दवाखान्यातल्या दाई, इतर रुग्ण आणि त्यांचे नातलग या सा-यांना नवल वाटत होतं, की या कारणासाठी सुद्धा कुणाला इतका आनंद होऊ शकतो! तिच्या सासर-माहेरची सगळी मंडळी मात्र अगदी आनंदात होती. कारणही तसंच होतं, तिला पहिलंवहिलं कन्यारत्न झालं होतं. तिच्या सासरी माहेरी दोन्हीकडे मुलांच प्रमाण जास्त होतं, मुलगी ही एकटीच! त्यामुळेच अवघ्या दोन दिवसांचं ते इवलंसं गोंडस पिलू खूप कौतुकाचं होतं. त्याच्यासाठी काय करू आणि काय नको अशी चढाओढ सुरू होती सगळ्यांची! तिलाही अगदी जग जिंकल्याचा आनंद झाला होता. दिवसभर सासूबाई आणि रात्री आई दोघी चिमुरडीची काळजी घेत, त्यामुळे तिला निवांत आराम मिळत असे. तशी ती चिमुरडी नुसतीच सुन्दर आणि गोंडस नाही, तर हसरी पण होती. रडणं तर खूप कमी!
जेवण करून लौकरच ती झोपी गेली. आई पण चिमुरडीला थोडा वेळ खेळवून झाल्यावर कुशीत घेऊन झोपली.
"डॉक्ट्..................र................" एक भयानक किंकाळी त्या दवाखान्याच्या भिंती चिरत गेली. पटापट सगळीकडचे दिवे लागले, सगळे खडबडून जागे झाले. पहाट फुटायला थोडाच वेळ होता. धावत पळत डॉक्टर आल्या. काय होतंय, काय चाललंय कुणालाच कळत नव्हतं. ती पण जागी झाली. आई कानोसा घेऊन बाहेर गेली. थोड्या वेळानं आई परत आली. तिनं आईला विचारलं, "काय झालं ग आई? कोण किंचाळत होतं?" " काही नाही ग, रोजचंच काहीतरी चालू रहातं दवाखाना म्हटल्यावर! तू झोप निवांत की उठून बसतेस थोडा वेळ?" आईनं विचारलं, पण काहीतरी टाळलं हे तिच्या लक्षात आलं.
सगळं आवरून दुपारी आई घरी गेली आणि सासूबाई येऊन थांबल्या. तिचं जेवण झालं. चिमुरडी मस्त झोपली होती. सासूबाईंच्या बारशाच्या तयारीबद्दल गप्पा सुरू होत्या. नाव काय ठेवायचं, कुणी काय नावं सुचवली, काय काय आणायचं, याची इत्थंभूत माहिती त्या उत्साहानं देत होत्या, पण तिचं लक्षच नव्हतं. वरवर तर ती हो ल हो करत होती, पण तिच्या डोक्यातून ती किंकाळी अजून गेलीच नव्हती. "झोप आता जरा वेळ. ओल्या बाळंतिणीनं जास्त वेळ नाही बसू." सासूबाई बोलल्या. तिनं पडत्या फळाची आज्ञा प्रमाण मानली. तिला झोपलेली पाहून त्या बाहेर गेल्या.
लादी पुसायला आलेली बाई स्वतःशीच बडबडत होती काही. तिनं विचारलं, "कोण किंचाळत होतं बाई पहाटे? काय झालं?"
"का बोलावं माय आता! कोन मेला मसन्या वानाचा राकूस होता काय ठावं? तीन वर्साचं लेकरू बी ज्याला कमी पडलं!" बरंच काही बडबडत तिनं लादी पुसली आणि बडबडतच ती निघूनही गेली. ती सुन्न! काय घडलं असेल, याचा थोडासा अंदाज तिला येत होता!
"डॉक्ट्..................र................"पुन्हा एक भयानक किंकाळी ! खूप आरडाओरडा, रडारड, गोंधळ. काही समजत नव्हतं. खोलीत ती एकटीच. पिलू झोपलेलं. तिनं खिडकीतून खाली पाहिलं, शववाहिकेत कुणीतरी डोकं बडवत, रडत ओरडत बसलेली, कदाचित त्या मुलीची आई, हतबल आणि मूक झालेले तिचे बाबा असावेत! स्ट्रेचरवरून पांढ-या चादरीखाली झाकलेलं कलेवर! मागे मागे जाणारे सुन्न नातेवाईक असतील कदाचित.
तिला आठवलं तिचं आयुष्य. बालपणापासून आजतागायत आलेले सगळे विचित्र अनुभव भोवती पिंगा घालून नाचायला लागले भुताच्या सावल्यांसारखे. नकळत झाल्यासारखे वाटणारे सहेतुक घाणेरडे स्पर्श, कामूक नजरा, विचित्रशी अनाकलनीय भाषेतली वक्तव्ये, शिकवणीच्या सरांनी काहीतरी केलं म्हणून आत्महत्या करणारी मैत्रिण! स्त्री असण्याचा शाप? नात्यांमध्येही वासनांची वारंवार येणारी प्रत्यंतरं, लग्नानंतर देखिल आपल्या मनाचा विचार न करता हवं तसं हवं तेव्हा हक्कानं लुबाडणारा नवरा! एक व्यक्ती म्हणून विचारात न घेतलं जाता केवळ एक मादी म्हणून झालेली गणना!
"डॉक्ट्..................र................"ही किंकाळी होती तिच्या सासूबाईंची आणि नुकत्याच घरून आलेल्या आईची! धावत धावत डॉक्टर आल्या, सगळा दवाखाना आता तिच्या खोलीपुढे जमा झाला. एक क्षण काहीही न सुचलेल्या डॉक्टरनी तिच्या मांडीवरची उशी उचलली. दोन दिवसांचं गोंडस पिलू निपचित पडलं होतं आपल्या जन्मदात्रीच्या मांडीवर! ती शून्यात पहात गोठलेल्या नजरेनं! तिला गदागदा हलवलं डॉक्टरांनी, अचानक झोपेतून जागी झाल्यासारखी ती बाळाकडे पहात निस्तेज आवाजात बोलली, "डॉक्टर, मी वाचवलं तिला!" आणि ती कोसळली!
वाचने
7299
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान असे
हे असं
खरंच
बापरे!!
शेवट सुन्न
In reply to बापरे!! by प्राजु
अवघड आहे !!!
आणि मी मेलो
In reply to अवघड आहे !!! by टारझन
क्रांती
(विषय दिलेला नाही)
सशक्त कथा
असहमत असहमत असहमत.........
अरे
मत फुकट
In reply to अरे by दशानन
सगळेच
In reply to मत फुकट by यशोधरा
अभिमन्यूच
In reply to सगळेच by दशानन
अगा आय आय....
क्रान्ती, क
छान
चांगली कथा
फर सुन्न
आम्बोल्या
In reply to फर सुन्न by आंबोळी
शेवट
बिलव्हेड
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
बातमीवरुन