एका मित्राने काही दिवसांपूर्वी अचानक विचारलं, '१२७ अवर्स' च्या प्रायवेट स्क्रीनिंगचे पासेस आहेत. मला जायला जमणार नाही, तुला जायचं असेल तर सांग'. त्या क्षणापर्यंत मला हि काय भानगड आहे पत्ता नव्हता. तशी मी काही फार 'मूव्ही बफ' वगैरे म्हणण्यासारखी नाही, पण एका कंटाळवाण्या संध्याकाळी कोणी फुकट पास देत असेल तर नाही का म्हणा? म्हटलं दे.
तर संध्याकाळी घाईघाईने थेटरात. कसला चित्रपट, कोणाचा काही माहित नव्हतं. शेवटी २-३ मिनिटं उशिराने पळत पळत जाऊन बसलो. नशिबाने शीटा बर्या मिळाल्या होत्या.
पडद्यावर एक प्रचंड कॅन्यन (blue canyon), अफाट पसरलेला. त्यावर एक डोंगरात चालवायची सायकल (mountain bike) घेऊन निघालेला २५-३० मधला एक तरुण, एरन (aaron). सतत स्वतःच्या वाटचालीची कॅमेर्यातून नोंद ठेवणारा आणि मजेदार कॉमेंट्री देत पुढे जाणारा. त्याला दोन तरुण मुली भेटतात, हा त्यांना हव्या त्या 'डोम' मध्ये एका भन्नाट रस्त्याने(?) घेऊन जातो. खालच्या निळ्या-नितळ पाण्यात तिघं पुन्हा पुन्हा सूर मारत राहतात. त्याचही रेकॉर्डिंग. त्या मुली एरनला त्यांच्या घरी विकांताला पार्टीला यायचं आमंत्रण देतात आणि परत जायला निघतात. एरनचं 'एकला चालो' पुढे सुरु.
अतिशय सावधपणे प्रत्येक फांदी-दगडावर जोरजोराने लाथा मारून, खात्री करून मगच त्यावर पाय ठेवत हा एकामागून एक शेकडो फूट खोल घळी पाहत चाललेला. आता पुढे काय म्हणून आपण जरा स्थिरावतो. एरन अजून एका भल्यामोठ्या दगडावर लाथा मारून पाय ठेवत पुढे जायला निघतो.
इतक्यात प्रचंड आवाज करत तो मोठ्ठा पत्थर आणि एरन त्या घळीत शेकडो फूट खाली कोसळतात. धुरळा ओसरल्यावर दिसतं की तो दगड घळीच्या सापटीत फिट्ट जाऊन बसलाय. आणि त्या दगडात आणि घळीच्या भिंतीत सापडलेला एरनचा हात!
पुढचे १२७ तास त्या घळीत काय घडता याचं अंगावर येणारं चित्रण म्हणजे '127 hours'! आणि या अंगावर काटा आणणाऱ्या दृश्य परिणामासोबतच रहमानचे अनुरूप पार्श्वसंगीत. मध्ये वाचलं की त्याला या संगीतासाठी परत ऑस्करचं नामांकन मिळालंय आणि परत तो सगळा अनुभव आठवून गेला.
एरनचा सुरवातीचा आकांत, स्वतःच्या आयुष्यातले प्रसंग आठवुन कधी केलेला पश्चात्ताप, कधी स्वतःवरच हसणं. न जाणो आपल्या मृत्यूनंतर कोणाला आपला शोध लागला तर? अशा विचाराने रेकॉर्ड केलेली व्हिडिओ डायरी. या सगळ्यात आपल्याला कुठेही एरनविषयी 'अरेरे, बिच्चारा' असलं काही वाटंत नाही हे या चित्रपटाचं यश असावं कदाचित. उलट आपणदेखील त्या घळीत हात अडकून, वाचवायला कोणी यायची सूतराम शक्यता नसताना, एक बाट्ली पाणी आणि अगदी थोडं खायला अशा अवस्थेत सापडलोय असं वाटत रहातं.
चित्रपटाची सगळी गोष्ट सांगून मला त्याची मजा घालवायची नाही, पण व्यक्तिश: मला हा चित्रपट Danny Boyle च्या आधीच्या चित्रपटापेक्षा (slumdog पेक्षा) अधिक आवडला. Slumdog तसाही फार भावला नव्हताच, अनेक कारणांसाठी. दोन्हीमध्ये जरी Ayn Rand च्या तत्वज्ञानाचे आणि मानवी प्रयत्नवादाचे अंश असले, तरी हा अनुभव अधिक जवळून प्रतीत होतो. कदाचित सत्यघटनेवर आधारित असल्याने असेल.
असो, माझ्या तोकड्या शैलीमध्ये या चित्रपटाच्या अनुभवाचे वर्णन सार्थपणे करणे जमणार नाही, तेंव्हा ही फक्त लहानशी ओळख आहे. पण इतर कोणी हा चित्रपट पहिला असल्यास आपली मते जाणून घ्यायला जरूर आवडेल. (आणि पाहिला नसल्यास जरूर पहा...फक्त रक्त वगैरे बघून 'कससंच' होत नसेल तर :-) )
वाचने
3162
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
रक्त बघून कससं होतं पण तुम्ही
स्लमडॉग जरुर पहावा.
In reply to रक्त बघून कससं होतं पण तुम्ही by रेवती
चित्रपट
धन्यवाद
रोचक आहे
उत्तम
एरनचे १२७ तास....!!
सर्वांचे धन्यवाद
In reply to एरनचे १२७ तास....!! by इन्द्र्राज पवार
शीडी
व्हरजीनल आली बी ?
In reply to शीडी by आशिष सुर्वे
उत्तम चित्रपटाची उत्तम ओळख!
आवडलं.
ट्रेलर पाहिल होते दोनदा, पण
पिक्चर डाऊनलोड केलास की मला
In reply to ट्रेलर पाहिल होते दोनदा, पण by परिकथेतील राजकुमार
खर तर राग आहे या बॉयल्या वर ,
छान ओळख!