पुन्हा एकदा भ्रमणगाथा-३
ह्याआधी-
पुन्हा एकदा भ्रमणगाथा-१
पुन्हा एकदा भ्रमणगाथा-२
नॉर्डलिंगनला आम्ही पोहोचलो तेव्हा पाऊस आणि वार्याचा जोर इतका वाढला आणि त्याच बरोबर हवेतला गारवाही! त्यामुळे आधी गरमागरम कॉफी प्यायलो. आम्ही ज्या गेस्टहाउसमध्ये उतरलो होतो ते रेल्वेस्टेशनाच्या अगदी १०० पावलांवरच होते, तरीही अजिबात गजबजाट नव्हता. आपल्या कोकणरेल्वेच्या लाईनीवरची लहानलहान स्टेशने कशी असतात? तसेच हे रेलस्टेशन होते.किंबहुना मार्सेलाने आम्हाला तेथे सोडताना स्टेशन दाखवले म्हणूनच तेथे रेल्वेस्टेशन आहे हे समजले. अशा ह्या निर्जन वाटणार्या गावात जेवणासाठी टेबलबुकिंगची गरज आम्हाला वाटली नसली तरी तिथल्या म्यानेजरणीला वाटली. तेवढी तरी गिर्हाइके नक्की करत असेल असे वाटून आणि एवढ्याशा गावात अजून काही हाटेल असेल का? अशी शंका येऊन आम्ही रात्रीच्या जेवणासाठी तेथेच टेबलही बुक केले. बायरिश खासियत "केझं स्पेट्झलं " तेथे मिळते ना एवढी खात्री मात्र करून घेतली. तिने दिलेल्या खोल्यात आमची सामानाची बोचकी टाकून फ्रेश होऊन गावात एखादी चक्कर मारावी असे ठरवत होतो पण पाऊस आणि वारा काही थांबायचे नाव घेत नव्हते.
शेवटी रोममध्ये रोमनासारखे वागावे ह्या धर्तीवर आम्ही बव्हेरियात बायरीशांसारखे वागायचे ठरवून खाली असलेल्या दालनात जेवण्यासाठी गेलो. तासादोनतासापूर्वी सामसूम असलेले ते रेस्तराँ आता माणसांनी फुलून गेले होते. एका टेबलावर काही टुणटुणीत आजोबा बियरचे मास घेऊन पत्त्यांचा डाव टाकत बसले होते. कुठल्या टेबलावर युगुलांचे गुटरगू चालले होते तर काही जण सहकुटुंब जेवायला आलेले होते. ते अवघे १०/१२ टेबलांचे दालन एकदम गजबजून गेले होते. आमच्या साठी आरक्षित टेबल होते म्हणून बरे नाहीतर परत खोलीत जाऊन काही वेळाने परत यायला लागले असते. रक्तवारुणी, बायरिश बियरच्या साक्षीने येथली खासियत केझं स्पेट्झलं,सलाड, चीजबरोबर बेक केलेल्या भाज्या आणि त्याबरोबर जर्मन जेवणात हवेतच असे बटाटे! असा बेत होता. भरपूर हादडल्यावर मात्र शतपावली नव्हे तर सहस्त्रपावलीची गरज भासू लागली. एव्हाना पाऊस थांबला होता आणि आठ वाजून गेले असले तरी उजेडही भरपूर होता म्हणून मग एक फेरफटका मारायला बाहेर पडलो.
१४व्या शतकात बांधलेल्या भरभक्कम दगडी भिंतीची वेस अजूनही ह्या गावाला आहे आणि त्या भिंतीच्या टेहळणी बुरुजांवरुन चालत गावाला प्रदक्षिणाही घालता येते.ह्या बुरुजांवर आणि गावातही जाण्यासाठी चार ते पाच मुख्य बुलंद दरवाजे आहेत. आता जरी लाकडी दरवाजे काढले असले तरी दगडी कमानी मात्र तशाच ठेवलेल्या आहेत. आमच्या हॉटेलापासून अगदी दोनच मिनिटाच्या अंतरावर डाइनिंगर टोअर म्हणजे डाइनिंगर दरवाजा होता. तेथे गेलो तर मोठ्ठा लाकडी जिना दिसला. चढून वर गेलो तर बुरुजावरच पोहोचलो की. त्या भक्कम ,दगडी बांधकामावरुन खालचे गाव पाहत चालत होतो. सूर्यास्ताची वेळ होतच आली होती. तो नेमका क्षण कॅमेर्यात पकडण्याचा प्रयत्न केला आणि मग मात्र त्या अंधार्या वेशीवरुन न चालता लॉपसिंगर दरवाज्याशी खाली उतरलो आणि मग रस्त्यावरुन फेरफटका मारत हाटेलावर परतलो तेव्हा १० वाजून गेले होते. खोलीवर आल्यावर परत एकदा गप्पांचा फड रंगला.
आज जी डोनाव रिस मधील नॉर्डलिंगन आणि आसपासची गावे आहेत त्या भागात सुमारे १.५ कोटी वर्षांपूर्वी साधारण एक किमी व्यासाचा अशनी ७०,००० किमी /तास वेगाने येऊन आदळला आणि तेथे उत्पात झाला. २.५ लाख हिरोशिमा बाँब एकत्र पडल्यावर होईल तसा विध्वंस तेथे झाला आणि १२ किमी व्यासाचा,एखादे मोठे सरोवर होईल एवढा मोठा खड्डा तेथे पडला. त्यावेळी निर्माण झालेल्या प्रचंड उर्जेने तेथल्या दगडधोंड्यांच्या ठिकर्या ठिकर्या तर झाल्याच पण कितीतरी मण दगडधोंडे वितळले आणि तो रस परत त्या खड्ड्यात भरला गेला आणि ते दगडांचे लहानसान तुकडेही परत त्या खड्ड्यात जाऊन बसले. खड्ड्याचा व्यास आता २५ किमी पर्यंत वाढला होता. त्या प्रचंड दाबाने ते वितळलेले, चुरा झालेले ,तुकडे ठिकर्या झालेले दगड एकमेकांवर घट्ट बसले आणि सुवेत नावाचा दगडाचा नवाच प्रकार तयार झाला. ह्या उत्पाताने आजूबाजूच्या साधारण १०० किमी च्या परिसरातली परिसंस्था नष्ट झाली आणि त्या खड्डयामध्ये एक सरोवर तयार झाले. काठाला वनस्पती उगवल्या,पाण्याजवळ प्राणीही आले.साधारण २ कोटी वर्षांमध्ये गाळ,चिकणमाती,वाळू इ.ने ते तळे भरुन आले अन्यथा युरोपातल्या मोठ्या सरोवरांपैकी ते एक झाले असते. हळूहळू तेथे झाडे वाढली, प्राणीजीवन सुरू झाले आणि जीवसृष्टीच्या सॄजनाची सुरूवात झाली.
हा सारा इतिहास तेथल्या बाल्डींगर दरवाज्याजवळ असलेल्या रिसक्रेटर म्युझियममध्ये जपून ठेवलेला आहे. तो पहायला अर्थातच आम्ही तेथे गेलो. इंग्रजी आणि जर्मन अशा दोन्ही भाषांत आलटून पालटून ह्या अशनीपाताची चित्रफित दाखवतात. तेथील संग्रहालयात वेगवेगळ्या प्रकारचे खडक,वेगवेगळ्या दाब आणि तपमानामुळे कसे तयार झाले हे सचित्र समजावले आहे आणि त्या, त्या प्रकारच्या खडकांचे नमुनेही ठेवले आहेत.त्या उत्त्पातात नष्ट झालेल्या प्राणीजीवनाचे पुरावे फॉसिल्सच्या रुपात तेथल्या म्युझियममध्ये जतन करुन ठेवले आहेत. प्रो. ए. एम. शूमाकर आणि डॉ. इ. सी. टी. चॉव यांच्या अथक संशोधनातून रिसचा हा भूभाग अशनीपातातून तयार झालेला आहे हे सिध्द झाले. त्यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ त्यांचे नाव ह्या चौकाला दिलेले दिसले.हे गाव म्हणजे भूगर्भशास्त्रज्ञांना अभ्यासाच्या दृष्टीने अगदी खजिनाच असावा असे वाटले.
येथले अजून महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे १९७० मध्ये नासाच्या अपोलो १४ आणि १७ मधील अंतराळवीर येथे फिल्ड ट्रेनिंग आणि चंद्रावरील जिऑलॉजिकल अभ्यासासाठीच्या पूर्वतयारीसाठी आले होते. त्यांनी येथल्या म्युझियमला औचित्यपूर्ण अशी भेट म्हणून 'चंद्रावरचा दगड' दिला आहे. तो पाहण्याची अर्थातच आम्हाला उत्सुकता होतीच! आमचे येथे येण्यामागचे ते ही एक महत्त्वाचे कारण होते.डोळे भरुन किती वेळ ते अद्भुत पाहत होतो पण शेवटी वेळेची मर्यादा होतीच ना.. नाइलाजाने त्या एरवी चित्रातच दिसणार्या,परिकथेत शोभणार्या गावातून घराकडे यायला निघालो.
अदितीला भारतात जाणार्या विमानात बसवून भ्रमणमंडळ काही काळ विश्रांती अवस्थेत गेलेले असले तरी पुढच्या ब्याचची नोंदणी चालू केलेली आहे,तेव्हा त्वरित संपर्क साधा.


याद्या
6802
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
देशपांडे
दिसले ब्वॉ
स्वातीताई,
हा हा हा !
हा भाग जरा
अरे तो
In reply to हा भाग जरा by ऋषिकेश
आम्ही जळून
In reply to अरे तो by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to आम्ही जळून by ऋषिकेश
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
In reply to +१ by नंदन
परत एकदा
छान
+१
In reply to छान by सुनील
हाही मस्त
स्वातीताई
मस्त
वा!
मस्त!!!
छानच!
धन्यवाद!
तिन्ही भाग
जर्मनीट्रीप
In reply to तिन्ही भाग by मिसळभोक्ता
सावधान
In reply to जर्मनीट्रीप by स्वाती दिनेश
स्वारी
In reply to सावधान by केशवसुमार
झकास!