Skip to main content
लेखक श्वेता२४ यांनी शुक्रवार, 16/10/2026 11:19 या दिवशी प्रकाशित केले.

 

सहज मात्र


सहज लिहून पाठवतोस तू
जे सूचतं तुझ्या मनात...
मी मौनात घुसमटते अन्
शोधत राहते शब्द मात्र...

 


सहज फिरतोस कुठे कुठे
अन् म्हणतोस, "येशील का?"
मनपाखरू झेपावतं पण...
पाय तिथेच चौकटीत मात्र...

 


सहज गातोस गाणे कधी
तालसुरांत बरसून जातोस
स्वरधारांच्या वर्षावात मी
चिंब भिजत राहते मात्र...

 


सहज येऊन बसतोस समोर
आणि बोलतोस असंच काही
दिवस जातो कसा तरी
रात्र सरत नाही मात्र...

 


अशा अनेक सहज गोष्टी
सहजपणेच केल्या असशील
त्यानंतर जगणे माझे
सहज राहिले नाही मात्र...!!

 

- श्वेता २४ © 2026

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 346
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

सहज बनवतेस  जेवण,

सुग्रास,सुंगध दरवळत रहातो

पोट केव्हांच भरते !

बोटे  चाटत रहातो मात्र.......🤣

 

आवडली.


सहज करून जातेस,

सुग्रास,सुंगध दरवळत रहातो

पोट केव्हांच भरते !

बोटे  चाटत रहातो मात्र.......🤣

 

आवडली.

 

विडंबन करू क्या,कच्चा माल चांगला आहे.


सहज गातोस गाणे कधी
तालसुरांत बरसून जातोस
स्वरधारांच्या वर्षावात मी
चिंब भिजत राहते मात्र...

आवडली कविता. -दिलीप बिरुटे


किती सहजपणे मनातलं व्यक्त केलं आहे! काही क्षण आपल्यासाठी सहज असतात, पण समोरच्याच्या मनात तेच क्षण भावनांचं वादळ उठवून जातात… ❤️


या कवितेपासून प्रेरणा घेऊन इथे चार ओळी खरडल्या आहेत. 
 


In reply to by कांदा लिंबू

माझी कविता इतकी प्रेरणादायी ठरेल असं वाटलं नव्हतं...🤣

काही क्षण आपल्यासाठी सहज असतात, पण समोरच्याच्या मनात तेच क्षण भावनांचं वादळ उठवून जातात…

अगदी कवितेच्या मूळ भावनेला हात घातलात तूम्ही...

आणि 'त्याच्या' दृष्टीकोनातून लिहीलेली तुमची कविताही फार आवडली...


सहज कोणी लिहून जाते

मनाची दारे उघडून देते.

कल्लोळ वाहून जातो

होतो मी  नि:शब्द मात्र

 

 

छान कविता आहे ही


In reply to by चौथा कोनाडा

आपल्याला कविता आवडली हे वाचून आनंद झाला.

प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद


In reply to by श्रीगुरुजी

असुदेहो गुरुजी...

सगळीच विडंबने एकापेक्षा एक आनंद देणारी आहेत...

शिवाय वेगळ्या दृष्टिकोनातून लिहीलेल्या कविता व प्रतिसादातल्या ओळी देखील कौतुकास्पद आहेत..

सगळे लिहीते झाले व आस्वाद घेत आहेत हे जास्त महत्वाचे...निमित्त काही का असेना...


In reply to by श्वेता२४

सहमत. 

 

रूक्ष,विखारी,भरकटलेल्या अर्थ हिन राजकिय काव्य काव पेक्षा हलके फुलके काव्य ,विडंबन भावते. 

प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद. 

 


तुम्हीं पण बी बीयाण ,खतपाणी टाकलत की?

 

विखारी,बिन बुडाच्या टिका टिप्पण्या करण्यापेक्षा विंडबन बरे ना....


सहज फिरतोस कुठे कुठे
अन् म्हणतोस, "येशील का?"
मनपाखरू झेपावतं पण...
पाय तिथेच चौकटीत मात्र..

 

कविता आवडली.


सरळ.. नितळ.. सुंदर कविता...

मनाचे कवडसे जणू... जे हळूच त्याच्या प्रत्येक गोष्टीत डोकावत राहतात.. आणि त्या कवडश्यांना सोनेरी रंगाची झालर कधी लागते, हे त्यांनाही कळत नाही...

- गणेशा


In reply to by गणेशा

मनाचे कवडसे जणू... जे हळूच त्याच्या प्रत्येक गोष्टीत डोकावत राहतात.. आणि त्या कवडश्यांना सोनेरी रंगाची झालर कधी लागते, हे त्यांनाही कळत नाही...

 

क्या बात है!! मस्त लिहिलय..