बॉलिवूडी सिनेमांचा जर्मन रतिब इथल्या टेलिव्हिजनवर, सीडींमधून चालूच आहे अर्थात आता त्याची नवलाई संपली असली तरी कधी तरी एखादा सिनेमा पाहण्याची लहर येते. तसाच परवा त्या जोहरांच्या करणचा 'कभी अलविदा ना कहना..' लागला होता . नेहमीचेच खेळगडी , खानांचा शाहरुख, मुखर्जींची राणी , पिता बच्चनबरोबर पुत्र बच्चन (फ्री), वाडिया की झिंटांची प्रिती इ. इ... सिनेमाचे नाव केकता सारखेच करणही क ने सुरु करतो बहुदा आणि 'म्याच'नेच सिनेमा ओपन करायचा असतो असा त्याचा (गैर)समजही असावा बहुतेक.. तर यावेळी फूटबॉल म्याचने सिनेमा सुरु होतो.म्याच संपल्यावर त्या जोडीचा फोनावर संवाद तर दुसरीकडे दुसर्या जोडीचे लगीन होणार असते. ह्या लग्नाला आलेल्या आईला पहिल्याला घरी घेऊन यायचे म्हणून तो तिथे जातो आणि आई सोडून नवरीशी गप्पा मारत बसतो. लग्नाच्या धावपळीत नवरी आपल्याच घराच्या बागेतल्या बाकड्यावर शांत बसून दु:खी भाव घेऊन बसून राहिलेली.. 'सच्ची मोहब्बतच्या विचारात',, सिनेमाभर राणीबाई हेच भाव घेऊन वावरल्या आहेत आणि शाहरुख करणच्या कोणत्याही सिनेमात फक्त शाहरुख असतो.. त्या सिनेमातले पात्र कुठे होतो?
तर एकीकडे राणी आणि अभिषेकचे लगीन आणि दुसरीकडे शाहरुखला अपघात.. त्यात त्याच्या पायाला इजा आणि फूटबॉल करियर पाण्यात.. आता काय करायचं? सोप्पं आहे.. "४ साल बाद" अशी पाटी आणायची पडद्यावर आणि कोच व्हायचं ना फूटबॉलचा! ट्रेन करायला स्वतःचाच मुलगा आणि त्याची शाळा आहेच की.. प्रितीताई फॅशन मॅगेझिनच्या वरिष्ठ पदावर काम करत असल्याने त्यांच्याकडे मुलासाठी आणि नवर्यासाठी वेळ कमीकमीच असतो ना, मग मुलांच्या फूटबॉलम्याचने अजून एक रिळ भरायचे. बरं ह्या ताई काम करतात म्हणजे फक्त एका खुर्चीवर बसून रामपालांच्या अर्जुनशी "सर, मेरी शादी ,मेरा बच्चा , मेरे करियरके बिच नही लाउंगी.." असं म्हणतात मग लग्गेच दुसर्या क्षणी त्यांना खूप फायदा, त्यांचं मॅगेझीन जगातलं दुसर्या नंबराचं मासिक आणि पार्टी ऐवजी त्याला पहिल्या नंबरावर आणायचा प्रयत्न करा.. असा प्रितीताईंचा सज्जड दम.. बॉस रामपाल बाबळट्ट चेहरा करुन उभा! ( म्हणजे तसंही त्याला वेगळा अभिनय करायची काही गरज नाही) बॉसिण तर ह्याच ताई वाटतात..
आणि अमिताभ तर काय? साठी बुध्दी नाठी झाल्यासारखा सिनेमात वागतो, स्वत:च्या (खर्या आणि सिनेमातही झालेल्या) मुलासमोर ओल्या पार्ट्या,नाच गाणी आणि सेक्सी बायांबरोबर लघळ सीन्सचे फूटेज एवढ्याच रोलसाठी हा माणूस का वाया घालवला की तो स्वतःहून दोस्तीखातर वाया गेला ,हेच कळेनासं झालं सिनेमा पाहताना.. ह्या सिनेमात राणीबाई व्हॅक्यूमक्लिनर घेऊन सारखे घर साफ करतात, पतीदेव आले की दु:खीकष्टी चेहरा करुन प्रॉब्लेम डिस्कस करु म्हणतात.. प्रॉब्लेम काय आहे? ते समजतच नाही.. बरं, लग्नाला ४,५ वर्षं होऊन राणीताई मूल देऊ शकलेल्या नसतात पण हा त्यांचा डिस्कशनचा प्रॉब्लेम आहे असं कुठे सिनेमाभर वाटतच नाही. अमेरिका, इंग्लंड सारख्या देशात, मोठमोठ्या महालात राहणार्या ह्यांना एकदाही ह्या समस्येसाठी डॉक्टराकडे गेलेले दाखवले नाहीये.. असो.
परत एकदा पडद्यावर पाटी " ३ साल बाद.." आणि एका फडतूस योगायोगात राणी आणि शाहरुखची भेट.. फक्त पडद्यावर पाट्या येत राहतात.. ४ साल बाद, ३ साल बाद पण ह्यांची वयं मात्र तेवढीच दिसतात! म्हणजे काय? करत असतील डाएटिंग, व्यायाम आणि मेकअप.. तुम्ही नाही करत स्वतःला मेंटेन्ड.. ते करतात, जळता कशाला? असा स्वतःशी संवाद केला तरी मुलांचे काय? मुलाची उंची एवढेच नव्हे तर वयही तेवढेच ,आधीचेच वाटते... त्यात काहीच बदल/वाढ होऊ नये? मेंटेन्ड ठेवायचा किती हा सोस करणचा..
ह्म्म.. तर हे दोघं भेटतात आणि भेटतच राहतात आणि एकमेकांचे 'बेस्ट फ्रेंड' होतात! ह्या हिंदी सिनेमांमध्ये " वो मेरा बेस्ट फ्रेंड है! हम सिर्फ दोस्त है, और कुछ नाही.." ही वाक्य आली नाहीत तर फाउल धरतात काय न कळे!! आपापल्या असफल लग्नांच्या कहाण्या शेअर करता करता एकमेकांच्या प्रेमात पडतात मग आपापल्या नवराबायकोपासून चोरुन भेटतात.बरं ह्यांचे नवराबायकोही एकमेकांना (चोरुन न भेटता )नुसतेच भेटून आपली लग्नं कशी असफल आहेत, आपण कसा घटस्फोट घ्यायला हवा याची चर्चा करतात आणि त्याचवेळी आपल्या प्रेयसीसाठी आणलेली फुलं आणि प्रियकराने दिलेला गुलाब आपापल्या नवराबायकोला दिला जाऊन त्यांना प्रेमाचा खोटा संदेश दिला जातो आणि घटस्फोट क्यानसल...
पण ह्याची आई आणि तिचा सासरा जे एकमेकांचे सिर्फ दोस्त असतात,एकदा एका सबवे स्टेशनबाहेर ते दोघं ह्या दोघांना एकमेकांनी पकडलेल्या अवस्थेत पकडतात आणि .. मग सासर्याला एकदम हुकुमी हार्ट अॅटेक! आपल्या 'नवर्यापासून दूर अपने प्यारके पास जा' .. असा आपल्या बहु कम बेटीला संदेश देऊन सासरा पंचत्त्वात विलिन. दोघांच्याही नवराबायकोला आपापल्या जोडीदारांचे रंग उधळणं माहितच नसतं.. उपरती होऊन राणी आणि शाहरुख आपलं प्रेम संपवून आपापल्या जोडीदारांबरोबर पक्षी अभिषेक आणि प्रिती बरोबर उरलेलं आयुष्य सुखात काढण्याचं ठरवून एकमेकांचा निरोप घेतात आणि 'झूट की बुनियाद'पर शादी रहायला नको म्हणून आपापल्या जोडीदाराला ज्या प्रेमप्रकरणाची माहितीही नसते ते सांगून आगीत तेल ओततात. दोघेही घराबाहेर काढले जातात आणि त्यांना मात्र वाटत राहतं ते आपापल्या संसारात सुखात आहेत.
परत एकदा '३साल बाद'.. मुलासकट सार्या पात्रांची वय परत एकदा फ्रीज झालेली आणि अमिताभ हारवाल्या फोटोत जाऊन बसलेला.. राणीला भेटायला अभिषेक येतो आणि सांगतो मी लग्न करतोय ,तू ह्या लग्नात करवली हो बाई.. माझं ह्या दुनियेत तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे? ही बया आपली चमचम साडी नेसून करादिवा घेऊन त्याच्या लग्नात मिरवायला तयार.. पण चेहर्यावर मात्र तेच ते सिनमाभरचे दु:खीकष्टी भाव! मुलीच्या बाजूकडून प्रितीबाई आणि त्यांचा बॉस कम होणारा नवरा लग्नाला येतात आणि माजी नवर्याच्या लग्नात करवली राणी पाहून माजी सवत प्रिती तिला स्टेशनात जाऊन शाहरुखला थांबवण्याचा सल्ला देते कारण तो 'नौकरीके वास्ते शहर छोडके दूर' जाणार असतो. मग राणी सुसाट पळत स्टेशनात.. गाडी सुटताना शाहरुखकडे ती विध्द नजरेनी पाहते. गाडीचे दरवाजे बंद असल्याने नाइलाजाने तो तिला हात देण्यासाठी दारात उभा राहू शकत नाही आणि चेन खेचतो ,दोघांची भेट होते आणि ते दोघं एकत्र येतात..
दोन लग्न मोडून तीन संसार वसवताना ह्या ३,४ तासांच्या सिनेमात त्या शाहरुख, प्रितीच्या १०/१२ वर्षाच्या कोवळ्या, संवेदनाक्षम वयातल्या मुलाचा कुठे विचारच नाही.. फक्त 'सच्चा प्यार'म्हणे ! बाकी सब झूट?? सगळाच "आणंदीआणंद"!!! तर तात्पर्य काय? आपले ४ तास वाया घालवून 'कभी यह सिनेमा ना देखना'...
वाचने
12513
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हो ना...
In reply to मस्त by नंदन
लेख फार आवडला.
प्रत्येक
आग्गायायायाया
जबर्या
हाहाहा..
हेच
In reply to हाहाहा.. by शाल्मली
छान
हा हा हा ...
हसून हसून
आपली
डबल मजा है...
अगदी हेच!
In reply to डबल मजा है... by विकास
धमाल
मी हा
मी हा
त्यातलं
In reply to मी हा by प्राजु
तर
क्या बात है !!
खरोखर!?
स्वाती, लै
पिक्चर
लै भारी!
खल्लास
=))
जबरा...
कमाल आहेस
अरे वा!
In reply to कमाल आहेस by ३_१४ विक्षिप्त अदिती
धन्यवाद,
स्वाती, तु
आम्ही पाहीला ना ..
भन्नाट
भरि एक नम्बर
असले चित्रपट
मस्त इनोदी
मस्त इनोदी