल्पना फॅन्टास्टिक आहेत. भारतात जांभळाची झाडे आहेत म्हणून भारतीय उपखंडाला जंबूद्वीप म्हणतात अशी माझी कल्पना होती.
  • Log in or register to post comments

<<<भारतात जांभळाची झाडे आहेत

शिल्पा ब
Wed, 04/13/2011 - 09:32 नवीन
<<<भारतात जांभळाची झाडे आहेत म्हणून भारतीय उपखंडाला जंबूद्वीप म्हणतात अशी माझी कल्पना होती. कदाचित त्याकाळी जांभळाची लागवड मोठ्या प्रमाणात नसेल आणि सगळ्यांनाच जांभूळ खायला आवडत असेल (हापूस सारखे) म्हणून मग सोन्यासारखा भाव आला अन जांभळ्या रंगाचे सोने म्हंटले असेल. हॉलंडमध्ये नाही का ऑर्किड का काय फुल अगदी सुरुवातीला मिलिअन $ मध्ये विकली जायची, त्यावर सट्टा वगैरे पण व्हायचा...लोकं फुलं विकुन प्रचंड पैसेवाले झाले होते अन शेवटी कंगाल पण झाले.( डॉट कॉम बबल/ हाउसिंग बबल सारखे). हा माझा अंदाज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

वैदिक भूगोल समजुन घेताना

Nile
Wed, 04/13/2011 - 11:16 नवीन
वैदिक भूगोल समजुन घेताना भारतीय ज्योतिष वाड्मयाचा व पुराणांचा अभ्यास आवश्यक आहे. अन्यथा निष्कर्ष विचित्र बनतात
वर उल्लेखलेल्या अभ्यासाने लेखात लिहलेली मतं बनत असतील तर तो अभ्यास आपट्यांनीच करावा अशी आमची विनंती आहे.
  • Log in or register to post comments

आपटे काका द्या हो माहिते इथे.

विजुभाऊ
Wed, 04/13/2011 - 14:24 नवीन
आपटे काका द्या हो माहिते इथे. लोकांच्या कॉमेन्ट्स कडे अज्जीबात लक्ष्य देवू नका पृथ्वी गोल आहे असे सांगणारांवरदेखील टीका केली गेली होती. त्याना जीवे मारले होते. लोकाना नव्या गोष्टी रुचतच नाहीत. ( निदानभुगोलाची अगोदर छापलेली पुस्तके संपूर्ण खपली जाईपर्यन्त तरी ...)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा