Skip to main content
लेखक श्वेता२४ यांनी शुक्रवार, 16/10/2026 11:19 या दिवशी प्रकाशित केले.

 

सहज मात्र


सहज लिहून पाठवतोस तू
जे सूचतं तुझ्या मनात...
मी मौनात घुसमटते अन्
शोधत राहते शब्द मात्र...

 


सहज फिरतोस कुठे कुठे
अन् म्हणतोस, "येशील का?"
मनपाखरू झेपावतं पण...
पाय तिथेच चौकटीत मात्र...

 


सहज गातोस गाणे कधी
तालसुरांत बरसून जातोस
स्वरधारांच्या वर्षावात मी
चिंब भिजत राहते मात्र...

 


सहज येऊन बसतोस समोर
आणि बोलतोस असंच काही
दिवस जातो कसा तरी
रात्र सरत नाही मात्र...

 


अशा अनेक सहज गोष्टी
सहजपणेच केल्या असशील
त्यानंतर जगणे माझे
सहज राहिले नाही मात्र...!!

 

- श्वेता २४ © 2026

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 136
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

सहज बनवतेस  जेवण,

सुग्रास,सुंगध दरवळत रहातो

पोट केव्हांच भरते !

बोटे  चाटत रहातो मात्र.......🤣

 

आवडली.


सहज करून जातेस,

सुग्रास,सुंगध दरवळत रहातो

पोट केव्हांच भरते !

बोटे  चाटत रहातो मात्र.......🤣

 

आवडली.

 

विडंबन करू क्या,कच्चा माल चांगला आहे.


सहज गातोस गाणे कधी
तालसुरांत बरसून जातोस
स्वरधारांच्या वर्षावात मी
चिंब भिजत राहते मात्र...

आवडली कविता. -दिलीप बिरुटे


किती सहजपणे मनातलं व्यक्त केलं आहे! काही क्षण आपल्यासाठी सहज असतात, पण समोरच्याच्या मनात तेच क्षण भावनांचं वादळ उठवून जातात… ❤️


या कवितेपासून प्रेरणा घेऊन इथे चार ओळी खरडल्या आहेत. 
 


In reply to by कांदा लिंबू

माझी कविता इतकी प्रेरणादायी ठरेल असं वाटलं नव्हतं...🤣

काही क्षण आपल्यासाठी सहज असतात, पण समोरच्याच्या मनात तेच क्षण भावनांचं वादळ उठवून जातात…

अगदी कवितेच्या मूळ भावनेला हात घातलात तूम्ही...

आणि 'त्याच्या' दृष्टीकोनातून लिहीलेली तुमची कविताही फार आवडली...


सहज कोणी लिहून जाते

मनाची दारे उघडून देते.

कल्लोळ वाहून जातो

होतो मी  नि:शब्द मात्र

 

 

छान कविता आहे ही