Skip to main content

निशाण

लेखक नगरीनिरंजन यांनी शुक्रवार, 12/11/2010 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
जय नावाचा इतिहास जो सारे जेत्यांचेच लिखाण आहे पराजितांना अधर्मी ठरवून उंच विजेत्यांचे निशाण आहे राजपुत्रच श्रेष्ठ धनुर्धारी वचन गुरुंचे महान आहे एका अंगठ्याच्या कर्जापायी गुरुधर्म तो गहाण आहे सूताघरी सूर्यपुत्र दानी वंचनाच नियतीचे दान आहे धर्माची चौकशी करतो ईश्वर उरी भावाचाच बाण आहे जरी सुयोधन अंधपुत्र तू राजपदीही अपमान आहे सत्तालोभ धर्माधर्म कधी कमरेखालीच प्रहार आहे कर्मयोगाची करुनि भलामण हरला गुरुचाच प्राण आहे सूडाग्नीत जीवन गुरुपुत्राचे चिरंजीव विराण आहे पराजितांना अधर्मी ठरवून उंच विजेत्यांचे निशाण आहे.....
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4783
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

झकास जमले आहे. -इनोबा म्हणे

काही मते पटणारी नाहीत पण आवडली.

मस्त! --असुर

मला कविता वगैरे काही समजत नाही...पण हि कविता आवडली, समजली. छान आहे. मी साधारणपणे असे धागे उघडतच नाही..पण अवलियाने काहीतरी विडंबन केलंय म्हणून मूळ काय ते वाचले आणि आवडले.

ही कविता वाचायचीच राहून गेली होती. अतिशय आवडली. इतिहास जेतेच लिहितात हे आत्तापर्यंतचं विदारक सत्य माहित असूनही आपण डोळ्यांवर कातडं ओढतो. आणि मग त्या जेत्यांनीच लिहिलेल्याची हाजीहाजी करून त्याल सत्याचं स्वरूप देतो. युद्धांच्या उद्रेकात काही दगड शिल्लक रहातात, काही ठिकऱ्या होऊन नष्ट होतात. मग उरलेल्या दगडांना आपण आपल्या कल्पनाविलासाने कोरून त्यांतून देखणे हिरो आणि सुंदर हिरॉइनी तयार करतो, - त्यांच्या कथा एकमेकांना सांगतो. देवांच्या मूर्ती घडवतो आणि त्यांची पूजा करतो. हे सत्य किती बेगडी आहे याची कल्पना असूनही ती नाकारतो आणि मूर्ती स्वीकारतो. मला राहून राहून प्रश्न पडतो. पांडवांचा तारणहार म्हणून कृष्ण देव झाला. पांडव हरले असते तर न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या कौरवांना मदत करणारा शकुनिदेव झाला असता का?