✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

प्राचीन वैदिक भूगोल व शहरे

ई
ईश आपटे यांनी
Tue, 04/12/2011 - 14:00  ·  लेख
लेख
वैदिक भूगोल समजुन घेताना भारतीय ज्योतिष वाड्मयाचा व पुराणांचा अभ्यास आवश्यक आहे. अन्यथा निष्कर्ष विचित्र बनतात . जम्बु द्वीपाचा म्हणजे प्रस्तुत पृथ्वीच्या प्राचीन भूगोलाचा फक्त आपण विचार येथे करणार आहोत. पुराणे व ज्योतिष ग्रंथांनुसार एकंदर सप्त द्वीपे आहेत, जम्बु ,प्लक्ष, शाल्मल, कुश ,क्रौञ्च, शाक, पुष्कर . त्यातील केवळ जम्बु द्वीप मानवी दृष्टीगम्य आहे. इतर दुसर्‍या डायमेंशन मध्ये आहेत. अनेक संशोधकांची इथेच चूक झाली व ते इतर ६ द्वीपे ह्या पृथ्वीवरच शोधत बसले. पुराणात स्पष्ट उल्लेख आहे, की जम्बु द्वीप लवणसागराने वेढलेले आहे. इतर द्वीपांभोवती असलेले सागर वेगळ्या द्रव्याचे आहेत. तेव्हा दृश्य पृथ्वी म्हणजे केवळ जम्बु द्वीप होय. जम्बुनद् हा एका जांभळट रंगाचा सुवर्णाचा प्रकार आहे. हे सगळ्यात उच्च दर्जाचे सुवर्ण आहे , जे ह्या पृथ्वी वरच उपलब्ध होते.(अजुन ही असेल) . तर जम्बु द्वीपाची विभागणी नऊ वर्षात म्हणजे देशात केली आहे. संस्कृतमध्ये देशाला वर्ष असे म्हणतात जसे भारतवर्ष ! . त्यांची स्थाने मेरु पर्वताला केन्द्र ठेऊन सांगितली आहेत. मेरु पर्वत म्हणजे पृथ्वीच्या केन्द्रातुन जाणारा दक्षिण-उत्तर अक्ष होय.ह्या नऊ वर्षांची माहिती खाली देत आहे. १. भारतवर्ष- हिमालय ते कन्याकुमारी २.किम्पुरुषवर्ष- इंडोनेशिया,मलेशिया,कम्बोडिया आदि आग्नेय भाग, इथे रामोपासना चालायची. अजुन ही चालते ३.हरिवर्ष- इथे नृसिंह उपासना चालायची ४.रम्यक- इथे मत्स्य अवताराची उपासना चालायची ५.हिरण्यमय-इथे कूर्मरुपात उपासना चालायची ६.उत्तरकुरु- हे म्हणजे सध्याची दक्षिण अमेरिका . ह्याचा आकार भारतासारखा धनुष्याकार वर्णिलेला आहे. इथे वराहरुपात उपासना चालायची ७.भद्राश्ववर्ष- हे म्हणजे चीनचा अतिपूर्वेकडचा भाग. कदाचित आता तिथे पॅसेफिक सागर आहे. इथे घोड्याचे डोके असलेल्या विष्णुमूर्तिची (हयग्रीव)उपासना व्हायची. ८.केतुमाल वर्ष- इथे कामदेवरुपात उपासना व्हायची , हे म्हणजे आफ्रिका खंड किंवा युरोप ९.इलावृत्त वर्ष- हे उत्तर ध्रुवाभोवती आहे. इथेच गन्धमादन पर्वत आहे. इथुन चार पवित्र नद्या चार दिशेला गेल्या. त्यातील एक म्हणजे गंगा, अन्य नद्या चक्षू(फरात- इराक मधील) , सीता(रशिया/चीन) ,भद्रा (उ. अमेरिका). अरबांच्या इतिहासानुसार, ह्या पवित्र नद्या नील्,फरात्,जेहु,सेहु अशा आहेत. जिज्ञासुना अधिक शोधता येईल. हे झाले पुराणातील वर्णन, भास्कराचार्य सारखा गणिती ही ह्या वर्णनाला आपल्या ग्रंथात पुष्टी देतो. सूर्यसिध्दान्ता सारख्या प्रमाण ज्योतिष ग्रंथात तर प्राचीन शहरांची ही माहिती आहे. आपण जसे आता विषुवृत्त, रेखावृत्त इ. नकाशा करण्यासाठी संकल्पना वापरतो. तशाच कल्पना प्राचीन भारतीय ही वापरायचे. त्यांनी लंका हे प्राचीन बेट शून्य विषुवृत्तावर व शून्य पृथ्वी मध्य वृत्तावर मानले आहे. हे पृथ्वी मध्ये वृत्त आजच्या उज्जैन शहरातुन दक्षिण-उत्तर जाते. ह्या वृत्तावर दक्षिणेला हिन्दी महासागरात कुठे तरी लंका हे बेट होते .(कदाचित ते आताची लंका ही असू शकेल. सध्याची लंका विषुवृत्तापासुन ६ अंश उत्तरेला आहे) ह्या प्राचीन लंका ह्या दिव्य शहरापासुन ९० अंशावर पूर्व-पश्चिम दोन शहरे होती. व १८० अंश विरूध्द एक शहर होते. ही चार शहरे देवांनी बांधलेली व अत्यंत प्रगत होती असा ज्योतिष ग्रंथात उल्लेख आहे. सूर्यसिध्दान्तात खालील उल्लेख आहे. समन्तान् मेरुमध्यात् तु तुल्यभागेषु तोयधेः / द्वीपिषु दिक्षु पूर्वादिनगर्यो देवनिर्मिताः // भूवृत्तपादे पूर्वस्याम् यमकोटीति विश्रुता / भद्राश्ववर्षे नगरी स्वर्णप्राकारतोरणा // याम्यायाम् भारते वर्षे लङ्का तद्वन् महापुरी / पश्चिमे केतुमालाख्ये रोमकाख्या प्रकीर्तिता // उदक् सिद्धपुरी नाम कुरुवर्षे प्रकीर्तिता / तस्याम् सिद्धा महात्मानो निवसन्ति गतव्यथाः / {लंका ही भारतीय ज्योतिषानुसार ० अंश विषुवृत्तावर व ० अंश पृथ्वी मध्यवृत्तावर मानली आहे. हे मध्य वृत्त अवन्ती म्हणजे सध्याच्या ऊज्जैन शहरातून जात असे} (लंका)भारतवर्ष व (सिध्दपुरी)उत्तरकुरूवर्ष आणि (यमकोटी)भद्राश्ववर्ष व (रोमक)केतुमाल्वर्ष ही प्राचीन देवनिर्मित शहरे परस्परांच्या १८० अंश समोर आहेत. सध्याच्या नकाशानुसार सिद्धपुरी हे मेक्सिकोमध्ये, यमकोटी हे उत्तर पॅसेफ़िक मध्ये बेट असावे. रोमक हे प.आफ्रिकेमध्ये असेल, व लंका हे बेट एकतर सध्याची श्रीलंका असेल किंवा हिन्दी महासागरातील श्रीलंकेच्या खालचे एखादे बेट असेल. मी आजच्या नकाशानुसार ह्यांचे अक्षांश-रेखांश खाली देत आहे, ज्यांना उत्सुकता आहे त्यांना अधिक शोध घेता येईल. गुगल अर्थ तसेच इतर देशांच्या मायथोलोजिचा हि उपयोग करता येईल. लंका- ० अंश उत्तर, ९० अंश पूर्व सिध्दपुरी-० अंश उत्तर ९० अंश पश्चिम यमकोटी-० अंश उत्तर १८० अंश पश्चिम रोमक- ० अंश उत्तर ० अंश पूर्व (ग्रीनीच शहराच्या सरळ रेषेते दक्षिणेला हे शहर आहे) लाखो वर्षात समुद्र व इतर भूरचनेत वारंवार बदल झाल्यामुळे, वरील शहरे अचूक हुडकून काढणे अशक्यप्राय बनले आहे. तरी ही वरील माहिती कमी इंटरेस्टिंग नाही. ज्यांना प्राचीन इतिहासात रस आहे त्यांना मजेशीरवाटेल अशी आशा आहे. ता.क.- वरील भूगोलानुसार एखादा नकाशा बनवता आला तर मी ह्या लवकरच ह्या लेखातच अपडेट करेन संदर्भ- सूर्यसिध्दान्त विष्णु पुराण सिध्दान्त-शिरोमणी-भास्कराचार्य
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
28817 वाचन

💬 प्रतिसाद (103)

प्रतिक्रिया

मह्त्वाची माहिती

चैतन्यकुलकर्णी
Tue, 04/12/2011 - 15:34 नवीन
दिल्याबद्दल धन्यवाद..
  • Log in or register to post comments

मौलिक लेखन

अरुण वडुलेकर
Tue, 04/12/2011 - 15:43 नवीन
वैदिक भूगोल व शहरे हा आपला अभ्यासपूर्ण लेख आपला व्यासंग दर्शवितो. आपण ज्या ग्रंथाचा उल्लेख संदर्भादाखल केलेला आहे, त्यातील कांही माझ्याही वाचनात आलेले आहेत. परंतु मी ज्योतिष शास्त्राचा अभ्यासक असल्याने माझा वाचनाचा दृष्टिकोन जरा निराळा होता. या ग्रंथांचा भौगोलिकदृष्ट्या आपण घेतलेला मगोवा प्रशंसनीय आहे. विशेषतः कांही स्थळांचे दिलेले अक्षांश-रेखांशात्मक संदर्भ मोलाचे आहेत. या विषयावर आपले आणखीही लेखन वाचायला निश्चित आवडेल.
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Wed, 04/13/2011 - 16:11 नवीन
पु. ले. शु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण वडुलेकर

हे जरी ...

sagarparadkar
Tue, 04/12/2011 - 16:05 नवीन
हे जरी समजा खरे आहे असं मानलं तरी आत्ता ह्या ज्ञानाचा नक्की कसा आणि कोणता उपयोग करायचा? त्याने काय साध्य होणार? बरं पृथ्वी हेच एक जंबुद्वीप आहे असं समजलं तर उर्वरीत (प्लक्ष, शाल्मल, कुश ,क्रौञ्च, शाक, पुष्कर) ही द्वीपे मग कुठे आहेत? जांभळ्या रंगाचे सोने कधी कोणी पहिले आहे का? पाहिले असल्यास ते सोनंच आहे, आणि सर्वोत्तम दर्जाचंच आहे असं कशावरून म्हणणार? संशोधक जर उर्वरीत सहा द्वीपांचा शोध घेण्यात चुकतात, तर आपण का नाही शोध घेतलात? जी गोष्ट / वस्तु कुणालाच कोणत्याच साधनांनिशी दिसत किंवा जाणवत नाही ती खरी कशी मानायची? तसा अट्टाहास का? त्याने काय साध्य होणार?
  • Log in or register to post comments

औत्सुक्यपूर्ण

अन्या दातार
Tue, 04/12/2011 - 16:26 नवीन
लेख औत्सुक्यपूर्ण आहे. फक्त भाषा जरा समजेल अशी ठेवा. दृष्टीगम्य वगैरे शब्दांनी भंजाळून गेलो होतो.
  • Log in or register to post comments

+१, जरा सोपी भाषा वापरता आली

पुष्करिणी
Wed, 04/13/2011 - 00:02 नवीन
+१, जरा सोपी भाषा वापरता आली तर बरं होइल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

काही प्रश्न - काही सूचना

प्रास
Tue, 04/12/2011 - 16:45 नवीन
ईश महोदय, आपला उपक्रम स्तुत्य आहे आणि आपला अभ्यास दांडगा! एक विनंती आहे. उपरोल्लेखित निबंधामध्ये बर्‍याच अंशी संदर्भ स्पष्ट झालेले दिसत नाहीत. केवळ
पुराणे व ज्योतिष ग्रंथांनुसार
असं लिहून कसं चालेल? १८ पुराणे आणि अनेकानेक ज्योतिष ग्रंथांमध्ये संदर्भ कसे हुडकावेत? सदर बाबतीत विष्णु पुराणासह इतर पुराणांत आणि रामायण-महाभारत महाकाव्यात काही वेगळे संदर्भ उपलब्ध होत असल्यास त्यांची संगती कशी मांडावी? पुन्हा मेरु पर्वत म्हणजे पृथ्विचा अक्ष असल्यास भारतवर्षादि निरनिराळी वर्ष (तुमच्या मते देश) कसे निश्चित झाले? तो संदर्भही त्याच्या कारणमीमांसेसह उपलब्ध झाल्यास विषय अधिक स्पष्ट होण्यास हातभार लागेल. जम्बुनद म्हणजे जांभळ्या रंगाचे सोने(?) अधिक स्पष्ट व्हावे अशी इच्छा. एकूण अधिक उत्तम प्रकारे सदर निबंध अद्ययावत करता आल्यास उपयुक्त होईल. पुलेशु
  • Log in or register to post comments

इतर द्वीपांविषयी माहिती आहे. पण ती निव्वळ गूढ स्वरुपाची आहे.

ईश आपटे
Wed, 04/13/2011 - 00:40 नवीन
खाली विष्णुपुराणाचा संदर्भ दिला आहे. इतर ही पुराणात थोडया फार फरकाने हीच माहिती आहे. इतर द्वीपांविषयी माहिती आहे. पण ती निव्वळ गूढ स्वरुपाची आहे. मेरु पर्वता भोवती संपूर्ण ग्रह,नक्षत्रे प्रदक्षिणा करतात असा पुराणात उल्लेख आहे. सूर्यसिध्दान्तासारख्या ज्योतिष ग्रंथाच्या आधारे हा निष्कर्ष निघतो, कि मेरु म्हणजे पृथ्वीच्या केन्द्र बिन्दुतुन जाणारा दक्षिणोत्तर अक्ष . पुराणात निरनिराळ्या वर्षांची स्थाने मेरु पर्वताच्या सापेक्ष, पूर्व्,पश्चिम इ. दिली आहेत. त्यावरुन वरील निष्कर्ष काढले आहेत.मेरु पर्वताचे वरचे टोक हे उत्तर ध्रुव मानले आहे. उत्तर कुरु हे भारताच्या अचुक १८० अंश पलीकडे आहे असे पुराणात वर्णन आहे. व त्याचा आकार धनुष्यासारखा आहे असे ही दिले आहे. ह्या वरुन ते वर्ष द. अमेरिका खंड ठरते. सुवर्णाचे पाच प्रकार भारतीय रसायनशास्त्रज्ञांनी मानले आहेत. त्यापैकी ३ दैवी आहेत. चौथा हा खनिजात सापडणरा, जो सध्या वापरात आहे. व पाचवा म्हणजे पार्‍या पासून बनवलेले सोने. जाम्बुनद हे पहिल्या ३ प्रकारातील सोने असावे. कदाचित ते पृथ्वीच्या क्रक्स मध्ये असेल. (हा अंदाज आहे). पण जाम्बुनद हा शब्द, जांभळ्या रंगाचे सुवर्ण असलेल्या नदीशी संबंधित आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

उत्तर कुरु

प्रियाली
Wed, 04/13/2011 - 01:01 नवीन
उत्तर कुरु हे भारताच्या अचुक १८० अंश पलीकडे आहे असे पुराणात वर्णन आहे. व त्याचा आकार धनुष्यासारखा आहे असे ही दिले आहे. ह्या वरुन ते वर्ष द. अमेरिका खंड ठरते.
ते पूर्वी उत्तरेला होते का? मग वाहत वाहत एके दिवशी दक्षिणेला आले? असे कसे आपल्या पूर्वजांनी दक्षिण अमेरिकेला उत्तर कुरु नाव दिले?
मेरु पर्वता भोवती संपूर्ण ग्रह,नक्षत्रे प्रदक्षिणा करतात असा पुराणात उल्लेख आहे.
अरेरे! यडपट कुठला गॅलिलिओ!
मेरु म्हणजे पृथ्वीच्या केन्द्र बिन्दुतुन जाणारा दक्षिणोत्तर अक्ष
पर्वत असेल तर अक्ष कसा? अक्ष असेल तर पर्वत कसा?
सुवर्णाचे पाच प्रकार भारतीय रसायनशास्त्रज्ञांनी मानले आहेत. त्यापैकी ३ दैवी आहेत. चौथा हा खनिजात सापडणरा, जो सध्या वापरात आहे. व पाचवा म्हणजे पार्‍या पासून बनवलेले सोने. जाम्बुनद हे पहिल्या ३ प्रकारातील सोने असावे. कदाचित ते पृथ्वीच्या क्रक्स मध्ये असेल. (हा अंदाज आहे). पण जाम्बुनद हा शब्द, जांभळ्या रंगाचे सुवर्ण असलेल्या नदीशी संबंधित आहे...
दैवी म्हटले की झाले ;) पुण्यवान लोकांना ते दिसते आणि पापी लोकांना दिसत नाही असेही म्हणून टाका. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश आपटे

ते पूर्वी उत्तरेला होते का?

llपुण्याचे पेशवेll
Wed, 04/13/2011 - 09:23 नवीन
ते पूर्वी उत्तरेला होते का? मग वाहत वाहत एके दिवशी दक्षिणेला आले? असे कसे आपल्या पूर्वजांनी दक्षिण अमेरिकेला उत्तर कुरु नाव दिले? वाहत दक्षिणेला आलेही असेल बॉ. शास्त्रज्ञ म्हणतात काही लाख वर्षांपूर्वी पृथ्विवरचे सगळा भूभाग एकसंध होता नंतर तुकडे पडून खंड सरकत सरकत एकमेकांपासून दूर गेले. अजूनही अशी आंतरखंडीय हालचाल होत आहे आणि असते. त्यामुळे अनेक भूकंप सागरात आणि भूपृष्ठावरही होत असतात. त्यामुळे तसे झालेही असेल.. कोणी बघितलंय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

+१

प्रियाली
Wed, 04/13/2011 - 17:20 नवीन
वाहत दक्षिणेला आलेही असेल बॉ.
पृथ्वी त्रिकोणी असेल तर कोनावरून घसरत घसरत दक्षिणेला येणे शक्य आहे. गोलाकार पृथ्वीवर मात्र खंड प्रामुख्याने पश्चिम-पूर्व किंवा नैऋत्य (हळू हळू दक्षिण) सरकायला हवेत. उत्तर दक्षिण नाहीत आणि ही प्रक्रिया फार फार पूर्वी झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

भारतीय उपखंड वरती (उत्तरेला)

एक
Wed, 04/13/2011 - 23:41 नवीन
सरकल्या मुळे, हिमालयाची निर्मिती झाली असं काहीसं ऐकल्या सारखं वाटतं आहे. ठामपणे मत व्यक्त करायला मी अजून सर्वज्ञ झालो नाही त्यामुळे माझा आपला अंदाज. -एक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

अगदी उत्तरेला नाही

प्रियाली
Wed, 04/13/2011 - 23:54 नवीन
अगदी सरळ उत्तर नाही, अग्नेयेला (पण पर्यायाने उत्तरेला) सरकत आली भारताची भूमी हे योग्य आहे. त्यात सर्वज्ञ असण्यानसण्याचा प्रश्न नाही. ही घटना लाखो वर्षांपूर्वी घडली (सुमारे ७०० लाख वर्षे) म्हणूनच आपट्यांना प्रश्न आहे की उत्तर कुरू कुठून कसे वाहत आले? नेमके कुठे होते? कारण ते जर लाखो वर्षांपूर्वी उत्तरेला होते म्हणून नाव उत्तर कुरु होते आणि जेव्हा दक्षिणेला आले तेव्हाही त्याला उत्तर कुरु नाव होते म्हणजे ते वाहत आल्याचे आपल्या पूर्वजांना माहित होते किंवा उत्तर कुरु उत्तरेला असताना आपले पूर्वज अस्तित्वात होते आणि प्रगत होते. हे मला पटलेले नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

>> अग्नेयेला (पण पर्यायाने

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 04/14/2011 - 13:11 नवीन
>> अग्नेयेला (पण पर्यायाने उत्तरेला) सरकत आली भारताची भूमी तुम्हाला ईशान्य म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

हो

प्रियाली
Fri, 04/15/2011 - 15:47 नवीन
ईशान्येला ;) गल्तीसे मिश्टेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

मेरुच्या उत्तरेला आहे

ईश आपटे
Wed, 04/13/2011 - 11:17 नवीन
मेरुच्या उत्तरेला आहे म्हणून त्याला उत्तर कुरु हे नाव आहे. नकाशा लोड केल्यावर अधिक स्पष्ट होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

उत्तर कुरु???

पंगा
Wed, 04/13/2011 - 16:35 नवीन
'उत्तर कुरु' हे बायेनीचान्स संस्कृतात आहे काय? म्हणजे 'उत्तर कर' असा काही आदेश वगैरे? पण मग 'उत्तर करणे' म्हणजे काय? 'उत्तर देणे' ऐकले होते. 'उत्तर करणे' नवीन आहे. 'उत्तर करण्या'चा उत्तरक्रियेशी काही संबंध आहे काय? (पण तसे असेल तर मग संस्कृत गंडल्यासारखे वाटते. जेवढे आठवते त्यावरून 'उत्तरा'ची बायेनीचान्स द्वितीया वगैरे नको का व्हायला? म्हणजे 'उत्तरं कुरु' किंवा असे काहीतरी? की संस्कृताची पडझड व्हायला तेव्हाच सुरुवात झाली होती?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश आपटे

शंका

प्रियाली
Wed, 04/13/2011 - 17:14 नवीन
मेरु पर्वत म्हणजे पृथ्वीच्या केन्द्रातुन जाणारा दक्षिण-उत्तर अक्ष होय.
जर मेरु पर्वत म्हणजे दक्षिण-उत्तर अक्ष असेल तर त्याच्या उत्तरेला म्हणजे काय? द. ध्रुवावर उभे राहिले तर इतर सर्व जग उत्तरेला दिसते तसे काही आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश आपटे

वाह छान माहीती आहे.

llपुण्याचे पेशवेll
Tue, 04/12/2011 - 17:03 नवीन
वाह छान माहीती आहे. पूर्वीपासून जगाचा नकाशा कायम बदलत आले आहेत. पूर्वी एकमेकांना जोडलेले खंड आतापर्यंत एकमेकांपासून दूर दूर गेले आहेत. त्यामुळे पुराणांमधील वर्णने आणि सद्यःस्थिती यांच्यात तफावत यायची फार शक्यता आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments

पुरावा

गणपा
Wed, 04/13/2011 - 16:23 नवीन
पूर्वीपासून जगाचा नकाशा कायम बदलत आले आहेत. पूर्वी एकमेकांना जोडलेले खंड आतापर्यंत एकमेकांपासून दूर दूर गेले आहेत.
हा घ्या पुरावा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

चांगली माहिती संकलित केली

पक्का इडियट
Tue, 04/12/2011 - 17:09 नवीन
चांगली माहिती संकलित केली आहे. आज उपलब्ब्ध असलेल्या पुराणांचे पुनर्लेखन जरी गुप्तकाळातील असले तरी परंपरेने आलेले पुराणांमधले कित्येक संदर्भ हे वेदपूर्वकालापासूनचे आहेत असे मानले जाते. त्यातून अनेक इतिहासाचे संदर्भ मिळतात. कल्पना, इतिहास, चमत्कृती यांचे अनोखे संगम असलेले साहित्य म्हणजे भारतीय पुराणे. कित्येकदा त्यातला धुसर असलेला भेद लक्षात न आल्याने, त्यांच्यावर काल्पनिक असा शिक्का मारला जातो. कथा काल्पनिक असु शकतात त्यात असलेला संदर्भ कदाचित बहुमुल्य असु शकतो हे अनेक जण लक्षात घेत नाहीत. वादाची सुरवात तिथे होते. सारासार विचाराने आकलन केल्यास अनेक गोष्टी समजतात हे नक्की. चांगला उपक्रम आहे. चालू राहू द्या !!
  • Log in or register to post comments

?

नितिन थत्ते
Tue, 04/12/2011 - 17:32 नवीन
पृथ्वी त्रिकोणी असल्याने शीर्षकातील "भूगोल" हा शब्द खटकला. सुधारणा करावी.
  • Log in or register to post comments

सहमत आहे. परंतु लेटेस्ट

पक्का इडियट
Tue, 04/12/2011 - 19:28 नवीन
सहमत आहे. परंतु लेटेस्ट बातमीनुसार पृथ्वी बटाट्याच्या आकाराची आहे http://english.cntv.cn/program/newsupdate/20110402/103172.shtml
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

पृथ्वी गोलच आहे

अगोचर
Wed, 04/13/2011 - 22:15 नवीन
पृथ्वी बटाट्यासारखी नसुन तिचे गुरुत्वाकर्षण बटाट्यासारखे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्का इडियट

काय सांगता? अरे हो खरेच की !

पक्का इडियट
Fri, 04/15/2011 - 12:08 नवीन
काय सांगता? अरे हो खरेच की ! मला कळलेच नाही आधी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगोचर

थत्ते साहेब, वैदिक काळात

५० फक्त
Tue, 04/12/2011 - 19:50 नवीन
थत्ते साहेब, वैदिक काळात प्रुथ्वी गोलच होती, आता आता आपट्यांनी लिहायला सुरु केल्यापासुन त्रिकोणि झाली असावी.. हो किन्नई ओ आपटे . अवांतर - एक हे आपटे प्राआआआआआआचीन इतिहास आपटताहेत आणि ते दुसरे आपटे कट्टे करताहेत, दोन्ही आपट्यांच्या नाडी पट्ट्या काढुन आपटे- कट्टे आणि नाडीपट्टे असा एक शोधनिबंध लिहिल काय कुणि ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

जम्बुनद्

प्रियाली
Tue, 04/12/2011 - 17:38 नवीन
जम्बुनद् हा एका जांभळट रंगाचा सुवर्णाचा प्रकार आहे. हे सगळ्यात उच्च दर्जाचे सुवर्ण आहे , जे ह्या पृथ्वी वरच उपलब्ध होते.(अजुन ही असेल) .
व्वा! व्वा! आपट्यांच्या सुरस कथामालिकेतील आणखी एक पुष्प. आवडले.
  • Log in or register to post comments

जम्बुनद नव्हे जांबूनद..

योगप्रभू
Wed, 04/13/2011 - 11:29 नवीन
आपटे साहेब, सोन्याच्या प्रकाराचा उच्चार जम्बुनद् नसून जांबूनद असा आहे. पण हे जांभळट रंगाचे असून सगळ्यात उच्च दर्जाचे सुवर्ण आहे, हे कसे मानावे? चाणक्य आपल्या अर्थशास्त्रात म्हणतो जांबूनद, शातकुंभ, हाटक, वैणव व शृंगीशुक्तिज असे सोन्याचे उत्पत्तिस्थानावरुन पाच भेद आहेत. हे सोने शुद्ध रुपाचे, रसायनाने बनवलेले किंवा खाणीतून काढून शुद्ध केलेले असे तीन प्रकारचे असते. कमलातील परागाच्या वर्णाचे, मऊ, स्निग्ध, नादरहित व चमकणारे सोने श्रेष्ठ होय. शुद्ध सोन्याचा हळदीसारखा एकच वर्ण असतो. सोने तापवले असता जे आत व बाहेर कमलातील परागासारखे किंवा कोरांटीच्या फुलासारखे एकरंगी असते, ते उत्तम. पण ते जर काळसर किंवा निळसर निघाल्यास अशुद्ध जाणावे. तांबूस पिवळे सोने मध्यम व लाल सोने कनिष्ठ जाणावे. आता तुम्ही तर म्हणताय, की जांभळट सोने. म्हणजे निळा व लाल या रंगांचे मिश्रण. मग जांभळे सोने उच्च दर्जाचे कसे ठरेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

जांबुनद

प्रियाली
Wed, 04/13/2011 - 17:15 नवीन
असामान्य योगबलाने आपट्यांनी जांबूनदचे जम्बुनद करून त्याला हिरवट-निळसर दिसणारा टरक्वाइज ठरवले आहे. अधिक खुलासा माझ्या खरडवहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

महात्मा

राजेश घासकडवी
Fri, 04/15/2011 - 15:44 नवीन
खरा जांभळा तोच. तुमच्या डोळ्यावर लाल चष्मा असल्यामुळे त्यातून जो रंग दिसतो त्याला तुम्ही जांभळा म्हणता. मर्ढेकरांच्या ओळी थोड्या बदलून लिहितो अशीच जावी वर्षे काही, आणि महात्मा यावा पुढचा जम्बुस आम्ही पुन्हा पहावे काढुन चष्मा डोळ्यांवरचा... असे चष्मे काढण्याची वेळ आपल्यावर आणत असल्यामुळे ईश आपटे हे रेग्युलर महात्मा आहेत असंच मर्ढेकर म्हणतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

चांगली कविता आहे

ईश आपटे
Fri, 04/15/2011 - 18:47 नवीन
चांगली कविता आहे...त्या पाय वर केलेल्या :) कवितेपेक्षातर खूपच चांगली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

छान संकलन केले आहेत आणि उत्तम

परिकथेतील राजकुमार
Tue, 04/12/2011 - 17:49 नवीन
छान संकलन केले आहेत आणि उत्तम शब्दात आमच्यापर्यंत पोचवले आहेत. लेखन थोडे आटोपते घेतल्यासारखे वाटले. ह्याविषयावर अजुन वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

असेच म्हणते

स्मिता.
Tue, 04/12/2011 - 19:46 नवीन
या माहितीपूर्ण लेखांमुळे ज्ञानात मोलाची भर तर पडतेच आहे सोबत करमणूकही होते. अजून येऊद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

रोचक माहीती

आत्मशून्य
Tue, 04/12/2011 - 17:56 नवीन
.
  • Log in or register to post comments

ऊत्तम लेख

तर्री
Tue, 04/12/2011 - 18:02 नवीन
अभ्यास पूर्ण ऊत्तम लेख. कालगणना , युगांची संकल्पना , ज्योतिष , पृथ्वीची निर्मीती , आकाशगंगेची निर्मीती , ह्या सगळ्यावर भाष्य करणारी भारतीय संस्कृती खरच थोर ! आज त्यामधील काही दुवे संदर्भ हीन , शासत्राधार नसलेले वाटतील ,पण त्या वर भाष्य आहे हे मला खूप मोलाचे वाट्ते. इश साहेबाना प्रणाम ....
  • Log in or register to post comments

काही प्रश्न

राजेश घासकडवी
Tue, 04/12/2011 - 18:55 नवीन
पुराणात स्पष्ट उल्लेख आहे, की जम्बु द्वीप लवणसागराने वेढलेले आहे. इतर द्वीपांभोवती असलेले सागर वेगळ्या द्रव्याचे आहेत.
हे सागर कुठच्या द्रव्यांचे आहेत हे सांगाल का?
लाखो वर्षात समुद्र व इतर भूरचनेत वारंवार बदल झाल्यामुळे, वरील शहरे अचूक हुडकून काढणे अशक्यप्राय बनले आहे.
तुम्ही दिलेल्या संदर्भातले उल्लेख किती जुने आहेत? शहरंच्या शहरं हरवेपर्यंत त्यात बदल कसा झाला नाही? वेगवेगळ्या डायमेन्शन, न सापडणारी शहरं मानण्यापेक्षा ते काल्पनिक स्थळांचं वर्णन असू शकेल का?
  • Log in or register to post comments

गुर्जी पिरी रीसचे नकाशेही

मृत्युन्जय
Tue, 04/12/2011 - 20:45 नवीन
गुर्जी पिरी रीसचे नकाशेही काल्पनिकच मानावेत काय? की तो भारतीय नसल्यामुळे आणी त्याचे वैदिक संस्कृतीशी नाते नसल्यामुळे त्याचा उदोउदो करण्यात हरकत नसावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

कोण पिरी रीस?

राजेश घासकडवी
Tue, 04/12/2011 - 21:35 नवीन
हा कोण हे मला माहीत नाही. तो नकाशे काढत असे असं तुमच्या लिखाणावरून दिसतं. त्याचे नकाशे कोणी माझ्या समोर मांडून 'शहरं सापडणार नाही कारण समुद्राच्या उलथापालथीमुळे ती हलली आहेत' असं म्हटलं तर मी हेच प्रश्न विचारेन. भारतीय असणं व वैदिक संस्कृती यांचा मी कुठे उल्लेख केला? संदर्भ काय इतकंच विचारलं. अभारतीय चक्रम विचारांवर मी जरूर शंका घेतो. एरिक व्हॉन डॅनिकेनचे विचार शंका घेण्यालायकच आहेत. चक्रम विचारांवर कोणा एका देशाचा मक्ता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

चुकताय तुम्ही

गोगोल
Tue, 04/12/2011 - 21:43 नवीन
> एरिक व्हॉन डॅनिकेनचे विचार शंका घेण्यालायकच आहेत हा मनुष्य बरोबर होता हे आता सिद्ध झालेल आहे. अधिक माहिती साठी माझा खालील प्रतिसाद बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

पिरी रीस १६ व्या शतकातील

मृत्युन्जय
Tue, 04/12/2011 - 22:10 नवीन
पिरी रीस १६ व्या शतकातील समुद्री चाचा / खलाशी / व्यापारी काहीही म्हणा. त्याच्या सफरीच्या अनुभवावरुन आणि पुरातन नकाश्यांवरुन त्याने पृथ्वीचा नकाशा तयार केला होता. अर्थात हे नकाशे त्याने चक्क ढपलेले होते. या नकाशात द्क्षिण अमेरिका, अफ्रिका आणि अंटार्क्टिका जोडलेले दाखवले होते. त्या काळात हे ज्ञान कोणालाही नव्हते की त्याने कढलेले नकाशे ख्रिस्त्पुर्व १०००० च्या पृथ्वीच्या भुगोलाशी तंतोतंत जुळतात. मग हे ज्ञान कुठुन आले. बर हे भूभाग नंतर वेगळे कसे झाले? गोंडवनलँड आणि लॉरेशियाचे काय? आख्खे खंड हालले तर शहरे हलु शकत नाहीत काय? की आपल्याला जे माहित नाही ते अस्तित्वातच नाही म्हणुन डोळ्यावर झापडे ओढुन घेउन स्वस्थ बसायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

पिरी रीसवरील लेख वाचायला

राजेश घासकडवी
Tue, 04/12/2011 - 22:41 नवीन
पिरी रीसवरील लेख वाचायला आवडेल. पण तूर्तास या लेखावरच बोलू.
डोळ्यावर झापडे ओढुन घेउन स्वस्थ बसायचे?
नाही, डोळसपणे प्रश्न विचारायचे. आणि समर्थ उत्तरांची अपेक्षा ठेवायची. उत्तरं योग्य वाटली तर स्वीकारायची. पुरेसे पुरावे दिसले नाहीत तर नाकारायची. इतकं साधं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

लिहित राहा......!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/12/2011 - 18:57 नवीन
वाचतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

चांगला लेख. वाचतोय. अजून

बबलु
Tue, 04/12/2011 - 21:15 नवीन
चांगला लेख. वाचतोय. अजून येउद्या. (आणि नकाशा इथे डकवता आला तर पहा प्लिज).
  • Log in or register to post comments

+१

पिवळा डांबिस
Tue, 04/12/2011 - 22:26 नवीन
(आणि नकाशा इथे डकवता आला तर पहा प्लिज). सहमत आहे... फोटो टाकल्याशिवाय पाककृतीला प्रतिसाद द्यायचा नाही ही मिपाची परंपरा (चुकलो, थोर परंपरा) आहे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबलु

हेहेहे!

प्रियाली
Tue, 04/12/2011 - 22:36 नवीन
फोटो टाकल्याशिवाय पाककृतीला प्रतिसाद द्यायचा नाही ही मिपाची परंपरा (चुकलो, थोर परंपरा) आहे!!!
+१. या पाककृतीत चांगलेच पकवले आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

फोटो टाकल्याशिवाय पाककृतीला

अलख निरंजन
Wed, 04/13/2011 - 16:54 नवीन
फोटो टाकल्याशिवाय पाककृतीला प्रतिसाद द्यायचा नाही ही मिपाची परंपरा (चुकलो, थोर परंपरा) आहे!!!
हाहाहाहा...आपट्यांनी पुलाव चांगला पकवला आहे. फोटो दिला तर तर सोन्याहूनही जांभळे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

छान

आळश्यांचा राजा
Tue, 04/12/2011 - 21:24 नवीन
छान माहिती. लेखकाने प्राचीन ग्रंथांमधील माहितीवर प्रकाश टाकण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे. त्याबद्दल अभिनंदन आणि आभार. लेखकाच्या मतांशी मी बरेचवेळा सहमत नाही. परंतु तरीही त्यांचे लेखन स्वागत करावे असेच आहे. लेखकाचे इंटरप्रिटेशन पटत नसेल तर ते बाजूला ठेऊनही काही नवीन माहिती मिळते, आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये असे असे म्हटले होते हे समजते, हे ध्यानात घेऊन या लेखनाची दखल घेतली जावी. (अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे लेखन असे समजून, कदाचित,) काही सदस्य तिरकस, टोमणेवजा प्रतिसाद देत आहेत. लेखकाने त्याकडे लक्ष न देता आपले लेखन करत रहावे ही विनंती. व्यक्तिशः मला या लेखकाच्या लेखनात बरीच नवीन माहिती मिळाल्याचा आनंद मिळतो. आपापले इंटरप्रिटेशन करायला प्रत्येकजण स्वतंत्र आहे.
  • Log in or register to post comments

सहमत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/12/2011 - 22:02 नवीन
लेखकाचे इंटरप्रिटेशन पटत नसेल तर ते बाजूला ठेऊनही काही नवीन माहिती मिळते, आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये असे असे म्हटले होते हे समजते, हे ध्यानात घेऊन या लेखनाची दखल घेतली जावी. सहमत आहे. (अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे लेखन असे समजून, कदाचित,) काही सदस्य तिरकस, टोमणेवजा प्रतिसाद देत आहेत. लेखकाने त्याकडे लक्ष न देता आपले लेखन करत रहावे ही विनंती. व्यक्तिशः मला या लेखकाच्या लेखनात बरीच नवीन माहिती मिळाल्याचा आनंद मिळतो. आपापले इंटरप्रिटेशन करायला प्रत्येकजण स्वतंत्र आहे. सहमत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

-१

प्रियाली
Tue, 04/12/2011 - 23:05 नवीन
(अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे लेखन असे समजून, कदाचित,) काही सदस्य तिरकस, टोमणेवजा प्रतिसाद देत आहेत.
नाही! शालेय किंवा महाविद्यालयीन इतिहास हा कचर्‍यासारखा आहे कारण तो कॉंग्रेस आणि साम्यवादी पुरस्कृत आहे* असे पटवून द्यायच्या उद्योगात आपटे आहेत म्हणूनही टोमणेवजा, तिरकस प्रतिसाद आहेत. लेखन आवडण्यात आणि पटण्यात लेखनाचा उद्देश हाही महत्त्वाचा भाग असतो. * हे त्यांनी एका मिपा सदस्येच्या खरडवहीत लिहिलेले आढळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

प्रियाली यांच्याशी सहमत

राजेश घासकडवी
Wed, 04/13/2011 - 01:13 नवीन
ईश आपटे यांनी टोमणेवजा विधानं, तिरकस लेखन केलेलं आहे. तसं करायला काहीच हरकत नाही, फक्त त्यांच्या लेखनावर तशाच प्रतिक्रिया आल्या तर कोणीच राग मानू नये. तरी बरं कोणी त्यांना, त्यांनी इतरांना दिल्या तशा अर्वाच्य शिव्या दिलेल्या नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा