शब्द झाले मोती : ३
जवळजवळ १०-११ वर्षे झाली, “शब्द झाले मोती” लिहायला घेतलेलं ते...
आता मागे वळून पाहताना वाटतं,
माणूस ३० मधून चाळिशीकडे येताना किती स्थित्यंतरांतून जातो...
या भागात मात्र मला चाळिशीतल्या माझ्या मनाला उमटणारे भाव शब्दांत उतरवायचे आहेत. जसं वाटेल, तसं लिहिणार आहे...
आधी वाटलं होतं, FIRE, Finance, Health, चाळीशी, अशा माझ्या आत्ताच्या विचारांवर लिहावं.
पण इतक्या वर्षांनी पुन्हा लिहायला घेतलं आणि आठवणींचे दरवाजे आपोआप उघडू लागले...
मग म्हटलं,
“शब्द झाले मोती” म्हणजे मनात येईल ते.
त्याला कसला बांध नाही...कसल्या मर्यादा नाहीत... ते म्हणजे माझं मुक्त... स्वैर... स्वच्छंदी जीवन.
म्हणून विषयाला वर दिले तसे बांधणार नाही..जे वाट्टेल ते लिहिणार.. बरेच से माझे खरे जीवन.. खरी कहानी..
खरे तर 12-15 तास कामात busy असल्याने कसलाच वेळ मिळत नाही.. पण आता ठरवले आहे बस रोज 15 मिनिटे तरी लिहिणार मी माझ्याच साठी फक्त.
या धाग्यात मुद्दाम मागच्या भागांच्या लिंक देत नाहीये.
कारण हा कदाचित या वरील माझा शेवटचा थ्रेड असू शकतो.
म्हणून मागचं जे काही चांगलं आहे, तेही या धाग्यात पुन्हा रिपीट करेन...
कारण काही आठवणी पुन्हा जगाव्याशा वाटतात,
आणि काही शब्द...पुन्हा एकदा मोती व्हावेत असं वाटतं.
आणि शेवटी एक विनंती...
कृपया रिप्लायमध्ये
“छान... सुंदर...” असले रिप्लाय नकोच, मला प्रतिसाद संख्या वाढवायची नाही.
तुम्ही लिहा हा आग्रह अजिबात नाही...कारण यावेळेस हि माझी डायरी आहे.. आणि हे लिखान माझ्याचसाठी असणार
कारण यावेळेस
मलाच माझं लिहायचं आहे...
जे वाटेल तसं.
- शब्दमेघ.. मुक्त... स्वैर... स्वच्छंदी जीवन (गणेशा)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया
मेघ - १
प्रिय वसुंधरे,
तू म्हणशील,
“हे ‘प्रिय’ काय रे बेफिकीर, टुकार ढगा?
एकतर तुझा स्वभावच मुळात कुठेही भरकटणारा… तुला पाहिजे तसा… स्वैर!”
पण असूदे… मी असाच.
आज मला तुझी आठवण आली.
का नाही येणार?
आषाढ सुरू होऊन दोन-तीन दिवस होऊन गेलेत…
आषाढ माझा आवडता महिना.
तू नाही का म्हणत असतेस मला—
“काळा काळा कापूस पिंजला रे…”
मी असाच अवखळ… भारदस्त…
आणि तू - हळवी.
मी कोसळलो की तू माझ्याकडे स्तब्ध होऊन पाहत राहतेस… मनापासून.
आणि मग तुझा तो अबोल मृद्गंध सगळीकडे पसरतो
हवा हवासा… मनात भिनणारा.
तूही नटतेस, हिरवा शालू परिधान करून…
आणि पुन्हा असा वेंधळा मी दिसलो,
की माझ्यावरती तू डोळे वटारून पाहतेस.
मग मीच ओशाळतो…
माझा काळा रंग तुझ्या हिरव्या शालूला शोभत नाही, असं समजून मी पांढऱ्या शुभ्र रंगाची दुलई घेऊन येतो तुझ्याकडे.
तेव्हा मात्र माझी एकच इच्छा असते,
मी सोडून तुला कोणीच पाहू नये…
तू फक्त माझीच असावी.
आपलं हे असंच असतं…
मग एखादा उनाड वारा मध्येच घोंगावतो,
विजेच्या तारा तुटतात…
तू चिंब ओली…
आणि मी धूसर, अस्पष्टसा…
मी मग दूर जाताना,
तुझ्या पानाफुलांत माझे श्वास अडकतात - अध्ये-मध्ये.
मला भास होतो…
तू आवाज देते आहेस असा.
मागे वळून पाहतो…
तर दिसते फक्त क्षितिजरेघ.
तुझ्या-माझ्यामधली…
कदाचित तुझ्याही हातात
ही क्षितिजरेघच सापडते…
माझ्या ऐवजी.
तुझाच मेघ…
-शब्दमेघ.. एक मुक्त स्वैर स्वछंदी जीवन.. (गणेशा)
मेघ - २
प्रिय वसुंधरे,
आज वाटतंय… तुझ्यापाशी यावं… मनमोकळं.
तुझा हात घट्ट पकडावा,
तुझ्या मिठीत शिरावं…
शेवटच्या श्वासापर्यंत.
अस्तित्वच संपवून घ्यावं… तुझ्या मिठीत.
तुला जाणवतील माझ्या हृदयाची अनियमित स्पंदने…
मध्येच तुला तिथे चिमण्यांची किलबिल ऐकू येईल,
काही रंगीत रंगांच्या छटा मध्येच दिसतीलही…
मी मात्र डोळे बंद करून घेतलेले असतील.
बंद डोळ्यांत पाणी लगेचच साठत जातं…
आणि त्या डबडबलेल्या डोळ्यांत
किती आठवणी तरंगत असतात…
काय सांगू?
शाप आहे माझ्या डोळ्यांना…
ते उघडले की पाणी उडून जातं.
म्हणूनच कदाचित
तू हवेचं कुंपण घातलं आहेस माझ्याभोवती…माझ्याचसाठी.
पण आवडीच्या गोष्टींना
अशी कुंपणं का घालावी लागतात गं?
माहीत नाही…
पण तुझ्या वाऱ्याचे हात
तू माझ्याभोवती गुंफून ठेवलेले असतात…
मी मात्र तरीही पाझरतो…
आणि निघून जातो.
मागे उरतात फक्त
तुझ्या हिरव्याकंच गवताच्या भाळी माझ्या पाऊलखुणा…
कधी कधी…
दवबिंदू ल्यालेल्या.
तुझाच मेघ…
-शब्दमेघ.. एक मुक्त.. स्वैर.. स्वच्छंदी जीवन (गणेशा)
मेघ - ३
प्रिय वसुंधरे..
मी एक ढग… साधा ढग.
तुझा ढगोबा.
कधी कधी तुझा वाऱ्याचा हात माझ्या गालावरून अलगद फिरू लागला की,
मध्येच मला आईची आठवण येते…
ती पण मला ढगोबाच म्हणायची.
तू मात्र माझी सखी… मैत्रीण.. प्रिय.
एकदा आठवतंय?
आपल्यात खूप भांडणं झाली होती… त्या समुद्रावरून.
तो अजूनही तुझ्या पायाशी लोळण घेतो बघ…
आपल्याला तसं जमत नाही.
आपला स्वभावच असा-
हट्टी.
तू म्हणतेस, मी खूप कठोर बोलतो… कधी कधी.
खरंय.
“तुझ्या-माझ्यात नातं असलं,
तरी त्यात एक व्यवहार आहे…
साधा वाटलो तरी माझ्याकडे तलवार आहे,
माझ्या तरल शब्दांनाही धार आहे…”
असंच काहीतरी मी बोलत गेलो होतो… आणि मग निघून गेलो, दूर… डोंगरापलीकडे.
मग मात्र तू रडत बसलीस.
मी पाहिलं होतं तुला…
हलकेच.
पण मी रागावलो की
माझा हि मी राहत नाही.
नंतर मात्र…
हृदयात हलकेच एक कोवळी वीज चमकते, तुझ्या ओढीची.
मग भांडणं विसरून
मी पुन्हा तुला पाहायला येतो.
तू मात्र अजूनही तशीच…
रागावलेली.
मग हलकेच
मी एखाद्या झाडावर चढून बसतो.
तू बोलत नाहीसच.
मग मी पालखी बनून येतो
तुझ्या दारी…
तुला मनवायला.
तू माझ्याकडे पाहतही नाहीस.
मग पानाफुलांत जाऊन
तुझ्यासाठी गाणं गातो…
तरी तू माझ्याकडे दुर्लक्षच करतेस.
मग वेगवेगळे आकार घेतो,
तुला हसवायला.
तू मात्र चिडलेलीच असतेस.
तुला रंगांचं खूप अप्रूप आहे,
पहिल्यापासूनच.
मग मी सूर्याकडे जातो…
त्याची मदत घेतो.
तो माझ्यावर
रंगांचा वर्षाव करू लागतो-
संध्याकाळी.
मी काळा असलो तरी मला मरून लाल रंग आवडतो…आणि तुला हिरवा.
म्हणून मी लाल रंगाचीच उधळण करतो.
तुला काय वाटतं, काय माहीत…
तू तुझ्या हिरव्या साडीत
गाल फुगवून उभी असतेस.
पण तुला माहीत आहे ना-
मला हिरवी साडी खूप आवडते, पहिल्यापासून.
मग अलगद
मी तुझ्याभोवती पिंगा घालतो…
आणि तुझे हात
माझ्या हातात घेत,
ताऱ्यांचं रूपडं बघत
तिथेच बसतो…
काहीही न बोलता.
तुझ्याचसाठी.
तुझाच मेघ…
-शब्दमेघ.. एक मुक्त.. स्वैर.. स्वछंदी जीवन.. (गणेशा)
खूप साऱ्या शुभेच्छा
आजिबत विश्बास बसेना कि शब्द झाले मोती चा याआधीचा भाग पाच वर्षांपुर्वी आला होता. बापरे! कस बघावं याकडे कळेना. आयुष्यातली पाच वर्षे कमी झाली. मुलं पाच वर्षांनी मोठी झाली, की अजून काही. आयुष्याची पाच वर्ष खर्च झाली तरी अक्कल तेवढीच आहे तिच्यात काही वाढ होईना. आता मुलांकडून वारंवार तसंही ऐकायला मिळतय की मला काहीच कळत नाही म्हणून. खरंच, कधी अक्कल यायची काय माहित.
असो, पुन्हा एकदा हे शब्दमोती वेचायला मजाच येणार आहे. जमेल तसं जमेल तितक लिहिण्याचा प्रयत्नही करीन.
गणेशाभाऊ, खूप साऱ्या शुभेच्छा. भेटू पुढच्या प्रतिसादात. :)
सं - दी - प
मेघ-वसुंधरेच्या…
मेघ-वसुंधरेच्या शब्दमोत्यांतल्या गुजगोष्टी आवडल्या. इतना ना मुझसे तू प्यार बढ़ा हे सुंदर गाणे आठवले.
👌आणि दीवाना हुआ बादलसावन की…
In reply to मेघ-वसुंधरेच्या… by श्वेता व्यास
👌आणि
दीवाना हुआ बादल
सावन की घटा छाई
ये देखके दिल झूमा
ली प्यार ने अंगड़ाई
दीवाना हुआ बादल...
शम्मी कपूर एव्हरग्रीन गाणे!
मेघ -४ (समुद्र)
मित्र मेघ आणि वसुधा
हो समुद्र बोलतोय, आणि या ढगा सारखं मला प्रिय.. सखी.. वगैरे बोलायला जमत नाही.. आणि बोलणार हि नाही..
आणि माझ्यावरून भांडण?
म्हणूनच मला वाटतं…
कुणी जवळ नसावं.
जगावं असं एकटं… शांत.
कोणीच नसावं भोवती.
सगळीकडे असावं धुकं… धुकं…आणि मनाशी मनाचेच चालावेत खेळ.
अशावेळी हा हट्टी ढग माझ्याकडे येतो आहे, असा मला मग भास होतो.
तो कायम हुल देत राहतो…
त्याची सरसुद्धा
“आली… आली…” म्हणता म्हणता येत नाहीच. जसं आपल्या इवल्याशा चिमटीत आकाश येत नाही… आणि रात्री दिसणारे तारे मनाच्या खिडकीतून आत झिरपत नाहीत…
अगदी तसाच हा भास होतो
या वेंधळ्या ढगाचा.
मग मी माझ्या किनाऱ्यावर येतो.
वाळूत रुतलेली होडी
तिथेच असते.
उंचच उंच झाडं दिसतात मला…
आणि माझ्या संगीताच्या तालावर मंत्रमुग्ध झालेली वसुधा दिसते.
मला आवडते वसुधा.
मी तासनतास किनाऱ्यावर
तिच्याशी बोलत बसतो.
तिच्या उडणाऱ्या बटा…
किती सुंदर दिसतात!
मला ती चंदेरी साडीत आवडते.
त्या ढगाला मात्र
ती हिरव्या साडीत आवडते.
चंदेरी साडीत तर
ती मला एकदम जलपरीच वाटते.
ती मला संगीत वाजवायला सांगते…
मग मी एका लयीत
माझ्या लाटांनी सप्तसूर छेडतो.
आणि मग वसुधा
मेघमल्हार गाते…
मेघमल्हार गायल्य मुळ मेघ येतो मग…
हळूच.. तिच्याकडे..
कदाचित तो वाटच पाहत असतो-
कधी ती त्याला बोलावते म्हणून.
तो येताना चंद्राचा संदेश घेऊन येतो…माझ्यासाठी.
मीही हसतो मग…त्याला मिठी मारतो.
आताशा तरीही का वाटतं मला-
कुणी जवळ नसावं.
जगावं असं एकटं… शांत.
कोणीच नसावं भोवती.
सगळीकडे असावं धुकं… धुकं… आणि मनाशी मनाचेच चालावेत खेळ.
-समुद्र
-शब्दमेघ
एक मुक्त… स्वैर… स्वच्छंदी जीवन ( गणेशा)
सुंदर कल्पना
इतकी सुंदर की इथे प्रतिक्रियांमध्ये लपून राहण्यापेक्षा प्रत्येक वाचकाने स्वतंत्र धागे तयार करुन टाकावे असे वाटते.
सिमटी हुयी बुंदे......
हॅलो,मी सागर बोलतोय.
कोण पाहिजे?
वसुधा आहे का?
नाही, ती सरिता बरोबर शाॅपिंग ला गेलीय.
केव्हां येणार?
सागर,तीला आकाशाने लंच करता समुद्र मधे बोलवलंय.
समीर बरोबर लाॅग ड्राईव् ला जायच म्हणत होती. तिकडून बहुतेक निशा कडे जाईल.
सागर हिरमुसला.
पलीकडून ,हॅलो,सागर हॅलो...... भ्रमणध्वनी वाजत होता.
सागराने तिकडे लक्ष दिले नाही.
तेव्हढ्यात डोअर बेल वाजली.
मारगारिटा आणी शेरी दोघी दरवाज्यात उभ्या होत्या.
मागे बी. मेरी उभी होती.
मेरी तू कधी आलीस?
त्यांच्याशी गप्पा मारता मारता उषा कधी आली कळालेच नाही.
पुन्हा भ्रमणध्वनी वाजला.
हाय,हनी सागर ,मी वसू बोलतेय.
सागर काहीच बोलला नाही.
ओ,....डार्लिंग यू मिस्ड मी.....
नो. हनी, मारगारेट,बी मेरी ॲण्ड शेरी वाॅज विद मी....
भ्रमणध्वनी कट झाला.......
(गणेशाभाऊं क्षमस्व, )
मेघ भाग ५
प्रिय वसुंधरे,
“तू हसलीस की फुले उमलू लागतात…” - तुझ्या ओठांवर.
आणि मग माझे मन फुलपाखरू होते…
अलगद, हळुवार, ते तुझ्याजवळ येते. तुझ्या फुलांवर नाजूकसा स्पर्श करते…त्या स्पर्शात एक विलक्षण कोमलता असते.
आणि मग तुझा रंग मला लागल्याचा आणि फुलापाखराच्या पंखासारखा माझा रंग तुला लागल्याचा मला उगाच भास होतो..
तेवढ्यात तूझ्या वाऱ्याच्या हाताने तू मला अलगद बाजूला करतेस… आणि तुझ्या त्या टपोऱ्या डोळ्यांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकतेस.
मी माझ्याकडेच पाहतो… ओशाळल्या नजरेने मी तसाच माघारी फिरतो.. पांढरी शुभ्र दुलई ओढून मग मी
पुन्हा तुझ्याकडे येतो… तुझ्या पानाफुलांमध्ये श्वास अडकतात माझे. पण तू पुन्हा मला बाजूला करतेस…
चिडवतेस…
आणि पुन्हा गुणगुणतेस,
“काळा काळा कापूस पिंजला रे…”
मग मी मात्र रागावतो तुझ्यावर, तसाच सताड सूर्याकडे निघून जातो मी.
तो मात्र हे सारे पाहतच असतो…माझ्यासाठी तो मग पंचेचाळीस अंशांच्या कोनातून निळ्या आकाशाच्या कॅनव्हासवर इंद्रधनुष्याची एक कमान उमटवतो.
मी खूप आनंदित होतो.
पुन्हा तुझ्याकडे धावत येतो…
आणि अभिमानाने तुला ती इंद्रधनूची कमान दाखवतो.
पण तू…
तू अजूनही मला चिडवतच असतेस.
हसत म्हणतेस -
अरे ढगा...“या इंद्रधनुष्याच्या रंगांमध्ये
तू कुठे आहेस?”
आणि पुन्हा हसतेस…
यावेळी मात्र
मी खरंच चिडतो.
रागावतो तुझ्यावर.
“आता मी तुझ्याशी मुळीच बोलणार नाही…”
असं म्हणून पुन्हा निघून जातो
दूर… क्षितिजापल्याड.
क्षितिजावरती सूर्य, माझ्या आवडत्या मरून रंगाची शाल पांघरून जणू ध्यानस्थ बसलेला असतो.
माझ्या पावलांचा हलकासा आवाज होताच
तो डोळे उघडून मला पाहतो…
आणि मग तो माझा हात हातात घेऊन मला थांबवतो... क्षितिजावर असंख्य रंगानी तो मला न्हावू घालतो... जणू हे रंग लेवून मी चमकत असतो क्षितिजावरती...
आता माझा मीच राहत नाही..
आणि तेवढ्यात…
वसुंधरे, मला तुझा आवाज ऐकू येतो.
तू मला हाक मारत असतेस.
मी तसाच, तुझ्याकडे परत येतो.
नदीच्या काठावर, तू माझी वाट पाहत असलेली दिसतेस.
हळुवारपणे तू तुझ्या हिरव्या साडीचा पदर सावरतेस…
आणि मग… तू मला गच्च मिठी मारतेस.
काहीही न बोलता.
फक्त हसतेस…
आणि तू हसली की पुन्हा तुझ्या ओठांवर फुले उमलतात…
आणि त्या फुलात मला दिसतात माझेच रंग.. माझेच रूप.
पहाटे, तुझ्या कुशीतून हलकेच मी निघतो.. थोडास पाझरतो तुझ्या भाळी दवबिंदू होऊन.. आणि तुला 'जातो' म्हणतो ..
तु नेहमी प्रमाणेच हळवी पाहत असतेस माझ्याकडे..
आणि म्हणते.. जातो नाही 'येतो' म्हण ना रे...
तुझाच मेघ
- शब्दमेघ.. एक मुक्त..स्वैर.. स्वछंदी जीवन.. (गणेशा)
२४-०९-२०२६
क्षितिजापार माझिया मनाचा…
क्षितिजापार माझिया मनाचा धावा
ज्याच्या त्याच्या स्थावर सत्ता
वाढला भोवती दोषांचा कावा
ओंजळीत माझिया सुगंधी गुलदस्ता....१
दारी माझिया वाजे कृष्णपावा
निवडुंगीच्या रानात हरवला पत्ता
तुडवल्या मळकट रोज वाटा
राशी ओतती माणिकांच्या,शब्दची भ्राता....२
-सरीवर सरी
(भक्ती)
माफ कर साहिल,तुला किती…
माफ कर साहिल,
तुला किती निरनिराळे
लेबल लावले गेले...
पण एक माणूस म्हणून
तुला समजून घेणे तर दूरच,
सहानुभूती देणेही दूरच...
तुझ्या मरणाचे लचके
समाज घेत राहिला,
आणि तुझ्या अस्तित्वावर
आपापले अर्थ लादत राहिला...
माफ कर साहिल!
माफ कर जमुईच्या षोडशा,तुला…
माफ कर जमुईच्या षोडशा,
तुला बिहारमध्ये
स्त्री म्हणून जन्म मिळाला...
पण स्वातंत्र्याचा आस्वाद देणे तर दूरच,
इज्जत देणेही दूरच...
तुझ्या कोवळ्या शरीराला
कुस्करत राहिला
तोच पितृसत्ताक समाज,
ज्याने तुझ्या जन्माआधीच
तुझ्या आयुष्याची
मर्यादा ठरवून ठेवली होती...
माफ कर जमुई षोडशा!
-भक्ती
आला गणु एकदाचा, मागच्या…
आला गणु एकदाचा, मागच्या सारखाच तो आणि मी एकत्रच आलो, काय विलक्षण योगायोग आहे ना.
गणु येताना दर वेळी हि टुम घेऊन येतो, मलाही तेवढंच बरं वाटतं, अगदी भर दुपारी एखाद्या निरव शांत जागी नदी च्या काठाला स्वतः बरोबर पोटभर गप्पा मारल्या सारखं वाटतं. म्हणजे कसं एकाच वेळी एकदम मन भरलं आणि रिकामं सुद्धा झालेलं अशी जी तरल भावना असते तसं च काही.
मागचे काही महिने, महिने कशाला वर्ष म्हणा हवी तर, कुठे तरी हरवलो होतो मी. इथं चे होतो, तीही चालता चालता चालत खुप लांब निघून चाललो होतो.
आधी वाटत होतं आपल्या नियंत्रणात आहे सगळं. कि कधीही वाटलं तरी आपण परत मागे फिरून आहे तिथे येऊन पुन्हा सुरु करु. पण माझी चाल कधी मलाच फरफटत पार पार लांब घेऊन गेली कळलं सुद्धा नाही.
आज मला स्वतःला कळेना कि नक्की कुठे चाललो आहे, का चाललो आहे. कुठं तरी थांबायला वाटतं पण स्वतःच्याच चालीचा रेटा दोन क्षण थांबून हि चाललेली फरफट सावरायला देईल तर शप्पथ.
अजून खुप काही आहे पण ते आता बोलावं किंवा असं च पुढे व्हावं हे ठरवून झालं की मग पुन्हा एकदा भेट.. होईल कदाचित... किंवा मग असंच चालायचं. चालत रहायचं.
गणेशा, तुमचे व इतरांचेही…
गणेशा, तुमचे व इतरांचेही शब्द-मोती पाणीदार आहेत. अजून येऊ द्या.
शांतीपरतें नाहीं सुख
तसा एफ.एम सकाळपासूनच सुरु असतो.पण माझे चिंतनाचे विषय वेगवेगळे असल्याने माझे आपले दुसरे श्रवण सुरु असते😄.पण कधी कधी काही गाणी जुनीच खूप काळाने ऐकायला मिळतात,एक सुखद झुळूक रुंझी घालते.कधीही न ऐकलेली मधुर गाणीही ऐकून नाविन्य आनंददायी वाटते.
असाच एक सुंदर अभंग काल ऐकला.वाह किती गोड गायला आहे लतादीदी यांनी असे मनात शांती दाटली.
यु ट्यूबवर पुन्हा शोधला.नेहमीप्रमाणे गॉड गळ्याच्या सुमन कल्याणकर यांचा आवाज लता मंगेशकर यांचा समजण्याची चूक घडलीच होती😊
शांतीपरतें नाहीं सुख ।
येर अवघेंची दुःख ॥१॥
म्हणउनी शांति धरा ।
उतराल पैल तीरा ॥ध्रु.॥
खवळलिया कामक्रोधीं ।
अंगी भरती आधिव्याधी ॥२॥
तुका म्हणे त्रिविध ताप ।
जाती मग आपेआप ॥३॥
इतकी सरल रचना ....याचे खूप मोठे निरूपण करून अधिक किष्टता वाढवण्यात उपयोग नाही.
शांतीपेक्षा मोठे सुख दुसरे नाही. मनाला खरी शांती मिळाली तरच सुखाची अनुभूती येते.बाकीचे सर्व दुःखच आहे.म्हणून मनात शांती धारण करा. जीवनातील संकटे आणि दुःखे पार करून तुम्ही भवसागराच्या पैलतीरी पोहोचाल.काम, क्रोध आणि वासना मनात उफाळून आल्या की मन अस्वस्थ होते आणि त्याचा परिणाम शरीरावरही होतो. मानसिक अस्वस्थतेतून अनेक आधी-व्याधी निर्माण होतात.तुकाराम महाराज म्हणतात की मनात शांती निर्माण झाली की आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक असे त्रिविध तापही हळूहळू नाहीसे होतात.
मानसिक अस्वस्थतेतून अनेक आधी-व्याधी निर्माण होतात.....अगदी तंतोतंत खरे आहे.सहा महिन्यापूर्वी रागातच मी बाईकहून घरी चालले होते.त्या रागात इतकी जोरात चालले होते की नको ते घडले .छोटाशा अपघात झाला .अजूनही तो पाय दुखतोय..ते आठवलं की राग किती घोळ घालतो,व्याधी जडवून दत्त हे पटत राहते.
शांती ही केवळ बाह्य शांतता नसून मनाची स्थिरता, संयम आणि समत्व आहे. त्यांच्या मते मन काम, क्रोध, लोभ, मत्सर यांमुळे अस्थिर झाले की दुःख वाढते. उलट मन शांत झाले की त्याच परिस्थितीचा त्रास कमी जाणवतो.
मेघ - ६ (समाप्त)
प्रिय वसुंधरे,
तुझं आणि माझं नातं जन्मजन्मांतरीचं आहे...
वर्षाचे सर्व सहा ऋतू आणि बारा महिने मी सदैव तुझ्यासोबत असतो.
आणि तुलाच फक्त माहिती आहे, माझ्यात ना दोन रूपं आहेत... मिथुन या माझ्या सूर्य राशीमुळे कदाचित...
एक अवखळ... भारदस्त... उनाड... स्वैर... हळवं...
आणि दुसरं...
हत्तीसम रौद्र.
तुला आठवतंय, वसू?
मी हत्तीसम रौद्र रूप धारण केलं की मला अडवण्याची ताकद मग कोणातच नसते.
तरीही तू येतेस...
थोडीशी कावरी-बावरी होऊन.
तरीही मी कोसळतो...
यथेच्छ!
मला असं पाहून तूही रडतेस मग...
तुझ्या नयनांतून वाहणाऱ्या नद्यांना पूर येतो मग.
माझ्याच भावनांच्या असंख्य रेषा एकमेकींना छेदून जातात...
आणि त्यातून विजेचा कडकडाट होतो.
सारं वातावरण भयभीत होतं.
माझं हे हत्तीसम रौद्र रूप पाहून तूही भयभीत होतेस...
तरीही तू तुझ्या वाऱ्याच्या हाताने मला थांबवण्याचा अटोकाट प्रयत्न करतेस.
म्हणूनच कदाचित हत्ती नक्षत्राऐवजी याला हस्त नक्षत्र म्हणत असावेत...
माझ्या भावनांचे असंख्य लोट जोपर्यंत संपत नाहीत, तोपर्यंत मी बरसतच राहतो.
वसुंधरे,
मला एवढं रौद्र होऊनही झेलण्याची
इतकी ताकद तुला कुठून येते गं?
आता तू माझ्याकडे असं बघू नकोस...
मी पुन्हा प्रेमात पडेन तुझ्या.
बघ... आलोही मूळ हळव्या रूपात.
---
वसुंधरे,
मी खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम करतो...
मला तर वाटतं, तू तुझ्या गळ्यातील हे पिवळ्या फुलांचं मंगळसूत्र काढून माझ्याशी बोलावस...
एका निखळ मैत्रिणीसारखं.
बघ, असं बोलायला लागलो की तुझ्या भुवया उंचावतात...
मग माझ्या बोलण्याची लय तुटते...
आणि नेहमीप्रमाणे मग मी भरकटत जातो.
तुला माहिती आहे,
तू मला जास्त आवडतेस ते शिशिर ऋतूत.
कारण, शिशिरात तू मला खूप जवळची वाटतेस.
शिशिर आला की तू तुझ्या पानांचा पसारा बाजूला करतेस...
तुझी ती पिवळी फुलं तू बाजूला करतेस...
एक हुरहूर असते त्या शिशिरात ल्या गारव्यात
मी येतो मग तुझ्याकडे...
सकाळ झाली तरी मी मग जात नाही.
तुझ्या भाळी दवबिंदू होऊन मी तसाच चमकत राहतो...
मला हे हि माहिती आहे, तुला तू मात्र वसंत ऋतूमध्ये आवडतेस...
चैत्राची नवी पालवी घेऊन तू पुन्हा सजतेस तेंव्हा.
पण मला तर शिशिरातही तू चैत्राचं स्वप्न पाहतेस असंच वाटतं...
कदाचित म्हणूनच तुझी पानगळही मला सुंदर वाटते.
कारण त्या प्रत्येक गळणाऱ्या पानामागे
नव्या पालवीचं एक स्वप्न दडलेलं असतं कदाचित...
---
प्रिय वसुंधरे,
तुझ्याबद्दल मी कितीही बोललो तरी कमीच आहे...
म्हणून शेवटचं लिहितो...
तू अशीच फुलत राहा... माझ्याशी बोलत राहा ...
तुझा मी नसताना हि.. माझ्यावर प्रेम करत राहा ..
- तुझाच मेघ
शब्दमेघ... मुक्त... स्वैर... स्वच्छंदी जीवन...
(गणेशा)
२५-०९-२०२६
तरीही तू तुझ्या वाऱ्याच्या…
In reply to मेघ - ६ (समाप्त) by गणेशा
तरीही तू तुझ्या वाऱ्याच्या हाताने मला थांबवण्याचा अटोकाट प्रयत्न करतेस.
म्हणूनच कदाचित हत्ती नक्षत्राऐवजी याला हस्त नक्षत्र म्हणत असावेत...
सुरेख!
मला तर वाटतं, तू तुझ्या गळ्यातील हे पिवळ्या फुलांचं मंगळसूत्र काढून माझ्याशी बोलावस...
एका निखळ मैत्रिणीसारखं.
कृष्ण राधेला रासलीला खेळायला बोलावत आहे असा भास झाला 👍
आठवणींचे थवे
पप्पा,
आज ३० सप्टेंबर…
तुम्हाला जाऊन चार वर्षे झाली, हे अजूनही खरं वाटत नाही.
या चार वर्षांत प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनेत मला तुमची आठवण आली. तुमची कमी प्रत्येक गोष्टीत जाणवली.
पण या चार वर्षांत तुमच्याबद्दल एक शब्द लिहायला घेतला, तरी काहीच लिहिता येत नाही… डोळ्यांपुढे पाणी तरळतं. मनात खूप काही असतं, पण ते शब्दांत उतरवणं जमत नाही.
यावर्षी पुन्हा एकदा प्रयत्न करतोय…
तुमच्याबद्दल काही शब्द लिहिण्याचा.
कारण तुम्ही नसलात तरी तुमच्याशी बोलणं अजून संपलेलं नाही…
--
पप्पा,
आताही असेच होते आहे…
काय लिहू, कुठून लिहू, हे काहीच कळत नाही.
आठवणींचे थवेच्या थवे डोळ्यांसमोरून पुढे जातात; पण त्या आठवणींना शब्दांत काही मांडताच येत नाही.
लहानपणी आकाशात बगळ्यांच्या थव्यांची बाणाकृती रांग उडताना दिसली, की मी ओरडायचो,
“बगळ्या बगळ्या… कवडी दे!”
आणि नखावर पांढरट डाग उगाच दाखवत, बगळ्याने कवडी दिली हे सांगत होतो.
आता वाटतं…
या आठवणींच्या थव्यानो, मला शब्द द्या.
तुमच्याबरोबरच्या त्या सर्व आठवणी तशाच कायम राहिल्या आहेत.
पण आठवायचं म्हटलं तर काय काय आठवू?
--
मला तर मी दोन अडीच वर्षांचा होतो, १९८४-८५ च्या आसपास… आपण सातववाडीला राहत होतो, तेथील रूमसुद्धा आठवते.
त्या रूममधली ही आठवण आईने मला सांगितलेली आहे.
मी त्रास देतो म्हणून आईने मला पहिल्यांदाच कॉटला बांधून ठेवलं होतं. तुम्ही आल्यावर मात्र मी जोरात रडलो होतो आणि तुम्ही मला कडेवर घेतलेलं…
२०१५ ला सातववाडीला मी गेलेलो.
तेव्हा आपण जिथे राहत होतो, अंदाजे तिथे मी गेलो. सगळंच बदललं होतं.
फक्त रस्त्यापुढचं Gliding Centre तसंच होतं.
मला ना या आठवणींचा शाप आहे, असं नेहमी वाटतं पप्पा. मला त्रासही होतो याचा.
तुमच्याबद्दल लिहायचं म्हटलं की एक आठवण दुसरीला घेऊन येते… आणि मग कुठून सुरुवात करायची, कुठे थांबायचं, काहीच कळत नाही.
सातववाडी, हडपसर येथील कुत्र्याची आठवण तुम्ही सांगून हसत असत, तो प्रसंग मात्र मला अजिबात आठवत नाही.
मी हसतो ह्यावर.
तिथे एक सर्वात चावणारी कुत्री होती. कोणाला ती तिच्याकडे फिरकू देत नव्हती, फक्त मला येऊ द्यायची.
मी तिच्यावर बसायचो… तिचे कान ओढायचो…
नंतर तिला पिल्लं झाली, तेव्हा त्या पिल्लांबरोबर एकदा मीसुद्धा तसंच दूध प्यायला गेलेलो.
अजूनही हसू येतं या गोष्टीचं.
पण हे मात्र मला आठवत नाही…
--
उरुळी कांचनला तुम्ही १९८६-८७ च्या आसपास आपलं नवीन घर बांधलं.
तेव्हा आई आणि तुम्ही विष्णूच्या मिलवरून मुरूम आणून पाया भरलेला मला अजूनही लख्ख आठवतो.
नंतर घराच्या पूजेच्या वेळी तायडीला मी झोपेतून उठवून तिच्या गालाला पावडर लावून फोटो काढलेला आठवतो.
तो फोटो अजूनही आहे माझ्याकडे.
त्या घरात माझं बालपण गेलं. तेथील सगळ्या आठवणी अजून तशाच आहेत.
ते घर…त्याच्या बाजूला असलेली छोटीशी बाग… त्यात असेलेली झाडे.. फुले.. मोगरा.. जाई.. जुई.. जाईच्या वेलीवर काळ्या चिमणीने केलेले घरटे..
पावसाळ्यात तायडीला आणि मला तुम्ही बनवून दिलेल्या होड्या…
मला आणलेले पहिले action चे shoes…
बरंच काही…
--
मी १९८७-८८ ला पहिलीत गेलो.
त्यावेळेस तुम्ही नंतर मला महात्मा गांधी विद्यालयाच्या ग्राउंडवर न्यायचा.
तिथे डबल बारवर मला लटकवायचा आणि वरती माझ्या मुठीला धरून ठेवायचा.
तुम्ही म्हणायचा, “याने उंची वाढते.”
तेव्हा माझी उंची त्या मानाने साधारण होती.
सर्वांना सायकल होती आणि मला सायकल शिकायची होती.
मी तुम्हाला सायकलसाठी आग्रह केला.
तेव्हा तुम्ही ATLASची सायकल ५०० रुपये देऊन आणलेली… अजूनही आठवते मला.
ती सायकल तुम्ही शेवटपर्यंत चालवली.
ती अजूनही बारामतीच्या घराखाली आहे.
तुमच्या नंतर माझी हिंमत झाली नाही तिला पाहण्याची.
--
लहानपणी तुम्ही तायडीचे होता आणि माझी आई होती.
बरेच वर्षे मी तुम्हाला ‘आबा’ म्हणायचो.
‘पप्पा’ हा फॅशनेबल शब्द तायडीने पहिल्यांदा म्हटला…
आणि शेवटपर्यंत तुम्हाला आम्ही आबाऐवजी पप्पा म्हणू लागलो.
तुम्ही तायडीला तुमच्या ताटात जेवायला घ्यायचा.
मी रागवायचो… “तीच का म्हणून?”
--
सातवीत असताना माझ्या उजव्या डोळ्याला विट्टी लागली आणि त्यातील मुख्य केशवाहिनी तुटल्याने मला पुण्यात ॲडमिट केलं होतं.
तेव्हा तुमची झालेली घालमेल मला अजूनही स्पष्ट आठवते.
माझे डोळे आत्ताच पाण्याने भरले आहेत…
पुढचं काही दिसेनासं झालं आहे.
पण एक गोष्ट त्यानंतर चांगली झाली…
ना तुम्ही, ना मी त्यानंतर कधी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो.
अपवाद फक्त तुमच्या शेवटच्या आजाराचा…
--
तुम्ही पुण्याहून शटलने ६:४० वाजता उरुळीला यायचा.
तुमच्या रेल्वेचा आवाज आला, की मी दातार कॉलनीत जिथे खेळत असू तिथून पळत घरी यायचो आणि पुस्तक हातात धरायचो.
तुमचा धाक शेवटपर्यंत होता.
पण आज त्या धाकाचीही आठवण येते.
आज वाटतं, तो धाकही तुमच्या प्रेमाचाच एक भाग होता.
--
लहानपणी मी अभ्यासात मात्र मध्यम होतो.
आईने तर मला बारावी होईपर्यंत बाहेर लांब कुठेच पाठवलं नाही.
तुम्ही तिला म्हणायचा,
“असं नाही केलं पाहिजे. त्याला थोडं बाहेरचं जग पाहू दे.”
आणि ही कसर मी शिरूरला BCSला गेल्यावर भरून काढली.
आणि त्यानंतर एकूण १५ वर्षे मी घराच्या बाहेर राहिलो.
--
त्यावेळेस मी अभ्यासात जेमतेम होतो.
एकदा मी घड्याळ मागितलं होतं.
तेव्हा तुम्ही मला म्हणालात,
“तू जेव्हा वर्गात पहिला येशील, तेव्हा तुला पहिलं घड्याळ घेऊ.”
त्यानंतर मी गणित विषयात पहिला यायला लागलो. पण वर्गात पहिला नंबर काही कधी आला नाही…
नंतर नववीत मी वर्गात पहिला आलो.
आणि मला तुम्ही पहिलं घड्याळ घेतलं.
ते घड्याळ BCS होईपर्यंत माझ्याकडे होतं.
BCSला तर त्यातील काटे पडले तरी मी ते घातलेलं होतं. BCS ला मी कॉलेज ला पहिला आलो.
--
मी १९९८-९९ ला बारावी झालो.
तेव्हा तुमचे MSEBचे साहेब घरी आलेले.
माझं गणित चांगलं होतं म्हणून त्यांच्या शेअर मार्केट ब्रोकिंग हाऊसमध्ये चल, थोडं शिकवतो, असं ते म्हणाले होते.
पण तुम्ही त्यांना स्पष्ट नाही सांगितलं होतं.
त्यानंतर तुम्ही मला शेअर मार्केट करू नको, असं सांगितलं.
आणि मी २०२० पर्यंत कधी त्याकडे पाहिलंही नाही.
२०२० ला मात्र मी तुमच्याकडून परवानगी घेतली.
इन्व्हेस्टमेंटच्या विचाराने मी करेन, इतर काही नाही… आणि कोणाकडून कसलेही पैसे घेणार नाही, हा शब्द मी तुम्हाला दिला होता.
तो मी अजून पाळला आहे.
आणि पाळत राहीन.
या एका तत्त्वामुळे मला शेअर मार्केटचा अभ्यास इतरांना सांगण्यातही आनंद होतो.
--
पप्पा,
तुमचा आणि माझा आवाज जवळजवळ सारखाच होता.
आणि आपलं इंग्लिश हस्ताक्षरही…
तुम्ही तुमचं आयुष्य खूप तुमच्या तत्त्वांवर जगलात.
तुम्हाला ना कुठलं व्यसन होतं, ना कसली हाव.
कदाचित म्हणूनच मीही कुठल्याही व्यसनापासून कायम लांब राहिलो.
माझ्याही आयुष्यात मी तुमच्यासारखी काही तत्त्वं जपली.
एक गोष्ट मात्र माझी चुकली…
तुम्ही कर्जाच्या बोजाखाली कधी नव्हता.
मी मात्र या EMIच्या चक्रात अडकलो होतो.
झालं…
आता तेही पुढच्या दोन वर्षांत संपवतो आहे.
तुम्हाला दिलेल्या शब्दासारखंच हेही करून दाखवायचं आहे.
आणि नंतर मात्र मला मुक्त जगायचं आहे.. खूप फिरायचं आहे.. सर्वांवर प्रेम करायचं आहे..
--
लहानपणी आपण चल्लस साठ खेळत असू. तुम्ही माझ्यासोबत रम्मी पण खेळत असत. आपण खूपदा रम्मी खेळायचो नंतर.
अगदी अलीकडे आपण सर्वजन पुण्याला लुडो खेळायचो.
आणि क्रिकेटची मॅच असली, तर आपण किती बोलायचो…
मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मिस करतो. कधी कधी तुमच्या या छोट्या गोष्टींची जास्त उणीव जाणवते.
--
पप्पा,
तुम्हाला कॅन्सर झाला.
आणि तुम्ही जास्त दिवस जगणार नाही, हे डॉक्टरांनी मला स्पष्ट सांगितलं.
त्या दिवशी मला खूप दुःख झालं…
खूप रडलो मी तेव्हा.
नंतर तुम्ही मला कायम म्हणायचा,
“माझे आयुष्य मी खूप आनंदाने आणि चांगल्या निरोगी पद्धतीने जगलो आहे. आता जे व्हायचं ते होऊ दे.”
तुमच्या या अशा परिपूर्ण विचारामुळे मला खूपच भारावल्यासारखं झालं.
शेवटचे सहा महिने मात्र मी कायम तुमच्या सोबत होतो…
आपण सर्वच बरोबर होतो.
तुम्ही गेल्यावर डॉक्टरही म्हणाले होते,
“कॅन्सर झालेला असूनही असा हसतमुख माणूस आम्ही अजून पाहिला नव्हता.”
कधीच कुठली तक्रार नाही…खंत नाही…
--
पप्पा,
मी नंतर तुमच्या कामाच्या सोसायटीमध्ये गेलेलो.
कदम मॅडम भेटल्या मला.
त्यांनी सांगितलं, तुमचे वडील कायम तुमच्याबद्दल बोलायचे…
आणि बरंच काही.
हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं.
बापाचं मन खरंच शेवटपर्यंत कळत नाही…
त्या नंतर हि रास्ता पेठ ला माझे जाणे झाले, तुमच्या ऑफिसला गेलेलो..
तुम्ही मी लहान असताना मला कधी कधी ऑफिस ला न्ह्यायचा त्या ऑफिस रूम मध्ये हि मी गेलो.. मला खूप भरून आलेलं, माझ्या डोळ्यांतील पाणी दिसू नये म्हणून मी माझा काळा गॉगल लावला...
--
शेवटी तीन दिवस आधी तुम्ही मला सतत म्हणत होता,
“मला तुझी खूप काळजी वाटते…”
आणि मी म्हणायचो,
“सर्व छान आहे… काळजी नका करू.”
नंतर तुम्हाला ऑक्सिजन लावला.
काय चालू आहे, हे मला डॉक्टरांनी सांगितलं होतं.
तेव्हा मात्र मी देवाकडे प्रार्थना करत होतो…
यांना आता कसलाही त्रास देऊ नको.
मला तेव्हा माझ्या मैत्रिणीच्या डायरीत लिहिलेली कुसुमाग्रजांची, त्यांनी शेवटी लिहिलेली कविता आठवली…
“उगवतीचे ऊन आता, मावळतीला चालले आहे.
मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक साचले आहे..
दुःख नाही.. खंत नाही.. स्फूर्तीसाठीच प्रवास असतो..
केंव्हा तरी मिटण्यासाठीच काळजामधला श्वास असतो…”
--
तुम्ही गेल्यावर, तुम्हाला नातू झाला पप्पा, तो हसला की मला तुमची आठवण येते...
तुम्हाला आपल्या कुलदैवत - सिद्धनाथ आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम वेड होतं.. तुम्ही विठ्ठलाच्या वारीला हि जायचा...
त्यामुळे म्हसवडला उधळला जाणारा अबीर गुलाल आणि विठ्ठलाचा अबीर टिळा या सुगंधीत नात्यांमुळे मी तुमच्या नातू चे नाव 'अबीर' ठेवले...
उद्या जेंव्हा गावाला मी घर बांधेल, तेंव्हा त्याचं नाव मी 'बहावा' (अमलतास) ठेवणार आहे, बहाव्याची लगडलेली पिवळी फुले पाहिली की, का माहिती नाही, पण मला तुमची आठवण येते..
--
पप्पा,
मला तुमच्याबद्दल लिहायचं होतं…
तुमच्या स्वभावाबद्दल, आपल्या नात्याबद्दल, तुम्ही मला काय दिलंत याबद्दल. पण पुन्हा तेच… मला तसं लिहिता येत नाही. वाक्य जमत नाहीत.
फक्त आठवणी येतात. एकामागून एक.
आठवणींचे हे थवे थांबतच नाहीत.
आणि कदाचित म्हणूनच…
मला या आठवणींचा शाप आहे असं वाटत असलं, तरी हाच माझा सगळ्यात मोठा ठेवा आहे.
तुम्ही नाही आहात, पण तुमचं असणं या प्रत्येक आठवणीत आहे.
माझ्या काही तत्त्वांत आहे..
माझ्या प्रत्येक निर्णयांत आहे..
माझ्या जगण्याच्या पद्धतीत आहे..
तुम्ही तुमचं आयुष्य ज्या तत्त्वांनी जगलात, त्यातील काही तत्त्वं माझ्यात नकळत आली…
आणि म्हणूनच कदाचित, तुम्ही आज माझ्यासोबत नसलात तरी,
तुम्ही माझ्यात कुठेतरी अजूनही आहात.
तुम्ही जाऊन चार वर्षे झाली…
पण माझ्या आयुष्यातून तुम्ही गेलेले नाही.
तुमची आठवण येते.
नेहमी...
आजही...
- गणेशा
३० सप्टेंबर २०२६
वाह, गणेशा...आठवणींच्या थव्यानो, मला शब्द द्या.
अफलातून मुक्तक.
माझी आई बहिणाबाई,
बहिणाबाई म्हणू का झाशीची राणी
आठव तुझी आणी डोळ्यांमधे पाणी
देव गेले देवासनी आणी उंबरा सोडला
जग जिंकल्याव तुझा वारू ग थांबला
फाटक्या पदरी झाकले आभाळ
निगुतीने केला तू माझा सांभाळ
कमी पडलो, नाही फेडू शकलो ग पांग
ऋणातून तूझ्या कशी उतराई सांग
धन्य तुझी कोख धन्य तुझी माया
पडती कमी जरी गेले सात जन्म वाया
ऋणी तुझ्या धन्य, ऋणीच मान्यता
बाकी सारी ऋणं वाटती अन्यथा......
मिटलेला श्वास
@कर्नलतपस्वी
तिचे नसणे माझ्या मनाला मान्यच नसते कधी... ती गेली त्या दिवशी तिने आनंदाने अंगणात रांगोळी काढली होती...ठिपक्या ठिपक्यांचे कासव तीला यायचे.. तेव्हडेच यायचे... ती गेली आणि त्या रांगोळीचे ठिपके धुसर झाले... आज पर्यंत पुन्हा अंगणाला रांगोळीचा स्पर्श झाला नाही.. तिचे मंगल पावित्र्य अंगणाला पुन्हा कधी मिळाले नाही.. ही गत फक्त अंगणाची.. माझ्या आयुष्याचे वेगळे असे काय झाले ? अंधुक भग्न घराच्या कडेकपारीतुन अजुनही तो ओळखीचा सूर ऐकु येतो..... ओठांच्या घाटावर.. त्या शब्दसावल्या अजुनही विखुरलेल्या आहेत .. तश्याच ... आवाज न करता... मळकट पायवाटेवर... ते ओळखीच वारुळ अजुन तसेच आहे... दु:ख पारावर अजुनही तसेच घट्ट बसुन आहे... शेताच्या बांधावर भासांची टोळी अशीच अचानक येते अन मग फाटक्या माझ्या झोळीतुनही त्या टपोर्या दाण्यांना अलगद वेचुन न्हेते.. आजकाल हे असेच होते.. काल वटपोर्णिमा होती.. ते वडाचे झाड मात्र वाळलेले होते.. नाही.. दोरा होता गुंडाळलेला.. करकच्च... पण त्याच्या पारंब्याला माझी स्वप्न लगडलेली होती.. आणि निजले होते माझे विचारगाव त्या तिथेच झाडाखाली...
- शब्दमेघ
(शब्द झाले मोती - १ मधून repost)
आनंदाच्या व्याख्या... ताक…
आनंदाच्या व्याख्या...
ताक:
ताक हे शेवटीच असतात…
पण लिहिण्याच्या या प्रवाहात गोष्ट कुठेतरी हरवून जाईल या भीतीने, मी ती आधीच इथे लिहून ठेवून दिली.
अरे गणेशा…
काल कल्लूचा फोन आला.
आवाजात थकवा होता, पण निर्णय स्पष्ट होता.
“भक्ता… it’s done now.
खूप toxic होते.
मी हा job सोडून देईन.
आणि I will move… स्वतःच काहीतरी करेल.
बस… आता career जे आहे ते झालेलंय.”
मी ऐकत होते.
आणि मला पुन्हा एकदा आठवलं...
मी तुला कसं सांगितलं होतं ना,
की कल्लू आणि तू मला जरा जरा सारखे वाटतात.
त्याच शांत, ठाम, पण हळव्या घाईत.
आता पुढे काय सांगायचं होतं?
हो… आनंदाच्या व्याख्या.
बऱ्याच गोष्टी अशा असतात.
आपल्यासाठी त्या प्रकाश असतात,
पण समोरच्याला त्या फक्त लश्कराच्या भाकऱ्या वाटतात.
कोरड्या, जबरदस्तीच्या, नकोशा.
काल नेमीप्रमाणे गुरुवार होता.
सामाजिक उपक्रमात मुलांना गोष्टी सांगायला गेले होते.
त्या छोट्या डोळ्यांसमोर बसताना…
वेळ थबकतो.
माझा लेक्चर होताना विद्यार्थी तल्लीन होतात,
पण या लहान मुलांमध्ये काहीतरी वेगळं असतं.
ते judge करत नाहीत.
ते फक्त ऐकतात,पूर्णपणे, निर्व्याजपणे.
मी त्यांना career म्हणून शिकवत नाही.
ही फक्त एक सामाजिक बांधिलकी आहे…
आणि तरीही, इथेच मला सर्वात खोल आनंद मिळतो.
पण हा आनंद…
मी घरच्यांना समजावून सांगू शकत नाही.
किंवा कदाचित ते ऐकूच इच्छित नाहीत. त्यांना वाटत निघाली ही लष्करच्या भाकऱ्या भाजायला 🙄
त्यामुळे मनात एक सूक्ष्म दुखः राहतं.
माझ्या आनंदाच्या व्याख्या खूप वेगळ्या आहेत.
आणि अशा व्याख्या समजणाऱ्या माणसांची संख्या… खूप कमी.
पण "सुचू "समजते.
तीन महिन्यांपूर्वी आम्ही गोंदेश्वरला गेलो.
रस्त्यावर ती सुसाट धावत होती.
बोलत, हसत, विनोद करत,
जणू संपूर्ण जग तिच्या पाठीमागे धावत आहे .
अतुल हसत म्हणाला,
“मला वाटलं माझी बायकोच वेडी आहे…
पण ही सुचू तर तुझ्याही पुढची आहे!”
सर्वात्मका शिवसुंदरा.... तिमिरतुनी तेजाकडे... इतका सुंदर व्हीडिओ आमचा त्या स्वर्ग मंडपात आकाशाच्या झिरपणाऱ्या निळाईत बनवला आहे की आठवलं की आजही अंगावर काटा येतो 🥰
सुचूसोबत अजून ट्रिप्स बाकी आहेत.
गोकर्ण… डिसेंबरपर्यंत झाली तर ठीक,
नाहीतर पुढच्या वर्षी. दोघींनीच.
२०२० नंतर मी बऱ्याच गोष्टी बदलायचं ठरवलं. खुप विरोध स्वीकारून..
स्वतःवर concentration.
स्वतःला जे खरंच हवंय तेच करायचं.
लग्नामुळे career मध्ये पडलेला तो खड्डा…
मी कित्येक वर्षे इकडे-तिकडे बुजवत होते.
पण एक दिवस कळलं,
जे प्रश्न मी विचारत होते,
ते माझे नव्हतेच.
ते भूतकाळाचे होते.
मी त्यांना सोडल नाही, त्यांची उत्तर मिळवलीच.
आणि स्वतःला विचारलं...
मला खरंच काय हवंय?
कुठे मला खरी शांती वाटते?
आणि कुठे मी फक्त दुसऱ्यांना खुश करण्यासाठी जगत होते?
या खासगी गोष्टीं फक्त सुचूला सांगितल्या आहेत....
त्या खड्ड्याला मी आता बुजवायचा प्रयत्न करत नाही.
मी त्याला स्वीकारलं.
आणि स्वीकारल्यावरच नवीन वाट दिसू लागली.
कल्लूसारखीच…
toxic जागा सोडून,
स्वतःच्या गतीने,
स्वतःच्या आनंदाच्या व्याख्येनुसार.
Ad. DMLT पूर्ण झालं.
लायसन्स प्रोसेसमध्ये आहे.माहिती नाही अजुन किती काळ लागेल.
लॅबचं अजिबात डोक्यात नाही.फक्त गोष्टीं करतेय, आकार घेईल की नाही? ठाऊक नाही.
अजुन एक खड्डा बुजवतेय. भीती आहे… किंचित.
पण किती दिवस फक्त घाबरायचं?
भीतीवर विजय मिळवणारच.
आता मला कळतंय...
आनंद हा कोणाच्याही मंजुरीवर अवलंबून नसतो.
तो माझ्या दोनशेहून अधिक प्रोजेक्टमध्ये असतो,
उपक्रमातल्या मुलांच्या चमकणाऱ्या डोळ्यांत असतो,
गोष्टी सांगतानाच्या शांत क्षणांत असतो,
वाचलेल्या पुस्तकांच्या पानांत असतो,
हजार वर्षांपूर्वी साकारलेल्या मंदिर शिल्प डोळे भरुन पाहण्यात असतो,
आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्यात असतो.
म्हणूनच आता मी सांगते…
माझ्या आनंदाच्या व्याख्या खूप वेगळ्या आहेत.
आणि आता मी त्यांना लपवत नाही.
डोक्यात खूप काही होतं.
इतकेच शब्दात उतरलं.
मी असे कधीच लिहीत नाही.
इथे आहे म्हणून लिहिलं.... क्यूकी...
यहाँ कोई आता जाता नहीं😅
गणेशा, तुला आठवत असेल की नाही…
ऑरकूटवर मी एक गाणं कायम सर्वांना सुचवायचे.
बहुदा माहीतच नसेल कारण आपण तेव्हाहि एकमेकांना ओळखतही नव्हतो.
ते गाणं होतं,आनंदाच्या झाडाचं.
प्रत्येकाने आपल्या आनंदाच्या झाडाची काळजी घेतलीच पाहिजे.
आनंदाचे झाड
आनंदाचे झाड माझ्या अंगणात आहे,
आनंदाचे झाड माझ्या अंगणात आहे.
खोल रुजलेलं माझ्या जीवनात आहे.
उन-पाऊस झेलत साद नभाला घालत,
पानगळ सोसूनही पुन्हा बहरून येते,
पाखरांचा सुर त्याच्या मोहरात आहे,
चैतन्याचे गीत त्याच्या काळजात आहे.
आनंदाचे झाड माझ्या अंगणात आहे.
-अनामिक (बहुदा, विजय कुवळेकर)
https://youtu.be/aUPdVbJvd9s?si=Nq7y2ryOYRrDFFB9
चला तीन महिने खुप काम आहेत. असं डायरीत मनातली स्वगत लिहायला पुढच्या वर्षीचं जमणार 😇
-भक्ती
भक्ती… मैत्रीणे… हो… तू…
भक्ती… मैत्रीणे…
हो… तू म्हणतेस ना, माझा आणि कल्लूचा स्वभाव सारखाच आहे म्हणून… ते खरंच असेल कदाचित.
आनंद…
हा शब्दच किती विलक्षण आहे ना?
आनंदाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. ज्यात मला आनंद मिळतो, त्यात तुला मिळेलच असं नाही… आणि ज्यात तुला आनंद सापडतो, त्याची मला कदाचित गरजही वाटणार नाही.
म्हणूनच आनंद शोधायला निघालं की आपण अनेकदा चुकीच्या ठिकाणी शोधत राहतो.
मला मात्र वाटतं… आनंदाचा सगळ्यात जवळचा संबंध समाधानाशी आहे.
कोणाला शिकवण्यात समाधान मिळतं… कोणाला एखादं पुस्तक वाचण्यात… कोणाला एखाद्या सुंदर जागी भटकण्यात… कोणाला काहीतरी नवीन शिकण्यात… तर कोणाला फक्त आपल्या माणसांसोबत शांतपणे बसण्यात.
आणि माणूस मनापासून समाधानी असेल ना… तर तो आनंदी असतोच.
आपण मात्र आयुष्यात अनेकदा सुख आणि समाधान यांची गल्लत करतो.
सुख कधी कधी खूप मिळूनही अपुरं राहतं… पण समाधान थोडंसं मिळालं तरी मन भरून जातं.
आणि म्हणूनच मला वाटतं… समाधान हे सुखापेक्षा मोठं आहे.
पण भक्ती… याहीपेक्षा एक गोष्ट मला अधिक मोठी वाटते…
स्वतःशी प्रामाणिक असणं.
जगाला आपण काय दाखवतो, यापेक्षा आपल्या मनाला आपण काय सांगतो हे महत्त्वाचं.
स्वतःच्या मनाशी खोटं बोलावं लागू नये… आपल्या निर्णयांचं ओझं स्वतःपासून लपवावं लागू नये… आणि रात्री डोळे मिटताना स्वतःलाच स्वतःची नजर चुकवावी लागू नये…
यासारखं सुख या जगात दुसरं कोणतंच नसावं.
आणि त्या ‘आपल्या’ माणसाशीच म्हणजे स्वतःशीच आपण खरं असलो… तर कदाचित त्यालाच खरा आनंद म्हणता येईल.
- शब्दमेघ (गणेशा)
०३-१०-२०२६
मी तुला पुन्हा भेटणार आहे…
मी तुला पुन्हा भेटणार आहे…
अमृता प्रीतम आणि इमरोज प्रेमाची एक कहाणी
प्रेम कधीकधी शब्दांच्याही पलीकडे जाते. ते शरीर संपले तरीही थांबत नाही. अमृता प्रीतम यांची ही प्रसिद्ध पंजाबी कविता ही अशाच एका प्रेमाची साक्ष आहे, जी मृत्यूनंतरही जिवंत राहते.
अमृता आपल्या शेवटच्या दिवसांतही फक्त इमरोज़लाच संबोधून लिहीत राहिल्या.
इमरोज़ चित्रकार होते, म्हणूनच अमृतांनी आपल्या शेवटच्या कवितांत कॅनव्हास, रंग, रेषा आणि ठिणगी यांचा इतका सुंदर वापर केला. त्या म्हणतात, मी तुझ्या कल्पनेची ठिणगी बनून तुझ्या कॅनव्हासवर उतरेन… किंवा एक रहस्यमय रेषा बनून शांतपणे तुला न्याहाळत राहीन… सूर्याची ज्योत होऊन तुझ्या रंगांत विरघळेन…
ही कविता फक्त प्रेमाची नाही, तर मृत्यूनंतरही भेटीची ग्वाही आहे. शरीर संपेल, पण चेतनेचे धागे आणि ब्रह्मांडाचे कण गोळा करून मी पुन्हा येईन, असे अमृता इमरोज़ला सांगतात.
>>मूळ पंजाबी कविता
मैं तैनू फ़िर मिलांगी
कित्थे ? किस तरह पता नई
शायद तेरे ताखियल दी चिंगारी बण के
तेरे केनवास ते उतरांगी
जा खोरे तेरे केनवास दे उत्ते
इक रह्स्म्यी लकीर बण के
खामोश तैनू तक्दी रवांगी
जा खोरे सूरज दी लौ बण के
तेरे रंगा विच घुलांगी
जा रंगा दिया बाहवां विच बैठ के
तेरे केनवास नु वलांगी
पता नही किस तरह कित्थे
पर तेनु जरुर मिलांगी
जा खोरे इक चश्मा बनी होवांगी
ते जिवें झर्नियाँ दा पानी उड्दा
मैं पानी दियां बूंदा
तेरे पिंडे ते मलांगी
ते इक ठंडक जेहि बण के
तेरी छाती दे नाल लगांगी
मैं होर कुच्छ नही जानदी
पर इणा जानदी हां
कि वक्त जो वी करेगा
एक जनम मेरे नाल तुरेगा
एह जिस्म मुक्दा है
ता सब कुछ मूक जांदा हैं
पर चेतना दे धागे
कायनती कण हुन्दे ने
मैं ओना कणा नु चुगांगी
ते तेनु फ़िर मिलांगी!
>> मराठी भावानुवाद
मी तुला पुन्हा भेटणार आहे
कुठे? कसे? माहिती नाही
बहुदा तुझ्या कल्पनेची ठिणगी बनून
तुझ्या कॅनव्हासवर उतरेन
किंवा तुझ्या कॅनव्हासवरील कलाकृतीत
एक रहस्यमय रेषा बनून
शांतपणे तुला न्याहाळत राहीन
किंवा सूर्याची तेजस्वी ज्योत होऊन
तुझ्या रंगात विरघळेन
किंवा तुझ्या रंगांत बहरून
तुझ्या कॅनव्हासवर एकरूप होईन
माहिती नाही कुठे कसे
पण तुला नक्की भेटणार आहे
किंवा एखादा उसळता झरा बनून
जसे झऱ्याचे तुषार उडतात
ते पाण्याचे थेंब होऊन
तुझ्या अंगभर विखरून जाईन
आणि एक शहरवणारा गारवा बनून
तुझ्या छातीला बिलगेन
मी आणखी काही जाणत नाही
पण एवढे जाणते
की काळ जे काही करेल
एक जन्म माझ्यासोबत असेल
हे शरीर-जीवन-मरण सगळे नष्ट होईल
पण माझ्या चेतनेचे धागे
ब्रह्मांडाचे कण आहेत
मी ते पुन्हा गोळा करीन
आणि कण कणांतून
तुला पुन्हा भेटणार आहे
मुळ -अमृता प्रीतम
भावानुवाद -भक्ती
>>
ही कविता वाचताना वाटते की प्रेम ही फक्त भावना नाही, तर एक शाश्वत ऊर्जा आहे. इमरोज़ चित्र काढत असताना अमृता कदाचित त्यांच्या ब्रशमध्ये, रंगांत किंवा कॅनव्हासच्या रिकाम्या जागेतच बसून असतील. आणि कदाचित अजूनही आहेत.
ती कॅनव्हासवर, रंगांत आणि कणांतून पुन्हा पुन्हा भेटत राहतात.
मिपावरही या कवितेचे सुंदर रसग्रहण यापूर्वीच झाले आहे 😇
https://www.misalpav.com/story/24897
मोगरा आणि 'मी'
प्रिये...
तुझ्या असण्याने माझं असणं पूर्ण झालं...
आनंद, प्रेम, माया यांच्यासोबत भांडणं, रुसवे-फुगवे... हे सगळंही त्यात आहेच. पण कदाचित याच सगळ्यामुळे आपलं नातं अधिक खरं आहे... अधिक जिवंत आहे.
खरं तर एक गोष्ट मला मनापासून तुला सांगायची आहे...
तू मला माझ्या जगण्यात जे स्वातंत्र्य दिलंस, त्याचा मी आयुष्यभर ऋणी राहीन.
खरं सांगायचं तर मी मुक्त... स्वैर... स्वच्छंदी माणूस.
माझ्या मनाला वाटेल तसं जगणारा... माझ्या आवडीच्या गोष्टींमध्ये रमणारा... कधी स्वतःच्या जगात इतका मशगूल होणारा, की आजूबाजूला काय चाललंय हेही विसरून जाणारा.
माझ्या गोष्टी, माझ्या आवडी, माझी स्वप्नं, माझे हट्ट यांच्यात हरवणारा...
थोडासा हळवा... कुठल्याही गोष्टीवर मनसोक्त प्रेम करणारा... काही सुटलेल्या गोष्टींवरही कायम जीव ओवाळून टाकणारा...
अजूनही भूतकाळ आठवून गालात हसणारा... तुझ्याकडे हक्काने मैत्रीण म्हणून पाहणारा... आणि तुझ्याशी वाट्टेल तसं बोलणारा...
आणि तू...
तू माझ्या या स्वैर जगण्याला कधी कुंपण घातलंच नाहीस. मला बदलण्याचा हट्ट केला नाहीस. माझ्या जगण्यावर तुझं जगणं लादलं नाहीस.
उलट...
तू मला माझ्यासारखं राहू दिलंस. माझं 'मी'पण जगू दिलंस... माझं स्वातंत्र्य अबाधित ठेवलंस...
आणि कदाचित म्हणूनच, तुझं माझ्या आयुष्यात असणं मला कधी बंधन वाटलं नाही...
ते नेहमीच माझ्यासाठी एक मोकळं आकाश वाटत राहिलं.
आणि त्या मोकळ्या आकाशातला मी... मेघ बनून कायम मुक्त... स्वैर... स्वच्छंदी जगत राहिलो.
तू खऱ्या अर्थाने मला स्थैर्य दिलंस.
तुझं नातं जमिनीशी आहे... तू मला कायम जमिनीवर ठेवतेस... आणि मी तुला कदाचित थोडं आकाश दाखवतो.
तुझ्यातला संयम आणि माझ्यातला हळवेपणा... तुझ्यातलं स्थैर्य आणि माझ्यातला स्वैरपणा...
तू अलकनंदा सारखी शांत आणि मी भागीरथी सारखा चंचल
आणि म्हणूनच...
तुझ्यासोबतचं हे आयुष्य मला केवळ संसार वाटत नाही.
हा माझ्या आयुष्याचा एक सुंदर प्रवास आहे...
ज्यात कधी आपण एकमेकांच्या अगदी जवळ असतो, कधी थोडे दूर...
कधी हसतो, कधी भांडतो... कधी रुसतो, कधी पुन्हा एकमेकांकडे येतो...
माझ्या आयुष्यात अनेक मित्र आहेत... अनेक मैत्रिणी आहेत... अनेक नाती आहेत... माझं स्वतःचं एक वेगळं जग आहे... माझ्या अनेक गोष्टी आहेत...
हे मला माहीत आहे.
पण तुझ्यासाठी मात्र... कदाचित मीच सर्व आहे.
आणि आजकाल मी तुला खूपच कमी वेळ देतो आहे...
खरं तर हे पहिल्यापासूनच आहे. पण आजकाल तुला ते अधिक प्रकर्षाने जाणवतं आहे...
माझ्या लिखाणात, पुस्तकांत, रनिंगमध्ये, मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये, ट्रेकमध्ये, जिम मध्ये ... मी माझ्या जगात रमलेलो असतो.
आणि या सगळ्यात, कधी कधी नकळत तुझ्यासाठी असलेला माझा वेळ कमी होत गेला.
तुला माझ्याशी काही बोलायचं असतं... कदाचित फक्त माझ्यासोबत शांत बसायचं असतं...
आणि त्या वेळी मी माझ्या जगात कुठेतरी दूर असतो.
यासाठी...
मला मनापासून माफ करशील का गं?
याचं मला खरंच वाईट वाटतं.
मी लिखाण करतो... मी पुस्तकं वाचतो... मी रनिंग करतो...यात तुला जास्त रस अजिबात नाही.
मी फिरतो... निसर्ग मला आवडतो... निसर्गात मनसोक्त फिरताना मी स्वतःलाच हरवून जातो.
तुलाही आवडतं फिरायला... माझ्यासोबत.
हा काळही जाईल...
तेव्हा मी फक्त तुझ्यासोबत फिरत असेन.
मी दोन-तीन वर्षांत जॉब सोडणार म्हणतो आहे... तुला ते कदाचित चुकीचं वाटत असेल.
पण तुला माहिती आहे...
मी 'माझंच' ऐकतो.
मला खूप फिरायचं आहे... माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींना पुन्हा नव्याने भेटायचं आहे... पुन्हा मला नव्याने जगायचं आहे... मला जग बघायचं आहे... हे कदाचित चाळीशीत आलेल्या भावनांचं स्वैर भाषांतर आहे...
पण तुला एक खात्री मात्र देतो...
जगात फिरताना मी एकटा नसेन.
तूच माझी सोबती असशील.
तुला माहिती आहे, मी कसाही असलो तरी मी 'खरा' आहे.
बघ... तू आता पुन्हा मनात म्हणायला लागली असशील,
"यांचं 'मी' पुराण कधी थांबतच नाही"
हो...
'मी' असाच आहे.
कदाचित मी सर्वात जास्त प्रेम 'माझ्यावरच' करतो...हे खरे आहे..
पण एक आहे मात्र...
माझ्यात 'मी'पणा ओतप्रोत भरलेला असला, तरी आपल्यात 'मी'च जास्त प्रेमळ आहे.
फरक इतकाच की, मी ते तितकं बिंबवू शकत नाही. कदाचित व्यक्तही करू शकत नाही.
तुझ्या मनात पुन्हा आले ना? : 'मी'.. 'मी'.. 'मी'
तुला माहिती आहे... मला हिरवी - बॉटल ग्रीन रंगाची साडी आवडते... हिरव्या साडीत तू छान दिसतेस... जणू हिरव्या पानांच्या मधील तू सुगंधी ढब्बू मोगरा जणू
यावेळस पुन्हा मी तुला हिरवीच साडी घेणार आहे...
तुला आठवतं, आपण पहिल्यांदा भेटल्यावर मी लिहिलेलं,
"स्पर्शगंधाने फुललेल्या वाटेवरती
तव हाताचा स्पर्श लाजरा होता...
हिरव्या सतेज वृक्षांमधुनी
प्रेमाचा निर्झर खळाळत होता...
स्पर्शांच्या मोहक संगतीत
देह चैतन्यात भिजला होता...
तितक्यात कातरवेळी
आकाशाने रंगीत अलवार पदर सोडलेला...
नदीच्या रम्य काठावरती
सूर्य नाजूक निजला होता...
-- - -
- - -
"
कधी कधी वाटतं, ज्या गोष्टींवर मी मनापासून प्रेम करतो, त्यात तुझं स्थान सगळ्यात वेगळं आहे.
फक्त माझ्या प्रेमाची भाषा थोडी वेगळी आहे...
माझं जग कितीही मोठं असलं, तरी त्या सगळ्याच्या शेवटी माझ्याकडे परत यावंसं वाटणारं एक ठिकाण आहे...
आणि ते ठिकाण तू आहेस.
माझ्या सगळ्या 'मी'मध्ये, माझ्या सगळ्या स्वैरपणात, माझ्या सगळ्या जगण्यात... तू कायमच आहेस.
आणि म्हणूनच...
तू आहेस... म्हणून माझं असणं पूर्ण आहे.
- - - - - - -
मला माहिती आहे... माझं असं लिहिणं तुला कदाचित अजिबात आवडत नाही.
तुला कदाचित माझ्या या शब्दांमध्ये काहीच दिसत नसेल... पण माझ्यासाठी प्रत्येक शब्दाच्या मागे थोडंसं माझं मन असतं,
तू आणि मी थोडे वेगळे आहोतच.
तुला कदाचित जे सहज वाटतं, ते माझ्यासाठी खूप खोल असतं... तुला अर्थहिन वाटणाऱ्या काही गोष्टी मात्र मला अर्थपूर्ण वाटत असतात..
असो..
तरीही एक सांगतो...
तू मोगरा आहेस माझ्या जीवनाचा...
आणि तुझं असणं.. तुझं जगणं.. माझ्यासाठी
मोगऱ्याच्या त्या हळुवार सुगंधासारखं आहे...
नकळत मनात उतरणार.
-शब्दमेघ... मुक्त... स्वैर... स्वच्छंदी जीवन...
(गणेशा)
०५/१०/२०२६
मी तुझ्यावर हजारो वर्षांपासून प्रेम केले आहे
Heart beats fast, colors and promises
How to be brave? How can I love when I'm afraid to fall?
But watching you stand alone
All of my doubt suddenly goes away somehow
One step closer
I have died every day waiting for you
Darling, don't be afraid
I have loved you for a thousand years
I'll love you for a thousand more
Time stands still, beauty in all she is
I will be brave, I will not let anything take away
What's standing in front of me
Every breath, every hour has come to this
One step closer
I have died every day waiting for you
Darling, don't be afraid
I have loved you for a thousand years
I'll love you for a thousand more
And all along, I believed I would find you
Time has brought your heart to me
I have loved you for a thousand years
I'll love you for a thousand more
मनात भीती असताना प्रेम तरी कसे करू? (अगदी भीतीच्या पल्याडच ,पैलतीरी प्रेम,ईश्वर,शांती सर्वकाही वाट पाहत असते)
मी तुझ्यावर हजारो वर्षांपासून प्रेम केले आहे
MAROON COLOR (कॉलेज -3)
" तू हसलीस की, फुले उमलू लागतात,
आणि त्याचे रंग तुझ्या ओठांवर दिसु लागतात.
तू अशीच हसत रहा, सर्वांचे मन मोहत रहा
माझी नसताना पुन्हा, माझीच होत रहा.. "
मेघा तुझ्या डायरीतील ह्या ओळी माझ्या अजुनही लक्षात आहेत.. हातात घेतलेल्या फुलपाखराचे रंग जसे उडून जातात, तश्या आठवणी थोड्याच त्या रंगांसारख्या असतात ? काही आठवणी असतात त्या फुलपाखरा सारख्या, नाजुक.. सुंदर.. नितळ..
ह्या ओळी मना वरती कोरल्या गेल्या त्या कायमच्या. त्या काळी मी लिहित नव्हतो तरीही मी ही एक डायरी घेतली होती तेंव्हा.. त्याच्या शेवटच्या पानावर तू लिहिलेले "आते जाते, हसते गाते, सोचा था मैने मनमे कई बार " हे गाणे अजुनही तसेच आहे, तुझ्या नावा सहित., आणि मग डायरीच्या शेवटच्या पानावर तू लिहिलेल्या गाण्याच्या मागे मी लिहिले...
--
तर, हा काळ आहे २०००-०२ चा, तेंव्हा आजकालच्या सारखे Mobile phone ,WhatsApp status, facebook असले social life नव्हते. तुमच्या भावना ह्याच उत्कट होत्या. तेंव्हा वाटणार्या गोष्टींमध्ये एक अनामिक हुरहुर दाटलेली असायाची.. एक ओढ असायची.. वाट पाहणे असायचे. बरेच काही..
मेघा खुप शालिन मुलगी, रेखीव. तीच्या दोन्ही गालावर खळ्या पडायच्या. मला आवडायच्या त्या. तेंव्हा कविता लिहित नव्हतो मी. लिहित असतो, तर त्या चंद्रखळ्यांवर असंख्य कविता लिहिल्या गेल्या असत्या इतक्या त्या आवडायच्या मला. मेघा शांत, सुशिल, कमी मित्र असलेली मुलगी. मी त्या उलट, खुप बोलका, टुकार, कँटीन ला पडीक असलेला, मुक्त.. स्वैर.. स्वच्छंद.
मेघा ला मात्र फक्त दोन मित्र एक मी आणि दुसरी सोनाली. सोनाली ही अतिशय सालस मुलगी. मेघा मुळे माझी तिच्याशी ही खुप छान मैत्री झाली होती. नंतर आमच्या तिघांचा असा ग्रुप तयार झाला होता. मला मात्र खुप जास्त मित्र -मैत्रीणी होत्या. आपला स्वभाव बोलका. त्यामुळे माझे गृप पण जास्त. मी तेंव्हा खुप भांडायचो खरे. आता हसु येते पण तेंव्हा मी नक्कीच वेगळा होतो. पटकन रिअॅक्शन, पटकन प्रेम, पटकन भांडण..
मेघाची आणि माझी मैत्री झालीच कशी असा प्रश्न मला पडायचा कधी कधी. ती इतकी नाजूक, सुंदर, गोरीपान, शालिन.. मी इतका बेडर, सावळा, उंच धिप्पाड, भिडभाड न बाळगता कसे ही बोलणारा, माहीत नाही. पण मी तेंव्हा ही खुप respect करायचो तीचा. तेंव्हा त्या सर्व गोष्टींना respect म्हणतात हे माहीत नव्हते इतकेच.
खरे तर ती होतीच तशी, जीव लावावी अशी.. प्रेमात अखंड बुडुन रहावे अशी. तीने maroon color चा, बुट्ट्या असलेला ड्रेस घातल्यावर तर ती खुप सुंदर दिसायची. मला खरे तर मुली आवडायच्या त्या ब्लॅक ड्रेस मध्ये, पण ह्या maroon color च्या ड्रेस मुळे मात्र मला ह्या कलरचे पण खुप आकर्षण झाले होते.
मेघा चा बॉब कट असायचा.. कधी कधी तीचे सिल्की केस डोळ्यांपुढे पण यायचे. मला तीच्या केसाला हात लावून मागे सारण्याचा मोह व्हायचा. कधी कधी तीने डोळे वटारले तरी तो मोह मी पुर्ण करायचो.
त्या काळी आपल्याला आवडणार्या माणसा बद्दलच्या भावना अश्याच असायच्या मर्यादीत. मेघा मर्यादेचा अतीव पुतळा होती.. ती खडूस पण होती. सुरवातीला तीला माझ्या भावनांचे जास्त काही पडले आहे का नाही असे मला नेहमी वाटायचे.
मी पहिल्यांदा तीला माझ्या प्रेमा बद्दल सांगितल्यावर तर ती किती भडकली होती. टुकार हा तिने तेंव्हा मला म्हंटलेला शब्द अजुन आठवतो , नंतर काही काळ असाच गेला. नेमके शनिवारीच हे सगळे घडायला हवे होते का ? सोमवार पर्यंत वाट पाहणे म्हणजे काय हे आता त्या खडुस मुलीला कोण सांगावे असेच वाटत होते मला.
सोमवार आला, गपचुप पुन्हा आम्ही प्रॅक्टीकल ला बसलो, न बोलता. प्रॅक्टीकल ला पण आमचा एकच कॉम्प्युटर होता, कोपर्यातला. दोघे एकत्रच तासन तास c and data structures चे प्रोग्रॅम करत बसायचो. इतके की मी त्या विषयात पहिला आलो. नंतर कंपणीत पण त्याचा जास्तच उपयोग झाला :-))
तर गपचुप बसणे हे आपल्या स्वभावात नव्हते. पुन्हा बोलणे, पुन्हा आर्जवे.. फक्त मैत्रीण म्हणुन आपल्याला जमणार नाही तुझ्याकडे बघायला असली असंख्य वाक्य माझ्याकडे होती. मी माझे नेहमीच खरे करत आलो आहे. तेंव्हाही मी आताच्या सारखाच होतो या बाबतीत.
--
मेघा माझ्या बरोबर कँटीन ला येत नव्हती जास्त. खुप कमी वेळेला आम्ही कँटीन ला गेलो असेन. एकदा ती माझ्या बरोबर भटाच्या कँटीन ला आली होती. तुषार च्या कँटीन पलिकडे गुलाबाचं झाड होते, त्याचा गुलाब तोडुन मी तिच्यासाठी आणला होता. हाय, तो गुलाब चक्क पांढरट पिवळट होता. लाल नव्हता. ती हसत होती. मी देताना म्हणालो देणार्याच्या भावना महत्वाच्या, कलरचे काय येव्हडे.
मी खुप वाया गेलेलो आहे असे कोणाचे ही म्हणने असेल पण तरीही मी पहिला आलो सेकंड इअर ला. आपले असेच असते. जे करायचे ते मनापासुन, मग तो अभ्यास असो वा प्रेम वा मैत्री. गणित आणि c and data structures मध्ये पुर्ण पुणे university मध्ये मी पहिल्या काही जनात होतो असे सरांनी सांगितले मला.
मी हुशार होतो. पण टिपिकल वरणभात, सोज्वळ हुशारपण आपल्यात नव्हते. आपल्याला जे यायचे ते असेच यायचे नॅचरली.
मग आम्ही एकत्र अभ्यास करु लागलो. एकत्र अभ्यास हा कॉलेज सोडुन भेटण्याचा पण एक मार्ग होता आमचा. मला आवडायचे शिकवायला. किती किती अभ्यास करायचा म्हंटले तरी एक एक टॉपिक मी चुटकिसरशी संपवून टाकायचो. मग उगाच असंख्य गप्पात आमचे तासन तास जायचे.
ते तास, त्या गप्पा पुन्हा मिळतील का मला पुन्हा ? असा प्रश्न माझे मन कायम मला म्हणत राहते.. तेंव्हा आमचे एक सुत्र पण होते 'more study- more confusion- less marks , less study- less confusion - more marks.
एकदा तर आम्ही अभ्यास करायला, नविन कॉलेजची बिल्डींग होती त्याच्या वरच्या मजल्यावर दोघेच गेलेलो, ३-४ दिवस अभ्यासाची हीच जागा ठरलेली.. अभ्यास कसला , तो झाल्यावर निव्व्ळ टाइमपास. तीला तिच्या डायरीतल्या कविता, लेख वाचायला आवडायचे.
" बस होती चिंचवडची" ही कविता तर मी तिला कितीदा म्हणायला लावायचो . ती कविता ती खुप छान म्हणायची. तेंव्हा मी स्वता: कधी आयुष्यात कविता लिहिल असे वाटले नव्हते. कदाचीत मी कविता लिहिण्याला हे सारे प्रसंगच कारणीभुत आहेत. असो.
शेवटी आम्ही माझ्या रुम वरच अभ्यास करत असु. कधी तरी अभ्यासाला बाफना बागेत गेलेले आठवते आहे, पण पुसटसे. नक्की आठवेना.
--
मेघा माझ्या पेक्षा मोठी होती. वागण्याने पण. मेघाचे डोळे खुप काळेभोर मस्त होते. मी नंतर तीला बर्याचदा चष्मा काढायला लावायचो. बर्याचदा तीच्या डोळ्यात बघायचा हट्ट करायचो मी.. मी ऐकत नव्हतोच :-))
मी खुप हळवा होतो तेंव्हा. मेघा हसायची माझ्या हळवेपणावर कायम. मेघा होतीच तशी, ती कुठल्याही गोष्टीवर मनमुराद हसु शकत असे. एखादी गोष्ट मिळाली नाही तरी त्या गोष्टीकडे ही ती हसत पाहु शकत असे. मला असले वागणे कधी जमत नसे.
'धडकन' रिलीज होण्या आधीच माझे " तूम दिल की धडकन मे.. रहते हो,. तुम रहते हो" हे गाणे पाठ होते. माझा आवाज चांगला नव्हता. पण सर्व वर्गात मी हे गाणे तीच्या साठी गायलं होते .. ते ही पुर्ण. ते गाणे तेंव्हा मला इतके यायचे की त्याचे म्युजिक पण मी तसेच गायचो. हे गाणे मी मेघाला dedicate केले होते. नंतर तो पिक्चर रिलिज झाला, आणि त्या देव सारखाच मी आहे असे तीचे म्हणणे होते :-)) आणि असे म्हणुन ती हसत असे.
पुढे नंतर तीने वर्गात "आते जाते, हसते गाते | सोचा था मैंने मन में कई बार | वो पहली नज़र, हलका सा असर |करता है क्यों दिल को बेक़रार " हे गाणे गायले होते.
मला खुप आवडले हे. तीला लता मंगेशकर ने गायलेले होठों की कली कुछ और खिली ह्या ओळी पासुन हे गाणे जास्त आवडायचे. मला एस.पी,बालासुब्रम्हण्यम चे कडवे आवडायचे.
एस.पी. माझा आवडता गायक. अजुनही मी त्याची कित्येक गाणी ऐकतो. विशेष म्हणजे आराध्याला पण नेमके आते जाते, हसते गाते हेच गाणे आवडते. आराध्या आणि मी गाडीवर जाताना नेहमी 'मेरे रंग मे' हे गाणे म्हणतो, पण तीला आते जाते हे गाणे आपोआप कसे आवडायला लागले माहित नाही., कधी कधी तर ती चक्क पप्पा, आते जाते लावा ना असे बोलते. आराध्याचा जन्म पण जानेवारी मधलाच.
आम्ही रुम वर आते जाते चे गाणे म्हणायचो. मी एस.पी.चे कडवे म्हंटल्यावर ती लता चे कडवे म्हणत असे. ती जेंव्हा तीच्या गावी जाणार असे तेंव्हा मला उगाच "आँख हे भरी भरी, और तुम मुस्कुराने की बात करते हो" हे गाणे म्हणुन चिडवायची.. मी चिडलो की मात्र ती पुन्हा एस.पी आणि लता चे गाणे म्हणायची - " तुमसे जूदा होकर मुझे दूर जाना है , पलभर की जूदाई फिर लोट आना है"
तेंव्हा मला ऐश्वर्या राय आवडायची खुप, मेघाला पण ऐश्वर्या रायच आवडायची. माझ्या एका वहिवर पण ऐश्वर्याचे चित्र होते. ती वही मला खुप प्रिय होती. मेघा मात्र प्रिती झिंटा सारखी दिसायची . अगदी तसीच अवखळ वाटायची कधी कधी. मेघा ला टीव्ही सिरिअल्स आवडायच्या बहुतेक मला तसल्यात काही रस नव्हता. तीला 'कसोटी जिंदगी की' आवडायची, मी त्याचा एकही भाग बघु शकत नव्हतो.
--
साडी डे ला, मेघा खुप सुंदर दिसत होती.. मला हिरवी साडी आवडते, हे मी नव्हते सांगितले तीला कधी, तीने Maroon red च साडी घातलेली. तीला मी पाहतच बसलो होतो. मेघा जवळ आल्यावर मेघा तु आता मोठी झाली असे तन्वीर म्हणाला होता. तो फोटो तीने तिच्या वडलांना दाखवला होता, तेंव्हा ते पण तीला मेघा आता तू मोठी झाली म्हणाले होते, हिने आम्हाला मारलेलाच डायलॉग तेथे मारला " मी आहेच मोठी". तीने काढलेला तो फोटो मी माझ्याकडे ठेवून घेतला नंतर, तीच्या आठवणी साठी.
आम्ही कॉलेज नंतर पुन्हा भेटणार नाहीच असे तीला कदाचीत म्हणायचे होते . मी माझ्या स्वप्नात पण असे विचार करु शकलो नव्हतो. पण मी कितीही बेधडक असलो तरी मात्र मी कधी माझ्या मर्यादा तोडून तीला त्रास होइल असे वागलो नाही. ते चुक की बरोबर हे तीच सांगु शकेल, मी नाही. तीच्या त्या फोटोचे मी खुप छान स्केच बनवले होते. आहे अजुन माझ्याकडे ते.
आम्ही कॉलेज संपल्यावर काय काय करायचे, कुठे कुठे अॅडमिशन घ्यायचे, कसे पुढे जायचे असे बोलत असू. मी आयुष्यात तुझ्यासोबत असेल असे मी नेहमी म्हणत असे. मी MCS करणार होतो. मेघाला वाटायचे MCA करावे, ते जास्त चांगले. मेघा पुढे बहुतेक शिकणार नव्हती. आणि मी तीला पुण्याला अॅडमिशन घे म्हणायचो. मी कितीही माझ्या म्हणण्यासारखे झाले पाहिजे म्हणालो तरी, ती तीच्याच म्हणण्याने वागायची.. आम्ही खरेच वेगळे होतो..खुप वेगळे..तरी एकत्र.
मी नंतर, तीचे तेंव्हा म्हणणे होते ते म्हणुन MCA ला अॅडमिशन घेतली.. मात्र मी कॉलेज ला कधी निट गेलोच नाही. मी दूसर्या वर्षाला असतानाच मॉड्युलर या कंपणीत सिलेक्ट झालो, आणि कॉलेजने मला दूसर्या वर्षापासून तिकडे काम करण्याची परमिशन दिली ( मोड्युलर चे चार भाग मी आधी लिहिले आहेतच).
मास्टर डिग्रीला कॉलेजला मी कधीच रमलो नाही. कारण तिथे तू नव्हती मेघा, मी अभ्यास पण केला नाही, मला मास्टर डिग्रीला अमोल सोडला तर कोणी मित्र पण नव्हते. नशिब तेथे ही मी असाच अभ्यास न करता ही पेपरच्या आदल्या दिवशी काही वाचुन फस्ट क्लास मिळवला..
--
आमच्या लास्ट इअर च्या परिक्षा झाल्या तरी ३-४ दिवस मी माझ्या घरी निघुन आलो नाही. तेथेच रुम वर राहिलो. रोज उद्या जातो म्हणायचो आणि सकाळी लँडलाईन वर फोन करुन मेघा ला बोलावून घ्यायचो.. शेवटी तो दिवस आला तो कसा विसरेल मी.. आणि मी घरी जाण्याचा निर्णय घेतला. सोनाली पण रुम वर आली होती काही वेळाने, मेघा पाठोपाठ. मेघानेच बोलावले होते तीला असे मला वाटते. नंतर त्या दोघींना सोडवायाला मी हुडको कॉलणीतुन सैनिक कॉलणीत जाई पर्यंत बरोबर गेलो. मेघाचा त्या दिवसी Maroon कलरचाच ड्रेस होता. माझ्या आवडीच्या कलरचा. तीला तेंव्हा मी सोडवायला जाताना मनात कीती स्वप्ने घेवून चाललो होतो.. तीला शेवटचे पाहताना हेच शेवटचे असे वाटले नव्हते.
निरोपाची वेळ आल्यावर नेमके मला खुप खुप बोलावेसे वाटत होते. कॉलेज च्या सर्व आठवणींना ओंजळीत पुन्हा घ्यावे वाटत होते. पण ती रस्त्याच्या त्या कडेला जाईपर्यंत माझे शब्द ओठांआडच अडकले. नेहमी रस्त्याने चालताना मी रस्त्याच्या बाजुला चालायचो आणि ती आतल्या बाजुला, आता आराध्याला घेवून चालतो तसे, आता मात्र आमचे रस्तेच वेगळे होणार होते. हलकेच तिने मागे वळून पाहिले, माझे संयमाचे बांध हळुच सुटले आणि रिकामे हात हलत राहिले...
--
नंतर अनेक दिवस गेले, लँडलाईनवर कधीतरी बोलणे व्हायचे. मेघाने पुढे कॉलेजला अॅडमिशन घेतले नाही. तीच्या लग्नाचे काही चालले आहे कधी ती बोलली नाही. एका १० जून ला तीचा फोन आला नाही, म्हणुन मी १२ जून ला रागावून फोन केला होता - २१०६६. तेंव्हा असलेच नंबर असायचे. आता सारखे मोठे नंबर तेंव्हा कधी नव्हते.
तेंव्हा तीने मला सांगितले तीचे लग्न झाले, आणि मी खुपच हळवा आहे म्हणुन मला तीने मुद्दाम बोलावले नाही. मी म्हणालो तीला, आलो असता मेघा मी तुझ्या लग्नाला, बोलवायचे तरी. ती तेंव्हा खुप खुष वाटत होती.. मी अभिनंदन केले का मला आठवत नाही. तीने मला त्यांचे गाव आणि नाव सांगितले. भेटु म्हणाली बहुतेक तिकडे.
ती हसत बोलत होती.. मी पण खोटे हसु आणले होते ओठांवर. नंतर मी आते जाते हसते गाते, तुम दिल की धडकन मे, तुमसे जुदा हो के ही सगळी गाणी माझ्या mp3 player ला ऐकली.. काही वर्षांनी मी माझ्या भावना शब्दातुन लिहिण्याचा पर्यत्न केला आणि मला नवी दुनिया सापडली - कवितेची. मी इतका भारी लिहित नव्हतो तेंव्हा, पण पहिली कविता माझी खुप हिट झाली.. तीचे नाव होते - " माझी तू..त्याची होताना.. ". या कवितेची असंख्य विडंबणे झाली. स्टेजवरती असंख्य once more या कवितेला मिळाले आणि शब्दमेघ हा माझाच मी नविन पुन्हा जन्मला आलो.
नंतर १४ वर्ष, मी तीचे नाव कधीच कोठे सर्च केले नाही. तीला कसलाच भेटण्याचा प्रयत्न माझ्या मनात आला नाही. मी कोणालाच तीच्या बद्दल कधी विचारले नाही. शब्दमेघ होऊन मी असाच फिरत राहिलो.. मुक्त..स्वैर..स्वछंद.. एक शापित मेघ जणू. कवितेतुन गझल कडे येण्याचा असफल प्रयत्न केला तेंव्हा "सार्या उदास वाटा कापित चाललो मी, होउन मेघ काळा शपित चाललो मी ", हा पहिल्या गझलेचा पहिला मतला मी लिहिला.
नंतर मला चुकुन काही संगितकारांबरोबर काम करण्याचा योग आला, मी एका अल्बम ला प्रेमिकेने प्रियकराला बोलवायचे गाणे लिहिले, ते खरे तर माझे मन होते का ? माहीत नाही.
एकदा मात्र मी आपल्या कॉलेजला ला गेस्ट लेक्चर ला गेलो होतो, नेमका आपण ज्या वर्गात बसायचो तोच वर्ग होता. नंतर सगळे विद्यार्थी गेल्यावर मी तु बसायची त्या तिसर्या नंबरच्या बाकावर ,शेजारी जावून बसलो होतो.
--
दिवस असेच बदलत गेले... माणसाचे आयुष्य पुढे पुढे जात राहते..
त्या क्षणांच्या असंख्य रांगोळी मनात मात्र उमटत राहिल्या. तुळशीहून ही पवित्र असणारे आमचे नाते माझ्या मनात मी आठवत असे. मग माझे मलाच वाटे आपण पुन्हा भेटु का कधी ? भेटलोच तर काय बोलू ?
आणि मग डायरीच्या शेवटच्या पानावर तू लिहिलेल्या गाण्याच्या मागे मी लिहिले...
"दिवस सरत जातात तशी आपल्या आठवणींची फुलं बनत जातात "
--
आता अलिकडे इतक्या वर्षांनी मात्र, मला पुन्हा वाटत होते, आपण पुन्हा भेटावे, तेंव्हाचे सगळे सोडुन द्यावे आणि मैत्रीच्या निखळ नात्याला पुन्हा अनुभवावे. जे तेंव्हा, फक्त मैत्रीचे निखळ नाते निभवायचे राहुन गेले ते पुन्हा निभवावे.. काय हरकत आहे ? थोडा वेळ काढायला हरकत नक्कीच नाही. येव्हडा विश्वास आपल्यात नक्कीच आहे.
आता तर हसु येईल पण मला वाटते पार तुझे पांढरे केस झाल्यावर आणि माझ्या डोक्यावरचे केसच निघुन गेल्यावर ही भेटत रहावे.. भांडत रहावे.. बोलत रहावे. ..
गोड कडु आठवणींचे विनुन अस्तर, पुन्हा त्या ढगांच्या पलिकडच्या निळ्या आकाशाकडे पाहत बसावे. काय हरकत आहे?
वेळेची गणिते जमणार नाहीत, पण वयाला या वळणावर आणणार्या रस्त्यावर पुन्हा भेटुन, मावळतीच्या त्या Maroon red कलरने पुन्हा मैत्रीचे नाव हातावर गोंदवून घ्यायला काय हरकत आहे ? अनेक संध्याकाळ विरघळून गेल्यात त्या नदिच्या प्रवाहात, एखाद्या संध्याकाळचे मैत्रीचे रंग पुन्हा झेलावेत आपण आपल्या तळहातावर, काय हरकत आहे ?
उद्या मी असेल नसेल , तेंव्हा माझ्या नावाने मैत्रीचे तोरण तू बांधण्यापेक्षा, मैत्रीचा हात हातात घेवून पुन्हा जगावे.. आपल्यासाठी...
मी असाच आहे,वेगळा...माझा आवाज,त्याचा टोन ही असाच वेगळा.. पण त्यात आपुलकी आहे.. विश्वास आहे.. नितळ भावनेचा एक ओलावा आहे त्यात ...म्हणुन म्हणतो काय हरकत आहे ?
आणि मेघा, मला आनंद वाटला आपण पुन्हा भेटलो १८ वर्षांनी.. निखळ ..नितळ.. तू अजुनही तितकीच शालिन.. मला खुप अभिमान वाटला आपला ..आपल्या विश्वासाचा...
-शब्दमेघ.. एक मुक्त.. स्वैर.. स्वच्छंदी जीवन (गणेशा)
मेघ -७ (वसुंधरा)
प्रिय मेघ,
तुला एक स्पष्ट सांगते आधी...
तुझ्यासारखं प्रत्येक भावनेला शब्दांत बांधणं मला जमत नाही...
हो, बांधणंच!
तुला प्रिय म्हटलं म्हणून हुरळून जाऊ नकोस...
मला सुरुवात कशी करायची, हेच माहिती नाही.
तू सारखा माझ्या मागे लागला आहेस...
थोडं बोल ना माझ्याशी... माझ्यासारखं!
तुझ्यापेक्षा मी मोठी आहे... वागण्याने पण.
तू तरल आहेस... वाहवत जातोस... माझं तसं नाही.
एकदा तर तू काय म्हणत होतास?
तू आहे त्या कृष्णासारखा... आणि हातात सूर्याला घेतल्यासारखं करून ते तुझं सुदर्शन चक्र आहे, वगैरे वगैरे...
अरे मेघा, मग तुझ्याकडे असलेल्या रुक्मिणीकडे जा ना! राधेकडे का रमतोयस उगाच?
आणि एक...
तू रंगांच्या दुनियेत रंगतोस...
मरून... लाल... हिरवा... पिवळा... सोनेरी... काळा...
तुला खरं सांगू?
मला तू सर्व रंगांत हवाय...
हो, तुझ्या रागात... लोभात... क्षमेत... मैत्रीत... प्रेमात...
तुझ्या या सगळ्या रूपांत!
पण मला तुझ्यासारखं नाही जगता येत...
कधी कधी माझ्या वाऱ्याच्या हाताने तुला धरू पाहते...
तुला तेही कळत नाही.
वेडाच आहेस तू!
रात्री मात्र येतोस तू माझ्याबरोबर..
समोर बसतोस...
आणि माझ्या डोळ्यांत दवबिंदू देऊन निघून जातोस...
असं हळवं राहणं मला शोभत नाही...
तुझ्यासारखं नाही रे माझं!
पण तू मित्र... सखा... माझा प्रियकर म्हणून आवडतोस मला.
पण ऐक...
त्या मंगळसूत्राचं तू बोललास ना...
मी हसले मनातल्या मनात.
पण तसं नसतं रे वेड्या!
तुझ्या या खऱ्याखुऱ्या बोलण्यामुळेच मी तुला भेटते... तुझ्याशी बोलते...
आजच्या जगात खरं बोलणारे विरळच!
म्हणूनच...
तूच माझा जिवलग...
तूच माझा सोबती...
कायमचा... कायमस्वरूपी!
- वसुंधरा...
शब्दमेघ... एक मुक्त... स्वैर... स्वच्छंदी जीवन...
(गणेशा)
०९-१०-२०२६
तिथे तुझी मी वाट पाहते ...
तिथे तुझी मी वाट पाहते ...
अमृताने कसे ,कुठे भेटणार हे काव्याच्या भावानांनी सांगितले .क्रिस्टीनने मी हजारो वर्षे वाट पाहींली असे सांगितले.पण या प्रेयसीने तर कुठे,कशी, केव्हा मी तुझी वाट पाहते हे सांगितले .तेही कृष्णधवल काळातले हे गीत तरीही प्रेमाच्या रंगाने रंगलेले ,मनोरम वाटते कायम !!
जिथे सागरा धरणी मिळते हे १९६१ सालच्या मराठी चित्रपटात 'पुत्र व्हावा ऐसा' मधील सुमन कल्याणपूर यांनी गायलेले, वसंत प्रभू यांचे संगीत आणि पी. सावळाराम यांचे गीत असलेले एक अजरामर भावगीत आहे. राग यमनवर आधारित या गाण्यात प्रेमाची तळमळ, त्याग आणि शाश्वत वाट पाहणे या भावना अत्यंत कोमल आणि खोल स्वरूपात मांडल्या आहेत.गाण्याची मध्यवर्ती कल्पना आहे प्रेमाची वाट पाहणे आणि मिलनाचे ठिकाण सांगणे .प्रेमात वाट पाहतांना प्रेमी कधीच मागे हटत नाही ,किंबहुना किती काळ सरत चालला आहे याचे त्यांना भानच नसते ,काळाच्या पार प्रेमाच्या नावेत ते केवळ स्वैर डोलत असतात.भेटीच्या ठिकाणी डोळ्यात वाट दाटलेली असते.
“जिथे सागरा धरणी मिळते,
तिथे तुझी मी वाट पहाते.”
गाण्याची मध्यवर्ती कल्पना ही आहे की जिथे सागर आणि धरणी एकमेकांना मिळतात, म्हणजेच समुद्रकिनार्यावर, तिथे प्रेयसी आपल्या प्रियकराची वाट पाहते. हे ठिकाण केवळ भौगोलिक नाही, तर दोन वेगळ्या गोष्टी एकरूप होण्याचे प्रतीक आहे.
डोंगरदरीचे सोडून घर ते
पल्लव-पाचूचे तोडून नाते
डोंगरदरीचे सोडून घर ते
पल्लव-पाचूचे तोडून नाते
हर्षाचा जल्लोष करुनी जेथे
प्रीत नदीची एकरूपते
हो, तिथे तुझी मी वाट पहाते, वाट पहाते
जिथे सागरा...
प्रेयसी स्वतःला नदीच्या रूपाने सांगते. डोंगर-दरीचे घर सोडून, पल्लव-पाचूचे हिरवेगार झाडांची डोंगर नाते तोडून, हर्षाने जल्लोष करत ती सागराशी एकरूप होण्यासाठी येते. नदी कोणाचेही ऐकत नाही, कोणाला घाबरत नाही. तिचे घर कितीही सुंदर असले, तरी ती सगळे सोडून सागराला भेटायला येते. ही नदीची अखंड वाहणारी ओढ म्हणजेच प्रेमाची ओढ आहे.
वेचित वाळूत शंख-शिंपले
रम्य बाल्य ते जिथे खेळले
वेचित वाळूत शंख-शिंपले
रम्य बाल्य ते जिथे खेळले
खेळाचा उल्हास रंगात येऊनी
धुंदीत यौवन जिथे डोलते
हा, तिथे तुझी मी वाट पहाते, वाट पहाते
जिथे सागरा...
पुढील कडव्यात बालपण आणि यौवन यांचे चित्र येते. वेचित वाळूत शंख-शिंपले गोळा करत खेळलेले रम्य बालपण आणि नंतर खेळाचा उल्हास रंगात येऊन धुंदीत डोलणारे यौवन हे दोन्हीही त्याच किनार्यावर येऊन मिळतात. प्रेम हे फक्त प्रौढत्वाचे नाही, तर बालपणापासूनच रुजलेले असते.
बघुनी नभीची चंद्रकोर ती
सागर हृदयी ऊर्मी उठती
बघुनी नभीची चंद्रकोर ती
सागर हृदयी ऊर्मी उठती
सुख-दुःखाची जेथे सारखी
प्रीत जीवना ओढ लागते
हा, तिथे तुझी मी वाट पहाते, वाट पहाते
जिथे सागरा...
शेवटच्या कडव्यात चंद्राची कोर बघून सागराच्या हृदयात ऊर्मी उठते आणि जिथे सुख-दुःख दोन्ही सारखे वाटतात, तिथेच प्रेमाची खरी ओढ लागते. प्रेम हे केवळ आनंदाचे नाही, सुख आणि दुःख दोन्ही लाटा असतात आणि त्या लाटांच्या ठिकाणीच खरी भेट होते.
प्रत्येक कडव्याचा शेवट 'तिथे तुझी मी वाट पहाते' या ओळीने होतो. ही पुनरावृत्ती गाण्याला मंत्रासारखे रूप देते आणि वाट पाहण्याची अखंड तळमळ अधोरेखित करते. सुमन कल्याणपूरच्या कोमल आवाजात ही तळमळ आणि सौम्य आशावाद दोन्ही एकत्र येतात.
एकूणच हे गाणे केवळ प्रेमगीत नाही, तर प्रेमाच्या स्वरूपाचे दर्शन आहे. प्रेम म्हणजे घर सोडून जाणे, सुख-दुःख दोन्ही स्वीकारणे आणि तरीही वाट पाहत राहणे. नदी सागराशी मिळते, तसेच प्रेम आपल्या प्रियजनाशी मिळते, पण ती भेट कधीच संपूर्ण होत नाही. म्हणूनच 'वाट पहाते' ही ओळ गाण्याच्या शेवटीही राहते. ही वाट पाहणे हीच प्रेमाची शाश्वत अवस्था आहे.
युनिव्हर्स इज लिसनिंग...
तुमचं कोणीच ऐकत नसेल?
पण तो ऐकत असतो..
एक निळंसर आकाश,
एक चंद्राचा तुकडा,
आपल्याच नादात धुंद ढगांची माळ!
उगवणारी हुरहूर कातरवेळ
हळूच मनाला स्पर्शून जाते.
गलबलून गेलेल्या जरतारी मनाचा
तोल सावरायला मग
त्याच्या आठवणींचा यमन
साथीला येतो...
पण तो ऐकत असतो..
-भक्ती
११ ऑक्टोबर २०२४
तुझं गाभूळलेलेनिळ्या शाईनं…
तुझं गाभूळलेले
निळ्या शाईनं नटलेले
आकाश मला दे
तुझ्यासाठीच लपलेला
गुपचूप रूसलेला
चंद्र तुला घे
हिशोब जमतोय का?
कातरवेळ सतावतेय ना?
सौदा आता पक्का करू?
शुक्राच्या साक्षीने
गठबंधन करू..
-भक्ती
हे शरद ऋतूचे आभाळ माझ्यातली कवयित्री जागीच करणार वाटतं 😅
१३ ऑक्टोबर २०२४
काही नाही चेहरापुस्तकातुन या कविता डोकावुन मीही कविता लिहिते याची आठवण करुन देत आहेत😅🤣
मस्तच! राग मानू नका पण…
In reply to तुझं गाभूळलेलेनिळ्या शाईनं… by Bhakti
मस्तच! राग मानू नका पण गठबंधन शब्द तेवढा बरा वाटत नाहीये वाचताना, काही रोमँटिक बदली शब्द सुचला तर आणखी छान वाटेल वाचायला 🙂
सध्या अस सुचण तेही रोमँटिक …
In reply to मस्तच! राग मानू नका पण… by श्वेता व्यास
सध्या अस सुचण तेही रोमँटिक ..फार अवघड आहे.😅
हे अस काहितरी सुचत कुंपणाच्या पार..स्त्रीवादी😅
हे तर खूपच आवडलं. हे फक्त…
In reply to सध्या अस सुचण तेही रोमँटिक … by Bhakti
हे तर खूपच आवडलं. हे फक्त सत्य आहे, स्त्रीवादी वगैरे लेबल्स जाऊद्यात 🙃
अंधारातली माणसं... अन् पुनवेची चिमणी...
Dedicated to... कधीच प्रत्यक्ष बोलणं न झालेल्या माझ्या पूनम१ मैत्रिणीस...
--
अंधारातली माणसं... अन् पुनवेची चिमणी...
अंधार म्हटलं की मला आठवतात सातपुडा पर्वतातील रांगा... तोच शापित प्रदेश... जिथे माणसांनी केवळ रात्रच नाही, तर संपूर्ण जिंदगीच अंधारात काढलेली आहे.
अं हं... तुम्हाला वाटेल, मला कसं ठाऊक हे सगळं?
पण मला ठाऊक आहे...
हे आठवताना माझं मन जातं उडत २०११ मध्ये...
तेव्हा मी एक झाड होतो...
रात्रीच्या वेळीही, पौर्णिमेला एक चिमणी माझ्याकडे यायची. नाजूकशा पंखांनी गगनभेदी भरारी घेऊन झाल्यावर, कधी एकदा ती चिमणी पुन्हा माझ्याकडे येतेय, असं मला होऊन जायचं.
ती आली की झाडांच्या पानांतून... दूर क्षितिजापल्याडचा सूर्य मावळताना... ती मला तिथली सगळी कहाणी सांगायची.
अताशा सूर्य मावळताना त्या झाडाला चिमणीचाच भास होतो...
ती नाही आली तर काय करत असेल आता?
शांतीचा संदेश देता देता, माझ्यासारखी असंख्य झाडं तिची सोबती झाली असतील ना?
मला आठवतंय... ती हळूच दूरवर असलेल्या झोपडीत डोकावून यायची. तिथले अनुभव मला सांगायची. ते ऐकताना खरं सांगतो, माझं मन भरून यायचं...
म्हणूनच त्या झोपडीतल्या माणसाने माझ्यावर कुऱ्हाड जरी चालवली ना, तरी मी खुशाल माझे हात पुढे करेल ...
चिमणी अताशा हे झाड विसरली आहे...
कदाचित या झाडाचीच ती चूक असेल की त्यालाच त्या चिमणीची आधी विचारपूस करता आली नाही कधी...
पण झाड पुन्हा आस लावून बसलं आहे.
त्याची चिमणी येईल...
नक्की येईल!
यावेळेस मात्र झाडाला त्या चिमणीबरोबर जायचं आहे. ही पानांची सळसळ... हवेतली शुद्धता... सारं काही त्याने चिमणीला द्यायचं ठरवलं आहे.
झाडाला अजूनही वाटतं... अंधाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या त्या वाटेवरचा तो एक सोबती व्हावा... पंखभरल्या चिमणीचा एक दाणा व्हावा...
चिमणीची आठवण काढताना, झाडाला आठवते ती, तिने त्या अंधारातल्या माणसांची सांगितलेली कहाणी...
ती कहाणी नुकतीच या झाडाने आपल्या फांदीवर लिहून ठेवली आहे... कधीच विसरू नये म्हणून...
क्रूर नियतीच्या नशिबी खोल वार रे,
मरण लिहिलेला त्यांचा हा भाळ रे...
(माझी मेळघाट वर लिहिलेली कविता)
अंधार म्हटलं की मला आठवतं हे सगळं...
अंधारातली माणसं... अन् पुनवेची चिमणी...
- शब्दमेघ...एक मुक्त..स्वैर.. स्वछंदी जीवन
(गणेशा)
चाळीशी पार…
चाळीशी पार…
_______________
खरं तर, ‘शब्द झाले मोती’ हे लिखाण पुन्हा सुरू केलं, त्याचं कारण ‘चाळीशी पार’ हा मूळ विषय होता...
मागे तिशीबद्दल... त्यातील दिमाखदारपणा, निर्णय, जबाबदाऱ्या आणि त्यांचं प्राधान्य याबद्दल मी लिहिलेलं होतं. पण जसजसं माणूस चाळिशीत येतो आणि त्यापुढे चालू लागतो, तसतशा त्याच्या भावना, त्याच्या मनात येणारे विचार आणि मनाला लागलेली शांततेची आस त्याला पुन्हा पुन्हा सगळ्या गोष्टींचा विचार करायला भाग पाडतात...
तिशीत दिसणारं आकाश, ते क्षितिज सारं तिथंच असतं. काही गवसलेलं असतं, काही अजून मिळवायचं असतं... पण चाळिशीत माणूस आकाश सोडून पुन्हा जमिनीशी नातं सांगू पाहतो, असं मला वाटू लागलं आहे.
चाळिशीत मग त्याला आठवतात सारे क्षण... सारे सुख-दुःखांचे हिशेबच जणू तो स्वतःपुढे मांडतो... आणि मग विचारांच्या तराजूत तो स्वतःच प्रत्येक गोष्ट उगाचच तोलून पाहतोय की काय, असं वाटत राहतं...
मग अचानक चाळिशीत त्याला हे सगळं फोल वाटू लागतं. मनाच्या तरल, कुठेही वाहवत जाणाऱ्या विचारांना बाजूला सारून, हृदयाच्या खोल ताल-सुरांत निनादणाऱ्या गझलेच्या प्रेमात तो पुन्हा बुडू लागतो...
मग त्याला कळतं... अर्ध्याहून अधिक आयुष्य आपण जगलो आहोत. आणि राहिलेल्या निम्म्या आयुष्यातीलही अर्धंच आयुष्य कदाचित आपल्या हातात नीटसं असू शकतं...
सर्व माणसं नक्कीच सारखी नसतात. प्रत्येक जण वेगळा असतो. प्रत्येकाची स्वप्नं, आकांक्षा वेगळ्या असतात... पण मला माझ्यापुरतं असं वाटतं की, ‘चाळिशीत माणूस स्वतःवर पुन्हा प्रेम करू लागतो...’
माझं तर असं म्हणणं आहे की, चाळिशीतही जो माणूस स्वतःवर आणि इतरांवरही निस्सीम, नितळ, निखळ प्रेम करू शकत असेल, तर तो स्वतः अतिशय सुंदर दिसतो...
आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात असंख्य रील्स आपल्यापुढे येऊन धडकत असतात. चाळिशी पार केल्यानंतरही व्यायाम करून, निरोगी राहून तुम्ही कसे सुंदर दिसू शकता, तुमचा चार्म कसा टिकून राहतो, वगैरे वगैरे...
पण खरं सांगायचं तर, मला वैयक्तिकपणे वाटतं की, तुम्ही मनाने सुंदर असाल, तुमच्या हृदयात प्रेमाची गझल उमटत असेल, तर तुम्ही खूप सुंदर दिसता...
आणि आपसूकच तुमचं मन तुम्हाला या मानसिक सुंदरतेतून शारीरिक स्वास्थ्याकडे... व्यायामाकडे... घेऊन जातं.
मनाची सुंदरता हीच खरं तर चाळिशीतही आनंदाने जगण्याची चावी आहे, असं माझं वैयक्तिक आणि स्पष्ट मत आहे.
नाहीतर, खूप सारा ताण आणि मनात विखारी विचार घेऊन जगणारी व्यक्ती कितीही व्यायाम करत असली, तरी ती सुंदर दिसत असेलच, याबद्दल मला शंका वाटते...
चाळिशीबद्दल असं खूप लिहिता येईल... पण त्यासाठी असंख्य भाग करावे लागतील. म्हणून चाळिशीत मला जाणवणाऱ्या काही विषयांवर थोडक्यात लिहिण्याचा आणखी प्रयत्न करतो. त्या विषयांवरही विस्तृतपणे नंतर बोलता येईल...
१. FIRE (Financial Independence, Retire Early)
खरं तर, चाळिशीत माणूस असला की त्याला वाटू लागतं... आपण जे खरे आहोत ना, तसं जगावं!
आत कुठेतरी सुख आणि समाधान यांचं द्वंद्व आपल्यात सुरू झालेलं असतं...
मग असलेल्या सुखापेक्षा समाधानाची शांतता अधिक प्रिय वाटू लागते.
आणि मग त्याचं मन त्याला स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करायला उद्युक्त करतं...
आणि मग विषय येतो, वेळ असण्याचा!
कारण मनाला एखादी गोष्ट करावीशी वाटणं आणि प्रत्यक्षात तसं जगता येणं, यात फरक असतो.
मी अनेकदा पाहिलं आहे की, माणूस आपल्या जबाबदाऱ्या... नकळत सगळ्या गोष्टींचं ओझं स्वतःच्या खांद्यावर पेलू पाहतो... आणि पुन्हा आपणच निर्माण केलेल्या उंच आकाशात विहार करण्याचा प्रयत्न करत राहतो...
त्यात वावगं काहीच नाही. पण कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळतानाच स्वतःच्या आयुष्यालाही जागा करून देता आली पाहिजे, असं मला चाळिशीत आल्यावर मनापासून वाटतं.
FIRE ही संकल्पना अशी आहे की, ती योग्य नियोजनाने प्रत्यक्षात आणता आली, तर माणसाला त्याच्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य मिळू शकतं.
खरं तर आनंदाचं परिमाण व्यक्तिसापेक्ष असतं. आनंदासाठी केवळ पैसा पुरेसा नसतो, तर आपल्याकडे असलेला वेळ, आपल्या माणसांची सोबत आणि मनाचं समाधानही महत्त्वाचं असतं.
FIRE म्हणजे केवळ नोकरी सोडण्यासाठी पुरेसा पैसा जमवणं नाही. त्यात आर्थिक स्वातंत्र्य, खर्चाचं नियोजन, आपत्कालीन निधी, आरोग्यविषयक खर्च, महागाई आणि दीर्घकाळ पुरेल अशी गुंतवणूक यांचाही समावेश होतो.
आणि एक... आर्थिक स्वातंत्र्य मिळालं म्हणजे प्रत्येकाने नोकरी सोडावीच असं नाही. काहींसाठी पूर्ण निवृत्ती, तर काहींसाठी कमी काम, आवडीचं काम किंवा स्वतःच्या व्यवसायासाठी वेळ मिळवणं, हेदेखील FIRE मधून साध्य करता येऊ शकतं.
वैयक्तिक सांगायचं झालं, तर मी अजून दोन-तीन वर्षं नोकरी करेन... मी मला वाटेल तसा स्वतःच्या व्यवसायाला वेळ देणार... माझ्या आवडींना वेळ देणार... प्रत्येक आवडणारी गोष्ट मनापासून जगणार...
आता हे करताना आर्थिक नियोजन कसं करता येतं, हा प्रश्न आहेच. पण हा लेख उपदेशात्मक झाला नाही पाहिजे, असं मला मनापासून वाटतं. म्हणून हा मुद्दा मी इथेच वगळतो... वाटल्यास पुन्हा केव्हातरी लिहीन...
२. मैत्री.. नाती..
खरं तर, माझ्यासाठी हा खूप मोठा विषय आहे. माझ्या आधीच्या आयुष्यातील अनेक गोष्टी मी यापूर्वीच या विषयाभोवती लिहिलेल्या आहेतच...
पण चाळिशी पार केल्यानंतर मात्र माणूस आतून थोडा बदलतो, असं माझं वैयक्तिक मत आहे...
आणि मग त्याला जाणवू लागतं, आपले खरे मित्र कोण आहेत... लहानपणीचे.. शाळेतील.. कॉलेजमधील.. आणि त्यानंतरच्या आयुष्यात भेटलेले... ज्यांच्याशी आपण मनमोकळेपणाने खूप साऱ्या गोष्टी अगदी सहज, आपल्या मनासारख्या बोलू शकतो...
भले ते कमी असतील.. पण असतील, तर आयुष्यात इतर मित्र किंवा नाती नसली तरी चालतील; पण ही माणसं आपण जपली पाहिजेत, असं वाटू लागतं...
अगदी आपल्याला आधी आवडलेल्या प्रिय व्यक्तीलाही पुन्हा भेटावंसं वाटणं... निखळ.. नितळ.. नात्यांना पुन्हा जगावंसं वाटणं... हे सगळं चाळिशी घेऊन येते...
खरं तर, आयुष्याच्या या टप्प्यावर माणसाला नात्यांमधला मोकळेपणा अधिक महत्त्वाचा वाटू लागतो. आपल्याला समजून घेणारी, आपल्याला आपल्यासारखं राहू देणारी आणि आपल्यासोबत कोणताही मुखवटा न घालता जगू शकणारी माणसं हवीशी वाटू लागतात...
आणि या व्यक्तींमध्ये आपला पार्टनरही असेल, तर खऱ्या अर्थाने चाळिशी आनंदात घालवता येऊ शकते... या बाबतीत मी नशीबवान आहे...
खरं तर, चाळिशी ही पुन्हा नव्याने, पहिल्यासारखं जगण्याची एक उमेदच घेऊन येते, हे माझं स्पष्ट मत आहे...
३. आवड.. छंद.. स्वतःसाठी जगणं
खरं तर, ‘चाळीशी पार’ मधील हा माझा आणखी एक आवडता विषय...
खरं तर, बऱ्याचदा आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, हे इतकं झालं की मग हे करू... हे असं केलं की मग वेळच वेळ आहे... असं म्हणत म्हणत अर्धं आयुष्य घालवलेलं असतं. काळाचे दोरे कधी हातातून निसटत गेले, हे आपण नकळत विसरतो...
म्हणूनच आता आपल्या आवडी... आपले छंद जोपासावेत, निदान आपल्या हव्याशा गोष्टींसाठी तरी वेळ काढावा, असं वाटू लागतं...
कदाचित आपल्याला खूप फिरायचं असेल... खूप लिहायचं असेल... किंवा निवांत राहून फक्त मित्रांमध्ये मिसळायचं असेल... किंवा आणखी काही! चाळिशीत या गोष्टींची एक हलकीशी जाणीव होऊ लागते...
कदाचित आपल्या जबाबदाऱ्या... आपण निर्माण केलेलं जग अजूनही या गोष्टींसाठी अनुमती देत नसेल. परंतु चाळिशीच्या या वयात, या मनाला अशा असंख्य गोष्टी कराव्याशा वाटू लागतात...
कदाचित चाळिशीत आपल्याला कोणासमोर काही सिद्ध करायचं नसतं, किंवा प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याचा अट्टाहासही नसतो. फक्त आपल्याला... आपल्या मनात असलेल्या गोष्टींसाठी... स्वतःसाठी थोडं जगावंसं वाटतं...
आणि मला स्पष्टपणे असं म्हणावंसं वाटतं की, चाळिशीत माणसाने असं मुक्त जगावं... थोडं स्वैर.. थोडं स्वच्छंदी...
असं जगणं म्हणजे स्वैराचार नव्हे, किंवा स्वतःपुरतं जगणंही नव्हे.
उलट, चाळिशीत कधीतरी स्वतःलाही विचारावंसं वाटतं... ‘मला नेमकं काय करावंसं वाटतं?’
आणि कदाचित, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याइतकी समज चाळिशीत आलेली असते...
कारण शेवटी, आपण आयुष्य किती परिपूर्ण जगलो यापेक्षा, आपल्या मनाला जे जगावंसं वाटलं, ते किती मनापासून जगलो... हेच कदाचित चाळिशी पार केल्यावर अधिक महत्त्वाचं वाटू लागतं...
-शब्दमेघ.. एक मुक्त.. स्वैर.. स्वच्छंदी जीवन.. (गणेशा)
२४-१०-२०२६
छान लिहिले आहेस ,हो तू आधीही…
In reply to चाळीशी पार… by गणेशा
छान लिहिले आहेस ,हो तू आधीही स्वछंदी होताच पण पहिल्यापेक्षा अजून जास्त मुक्त ,मोकळ्या स्वभावाचा झालं आहेस आता 😄
चाळिशीत माणूस स्वतःवर पुन्हा प्रेम करू लागतो...’👍️
हे सगळं माझ्याबाबतीत तिशीत घडले आहे 😇
म्हटलं बास ....आता स्वतःकडे लक्ष देणार !!सगळे म्हटले .अग ,असे नसते.मीही म्हटलं, "हॅलो ब्रो मला फक्त थोडा वेळ द्या"
हायला तेव्हा मी चक्क माझाच वेळ लोकांकडून मागत होते 😅 माझी अर्ली रेटिनमेन्टची २ वर्षे मानसिक,शारीरिक स्वास्थ्याला वाहून घेतली .
FIRE -या बाबत मला अजूनही बरेच करायचे आहे .त्यामुळे अजून १० वर्षे तरी यावर काम करेन.
मैत्री.. नाती..याबाबत माझा अनुभव वेगळा आहे .आधी अगदी "परकाया प्रवेश "प्रमाणे दुसर्याचें दुःख सुख जाणून घेत असे . पण तेव्हा अशा स्वभावामुळे चक्क मला गृहीत धरले जात असे .स्वतःकडे लक्ष दिल्यापासून आता जर जी नाती माझीच आहेत/माझा स्पेस मान्य करतात अशाच नात्यांना मीही पुढे नेते.जी आपली आहेत तीच फिरून येतात .
आवड.. छंद.. स्वतःसाठी जगणं-तेच तर खर जीवन आहे .बाकी फक्त जवळून जाणारे मेघ आहेत .खरा पाऊस ,आनंद सरींनी तर मन सतत चिंब भिजायला पाहिजे ,तीच जगण्याची मज्जा आहे!