Skip to main content

ग्रेसची आई

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 11/05/2026 06:54 या दिवशी प्रकाशित केले.

 

 

 

आज तारीख दहा मे.आज जागतिक मातृदिन.

मातृदेवो भव:,

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी...

देव सर्वत्र,सदासर्वकाळ पोहचू शकत  नाही  म्हणून  त्याने आई बनवली आहे.

साने गुरूजींचे "शामची आई ",पुस्तक व त्यावर आधारित झालेला चित्रपट. 

लहानपणी ऐकलेली आई आणी मुलाची गोष्ट. सारांश....

"एका मुलाचे एका मुलीवर जिवापाड प्रेम असते.ती मुलगी मुलाला आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी त्याच्या आईचे हृदय काढून आणण्यास सांगते. प्रेमात अंधळा झालेला मुलगा  आईला ही गोष्ट सांगतो. मुलाच्या प्रेमापोटी आपले हृदय काढून देते. मुलगा घाईघाईत मुलीकडे जात असताना मुलाला ठेच लागते आणी ते आईचे हृदय मुलाला म्हणते " फार लागले नाही ना!" यामधे आई बद्दलची उदात्त भावना दाखवली आहे.

"देव जरी मज कधी भेटला,माग हवे ते माग म्हणाला...  म्हणेन प्रभू हे माझे सारे, जीवन देई मम बाळाला ",चित्रपट  मोलकरीण, १९६३.

https://youtu.be/gp55sRf1Dcg?si=cAK-RY1uVXKo3VNM

"आई सारखे दैवत सार्या जगता वर नाही....",चित्रपट वैशाख वणवा,१९६४.

https://youtu.be/8MmPe5Hxi6Y?si=rHMWq6brSavSnn5A

 

या सारखे चित्रपट,गाणी आणी गोष्टी ऐकत, वाचत आणी तत्सम  विचारसरणीत लहानाचा मोठा झालो."आई",शब्द भव्यदिव्य, पावित्र्य, प्रेम,त्याग,मांगल्य, वात्सल्य अशा अनेक  भावनांचे प्रतिक.

आज सर्वच आपल्या मातृदेवतेचे वंदन, आठवण,भेटवस्तू वगैरेने  उपकारांचे स्मरण करतात.

हे सर्वसामान्य आणी सर्वमान्य.....

आज दहा मे. योगायोगान  आज मातृदि न  व  माणीक सिताराम गोडघाटे प्रख्यात कवी.कवी ग्रेस यांचा जन्मदिन एकाच दिवशी आला आहे .अनेक कवीता संग्रह,ललितलेखन यांनी केले. कवी महादु:खाचा,दुर्बोधता ज्यांच्या कवीतेचा गाभा मानला जातो. नेहमीच एक वेगळ्या धाटणीचा बहुचर्चित लेखक, कवी स्वताची वेगळी ओळख  आणी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार परत करणारे अगम्य  व्यक्तिमत्त्व. 

यांचेही जन्मदिवसाच्या निमित्ताने आदरपुर्वक स्मरण.

कधी वाटले नव्हते कवितासंग्रह विकत घेऊन वाचेन. सेवानिवृत्ती नंतर तसे झाले. कवितांची गोडी लागली व मराठी गद्य साहित्या बरोबरच पद्यही वाचनात आले.

कवी ग्रेस यांच्याबद्दल तूनळीवरील अनेक चित्रफिती ऐकल्या. "सांजभयाच्या साजणी, चंद्रमाधवीच्या प्रदेशात , संध्याकाळच्या कवीता"हे कवितासंग्रह वाचले. समजले का?तर अजिबात नाही. काहीतरी वेगळे आहे एव्हढेच जाणवले.

कवी ग्रेस यांच्या ""ग्रेसची आई, जळे पान्ह्यात पदर, माझी आई सुमित्रा,चुडा", अंगाई",या  कवीता वाचल्यानंतर "आई"या कल्पनेला धक्का बसला.आईबद्दल  कोणी अशा भाषेत व्यक्त होऊ शकतो हे खरोखर अविश्वसनीयच आहे. 

अस्वस्थ वाटले व इतका मोठा साहित्यिकाने असे का लिहीले हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली.त्या प्रयत्नात श्री कवी ग्रेस यांच्या तूनळीवरील चित्रफिती मिळाली.यामधे  स्वता कवीने आपला दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. मुलाखत देताना ते म्हणतात,"त्यांची 'आई' अन्य साहित्यिकांनी वर्णन केल्याप्रमाणे भव्यत्व, दिव्यत्व, पावित्र्य इत्यादी गुणांची द्योतक नाही तर तिच्यात फक्त स्त्रीचे, नारीत्वाचे व अंततोगत्वा आदिमायेचे गुण आहेत. ती कधी द्रौपदी, कधी अहल्या, कधी जानकी इत्यादी पौराणिक पात्रांच्या स्वरूपात दिसते."आई",या कवितेत मात्र ती पारंपरिक आईच्या रूपात आपल्या समोर येते.

श्री श्रीनिवास हवालदार, समकालीन लेखक आणी मित्र यांचे" ग्रेसांच्या कवीता,धुक्यातून प्रकाशाकडे ",हे काव्य रसग्रहण मिळाले. वाचल्यानंतर कवी ग्रेस  मला थोडेफार  समजले असा गैरसमज झाला.शिरीष पै यांनीही कवी ग्रेस  यांच्या निवडक कवीतांचे रसग्रहण केले आहे.पुस्तक उपलब्ध नसल्याने वाचायचे राहिले.

जागतिक मातृदिन व कवी ग्रेस यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कवी ग्रेस यांनी लिहीलेल्या "आई बद्दलच्या ",काही कवीता खाली देत आहे. वाचकांनी आगोदर वाचल्या असतील. 

 

१. ग्रेसची आई

आई माझी कृष्णकळीतील विष विसरला कंस 

देवकीच्याही पुढे निघाला शुभ्र पांढरा हंस...

आई माझी रांगोळीतील टिंब हरवली टिकली 

कशास पाडू दार, कराया भिंत घराची मधली...

माझी आई मत्त वासना संभोगाची भूल क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या करुणेचेही फूल.....

आई माझी भिरभिर संध्या घेई सुर्य दिलासा

नश्वर शब्दाच्याही ओठी काव्यकुळातील भाषा

माझी आई अरण्यसरिता,चंद्र झुलविते पाणी

रामासाठी त्यावर लिहिते शिळा अहिल्या गाणी.

आई माझी गाव निरंतर पारावरती भरवी 

संध्याकाळी भगवी होते तिच्या तनूतील ओवी.

आई माझी काजळभरला रे!मायेचा नखरा

वेणीमधली नागीण खुडते जसा हिऱ्यांचा गजरा

आई माझी कंचुकीतल्या तरल स्तनांचे दूध 

गोरजवेळी वाटत फिरतो जोगी कुठला वेध ?

संध्येसाठी माझी आई जपून उजळे वात 

अश्वत्थाम्यापरी हिंडतो जिथे भयंकर घात...

त्याहीनंतर आई निघते कळशी घेऊन दूर

तेव्हा कळतो खुळ्या नदीला या मादीचा सूर....

आई माझी झुळझुळतांना किणकिणतीही तारा तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा...

माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा 

२. माझी आई : सुमित्रा

परसदाराला चंदनाच्या डहाळीची सुगंधी कडी लावून

ती केव्हाच निघाली बेभान :

प्रियकरांचे, यारांचे निघृण वध, तर डोळी त्यांचेच धगधगते बेमुर्वत इमान !

संध्या मलूल, पांगळी, अस्तसूर्याच्या भाराने

वाकलेली :

तुटलेली, कर्णव्याकुळ करंगुळी......

देवासारखे हसता येईल मला : 

मला संतासारखे रडता येईल ? तिच्या कपाळी, चंद्रमौळी.....

३. चुडा

तुला पाहिले मी नदीच्या किनारी

तुझे केस पाठीवरी मोकळे

इथे दाट छायांकित रंग गळतात 

या वृक्षमाळेतले सावळे

तुझी पावलें गे धुक्याच्या महालांत ना वाजलीं ना कधी नादलीं निळागर्द भासे नभाचा किनारा न माझी मला अन् तुला सावली...

मनावेगळी लाट व्यापे मनाला जसा डोंगरी चंद्र हा मावळे पुढे कां उभी तू, तुझे दुःख झरतें ? जसे संचिताचे ऋतू कोवळे...

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनांतून आकांत माझ्या उरी केवढा ! तमांतूनही मंद ताऱ्याप्रमाणें दिसे कीं तुझ्या बिल्वरांचा चुडा...

४. आई

ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता मेघात मिसळली किरणे हा सूर्य सोडवित होता

तशि सांजहि अमुच्या दारी येउन थबकली होती शब्दांत अर्थ उगवावा अर्थातुन शब्द वगळता

ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मीही रडलो त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता

हे रक्त वाढतानाही मज आता गहिवर नाही; वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता.

_____________________________________

समाजाने "आई",या नात्याचे उदात्तीकरण केल्यामुळे  अवाजवी अपेक्षांचे ओझे टाकले आहे का?. ती सुद्धा एक माणूस आहे, तिचेही काही स्वतःचे आयुष्य, चुका किंवा इच्छा असू शकतात,हे सुर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. आईच्या नात्याला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आदर देणे योग्य आहे. ती एक 'माणूस' म्हणून सक्षम, परिपूर्ण आणि चुकीचीही असू शकते, हे विसरून चालणार नाही.

म्हणून जशी आई  क्षमाशील असते तसेच मुलांनीही तीच्याप्रती क्षमाशील असायला हवे.

एक मात्र नक्कीच ग्रेस  वाचताना मी अंतर्मुख होतो. 

 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 330
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

नाही समजली. कविता संग्रहातील एखादीच समजते.

>>>समाजाने "आई",या नात्याचे उदात्तीकरण केल्यामुळे  अवाजवी अपेक्षांचे ओझे टाकले आहे का?. ती सुद्धा एक माणूस आहे, तिचेही काही स्वतःचे आयुष्य, चुका किंवा इच्छा असू शकतात,हे सुर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. >>>

बरोबर. उगाचच ओझे टाकून कविता लेख वाचणे बरोबर नाही.

रस्किन बॉन्ड हा लेखक हेच सांगतो. भारत स्वतंत्र झाल्यावर ब्रिटिश परत गेले पण त्याने इथेच राहायचे ठरवले आणि तो अजूनही इथेच आहे मसुरीमध्ये. लहानपणीच आईवडलांच्या घटस्फोटानंतर बाबांनी त्याला वाढवले. तो चार वर्षांचा होता. अगदी लहान मुलांना आई फार आवडते पण आईलाही जंजाळातून सुटायचे असते, मुक्त व्हायचे असते. वाघ सिंहांच्या बछड्यांनाही ठराविक महिन्यांनंतर आई सोडून देते. निघून जाते. 

एवढा दु:खी झाला की मोठेपणी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. याबद्दल त्याने त्याच्या कथांमधून लिहिले आहे. त्याची motherland भारतच होती. थोडे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले तरी त्याला भारतच आपला वाटला आणि इथेच परत आला.


पिढी दर पिढी इमोशनल कोशंट (EQ) बदलतोय असे माझे निरीक्षण आहे. 

 

वाडवडिलांनी झोपण्या आगोदर आईच्या तळपायाला काशाच्या वाटीने तेलमालीश करून झोपी घातले. 

 

असे काही आमच्या पिढीने केले असेल असे वाटत  नाही पण वृद्धपणात त्यांची आबाळ ही होऊ दिली नाही.

 

पुढील  पिढी काय करेल माहीत  नाही.