✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मातृत्वाचा शृंगाररस

ग — गंगाधर मुटे, Sat, 10/19/2024 - 23:35
मातृत्वाचा शृंगाररस चंदन चांदणं गोंदण ल्याली नवथर कांती तनू सुकुमार अर्ध मोकळ्या केसावरती माळून गजरा चंद्राकार कुठे निघाली चंचल रमणी थबकत लचकत हरिणी समान सरकत शेला सावरलेला धरत रोखुनी नयन कमान ठुमकत मुरडत गवळण राधा जणू विहरत यमुनाकाठ गोप बघुनी झाकू पाहते पदराखाली भरला माठ हिंदोळणाऱ्या पदरासंगे डुचमळते बेचैन उभार हृदय-चक्षूंना वेधून घेते तन्मीलनाची नमनमिनार अर्ध्या उघड्या पाठीवरती भुरुभुरू केसांचे नर्तन नाभी भवती करुनी रिंगण पिंगा खेळतो द्वाड पवन गुलाब जाई मोहित होई रूप गोजिरे पद्मसमान लपून आडून चोरून बघती फुलामागुनी पिकले पान कुणी म्हणाले शेंग चवळीची कुणी म्हणाले पेवंदी आम कुणी म्हणाले कामुक मैना खुदुखुदू हसुनी रमताराम कुण्या मुलखाची राजपरी ही कुजबुज करती वल्लीशिवार जशी घडविली, तशी मढवली ही रंगीली नटवी नार तव वदली ती प्रसन्नवदना हो मी आहे नटवी नार खळखळ वाहत असतो माझ्या नसानसातुनी रस शृंगार विरक्तीला लुब्ध कराया करीत पीयुषाची पखरण सजणेधजणे, लटक, मटकणे प्रीत लालित्याची उधळण जरी दिसतो तुम्हां दुरुनी माझ्याठायी हा एकच रस परी मी आहे सर्व रसांचा जणू घुसळला अमृतरस कधी असते मी झाशी, अहिल्या मीच कालिकेचा अवतार मी राधिका, मीच मीरेच्या अद्वैत भक्तीचा एकतार मीच कैकेयी, मी कौशल्या मी वनवासी जनकाची लेक मीच देवकी, मीच यशोदा माझे स्वरूप, रूप अनेक मीच भीमाई, मी जीजाऊ मी क्रांतीची ज्योतमशाल पंकामध्येही पंकजाची पालनकर्ती मी मृणाल आदी माया आदी शक्ती सचेतनाची मी सृजक जैवजिवांची उत्पत्ती अन प्रणयरसाची मी पूजक स्त्रित्वाची मी अभय स्वामींनी सजीव सृष्टी माझं बाळ ब्रह्मांडाला व्यापून उरली माझ्या मातृत्वाची नाळ - गंगाधर मुटे 'अभय' ============== अठरा/दहा/चोवीस

प्रतिक्रिया द्या
20571 वाचन

💬 प्रतिसाद (93)

कविता आवडली नाही

प्रसाद गोडबोले
Sun, 10/20/2024 - 10:27 नवीन
कविता अजिबात आवडली नाही. मातृत्व आणि शृंगार ह्या दोन भिन्न भावना आहेत त्यांची सरमिसळ अजिबात आवडली नाही. पहिल्या कडव्यात तुम्ही उघडी पाठ , उभार, पदराखाली भरला माठ वगैरे वगैरे म्हणत आहात अन् नंतरच्या कडव्यात अहिल्या, झाशी, मीरा , कैकयी वगैरे ह्यांना आणत आहात. बाकीच्यांची तर नावे घ्यायचे माझे धाडस ही होत नाही. कुठल्या गोष्टी कुठे जोडत आहात. तुम्हाला दहशत कशी वाटत नाही "त्या" लोकांची ? असो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने तुम्ही तुमच्या रिस्क वर काय वाटेल ते लिहायला स्वतंत्र आहात. फक्त मिसळपाव थाळीत गुलाबजाम दिला म्हणून तो तर्री त घालून खाऊ नये. बाकी आपण सुज्ञ असा. इत्यलम
  • Log in or register to post comments

फक्त मिसळपाव थाळीत गुलाबजाम

सुबोध खरे
Mon, 10/21/2024 - 10:01 नवीन
फक्त मिसळपाव थाळीत गुलाबजाम दिला म्हणून तो तर्री त घालून खाऊ नये. शृंगार रस आणि वात्सल्य रस यांची सरमिसळ( कि रसमिसळ) करण्याचा हेतू समजला नाही. कोणतीही व्यक्ती मग ती आई असो कि बहीण किंवा बाप हे सर्व भावभावना आणि रस पूर्ण असतेच. त्यात वात्सल्य शृंगारच कशाला क्रोध मोह इ भावना सुद्धा असतातच परंतु त्यांचे मिश्रण अप्रस्तुत किंवा अयोग्य ( inappropriate) वाटते. बाडीस जसे आपल्या आईवडिलांची वासना हि आपल्या जन्मास कारणीभूत आणि अत्यावश्यक असली तरी त्याचे सार्वजनिक अनावरण/ वाचन हे अप्रस्तुत असते. बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सर्व रसांचे मिश्रण एकत्रित

गंगाधर मुटे
Mon, 10/21/2024 - 10:50 नवीन
सर्व रसांचे मिश्रण एकत्रित केले जाऊ नये, हे खरे आहे. पण ते मांडले जाऊच नये हे तितकेसे खरे वाटत नाही. त्यात बीभत्स, बटबटीत रूप येऊ नये इतकेच. मांडलेच जाऊ नये, या मताशी मी सहमत नाही मात्र मला ते जसे मांडायला हवे तसे मांडता आले नसेल तर तो माझा व्यक्तिगत दोष आहे. कवितेचा दोष असू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

जरी बटबटीत नसले तरि दोन

चौकस२१२
Tue, 10/22/2024 - 13:29 नवीन
जरी बटबटीत नसले तरि दोन वेगळेच रस कशाला एकत्र केलेत ते अजिबात कळले नाही त्या बाबतीत हुकलंय आणि नुसतच हुकली असे नहि तर काही भगःची जोडणी अप्रस्तुत वाटली पण अर्थात एवढेही लिहिण्याची माझ्य सारख्याकडे प्रतिभा नसल्यमुळे आमच्या पेक्षा तुम्ही जास्त चांगले कवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

कविता कशी असावी आणि कविता कशी

गंगाधर मुटे
Tue, 10/22/2024 - 15:13 नवीन
कविता कशी असावी आणि कविता कशी नसावी याबद्दल तुमच्या मनात एक अदृश्य साचा ठरलेला आहे. त्यामुळे कुणीही कविता लिहिले तरी तुमच्या मनातील साच्यानुसारच असावी असे तुम्हाला प्रामाणिकपणे वाटते. असे वाटणे खरंच योग्य आहे का, याचा आपण विचार करावा. तुमच्या समोर तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांची उकल आपोआप होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

तुम्हाला आवडली नाही याबद्दल

गंगाधर मुटे
Sun, 10/20/2024 - 15:02 नवीन
तुम्हाला आवडली नाही याबद्दल कुणाचे हरकत असू शकत नाही. कोणतीही कलाकृती ज्याला जेवढी कळते तेवढ्या आधारावर तो आपले मत बनवत असतो आणि त्याच आधारावर आवडणे आणि नावडणे ठरत असते.
  • Log in or register to post comments

अत्यंत अवघड विषय

श्वेता२४
Sun, 10/20/2024 - 15:49 नवीन
मातृत्व आणि शृंगार या दोन परस्परविरुद्ध असणाऱ्या गोष्टींची सांगड तुम्ही कवितेमध्ये कशी काय घातली असेल याच्या उत्सुकतेपोटी मी ही कविता वाचली. कवितेतील तीन कडवी - कधी असते मी झाशी,मीच कैकेयी, मीच भिमाई ही तीन कडवी बाजूला करून संपूर्ण कविता वाचली तर छान वाटली. माफ करा. काव्य समजून घेण्याची माझी समज फार नाही. परंतु ही तीनही कडवी रसभंग करतात असे वाटले. ती सोडून बाकीची सर्व कविता मला आवडली.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद बद्दल आभार.

गंगाधर मुटे
Sun, 10/20/2024 - 16:40 नवीन
प्रतिसाद बद्दल आभार. तुम्ही स्वतःच्या कवीते बद्दल बोलू नये आणि कविता उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करू नये, असे माझे मत आहे. कविता लिहून झाली आणि एकदा प्रकाशित केली की नंतर काय बोलायचे ते कविताच बोलली पाहिजे. मात्र, आपण जे लिहिले ते कितपत शब्दात उतरले आणि रसिकापर्यंत पोहोचले याचा पडताळा घेण्यासाठी प्रतिसादांचा फार उपयोग होतो. कविते बाहेर बोलायचे असेल तर माझे मत असे आहे की, कोणतेही मातृत्व सर्व गुण संपन्न आणि सर्व रसांनी परिपूर्ण असते. जरी एखाद्या मातृत्वातला एखादाच गुण अधोरेखित होत असला किंवा ठळकपणे जाणवत असला तरी उरलेले गुण (अदृश्य स्वरूपात वगैरे) मातृत्वामध्ये असतेच, असे माझे मत आहे. मातृत्व हे सर्वठाई सारखेच असते. कैकयीची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते तर कौशलेची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते. व्यक्तिरेखा बदलल्या पण मातृत्व स्थायी आहे, असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

कवीने... असे वाचावे.

गंगाधर मुटे
Sun, 10/20/2024 - 16:43 नवीन
कवीने स्वतःच्या कवीते बद्दल बोलू नये आणि कविता उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करू नये, असे माझे मत आहे. वरील प्रतिसादातील हे वाक्य असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

आपण म्हणतात असे ते तीन कडवे

गंगाधर मुटे
Sun, 10/20/2024 - 16:51 नवीन
आपण म्हणतात असे ते तीन कडवे काढून टाकले तरी कवितेला धक्का पोहोचत नाही. मूळ गाभा कायम राहतो. ते तीन कडवे फक्त उदाहरणादाखल नमुने म्हणून आलेले आहेत. या कडव्यांमुळे विषय थोडा समजून घेणे सोपे जाईल, असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

दोन वेगवेगळ्या कविता वाचल्या.

विवेकपटाईत
Sun, 10/20/2024 - 17:33 नवीन
दोन वेगवेगळ्या कविता वाचल्या. पहिल्या कवितेची ही ओळ आवडली. लपून आडून चोरून बघती फुलामागुनी पिकले पान या वयात ही सुंदर फूल दिसले की नजर तिथे जातेच. मनाने आपण कधीच म्हातारे होत नाही. पान गळतीच्या काळात ही वसंताचे स्वप्न पाहतोच.
  • Log in or register to post comments

प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर

गंगाधर मुटे
Sun, 10/20/2024 - 17:53 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

विरोधाभासतला दुवा....

कर्नलतपस्वी
Mon, 10/21/2024 - 09:44 नवीन
जरी दिसतो तुम्हां दुरुनी माझ्याठायी हा एकच रस परी मी आहे सर्व रसांचा जणू घुसळला अमृतरस नायिकेने स्वताच स्पष्ट केले आहे की वरकरणी नटवी नार दिसत असले तरी माझ्यात इतर गुण अवगुण आहेत. मातृत्व-पितृत्व शृगांराची परिणीती याचा अर्थ त्याव्यतिरिक्त इतर कुठलेही भावना नाहीत असे समजणे बरोबर नाही. कवीता आवडली.
  • Log in or register to post comments

विस्तृत प्रतिसादाबद्दल आभार

गंगाधर मुटे
Mon, 10/21/2024 - 10:58 नवीन
विस्तृत प्रतिसादाबद्दल आभार सर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

प्रयोग करत राहावेत.

गवि
Mon, 10/21/2024 - 10:35 नवीन
प्रयोग करत राहावेत. वेलकम बॅक मुटे काका सर.
  • Log in or register to post comments

एस सर. नक्कीच प्रयोग करतच

गंगाधर मुटे
Mon, 10/21/2024 - 10:58 नवीन
एस सर. नक्कीच प्रयोग करतच राहू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

असेच म्हणतो. ये कुछ जम्या नही

विंजिनेर
गुरुवार, 10/24/2024 - 23:49 नवीन
असेच म्हणतो. ये कुछ जम्या नही पण हरकत नाही - काहीसं coke studio सारखं झालेय - त्यांची सगळीच कॉंपोझिशन्स जमतात असं नाही पण प्रयोग करायचं धाडस मला आवडतं जुनं नाव बोर्डावर पाहून छान वाटलं हे अजून एक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पहीली आठ कडवी ही पुरुषसत्ताक

कानडाऊ योगेशु
Mon, 10/21/2024 - 10:51 नवीन
पहीली आठ कडवी ही पुरुषसत्ताक समाजाचा एखाद्या स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन आहे आणि बाकीची कडवी ही कवितेतील नायिकेने त्यांच्या दृष्टीकोनाला दिलेले उत्तर आहे. ह्या दोन्ही बाबींना कवीचे मतच आहे असे समजल्यामुळे काही प्रतिसादकर्त्यांची गफलत झाली आहे. ह्यावरुन विवेकानंदांच्या आयुष्यातील एक प्रसंग आठवला. विदेश दौर्यावर जाण्यापूर्वी जयपूरच्या महाराजांनी त्यांच्यासाठी एक समारंभ ठेवला होती ज्यात जयपूरच्या एका गायिका/गणिकेला बोलावले होते. विवेकानंदांना त्या समारंभात गेल्यावर ह्या गोष्टी कळल्या आणि त्यांना एका संन्यासाने एका गणिकेच्या अश्या मैफिलित असणे उचीत न वाटल्याने ते उठुन जायला लागले तेव्हा त्या गाणार्या गणिकेने संत मीराबाईची एक विरहणी गायला चालु केली आणि विवेकानंदाला त्वरीत अर्थबोध झाला. त्यांनी त्या गायिकेची केवळ माफिच मागितली नाही तर तिला 'तुझ्याकडुन मला अजुन एक शिकवण मिळाली आई' असेही संबोधले.
  • Log in or register to post comments

सखोल आणि तर्कशुद्ध दिलेल्या

गंगाधर मुटे
Mon, 10/21/2024 - 11:01 नवीन
सखोल आणि तर्कशुद्ध दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपला आभारी आहे. प्रत्येक मातेमध्ये सर्वच्या सर्व रस असतातच. अशी एकही माता असू शकत नाही जिच्यामध्ये सर्व रस सामावलेले नाहीत. दुर्गादेवीला फार कमी लोक दुर्गादेवी म्हणतात. बहुतांश लोक दुर्गा माता म्हणतात. दुर्गा हे वीर रसाचे सर्वोत्तम उदाहरण असले तरी ती माता आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

विवेकानंद

प्रसाद गोडबोले
Tue, 10/22/2024 - 16:37 नवीन
विवेकानंदाला त्वरीत अर्थबोध झाला. त्यांनी त्या गायिकेची केवळ माफिच मागितली नाही तर तिला 'तुझ्याकडुन मला अजुन एक शिकवण मिळाली आई' असेही संबोधले.
>>> हे असल्या अतार्किक अनाकलनीय अपेक्षा ठेवल्यामुळे आजकाल कोणाला विवेकानंद व्हावेसे वाटतं नाही. गुलाबजाम तर्रीत घालून खायची हौस का असते लोकांना हे अनाकलनीय आहे. कालच एका सुप्रसिद्ध मंदिरात जाऊन आलो, आत देवीची मूर्ती आहे , तिला लोकं साष्टांग नमस्कार च करणार आहेत . पण बाहेरील शिल्पकलेत पत्रलेखिका आहे जी तिचे पुष्ट नितंब आणि कमनीय कटी दाखवत पत्र लिहीत आहे, किंवा दर्पण सुंदरी आहे जी तिचे उन्नत मोहाचे घट सावरत आरशात बघत केसांचा शृंगार करत आहे, त्यांच्याकडेही लोकांनी मातृभावाने पाहावे अन् "विवेकानंद" व्हावे ही अपेक्षाच अविवेकी आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

गुलाबजाम तर्रीत घालून खायची

सुबोध खरे
गुरुवार, 10/24/2024 - 19:13 नवीन
गुलाबजाम तर्रीत घालून खायची हौस का असते लोकांना हे अनाकलनीय आहे. बाडीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

गुलाबजाम तर्रीत घालून खायची

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 10/24/2024 - 23:39 नवीन
गुलाबजाम तर्रीत घालून खायची हौस का असते लोकांना हे अनाकलनीय आहे
. अगदी गुलाबजामुन व तर्री नाही तरी तश्याच प्रकारच्या काही पाककृती ऐकण्यात आल्या आहेत. मैसुर पाक ही अशीच एक फसलेली पाककृती होती. म्हणजे करायला गेलो एक आणि झाले दुसरेच असा प्रकार होता. तोच प्रकार पनीर बाबतही सांगितला जातो. म्हणजे नासलेल्या दूधावर केल्या गेलेल्या प्रयोगातुन रसगुल्ल्याचा जन्म झाला. मध्यंतरी आईसक्रिम पकोडा नावाची डिश पण लोकप्रिय होती.म्हणजे पकोडा तळायचा व बाहेर काढुन त्यात आईसक्रिम घालुन पुन्हा तळायचा असा काहीसा प्रकार होता. सोलापुरात चहाकॉफिच्या दुकानात मारामारी नावाचे पेय मिळायचे.चहा आणि कॉफि मिक्स करुन बनवले जायचे. टंकण्याचा एकुण उद्देश हाच कि पाककृती असो वा लेखनकृती ..प्रयोग करत राहिले पाहिजे काहीतरी नवीन हाती गवसु शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

संपादित

साहित्य संपादक
Mon, 10/21/2024 - 12:12 नवीन
संपादित
  • Log in or register to post comments

वाट्टेल त्या गोष्टींची

वामन देशमुख
Mon, 10/21/2024 - 12:19 नवीन
वाट्टेल त्या गोष्टींची वाट्टेल तशी सरमिसळ करणे व वाट्टेल त्या प्रकारे ती सादर करणे असे प्रकार सदर धागाकर्त्यास नवीन नाहीत. --- बाकी, २०२४ मिपा प्रौढ दिवाळी अंकातील साहित्यरत्ने आधीच प्रकाशित होतील असे वाटले नव्हते.
  • Log in or register to post comments

तुमच्या वरील अर्ध्या

गंगाधर मुटे
Mon, 10/21/2024 - 14:29 नवीन
तुमच्या वरील अर्ध्या प्रतिसादाबद्दल मला काहीच बनायचे नाही हे तुमचे मत आहे. आणि तुम्हाला वाटेल तसे मत बाळगायचा तुमचा अधिकार अबाधित आहे. ----- पण खालील अर्धा प्रतिसाद मान्य होण्यासारखा नाही. मी परत एकदा कविता वाचली आणि मला जे जाणवले त्यावरून मी हमखास सांगू शकतो की ही कविता कुठल्याही अंगाने Adult नाही. 1. कवितेत एकही थिल्लर, चिल्लर अथवा उत्तान शब्द आलेला नाही. त्यामुळे बाळबोधांना/नाबालिगांना कवितेतील शृंगार उलगडण्याची शक्यताच नाही. 2. कवितेतील अनेक रहस्य सहजासहजी सर्वांनाच कळेल अशी शब्द योजना नाही. कवितेतील अनेक उपमा, प्रतिमा आणि दृष्टांत सरसकट सर्वच भाषा प्रभुंना किंवा भाषातज्ज्ञांना किंवा समीक्षकांना किंवा गुणग्राहकांना कळण्याची शक्यता नाही. जिथे 80 वर्षाच्या म्हातार्‍याला कविता पूर्णपणे करण्याची शक्यता नाही तिथे कुठलेही स्थितीत 18 वर्षाखालील मुलाला कळेल अशी शक्यता असू शकत नाही. कवितेत माझ्या नजरेने बघितले तर खालील ओळ भयानक व अत्यंत खतरनाक आहे ज्या ओळी बद्दल माझ्यावर प्रचंड टीका होईल असा अंदाज व भीती होती पण अजूनही टीका झाली नाही याचा अर्थ ती ओळ उलगडली नसावी असा घेण्यास जागा आहे. हृदय-चक्षूंना वेधून घेते तन्मीलनाची नमनमिनार आपणास कधीकाळी जर अर्थ लागला तर मला विपु मधून अवश्य कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

कविता आवडली

चांदणे संदीप
Mon, 10/21/2024 - 12:47 नवीन
बहिर्‍या ऐकवणे, आंधळ्या दाखवणे जमते कविते हे काम बहाद्दर असल्या काव्यास माझा केवळ प्रणाम! कविता आवडली. सं - दी - प
  • Log in or register to post comments

आपला आभारी आहे.

गंगाधर मुटे
Mon, 10/21/2024 - 14:31 नवीन
आपला आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

वैचारिक कविता आहे.

कंजूस
Mon, 10/21/2024 - 13:26 नवीन
वैचारिक कविता आहे. आमच्या मराठीच्या बाई (शिक्षिका) म्हणाल्या ते आठवलं. "तुम्हाला गुण हवे असतील तर आपली मतं पाजळू नका. कवितेच्या प्रश्नांवर उत्तरामध्ये कवी असं म्हणतो, तसं म्हणतो, आणि कवितेतल्याच ओळी परत लिहून काढा."
  • Log in or register to post comments

कविता समजून घेतल्याबद्दल आपला

गंगाधर मुटे
Mon, 10/21/2024 - 14:32 नवीन
कविता समजून घेतल्याबद्दल आपला आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

वात्सल्य की वीर रस ?

नठ्यारा
Mon, 10/21/2024 - 18:05 नवीन
गंगाधर मुटे, खूप दिवसांनी आलात. असेच वरचेवर येत रहा. उत्तरार्धात वात्सल्य रस आहे की वीररस आहे असा प्रश्न पडलात. शृंगार व वात्सल्य एकत्र जात नाहीत असं म्हणतात. पण वीर आणि शृंगार मात्र एकत्र चांगलेच खुलतात. झाशी, अहिल्या, कालिका वगैरे नावं येतात तेव्हा वीररसाची अपेक्षा असते. पुढे ती वात्सल्यरसात बदलते. हे रूपांतरण अलवार व्हायला हवं होतं. हे मझं वैयक्तिक मत आहे. विचारचक्रास चालना देणारी कविता आहे. म्हणून आवडली. सर्वस्वी पटली नाही तरीही आवडली. आपला नम्र, -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments

खूप खूप धन्यवाद.

गंगाधर मुटे
Mon, 10/21/2024 - 18:32 नवीन
खूप खूप धन्यवाद. कवितेचा विषय आणि आवाका फार मोठा आहे. तो शब्दबद्ध करण्यात आपली लेखणी अपुरी पडू शकते. कदाचित भविष्यात हाच विषय कुणीतरी अधिक सक्षमतेने हाताळू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नठ्यारा

कविता आवडली - वेगळ्या दृष्टीने

स्वधर्म
Mon, 10/21/2024 - 21:59 नवीन
नायिकेला (विशेषत: सुंदर स्त्रीला) आपल्याकडे कसे पाहिले जाते, याची बहुतेक वेळा नीट जाणीव असते. या कवितेत नायिकेने पहाणार्यांना तिची दुसरी बाजू सांगण्याचा प्रयत्न केला आहे, असे वाटते. कदाचित ही कविता कुण्या मोठ्या कवीच्या नावे असती, तर लोक त्यांच्या वेगळ्या दृष्टीचे कौतुक करत असते.
  • Log in or register to post comments

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार

गंगाधर मुटे
Mon, 10/21/2024 - 22:09 नवीन
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

हे कविता कुप छान आहे

जावा फुल स्टॅक
Tue, 10/22/2024 - 04:36 नवीन
हे कविता कुप छान आहे चाट गिपीटि अनि गुगुल भाशान्तर चान्गल वापरले आहेत आवडल आहे
  • Log in or register to post comments

चौकटीबाहेरची कविता आवडली!

अथांग आकाश
Tue, 10/22/2024 - 10:12 नवीन
चौकटीबाहेरची कविता आवडली!
  • Log in or register to post comments

नाही नाही

गंगाधर मुटे
Tue, 10/22/2024 - 11:29 नवीन
आपले मनःपूर्वक आभार
  • Log in or register to post comments

प्रतिसाद नाही नाही कुठून आले?

गंगाधर मुटे
Tue, 10/22/2024 - 11:30 नवीन
प्रतिसाद नाही नाही कुठून आले? ते नाही काढून प्रतिसाद वाचावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

हि कविता नक्की कशाबद्दल आहे ?

चौकस२१२
Tue, 10/22/2024 - 13:21 नवीन
हि कविता नक्की कशाबद्दल आहे ? शृंगार? स्त्री देहाची "काम" या अर्थातून वर्णन कि धाडसी महिला - माता ? ही रंगीली नटवी नार आणि मग एकदम .... मी झाशी, भीमाई, मी जीजाऊ.. दोन विषयांची मिसळ काही पटली नाही आणि कळली पण नाही
  • Log in or register to post comments

कवितेत दोन विषय किंवा दोन रस

गंगाधर मुटे
Tue, 10/22/2024 - 15:09 नवीन
कवितेत दोन विषय किंवा दोन रस यांची मिसळ झाली आहे असे मला तरी वाटत नाही. कवितेचा केंद्रबिंदू "मातृत्व" आहे आणि मातृत्वाची विभागणी होऊ शकत नाही. मातृत्व हे फक्त मानवी स्त्री पुरते मर्यादित नसते. मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात काहीही फरक नसतो जवळजवळ ते एकसमानच असते. माणूस, पशु,पक्षी, वनस्पती सहित सर्व सजीव यांच्या प्रजनन, पोषण आणि संरक्षण ह्या सर्व प्रेरणा बहुतांश प्रमाणात एकसमान आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

"हिंदोळणाऱ्या पदरासंगे

चौकस२१२
Tue, 10/22/2024 - 15:32 नवीन
"हिंदोळणाऱ्या पदरासंगे डुचमळते बेचैन उभार" आनि "कधी असते मी झाशी, अहिल्या" हे एकाच मालळे तील मणी ? नाही बुवा पटत .... असो कवी चा अधिकार आहे स्वतःचं मनाला पटेल ते लिहिण्याचाच तेवहा चालू द्या ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

हिंदोळणाऱ्या पदरासंगे डुचमळते

गंगाधर मुटे
Tue, 10/22/2024 - 16:09 नवीन
हिंदोळणाऱ्या पदरासंगे डुचमळते बेचैन उभार" ही दृष्टी रमतारामांची आहे. तर "कधी असते मी झाशी, अहिल्या... हे नायिकेने दिलेले उत्तर आहे. रमतारामांची दृष्टी वेगळी आणि कवितेच्या नायिकेची दृष्टी वेगळी. दोन दृष्टीमध्ये काहीही तुलना होत नसताना तुम्ही तुलना करण्याचा प्रयत्न करत आहात, त्यामुळे तुमच्यासमोर नको ते प्रश्न उभे राहत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

नको ते प्रश्न उभे राहत आहेत.

चौकस२१२
Tue, 10/22/2024 - 17:06 नवीन
नको ते प्रश्न उभे राहत आहेत. कसले नको ते प्रश्न , अनेकांनी ह्याच पद्धतीचा प्रतिसाद निंदवले आहेत एकीकडे स्त्रीचे शृंगारिक / कामुक वर्णन आणि एकीकडे वीर रस ओतप्रोत भरलेली स्त्रियांचा उल्लेख एकाच कवितेत का केवळ स्त्रिया आहेत म्हणून ! हे म्हणजे उद्या जर एखाद्याने "मराठी संत, त्यांचे आध्यत्मिक कार्य आणि त्यांचे शरि सैष्ठव " हे एकाच निबंधात ( किंवा कवितेत ) घुसडले तर कसे वाटेल तसे आहे असो राग आलेला दिसतोय , तुम्ही जेवढे लिहू शकता त्याच्या जवळपास हि आम्ही नाही लिहू शकणार पण एक वाचक/ रसिक म्हणून प्रामाणिक प्रतिक्रिया नोंदवली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

मराठी संत, त्यांचे आध्यत्मिक

गंगाधर मुटे
Tue, 10/22/2024 - 17:57 नवीन
मराठी संत, त्यांचे आध्यत्मिक कार्य आणि त्यांचे शरि सैष्ठव... एकाच निबंधात घुसडले तर.... तुम्हाला छान वाटले तर छान म्हणावे, वाईट वाटले तर वाईट होणारे, प्रशंसा करण्यायोग्य असेल तर प्रशंसा करावी, निंदा करण्यायोग्य असेल तर निंदा करावी, निषेध करावा, खडबडीत खरबडीत उत्तर द्यावे.... वाचक म्हणून हे सर्व अधिकार वाचकाला आहेतच. पण पण काय लिहावे आणि काय लिहू नये याचा निर्णय लिहिणाऱ्यांनी घ्यायचा असतो.... वाचणाऱ्यांनी नाही. तुम्ही तुमची मते जगावर लादण्याचा प्रयत्न समर्थनिय नाही. असे लिहिले तर काय होईल, तसे लिहिले तर काय होईल? असे उगीच प्रश्न स्वतःला पडू देऊ नका. कारण "काहीही होणार नाही" हे त्याचे उत्तर आहे. जे अस्सल असते, उपयुक्त असते तेच उत्क्रांतीच्या प्रवाहात टिकते. बाकी सारा काडीकचरा क्षणिक असतो, विशिष्ट कालावधीनंतर तो वाहून जातो आणि कालांतराने तो कसला सुद्धा रूपांतरीत होऊन नष्ट होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

"तुमची मते जगावर लादण्याचा

चौकस२१२
Tue, 10/22/2024 - 18:10 नवीन
"तुमची मते जगावर लादण्याचा नाही हो ....." नाही हो एक काहीतरी खटकलेली गोष्ट किंवा विस्कळीत गोष्ट जी इतराना जाणवली ती फक्त दाखवली " कला निर्माण करण्याऱ्या बंधने असू नयेत" या तत्व खाली काय वाटेल ते चालेल" असा तुमचा रोख दिसतोय ... त्यामुळे बोलणे खुंटले उद्याच "समर्थांचे श्लोक आणि त्यांच्या दंड बैठका" यावर जिलब्या पाडतो कारण "काय लिहावे आणि काय लिहू नये याचा निर्णय लिहिणाऱ्यांनी घ्यायचा असतो."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

@चौकस212

गंगाधर मुटे
Wed, 10/23/2024 - 14:14 नवीन
@चौकस212 सर्व सजीव सृष्टी मधील माता आणि तिचे मातृत्व हा कवितेचा केंद्रबिंदू आहे. मानवी स्त्री कवितेत केवळ त्या मातृत्वाचे प्रतिनिधित्व करते. मानवी स्त्री कवितेची नायिका असणे, कवितेची गरज म्हणून निमित्तमात्र आहे. मातृत्व हे फक्त मानवी स्त्री पुरते मर्यादित नसते. मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात फारसा काही फरक नसतो, जवळजवळ ते एकसमानच असते. माणूस, पशु, पक्षी, वनस्पती सहित सर्व सजीव यांच्या प्रजनन, पोषण आणि संरक्षण ह्या सर्व प्रेरणा बहुतांश प्रमाणात एकसमान आहेत. माझे मत असे आहे की, कोणतेही मातृत्व सर्व गुण संपन्न आणि सर्व रसांनी परिपूर्ण असते. जरी एखाद्या मातृत्वातला एखादाच गुण/रस अधोरेखित होत असला किंवा ठळकपणे जाणवत असला तरी उरलेले गुण (अदृश्य स्वरूपात वगैरे) मातृत्वामध्ये असतेच, असे माझे मत आहे. सर्व रसांनी परिपूर्ण नाही असे मातृत्व असू शकत नाही. जसे मानवी स्त्रीमध्ये स्त्रीत्व जन्मताच येते तसेच मातृत्वही उपजत असते. शृंगार ही मातृत्वाची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे कोणतेच मातृत्व शृंगारहीन असू शकत नाही. मातृत्व हे सर्वठाई सारखेच असते. उदाहरणार्थ... कैकयीची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते तर कौशल्येची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते. व्यक्तिरेखा बदलल्या पण मातृत्व स्थायी आहे, असे माझे मत आहे. कविता तुकड्या तुकड्यात दिसत असली तरी मुळात ती कविता मातृत्वाभोवती फिरत असल्यामुळे कविता एकजिनसी आहे. मातृत्व आणि मातृत्वाच्या प्रेरणा केंद्रबिंदू म्हणून कविता वाचली तर कविता उलगडायला फार अवघड जाऊ नये.
  • Log in or register to post comments

मानवी स्त्री मधील मातृत्व आणि

सुबोध खरे
गुरुवार, 10/24/2024 - 11:59 नवीन
मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात फारसा काही फरक नसतो, आपण कविता करावी जीवशास्त्रात जाऊ नये अशी नम्र विनंती आहे. कोकिळा आपले अंडे कवळ किंवा दुसऱ्या पक्षाच्या घरट्यात घालते आणि ते अंडे उबवणे आणि पिल्लाचे संगोपन करणे हे तो दुसरा पक्षी आणि त्याची मादी करते. माशाची मादी अंडी घालून पाण्यात सोडून देते. पिले अंड्यातून बाहेर आली कि स्वतःचे अन्न स्वतः मिळवून वाढू लागतात. खेकड्याची मादी पोटातून पिल्ले बाहेर सोडून देते त्यानंतर पिल्ले स्वावलंबीच असतात. काही माशात आणि बेडकांच्या जातीत नर पिल्लाना ती मोठी होईस्तोवर आपल्या पाठीवर बाळगतात. तेंव्हा पशु पक्षी आणि मानव यातील मातृत्व हे मुळीच सारखे नाही. उत्क्रांतीच्या उतरंडीत प्राणी जितक्या उच्च दर्जाचा आहे तितके मातृत्व जास्त जास्त कठीण होत जाते. कुत्र्या मांजराची पिल्ले काही दिवसातच वासाने स्वतःचे अन्न'स्वतः मिळवू शकतात तर मानवी बालपण कित्येक वर्षे लांब आहे त्यामुळे तितकी वर्षे मातेला बालकाची सर्वतोपरी काळजी घ्यावीच लागते. मानवी मातृत्व हे अतिशय उच्च कोटीचे असू शकते. हिरकणी सारखी उदाहरणे आपण वाचली असतीलच. बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

तुम्ही तुमची मते कविवर लादू

गंगाधर मुटे
गुरुवार, 10/24/2024 - 15:45 नवीन
तुम्ही तुमची मते कविवर लादू नयेत, अशी आपणास माझी नम्र विनंती आहे. कविता वाचून कवीला जीवशास्त्राची असलेल्या जाणीवेची खोली जशी तुम्हाला कळलेली आहे तशीच तुमचे प्रतिसाद वाचून जीवशास्त्राची तुम्हाला किती जाणीव आहे हे मलाही कळलेले आहेत. कुणी कितीही स्वतःला एखाद्या विषयातला तज्ञ समजत असला तरी तो तज्ञ असतोच, असे काहीही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुमच्या प्रतिसादात पशु पक्षी

गंगाधर मुटे
गुरुवार, 10/24/2024 - 19:48 नवीन
तुमच्या प्रतिसादात पशु पक्षी आणि मानवी मातृत्व यांतील भेद सांगताना आपण जे निकष वापरले तेच निकष वापरून भारतासारख्या अत्यंत विषम संस्कृती, विषम आर्थिक स्थिती, विषम सामाजिक स्थिती, विषम सोयीसुविधा, विषम परिस्थितीत जगणारे सरकसकट सर्व मानवी मातृत्व एकसमान आणि अतिशय उच्च कोटीचे कसे असते, हे सिद्ध करून दाखवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

तुमच्या प्रतिसादात पशु पक्षी

गंगाधर मुटे
गुरुवार, 10/24/2024 - 19:44 नवीन
तुमच्या प्रतिसादात पशु पक्षी आणि मानवी मातृत्व यांतील भेद सांगताना आपण जे निकष वापरले तेच निकष वापरून सरकसकट सर्व मानवी मातृत्व एकसमान आणि अतिशय उच्च कोटीचे कसे असते, हे सिद्ध करून दाखवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हायला

सुबोध खरे
गुरुवार, 10/24/2024 - 19:55 नवीन
हायला काहींच्या काही विधान तुम्ही करायचे आणि मी काहीतरी सिद्ध करून दाखवायचे हे तुम्हीच मला आव्हान द्यायचे. इतका भंपकपणा पाहिला नव्हता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा