लक्ष्मणः व्हेरी व्हेरी स्पेशल!
गेली दहा वर्षे अनेक वेळेस दिसलेले चित्र: ऑसीज नी लावलेली टाईट फिल्डींग, च्युईंग गम चघळत मैदानावरचे आणि बाहेरचे सगळे डावपेच कोळून प्यालेला कप्तान आणि दुसर्या टीम ला कोणत्याही परिस्थितीत हरवायचे या एकाच विचाराने खेळणारा "बॅगी ग्रीन" घातलेला आक्रमक संघ. बॅट्समन च्या सर्व त्रुटी हेरून त्याप्रमाणे बोलिंग चालू असते. एकापाठोपाठ एक बॅट्समन परततात. ऑस्ट्रेलियाला विजय समोर दिसू लागतो. "आता फक्त समोरचे दोन उडवले की मग शेपूट..." वगैरे विचार त्यांच्या डोक्यात चालू असताना त्या दोघांपैकी एकाला एकदम आपली कला सादर करायची हुक्की येते. आणि मग चौफेर फटकेबाजी चालू होते. शॉट्स ही असे की फिल्डर्स नी बॉल अडवायचे सोडून बघत राहावे, आणि बोलर ने "हा बॉल तिकडे कसा काय गेला" विचार करत रन अप कडे परत जावे...
वॉर्न च्या लेग स्पिनला विरूद्ध दिशेने मिडविकेट ला (ऑन साईड) सतत मारल्याने कंटाळून शेवटी स्टीव्ह वॉ तेथे एक फिल्डर लावतो. वॉर्न पुन्हा तसाच बॉल टाकतो. "आता काय करशील" असा विचार त्याच्या डोक्यात यायच्या आतच लक्ष्मण स्वत: लेग साईड ला मागे जाउन आता मोकळ्या झालेल्या ऑफ साईडला फोर मारतो. स्क्रीन वर वॉर्न चा हताश चेहरा आणि मागे "इडन गार्डन" वर ओरडणारे एक लाख लोक! परदेशी संघांच्या सगळ्या अभ्यासाला, कॉम्प्युटर, व्हिडीओ टेप्स अॅनेलिसिस ना एका अस्सल भारतीय कलाकाराने केवळ आपल्या कौशल्याच्या जोरावर हरवल्याचे अविस्मरणीय दृश्य!
व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण ने मार्क टेलर पासून ते आता पाँटिंग च्या संघांची अवस्था अशी केलेली आहे. एरव्ही लक्ष्मण संघात असून सुद्धा दिसत नाही. कधीकधी नसतो ही.
"Everytime he plays against us he comes up with something special and the next thing we read after the series is he is dropped! It leaves me completely bewildered."
अॅडम गिलख्रिस्टचे हे लक्ष्मणबद्दलचे वाक्य. स्थळ सिडने, जानेवारी २००४. सिरीज मधे आधी एकदा द्रविड बरोबर ३००+ रन्स ची भागीदारी करून झालेली. आता सचिन बरोबर आणखी ३५१. त्यात याच्या १७८ आणि क्वचित दिसणारे उदाहरण म्हणजे सचिन च्या २४१* पेक्षाही प्रेक्षणीय.
त्याआधी कलकत्त्याची द्रविड आणि त्याची ३७६ ची भागीदारी तर सर्वांना माहीतच आहे. ऑस्ट्रेलियाने १६ टेस्ट्स सलग जिंकलेल्या. "इडन" वर भारताला फॉलोऑन दिल्यावर तिसर्या दिवसअखेर शँपेन वगैरे मागवलेल्या. पण चौथ्या दिवशी भारताचे कोणीच आउट होणार नाही आणि पाचव्या दिवशी आपण सगळेच आउट होउ हे १६ मॅचेस मधे पराभव ठाउक नसलेल्या कांगारूंच्या स्वप्नात देखील आले नसेल.
लक्ष्मण ने ऑस्ट्रेलियाला हाणलेला मी पहिल्यांदा बघितला तो कलकत्त्याच्या मॅचमधे १९९८ ला, त्या "सचिन वि. वॉर्न" सिरीज मधे. आमच्या कंपनीला गुरूवारी सुट्टी असायची. आदल्या दिवशी चालू झालेल्या या मॅचमधे खास आमच्यासाठी ऑस्ट्रेलिया पहिल्याच दिवशी सर्वबाद झाले. पूर्ण दिवस भारताची बॅटिंग बघायला मिळणार, त्यात फॉर्मात असलेला सचिन, कलकत्त्याला नेहमीच चांगला खेळणारा (आणि तोपर्यंत आवडत असलेला) अझर यांच्या बद्दलची उत्सुकता जास्त. पण सिद्धू बरोबर सलामीला लक्ष्मण आला आणि तेथून ऑस्ट्रेलियाके बुरे दिन शुरू हो गये तेव्हा त्याने मारलेल्या ९५ रन्स ही पुढच्या गोष्टींची चुणूक होती याची कल्पना तेव्हा नव्हती.
पण तो खरा सलामीचा बॅट्समन नाही. आपल्याकडे सगळी मधली फळीच असल्याने बहुधा चिठ्ठ्या टाकून सलामीवीर निवडत असावेत. पण जेव्हा लक्ष्मण ला मधल्या फळीत खेळता आले तेव्हा त्याचा खरा खेळ दिसू लागला. मग २००१ मधे कलकत्ता, २००२ मधे विंडीज, २००३ मधे पुन्हा ऑस्ट्रेलिया, २००४ मधे पाक अशा बर्याच वेळेस तो चांगला खेळला, पण ऑस्ट्रेलिया वगळता तो फारसा उठून दिसला नाही. बर्याच वेळा संघ अडचणीत असताना शेपटाबरोबर तो ६०-७० रन्स काढायचा पण इतरांच्या चमकदार शतकांपुढे त्या लक्षात यायच्या नाहीत.
२००१ च्या त्या प्रसिद्ध सिरीज मधे ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याचे रन्सः २०, १२, ५९, २८१, ६५ आणि ६६.
नंतर लगेच झिम्बाब्वेविरूद्धच्या सिरीज मधे: २८, ३८, १५ आणि २०!
अशी बरीच उदाहरणे सापडतील. असा चाचपडत खेळत संघाच्या आत बाहेर चालू राहते. पाटा विकेट्स, ट्वेंटी २० वगैरेच्या अॅक्शन मूव्हीज मधे कलाकारांची गरज नसते, फक्त फाईटिंग करणारे लागतात. मग पुन्हा ऑस्ट्रेलिया सिरीज येते, चेंडू पिचवरून डोक्यापर्यंत उडू शकतो हे नव्याने कळते. कॉमेंटेटर्सच्या भाषेत सांगायचे तर "बॉईज" आणि "मेन" मधला फरक दिसू लागतो. आणि पुन्हा लक्ष्मण मॅच जिंकून देतो. नवीन ऑस्ट्रेलियन बोलर्स ना "मॅग्राथ किंवा वॉर्न म्हणत होते ते बरोबर होते" असे जाणवेपर्यंत मॅच हातातून गेलेली असते. लक्ष्मण बहुधा त्याची आर्टिस्ट्री दाखवायची वेळ निवडतो. त्या वेळेआधी मॅच धोक्यात असते आणि त्यानंतर जिंकलेली असते हे केवळ साईड ईफेक्ट्स!
त्याच्या २००३ मधल्या अशाच एका सुंदर शतकाचे वर्णन एका ऑस्ट्रेलियन पत्रकारा च्या शब्दातः
"Waving boundaries off both feet through cover, he transfixed the SCG crowd during the second session that revived India and the series. Mitchell Johnson was taken for 18 from five balls as Laxman split a crowded offside field and when he grew bored of hitting to cover, he worked towards square leg and mid-on with shots few Australians would have considered - or known how to play"
बीसीसीआय ला नम्र विनंती: जे काय ५०, २०, ५ ओव्हर्सचे गल्ली क्रिकेट खेळायचे ते खेळा. फालतू बोलर्सना १० यार्डवर असलेल्या बाउंड्रीच्या पलिकडे मारलेल्या फटक्यांना, सिक्सर्स, डीएलएफ मॅक्सिमम काय म्हणायचे ते म्हणा, त्यांना त्याबद्दल मिलीयन डॉलर्स द्या. पण वर्षातून निदान १०-१२ अशा टेस्ट्स होतील याची काळजी घ्या. आणि हो. बाकी विचार स्वातंत्र्य वगैरे ठीक आहे. पण सचिन, द्रविड आणि लक्ष्मण ला ते स्वतः ठरवेपर्यंत निवृत्त कधी होणार हे विचारायची पत्रकारांना बंदी करा :)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लक्षमण रावांचा विजय असो! काय
पत्रकारांना बंदी
मस्त!
जबरदस्त
हॅट्स ऑफ टू लक्ष्मण.. !!
मस्त रे !
सचिन, द्रविड आणि लक्ष्मण ला
मस्त लेख
छानच. शेवटच्या परिच्छेदाशी
ढकलपत्रातील काही व्हेरी
बीसीसीआय ला नम्र विनंती: जे
सुंदर!
नाद भरी... "जे पी मोर्गन"
BRAVO V V S!
ओ फारएन्ड शेठ, जरा कुठे
छान
क ड क
+१
मस्त रे!
मस्तच!!!! क्रिकेट बघण्याचा
मस्त!
छान..
मस्त लिहीलं आहेस फारेण्डा,
.
फार फार आवडलेला लेख.