Skip to main content

चालू घडामोडी- एप्रील-मे -२०२६

Published on सोमवार, 20/04/2026

राम राम मंडळी !

एप्रिल महिना आता सरत आला आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपलं मिपा आता एकदाचं नव्या रूपात आपल्या भेटीला आलं आहे. वेबसाइटवर हळूहळू सकारात्मक बदल होत आहेत आणि नवनवीन गोष्टींची भर पडत आहे. अधूनमधून मिपा जे बंद पडतं, ते पडद्यामागे सुरू असलेल्या याच तांत्रिक कामांमुळे.

मालकांची स्वतःची नोकरी अत्यंत जबाबदारीची आणि धावपळीची आहे. पण तरीही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून ते मिपासाठी राबत आहेत. अगदी रात्री उशिरापासून ते पहाटेपर्यंत त्यांची ही धडपड सुरू असते. कुणाचीही आर्थिक मदत न घेता, स्वतःच्या खिशाला मोठी झळ सोसून ते केवळ मिपाकरांसाठी ही सर्व मेहनत घेत आहेत, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.

मालक, तुमच्या या निस्वार्थ आणि अथक परिश्रमांसाठी आमच्या सर्व मिपाकरांकडून तुम्हाला एक स्टँडिंग ओव्हेशन आणि मानाचा मुजरा! मनापासून खूप खूप आभार!


एकीकडे उन्हाचा कडाका वाढत आहे, तर दुसरीकडे देशातील आणि जगातील घडामोडींमुळे राजकीय, आर्थिक आणि सामाजिक वातावरणही चांगलंच तापलं आहे. आपल्या मिपा कट्ट्यावर नेहमीच सखोल, अभ्यासपूर्ण आणि बऱ्याचदा खुमासदार चर्चा होतात, म्हणूनच सध्याच्या महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आपलं हे दळण.

१. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेचे राजकारण 

 तर काही माणसांचा पायगुणच असा असतो की, ज्याला हात लावतील त्याची माती होते. महिला आरक्षणाच्या उदात्त हेतूआडून रेटला जाणारा मतदारसंघ पुनर्रचनेचा (Delimitation) डाव असाच अंगलट आला आहे. संसदेत विरोधकांनी दाखवलेल्या अभूतपूर्व एकजुटीमुळे हे विधेयक बारगळले आणि सरकारला राजकीय पातळीवर एक मोठा पराभव स्वीकारावा लागला.

वरवर पाहता हा पराभव वाटत असला तरी, यामागील राजकीय गणिते अधिक गुंतागुंतीची आहेत. या मुद्द्यावर आपला निभाव लागणार नाही आणि विरोधक एकवटतील, याची सरकारला बहुधा आधीच पुरेपूर कल्पना असावी. परंतु, सध्याच्या घडीला देशातील वाढती बेरोजगारी, महागाई आणि इतर पायाभूत प्रश्नांसारख्या गैरसोयीच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष जाणीवपूर्वक विचलित करण्यासाठीच हा नॅरेटिव्ह (Narrative) सेट करण्याचा अजेंडा राबवला गेला का, अशी दाट शंका निर्माण होते.

कोणत्याही ठोस धोरणात्मक चर्चेपेक्षा राजकीय धुरळा उडवून देण्यातच सरकारला फायदा वाटतो. आणि या सगळ्या राजकीय नाट्यावर पडदा टाकण्यासाठीच की काय, दुसऱ्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता भाइयों और बहनों... अशी साद घालत पुन्हा एकदा मूळ प्रश्नांना बगल देणारे आणि केवळ भावनांना हात घालणारे भाषण देशाला ऐकावे लागले. ठोस कृतीऐवजी केवळ इव्हेंट मॅनेजमेंट आणि भाषणांच्या जोरावर मूलभूत प्रश्न सुटणार आहेत का?

माझा काही प्रारब्ध नियती, कर्मफळाची फळं भोगणे यावर विश्वास नाही पण आता त्याची प्रचिती सद्य सरकारची धोरणे पाहिल्यावर यायला लागली आहे.एखाद्या व्यवस्थेपुढे किंवा परिस्थितीपुढे माणसाला स्वतःचे प्रयत्न थिटे वाटू लागतात, तेव्हा नकळतपणे प्रारब्ध आणि नियती या शब्दांचा आधार घेतला जातो. सध्याची एकंदरीत परिस्थिती, महागाई, सर्वसामान्यांच्या खिशाला बसणारी करांची कात्री आणि त्याबदल्यात मिळणाऱ्या तुटपुंज्या सुविधा पाहिल्यावर हेच का आपले कर्मफळ? असा उद्विग्न प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे.

राजकीय विश्लेषणात अनेकदा गमतीने असं म्हटलं जातं की, निवडणुकीच्या दिवशी बोट दाबणे हे जनतेचे  कर्म  असते आणि त्यानंतरची पाच वर्षे सरकारची येणारी नवनवीन धोरणे हे त्या कर्माचे कर्मफळ असते! पण यात सगळ्यात मोठी गोम अशी आहे की, हे कर्मफळ मात्र ज्यांनी ते कर्म केले नाही त्यांनाही निमूटपणे भोगावेच लागते.

मंडळी, तमाशाच्या फडावर आधी नांदी होते, मग गण-गवळण रंगते, गवळणींचा रस्ता अडवला जातो आणि ही सगळी रंगतदार पूर्वतयारी झाल्यावर मग मूळ वगाला  सुरुवात होते. तसंच, आता मालकांचे आभार मानून आपली नांदी आणि गणगवळण पार पडली आहे. आता मुख्य वगाकडे वळुया...

सध्याच्या देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकूया. तुमचे विचार आणि विश्लेषणाचे स्वागत आहे....

 


वाचन संख्या 123
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by विजुभाऊ

आपल्या हातात काही राहिलं नाही. च्यायला, सगळं व्यवस्थित करुन आणलं होतं.
धागा प्रकाशित होत नव्हता येरर होता, झटल्यानंतर एकदाचा धागा प्रकाशित झाला.

आपण टाकलेले दळण कसंय,  आता निवांत पाहावं म्हटलं तर, सगळ्या एचटीएमलच्या लेंड्या
धाग्यात पसरुन गेल्या. सर्व सुरळीत झाल्यावर करतो दुरुस्ती.

टंकायचं कामही अवघड झालं. खात्या संपादनातून बदल करता येईल. पण सध्या त्यावरही मर्यादा आहेत.
दुसीकडून टायपून आणलं.

-दिलीप बिरुटे


 

१. इराण इजरायल अमेरिका युद्धाचा  नवा टप्पा आणि पाकिस्तानी मध्यस्थी यावर टिप्पणी 

https://youtu.be/Fun_PEUpASg?si=L1fhxoEmb-0f6FZy

२. अमेरिका उपाध्यक्ष जेडीवान्स यांनी एक वेगळेच मत नोंदवले. "इराण जे करत आहे ते यांची तुलना wife's right to skydive"शी केली. अमेरिकन महिलांनी यास आक्षेप घेतला. "बायकांनी नवऱ्याचं ऐकून निर्णय घ्यायचे का?"

३. इकडे भारतात महिला आरक्षण विधेयक लोकसभेतील एकूण जागांच्या संख्येशी निगडित असल्याने दक्षिण भारतातील राज्यांनी विरोध केला. ठराव फेटाळला गेला. घटनादुरुस्तीसाठी लागणारी दोन तृतियांश मते मिळवू शकला नाही. पण विरोधी पक्ष महिलांच्या विरोधात आहेत असा कल्लोळ करायला सत्ताधारी मोकळे झाले.


युद्धातल्या घडामोडींचा नीट अर्थ लागणे अवघड झाले आहे. अत्यंत तपशिलात जाऊन न्यूज फॉलो करणं वेळेअभावी शक्य होत नाहीये. इथे वाचून काहीतरी उलगडा होईल अशी आशा. उदा. अमेरिकेने मध्ये नाकाबंदीच केली. किंवा आजकालच एक इराणी नौका ताब्यात घेतली. यातून युद्धाचा कोणता उद्देश साध्य होतो आहे ? फक्त इराणची आर्थिक नाकेबंदी इतकाच का? व्यापारी जहाजे , कोणत्याही देशाची, अडवणे, हे तंत्र यापूर्वीही युद्धात वापरलं जात होतं का?


In reply to by गवि

अधिक स्पष्टतेसाठी.. समजा एखादी व्यापारी बोट अडवली, पकडली, ताब्यात घेतली, तर तिच्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना काय म्हणून ताब्यात ठेवतात ? युद्धकैदी ? की अन्य गुन्हेगार ?


In reply to by गवि

वरच्या विडिओत १२:५२ येथे इराणने स्पष्ट केलंय की आंतरराष्ट्रीय कायदा लागू करा. म्हणजे अमेरिका जे करतोय ते बेकायदा आहे.