Skip to main content

टु पेंट ऑर मेक लव्ह

टु पेंट ऑर मेक लव्ह

Published on गुरुवार, 11/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
अनेक दिवसांनी चित्रपट ओळख सादर करतो आहे. जमेल तसे अजून वेगवेगळ्या भाषांमधल्या चित्रपटांच्या ओळखी टाकण्याचा मानस आहे. -निनाद फ्रेंच चित्रपट टु पेंट ऑर मेक लव्ह मॅडेलीन (सबीन अझेमा) ही एक मध्यमवयीन हौशी चित्रकार आहे. शिवाय ती स्वतःचा व्यवसायही चालवते. तीच नवरा विलियम (डॅनियल अत्वाल) हा हवामान खात्यात नोकरी करतो. पण त्याने आता मुदतपूर्व निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या दांपत्याला एक मुलगी आहे. ती ला आता शिष्यवृत्ती मिळाल्याने ती इटलीमध्ये रोमला जाते आहे. आता हे दोघेच आहेत. व्यवसायातल्या ताणातून निवांतपणा मिळवण्यासाठी मॅडेलीन फ्रांसच्या ग्रामीण भागात भटकत असते आणि आवडलेल्या ठिकाणांची चित्रे काढत असते. अशाच एका भटकंतीमध्ये आल्प्स च्या सुंदर पर्वराजीतल्या ग्रामीण भागात असलेल्या एक जुन्या घराचे चित्र काढायला ती जाते. निवांत जागा आणि चांगला व्ह्यु पाहून ती आपले रंग आणि साहित्य काढते. सुरुवात करते तोच ती ला दुरून एक माणूस तिच्याकडे येतांना दिसतो. हा माणूस म्हणजे ऍडम (सर्जी लोपेझ). हा अंध असतो आणि रंगांच्या वासाने मॅडेलीनला शोधतो. चौकशी अंती मॅडेलीनला तो सांगतो की ती ज्या घराचे चित्र काढत आहे ते विकायला आहे. हे सुंदर पर्वतराजीत वसलेले घर मॅडेलीनला आवडते. मॅडेलीन विलियम सोबत ते घर विकत घेण्याचा निर्णय घेते. ऍडम आता त्यांचा शेजारी बनतो. घर घेतल्यावर ऍडम त्याच्या बायको इव्हा (अमीरा कॅसर) सह जेवायला येतो. संगीत गाणी आणि चित्र आणि फ्रेंच वाईन अश्या अनेक आवडी निवडी जुळतात. गप्पा रंगतात. एक प्रकारचा मोकळेपणा मॅडेलीन आणि विलियम अनुभवू लागतात. आणि ऍडम आणि इव्हा पण त्यांना जेवणाचे आमंत्रण देतात. ऍडम आणि इव्हा कडचे जेवणही असेच संगीत गाणी आणि चित्र आणि फ्रेंच वाईन सोबत रंगते. जेवण झाल्यावर मॅडेलीन आणि विलियम घरी येतात. दुरून त्यांना ऍडम आणि इव्हा च्या घराला आग लागल्याचे दिसते. पटकन गाडी काढून ते तेथे पोहोचतात. पण घर भस्मसात झालेले असते. ऍडम आणि इव्हाला ते घरी घेऊन येतात. आत चौघेजण एकत्रच राहू लागतात. अशाच एका धुंद जेवणानंतर ऍडम मॅडेलीनचा हात धरतो आणि तिला घेऊन वरच्या खोलीत जातो. इव्हा आणि स्तिमित विलियम दोघेच खाली राहतात. विलियम पुढे जाऊ लागताच इव्हा त्याला हात धरून सोफ्यावर ओढते. प्रणयाची एक धुंद रात्र संपून दुसरा दिवस सुरु होतो. आता अचानकपणे आलेल्या शृंगारातील या नव्या घटनेला कसे सामोरे जावे हे मॅडेलीन आणि विलियम या दोघांनाही कळत नाही. यातून वेगळेच काही आकाराला येऊ लागते. आणि मॅडेलीन आणि विलियम दोघेही ऍडम आणि इव्हाच्या प्रेमात पडले आहेत असे त्यांच्या लक्षात येते. मध्यम वयात बुर्झ्वा आयुष्यात आणि कोणतेही थ्रिल नसलेल्या जीवनात, हे नवीनच शृंगारिक धाडस धरून ठेवण्यासाठी त्यांची नकळतपणे धडपड सुरू होते. पण ऍडम आणि इव्हा फ्रांस सोडून पॅसिफिक महासागरातील एका बेटावर जाऊन राहण्याचा निर्णय घेतात. मॅडेलीन आणि विलियम ला हा विरह सहन होत नाही. ते ठरवतात की आपणही तेथेच जाऊन राहू. घर विकण्याचा निर्णय होतो. जाहिरातीमुळे काही लोक घर पाहायला येतात. पण काही जमेल असे दिसत नसते. आता सगळे लोक येऊन गेले असे वाटत असतांनाच अजून एक तरुण जोडपे तेथे उगवते. त्यांना ते घर खूपच आवडते. पण पैसे मात्र तेव्हढे नसतात. विषय थांबतो. सायंकाळचा अंधार दाटून आलेला असतो. मॅडेलीन या नवीन जोडप्याला म्हणते की आता जेऊन जा. फारसे आढेवेढे न घेता तेही तयार होतात. परत एकदा वाईन सोबत गपा ताल धरू लागतात. आवडी निवडी संगीत आणि कला जुळत जाते. नकळतपणे परत 'तेच घडते'. आता काहीसे सरावलेपण आलेले असल्याने सकाळ चांगली जाते! ते जोडपे निघून गेल्यावर विलियम मॅडेलीन ला विचारतो की, आपल्याला खरोखर बेटावर जायला हवे आहे का? आता घर विकण्याची आवश्यकता संपलेली असते! सुंदर चित्रण आणि साधी सोपी शृंगारीक कथा असा हा चित्रपट आहे. काही गोष्टी मात्र खटकल्या - काही खुप ढोबळपणे दिलेले क्ल्युज किंवा अतिसूचक गाण्यांचा वापर मला मठ्ठ वाटला, मजा घालवणारा वाटला. पण चित्रपट बटबटीतही नाही, हे मात्र तेव्हढेच खरे. चित्रण सुरेख आहे. चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही. साध्या सरळमार्गी आणि निवृत्तीला आलेल्या (फ्रेंच?) लोकांच्या आयुष्यातही सेन्सेशनल गोष्टी घडू शकतात हे दाखवून देणारा चित्रपट. चित्रपटाचे नाव - Peindre Ou Faire L'amour भाषा - फ्रेंच लेखक, दिग्दर्शक - अर्नाद लारौ आणि जीन मारी लारौ कलाकार मॅडेलीन - सबीन अझेमा विलियम - डॅनियल अत्वाल ऍडम - सर्जी लोपेझ (तोच अ पॉर्नोग्राफिक अफेयर मध्ये आपली ओळख झालेला) इव्हा - अमीरा कॅसर वर्ष - २००५ पुरस्कार - कान्स २००५ मध्ये पाम द् ओर साठी नॉमिनेशन

याद्या 3681
प्रतिक्रिया 19

चित्रपट पाहिलाच पाहिजे आता.(घरी पाहिला तर चित्रपट्च काय ईतर काही पाहायच्या लायकीचे पण राहणार नाही..) बाकी चित्रपट ओळख मस्तच.

In reply to by utkarsh shah

या चित्रपटाच्या चित्रिकरणात थोडीफार नग्नता सोडल्यास तसे काही काहीच नाही. :)

अच्छा. मला वाटले की एखाद्या रंग बनवणार्‍या कंपनीचीच जाहीरात आहे की काय? आपला सैफ नाही का पेंट करता करता प्रेम करतो.

सुंदर चित्रण आणि गोष्ट/ कृत्य अयोग्य/ वाईट असताना त्याचे चित्रण कसेही केले तरी मला फरक पडत नाही. वस्तुस्थितीला चित्रण किंवा दृष्टिकोनापेक्षा जास्त महत्त्व असते. सामान्य लोक नायकाला किंवा खलनायकाला ऐटीत सिगरेट/ सिगार/ पाईप ओढताना पाहून तसे करायला जातात पण ते कृत्य अयोग्य हे समजू शकत नाहीत. साधी सोपी शृंगारीक कथा असा हा चित्रपट आहे हे साधे सोपे नाही. भारतीयांसाठी तर नक्कीच नाही. परदेशी (इथे फ्रेंच) लोकांसाठी हे साधेसुधे आहे असे म्हणायचे आहे का? साध्या सरळमार्गी आणि निवृत्तीला आलेल्या (फ्रेंच?) लोकांच्या आयुष्यातही सेन्सेशनल गोष्टी घडू शकतात हे दाखवून देणारा चित्रपट सरळमार्गी? थोड्याच दिवसांपूर्वी विवाहबाह्य संबंध सशक्त विवाहाला आवश्यक असतात असा जावईशोध कोण्या फ्रेंच बाईनेच लावला होता ना ? इथेच मिपावर धागाही होता. पंतप्रधानही तसलाच.

In reply to by Pain

हे साधे सोपे नाही. भारतीयांसाठी तर नक्कीच नाही. परदेशी (इथे फ्रेंच) लोकांसाठी हे साधेसुधे आहे असे म्हणायचे आहे का?
'आता अचानकपणे आलेल्या शृंगारातील या नव्या घटनेला कसे सामोरे जावे हे मॅडेलीन आणि विलियम या दोघांनाही कळत नाही.' असे वाक्य वर आहेच. फक्त कथा सांगायला साधी सोपी इतकेच मला म्हणायचे होते. कारण नाईन क्वीन्स सारख्या चित्रपटाची कथाच सांगायला काँप्लेक्स वाटली होती. तसेच लाइफ इज ब्युटिफुल किंवा पर्सोना या चित्रपटांचेही झाले होते. मला अजूनही 'कळले असे वाटले तरी' सॅम्युएल बेकेटच्या नाटकांवर लिहिता येत नाही. या चित्रपटातले नाट्य आणि वर्तणूक साधी सोपी आहे असे म्हणता येणार नाही कदाचित. पण ते ठरवणे फार व्यक्तीगत पातळीवरचे आहे. असे माझे मत आहे. मी चित्रपट कोणतेही पूर्वग्रह न ठेवता पाहणे पसंत करतो. याचे काही परिणाम होतात. 'लिल्ल्या फॉर एव्हर' या अंतर्बाह्य हलवून सोडणार्‍या चित्रपटा नंतर आठ दिवस काहीच लिहू शकलो नव्हतो.
थोड्याच दिवसांपूर्वी विवाहबाह्य संबंध सशक्त विवाहाला आवश्यक असतात असा जावईशोध कोण्या फ्रेंच बाईनेच लावला होता ना ? इथेच मिपावर धागाही होता. पंतप्रधानही तसलाच.
:)

अच्र्त बाव्ल्त.... फ्रेंच लोक हो.. महेश भट व कंपूने हा सिनेमा बघायला नको नाहीतर एक मर्डर मिस्ट्री टाकुन आणतील..

In reply to by सहज

ओळखीचे परिक्षण आवडले.
अच्र्त बाव्ल्त.... फ्रेंच लोक हो..
हे शब्द नेमके आणि भेदक आहेत :)

'सुसंस्कृत' लोकांच्या मानाने धाडसी विषय असला तरी प्रतीकात्मकदृष्ट्या विचार केला तर 'आपल्या कृत्रिम नियमबद्ध जीवनाच्या कोशाबाहेरही एक जीवन आहे' असा एक छान संदेश देणारा चित्रपट आहे असे वाटते. तुम्ही थोडक्या शब्दांत नेटकेपणे माहिती लिहीली आहे. चित्रपट पाहताना तुमच्या मनात काय भावना निर्माण झाल्या हेही लिहीलं असतंत तर आणखी उद्बोधक झालं असतं. असो. बाकी काही प्रतिक्रिया वाचून भारतीय माणसे जगभरात ढोंगी म्हणून का प्रसिद्ध आहेत ते पुन्हा एकदा समजले. अवांतरः "व्यभिचार हा संभोगाचा सर्वोत्तम प्रकार आहे" इति ऑस्कर वाईल्ड.

In reply to by नगरीनिरंजन

अवांतरः "व्यभिचार हा संभोगाचा सर्वोत्तम प्रकार आहे" इति ऑस्कर वाईल्ड. कदाचित त्यातल्या थ्रील मुळे असेल .... नवरा बायकोत काय लपवायचे काय लपून राहणार? बाकी संभोगाविषयी एक वेगळा अप्रोच घेतल्याने वेगळा पिच्चर वाटतो...

In reply to by नगरीनिरंजन

चित्रपट पाहताना तुमच्या मनात काय भावना निर्माण झाल्या हेही लिहीलं असतंत तर आणखी उद्बोधक झालं असतं.
चित्रपट प्रतिकात्मक आहे असा माझा समज झाला होता. अ‍ॅडम आणि इव्हा ही नावे. अ‍ॅडमचे आंधळे असणे, मॅडेलीन चे चित्रकार असणे यामुले तसा समज झाला होता. पण पुढे धडलेल्या घटनांमुळे प्रतिकात्मकता आहे का याचा विचार परत करावा लागला. शिवाय मध्ये येणाऱ्या ढोबळ क्ल्युज मुळे रसभंग होत होता. पण एकुण चित्रपटाची कथा मला तरी वेगळेपणामुळे आवडली. शिवाय 'सर्वसाधारणपणे' चित्रपट हे तरूणांविषयी असतात पण येथे मध्यमवयीन फोकस असल्याने वेगळे वाटले. शिवाय येणार्‍या अनुभवांना प्रामाणिकपणे सामोरे जाणे आवडले. काही व्यक्तींना हे प्रामाणिक वागणे वाटत नाही असे वाटले. पण यात सेक्स स्विंगींग असले तरी ते दोघांनाही मान्य आहे, म्हणून वागणे प्रामाणिक वाटले. दोघेही पहिल्या अनुभवानंतर वास्तवाच्या स्विकारासाठी झगडत आहेत असे दिसते. त्याचवेळी त्याविषयी दोघांनाही आकर्षण दिसते. कुणी कुणाची फसवणूक करतो आहे असे दिसत नाही. बाकी ढोंगीपणा बद्दल म्हणाल तर एकाच त्वचेवर एकच त्वचा घासली म्हणून प्रामाणिकपणा असेलच असे कसे म्हणावे?

In reply to by निनाद

बाकी ढोंगीपणा बद्दल म्हणाल तर एकाच त्वचेवर एकच त्वचा घासली म्हणून प्रामाणिकपणा असेलच असे कसे म्हणावे? अहो पण त्याच त्या जोडीदाराच्या परवानगीशिवाय दुसरीचकडे आपली त्वचा घासली तर जोडीदार सोडून जातो असे म्हणतात...

In reply to by शिल्पा ब

जोडीदार अनेक कारणांनी सोडून जाऊ शकतो. त्यात हे एक महत्त्वाचे कारण असू शकते. संबंधातला प्रामाणिकपणा म्हणजे एकाच जोडीदाराबरोबर संभोग इतकाच मर्यादित अर्थ असावा काय? पण एकाच त्वचेवर त्वचा घासली पण वेगवेगळी त्वचा फक्त 'पाहिली' त्यातून काम प्रेरणाही घेतली तर तो ही अप्रामाणिकपणा असू शकतो नाही का? थोडक्यात, पॉर्न 'पाहणारे' प्रामाणिक की अप्रामाणिक? तेथे तर त्वचेचा संपर्कच नाही.

In reply to by निनाद

बाकी ढोंगीपणा बद्दल म्हणाल तर एकाच त्वचेवर एकच त्वचा घासली म्हणून प्रामाणिकपणा असेलच असे कसे म्हणावे?>> हे मात्र पटते... कारण emotional infidelity पचवणं जास्त अवघड असते....than accepeted relations like shown in the movie.

काही प्रतिक्रिया वाचून अंमळ पण एव्हाना अंगवळणी पडलेली गंमत वाटली. विवाहबाह्य संबंध म्हणजे पापच, किंवा त्याउलट अशा संबंधांचं चित्रण करणारा कोणताही चित्रपट म्हणजे लपलपत्या जिभांनी पाहायचा असणार अशा एकारलेल्या दृष्टिकोणांना (किमान तात्पुरतं) बाजूला ठेवलं आणि थोड्या मोकळ्या मनानं पाहिलं तर अशीही एक शक्यता जाणवेल की हा चित्रपट एक प्रकारे अपोलोनिअन आणि डायोनिसिअन डायलेक्टिकचं एक मूर्त स्वरूप असेल. चित्र काढणं (आणि त्यातून आनंद मिळवणं) हे अपोलोनिअन तर अनिर्बंध शारिरीक संबंधांतून आनंद मिळवणं किंवा त्यांत जीवनाचं तत्त्वज्ञान गवसणं हे डायोनिसिअन असं मानता येईल. आयुष्यातला डायोनिसिअन भाग वगळलेल्या बूर्झ्वा जोडप्याला तो नव्यानं गवसतो तेव्हा त्यांच्या आयुष्यात क्रांती घडते असं काहीसं म्हणायचं असावं असं वाटतं. अवांतरः मुक्तसुनीतांच्या मित्राला आयुष्यात रुची आणण्यासाठी अशीही एक शक्यता म्हणून हा चित्रपट दाखवावा का?

In reply to by चिंतातुर जंतू

आयुष्यातला डायोनिसिअन भाग वगळलेल्या बूर्झ्वा जोडप्याला तो नव्यानं गवसतो तेव्हा त्यांच्या आयुष्यात क्रांती घडते असं काहीसं म्हणायचं असावं असं वाटतं.
पटलं. किंबहुना या विश्लेषणाला दुजोरा देणारा महत्त्वाचा क्लू म्हणजे अॅडम आणि इव्हा ही नावं. अर्थातच संस्कृतीची वस्त्रं न नेसलेल्या मूळ स्त्री-पुरुषाची नावं अपघाताने आलेली नाहीत. आदीम पौरुष व स्त्रीत्वाची गाठ त्या जोडप्याला पडते हेच लेखकाला दाखवून द्यायचं आहे याबाबत शंका नाही. अॅडम व इव्हा हे त्यांना होणाऱ्या आत्मशोधाचं प्रतीक तर नवीन येणारं जोडपं हे कथानकाच्या थोडक्या वर्णनावरून असं वाटतं की मुळातच या जोडप्याची धड हेही नाही अन तेही नाही अशी अवस्था झालेली असावी. मुळात ती व्यावसायिक व नवरा रटाळ नोकरी करणारे, तिची चित्रकलादेखील हौशी - विशेष कन्व्हिक्शन नसलेली असावी. ही अवस्था बायफर्केशनवर या दिशेला जावं की त्या दिशेला हे न ठरल्यामुळे रुळावरून घसरलेल्या गाडीसारखी वाटते. पॅसिफिक महासागरावरच्या बेटावर जायचा (समाजापासून, आयुष्यापासून दूर जाण्याचा...) निर्णय सोडून देऊन पुन्हा ते कुठच्यातरी एका रुळावर येतात.