Skip to main content

रोहिंटन मिस्त्री वि. आदित्य ठाकरे - महाराष्ट्राच्या सुवर्णयुगाची पहाट?

लेखक चिंतातुर जंतू यांनी शुक्रवार, 22/10/2010 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
आदित्य ठाकरे एका वीस वर्षांच्या वाघाच्या बच्च्यानं नुकतीच आपली नखं दाखवून आपल्या उज्ज्वल कारकीर्दीची सुरुवात केली आहे. उध्दवजी ठाकरे यांचे सुपुत्र आणि सन्माननीय श्री. बाळासाहेबांचे नातू आदित्यजी ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून एका यःकश्चित कादंबरीची जी रातोरात हकालपट्टी केली आहे ते पाहून मराठी माणसाची मान अभिमानानं पुन्हा एकदा उंचावली गेली आहे. रोहिंटन मिस्त्री नावाच्या एका पारशाच्या 'सच अ लाँग जर्नी' या कादंबरीला २००७ मध्ये जेव्हा मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. (इंग्रजी) अभ्यासक्रमाचा एक वैकल्पिक भाग म्हणून निवडण्यात आलं तेव्हा आमचा वाघाचा बच्चा जरा वयानं लहान होता. यथावकाश मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये बी.ए. (इतिहास) करण्यासाठी त्यानं प्रवेश घेतला त्यानंतर कधीतरी बहुधा या कादंबरीत केल्या गेलेल्या ऐतिहासिक अपराधांची त्याला जाणीव झाली असावी. अगदी अशोकरावजी चव्हाणांनीही त्याची री ओढली आहे. आहात कुठे? कुणीतरी म्हटलंच आहे ना की अंधेर नगरी चौपट राजा, सॉरी देवाच्या दारात उशीर होऊ शकतो पण अंधार नाही! अर्थात प्रथेप्रमाणे मराठीजनांचा द्वेष करणार्‍यांनी यावर टीकेची झोड उठवली आहे. कुठल्याशा बुकर नावाच्या परदेशी पारितोषिकासाठी या पुस्तकाचं नामांकन झालं होतं म्हणे. करायची आहेत काय ती परदेशी पारितोषिकं? आम्ही नुकतीच किती सुवर्णपदकं लुटलीयेत माहिती आहे नं? पत्रकार-लेखक अरूण टिकेकरांनी म्हणे म्हटलं आहे की अभ्यासक्रमातून पुस्तक काढण्यासाठी एक विशीतला मुलगा मुंबई विद्यापीठाच्या व्हाइस-चॅन्सलरला अशी २४ तासांची नोटीस कशी बजावू शकतो? आता अशा गोष्टी टिकेकरांना या वयातही नसतील जमत कदाचित, पण आमच्या मराठी माणसाच्या हृदयसम्राटांच्या नातवाला यात काय अवघड आहे? विघ्नसंतोषी मराठी माणसाला मुळी कुणाची प्रगती झालेली बघवतच नाही! काही लोकांनी असंही म्हटलं आहे की खरं तर या अभ्यासक्रमाचं हे शेवटचं वर्ष होतं म्हणे. आणि एमेच्या वर्गात गेली २० वर्षं हे पुस्तक शिकवलं जातंय म्हणे. म्हणून काय झालं? शेवटी उदाहरणार्थ हा तत्त्वाचा वगैरे प्रश्न आहे ना? (म्हणजे आमच्या बछड्याचं शक्तीप्रदर्शन हे तत्त्व बरं, नाहीतर म्हणायचात एका टीचभर पुस्तकावरच्या बंदीत काय मेलं तत्त्व न फित्त्व?) त्या पुस्तकात म्हणे पारशांच्या विक्षिप्तपणाचं सुध्दा खूप चित्रण आहे म्हणे. आता पारशांना नसेल काही घेणं आपलं चित्रण कसं आहे याच्याशी. पण त्यांच्यात नसली अस्मिता तरी आमची अस्मिता जिवंत आहे की! काय म्हणता? त्यांच्यात मुलींचं नाव अस्मिता ठेवत नाहीत? अहो असं नाही हो म्हणत मी. म्हणजे तसं ते नाहीच ठेवत, पण मी तसं म्हणत नाही आहे. दुसरी एक अस्मिता नावाची भानगड असते काहीतरी. मला नका विचारू म्हणजे काय ते. तिला काहीतरी दुखापत झाली एवढंच लक्षात ठेवाल तर तेवढं पुरेसं आहे आपल्याला. उगाच भलत्या चौकशा नकोत. अंगाशी येतील बरं! रोहिंटन मिस्त्री आणि त्या मिस्त्रीनं म्हणे असं म्हटलं आहे की या वीस वर्षांच्या मुलाबद्दल कीव, किळस की करुणा बाळगावी ते कळत नाही! त्याला म्हणावं तिथे कॅनडात बसून अशा गमजा करण्याऐवजी आमच्या गल्लीत ये, मग दाखवतो तुला आमचा बडगा! काय म्हणालात, आमचा बडगा फक्त आमच्याच गल्लीत दिसतो? थांबाच जरा, आमचा बछडा अजून थोडा मोठा होऊ दे, मग लावू पुन्हा अटकेपार झेंडा. आहात कुठे? आमच्या आदित्यजींच्या कॉलेजातल्या मुख्याध्यापकांनी पण त्या शिंच्या मिस्त्रीचीच बाजू घेतली म्हणे. 'एकविसाव्या शतकात एका राजकीय पक्षानं आपल्यावरची टीका सहन करण्याची आणि आपल्या वागणुकीतून टीकाकारांना चोख उत्तर देण्याची प्रगल्भता दाखवायला पाहिजे. निव्वळ आपल्यावरच्या टीकेपोटी पुस्तकावर बंदी घालणं हे अयोग्य आहे', असं त्यांनी म्हटलं आहे म्हणे. आता तो मिस्त्री पण त्यांच्याच कॉलेजातला आणि त्यात पुन्हा जागतिक किर्तीचा वगैरे. मग त्यांना ही दादरची मुर्गी दाल बराबर वाटणार नाही तर काय? पण आमची मुर्गी नाही बरं, वाघ आहे वाघ! खाल तेव्हा कळेल आपलं, खाईल तेव्हा कळेल! पण आमच्या वाघाच्या बछड्यानं तरी असल्या ख्रिस्ती कॉलेजात जावंच कशाला? करायची काय ती बी.ए. न फी.ए. ची थेरं? असले इतिहास वगैरे शिकून कोण्णाचं भलं होत नाही! शिवाय घरची एवढी रग्गड जहागीर आहे की. नुसतं बसून खाल्लं तरी काही कमी पडणार नाही. काय म्हणता? घराणेशाही? कोण आहे रे तिकडं? जरा जीभ हासडा बरं यांची. फारच वळवळते आहे! अजूनही काही शंका असतील तर हे घ्या दुवे आणि लावा आपली अस्मिता दावणीला... भारतानं आता पुस्तक जाळण्यापलीकडे गेलं पाहिजे सेनेच्या वारसदारानं अभ्यासक्रमातून पुस्तक मागे घ्यायला लावलं

वाचने 27614
प्रतिक्रिया 105

प्रतिक्रिया

In reply to by अडगळ

हाथ कंगन को आरसी क्या ? The poor person does not realise the value of " Diamond Studded Bracelet" when he/ She can not afford to feed his/her hunger Here you can refer to "Hunger for Power" :-( जाहील को फ़ारसी क्या ?? As a Diamond is Useless for a Hungry men at the time of Hunger or the Beauty of a full moon is useless for a blind man , so is the Farsi (The Persian Lanugage) for an Uncultured person who is also Liar :-( अडगळ यांचा प्रतिसाद अप्रतिम !!

उपरोध खचाखच भरलेला लेख आवडला. पण हे सारे बोचरे असले तरी, "त्यांना" खरोखरच बोचेल का? बहुदा नाहीच.

In reply to by श्रावण मोडक

असला उपरोध शैनिकाना कलतच नाय मंग बोचायचा प्रश्नच कुटे येतो ? आपलं काम सरळसोट. धर की हान्न तिच्यायला ! (स्वारी ! मेस्त्रीची भाषा तोंडात आली. नेमी बोलतांना आपली हीच भाषा असते. पण लिवायचं म्हनजे सभ्यपने लिवायला हवं नाय का?)

चिंज इज ब्याक!!! एक नंबर तिरकं लिखाण!!.. लै आवडलं

बाळ राजे (राजकारणाच्या) प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत गेले तर! लेख आणि काही प्रतिसाद उत्तम!

योग्य ठिकाणी चिमटे आणि चावे घेतले गेले आहेत! चिंजंनी तलवारीपेक्षा लेखणी कशी धारदार असते हे दाखवून दिलेले आहे. राहिली गोष्ट बाळराजांची तर पिंडीच्या आश्रयाने राहणार्‍या विंचवाप्रमाणे झुंडीचा आश्रय असेपर्‍यंत यांच्या बाळलीला पाहणे भाग आहे.

In reply to by मिसळभोक्ता

यत्ता म्हणायचंय का तुम्हाला? (तुही यत्ता कंची मधली यत्ता) ती तर सगळ्याच युवराजांना विचारली पाहिजे.

चिमटे, चटके आणि फटके असलेला लेख. प्रतिसाद पण लै भारी.

चिंतातुरजंतुजी, तुम्ही असे धाग्यावर धागे काढून काय साध्य होणार? सरळ दुर्लक्ष करावेत. आता आपण दिल्लीच्या तख्ताचे युवराज राहूलकडे आणि त्याच्या विधानांकडे आपण दुर्लक्ष करतोच का नाही? तर ह्या एका "मुंबईच्या बाबू"चे कशाला घेऊन बसायचे? असे बघा, शिवसेनेस फॅसिस्ट म्हणले गेले, वसंतसेना म्हणले गेले, गुंड म्हणले गेले इत्यादी इत्यादी... तरी देखील अशा सततच्या बोलण्याने त्यांची (ठाकरे + शिवसेना यांची) प्रसिद्धी वाढतच गेली का नाही? बाळासाहेब आणि त्यांची शिवसेना कधीकाळी केवळ मराठी वृत्तपत्रे, झालेच तर काही मुंबईतील इंग्रजी वृत्तपत्रांपुरतेच मर्यादीत नाव होते. असल्या टिकांमुळे त्यांचे नातू तर अटकेपार काय अगदी साहेबाच्या राज्यातील पेपरात पोचले की! म्हणूनच, "सन्माननीय श्री. बाळासाहेबांचे नातू आदित्यजी ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून एका यःकश्चित कादंबरीची जी रातोरात हकालपट्टी केली आहे " असे काही उपरोधक लिहीलेले इथल्या अज्ञ मिपाकरांना थोडेच कळणार आहे? म्हणून म्हणावेसे वाटते की, जो पर्यंत आदित्य ठाकरे हे कर्तुत्वहीन आहेत अशी जनमानसात जागृती करत नाही आहात तो पर्यंत सर्व चर्चा फिजूल आहेत... ;)

In reply to by नितिन थत्ते

विकासराव्,समजा राहूल गांधींनी दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरुंना अशीच नोटीस पाठवली असती तर काय झाले असते? आपण किती लेख लिहिले असतेत त्यावर? हुप्प्या,गांधीवादी तर अ़़क्षरशः पेटून उठले असते.अडवाणी,जेटली,सुषमा ह्यांनी घराणेशाही किती वाईट आहे ह्यावर संसदेत लेझीम नृत्य चालु केले असते्.

In reply to by प्रिया देशपांडे

.अडवाणी,जेटली,सुषमा ह्यांनी घराणेशाही किती वाईट आहे ह्यावर संसदेत लेझीम नृत्य चालु केले असते्. वा ! क्या सीन है ! आवडला !

In reply to by प्रिया देशपांडे

पण एक फरक आहे ठाकरे घराण्यात अजुन तरी कोणी नगरसेवक , आमदार, खासदार झाला नाही ईतर पक्षात मात्र बाप मंत्री - पोरे / पुतणे आमदार / खासदार वगैरे चालू असतेच

In reply to by उल्हास

बाप मंत्री - पोरे / पुतणे आमदार / खासदार वगैरे चालू असतेच??? बाप पंतप्रधान - पोरे पंतप्रधान - नातू पंतप्रधान वगैरे चालू असतेच असे म्हणायचे असावे बहुदा! ;)

In reply to by गुंडोपंत

रिमोटकंट्रोलपदासाठी निवडणुका झाल्या तर ह्या तीन पिढ्या व्यंगचित्रे काढत बसतील.

बोचरा लेख. खुसखुशीत शैलीत रेशमी चिमटे घेणारे आदरणीय राजकुमार ह्यांच्या प्रतिसादाच्या अपे़क्षेत.

का आदित्य ठाकरेने ती बॅन केली म्हणुन संताप ? इथे मराठी माणसांबद्दल काहीही वाईट लिहिले तर ते बघत बसायचे का ? एरवी शिवसेनेच्या विरोधात असणारे मुख्यमंत्री पण बरखा दत्त च्या कार्यक्रमात ह्या पुस्तका विरोधात बोलले. अ‍ॅटलीस्ट पुस्तक तर वाचा.....त्या कार्यक्रमात पुस्तकातील काही उतारे दाखवत होते. नक्कीच आक्षेपार्ह होते. इथे शिवसेना वि. काँग्रेस असा रंग न देता मराठी वि. बाकी लोकांचा द्वेष ह्यावर चर्चा करावी ही माफक अपेक्षा.

In reply to by अमोल खरे

येथील दुव्यावरच्या माहितीनुसार पुस्तकात खालील आक्षेपार्ह वाक्ये असल्याचे समजते - 'What to do with such low-class people? No manners, no sense, nothing. And you know who is responsible for this attitude—that bastard Shiv Sena leader..... He and his “Maharashtra for Maharashtrians” nonsense. They won’t stop till they have complete Maratha Raj' ‘Wait till the Marathas take over, then we will have real Gandoo Raj,’

In reply to by बेसनलाडू

श्री बेसनलाडू, दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. आदित्य ठाकरेने ती बॅन केली म्हणुन संताप करण्याचे काहीच कारण (मला तरी) दिसत नाहीये. . . . बाकी चालू द्या. अवांतर : आजकाल कोलेजात काय हे असलं शिक्षण देतात कि काय ? माननीय हुप्प्या ज्या तळमळीने लिहितात त्याची अशी खिल्ली उडविलेली बघून वाईट वाटले. त्यांची मते कोणाला पटोत की नकोत पण त्यांचा हेतू पूर्णपणे प्रामाणिक आहे हे त्यांचे लेख वाचून कळतेच. त्यामुळेच अशी खिल्ली उडविणे समर्थनीय नाही असे मला वैयक्तिक पातळीवर वाटते. त्या धाग्याची अशी उडवलेली खिल्ली हे बघून एक मिपाकर नागरिक म्हणून मला शरम वाटली. ड्वोले पाणावले. :wink:

In reply to by गांधीवादी

+ गांधीवादींशी सहमत. तसेही फुकटचा तमाशा बस्घायला (वाचायला) मिळतो आहे म्हणून बघत होतो. :)

चायला... आता "ठाकरे एक जगण्याविरूध्द भली मोठी अडगळ" असे पुस्तक लिहावे म्हणतो. कमीत कमी एक लेखमाला तरी ...... कंटाळा आला यार या ठाकर्‍यांचा आता....

भाऊ पाध्येंच्या राडा या कादंबरीची या निमीत्ताने आठवण झाली. जबरदस्त कादंबरी आहे. ( यातला मंदार (हेच नाव होतं बहुतेक) हा नायक अगदी बॅ.अ.धोपेश्वरकराचा धाकटा भाऊ शोभावा इतका भारी आहे.सेनेचं वॉर्डावॉर्डातलं राजकारण त्यात उपकथानक म्हणून आलं आहे) ती पण सेनेने अशीच गायब केली असे म्हणतात.पण नंतर ती अक्षर प्रकाशनाने परत प्रकाशीत करुन बाजारात आणली. रिडल्स च्या वेळेला पण अशीच बोंबाबोंब केली होती. वासुनाकाप्रेमी अडगळ.

मला तर हे महाशय निदान त्यांच्या वडिलांपेक्षा मॅच्युअर वाटतात! आवाज कुणाचा, चिऊसेनेचा!

इंग्लंडच्या राजपुत्रापासून ते जगभरातील कॉर्पोरेट जगताने मॅनेजमेंट गुरू म्हणून ज्यांना सलाम ठोकला ते मुंबईचे डबेवाले म्हणजे घामटलेली डुकरे आहेत, त्यांच्या घामाला डुकरासारखी दुर्गंधी येते अशी गरळ ‘सच अ लॉंग जर्नी’ या पुस्तकातून ओकणार्‍या रोहिंटन मिस्त्री याच्या विरोधात मराठमोळे डबेवाले आज मैदानात उतरले. * मिस्त्री नाराज दरम्यान, शिवराळ भाषा असलेले रोहिंटन मिस्त्री याचे ‘सच अ लॉंग जर्नी’ हे पुस्तक शिवसेनेच्या आंदोलनानंतर मुंबई विद्यापीठाने अभ्यासातून वगळले, मात्र विद्यापीठाचा हा निर्णय मिस्त्री याच्या पचनी पडलेला नाही. त्याने विद्यापीठाकडे या निर्णयाबाबत ई-मेलद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. त्याची नाराजी व्यक्त करणार्‍या या ई-मेलची पत्रके वाटण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आनंद पटवर्धन यांनी विशेेष पुढाकार घेतला. मुंबईत जन्म झालेला रोहिंटन मिस्त्री कॅनडात स्थायिक झाला आहे. 1 एप्रिल 1991 साली त्याचे ‘सच अ लॉंग जर्नी’ हे पुस्तक प्रकाशित झाले. 424 पानांचे हे पुस्तक असून 2007 मध्ये ते आर्ट्सच्या दुसर्‍या वर्षाला अभ्यासक्रमात लावण्यात आले होते. मराठी माणसांबद्दल अतिशय घृणास्पद उल्लेख असलेले हे पुस्तक 15 ते 16 महाविद्यालयांनी अभ्यासक्रमासाठी घेतले होते.