भिती वाटता जीव काहूर राही
न जाणे कसे काय होणार काही
विचारात गुंतून डोके सदाही
उरी दाटता भाव आभास पाही
खरे काय ते की मनाचाच कावा
कुणी ओळखावे कसे सांग देवा
जिवाचा मुठीतून आकांत धावा
धगत्या मनाला कसे शांत ठेवा
भिताना मनाची मनालाच याही
हताश क्षणाची असे होत लाही
रडूनी नसे साध्य इच्छाच काही
मनी आसवांना जगी अंत नाही
दिसे स्वर्ग बाहेर पाताळ आत
अडोसाच नाही उभा वादळात
निमूट स्वतः पाहिले मी मनात
दिसूनी मला मी नसूनी तयात
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2297
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
धगत्या मनाला कसे शांत ठेवा
सुंदर अभिव्यक्ती.
कविता आवडली.
मनःपूर्वक आभार
In reply to धगत्या मनाला कसे शांत ठेवा by कर्नलतपस्वी
मनःपूर्वक आभारी आहे.
अगदी गेय झाली आहे कविता
अगदी गेय झाली आहे कविता.भुजंगप्रयातात आहे का?
हो, अगदी बरोबर
In reply to अगदी गेय झाली आहे कविता by कानडाऊ योगेशु
मनःपूर्वक आभार. हो, अगदी बरोबर. कविता भुजंगप्रयात वृत्तात आहे.
भुजंगप्रयातातली वृत्तबद्ध कविता आवडली.
भुजंगप्रयातातली वृत्तबद्ध कविता आवडली.
(रच्याकने, 'तेरे प्यार का आसरा चाहता हूं ... वफा कर रहा हूं वफा कर रहा हूं' हे जुने गाणेही याच वृत्तात आहे. म्हणून बघा).
आभारी आहे
In reply to भुजंगप्रयातातली वृत्तबद्ध कविता आवडली. by चित्रगुप्त
आपण वृत्त ओळखले आणि आपल्याला कविता आवडली हे वाचून चांगले वाटले. आभारी आहे.