हो. मी मराठी आहे.
म्हणजे नक्की कोण आहे? आणि मला मराठी का म्हणायचं? दोन-अडीच हजार वर्षांचा इतिहास असलेली एक राजसि भाषा बोलतो, वाचतो, लिहितो म्हणून? की अपरांतापासून ते विदर्भापर्यंत आणि सातपुड्यापासून करवीरापर्यंत पसरलेल्या प्रदेशात राहतो म्हणून? पोहे, मोदक, पुरणपोळी, पिठलं, शिरा खातो म्हणून की घरी गणपती बसवतो, गुढी उभारतो, भंडारा उधळतो म्हणून?
पृथ्वी, अग्नि, जल, वायु आणि आकाश ह्या पंचतत्वांनी सर्व चराचर सृष्टी बनली आहे, तसाच मी ही. पण तो "मी" म्हणजे फक्त माझं शरीर झालं. मी आज जो काही आहे त्या "मी" ला घडवण्याचं काम गेली शेकडो, कदाचित हजारो वर्षं चालू आहे. "मी" गेली शेकडो वर्षं सह्याद्रीच्या काळ्या कातळांच्या संगतीत राहतोय. त्यानेच मला "जमीनीवर" ठेवलंय. पुरेशाच पडणार्या पावसाने उधळपट्टी न करायला शिकवलंय. जवळपास पूर्ण वर्षभर असणार्या आल्हाददायक हवामानाने मला समाधानी राहायला शिकवलंय. पण हे झालं माझं "जीवनमान".
जिला आपण "संकृती" म्हणतो ती भौगोलिक रचना, वातावरण, पाऊसपाणी, जलस्रोत यांसारख्या नैसर्गिक गोष्टींबरोबरच काही ज्ञात तर काही अज्ञात व्यक्तीसुद्धा धडवत असतात. मग मला "मी" कोणी बनवलं? सांगतो -
जवळपास साडेसातशे वर्षांपूर्वी आपेगावच्या एका मुलाने मला कळणार्या साध्या सोप्या भाषेत साक्षात भगवंताचं गीत समजावून सांगितलं. "आता विश्वात्मके देवे" म्हणत माझ्या विचारांना विश्वाचे आर्त दाखवले. नामदेव, गोरोबा, तुकोबा आणि इतर अनेक संतांनी मला त्या निर्गुण निराकार परब्रह्माचं सावळं, सुंदर रूप दाखवलं. नुसतं दाखवलंच नाही तर त्याला आपलासा करायची एक सोपी युक्ती सांगितली - नामस्मरण. मला आणि माझ्यासारख्या इतरांना एका अदृश्य धाग्याने बांधणारा एक वसा दिला. वारी. आणि मला घडवणार्या पंचतत्वांपैकी पहिलं तत्व दिलं - "पांडुरंग."
त्यानंतर जवळपास साडेतीनशे वर्षांनी शालिवाहन शकाच्या १५५१ व्या वर्षी, शुक्लनाम संवत्सरात, उत्तरायण, फाल्गुन वद्य तृतीयेला, हस्त नक्षत्रावर, सिंह लग्नावर, भीमाशंकराच्या जटांत आणि नाणेघाटाच्या ओठांत वसलेल्या किल्ले शिवनेरीवर साक्षात नृसिंह अवतरला. माझा कुळपुरुष. त्याने माझ्या मनात स्वाभिमानाचा वडवानल चेतवला. माझ्या मनगटात आत्मविश्वासाचं कडं घातलं, आज माझ्या बाहूंमधला जोर केवळ त्याच्यामुळे आहे. माझ्यातली निष्ठा, नैतिकता आणि देशभक्ती हे त्याचं देणं. नेतृत्व, नियोजन, दूरदृष्टी, प्रेरणा, रणनीती, राजनीती ह्या गोष्टी माझ्यात रुजवल्या त्याने. त्या प्रौढप्रतापपुरंधर राजाने मला माझं दुसरं तत्व दिलं - "पराक्रम."
आज माझ्यात दिसणारी पुरोगामी विचारांची "ज्योत" ही खरंतर १९ व्या शतकात एका "सत्यशोधकाने" पेटवलेली आहे. त्याने अनिष्ट रूढी परंपरांचं जोखड मानेवर घेऊन वावरणार्या समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातलं. शिक्षण आणि महिला सबलीकरणाच्या शस्त्रांनी त्याने आणि त्याच्या "क्रांतीज्योती" पत्नीने जातीव्यवस्था, अस्पृश्यता, बालविवाह अश्या अनिष्ट गोष्टींवर हल्ला चढवला. आज महाराष्ट्रातच काय, पण भारतात कुठेही शाळा - महाविद्यालयांत शिक्षण घेणारी माझी प्रत्येक माय - भगिनी कुठेतरी ह्या दोघांची उतराई आहे. ह्या जोडप्यानं आणि त्यानंतरच्या समाजाच्या प्रत्येक स्तरातून आलेल्या अनेक समाजसुधारकांनी मला दिलं माझं तिसरं तत्व - "परिवर्तन."
माझा प्रदेश रांगडा आणि माझी लोकं साधी-भोळी. आमचा आवडता विरंगुळा हा ह्याच दोन गोष्टींचा मिलाफ. कुस्ती. पुरातन काळापासून चालत आलेला खेळ. आता कुठे मातीवर खेळला जाणारा तर कुठे गादीवर. पण महाराष्ट्रात ह्या खेळाचा रंग आहे "तांबडा"! ह्या खेळानी गावागावातून निर्माण केलेले मारुतीरायाचे उपासक. गावागावातून तांबड्या मातीचे आखाडे निर्माण झाले आणि महाराष्ट्र मारुतीरायापुढे दम घुमवू लागला - बलोपासना करायला लागला. बिराजदार, चौगुले, मुतनाळ, आंदळकर, वडार, शेख - नावं तरी किती घ्यायची? जवळपास पावणेदोनशे वर्षांपूर्वी सुरू झालेली "महाराष्ट्र केसरी" स्पर्धा आजही उत्कंठा निर्माण करते. शाहू छत्रपतींच्या कृपेने आम्हाला मिळालेली आमची चौथी ओळख - "पैलवानकी."
पुष्पांमांजी मोगरी आणि परिमळामांजी कस्तुरी असलेली, गोडव्यात अमृतातेही पैजा जिंकणारी माझी माय मराठी. शेकडो वर्षांपासून हजारो सरस्वतीपूजकांनी समृद्ध केलेली. विसाव्या शतकात शब्दांना स्वरांचा सुगंध आला. एका नारायणाने साक्षात लोकमान्यांना आपल्या आवाजाची भुरळ घातली. आणि त्या गंधर्वाच्या पदांचं बोट धरून आमच्या आयुष्यात आमचं नवं वेड आलं - नाटक! बाकी जगाला असेल चित्रपटाचं खूळ. आमचं प्रेम नाटकांवरच. त्याबरोबर आलेली संतवाणी, नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत - हे सगळं म्हणजे आमची पाचवी ओळख - "पद्य."
शिख धर्मात "सरदाराची" ओ़ळख असते ती पाच "क" कारांतून. कच्छा, केश, कंगा, कडा आणि कृपाण. मला परिभाषित करणारे हे पाच "प" कार. ज्ञानोबा - तुकोबांचा "पांडुरंग", शिवरायांचा "पराक्रम", जोतिबा आणि सावित्रीबाईंनी घडवून आणलेलं "परिवर्तन", शाहू छत्रपतींनी दिलेलं "पैलवानकी"चं वेड आणि बालगंधर्वांच्या माध्यमातून आम्हाला लागलेली "पद्याची" गोडी.
ह्या गोष्टी आहेत म्हणून मी मराठी आहे आणि मी मराठी आहे म्हणजे ह्या गोष्टी आहेतच.
© - जे.पी.मॉर्गन
१ मे २०२२
वाचने
5621
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडलंं मी मराठी.
खाशाबा जाधव
आदरणीय डॉ. बाबासाहेब
बाबासाहेबांनी नक्कीच खुप मोठी प्रेरणा दिली.
In reply to आदरणीय डॉ. बाबासाहेब by सुरिया
कोणत्या शिकवणुकीपासून दूर जात
In reply to बाबासाहेबांनी नक्कीच खुप मोठी प्रेरणा दिली. by Trump
परिवर्तन
मस्तच लिहीलेयत माॅर्गनराव!
लेख आवडला ...
मी मराठी आहे नाव माझं मार्गन.
दुभंग
छान !
छान लेख