✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माहिती: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष

व
विवेकपटाईत यांनी
Tue, 09/30/2025 - 10:15  ·  लेख
लेख
या वर्षी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. अजून पर्यन्त मिसळपाव वर देशातील सर्वात मोठ्या संस्कृतिक आणि सामाजिक संघटणे बाबत एक ही लेख आला नाही. माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी. आज RSS च्या ५ लाखांहून अधिक शाखा देशभर कार्यरत आहेत. या शाखा सांस्कृतिक राष्ट्रवाद, व्यक्तिमत्त्व विकास, आणि नैतिक शिक्षण यावर भर देतात. विद्या भारती ही शैक्षणिक संस्था १२,७५४ शाळा चालवते, जिथे भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण दिले जाते आणि आधुनिक विषयांचाही समावेश असतो. सेवा भारती ही सामाजिक संस्था आरोग्य, शिक्षण आणि आपत्ती मदतीसाठी हजारो प्रकल्प राबवते, विशेषतः दुर्बल आणि दुर्गम भागांमध्ये. राष्ट्र सेविका समितीसारख्या स्त्री संघटनांद्वारे महिलांना नेतृत्व आणि सांस्कृतिक प्रशिक्षण दिले जाते. या सर्व संस्था मिळून शिक्षण, सेवा आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देतात. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम सध्या देशभरातील ६३,९२६ वनवासी गावांपैकी २१,८२९ गावांमध्ये विविध सेवा प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पांमध्ये शाळा, बालवाडी, निवासी वसतिगृहे, आध्यात्मिक केंद्रे, दवाखाने आणि आरोग्य रक्षकांचे कार्य समाविष्ट आहे. महाराष्ट्रातील ५,६०० वनवासी गावांपैकी सुमारे २,००० गावांमध्ये आश्रमाचे कार्य सक्रिय आहे. याशिवाय, शिक्षण व आरोग्य सेवांबरोबरच ११३ कृषी विकास केंद्रेही कार्यरत आहेत, जी स्थानिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी मदत करतात. १९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धकाळात RSS ने देशसेवेचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वयंसेवकांनी रक्तदान, अन्नवाटप, मदत शिबिरे, आणि अनेक ठिकाणी प्रत्यक्ष सीमेवर सैनिकांना मदत केली. या योगदानाची दखल घेत, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६३ साली, २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात RSS च्या स्वयंसेवकांना पथसंचलनासाठी आमंत्रित केले. महात्मा गांधी यांनी १९३४ साली वर्धा येथे संघाच्या शिबिराला भेट दिली. त्या वेळी डॉ. हेडगेवार जिवंत होते. गांधीजींनी शिबिरातील शिस्त, अस्पृश्यतेचा अभाव आणि साधेपणा पाहून संघाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले, “संघाची सेवा आणि आत्मत्याग यावर आधारित प्रेरणा ही संघाला बळकट करणार आहे.” हे उद्गार ‘हरिजन’ साप्ताहिकात २८ सप्टेंबर १९४७ रोजी प्रसिद्ध झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ जानेवारी १९४० रोजी कराड (सातारा) येथे संघाच्या शाखेला भेट दिली. त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला आणि संघाच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण केले. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले, “जरी काही मुद्द्यांवर मतभेद असले, तरी मी संघाकडे आपुलकीच्या भावनेने पाहतो.” ही घटना ‘केसरी’ दैनिकात ९ जानेवारी १९४० रोजी प्रसिद्ध झाली होती. देशावर जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतात किंवा कोरोना सारखे आजार पसरतात, तेव्हा आरएसएसचे कार्यकर्ते तत्काळ आपदाग्रस्त जनतेच्या सेवेसाठी सज्ज होतात. १९९३च लातूर भूकंप, २००१ गुजरात भूकंप, २०१३ उत्तराखंड पूर, २०१८ केरळ पूर अशा अनेक आपत्तींमध्ये संघाने मदत शिबिरे, वैद्यकीय सेवा आणि पुनर्बांधणीचे कार्य केले. हजारो कुटुंबांना नवजीवन मिळवून देण्यात संघाचा सेवाभाव महत्त्वाचा ठरला. २००१ साली कच्छ जिल्ह्यातील भूकंपानंतर, आरएसएस आणि सेवा भारतीच्या स्वयंसेवकांनी भुज, अंजार आणि गांधीधाम परिसरात शेकडो मदत शिबिरे उभारले. अन्न, पाणी, औषधे आणि तात्पुरते निवारे पुरवण्यात आले. हुनरशाला फाउंडेशन आणि कच्छ महिला विकास संघटन यांच्या सहकार्याने पारंपरिक भुंगा घरांची रचना पुन्हा उभी करण्यात आली. स्थानिक मजुरांना भूकंप प्रतिरोधक बांधकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आणि गुजराती भाषेत मॅन्युअल तयार करून मार्गदर्शन करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात, RSS चे ५ लाखांहून अधिक स्वयंसेवक रस्त्यावर उतरून गरजूंना मदत करत होते. काही स्वयंसेवकांनी आपला जीव गमावला, तरीही सेवा थांबली नाही. पाच जून २०२१ पर्यंत, म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तानच्या सीमांपासून ते जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारण्यात आली. ११८ शहरांमध्ये कोविड केअर सेंटर्स, २८७ शहरांमध्ये आयसोलेशन सेंटर्स, ५ कोटी भोजन पॅकेट्स, ७३ लाखांहून अधिक कुटुंबांना राशन, आणि ४४ लाख स्थलांतरित मजुरांना सेवा पुरवण्यात आली. २०२५ मध्ये, देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये संघाने पुन्हा ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारून लाखो गरजूंना अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवली. शहरातील निवासी असो की वनवासी – सर्व भारतीयांची सेवा करणे आणि भारताला परम वैभवशाली बनविणे हेच आरएसएस च मुख्य ध्येय आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
20954 वाचन

💬 प्रतिसाद (160)

प्रतिक्रिया

खिक्क! हा आंतरराष्ट्रीय “गंडा

अमरेंद्र बाहुबली
Fri, 10/03/2025 - 17:51 नवीन
खिक्क! हा आंतरराष्ट्रीय “गंडा” माहीत नव्हता. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

संघाबाबत बरीच माहिती

स्वधर्म
Fri, 10/03/2025 - 18:42 नवीन
या धाग्यामुळे संघाबाबत बरीच माहिती समजली. तसेच अनेक आक्षेपही समजले. पटाईत काका किंवा समाधान राऊत हे थोडा वेळ काढून मिपाकरांच्या आक्षेपांना आणि माझ्या प्रतिप्रश्नांना उत्तरे देतील अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments

अर्थात , प्रश्नांची उत्तरे देतो आहे म्हणून मी संघी असं काही असेल

समाधान राऊत
Mon, 10/06/2025 - 08:45 नवीन
तरी हरकत नाही, बऱ्याच वेळा संघ शब्द ऐकला की समजून घेण्याची प्रवृत्ती कमी होते.असो. 1&3 समाज कार्य करणारा संघ हा पूर्णपणे स्वयंसेवकांवरती उत्स्फुर्तपणे चालतो , त्यांना इथे कुठलाही पगार , मानधन दिले जात नाही , नोंदणी न करण्याची मुभा स्वतः कायदा यांना देतो, आपला कायदाच लवचिक आहे त्याला आपण काहीं करू शकत नाही, संघाच्या स्थापनेच्या काही वर्षांनी देश स्वतंत्र झाला ,तरी तत्कालीन सरकारने संघाला कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी वेगळे कायदे का केले नाहीत किंवा का आणु शकले नाहीत ,(( tax बद्दल बोलायचे झाले तर सरकारी अधिकारी केव्हाही ह्यांचे ऑडिट करू शकते , तिथे सरकारला मज्जाव केला नाही , परंतु असे ऑडिट झाल्याचे ऐकिवात नाही , वरचेवर बोलण्यात ही मंडळी पटाईत असते ,पण काही सरकार व पक्ष ह्यांना पैशाच्या हिशोबापेक्षा बंदी घालण्यात जास्त इंटरेस्ट होता !!)) परंतु त्यांच्या सह संस्था ची नोंदणी केल्या जाते , जसे की सेवा भारती , आणि यांच्या मार्फत पैशाच्या उलाढाली होत असतात , ती 92000 शिबिरे फक्त एकट्या संघाने नाही तर त्यांच्या सह संस्था यांच्या मार्फत सुधा झाली आहेत , परंतु आपसुकच नाव संघाचे लागते , ह्या संस्था कर स्वरूपणाच्या कक्षेत येतात , समांतर उदाहरण देतो , वारकरी संप्रदायाचे , संघ यापुढे काहीच नाही , आता वारकरी सांप्रदायाची नोंदणी कशी करणार आणि कुठे करणार नोंदणी करताना कुणाच्या नावे करणार आणिं करावी का , आणि सगळ्यात महत्वाचे ओळखपत्र तरी कसे द्यायचे , गंध लावेल ते वारकरी , पताका हाती घेईल तो वारकरी , विठोबाचे नाम घेईल तो वारकरी , इथे जात धर्म काही पाहिले जात नाही , सामाजिक , धार्मिक आणि देशाच्या विरोधात काम न करणाऱ्या संस्थात्मकतेची ची नोंदणी करण्याची गरज नाही , वारकरी संप्रदायाचे जरी कुठे नोंदणी नसली तरी त्यांच्या सह संस्था / उपसंस्था , वारकरी दिंडी मंडळ , गड संस्थाने , ह्यांची नोंदणी असते , वारकरी संप्रदायाचा आर्थिक कारभार सुधा ह्याच संस्था मार्फत चालतो, असेच संघ सुधा काम करतो , ह्या उदाहरणामार्फत समजून घेण्यास काही अडचण असणार नाही अशी अपेक्षा करतो , 2.बेकायदेशीर कामे किंवा अजेंड्याच्या व्यतिरिक्त कामे केल्यानंतर कुठली व्यवस्था किंवा कंपनी,संस्था,पक्ष त्याचे समर्थन करतो , आणि कुठली संस्था चांगले काम केल्यानंतर स्वतःचे नाव लावत नाही , कितीही लांबचा नातेवाईक असला तरी बरेच जण तो जसे काही ते घरातलाच आहे अशी ओळख दाखवतात , चांगल्या कामाचा पुरस्कार नाही तर कशाचा करायचा , संघ बेकायदेशीर कामे , देशविघातक कामे करतच नाही , संघ मुस्लिम विरोधी नाही , वरती कुजबुज वैगेरे कुणीतरी लिहिले आहे , परंतु सर तन जुदा बद्दल त्यांचे काहीच म्हणणे नाही असे दिसते , ही असली वाक्य देशाच्या समर्थनार्थ आहेत काय?? देव देश धर्म याबद्दल बोलत असताना ते कुणाला चुकीचे वाटत असेल तर अवघड आहे , हे लोक कोण आहेत हे वेगळे सांगणे लागत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

चमच्याने चांगले भरवलंय. पण

शाम भागवत
Mon, 10/06/2025 - 11:32 नवीन
चमच्याने चांगले भरवलंय. पण मला वाटते पहिल्या प्रतिसादात दिलेली लिंक पाहिली तर मराठीत सगळी माहिती मिळेल. अजिबात तोचतोच पणा नाही. मुलाखतकार व मुलाखत घेणारे अजिबात संघाशी संबंधीत नाहीत. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समाधान राऊत

धन्यवाद

स्वधर्म
Mon, 10/06/2025 - 17:06 नवीन
आपल्या प्रतिसादाचे शिर्षक 'अर्थात , प्रश्नांची उत्तरे देतो आहे म्हणून मी संघी असं काही असेल..' हे समजले नाही. म्हणजे आपण संघाच्या वतीने उत्तरे देत आहात पण संघाला जबाबदारीतून मुक्त करत आहात काय? खरे तर संघ सभासदांना सोयीनुसार आपले किंवा संबंध नसलेले म्हणतो, हाच एक आक्षेप होता. सर्वप्रथम आपण द्वेषपूर्ण भाषा न वापरता उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल आभार. द्वेषपूर्ण प्रतिसादांची उदाहरणे या धाग्यावर अनेक आहेत. शिवाय इतर प्रतिसादकांनी सांगितलेले द्वेष पेरण्याच्या बाबतीतले संघातील अनुभव दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्यामुळे द्वेष हे संघाचे एक महत्वाचे इंधन आहे व संघप्रेमींचा तो एक खास पैलू आहे असे मानावे लागेल. गामा पैलवान यांचा प्रतिसाद हे 'संघ व द्वेष' कसे अविभक्त आहेत याचे याचे उत्तम उदाहरण आहे. ते संघस्वयंसेवक आहेत किंवा कसे ते आपल्याप्रमाणे परिस्थितीनुसारच ठरेल हेही आलेच. दुसर्‍या अनेक संघप्रेमींच्या बहुतेक प्रतिसादात दुसर्‍यांच्या हेतूबद्दल संशय, त्यांना कमी दाखवण्याची वृत्ती व 'आपण, आपला इतिहास, आपले काम, आपले नेते' हे सर्व जगात भारी आहेत असा ठाम विश्वास हे दिसून येतात. आपणच वर म्हटल्याप्रमाणे सहसा कोणताही स्वयंसेवक हा हिशोब पाहत किंवा विचारत नाही. असे प्रश्नच न विचारणारे व दुसरा पर्यायी विचार न स्विकारणारे कट्टर स्वयंसेवक तयार करणे, संघाचे यशच आहे. परंतु ते देशाला हितकारक आहे असे मात्र म्हणता येणार नाही. आपण वारकरी संप्रदायाचे दिलेले उदाहरण थोडेसे वेगळे आहे असे वाटते. संत तुकाराम महाराज संस्थान, देहू व संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी हे वारीचे अनुक्रमे तुकाराम व ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे मुख्य आयोजक आहेत व दोन्ही संस्था नोंदणीकृत आहेत. त्यांचे जबाबदार पदाधिकारी असावेत असे वाटते. शिवाय वारकर्‍यांचे सर्व ध्येय हे आंतरमुखी भक्ती, परमेश्वर प्राप्ती इ. असून आपल्या मताशी जुळणार्‍या पक्षाच्याच हातात सत्ता असावी इ. प्रकारची ध्येये ते ठेवत नाहीत असे वाटते. नर नारी बाळें अवघा नारायण । ऐसें माझें मन करीं देवा ॥1॥ न यो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद । अवघा गोविंद निःसंदेह ॥ध्रु.॥ या अभंगात द्वेष मनात नसावा अशी प्रार्थना केलेली आहे तर संघ प्रेमी व स्वयंसेवक इथे कसे व्यक्त झालेत ते स्पष्टच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समाधान राऊत

असे असले तरी...

स्वधर्म
Mon, 10/06/2025 - 17:38 नवीन
माझ्या परिचयात एक संघस्वयंसेवक आहेत. ते रुग्णोपयोगी साहित्याचे केंद्र चालवतात. त्यांच्या मुळे व संघाच्या या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना मदत झाली आहे. तसेच ते महिन्यातून एकदा ठराविक खेड्यात जाऊन औषधे व वैद्यकीय सेवा पुरवतात. असे अनेक उपक्रम चालू असतील व संघाचे काही निरलस कार्यकर्ते तिथे काम करत असतील. त्याचे मूल्य मान्य करायला मला तरी हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

मूळचे संघाचे पण पुढे

रामचंद्र
Mon, 10/06/2025 - 23:44 नवीन
मूळचे संघाचे पण पुढे संघनेतृत्वाशी मतभेद झाल्याने/स्वतंत्रपणे संघतत्त्वज्ञानावर आधारितच पण खरेखुरी, उपयुक्त समाजसेवा करणारे असे अनेक आहेत, म्हैसाळच्या मधुकरराव देवलांपासून ते अगदी अविनाश धर्माधिकारी इ. पर्यंत. आणि या सगळ्यांच्या निरलस कार्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ 'परिवार' म्हणून मातृसंस्थेला होतोच. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कितीही मतभेद असले तरी आपल्या मतभेदांमुळे मातृसंस्थेला हानी पोहोचू नये, याबाबत संबंधित व्यक्ती कमालीच्या दक्ष असतात. 'परिवारा'चा पाया घालण्याच्या देवरसांच्या कार्यामुळेच खरं तर मातृसंस्थेला आजचे सर्वार्थाने सोन्याचे दिवस आले आहेत असं म्हणता येईल. अन्य प्रचारतंत्रांच्या जोडीला सोशल मीडियाचा इतका परिणामकारक वापर हा खरं तर अभ्यासाचा विषय ठरावा. नीतिनियमांचे अनावश्यक ओझे अजिबात न बाळगणे, लवचिकता, व्यवहारवाद, उपयुक्ततावाद, डावपेच, दीर्घसूत्री धोरण, अद्भुत चिकाटी यांसारख्या बाबी विरोधक लक्षात घेत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

काही जण कधी संघाशी संबंधित

सुबोध खरे
Mon, 10/06/2025 - 18:39 नवीन
काही जण कधी संघाशी संबंधित होते आणि नंतर त्यांनी अशोभनीय वर्तन केले म्हणून बहुसंख्य लोक संघाला दोषी धरतात याचे आश्चर्य वाटत नाही. कारण नथुराम गोडसे हे केवळ एकेकाळी संघाशी संबंधित होते म्हणून गांधीहत्येनंतर काँग्रेसी लोकांनाही ७५ वर्षे संघालाच जबाबदार धरले आहे. गांधीहत्येच्या खटल्यात कोणताही पुरावा सापडला नाही तरीही. अशी स्थिती गेली ७५ वर्षे असताना संघ प्रेमी अरे ला का रे उत्तर देणारच ठकासी असावे महाठक। उद्धटासी उद्धट। खटनटासी खटनट। झालेची पाहिजे॥ जय जय रघुवीर समर्थ या अभंगात द्वेष मनात नसावा अशी प्रार्थना केलेली आहे तर संघ प्रेमी व स्वयंसेवक इथे कसे व्यक्त झालेत ते स्पष्टच आहे. बाकी इथलेच अनेक प्रतिसाद बिनबुडाचे पण संघद्वेषाने परिपूर्ण असे आहेत एवढे नोंदवून मी खाली बसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

आम्ही नाही बा

अभ्या..
Tue, 10/07/2025 - 20:21 नवीन
गांधीहत्येच्या खटल्यात कोणताही पुरावा सापडला नाही तरीही.
कसा सापडणार पुरावा? नथुरामला लेटरहेडवर वर्क ऑर्डर दिलेली का मिटिंग मिनिटस रेकॉर्ड? जी संस्था साधी नोंदणीकृत नाही, कितीजण येतात आणि काय करतात त्याची माहिती नाही, कागदोपत्री कसलाच व्यवहार नाही त्यांचा काय पुरावा मिळणार? मिळाला तरी मातृसंस्था तिची लेकरे काय उपद्व्याप करतात आणि त्यांना पाठबळ कशाचे हे सोयीस्करपणे लपवतात ते काय पुरावा सोडणारेत. . त्याण्तर संघावर बंदी घालताना संघाला नुकतेच प्रातःस्मरणीय झालेले देशाचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल ह्यांनी स्रसंघचालक गोळवलकरांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट मुद्दे मांडलेत. त्यांनी म्हटले की संघाने द्वेषाने भरलेले "जातीय विष" पसरवले आहे. "विषाचा अंतिम परिणाम" "गांधीजींच्या मौल्यवान जीवनाचे बलिदान" होते. पटेल यांनी नमूद केले की संघाने सर्व सार्वजनिक सहानुभूती गमावली आहे, विशेषतः त्यांच्या सदस्यांनी मिठाई वाटून गांधींच्या मृत्युचा आनंद साजरा केल्याचा आरोप केल्यानंतर. गांधीजींच्या हत्येच्या कटात "हिंदू महासभेचा अतिरेकी गट सहभागी होता" आणि संघाच्या कारवायांमुळे "सरकार आणि राज्याच्या अस्तित्वाला स्पष्ट धोका" निर्माण झाला होता, असा त्यांचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि ही काही अटींवर जुलै १९४९ मध्ये ही बंदी उठवण्यात आली, ती मन बदलल्यामुळे नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काही अटी मान्य केल्यानंतर. यामध्ये हे समाविष्ट होते: औपचारिक संविधान स्वीकारणे. भारतीय संविधान आणि राष्ट्रध्वजाशी निष्ठा राखण्याची शपथ घेणे. लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गांनी वचनबद्ध राहणे आणि एक संघटना म्हणून राजकारणापासून दूर राहणे. गोलवलकर यांनी या अटी मान्य केल्यानंतर ते "बंदी उठवण्यास उत्सुक" असल्याचे पटेल यांनी सांगितले. . ह्यांनंतर आजही ७५ वर्षानी रास्व संघाची शंभरी, विजयादशमी आणि म. गांधीची जयंती अशा योगावर Image removed. असे बोर्ड लागतात. द्वेष असा असतो आणि दिसतो सुध्दा. बोर्डावर कुणाचेही नाव नाही. काही ठिकाणी सकल हिंदू समाज. कोण आहे हा सकल हिंदू समाज हे उत्तर : या गटाच्या कारवायांना कायदेशीर आव्हाने आणि तपासणीचा सामना करावा लागला आहे, विशेषतः द्वेषपूर्ण भाषणाच्या आरोपांबाबत. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश: २०२३ च्या सुरुवातीला, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने समाजाच्या मेळाव्यांमध्ये संभाव्य द्वेषपूर्ण भाषणाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आणि त्यांच्या कार्यक्रमांचे व्हिडिओग्राफी करण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या निष्क्रियतेचा आरोप: महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन देऊनही, २०२४ च्या अखेरीस आलेल्या अहवालांमध्ये असे सूचित केले गेले आहे की राज्यात द्वेषपूर्ण भाषणाच्या प्रकरणांचा खटला चालवणे थांबले आहे. सकल हिंदू समाजाने "लव्ह जिहाद", धार्मिक धर्मांतर आणि गोहत्या विरोधी कायदे यासह सरकारकडून विशिष्ट कायदे करण्यासाठी सक्रियपणे लॉबिंग केले आहे. हिंदू संघटनांचा युती: या युतीमध्ये विश्व हिंदू परिषद (VHP), बजरंग दल, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती आणि इतर सारख्या उजव्या विचारसरणीच्या गटांचा समावेश आहे. सकल हिंदू समाजाचे वर्णन औपचारिक, श्रेणीबद्ध संघटना नसून एक केंद्रीकृत "बॅनर" किंवा सामूहिक म्हणून केले जाते. हे युती विविध हिंदू गटांना आणि त्यांच्या सदस्यांना रॅलींमध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र आणते, जे बहुतेकदा सोशल मीडियाद्वारे समन्वयित केले जातात. कीती छान ना. १०० वर्षे एकच पॉलीसी चालवायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

प्रतिसाद आवडला.

अमरेंद्र बाहुबली
Tue, 10/07/2025 - 22:03 नवीन
प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

१०० वर्षे एकच पॉलीसी चालवायची

सुबोध खरे
Wed, 10/08/2025 - 10:07 नवीन
१०० वर्षे एकच पॉलीसी चालवायची. जळजळ दिसून येते आहे. बरंच अवडंबर काढून टाकलं तर सत्य फारसं दिसत नाही. गांधीजींना काँग्रेसने देवत्वाला पोचवलं त्यामुळे त्यांच्या विरुद्ध काहीही बोललं तरी ते अब्रह्मण्यमच होईल याची काँग्रेस ने काळजी घेतली त्याचाच हा परिपाक आहे. असं असतं तर नथुराम गोडसे यांचे न्यायालयात केलेले पाच तासाचे वक्त्यव्य यावर प्रतिबंध आणण्याची काँग्रेस वर पाळी का यावी? सरदार पटेलांना तसं बोलणं भाग होतं याची अनेक कारणं आहेत. पण ती समजून घेण्यासाठी विवेकवादी विचारसरणी असावी लागते. काँग्रेसने संघावर अनेक वेळेस बंदी आणण्याचा प्रयत्न केला/ बंदी आणली. पण तरीही १०० वर्षानंतर संघ जिवंत असून वाढतोच आहे. कारण तुम्हीच शोधा नाही तर द्या सोडून. नाही तरी भोंगळ समाजवाद्यांनी द्वेष सोडून केलंच काय आयुष्यभर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पण तरीही १०० वर्षानंतर संघ

अमरेंद्र बाहुबली
Wed, 10/08/2025 - 12:38 नवीन
पण तरीही १०० वर्षानंतर संघ जिवंत असून वाढतोच आहे. जगात, देशात अनेक संस्था आहेत ज्या पडीक आहेत, १०० काय २०० वर्षापासून त्यात आणखीन एकाची भर दुसरे काय? जी संस्था नोणदणीकृत नाही, कोण येतय कोण जातंय ह्याचा काही हिशेब नाही, ती वाढते आहे की संपते आहे हे कसे कळले? संघ १९२५ ला स्थापन झाला आणी त्या नंतर उण्यापुर्या २२ वर्षांनी भारत देश स्वतंत्र झाला एवढ्या वर्षात संघाने काय डाइव लावले? काहीही नाही? कसे लावणार? इंग्रजांच्या चाकरीतच होते म्हणतात संघवाले, बरं हिंदूधर्मासाठी काही केले म्हणावे तर जातीनिर्मूलन, सामनात, हिंदूसेवा? ह्यापैकी संघाने काय केले? संघाचा अजेंडाच जातीनिर्मूलन होऊ नये असा आहे! काँग्रेसने एकाच वेळी इंग्रजांविरुद्ध लढा, जातीनिर्मूलन, सामाजिक सुधारणा केल्या! संघाचा ना देशाला फायदा होता ना हिंदूना! आणी आजही नाही. नेहरुद्वेष केल्याशिवाय त्यांची सकाळ होत नाही नी गांधीद्वेष केल्याशिवाय त्यांना झोप येत नाही! नेहरूनी १० वर्षे जेल मध्ये काढले, गोळवलकर, हेडगेवार हे किती वर्ष जेल मध्ये होते? संघ असूनही उपयोग नाही, नसला तरीही देशाला शष्प फरक पडणार नाही! संघ म्हणजे फक्त वयाने वाढलेली संस्था, बुद्धी अजुआनही मध्ययुगीन विचारसरणीची आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

त्यामुळे द्वेष हे संघाचे एक महत्वाचे इंधन आहे.

कर्नलतपस्वी
Mon, 10/06/2025 - 19:23 नवीन
द्वेष आणी प्रेम परस्पर विरोधी भाव असले तरी बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा. एखादी संस्था शभंर वर्ष प्रतिकूल परिस्थितीशी झगडून आपले अस्तित्व टिकवून ठेवते आणी एक्सपोनेनशियली वाढते यातच सर्व आले. कितीही स्पष्टीकरण दिले तरी इथे कुणाचेही मतपरिवर्तन होणे शक्यच नाही उलट वाद वाढेल आणी मला त्यात रूची नाही एवढेच बोलून खाली बसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

बाडिस!

नावातकायआहे
Mon, 10/06/2025 - 19:25 नवीन
बाडिस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

अहाहा

अभ्या..
Tue, 10/07/2025 - 20:25 नवीन
उलट वाद वाढेल आणी मला त्यात रूची नाही एवढेच बोलून खाली बसतो.
" तुम्ही खूप छान सुरळीच्या वड्या आणि फतफतं करता पण मला आज भूक नाहीये " इतकुसं सांगायला हॉटेलात आला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

बरेच समाजवादी मी संघाच्या

सुबोध खरे
Fri, 10/03/2025 - 18:45 नवीन
बरेच समाजवादी मी संघाच्या शाखेत गेलो होतो तेथे माझा भ्रमनिरास कसा झाला अशा अनेक कहाण्या नेहमी प्रसारित करत असतात. संघाबद्दल प्रचंड द्वेष त्यांच्या मनात असतो. यामुळेच समाजवाद्यांनी संघाला उत्तर म्हणून राष्ट्र सेवा दल हि काढले होते पण त्यात काम करणाऱ्या समाजवाद्यांची लग्ने जमवण्यापलीकडे राष्ट्र सेवा दलाने भरीव असे काही केले नाही. त्यामुळे ते काही काळाने बंद पडले. बाकी एकंदर भोंगळ विचारसरणी आणि अनुयायांपेक्षा नेते जास्त अशी स्थिती असल्याने भारतभर सर्वत्र समाजवादाची पीछेहाट झाली. आता केवळ संघावर खार खाण्यापलीकडे त्यांच्याकडे इतर काही उद्योग राहिलेला नाही. त्यामुळे असे बरेच वैफल्यग्रस्त समाजवादी संघावर टीका करताना सर्वत्र दिसणारच.
  • Log in or register to post comments

मला असं वाटतं की द्वेष

शाम भागवत
Sat, 10/04/2025 - 07:09 नवीन
मला असं वाटतं की द्वेष करणाऱ्यांची शक्ति कमी कमी होत जाते आहे. त्यामुळे द्वेष करणारे संघाच्या फायदा करून देतात असंच दिसून येतं. गेल्या १०-१५ वर्षात संघ खूपच बदलला आहे. विरोधकांना मात्र संघ फक्त हाप पॅंट वरून फुलपॅंटीत एवढाच बदल झालेला दिसतोय. :) विरोधक त्याच भ्रमात असलेले बरे. _/\_ जागे झाले तर कदाचित संघाशी लढण्यासाठी एखादा उपाय शोधून काढायचे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

भरली.

भृशुंडी
Sat, 10/04/2025 - 00:23 नवीन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष भरली. बाकी वेळ काय ते ठरवील. चालू द्या.
  • Log in or register to post comments

:)

शाम भागवत
Sat, 10/04/2025 - 06:57 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भृशुंडी

शंभर वर्ष भरली. कुणाची....????

कर्नलतपस्वी
Sat, 10/04/2025 - 09:12 नवीन
शंभर वर्ष भरली. बाकी वेळ काय ते ठरवील. चालू द्या. कुणाची भरली याबद्दल आता तरी शंका नाही. बाकी वेळ काय ठरवेल ते बघू......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भृशुंडी

शंभरी भरली :)

अमरेंद्र बाहुबली
Sat, 10/04/2025 - 09:22 नवीन
शंभरी भरली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भृशुंडी

शंभर वर्षे तितकीशी अनुकूल

रामचंद्र
Sat, 10/04/2025 - 01:00 नवीन
शंभर वर्षे तितकीशी अनुकूल परिस्थिती नसूनही एखादी विचारसरणी जिवंत राहते, इतकेच नव्हे तर भौतिक-व्यावहारिकदृष्ट्या सामर्थ्यवान झालेली दिसते असे तर असेल तर विरोधकांनी त्या कारणांचा बारकाईने अभ्यास करायला हवा. याच्यासारखे उदाहरण म्हणजे त्यातल्या त्यात एकोणिसाव्या शतकात मूळ धरलेली ज्यू लोकांची चळवळ म्हणता येईल. दोन्हींच्या प्रणेत्यांचे व्यवहाराचे भान, चिकाटी आणि झोकून देण्याची वृत्ती या गोष्टींत विलक्षण साम्य आहे.
  • Log in or register to post comments

गेल्या १० वर्षात संघ खूप

शाम भागवत
Sat, 10/04/2025 - 06:57 नवीन
गेल्या १० वर्षात संघ खूप बदललाय. पण जुन्या अनुभवांवर आधारित संघ विरोधक त्याच जुन्या भूमिकेत असलेले बरे. ते त्यांचे विचार मांडत राहतील तेवढे ते संघाच्या फायद्याचे आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

जुन्या अनुभवांवर आधारित संघ विरोधक त्याच जुन्या भूमिकेत असलेले ब

कर्नलतपस्वी
Sat, 10/04/2025 - 07:24 नवीन
सहमत. सद्य परिस्थिती पहाता संघ अधिक बलशाली व्हावा हिच श्रींची इच्छा असावी. यदा यदा ही.....
  • Log in or register to post comments

कायप्पा वर आलेले ढकल पत्र!

नावातकायआहे
Sat, 10/04/2025 - 12:48 नवीन
आज संघ परिवाराला शंभर वर्षे झाली. देशभरात सर्वदूर देखणं संचलन पाहायला मिळालं. आदरणीय पंतप्रधानांनी त्याबद्दल एक पोस्टाचे तिकीटही जारी केलं. सगळं भव्य दिव्य दिसलं.... कारण संघ परिवाराचं कामच तेवढं भव्य दिव्य आहे. केव्हाही कोठेही संकट येवो... देशाचा कोणताही कोपरा असो हा परिवार कसलीही अपेक्षा न करता रुजु होतो... न बोलता न काही आवाज करता काम करत राहतो. खरोखर अभिमान वाटावा असं हे संघटन आहे... हा विषय आज लिहावासा वाटला कारण आदरणीय मोहन भागवतांचं भाषण ऐकत होते. संघप्रमुख म्हणून अतिशय आदर्श व्यक्तिमत्व आहे ते! ते आजच्या भाषणात म्हणत होते, मला माझा देश जसा हवा, तसं मी वागायला हवं हे वाक्य सकाळपासून मनात रूंजी घालत होतं. देश जसा हवा तसं वागायला हवं.... केवढा मोठा आशय असलेलं वाक्य आहे हे! मला देश स्वच्छ हवा मला स्वतः स्वच्छता घरात घराबाहेर पाळायला हवी. मला देश भ्रष्ट नको तर मला शपथ घ्यायला हवी... मी भ्रष्टाचार करणार नाही, मी पैसे देणार नाही, घेणारही नाही. मला माझा व्यवसाय धंदा नीट चालावा असं वाटत असेल, तर मी स्वतः स्वदेशी उत्पादनांवरच भर देईन, तीच वापरेन. मी माझ्याच देशवासीयांचे पाय न ओढता पुढे जाईन. माझा माझ्या देशातल्या प्रत्येक व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असेल, त्यामुळे त्या व्यवस्थाना धरून काम करताना मला वाईट वाटणार नाही... माझा देश जर नियमबद्ध असावा असं वाटत असेल, तर मी वाहतुकीचा नियमही तोडायचा प्रयत्न करणार नाही. शिक्षण पद्धती उत्तम हवी असेल, तर मी शिक्षणामधली कोणतीही खोटी नाटी पद्धत वापरणार नाही. मी अतिशय सच्चाईने अभ्यास करेन. आणि योग्य ती दिशा शोधत माझ्या आयुष्याचा मार्ग सचोटीच्या रस्त्यावरच आखेन. देश जर उद्योगरत हवा असं वाटत असेल तर मलाही सतत कार्यरत राहायला हवं ना!... मी जर म्हणत राहिलो की प्रत्येक गोष्ट देशाने मला द्यावी, मी मात्र काहीच करणार नाही हे कसं चालेल? असे अनेक मुद्दे समोर आले, डोक्यात फिरत राहिले. सततच मी चा विचार डोक्यात राहिला तर समोर उभी भोगवादी संस्कृती आपणच निर्माण केली नाही का? यूके यूएस सगळ्यांनाच छान वाटेल, पण ते माझं नाही ना! मग जे माझं आहे ते जिवापाड सांभाळायला हवं ना!.... माझा धर्म, माझे गड किल्ले, माझे प्रदेश, माझी जंगलं, सगळं खूप सुंदर आहे. शिवाय किती विविधता आहे.... इथे वाळवंट आहे, बर्फाच्छादित हिमालय आहे, राकट सह्याद्री अरवली निलगिरी आहे, हिरवीगार वनश्री आहे, लांबच्या लांब समुद्रकिनारे आहेत, उत्तम ऐतिहासिक वास्तू आहेत! काय नाही या देशात.... सगळं काही आहे... आपण डोळे उघडून त्याला आपलं म्हणत नाही... तुम्ही फक्त या गोष्टीवर प्रेम करण्याची आवश्यकता आहे. देशाबद्दलचा अभिमान विकत मिळत नाही, तो रक्तातल्या प्रत्येक थेंबात रुजवावा लागतो. माझ्याआधी देश उभा राहायला हवा...मी त्यानेच घडेल. मी घडवणं म्हणजे पैसा गाड्या दागदागिने कपडे परदेशी दौरे करणं नाही, तर माझ्या पलीकडे पाहत काही समाजाप्रित्यर्थ करणं.... आपला देश न पाहता, त्याच्या भल्याकरिता काहीही न करता मनुष्यजन्म घालवण यासारखं महापातक नाही. देशाबद्दल, देशाच्या सेनेबद्दल, देशाच्या न्याय व्यवस्थेबद्दल अभिमान हे प्रत्येकाचंच आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येकाची तयारी असणे हेच भारतीय असल्याचं लक्षण आहे. मी भारतीय आहे याचा जर अभिमान असेल, तर माणूस देशात चुकीचं वागणार नाही आणि परदेशात गेल्यावरही देशाची प्रतिमा उन्नत राहावी म्हणून पराकोटीचे प्रयत्न करेल. मी काही चुकीचे वागलो, तर माझ्या देशाचं नाव खराब होईल या जाणिवेने तो जागरूकच राहिल.... मला संघप्रमुखांचं वाक्य खूपच अंतर्मुख करून गेलं... देशाबद्दल वाईट बोलणं, देशद्रोह करणं खूप सोपं आहे; पण इतकी आक्रमणे झाल्यावर वेगाने प्रगतीपथावर नेण्यासाठी देशाची बांधणी करणं खूपच अवघड काम आहे ना!... आपल्याला काही करता येत नसेल तर मोडता तर घालू नये ना! बघा पटतंय का????.... उर्मी निवर्गी, कोथरूड, पुणे लेख नावासहित पुढे पाठवण्यास हरकत नाही.
  • Log in or register to post comments

हा हा हा

माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 10/04/2025 - 23:15 नवीन
मजेशीर आहे पत्र. केंद्र सरकारमधील नेत्यांनी त्यांनी सांगितलेल्या विचारांचे पालन केले तरी देश बर्यापैकी पुढे जाईल असे आमचे मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

नमस्ते सदा

युयुत्सु
Sun, 10/05/2025 - 10:16 नवीन
नमस्ते सदा संघगीताच्या पुनर्निर्माणामध्ये आयात केलेल्या श्वेतकाय संगीतकारांचा थवा अवतरलेला बघून भारत देशात संगीतकारांचा दुष्काळ पडला की "आत्मनिर्भरतेला चुना" लावला असा प्रश्न पडला. आणि अंमळ मोउज वाटली. https://youtu.be/gjx8Uqy7dZo?si=l8V4nv-h6Ys-GTT3
  • Log in or register to post comments

मजा घ्या व आनंदी रहा. :)

शाम भागवत
Sun, 10/05/2025 - 19:03 नवीन
मजा घ्या व आनंदी रहा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

अन्न आणि विष्ठा

गामा पैलवान
Sun, 10/05/2025 - 22:47 नवीन
काही प्राण्यांना विष्ठाच शोधायची असते. त्यांना अगदी पंचेंद्रियांद्वारे पुरेपूर आस्वाद घ्यायचा असतो. त्यांनी जरूर घ्यावा. काही हरकत नाही. फक्त एक गंमत सांगतो. अनेक प्राणी ठिकठिकाणी तिला शोधतात. पण मिळण्याची हमी नसते. विष्ठा हमखास मिळण्याचं ठिकाण अन्न आहे. तिथे नक्की लाभते. फक्त वांधा असाय की मानवप्राणी अन्नाला पूर्णब्रह्म समजतात. त्यामुळे पूर्णब्रह्मात विष्ठा शोधावी का, असा प्रश्न आहे. प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार स्वत:लाच उत्तर द्यायचं आहे. शोधली तर मिळणार हे नक्की. -गामा पैलवान
  • Log in or register to post comments

शोधला तर द्वेष दिसतो अन्यथा नाही

गामा पैलवान
Mon, 10/06/2025 - 18:56 नवीन
स्वधर्म,
गामा पैलवान यांचा प्रतिसाद हे 'संघ व द्वेष' कसे अविभक्त आहेत याचे याचे उत्तम उदाहरण आहे.
पहिल्याप्रथम धन्यवाद. माझ्या प्रतिसादातील मुद्द्याची पुष्टी केल्याबद्दल तुम्हांस कुठे ठेऊ आणि कुठे नको असे झाले आहे. असाच लोभ राहू द्या. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

:-)

स्वधर्म
Mon, 10/06/2025 - 20:09 नवीन
तुमच्या सारखा प्रतिसाद केवळ चरम पातळीच्या द्वेषातूनच येऊ शकतो. तुमच्या पातळीला उतरुन दुसर्‍यांचा इतका द्वेष करणे, त्यांना हीन लेखणे जमणार नाही. त्यामुळे तुंम्ही जिंकलात! मजा करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

असहमती = द्वेष ?

गामा पैलवान
Mon, 10/06/2025 - 22:44 नवीन
असहमती म्हणजे द्वेष अशी तुमची व्याख्या दिसते आहे. आणि मला आनंदी ठेवल्याबद्दल मी ही व्याख्या मनापासून स्वीकारंत आहे. -गामा पैलवान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

संघ

कपिलमुनी
Tue, 10/07/2025 - 08:31 नवीन
१.संघाबद्दल काहीच वाईट नाही. २. संघाचे सगळे वाईट आहे.
  • Log in or register to post comments

अर्धाच प्रतिसाद प्रकाशित झाला..

कपिलमुनी
Tue, 10/07/2025 - 11:43 नवीन
१.संघाबद्दल काहीच वाईट नाही. २. संघाचे सगळे वाईट आहे. अशी मते व्यक्त केली जात आहेत , पण याच्या उलट परीस्थिति आहे. इतर सर्व संघटनांप्रमाणे संघात सगळेच वाईट नाही आणि सगळे चांगले नाही. कित्येक वर्षे संघात काम केले , शिक्षक , संघटक राहून प्रचारकांसोबत खुप काम केले आहे , नंतर वनवासी कल्याण आश्रम संस्थेच्या मार्फत काम केले.. तिथे बरेच इतर विचारांचे लोक भेटले .. हळूहळू संघाच्या मर्यादा कळत गेल्या.. संघ सगळाच वाईट नाही , पण त्यांनी मध्ययुगातल्या खुळचट कल्पना काढून टाकायला हव्यात..गांधी द्वेष, मुस्लीम द्वेष थांबवायला हवे.. एक प्रसंग आठवतो , एका सांयशाखेत भगत सिंग ची फाशी थांबवायला गांधीनी काहीच केले नाहि अशी चर्चा चालू होति.. ११-२० वर्षे सगळयांचे गांधी हरामखोर यावर एकमत झाले.. मी तेव्हा विचारले , १९३१ साली संघ होताच ..मग त्यांनी आंदोलन का नाही केले फाशी थांबवायला ?? मग थातूर मातूर उत्तरे ! हे असे बर्याच वेळा घडल्यावर कळले ,.. टीका करणे सोपे असते इतिहासावर टीका करणे तर फारच सोपे.. पण ग्राउंड वर्क करणे अवघड ! आणि मी संघापासून हळूहळू लांब होत गेलो .. द्वेष नसवा .. हिंंदूंची संघटना असावी, हिंदू साठी काम करावे . पण आंबेडकरांच्या वेळि संघ त्यांच्या बाजूने उभा राहीला नाही. हिंदू मधील जातीभेद मिटवायचा सखोल प्रतय्न संघाने केल नाहि . अशा ऐतिहासिक चुका संघाकडे पण आहेत.. असो , १०० वर्षे झाल्यावर संघ सर्व समावेशक होइल आणि लहान मुलांचे गांधी विरोधी, मुस्लीम विरोधी ब्रेन वॉश बंद करेल ही आशा आणि शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

संघामुळे मी प्रचंड

अमरेंद्र बाहुबली
Tue, 10/07/2025 - 12:43 नवीन
संघामुळे मी प्रचंड गांधीद्वेष्टा झालो होतो, पण जसजसा संघा पासून दूर होत नी सत्याच्या जवळ जात गेलो तसे गांधी कळत गेले, आज आपण विविध जातींचे हिंदू एकत्र आहोत , विविध प्रांतातले बहुभाषिक लोक एका देशाच्या धाग्याने जोडलो गेलो आहोत. विविध धर्माचे लोक एकत्र नांदत आहोत हे सगळ घडवून आणणारा एकमेव व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी हे जेव्हा कळले तेव्हा विस्मयचकित व्हायला झाले, त्याचबरोबर संघ किती द्वेष भरतो हे देखील लक्षात आले. अनेक संघात जाणारे लोक ओळखीचे आहेत, वयक्तिक ते प्रचंड चांगले आहेत. बऱ्याच लोकांचा संघात जायला म्हणजे फक्त दसऱ्याच्या मिरवणुकीत जायला नाईलाज असतो हे लक्षात आले, एरवी संघाच्या प्रात नि सांय शाखेत कुत्रही फिरकत नाही. लहान मुलाना खेळ खेळन्याचे आमिष दाखवून संघ शाखेत आणले जाते! जातीचा प्रेशर, संस्थेचा प्रेशर, आजूबाजूच्या लोकांनी ओढून ताणून नेणे अश्या विविध प्रकारे लोक जाऊन हजेरी लावतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

संघामुळे मी प्रचंड गांधीद्वेष्टा

स्वधर्म
Tue, 10/07/2025 - 16:13 नवीन
हेच मलाही जाणवले आहे. अगदी या चर्चेतही आपल्याशी मतभेद असणार्‍यांशी बोलताना कमालीचा द्वेष जाणवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

:=))

सोत्रि
Tue, 10/07/2025 - 13:54 नवीन
मग थातूर मातूर उत्तरे !
मी एका शिबिरात, घरवापसी करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या हिंदूना कोणत्या जातीत परत घ्यायचे ह्यावर संघाचे काय मत आहे? असा प्रश्न विचारला. त्यावेळी, जेव्हा कोणी घरवापसी करतो, तेव्हा तो फक्त हिंदू समाजात परत येतो, एखाद्या विशिष्ट जातीत नाही असं उत्तर मिळालं होत. त्यावर त्यांचा रोटी-बेटी व्यवहार कसा होणार ह्या पुढच्या प्रश्नानंतर माझी रवानगी 'प्रहरी' म्हणून शिबिराच्या सीमेवर केली गेली. :-) - (प्रहरी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

रोटी-बेटी व्यवहार कसा होणार

अमरेंद्र बाहुबली
Tue, 10/07/2025 - 15:42 नवीन
रोटी-बेटी व्यवहार कसा होणार ह्या पुढच्या प्रश्नानंतर माझी रवानगी 'प्रहरी' म्हणून शिबिराच्या सीमेवर केली गेली. खिक्क! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

मस्त..

गणेशा
Tue, 10/07/2025 - 23:20 नवीन
मस्त.. मला संघ आवडत नव्हता.. पण का काय माहीत कोठे काय ऐकलेले लहानपणी त्यामुळे महात्मा गांधी हि आवडत नव्हते.. तसेच भगतसिंग, आंबेडकर, नेताजी या बरोबरचे मुद्दे विनाकारण डोक्यात भरल्या गेले होते.. नंतर तुमच्या कडे ज्ञान आले.. आणि मग कळाले आधीचे गांधी बद्दल चूक होते.. पसरवलेले मनात होते.. नंतर गांधी एक विचार मिपा वर असताना धागा मांडला होता. तेंव्हा मिपा वर नविन होतो.. मिपाचे रंग जास्त माहीत नव्हते.. Link देतो सापडल्यास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

२०१४ पर्यंतचा संघ सुसह्य होता

युयुत्सु
Tue, 10/07/2025 - 12:39 नवीन
२०१४ पर्यंतचा संघ सुसह्य होता आता तो असह्य झाला आहे. संभ्रम निर्माण करणार्‍या कल्पनांचा आधार घेऊन लोकांवर नियंत्रण निर्माण करायचे. मूळ प्रश्न न सोडवता जुनाट टाकाऊ संकल्पना परत रूजवायच्या इतकाच सध्या त्यांचा कार्यक्रम आहे.
  • Log in or register to post comments

संघा विषयी मते

नावातकायआहे
Tue, 10/07/2025 - 16:20 नवीन
दुर्दैवानी (का सुदैवानी?) संघ कुणाच्याही टिकेमुळे थांबला नाही, थांबणार नाही. कुठलाही राजकीय पक्ष किंवा संघटना १००% "सर्व समाविष्ट" नाही हे वास्तव आहे. पूर्वाश्रमीच्या हिंदूना कोणत्या "जातीत" जाणार, "रोटी-बेटी" व्यवहार कसा होणार हा प्रश्न वाचून गंमत वाटली. हिंदू किंवा इतर धर्मातून "शांती प्रिय" धर्मात जाणार्यांना/ ओढल्या गेलेल्यांना हा पर्याय असेल का किंवा विचारायची परवानगी आणि "धमक" असेल काय असा विचार मनात डोकावून गेला! ह्या धाग्यावर संघाविषयी मत मतांतरे वाचून अंमळ करमणूक झाली हे नक्की ! असो! एवढे टंकून थांबतो!
  • Log in or register to post comments

इतर धर्मात

कपिलमुनी
Tue, 10/07/2025 - 20:06 नवीन
इतर धर्मात स्वागत करतात.. त्यातही भरपूर उपप्रकार आहेत. पण हिंदू एवढे कडक नाहीत. आणि आपण आपल्या धर्माची संख्या वाढवायची असेल. धर्म वाढवायचा टिकवायचा असेल तर आपलाच धर्म सुधारायला हवा ना. दुसरीकडे बोट घालून काय मिळणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

मी एका बाबतीत मात्र पूर्ण

युयुत्सु
Tue, 10/07/2025 - 19:44 नवीन
मी एका बाबतीत मात्र पूर्ण निश्चिंत आहे. संघाला भारत हा देश हिंदूराष्ट्र म्हणून आता कधीही घोषित करता येणार नाही. तसेच हिंदू समाजावर पण पूर्ण नियंत्रण संघाला कधीही मिळवता येणार नाही.
  • Log in or register to post comments

एवढा ठाम निष्कर्ष?

स्वधर्म
Tue, 10/07/2025 - 20:48 नवीन
एवढा ठाम निष्कर्ष कसा काढलात याविषयी उत्सुकता आहे. बाकी श्री. विवेक देशपांडे यांचा खालील व्हिडिओ पाहिला. RSS Exposed: Vivek Deshpande on Hindutva, Caste & Modi | The Politics | #gandhi #ambedkar #rssत्यात त्यांनी मांडलेले खालील मुद्दे रोचक आहेतः गेल्या ११ वर्षात संघाने सर्व शासकीय, निमशासकीय संस्था इथे फार मोठ्या प्रमाणात संघाचे कार्यकर्ते घुसवले आहेत. उदा. शासनात लॅटरल एन्ट्री प्रथम वर्ग अधिकारी. मंत्रालयात प्रत्येक मंत्र्याला शासनाचे नोकर सचिव आहेतच, पण मुख्यमंत्र्यांनी म्हणे आधीच्या व आत्ताच्या कार्यकाळात वेगळे ओएसडी पण नेमले आहेत, जे संघाचे कार्यकर्ते आहेत. विद्यापीठातही मोक्याच्या जागी संघ कार्यकर्ते आहेत (उदा. जे एन यु कुलगुरू). नुकत्याच एक भाजप संघाच्या प्रचारक न्यायाधीशही झाल्या. गोदी मिडीयात तर अनेक पत्रकार संघाच्या बाजूचे आहेत. याच्या शिवायही त्यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत, पण हिंदू राष्ट्र हे त्यांनाही शक्य वाटत नाही. तुंम्हाला ठामपणे हिंदूराष्ट्र म्हणून आता कधीही घोषित करता येणार नाही असे का वाटते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

श्री० स्वधर्म - भारत हिंदुराष्ट्र होण्यातील अडचणी

युयुत्सु
Wed, 10/08/2025 - 07:34 नवीन
भारताला **“हिंदू राष्ट्र”** घोषित करण्याच्या कल्पनेभोवती अनेक गुंतागुंतीचे कायदेशीर, सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न उभे राहतात. खाली या कल्पनेसमोरील मुख्य अडचणी (चॅलेंजेस) शक्य तेव्हढ्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या आहे्त. १. संविधानिक (कायदेशीर) अडचणी अ) भारताचे धर्मनिरपेक्ष संविधान भारताचे संविधान (१९५०) देशाला “सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक” असे घोषित करते. “धर्मनिरपेक्ष” हा शब्द १९७६ मध्ये (४२व्या दुरुस्तीने) स्पष्टपणे घातला गेला, पण त्याची भावना सुरुवातीपासून होती. भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी संविधानाच्या प्रस्तावनेत (Preamble) आणि धर्मस्वातंत्र्याशी संबंधित कलमांमध्ये (कलम २५–३०) मोठे बदल करावे लागतील. पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या “Basic Structure Doctrine” (केसवानंद भारती खटला, १९७३) नुसार, संसद संविधानाची मूळ रचना बदलू शकत नाही — आणि धर्मनिरपेक्षता ही त्या मूलभूत रचनेचा भाग आहे. त्यामुळे ही दुरुस्ती न्यायालयात रद्द होण्याची शक्यता आहे. ब) मूलभूत अधिकारांवर परिणाम कलम १४ (समानता), १५ (धर्मावर आधारित भेदभावास मनाई), आणि २५–२८ (धर्मस्वातंत्र्य) यावर थेट परिणाम होईल. हिंदूंना विशेष प्राधान्य दिल्यास अल्पसंख्याकांवर भेदभाव झाल्याचा दावा होऊ शकतो. २. धार्मिक व सामाजिक विविधता अ) भारत धर्म-बहुल राष्ट्र आहे. भारतात सुमारे २० कोटी मुस्लिम, तसेच ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, पारशी, ज्यू इ. धर्मांचे लोक राहतात. हिंदू राष्ट्राची घोषणा अल्पसंख्याक समुदायांमध्ये घबराट, असुरक्षितता निर्माण करू शकते. ब) हिंदू धर्मातील अंतर्गत विविधता हिंदू धर्म एकसंध नाही; त्यात हजारो पंथ, जाती, प्रादेशिक परंपरा आणि देवता आहेत. हिंदू राष्ट्र म्हणजे नेमके काय? — यावरच हिंदूंत मतभेद निर्माण होऊ शकतात. उदा. शैव–वैष्णव, लिंगायत, दलित परंपरा इ.कोणती परंपरा “अधिकृत” मानायची, हा विवाद उभा राहील. ३. राजकीय अडचणी अ) बहुसंख्यवाद vs लोकशाही मूल्ये भारतीय लोकशाही सर्वसमावेशकता आणि विविधतेवर आधारित आहे, फक्त बहुसंख्यांची सत्ता यावर नाही. हिंदू राष्ट्राची घोषणा बहुसंख्यवादाकडे झुकणारी वाटू शकते, ज्यामुळे लोकशाही तत्त्वांवर प्रश्नचिन्ह येईल. ब) राजकीय ध्रुवीकरण (polarization) धर्म राजकारणाचे प्रमुख केंद्र बनल्यास पक्षीय संघर्ष तीव्र होऊ शकतो. अल्पसंख्याक बहुल राज्ये व प्रादेशिक पक्ष केंद्राशी संघर्ष करू शकतात. क) संघराज्य व्यवस्थेवर परिणाम ईशान्य भारतातील ख्रिश्चन बहुल राज्ये (नागालँड, मिझोराम) आणि दक्षिणेतील सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न राज्ये (केरळ, तमिळनाडू) हिंदू राष्ट्र घोषणेवर प्रखर विरोध करू शकतात. यामुळे संघराज्यीय ताण किंवा वेगळेपणाच्या चळवळी वाढू शकतात. ४. आंतरराष्ट्रीय परिणाम अ) राजनैतिक (Diplomatic) परिणाम भारताची जागतिक ओळख एक धर्मनिरपेक्ष लोकशाही म्हणून आहे. हिंदू राष्ट्र झाल्यास, मुस्लिम बहुल शेजारी देशांशी (बांगलादेश, मालदीव) संबंध ताणले जाऊ शकतात. मध्यपूर्वेतील देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीय कामगारांवरही परिणाम होऊ शकतो. ब) जागतिक प्रतिमा व अर्थव्यवस्था पाश्चात्य लोकशाही देशांकडून टीका, गुंतवणुकीत घट आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो. भारताची “सॉफ्ट पॉवर” कमकुवत होईल. ५. सामाजिक तणाव आणि हिंसाचाराचा धोका हिंदू राष्ट्राची घोषणा झाल्यास काही ठिकाणी हिंसाचार, दंगली, धार्मिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. कट्टर गट (majority आणि minority दोन्ही) सक्रिय होऊ शकतात. कायदा व सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. ६. संकल्पनेतील अस्पष्टता “हिंदू राष्ट्र” ही कल्पना कायदेशीर दृष्ट्या स्पष्ट नाही. ती दोन प्रकारे समजली जाते — 1. संस्कृतीप्रधान राष्ट्र (RSS शैली) 2. धर्माधिष्ठित राज्य (कठोर हिंदू कायदे लागू) या दोन दृष्टिकोनांमुळेच अंतर्गत मतभेद व गोंधळ निर्माण होतो. भारताला हिंदू राष्ट्र घोषित करणे हे फक्त प्रतीकात्मक नाही, तर संपूर्ण संविधानिक साच्यात, सामाजिक समतेत आणि राष्ट्रीय एकात्मतेत आमूलाग्र बदल घडवणारे पाऊल ठरेल. भारतातील विविधता, लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष परंपरा लक्षात घेता अशी घोषणा कायदेशीर, राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीची व वादग्रस्त ठरेल. सर्वात महत्त्वाचे - असे धाडस करण्याने जो गोंधळ निर्माण होईल तो हाताळायची क्षमता संघ किंवा कोणत्याच हिंदू संघटनेमध्ये नाही, असे माझे मत आहे. आज मोठा समुदाय सध्याच्या घटनेवर जिवापाड प्रेम करतो, या समुदायाला डिवचणे महागात पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

आज केवळ अशक्य वाटणाऱ्या

रामचंद्र
Wed, 10/08/2025 - 09:41 नवीन
आज केवळ अशक्य वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी कित्येक दशकांच्या अथक प्रयत्नांनी आणि अद्भुत रणनीती वापरून संघाने करून दाखविल्या आहेत. मग ही उद्दिष्टपूर्ती केल्याशिवाय संघ राहील काय? आणि याला विरोध करणारे कायम विस्कळीत राहतील असे डावपेच आखले जातच असतात, ते डोळे उघडे ठेवून पाहिले तर लक्षात येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

हिंदू राष्ट्र करायची मुळीच

सुबोध खरे
Wed, 10/08/2025 - 10:15 नवीन
हिंदू राष्ट्र करायची मुळीच आवश्यकता नाही. इतर धर्मांचे लांगूलचालन थांबवलं आणि सर्व धर्माना खरोखरच समानता आणली पाहिजे एवढंच पुरे आहे. साधं समान नागरी कायदा आणायचा म्हटलं तरी काँग्रेसी आणि समाजवादी वृत्तीचे लोक बाप मेल्यासारखा टाहो फोडतात. तरी बरं हे घटनेतील मूलभूत कलम आहे. तेवढं सोडून बोलायचं हि टिपिकल समाजवादी वृत्ती. कुराण किंवा महंमदाबद्दल काही बोललं तर सर तन से जुदा म्हणणाऱ्या लोकांचा निषेध करण्याची हिम्मत नाही किंवा बकर ईद ला "प्राणी मात्रांवर दया दाखवा" म्हणायची शक्ती नाही. तेंव्हा घटनेतील समानता तत्वे आठवत नाहीत. दांभिकतेचा हद्द आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

श्री रामचंद्र

युयुत्सु
Wed, 10/08/2025 - 10:41 नवीन
श्री रामचंद्र कलम ३७० आणि राम मंदिर या शिवाय आणखी काही संघाने केले असल्यास कृपया नमूद करावे. माझ्यामते कलम ३७० हट्वणे हे फक्त महत्त्वाचे होते. त्यातील गुंतागुंत लक्षात घेतली तर हिंदुराष्ट्र ही कल्पना अशक्यप्राय आहे, हे लक्षात येते. पण अखंड भारत, विश्वगुरु, सनातन धर्म अशा अनेक संकल्पना रूजविण्यात संघ अपयशी ठरला आहे आणि ठरेल. पुड्या सोडून गोंधळ निर्माण करायचे काम हे लोक चांगले करू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

+१

सोत्रि
Wed, 10/08/2025 - 13:24 नवीन
पुड्या सोडून गोंधळ निर्माण करायचे काम हे लोक चांगले करू शकतात.
स्वानुभवावरून सहमत! - (एकेकाळचा गोंधळी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

आपण ज्याला पुड्या सोडणे

रामचंद्र
Wed, 10/08/2025 - 22:48 नवीन
आपण ज्याला पुड्या सोडणे म्हणता हाच मुळात डावपेचाचा एक भाग आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. मुळात या मंडळींना विधिंनिषेधाचे वावडे तर अजिबातच नसते. काश्मीरमध्ये जे काही झाले ती कल्पनेकडील बाब होय. शेषराव मोर्‍यांच्या पुस्तकात वस्तुस्थिती पूर्णपणे मांडली आहे असे वाटते. ते वाचल्यावर असे काही घडेल ही अशक्य कोटीतली गोष्ट वाटत होती. ते करून दाखवले मोदींनी. राम मंदिर खरे तर तार्किक्दृष्ट्या स्पष्ट मुद्दा आहे. जगात कुठेही मोठ्या अतिमहत्त्वाच्या धार्मिक स्थळाला चिकटून त्याच्या विरोधातील धर्मस्थळ नाही. जर अन्यधर्मीय धार्मिक स्थळ तिथे लगतच उभे राहिले असेल तर आधीचे दुसर्‍या धर्माचे स्थळ उद्ध्वस्त न करता आल्यामुळे चिकटून ती वस्तू विरुद्ध धर्मीयांनी ती उभारली आहे हे उघड आहे. (अल अक्सा मशिदीचाही मुद्दा लक्षात घ्या.). मक्का-मदिना, व्हॅटिकन सिटी यांना खेटून अन्य कुठले धर्मस्थळ उभे राहू शकेल का? मात्र खास हिंदू बनिया वृत्तीने त्वयार्धं मयार्धं करत शेवटी राममंदिर प्राप्त करून घेतले आहे. हीसुद्धा एक अशक्य वाटणारी बाब होती. डॉ. आंबेडकरांच्या अगदी थेट विरोधात नाही तरी अन्य समाजांतले ऐतिहासिक नायक प्रयत्नपूर्वक पुढे आणायचे, बहुजन समाजातून आवर्जून आपल्या विचारसरणीचे नेतृत्व पुढे आणायचे. अशा अनेक मार्गांनी संघाची म्हणा, परिवाराची म्हणा वाटचाल सुरूच आहे. आजूबाजूच्या घटनांकडे लक्ष दिले तर बर्‍याच गोष्टी लक्षात येतील. इतके दिवस ईशान्य भारतात फारसा वाव नव्हता पण अनेक दशके तिथे बर्‍यापैकी सेवाकार्य करून जमतील तितक्या जनतेला आपल्याकडे वळवण्यात--जोडीला सामदामदंडभेदनीती आहेच, आता तर सत्ताही--यश आले आहे. केरळ आणि तामिळनाडूतही लक्षणीय यश आता दूर नाही. आपण कलम 370 आणि राममंदिराशिवाय काय असं जे विचारता तेव्हा खर्‍या अर्थाने राष्ट्रासाठी उपयुक्त असं काय, असं आपल्याला अपेक्षित असावं. संघाच्या कल्पनेत अशा बाबी असतीलच असं नाही. त्याच्या दृष्टीने वेगळ्या गोष्टी अपेक्षित असतील. आता पर्यावरण, प्रदूषण यांना त्याच्या लेखी फारसं महत्त्व नसावं. आता मोदींनीच आवाहन केले होते, स्वच्छता अभियानासाठी. खरं तर पक्षविरहित, सर्वांनीच याला हातभार लावायला हवा होता. केवळ परिवारानेही जरी मनापासून काम केलं असतं तरी भाजपला केवळ या मुद्द्यावर विजय मिळाला असता. पण तसं घडलं नाही खरं. अन्य प्रदूषणांबाबत धर्माच्या नावाने कांगावा करून चुकीच्या गोष्टींचे समर्थन केलं जाताना आपण सारे पाहतोच. आणि संघाला विरोध करणारे इतक्या चिकाटीने, संयमाने, धीराने, 'मिळेल तिथं, मिळेल तसं, मिळेल तेव्हा' असं धोरण राबवून काम करताना दिसतात काय, विचार करावा. बरं संघात जाऊन आयुष्याला एक दिशा मिळून चांगलं आयुष्य स्वकष्टाने जगणारेही अनेक आहेत. त्यामुळे संघाबाबतच्या वास्तवाचा परत परत उच्चार करून वस्तुस्थिती बदलणार नाही, हे कृपया लक्षात घ्यावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा