ह्य ह्य..
"..मला काल रात्रीच कळलं. मग पंचवटीने आलो सकाळी निघून."
"बसायला जागा मिळाली का पण?"
"हो..रिकामी होती आज एकदम..झोपून आलो..ह्य ह्य.."
"ह्य ह्य.."
...
"बरं.. काय झालं एकदम?.."
"काल रात्री चांगले होते. सकाळपासून जोक्स बिक्स करत होते. योगासनं पण केली.. रात्री पिठलं टाक म्हणाले. मग टी.व्ही. बघत बसले होते. एकदम संडासला लागली म्हणाले. त्यांना कमोड लागतं ना. ते अशोकनं आतल्या बाथरूम मध्ये बसवलंय..फोल्डिंग टाईपचं. मग जरा हात धर म्हणाले अशोकला..तेव्हाच त्याला शंका आली. ..आणि मग संडासच्या वाटेतच त्यांचा तोल गेला..काहीतरी बोलले म्हणे अशोकशी आणि एकदम डोळे फिरवले."
"बरं झालं पटकन गेले. खितपत नाही पडले.."
"हो हो..उभे कशाला राहताय..वेळ आहे अजून....बसा हो कोचावर इकडे.."
...
..
"कधी नेणार आहेत?.."
"कुसुम निघालीय जालन्याहून. तिच्यासाठी थांबलेत.."
"कुठपर्यंत आलेत? .."
"नगर क्रॉस केलंय.. ..कुसुम रडतेय नुसती रस्ताभर.."
"साहजिक आहे हो.."
..
...
"चिन्मयीचं नाव घेत होते म्हणे शेवटी..अशोकजवळ.."
"होय हो..त्यांची लाडकी नं ती..कळवलं का तिकडे समीरला?"
"नाही. ते हवाईला वेकेशनवर आहेत. उद्या स्यान होजेला परत येणार आहेत. उगीच त्यांना कळवून ट्रिपचा दुचळा व्हायचा. मधेच निघून तरी कसा येणार तो..?..आणि येऊनही तसा काही उपयोग नाही.. दर्शन तर होणार नाहीच..म्हणून आम्ही ठरवलंय की सगळं झाल्यावरच कळवू.. "
"बघा..काय उपयोग इतका पैसा कमावून? शेवटचं दर्शन नाहीच.."
"हो ना.... आयला.. बापाच्या तोंडात शेवटचं पाणी घालायला पण नाही जमलं याला ..पैसा काय चाटायचाय ??"
....
..
"अरे..अनिश..तू आता टी.सी.एस. मध्ये आहेस ना?"
"हूं .. "
" वा..!! मग फॉरेन टूर कधी आता?"
"दोन वर्ष तर चान्सच नाय..दोन वर्षांत नाय दिला ऑनसाईट तर क्विट मारणार.."
"मग आज काय रजा का?"
"हो..डेथ इन फॅमिली म्हटल्यावर दिली सी.एल. ..नायतर रोजचं प्रेशर आहेच.."
...
...
...
...
"निलगिरी तेल आहे का थोडं मावशी..मला वाटतं किंSSचित वास येतोय आता.."
"हो..आणून ठेवलीय बाटली आत्ताच..गजाकाकाकडे आहे बघ.."
"बर्फ नाही का अरेंज होणार?"
"थोड्या वेळाचाच प्रश्न आहे हो..बर्फ आणला की मग पाणी पाणी होतं सगळीकडे..पुसायला काम.."
...
...
...
"ऋजुता..कॉफी कर सगळ्यांसाठी..कितीजण आहेत आधी मोज.."
"दूध..?"
"दूध आहे फ्रीज मध्ये..आणि जायफळ घाल मस्तपैकी..त्या लाल झाकणाच्या डबीत आहे बघ.."
"बिस्कीटं द्यायची का गं?"
"नको..खरं म्हणजे काSSही द्यायचं नसतं अशा वेळी..कॉफी दे नुसती अर्धा अर्धा कप....ढप्पळभर नको देऊस.."
...
...
...
"हे पाम्फ्लेट बघा..इथे ऋग्वेदी कोणी मिळत नाहीत..सगळे यजुर्वेदीच..हे तीन हजार फक्त आजच्या विधीचे. दिवसांचं सगळं त्यांच्याकडूनच करायचं असेल तर दहा हजारचं पॅकेज आहे त्यांचं. त्यात मग सामग्रीबिमग्री सगळी त्यांची.."
"पण ऋग्वेदी कोणी नाहीच का मिळणार?"
"अगदी तसंच असेल तर हे गुरुजी गाठून देतील कोणीतरी ऋग्वेदी.. यांना पाचेकशे देऊन मोकळं करून टाकू.."
"पण दिवसांचं काही ठरवलंय का? त्यांचा स्वत:चा विश्वास नव्हता नं?"
"होय हो..पण आता कुसुम आल्यावर जे ठरवेल ते खरं.."
"करा हो दिवस..त्याशिवाय ब्राम्हणाला मोक्ष नाही.. हल्ली तिन्ही दिवस एकदम करून घेतात..रजेचा काही प्रोब्लेम येत नाही त्यामुळे.."
...
...
...
"म्युन्सिपाल्टी वाले हरामी आहेत हो..हर्स वाला निघेचना..फार कॉल आहेत उशीर होईल वगैरे नाटकं करत होता..साले शंभर रुपये दाबल्यावर काढलीन गाडी लगेच.."
"इलेक्ट्रिक फर्नेसच आहे ना?"
"नाही..ग्यास फर्नेस बसवली आहे..चांगली आहे पण..आप्पांच्या वेळी आम्ही बघितलं ना..पाच मिनिटांत राख..दुस-या दिवशी थोडी मडक्यात भरून देतात. पन्नास रुपये ठेवायचे वॉचमनच्या हातावर.."
"होय च्यायला..म्हणजे एको फ्रेंडली..पोल्युशन पण नाही.."
...
...
...
"लिफ्ट मधून खाली न्यायला प्रोब्लेम येणार आहे..जिन्यानं तरी सात मजले कसे उतरवणार??"
"असं करूया..आपण दोघेच उभ्यानं त्यांना धरून लिफ्टने खाली जाऊ.. मग तिथे ठेवू तिरडीवर"
"पाय धरा तुम्ही तिकडून..मी डोकं धरतो..उचला जोरात.."
"दारातून लिफ्ट मध्ये टर्न सांभाळून घ्या हां..हातातून सटकले तर प्रॉब्लेम होईल.."
"ह्य ह्य.."
"ह्य ह्य.."
..
..
..
............................................
............................................
पूर्वप्रसिद्धी (ब्लॉगवरः http://gnachiket.wordpress.com )
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ह्य ह्य...
चांगलं लिहिलं आहे असे म्हणवत
+१
अगदी ओळखीचं... पण अजून बरंच
पट्टीचे पोचवणारे थांबतातच
+१
ह्य ह्य... लिखाण चांगल आहे पण
+१
ठीक!
.......
हम्म्म्म्म..
होय... खरे अहे. बरेचदा
अश्या लिखाणाला प्रतिसाद तरी
हम्म
आवडले
कोणाच्या तरी मृत्युनंतरचे हे
हॅ हॅ..??
होता है...
हम्म!!!
................
आवडला
आता मरणाचि वेदना प्रेत सरणावर
मस्त रे
संवाद आवडला. रिअलिस्टीक
हम्म... एका नातेवाईकांच्या
नाही. ते हवाईला वेकेशनवर
मस्त