Skip to main content

ग्रो अप बेब्ज..!!

लेखक गवि यांनी बुधवार, 16/02/2011 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
नाही नाही.."आजकालचे तरुण-तरुणी".."पाश्चात्यांचं अंधानुकरण"..असा त्रिफळाचूर्णी लेख नाही हा..तरीही हा यापूर्वी पहिल्यांदा लिहीला तेव्हा मला कोणीतरी आधुनिक बुरख्याआड लपलेले कृष्णराव हेरंबकर (अश्लीलमार्तंड) म्हणाले होते. त्या रात्री मात्र मी त्रिफळाचूर्ण नाही तरी जरा हवाबाण हरडे घेतले..असो.. तर .. वक्षखिंड (Cleavage ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) दाखवणारे काचोळीसदृश (Bra ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) उत्तरीय घालून महाविद्यालयात येणा-या पात्रांवर ड्रेस कोड नावाचा काहीतरी निर्बंधवजा अत्याचार होतोय असं पेपरमध्ये मध्यंतरी कळलं. आणि अधूनमधून कळतच असतं. युवावर्गाची (मी पण युवा हं..!!) मुख्य तणतण ही की हे कपडे (म्हणजे सूक्ष्म वस्त्रे) कम्फर्टेबल असतात म्हणून आम्ही घालतो. त्यावर बंदी घालणारे हे कोण प्रिन्सिपॉल.. इट्स आवर लाईफ.. मी अजिबात संस्कृतीरक्षक नाही बाबा. आधीच सांगतो. मी अजिबात कुठल्याही फॅशन विरोधात नाही. उलट नव्या नव्या कपड्यांत नटलेल्या पोरी पाहून मी कौतुक करतो. पोरांचं मला कौतुक नाही. कारणं नैसर्गिक आहेत. मी पोरींविषयीच सगळं लिहिणार. तंग किंवा लहान कपडे घालू नका असा प्रचार इथे नाही. मी तो करणारही नाही. मला उलट असल्या फटाकड्या पोरी बघायला आवडेलच. पण "कम्फर्ट"च्या मुद्दयामुळे आंबट ताक प्यायल्यासारखी माझ्या कपाळावर आठी आली आहे. ज्या निर्वस्त्रांवर "उपाय" म्हणून ड्रेस कोड आला असावा ती निर्वस्त्रं मी नीट पहिली आहेत. हो. पहिली आहेत. बेंबीवर संपलेला शर्ट:- हा घालून मुलगी बाईकवर कुमारमित्रापाठी (Boyfriend ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) बसते, तेव्हा ती दर तीस सेकंदांनी हात मागे नेऊन शर्ट चिमटीने खाली कमरेवर खेचते. त्याखाली असलेला थालीपीठ भाजणी, उडदाचं डांगर, मोदकाची उकड यापैकी एका शेडचा मांसल भाग झाकावा अशी इच्छा तिला वारंवार होते. म्हणजेच माय लॉर्ड..तो शर्ट कम्फर्टेबल नाही. दो-यायुक्त अंतर्वस्त्रं (याचं नक्की नाव सांगून सहकार्य करावं):- हा कपडा मी घालू का असं मुलीनं विचारल्यावर "पण बाकीचे कपडे कुठे आहेत?" असा भाबडा प्रश्न जातो.. ही स्ट्रिंग स्कंधखळग्यांच्या दोन्ही बाजूस आणि कमरबंदाच्या जागेतून दिसत असते (चू.भू.द्या.घ्या.). ती ही मुलगी सारखी ओढत असते आणि कापडाच्या आत झाकायला बघत असते. म्हणजे लाज वाटते. म्हणजे कम्फर्टेबल नाहीच ना? खूप कमी उंचीचा स्कर्ट:- (वारा आला तरी उडणार नाही कारण उडायला काही शिल्लकच नाही असा.) तो घालून एअरपोर्टवर बसलेली मुलगी पाय अत्यंत आवळून क्रॉस करून बसते. मोकळेपणानं सरळ पाय पसरून बसू शकत नाही. दोन मांड्यांत उरला सुरला स्कर्ट खुपसून घट्ट धरून बसायचं..बाथरूम सापडत नसल्यासारखा चेहरा करून. म्हणजे कम्फर्टेबल नाहीच. मुलीच्या टी शर्टच्या छातीच्या उभारावरच्या एरियात जर लक्षणीय मजकूर छापलेला असला (भले गायत्री मंत्र का असेना..) तर तो आम्ही वाचायचा की नाही वाचायचा? वाचायचा नाही तर मग तो तिथे कशाला ? मैत्रिणींनो..जर उत्तम वक्ष आणि मांड्या दाखवणारा ड्रेस तुम्ही घातलात तर त्यात तुम्हाला फक्त कम्फर्ट हवा असतो का? की उकडतं म्हणून घालता? की आपले असेट इतरांनी बघावेत असं वाटतं? खरं सांगू? इतरांनाही ते बघावेसे वाटतात. तुम्ही ते दाखवलेत तर आम्ही बघू. लाजून खाली मान घालूच असं नाही. ऑफिसात एक मुलगी पूर्ण मांड्या दाखवणारा स्कर्ट घालून आली होती. बराच वेळ तिच्यासोबत काम (मराठी अर्थानं..) करताना, बोलताना छताकडे बघ, पूर्वेकडे बघ, ईशान्येकडे बघ असं केल्यावर माझ्या लक्षात आलं की मी कशाला लाजतोय? मी कशाला टेन्शन घेतोय? मी कपडे घातलेत. आता माझी नजर चोरायची मला काही गरज नाही. पण ते अवघड होतंच. पावसात पांढरा टी शर्ट घातलात तर तो भिजल्यावर कोणी तुम्हाला बघू नये आणि बघितलं तर "तसल्या ओलेत्या" नजरेनं बघू नये अशी अपेक्षा जरा अनरियल नाही वाटत? अरे माझ्या (सारख्याच) तरुण मित्र मंडळींनो. तुम्ही म्हणता की कॉलेजनं आमच्या कपड्यांत लक्ष घालू नये. तुम्ही म्हणता की "यहां का सिस्टीम ही है खराब". तुम्ही म्हणता की "आम्हाला व्यक्तिस्वातंत्र्य हवं." तर मग घसा खरवडून विरोध करण्यापूर्वी "सारासार विचार" नावाची एक सोपी गोष्ट का करून बघत नाही? त्यासाठी आधी नुसता "विचार" करण्याची सवय का लावून घेत नाही? साधा शुद्ध शांत विचार. मग तो कसलाही असो. भिरभिर न करता शांत बसून "विचार". रोज थोडी थोडी सवय केली तर हळू हळू जमेल. काय आहे तो ड्रेस कोड? कशासाठी केला गेलाय? नागडं फिरायची परवानगी मिळाली तर तुम्ही फिराल का? आपण तथाकथित "प्रगत" होत जाताना नुसते "कपडे" स्वीकारलेले नाहीत, त्यासोबत काही संकोचाच्या कल्पनाही तयार केल्या आहेत.. अपरिहार्यपणे. कपडे बदलून समाज तातडीने बदलणार नाही. त्याची नजर असे कपडे घालून रातोरात मरणार नाही. त्याला वेळ लागेल. समाजाने बदलावं आणि नजर सुधारावी ही अपेक्षा चूक नसली तरी अतिआदर्शवादी आहे. ते होणे नाही. तोपर्यंत तरी स्वातंत्र्याची आजच्या दिवशी अस्तित्वात असणारी एक किंमत आहे. ती द्यायची तयारी आहे का? निसर्गाकडे परत जाऊन वल्कलं नेसायची (किंवा तीही नाही) तर त्याच मार्गावर पुढे निसर्गाकडेच जाऊन मुक्त नर मादी संभोग चालेल का? तशी दुर्घटना घडली तर ती हलकी घेऊ शकणार आहात का? पाकीट मारलं गेल्यावर आपण दु:ख करतो पण आयुष्यातून उठत नाही..तसंच याही दुर्घटनेला घेऊ शकू का? विचार..विचार.. किंमत द्यायची तयारी असेल तर जरुर घ्या ते स्वातंत्र्य.. हरकत घेणारे देणारे समाज किंवा कॉलेजचे प्रिन्सिपल यापैकी कोणी कोणी नाही..प्लीज गैरसमज करू नका..तुम्हीच आहात स्वातंत्र्य घेणारे, किंमत देणारे आणि हरकत घेऊ शकणारे.. ग्रो अप बेब्ज. .. !! ... (आता यात कोणी डबल मीनिंग घेतलं तर तो प्रस्तुत लेखकाच्या आधीच डागाळलेल्या चारित्र्यावरचा आणखी एक दुर्दैवी डाग ठरेल..)

वाचने 64519
प्रतिक्रिया 157

प्रतिक्रिया

In reply to by मुलूखावेगळी

नीट वाच हा मुद्दे दोघांनाही लागु पडतात. पण मुलांचा उल्लेख नाहीये म्हनुन
कुठे हे स्त्री विषयक चर्चा चालु असताना त्यात जबरदस्ती पुरुष का घुसवताय ? णवा धागा काढा

मुद्दा मांडण्यासाठी मसाला मारावा लागतो.ते अधूनमधून हिरवट शब्द नसते तर तुमच्यासहित कोणी काय मुद्दा आहे तेही शेवटापर्यंत वाचले नसते.
अवांतर : गवि , तुमचे लिखान आवडले .. आवडते. हा लेख ही उत्तम झाला आहे.. जे बदलायचे आहे त्याचे वर्णन हे असेच मनावर ठसले पाहिजे .. जरे येथे मुद्धा कंफर्टपनाचा असला तरी हा लेख बर्याच अन्कंफर्ट मनाचा चलबिचलपणा पण दाखवतो आहे.. तरीही आपल्याच लेखामध्ये मुद्दे मांडण्यासाठी मसाला मारावा लागतो हे म्हणने चुक आहे, अआणि तितकेच आपल्या प्रतिभेला कमी लेखने आहे. प्रत्येक कलाकृती हि तीच्या निर्मात्याला आनंद देवुन जाते.. आणि त्या कलाकृतीचा खुद्द त्या कलाकाराणेच आदर केला पाहिजे .. म्हणजे इतर ही ते करतीलच ... अतिअवांतर : अश्लिल कपडे घालताना ज्याचा त्याचा प्रश्न असे उद्दात धोरण अवलंबवताना.. एखाद्याने जर त्या पद्धतीने लेखन केले की तुम्ही प्रसिद्धीसाठी हे केले आहे असे वाटते असे म्हणताना काहीच कसे वाटत नाही .. एकिकडे ज्याचा त्याचा प्रश्न आणि दुसरीकडे माल मसाला का म्हणुन ते कळाले .. मत हे ठाम हवे ... भले ते चुकीचे का असेना - गणेशा

ज्यांना जे जे जशा फॅशन चे कपडे घालायचेत ते त्यांनी घालावेत. फक्त घालताना एक काळजी घ्यावी की ते व्यवस्थित दिसावेत..ओंगळवाणे दिसू नयेत...मग भले बिकीनी ही घालोत. फॅशन करताना त्या फॅशन ची व्यवस्थित माहिती करून ती करावी . लो वेस्ट जीन्स घालून बसायचे असेल तर कमरेला बेल्ट लावणे मस्ट आहे. म्हणजे बसलेल्या स्थितीत ती जिन्स मागून व्यवस्थित दिसते.( गवींच्या भाषेत -)वक्षखिंड दाखवणारा टॉप घालायचा असेल तर तो पुरेसा घट्ट हवा (बॉडी फिटींग). बाकी गविंना ज्या मुली त्यांच्या वेषभूषेत अनकंफर्टेबल वाटल्या त्या तशा नसतील ही. पायावर पाय घालून दोन अडीच तास बसणे हे पुरषांना जमत नसेल पण युवतींना तशी सवय असेल. नाहीतर ती मुलगी उठून उभी पण राहिली नसती का. अशा स्थितीत बसणेच मस्ट होते असे नक्कीच नसेल, मुले नाही का सारखे आपल्या केसांवरून हात फिरवत असतात तशाच मुली देखील कपडे वर खाली ओढत असतील.

सवय नसल्यामुळे आज जे कपडे अन्कम्फर्टेबल वाटताहेत; काही दिवसांनी सवय झाली की त्यांना कंफर्टेबल वाटू लागतील. मग जशी जशी असे कपडे घालणार्‍या मुलींची संख्या वाढत जाईल तसे तसे लोकांनाही त्याचे वावडे उरणार नाही. तोवर नविन फ्याशन येईल. आणि हे चक्र चालू राहिल. तसं पाहिलं तर आज अन्कंफर्टेबल वाटत असूनही असे कपडे घालणार्‍या मुली म्हणजे एक प्रकारे 'ट्रेंड सेटर' च म्हणायला हव्या. राहिला प्रश्न त्या फ्याशन च्या समर्थनार्थ केलेला युक्तीवाद (कंफर्ट)... जो चूक असू शकतो (एखाद्या मुलीला/मुलाला वाटतही असेल कंफर्टेबल म्हणजे सगळ्यांनाच कंफर्टेबल असेल असं नाही).. त्याऐवजी 'वैयक्तिक आवड निवड' (ज्याचा त्याचा प्रश्न!) हा युक्तीवाद जास्त बरोबर वाटतो.

कुणाला वाटेल त्याने तसे कपडे घालावेत आणि त्यामुळे दुसरयांच्या पोटात जळजळ व्हायचं कारण नको. बाकी लेखातील मूळ मुद्द्यांशी सहमत.. - पिंगू

गविंचे मुद्दे नीट समजून न घेता संस्कृती रक्षक, फैशन सेन्स , बलात्कार , नउवारी साडी वगैरे मुद्दे हवेत उडवले जात आहेत. जर एखादे वस्त्रप्रावरण कंफर्टेबल वाटते म्हणून अंगावर चढवायचे तर त्यात वावरतानाचा सहजपणा दिसला पाहिजे ,उगाच अवघडले पणा येणार असेल तर त्यात कसला आलाय डोंबलाचा कंफर्ट ? इतके साधे आणि सोपे मत त्यांनी मांडले आहे. लेख छानच लिहीला आहे जरा बोचरा आहे पण विषयच तसा असल्यामुळे त्यांना तो अधिक पातळ करता आला नसावा.

लेखनशैली अप्रतिम आहे .वाचतांना मजा आली . प्रतिक्रीया सुद्धा रोचक आहेत .अश्यावेळी माझ्यासारख्या प्रतिक्रिया सम्राटांनी किती काळ मौन धरायचे तेही अश्या रंजक लेखावर ? तेव्हा उचलली जीभ आणी लावली टाळ्याला.. ड्रेस कोड हि संकल्पना मला तत्वता मान्य नाही .कुणी काय घालावे ह्यावर उपदेश करणारे सीमेपलीकडे भरपूर आहेत .हि तालिबानी प्रवृत्ती आपल्या समाजात अजिबात असता कामा नये . मुळात एखादा पुरुष उत्तेजित होईल अशी वेशभूषा घालू नको हे एका कन्येस सांगण्यापेक्षा पुरुषप्रधान मानसिकता हि बालकास त्याच्या बाल्यावस्थेत म्हणजे पुरुषत्वाची जाणीव होण्याआधी सुधारली पाहिजे . स्मिता ताई ह्यांनी खुपतेच्या भागात जो प्रसंग सांगितला (ह्याचा उल्लेख एका प्रतिक्रियेत होता ) त्या अनुषंगाने माझे मत मांडतो . त्यात मुलीने जीन्स कशी घालावी हे तिने ठरवावे हे मान्य .मात्र आपला भारत एकच वेळी अनेक शतक व दशकात राहत आहे . समाजातील वाढत्या उच्च मध्यमवर्गीयांची आधुनिकीकरणाची झेप एवढी जलद आहे .कि इतर वर्गांची माती कुंठीत होते.( दे धक्का मधील मक्याचे शेवटचा डायालोग)ह्यात आर्थिक आणी सांस्कृतिक व सामाजिक विकास व प्रगल्भता अश्या अनुषंगाने मला म्हणायचे आहे . अश्यावेळी ती तरुणी लो जीन्स घालून बाईक वर बसली असतांना पाठून आलेले तरुणाने तिच्या जीन्स मध्ये सिगरेट टाकली . तेव्हा अर्थात त्या प्रसंगाला तोंड त्या तरुणीला द्यावे लागले . महान परंपरांचे गोडवे गाणार्या आपल्या समाजात पुरुष प्रधान संस्कृती व स्त्रीला फक्त मादी समजणे .व पौगुंडावस्थेत आपल्या नैसर्गिक भावनांचे दमन कि शमन ह्या द्विधा मनस्थितीत असलेल्या बहुतांशी युवकांची मानसिकता. त्यास हातभार म्हणून प्रसारमाध्यमात जाहिरात ते रियालती शो मधून व अर्थात सिनेमातून महिला हे उपभोग्य वस्तू म्हणून सादर केली जाते .. अश्यावेळी अशिक्षित व शिक्षित तरुण जेव्हा आधुनिक पेहेराव केलेल्या तरुणी पाहतात तेव्हा त्यांच्यातील विकृती बाहेर येते .पूर्ण साडी घातलेल्य बायकांना बस मध्ये किंवा लोकल मध्ये धक्का मारणे .किवा चिमटा काढणे असे प्रकार होतात. ( बहुतेक गोर्या बायका भारतातील शहरतील व खेड्यातील तरुण हे निळ्या सिनेमातून प्रथम पाहतात .तेव्हा सगळ्या गोर्या बायका म्हणजे कधीही कुठेही तयार . अशी कल्पना बहुतांशी भारतीय तरुण करतात .म्हणून मग अमीर खान ला जाहिरातीतून आव्हान करावे लागते ) .तेव्हा अश्या परीस्थित आपण कुठे वावरत आहोत हे पाहून पेहराव करणे.( डोंबिवलीतून आमच्यावेळी मुली पंजाबी ड्रेस घालून मुंबईत कॉलेजात शिरल्या कि लगेच वेशभूषा बदलून आधुनिक होतात .दिल्ली ६ मध्ये सोनम कपूर चा गाण्यातील प्रसंग आठवा ) किंवा जर कुणी वाकड्यात गेल. तर पायताण समोरच्याच्या गालावर मारण्याची धमक नि तयारी असेल तर असे पेहेराव घालण्यात काहीच हरकत नाही . चक्षु मोदन करणे किंवा सौंदर्याला दाद देणे हे रसिकतेचे उदाहरण असते .मात्र त्यात अतिरिक्त वासनेचा डोस आल्यास वखवख निर्माण होते व तिच्यातून विकृती . व असे विकृत महाभाग शाब्दिक किंवा प्रत्यक्ष अंगचटीला येऊन नसता अगोचरपणा करतात. तेव्हा काळ वेळ पाहून वेशभूषा करायला काहीच हरकत नाही .

आणि आवडलाही ...बाकी एक लिंक देते ती बघावी हि विनंती.अमिताभ बच्चन आणि झीनत चा 'दोस्ताना' या चित्रपटातील संवाद जरूर पाहावा आणि ऐकावा.... http://www.youtube.com/watch?v=sBL6wZUFgW4

विजुभाऊ लेख वर आणल्या बद्दल थॅंक्यू व्हेरी मच !