निकोल किडमन दुसर्‍या ऑस्करकडे ~ मुलासाठी व्याकुळ झालेली बेक्का कॉर्बेट...!

इन्द्र्राज पवार's picture
इन्द्र्राज पवार in जनातलं, मनातलं
3 Feb 2011 - 12:15 am

हॉलीवूडमध्ये फारच थोड्या अभिनेत्रींचा प्रवास "ग्लॅमर गर्ल" ते "सीरिअस अ‍ॅक्ट्रेस" असा झाला आहे (आपल्याकडील 'रेखा' या अभिनेत्रीने असा प्रवास केला होता असे म्हणता येईल). अलिकडील काही वर्षात प्रामुख्याने नाव समोर येत आहे ते आहे "निकोल किडमन" हिचे. योगायोगाने ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या दोन्ही देशाची नागरिक बनलेल्या (निकोलचे आईवडिल ऑस्ट्रेलियन पण तिचा जन्म झाला होनोलुलू या हवाई बेटावर, त्यामुळे तांत्रिक मुद्द्यावरून 'बाय बर्थ' तिला अमेरिकेचे नागरिकत्व आपोआप मिळाले) निकोलने ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजनच्या सोप ऑपेराज् मध्ये काही काळ काम केल्यावर तिथल्याच चित्रपटसृष्टीत काही लहानमोठ्या भूमिका केल्या. पण तिथे तिचा तसा जम जरी बसला नाही तरी तिच्या देखणेपणामुळे तिला योग्य वयात हॉलीवूडमध्ये प्रवेश मिळाला आणि टॉम क्रुझ (ज्याचाबरोबर तिने पुढे दहा वर्षे संसारही केला...) समवेतचा पहिलाच चित्रपट "डेज ऑफ थंडर" ने तिला हवे ते यश आणि नाव मिळवून दिले. पुढे मायकेल कीटन, बिल पुलमन, जिम कॅरी, जॉर्ज क्लूनी आदी आघाडीच्या अभिनेत्यासमवेत झळकून तिने हॉलीवूडमधील आपले स्थान पक्के केले. पुढे 'मूलॉ रूज' ने तर तिला प्रथम क्रमांकाची आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनविले. इथपर्यंतचा तिचा प्रवास मुख्य हीरोसाठी आवश्यक असणारी सुबक बाहुलीसम हीरॉईन असाच होता. पण तिच्यातील 'अभिनेत्री' ला वाव मिळाला तो केवळ तीन नायिकांच्यावर बेतलेल्या 'द हावर्स' या चित्रपटात तिने साकारलेल्या लेखिका 'व्हर्जिनिया वूल्फ' च्या भूमिकेमुळे. या आगळ्यावेगळा कथानकाच्या (तीन नायिका पण यांचा काळ आहे अनुक्रमे १९२३, १९५१ आणि २००१....तीन प्रसंगी घडणार्‍या घटना पण तिघीनाही त्या घटनेने गुंफले गेले आहे...अक्षरशः "माईन्ड ब्लोईंग" म्हणावे अशी पटकथा....जी फक्त हॉलीवूडमध्येच विचारासाठी येऊ शकते....तीन टॉपच्या हीरॉइन्स पण समोरासमोर एकदाही येत नाहीत....हेही एक वैशिष्ट्यच !) चित्रपटात 'ऑल टाईम ग्रेट' मेरिल स्ट्रीप, अजून एक गुणवान अभिनेत्री ज्युलियाना मूर दोन प्रमुख भूमिकेत असूनही निकोल किडमनने २००३ चे "ऑस्कर" पटकाविले त्या याच चित्रपटातील भूमिकेसाठी... तिच्यावर असा केलेला खास मेकअपही चर्चेचा विषय झाला होता....तिचे कट्टर चाहतेही तिला व्हर्जिनियाच्या भूमिकेत ओळखू शकले नव्हते.

२००३ नंतर यंदाच्या २०११ च्या "सर्वोत्कृष्ट अभिनेत्री"च्या रेसमध्ये पुनःश्च निकोल किडमन उतरली आहे आणि तिची सर्वत्र गाजत असलेली भूमिका आहे....."रॅबिट होल" मधील मुलाच्या अकाली मृत्यूमुळे कोलमडून गेलेली एक आई...बेक्का कोर्बेट. या लेखाचा मूळ उद्देश याच चित्रपटाची ओळख करून देणे हा आहे पण त्यानिमित्ताने निकोल किडमनविषयी थोडेबहुत.

Ncole1

बेक्का आणि तिचा नवरा हॉवी हे एक सुखी जोडपे....जोडप्यास डॅनी नावाचा चार वर्षाचा एक गोंडस मुलगा. न्यू यॉर्कपासून दूर शांत आनंदी उपनगरात एक देखणा बंगला, हॉवी एक यशस्वी एक्झेक्युटीव्ह तर बेक्का त्या चित्रासारख्या संसारातील यशस्वी गृहिणी....एरव्ही हॉवी आपल्या मित्रपरिवारात रमतो तर बेक्का आपली मैत्रीणीसम धाकटी बहीण ईझ्झी हिच्या संसाराविषयी आईसमवेत चर्चा करत मस्त जगत असते. अशा दृष्ट लागू शकणार्‍या संसाराला एके दिवशी खरंच दृष्ट लागते.

Nicole2
छोट्या डॅनीसमवेत खेळ आणि दंग्यात रममाण असलेली बेक्का

एके दिवशी बेक्का घरकाम करत असताना आपल्या लाडक्या कुत्र्याच्या मागे धावणारा तिचा मुलगा डॅनी रस्त्यावरून जाणार्‍या एका कारला आडवा येतो....कार त्याला उडविते, तो जागेवरच गतप्राण. कोर्बेट कुटुंबच धक्क्याने आणि दु:खाने कोसळून जाते. पुढे नियमानुसार त्या कार ड्रायव्हरवर खटला - जो त्याच उपनगरात, थोडे लांब राहाणारा, सीनिअरच्या वर्गात शिकणारा एक विद्यार्थीच असतो. कोर्टात मात्र असे सिद्ध होते की, उपनगरात आवश्यक असणारे कार स्पीड जेसन (कार चालविणारा विद्यार्थी) ने राखले होते शिवाय रस्त्यावर वाहतुकीच्यामध्ये येण्याची चूक बेक्काच्या मुलाचीच असते. त्यामुळे प्रचलित कायद्यानुसार जेसनची अपघात केसमधून निर्दोष सुटका होते. विशेष म्हणजे कायद्याचा मान राखणार्‍या कॉर्बेट कुटूंबालाही स्वतःवर काही अन्याय झाल्यासारखे वाटत नाही, कारण त्यानाही मनोमनी पटलेले असते की त्या अपघातात जेसनची काहीच चूक नाही.

Nicole3
आपण आता दोघेच उरलो....या उदासवाण्या वातावरणात बेक्का आणि हॉवी

पण असे असले तरी वैयक्तिक पातळीवर इकडे तर बेक्का आणि हॉवीचे भावविश्व तर हादरून गेले आहे. दोनतीन महिन्यानंतर हॉवी आपल्या पत्नीचे दु:ख हलके व्हावे यासाठी उपनगरातील 'ग्रुप कम्युनिटी' चे जोडप्याचे सदस्यत्व घेतो. त्यांच्यासारखेच समदु:खी (पण वेगवेगळ्या कारणास्तव) तिथे येऊन विविध विषयांवर चर्चा करत, एकमेकाना सांभाळून घेत आपल्या मानसिक वेदना कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात. सुरुवातीला बेक्का आपल्या पतीच्या आग्रहासाठी तिथे मनाविरुद्ध का होईना भाग घेते, पण तिला तिथेही कोंडमारा वाटू लागल्याने जास्तीतजास्त वेळ ती आपल्या बागेतच फुलझाडांची निगराणी करण्यात वेळ घालवू लागते...शिवाय जोडीला धाकट्या बहिणीच्या होऊ घातलेल्या संसारातही ती मन रमवतेच. हॉवी मात्र आपल्या ऑफिसकामानंतर (आता पत्नीच्या उदासपणामुळे तसा काहीसा वैतागलेला...) ग्रुप सेंटरकडे जाऊन तिथे मन रमवितो. तिथे त्याला समदु:खी एक मैत्रीणही बर्‍यापैकी मन रिझविण्यासाठी मिळते, पण हॉवीचे बेक्कावर मनापासून प्रेम असल्याने त्या केन्द्र मैत्रिणीसमवेत तो शारीरिक संबंध कधीही प्रस्थापित करत नाही.

Nicole4

धाकटी बहीण इझ्झा आणि तिच्या नवर्‍यासमवेत त्यांच्या आनंदी संसाराची साक्षीदार बेक्का

इकडे एक दिवस थोडा मोकळा वेळ मिळाल्याने नगर वाचनमंदिरात जाऊन वाचनासाठी काही पुस्तके आणावीत या उद्देशाने बेक्का आपली कार घेऊन लायब्ररीकडे जात असताना एका ट्रॅफिक सिग्नलजवळ थांबते. रेड सिग्नल असल्याने साहजिकच तिच्या कार शेजारी एक बसही थांबते. बसकडे पाहात असतानाच तिला अचानक एका सीटवर 'जेसन' (तो विद्यार्थी ड्रायव्हर, ज्याच्या गाडीखाली डॅनीचा अंत झालेला असतो...) दिसतो. का कोण जाणे, पण बेक्का "इम्पलसिव्हली" त्या बसचा त्याच्यासाठी 'फॉलो' करते. त्याच्या घराशेजारील स्टॉपजवळ जेसन उतरतो....पुढील दिवशी जाणीवपूर्वक बेक्का त्या बसचा पाठलाग करते आणि त्याच लायब्ररीमध्ये अखेरीस जेसनसमवेत तिची गाठभेट होते. जेसन अर्थातच बेक्काला ओळखतो....झाल्या घटनेबद्दल पुनश्च दिलगिरी व्यक्त करून तिची मनःपूर्वक माफीही मागतो. पण बेक्कालाही जेसनबद्दल तिटकारा वाटण्याचे काही कारण नसते, कारण तीही एक सुशिक्षित आणि कायदा मानणारी नागरिक असते. तरीही 'जेसन' मध्ये ती कळतनकळत तिचा आता हयात नसलेला "डॅनी' शोधते...त्याला (जेसनला) आईचे प्रेम देऊ इच्छिते. वास्तविक खुद्द जेसनला (जरी न्यायालयाने त्याला निर्दोष सोडले असले तरीही...) आपण एक गुन्हा केल्याची टोचणी असतेच. तो एक 'अ‍ॅनिमेशन' चा विद्यार्थी असल्याने 'डॅनी' ला केन्द्रस्थानी ठेवून एक कथा रचित असतो....त्याचेच नाव 'रॅबिट होल'.... [रॅबिट होलची कल्पना प्रथम 'अ‍ॅलिस इन वंडरलॅण्ड' मध्ये वापरली. एका सशाच्या खळग्यातून अ‍ॅलिस अदभूत आणि रहस्यमय दुनियेत प्रवेश करते आणि आतापर्यंत कधीही न पाहिलेल्या प्रवासाची सुरूवात होते.] जेसनलाही 'डॅनी' अशाच एका 'रॅबिट होल' मधून अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेला आहे असे वाटत असते व त्याला अनुलक्षून तो एक चित्रमय कथा प्रसिद्धीसाठी तयार करीत असतो. त्याच्या तोंडून ते कथानक ऐकताना आणि ती चित्रे पाहाताना बेक्का डॅनीच्या आठवणीने हरखून जाते. दोघे त्यानंतर भेटत असतात, पण हॉवीला हे माहीत नसते. एके दिवशी हॉवी, बेक्का आणि इझ्झा घरीच असताना अचानक काहीसा आनंदित असणारा जेसन [त्याची ती कथा आता मॅगेझिनमध्ये प्रसिद्ध झालेली असते] मासिकाची ती कॉपी बेक्काला देण्यासाठी येतो. त्याला हॉवीही घरीच असल्याचे अर्थातच ठाऊक नसते. पण हॉवी त्याला आपल्या घरी पाहाताच सुन्न होतोच, पण त्याहीपेक्षा तो आपल्या बायकोला भेटायला रोज येत असतो तसेच तीही त्याला भेटत असते हे प्रत्यक्ष बेक्काच्याच तोंडून ऐकल्यानंतर संतापाने फुटूनच जातो. [हा प्रसंग प्रत्यक्ष पडद्यावर पाहणे फार परिणामकारक ठरते...]

Nicole5

ज्याच्या कारने 'डॅनी' ला उडविले, त्याच जेसनसमवेत बागेत आठवणीत रममाण झालेली बेक्का

पुढे काय होते....हे सांगून चित्रपटातील रंगत कमी करण्यासारखे असल्याने इथेच थांबतो. पण बेक्काच्या भूमिकेत निकोल किडमन हिने जो अप्रतिम अभिनय साकारला आहे तो तिच्या "ऑस्कर" साठी प्रबळ दावेदार ठरेल यात शंका नाही. तिला ऑस्कर मिळो वा ना मिळो....पण मिपाच्या सदस्यांनी एका मुलाच्या अकाली अपघाती मृत्यूमुळे तडफडत असलेल्या आईच्या अभिनयासाठी 'रॅबिट होल' हा चित्रपट जरूर पाहावा ही आग्रहाची विनंती.

धन्यवाद

इन्द्रा
(धाग्यातील सर्व फोटोग्राफ्स गूगलवरून साभार !)

चित्रपटशिफारस

प्रतिक्रिया

गणपा's picture

3 Feb 2011 - 12:38 am | गणपा

काय सुरेख ओघवत्या भाषेत परिक्षण केलयस रे इंद्रदा.. आणि संपुर्ण कथानक न सांगता वेळीच समारोप करुन हा चित्रपट पाहाणाची उत्कंठा अजुनच वाढवली आहे.
(टोरेंट शोधुन लवकरच उतरवुन घेतो.)

वडिल's picture

6 Feb 2011 - 10:21 am | वडिल

गणपा शी सहमत

वाटाड्या...'s picture

3 Feb 2011 - 1:03 am | वाटाड्या...

+२ गण्याभावासारखेच म्हणतो...

योग्यवेळी कथा सांगायची थांबवुन उत्कंठा शिगेला पोहोचवायची हातोटी मस्तच...

+१ - (टोरेंट शोधुन लवकरच उतरवुन घेतो.)

थ्यांक्यु इंद्रशेठ...

- टायर वाटी...

चित्रपट उत्कट वाटतो आहे. पहाते मिळाला तर. बघवेल की नाही शंकाच आहे तरी....

इन्द्र्राज पवार's picture

3 Feb 2011 - 10:14 am | इन्द्र्राज पवार

"....बघवेल की नाही शंकाच आहे तरी....."

~ शुचिताई, जरूर पाहा. प्रत्येक "आई"ने हा चित्रपट पाहावा असाच आहे. मी जरी परिक्षणात "डॅनी" ला जेसनची कार उडविते आणि तो गतप्राण होतो असे म्हटले असले तरी प्रत्यक्षात हे दृश्य दिग्दर्शकाने पडद्यावर दाखविलेले नसल्याने अपघातामुळे 'शहारे' येणे असला प्रकार नाही. चित्रपट फ्लॅशबॅक तंत्राने घेतला असून डॅनीचा मृत्यु आणि त्यामागील कारण हे संवादातूनच प्रकट होते....डॅनीसोबत खेळ आणि दंगामस्ती हे हॉवीने केलेल्या व्हिडिओ चित्रणातून प्रेक्षकाला कळते. केवळा भावमुद्रा आणि तितकेच हळवे संवाद (+ चित्रीकरण) यामुळेच एखादा चित्रपट कसा खिळवून ठेवतो, याचे 'रॅबिट होल' एक छान उदाहरण आहे.

इन्द्रा

प्राजु's picture

3 Feb 2011 - 2:00 am | प्राजु

सुरेख परिक्षण!!! :)

यकु's picture

3 Feb 2011 - 7:11 am | यकु

छान परिक्षण!

सहज's picture

3 Feb 2011 - 8:52 am | सहज

बघावासा वाटत आहे.

भडकमकर मास्तर's picture

3 Feb 2011 - 10:07 am | भडकमकर मास्तर

मस्त...

ramjya's picture

3 Feb 2011 - 11:04 am | ramjya

"रॅबिट होल"..नक्की पाहिन

माझीही शॅम्पेन's picture

3 Feb 2011 - 11:09 am | माझीही शॅम्पेन

निशब्द आणि हतबुद्ध ! सुरेख परीक्षण

निकोलला दुखी: भूमिका पाहता येणार नाही !

मुलूखावेगळी's picture

3 Feb 2011 - 11:10 am | मुलूखावेगळी

छान परीक्षण

मृत्युन्जय's picture

3 Feb 2011 - 12:38 pm | मृत्युन्जय

मस्त लिहिले आहे रे इंद्रा. पिक्चर बघावासा वाटला एकदम.

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Feb 2011 - 12:57 pm | llपुण्याचे पेशवेll

मस्तं लिहीले आहेस इंद्रा. आवडले. सिनेमा पाहीला पाहीजे असे वाटू लागले आहे.

तुषार घवी's picture

3 Feb 2011 - 1:19 pm | तुषार घवी

खूप छान परिक्षण केले आहे.
निकोल ला अशा भूमिकेत बघणे नक्किच आवडेल.

मिहिर's picture

3 Feb 2011 - 5:04 pm | मिहिर

मस्त परिक्षण. पाहिला पाहिजे.

सखी's picture

3 Feb 2011 - 8:12 pm | सखी

सुरेख परिक्षण. खरच लगेच बघावासा वाटला. वरचा शुचितैंना दिलेला प्रतिसादही आवडला.

व्वा. मस्त परिक्षण. बघणारच. धन्यवाद.

धनंजय's picture

4 Feb 2011 - 12:01 am | धनंजय

मी हे नाटक मागच्या वर्षी रंगपटावर बघितले होते. अतिशय प्रभावी, अंतर्मुख करून चुटपुट लावणारे कथानक आहे.

परीक्षण छानच आहे.

इन्द्र्राज पवार's picture

4 Feb 2011 - 3:31 pm | इन्द्र्राज पवार

लकी आहात तुम्ही धनंजय की तुम्हाला थेट नाटकच पाहायला मिळाले. मुळात नाटक गाजले (अजूनही गाजतच आहे) म्हणून निकोल किडमनला त्यावर चित्रपट निर्माण करण्याची स्फूर्ती मिळाली (तीच निर्माती आहे). डेव्हिड लिंडसेला तर नाटकाबद्दलच 'पुलित्झर प्राईझ' मिळाले होते....तर यात बेक्काची भूमिका करणार्‍या सिंथिया निक्सन हिला 'टोनी अवॉर्ड" जे नाट्यदुनियेत ऑस्करच्या तोडीचे मानले जाते. हाही योगायोगच की निकोल हिलाही त्याच भूमिकेसाठी ऑस्कर नॉमिनेशन प्राप्त झाले आहे.

(थोडीशी उत्सुकता : तुम्ही 'सिंथिया' ने साकारलेली बेक्का पाहिली?)

इन्द्रा

आळश्यांचा राजा's picture

4 Feb 2011 - 12:39 am | आळश्यांचा राजा

बघावासा वाटतोय.

(विहीर पण पाहिलेला नाही. पण मिपावर त्याविषयी वाचल्यासारखं आठवतंय. काही साम्य आहे का कुठेतरी?)

इन्द्र्राज पवार's picture

4 Feb 2011 - 1:25 am | इन्द्र्राज पवार

"....विहीर पण पाहिलेला नाही. पण मिपावर त्याविषयी वाचल्यासारखं आठवतंय. काही साम्य आहे का कुठेतरी?...."

~ श्री.आ.रा...तुम्ही जर अमिताभ बच्चन निर्मित आणि उमेश कुलकर्णी दिग्दृशित "विहीर' बद्दल म्हणत असाल तर 'रॅबिट होल' आणि 'विहीर' मध्ये काही साम्य नाही.

"विहीर" ची कथा दोन मावस भावांमधील आहे. एक समिर आणि दुसरा नचिकेत. समीर आपल्या गावाकडील भावाला फार मानतो. पत्रांमधूनही संवाद साधत असतो. दोघेही संवेदनशील आहेत. समीर आपल्या मावशीच्या लग्नानिमित्य पुण्याहून नचिकेतच्या गावी येतो. पण नचिकेत सतत भविष्याविषयी गूढ बोलत असतो....पुढे विहीरीत पडून त्याचा मृत्यूही होतो....पुण्यास परत आलेल्या समीरला ते पटत नाही....आणि तो त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच गावातील एक मेंढपाळ त्याला जीवनाचे तत्वज्ञान सांगून ताळ्यावर आणतो...असे काहीसे 'विहिर' चे कथानक आहे.

अर्थात तुमच्या नजरेतील 'विहीर' दुसरी असेल तर त्याविषयी शोधले पाहिजे.

इन्द्रा

सुंदर चित्रपट परिक्षण !!! :)
और भी आने दो... :)

संजय अभ्यंकर's picture

4 Feb 2011 - 10:22 pm | संजय अभ्यंकर

अप्रतीम परिक्षण!

पैसा's picture

5 Feb 2011 - 12:20 am | पैसा

निकोल किडमन दिसते सुरेखच. तिचा इतका चांगला अभिनय बघायला नक्की आवडेल.

मूल जाण्याचं दु:ख आणि त्याबरोबरची जन्मभर पुरून उरणारी वेदना कोणत्याही देशातली असो किंवा भाषेतली असो, तेवढीच उत्कट.

अनुपम खेरचा १९८४ सालचा एक नितांत सुंदर चित्रपट आठवला. " सारांश."

इन्द्र्राज पवार's picture

5 Feb 2011 - 9:38 am | इन्द्र्राज पवार

".... सारांश"...

~ या चित्रपटाबद्दल ऐकले, वाचले आहे बरेच. पण का कोण जाणे पाहायला मात्र अजून मिळालेला नाही. कथानक अंधुकसे माहीत आहे, म्हणजे अनुपम खेर यांचा मुलगा अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये अपघातात मरण पावलेला असतो आणि त्याची रक्षा आणायला ते एका समवयस्क मित्रासमवेत मुंबई विमानतळावर जातात, तर तिथे त्यांची नित्याच्या रितरिवाजानुसार ससेहोलपट होते....पुढे काही राजकारणही आहे...इ.

'रॅबिट होल' मधील डॅनी हा मुलगा मात्र ४ वर्षाचा असून बंगल्यासमोरील रस्त्यावरच त्याचा अपघाती मृत्यू होतो असे दाखविले आहे....[तेही संवादातून...प्रत्यक्ष अपघात दाखविला नसूनही हा प्रसंग प्रभावीपणे ठसतो.]

जरूर पाहा, फार भावेल तुम्हाला.

इन्द्रा

प्राजक्ता पवार's picture

5 Feb 2011 - 2:44 pm | प्राजक्ता पवार

सुरेख परिक्षण !!

चिगो's picture

5 Feb 2011 - 10:55 pm | चिगो

सुरेख, चित्रपट पहायला प्रवृत्त करेल असे परीक्षण..
चित्रपट बघायला नक्कीच आवडेल..
थँक्यु इंद्रादा...

सुरेख परीक्षण..

निकोल नी फिगर जपण्यासाठि "सरोगेट मदर" च्या माध्यमातुन स्वतः च्या मुला ला जन्म दिला हे वाचण्यात आले. ते खरे आहे का ? ते कसे शक्य आहे ? असे तंत्रज्ञान कुठल्या देशात उपलब्ध आहे ?

इन्द्र्राज पवार's picture

6 Feb 2011 - 12:02 am | इन्द्र्राज पवार

"....सरोगेट मदर" च्या माध्यमातुन..."

~ होय. ही सत्य घटना आहे. १७ जानेवारीला निकोल आणि तिचा पती कीथ अर्बन (जो ऑस्ट्रेलियन आहे) यानी वार्ताहर परिषदेत असे जाहीर केले की, २८ डिसेंबर २०१० रोजी त्याना "सरोगेट मदर' माध्यमातून दुसर्‍या अपत्य प्राप्तीचा [नाव : फेथ मार्गारेट] लाभ झाला. या अगोदरही त्याना याचप्रकारे 'संडे रोझ' नावाची मुलगी झाली आहे, जी आता दोन वर्षाची आहे.

"...ते कसे शक्य आहे ?..."

~ अर्थातच. अमेरिका आणि कित्येक युरोपीअन देशात हा प्रघात सुखनैव चालू आहे. ही बाब स्पष्ट आहे की हा विषय आपल्या भारतीय मनाला 'नवखा' वा 'न पटणारा' होऊ शकतो, पण पाश्चिमात्य राष्ट्रांनी हे सायन्स एक उपयुक्ततेचे म्हणून स्वीकारल्याचे दिसतेच आहे. विशेष म्हणजे अशा बाळांना (जसे 'सिंगल मदर'ना) ही योग्य तो सामाजिक दर्जा मिळतोच.

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे "निकोल किडमन हिने फिगर जपण्यासाठी" हा पर्याय स्वीकारलाही असेल. पण सर्वच स्त्रिया केवळ 'फिगर' साठी 'सरोगेट' चा पर्याय घेतात असे नसून काही शारीरिकदृष्ट्या कमकुवत असतात वा लागोपाठ अ‍ॅबॉर्शन झाल्याने नैराश्य आलेल्या, तसेच लग्नाच्या बेडीत न अडकताही अपत्यसुख हवे असणार्‍या स्त्रियाही सरोगेट सिस्टीमला आपलेसे करीत असल्याचे दाखले आहेत.....अर्थात ही उदाहरणे युरोप आणि अमेरिकेतच प्रामुख्याने आढळतील.

(विषय थोडा किचकट आहे....त्यामुळे या विकल्पावर विश्वास बसणे थोडेसे कठीण वाटण्याची शक्यताही आहे.)

इन्द्रा

फिगर साठि हा पर्याय निवडायला काय हरकत आहे.
मुलं झाल्यावर बायकांची फिगर बिघडते हे सत्य नाकारुन चालणार नाहि. ह्याला अर्थात अपवाद आहेत. काहि बायकांची फिगर सुधारते सुध्दा. पण भारतात हे शक्य नाहि. राखी सावंत ने म्हणल्या प्रमाणे " जो भगवान नहि देता वो डॉक्टर देता है "
जर हे तंत्रज्ञान भारतात काहि वर्षां पुर्वी उपलब्ध असते तर भारतीय स्त्री ला हि लाभ झाला असता. अशी आशा करुया कि भारतीय स्त्रीयांना हि लवकरच हे तंत्र उपलब्ध होइल. बच्चन ह्यांच्या घरी हि पाळणा हलेल.
कतरीना, प्रियंका आदि नामवंत नट्या ह्याचा लाभ घेतील आणि उगाच लग्नाच्या फंदात पडणार नाहित.
सान्ड्रा बुलक, मॅडोना, एन्जलीना जोली ह्या सगळ्या जरा थांबल्या असत्या तर त्यांना अफ्रिकेत जाउन बेवारशी मुलं दत्तक घेयला लागली नसती..

बाय द वे.. तुम्हि "ब्रुनो " नावाचा सिनेमा पाहिला आहे का.. जरुर बघा.. त्यात एक दत्तक घेण्याचा चांगला सीन आहे.

इन्द्र्राज पवार's picture

6 Feb 2011 - 10:23 am | इन्द्र्राज पवार

"...फिगर साठि हा पर्याय निवडायला काय हरकत आहे..."

~ वेल. या कारणासाठी (च) जर हा पर्याय निवडायचा असेल तर ती व्यक्ती [अर्थात फीमेल] एंटरटेनमेन्ट, फॅशन या क्षेत्राशी संबंधित असेल अथवा टेनिस, स्केटींग वा तत्सम क्रिडाक्षेत्रातील असेल. कारण ही काही मोजकी क्षेत्र अशी आहेत की तिथे त्या स्त्रीला आपल्या 'करीअर' साठी फिगरची काळजी महत्वाची वाटत असते. अर्थात तिचा जोडीदारही बहुतांशी त्याच क्षेत्रातील असल्याने [जसे निकोलबाबतीत आहे] त्यालाही अशारितीने 'पालक' होणे गैर वाटणार नाही. अमेरिकेत तर सरकारमान्य 'आर्टिफिशिअल इनसेमिनेशन क्लिनिक्स' आहेत इतका हा प्रकार समाजाभिमुख झाला आहे.

भारतातही ही संकल्पना रुजत आहे, पण तिचा प्रसार अमेरिकेत जितक्या वेगाने झाला आहे तितका नक्कीच नाही. पण काही महिन्यापूर्वी "अनुबंध" या मराठी मालिकेत हाच विषय विस्तृत प्रमाणावर घेतल्याचे आढळले होते आणि या मालिकेला मिळालेले टीआरपी पाहाता इथल्या महिला वर्गानेही हा विकल्प चांगलाच आहे असे मान्य केल्याचे निदर्शनास आले होते. [अर्थात नेहमीप्रमाणे 'अनुबंध' मध्ये 'सरोगेट मदर' च्या डोळ्यातून गंगा-जमुना-कावेरी-गोदावरी-तापीला येणार नाहीत इतके पूर आणून मूळ विषय भरकटून टाकण्याचा नित्याचा प्रकारही झाला होताच....असो]

सॅण्ड्रा बुलॉक, मॅडोना आणि अ‍ॅन्जेलिना जोली यानी काही अनाथाना दत्तक घेणे आणि 'सरोगेट मदर' या कल्पनेशा सांगड घालणे ठीक नाही असे मला वाटते. त्यांचा विषय सर्वस्वी वेगळा आहे.

("ब्रुनो..." ~ हा हुकला. कारण एका 'गे' तरुणावर आधारित विनोदी चित्रपट आहे इतपतच माहित असल्याने माझे त्याच्याकडे लक्ष गेलेच नाही. पण 'दत्तक' कल्पना आहे, हे आता तुमच्याकडून कळाल्याने जरूर पाहिन. थॅन्क्स !)

इन्द्रा

अभ्यासपुर्ण उत्तरा साठि धन्यवाद.
भारतात हि कल्पना रुजत नाहि याचा खेद वाटतो.
भारतीय स्त्रीया स्वत: च्या फिगर ची काळजी घेत नाहित त्या मुळे भारतीय युवक अमेरीकेसारख्या देशात गमन करतात असे म्हणले तर चुकिचे ठरणार नाहि. तुमचे काय मत आहे ?

'भाड्याने गर्भाशय' ही संकल्पना भारतात गुजराथमधे बर्‍यापैकी रुजली आहे.

तूर्तास २००६ मधील बातमीचा हा दुवा पहा. गुगल बाकीचे दुवे देईलच.

अजुन एक दुवा.

तिसरा दुवा

गुजरात नेहमी भारताच्या एक पाउल पुढे असतो.

सहज यांनी छान सर्च करुन माहिती पुरवली आहे. पण सहजराव किंवा अन्य कोणी ह्या धाग्यांचे मराठित भाषांतर करुन लिहिले तर सगळ्यांना समजेल व लाभ होईल.

इन्द्र्राज पवार's picture

6 Feb 2011 - 11:01 am | इन्द्र्राज पवार

"...'भाड्याने गर्भाशय' ही संकल्पना भारतात गुजराथमधे बर्‍यापैकी रुजली आहे. .."

~ होय, सहज. मला माहीत होती ती बातमी. खरे तर यामागील इतिहास तपासता आला तर तो एक रोचक शोध होईल कारण गुजराथमध्ये 'टेस्ट ट्यूब बेबी', 'सरोगेसी' या संकल्पना जितक्या मराठी मनाला वाटतात तितक्या नव्या बिलकुल नाहीत. [इथे पैशाचा प्रश्न आहे की नाही, हा घटक दुय्यम मानू या.]

१९८० साली (म्हणजे तीस वर्षापेक्षा जास्त काळ लोटला] प्रभाकर पणशीकर यानी अनिल बर्वे लिखित 'पुत्रकामेष्टी' नावाचे नाटक रंगमंचावर आणले होते. त्यात नेमका हाच विषय घेतला होता....[मधू कांबीकर ही एक वेश्या असून ती सुधा करमरकर आणि पणशीकर या दांपत्यासाठी आपल्या गर्भात मूल वाढविण्यास तयार होते....अर्थात योग्य तो मोबदला घेऊन, असे काहीसे ढोबळ कथानक....यांची नाटकातील नावे आता आठवत नाही]. पण वैशिष्ट्य म्हणजे या नाटकाचे दिग्दर्शक कांती मडिया यानी सर्वप्रथम हे नाटक गुजराथीमध्ये अनुवादित करून घेतले आणि 'मृगजल सिंचीने.." या नावाने प्रथम तिथेच मंचावर आणले जे तुफान गाजले, इतकेच नव्हे तर 'सरोगसी' ची ती कल्पना मराठी प्रेक्षकांपेक्षा गुजराथी प्रेक्षकाने चटकन स्वीकारली.....मराठी अवतार 'पुत्रकामेष्टी' ला म्हणावा तितका प्रतिसाद न मिळण्यामागे तो विषय इथे पचनी पडला नाही, हेच सार.

'त्या' बातमीतील 'आणंद' गावाने याबाबतीत जे नाव मिळविले आहे त्यावरून तिथे ही कल्पना आता नाविन्याच्या पलिकडील वाटत आहे हे स्पष्टच दिसते.

इन्द्रा

रोचक माहिती.

भारतीय नट्या ह्या मार्गाचा उपयोग का नाहि करत ?

कुणी भारतीय नटी ने हा मार्ग अवलंबला आहे का ?

इन्द्र्राज पवार's picture

6 Feb 2011 - 11:41 am | इन्द्र्राज पवार

"....भारतात हि कल्पना रुजत नाहि याचा खेद वाटतो...."

~ श्री.वडिल यानी वर एका प्रतिसादात हा विचार मांडला आहे. पण ही कल्पना इथे किती रुळत चालली आहे याचे उत्तर येत्या ११ फेब्रुवारी २०११ ला इथे प्रदर्शित होत असलेला "मला आई व्हायचंय !" हा इंडो-अमेरिकन संयुक्त निर्मिती पाहण्यास अजिबात विसरू नका (दोन्ही देशातील कलाकार आहेत चित्रपटात). मुंबई हायकोर्टात वकीली करीत असलेल्या समृद्धी पोरे यानी निर्माण केलेला 'सरोगेट मदर' या विषयावरील हा चित्रपट अमेरिकेत अनेक पारितोषिके विजेता ठरला आहे.

मला कथानक माहीत आहे, पण ते इथे लिहून रसभंग करणे उचित नाही.

इन्द्रा

थोड विषयांतर झाल आहेच आणि गाडी नाटका आणि नट्यांकडे वळली आहे म्हणुन सरोगेट मदर या विषयावर बेतलेला तब्बु आणि सुश्मिता सेनचा फिलहाल आठवला.

पैसा's picture

6 Feb 2011 - 3:28 pm | पैसा

सरोगेट मदर या तंत्राच्या उपयोगापाठी "फिगर" राखणे हे एकच कारण नसावे. या नट्या एवढ्या बिझी असतात, की मूल पोटात ९ महिने वाढवायला त्यांच्याकडे वेळ नसतो. या ९ महिन्यात तब्येतीची इतर काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. अशा कारणामुळे शूटिंग झालं नाही तर निर्मात्याचं लाखो रुपयांचं नुकसान होतं. ऐश्वर्या रायच्या पुढच्या ४ वर्षांच्या तारखा बुक झालेल्या आहेत असं एका माहितगार व्यक्तीकडून ऐकलं.

योग्य व्यायाम आणि आहार याच्या मदतीने फिगर राखणे हे कोणालाही शक्य आहे. भारतीय सिनेमा सृष्टीत हेमा मालिनी, डिंपल कपाडिया, मलाइका अरोरा-खान अशी कितीतरी उदाहरणे आहेत, या सगळ्या जणी २ मुलांच्या आया आहेत. पण हेमा आजही तिच्या मुलीपेक्षा सुंदर दिसते, तर मलाइकाची मुन्नी बघताना लोक काय प्रतिक्रिया देतात हे वेगळं सांगायला नकोच!

शहराजाद's picture

6 Feb 2011 - 10:45 am | शहराजाद

ओघवत्या भाषेत छान परीक्षण इंद्रा.

sneharani's picture

6 Feb 2011 - 4:05 pm | sneharani

मस्त परिक्षण!!
:)