Skip to main content

ती स्त्री - भाग १ : पहिली जाणीव

लेखक रांचो यांनी सोमवार, 11/05/2026 19:12 या दिवशी प्रकाशित केले.

एक · गणपतीपुळे

अद्वैत त्याच्या आई आणि बाबांबरोबर गणपतीपुळ्याला आला होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत बाबांनी "गणपतीपुळ्याला जाऊयात" म्हटलं तेंव्हा त्याला खूप आनंद झाला कारण त्याला आता पहिल्यांदा समुद्र पाहाता येणार होता! तिथे जाईपर्यंत रोज रात्री झोपताना त्याच्या डोळ्यांसमोर फक्त लाटाच येत होत्या.

आत्ता देवळात उभं असताना सुध्दा त्याची मान मूर्तीकडे कमी आणि समुद्राकडे जास्त वळत होती. बाबा शांतपणे देवासमोर डोळे मिटून उभे होते. आई मात्र त्याची ती धांदल पाहून गालातल्या गालात मिश्किलपणे हसत होती. "अरे थांब जरा, आधी बाप्पाला नमस्कार तरी कर नीट" असं डोळ्यांनीच दटावत होती.

देवळातून बाहेर पडल्यावर मात्र अद्वैत एकदम सुटला. वाळूत पाय पडले आणि समुद्राने जणू त्याला आपल्याकडे ओढायलाच सुरुवात केली. लाटांचा आवाज, खारट वारा, आणि समोर अथांग पसरलेला समुद्र. तो तसाच धावत सुटला.

"अद्वैत, आमच्यापासून दूर जाऊ नकोस जास्ती ! पाण्यात तर अजिबातच नाही!!"आईचा आवाज मागून आला. त्याने "हो" म्हटलं, पण पाय काही लाटांपर्यंत पोहोचेतोवर थांबले नाहीत. त्या ओल्या वाळूचा स्पर्श त्याला हवाहवासा वाटत होता. समुद्राच्या लाटा उसळत त्याच्या पायापर्यंत येत होत्या आणि तिथेच अलगद विरून जात होत्या.

थोड्यावेळाने तो परत कोरड्यावाळूत येवून बसला. त्याचे हात नकळत वाळूत काहीतरी काढायला लागले. बहुधा एक दरवाज्यासारखा चौकोण, त्यात एक वर्तुळ आणि त्या वर्तुळातून बाहेर जाणाऱ्या रेषा. का काढतोय हे त्याला माहीत नव्हतं. जणू काही कुठलीशी अज्ञात शक्ती त्याच्याकडून ते काढून घेत होत.

अचानक त्याला कोणीतरी जवळ उभं असल्याची जाणीव झाली. त्याने आपसूकच वरती पाहिलं तर तिथे एक स्त्री उभी होती. साडी नेसलेली, वाऱ्यावरती उडणारे तिचे मोकळे केस अगदी त्या वर्तुळातून बाहेर येणाऱ्या रेषेप्रमाणे भासत होते. ती ना पाठीमागच्या गर्दीतून आली, ना समोरच्या समुद्रातून. ती फक्त अचानक तिथे प्रकट झाली होती, इतकंच. तिचे डोळे समुद्राच्या पाण्यासारखे निळेभोर होते, अतिशय खोल पण शांत . अद्वैतला कळेना की ती त्याच्याकडे पाहतेय की त्याच्यातून आरपार पाहतेय, इतकी तिची नजर तीक्ष्ण होती.

ती खाली वाकली आणि हळूच त्याच्या कानात म्हणाली "काय झालं, अद्वैत? गोंधळलास का ?"
अद्वैत एक क्षणासाठी जणू गोठला. त्याने तिला कधीच पाहिल्याच त्याला आठवत नव्हतं, मग तिला त्याचं नाव कसं माहीत झालं ? तो काही विचारणार तेवढ्यात बाबांनी हाक मारली. "अद्वैत, इकडे ये." एक क्षण त्याची नजर बाबांच्या आवाजाचा मागोवा घेण्यावर गेली आणि लगेच परत त्या स्त्री कडे वळाली तर ती तिथे नव्हती. जणू काही ती हवेतचं विरून गेली, गायब झाली.

वाळूवरती फक्त ते वर्तुळ होतं आणि लाटा वाळूशी काही गुपित बोलून परत फिरत होत्या.

क्रमशः


वाचने 425
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया