Skip to main content

एसटीचा संप : विलीनीकरण एकच मार्ग ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 21/11/2021 10:19 या दिवशी प्रकाशित केले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात आपली सर्वांची लालपरी, एसटी याची सेवा देणा-या कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करावे या एकमेव मुद्द्यावर आंदोलन सुरू असून गेली काही दिवसांपासून ऐन दिवाळीत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सुरू झालेले काम बंद आंदोलन आजही सुरू आहे.

maha-st
बोधचिन्ह

आघाडी सरकार असो की मागील सरकार असो दोन्हीही सरकारांनी विलीनीकरण शक्य नाही अशा भूमिका घेतलेल्या होत्या. आणि मा.न्यायालयानेही याबाबतीत समिती नेमून निर्णय घ्यावा असे म्हटलेले आहे. एसटी तुलनेने स्वस्त आणि सुरक्षित आहे, म्हणून एसटी सर्वांसाठीच वेगळा विषय आहे, म्हणून हा काथ्याकूट.

एक नजर टाकूया एसटीच्या इतिहास भूगोलोकडे- देशातील सर्वसामान्य जनतेला दळणवळणासाठी किफायतशीर दरात' ना नफा ना तोटा' या तत्त्वावर राष्ट्रीयकरणाच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेसाठी केंद्रसरकारने मार्ग परिवहन अधिनियम-१९५० तयार केला आणि त्या अन्वये राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्थापन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC ही संस्था एष्टीचा कारभार चालवते. ही एक स्वतंत्र संस्था असून त्यास सरकार काही प्रमाणात अनुदान देतं आणि बाकी पैसा एसटी उभी करते. सरकारचे परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष असतात. एसटीची तिकिटं, गाड्या भाड्यावर देणे यातून एसटीला उत्पन्न मिळतं. एसटी कर्मचारी हा सरकारी कर्मचारी आहे, परंतु तो निमसरकारी आहे. एसटी कर्मचा-यांचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे, नसता एकदा की तिची चाके रुतून बसली की पुन्हा मग त्यातून बाहेर पडणे अशक्य आहे असे वाटते. एसटीचा प्रवास आणि सुविधा आपल्या सर्वांचाच हळवा विषय आहे, आपण सर्वच एसटीने प्रवास करून मोठे झालेलो आहोत आणि काही तर, एसटीची वाट पाहणारे कायम प्रवासी आहेत. आपल्या सर्वांचाच तो जिव्हाळ्याचा विषय आहे.

ST-bus
आपली एसटी

एसटीचे शासनात विलीनीकरण झाले तर कर्मचा-यांचे प्रश्न सुटणार आहेत का ? वेतन वाढणार आहेत का ? सध्याचे त्या कर्मचा-यांचे वेतन फारच तुटपुंजे आहे असे व्यक्तीगत मत आहे. दहा वर्षाच्या सेवेनंतर चालक वाहक यांचे वेतन सतरा हजाराच्या जवळपास जाते. मला वाटते प्रदीर्घ सेवेनंतरही मिळणारे वेतन आजच्या काळात कमी आहे.

एसटी गेली अनेक वर्ष कायम तोट्यात असल्याच्या बातम्या वाचनात येत असतात. लॉकडाऊन काळात तर एसटी जवळजवळ बंद अवस्थेत होती त्यामुळे तोट्यात असलेल्या एसटीच्या नुकसानीत अजूनच भर पडली. एसटीचे आर्थिक स्त्रोत वाढविण्यावरही भर दिला पाहिजे असे वाटते, एसटीच्या खूप जागा आहेत त्यात गाळे काढून ते भाड्याने देणे, निगा राखणे, व्यवसायीकरण वगैरे करून त्यावर भर दिला तर एसटीचा आर्थिक स्त्रोत वाढेल असे वाटते. प्रवाशांना वेगवेगळ्या दिल्या जाणा-या सवलती कमी केल्या पाहिजेत. तरच एसटीची अवस्था सुधारेल असे वाटते. आर्थिक चणचणीवरचा उपाय म्हणून नुकतेच तिकीट दरामधेही सतरा टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. अपुरे आणि वेळेवर न होणारे पगार.आगारांमधील वाईट परिस्थिती, एसटीच्या अनेक कर्मचा-यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचनात येतात.

ऑक्टोबर अखेरीस कर्मचा-यांनी राज्यभर बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे, राज्य सरकारने महागाई भत्ता बारा टक्क्यावरून अठ्ठावीस टक्के केला आहे, असे असले तरी एसटी कर्मचारी यावर नाखुष असून एसटी महामंडळाचं शासनात विलणीकरण करण्यात यावे हीच त्यांची मुख्य मागणी आहे. कोणत्याही संघटनेच्या नेतृत्वाशिवाय हे आंदोलन सुरू आहे.

एसटी शासनाच्या ताब्यात गेल्यावर सर्व प्रश्न सुटतील असे या एसटी कर्मचाऱ्यानं वाटते. एसटी विलीनीकरण कसे होऊ शकते ? एसटी महामंडळाची निर्मिती ही Road Transport corpaoration Act 1950 नुसार झालेली आहे. हा केंद्र सरकारचा कायदा आहे त्यामुळे या कायद्याखालचं महामंडळ बरखास्त करून ते राज्य शासनात विलीन करण्याची प्रक्रिया असेल. राज्य परिवहन महामंडळ कायदा १९५० अन्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अस्तित्वात आलेले आहे, त्यावेळी राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे भाग भांडवल यात गुंतविण्यात आलेले होते. कायद्यातील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्वायत्त राज्यसरकारची कंपनी किंवा राज्यसरकारचा विभाग म्हणून राहू शकतो. विलणीकरणासाठी केंद्रसरकारची परवानगी घेणे आणि त्यांचे भागभांडवल परत करणे आवश्यक असेल त्यानंतर महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाने ठराव करुन आपला स्वायत्त दर्जा संपुष्टात आणून राज्याचा विभाग म्हणून राज्य सरकारने मान्यता द्यावी असा ठराव मंजूर करून राज्य सरकारला विनंती करणे गरजेचे आहे, अशावेळी महामंडळाची आताची रचना संपुष्टात येईल.

विलीनीकरणानंतर, एसटी कर्मचा-यांचे सर्व वेतन भत्ते सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे शासनावर आर्थिक भार पडेल. ( पडला तर पडू द्या) एसटीचे ९२ हजार कर्मचारी आहेत, त्यांची एकदा मागणी मंजूर झाली की इतर महामंडळाच्या कर्मचाऱ्याचीही मागणी पुढे येईल. देशात एकूण ५० पेक्षा अधिक परिवहन महामंडळे आहेत, केवळ आंध्रप्रदेश परिवहन महामंडळाचे राज्यशासनात विलणीकरण झालेले आहे, बाकी मंडळे अशी तशी आधारावर चालू आहेत.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे, एसटी कर्मचा-यांचे वेतन सुधारले पाहिजे. नव्या बसेस खरेदी केल्या पाहिजेत. भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे. प्रवाशांच्या मार्गावर नियमित वेळेवर बसेस आल्या गेल्या पाहिजेत. कर्मचाऱ्यांची अरेरावी कमी होऊन नम्रपणा आला पाहिजे वगैरे मतं मांडण्यासाठी हा धागा.

काथ्याकूट विस्कळीत असला तरी, मुख्य विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या विचारांचे स्वागत आहे. वीस बावीस वर्ष नियमित एसटीने प्रवास करीत राहीलो आहे. प्रवाशी संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या आंदोलनात प्रवाशांच्या बाजूने उभा राहीलो आहे. बाकी, काथ्याकूट माहिती संदर्भ आणि छायाचित्रे जालावरील चालूघडामोडी इतर संकलन यातून केलेले आहे, ते बरोबरच असू शकते असा दावा नाही. (चुभूदेघे)


वाचने 72733
प्रतिक्रिया 253

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

एस्टी महामंडळाचं खासगी करण करा पण त्यात सरकारचा हिस्सा आणी निर्णायक शब्द असावा. विलीनीकरण केलं तर खर्चं आणखीन वाढेल आणी उत्पादकता खाली जाईल. मुजोरी वाढेल. शिवाय तांत्रिक अडचणी आहेतच. गाड्यांची अवस्था आणखीनच बिकट होइल. कोणीतरी कडक कार्यकरी अधिकारी नेमा जे शिस्त लावील आणी कार्यक्षमता आणेल. त्याला लोकांना पार्श्वभागावर लत्ताप्रहार करुन हाकलुन देण्याचेही अधिकार असावेत.

In reply to by सामान्यनागरिक

एस्टी महामंडळाचं खासगी करण करा पण त्यात सरकारचा हिस्सा आणी निर्णायक शब्द असावा.
नक्को, तिकिटे महाग होतील, ग्रामीण भागात शिक्षण, स्कुल ड्रॉपआऊट परसेंटेज इत्यादी मोकार वाढेल, परत लोंढे येतील शहरात शहरांवर ताण वाढेल, शहरातील भद्रजन जनतेस त्रास होईल आणि शिव्या बसतील त्या लोकांनाच. एसटीचा सोशल डिव्हीडंट दांडगा आहे, तो तसा असणे हा घटनादत्त वेल्फेअर स्टेट कन्सेप्टमधला एक भाग आहे तो तसा असावा(च) फक्त तो तसा असताना एसटी कर्मचाऱ्यांचे हाल हाल होऊ नयेत असा काहीसा सुवर्णमध्य असावा...

शेतकरी आंदोलनावर बोंबलणारे, राजकारण करणारे महाभकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर मूग गिळून आहे, रोज जिलब्या टाकणारे राऊत, मलिक संपावर एक चकार शब्द बोलायला तयार नाहीत, मा. मुख्यमंत्री तर कुठे गायब आहेत न कळे. काळाने उगवलेला सूडच म्हणायचा हा. भाजप तर १००% संपाचे राजकारण करतोच आहे आणि करावेच. मात्र ह्यात सामान्य एसटी कर्मचारी भरडला जातोय. विलनिकरणावर अवश्य चर्चा व्हायला हवी मात्र राज्य सरकार जे खाजगीकरणाचे पिल्लू सोडून देतंय ते निषेधार्ह. माझा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना संपूर्ण पाठिंबा.

In reply to by प्रचेतस

माननीय मुख्यमंत्री ह्यांचे नुकतेच ऑपेरेशन झाले आहे ,मानदुखी आणि खांदे दुखी ,पण बरेच शाषण निर्णय खोळंबले

In reply to by प्रचेतस

संपुर्ण खाजगीकरण हाच एकमेव उपाय ! महाविकास आघाडीने निष्ठुरपणे संप मोडीत काढावा . भाजप खुप चलाख लोकांचा पक्ष आहे. स्वतः कॅपिटॅलिस्ट आहेत त्यांनी कर्मचार्‍यांच्या पोकळ मागण्या कधीही मान्य केल्या नसत्या , आत्ता केवळ सत्तेत नाहीत म्हणुन काड्या सारत आहेत बस्स. एस.टी महामंडळ हा एक पराकोटीचा भोंगळ कारभार आहे , त्याचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर टाकु नये, रीतसर खाजगी बस सेवेला परवानगी द्यावी . ज्याला चांगला प्रवास करायचाय त्याला त्याच्या खिषातुन पैसे भरु दे, उगाच इतरांच्या करावर डल्ला का ? मुळातच बहुतांश एस.टी सांभाळनारे लोकं बावळट आहेत . मी एकदा शिवनेरीने मुंबई सातारा प्रवास केलाय तेव्हा बस मध्ये अक्षरशः ४-५ माणसे होती =)))) हेच विमानसेवेच्या बाततीत असते तर त्यांनी माझे तिकिट कॅण्सल मरुन त्याबदल्यत काहीतरी कंपेन्सेशन देत मला पुढच्या विमानात अ‍ॅडजस्ट केले असते !!! पण ज्या लोकंची वृत्ती आधीच सरकारी कर्मचार्‍यांसारखी आहे त्यांना खरेच सरकारी कर्मचारी केले तर काय होणात ह्याचा आपण केवळ अंदाजच लावु शकतो. =) बाकी तसा माझा एस.टी वर वैयक्तिक राग आहे , एकदा केवळ मी दिलेल्या ५०० रु च्या नोटेवर काहीतरी पेन्सिल ने लिहिले होते , "ही नोट चालणार नाही " असे म्हणत मला कंडक्टर ने गडबडीत खाली उतरवले अन त्यानादात बस मध्ये महत्वाची बॅग विसरल्याने मला झक मारत खाजगी गाडी करुन ३००० रुपये घालुन ठाण्यापर्यंत प्रवास करावा लागला. तिथं पोहचल्यावर कंडक्टर ख्यॅ ख्यॅ ख्यॅ करत म्हणतोय चालवली असती नोट आपण नंतर , अनेक जणांकडे तसल्याच नोटा होत्या . प्रचंड राग आलेला , काय करणार , पण बामणी संस्कार असल्याने मनातल्या मनात शिव्याशाप घालुन निमुटपणे निघुन आलो. त्यातल्या शिव्या सोडून द्या पण एक दोन शाप फळले तर मनाला असे तामसिक समाधान लाभत आहे ! करा लेको , अजुन संप करा , भेंडी, तुमची अवस्था त्या गिरणी कामगारांसारखी च व्हायला हवी ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

मुंबई सातारा ठीक आहे ,मी साताऱ्याहून हैदराबाद गाडीत बसलो होतो ,माझ्या साताऱ्याच्या मित्राला रात्रभर झोप नाही आली ,सातार्याहून लोक हैदराबाद ला कसे जातात म्हणून ,गाडीत फकत ३ लोक होते ,बाकी सोलापूरला बसले बाकी तसा माझा एस.टी वर वैयक्तिक राग आहे काळसर होता का? हातावर शिवाजी महाराजांचा टॅटू?

In reply to by हस्तर

काळसर होता का? हातावर शिवाजी महाराजांचा टॅटू?
आता आठवत नाही , खुप प्रयत्न करुन सदर माणासला विसरलो आहे, प्रसंग मात्र विसरत नाही ५-६ वर्षे होऊन गेली तरीही ! बाकी शिवाजी महाराजांचा टॅटु म्हणालात हे मात्र खरं आहे. अन्य सरकारी खात्यातील गाडीवर शिवाजी महाराजांचे चित्र स्टिकर लावलेल्या माणासाने काहीही कारण नसताना ५०० रुपायला घोडा लावलेला ते आठवले. हे स्टिकर्स अन टॅटू ची मला दहशतच बसली आहे आता ! असल्या लोकांपासून लांब रहाणेच उत्तम !

In reply to by प्रचेतस

प्रिय प्रचेतस. स.न.वि.वि. राज्यसरकाराच्या कारभाराबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतील, आपल्याही चर्चा विषय आणि इतर प्रश्नांच्या बाबतीत केलेल्या मताचा आदर आहेच. बाकी, मा. मुख्यमंत्री कुठे आहेत या एसटी संपाबाबत तर त्याबाबत बोलले पाहिजे. मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, या विषयावर बोलले आहेत. ''एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करत आहोत. उच्च न्यायालयासमोर देखील शासनानं आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय-काय पाऊलं उचलत आहोत ते सांगितलंय. न्यायालयाचं देखील समाधान झालं आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरु केलं आहे. अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वचजण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा, अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे'' मा. मुख्यमंत्री. (वृत्तपत्र संदर्भ) राज्यसरकारच्या वतीने या विषयावर काही बोलले जात नाही, या आरोपात काही तथ्य नाही असे वाटते. आपल्या दुस-या मुद्द्याकडे वळतो की, भाजप तर १००% संपाचे राजकारण करतोच आहे, यात तर काही वाद नाही. मा. फडनवीस १०५ आमदार घेवून घरी बसलेले आहेत, यातलं भाजपचं दु:ख मोठं आहे, आज सत्तेत येऊ, उद्या येऊ, असे मुहुर्त पाहु पाहु आणि प्रसिद्धीमाध्यमासमोर येवून आक्रस्ताळपणे बोलणे याला महाराष्ट्रातली जनता कंटाळली आहे. सक्षम विरोधी पक्ष म्हणून सर्व आमदारांनी आझाद मैदानावर संपक-यासोबत बसले पाहिजे. राजकारण न करता तोडगा काढला पाहिजे. मिळमिळीत भूमिका लोकांना पचत नाही. उदा. मा. फडनवीस यांचं, काल एक ट्वीट ऐकतो होतो. खरं तर, विरोधी पक्षही या विषयाकडे फारसे गांभीर्याने बघत नाही असे वाटते. यांचंही इतर विषयावरच दळण सुरु आहे. अमरावती, त्रिपूरा वगैरे. तर, त्यांचं एक ट्वीट आहे. '' एसटी कर्मचा-यांच्या बाबतीत राज्य सरकारची आडमूडी भूमिका जीवघेणी आहे" बाकी बाईट्स मधील मतं मोठं गमतीशीर आहेत. ''विलणीकरण आणि त्यांच्या अडचणी याबाबतीतलं मधला तोडगा आम्ही सांगितला आहे'' (ट्वीटर लिंक) म्हणजे थेट विलणीकरणाच्या अडचणी यांनाही माहिती आहे. पण प्रश्न सोडविण्यापेक्षा एसटी कर्मचा-यांच्या विषयाचे राजकारणच करायचे यातच यांचं सौख्य सामावले आहे, असे वाटते. ''विलनिकरणावर अवश्य चर्चा व्हायला हवी मात्र राज्य सरकार जे खाजगीकरणाचे पिल्लू सोडून देतंय ते निषेधार्ह'' याबद्दल म्हणाल तर, मुख्य विषय हाच आहे की विलणीकरणाने कर्मचा-यांचे प्रश्न सुटत असतील आणि ती प्रोसेस कठीण नसेल तर निर्णय व्हायला हवा. न्यायालयाने दिलेल्या समितीने लवकरात विविध मुद्यांसहित, विलणीकरणाची भूमिका स्पष्ट करुन योग्य काय आहे, त्याबाबतीत कार्यवाही व्हायला हवी. दुसरा मुद्दा खासगीकरणाचा. जे भाजप सरकार, सरसकट खासगीकरणाचे धोरण अवलंबित आहे तो पक्ष एसटीचं खासगीकरण करु नये म्हणून भांडत आहे, हे दुटप्पी राजकारण आहे. बाकी, खासगीकरणाची भिती, संपक-यांना निलंबित करणे, हा विषय पुढे कुठे जाईल हे आत्ता तरी सांगता येत नाही. बाकी, माझाही संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना संपूर्ण पाठिंबा आहे, माझ्या तालुक्याच्या गावी असलेल्या एसटी कर्मचा-यांच्या आत्तापर्यंत दोनदा भेटी घेतल्या. त्यांच्याबरोबर बसून घोषणाबाजी केली. संपक-यांना धीर दिला. (फोटो वगैरे काढला) काल रविवार होता तर आम्हा प्रवाशांच्या वतीने चहा आणि पोहे असा अल्पोहार देवूनही आलो. व्यक्तीगत माझेही बस अभावी प्रचंड हाल होत आहेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संपाचं राजकारण हे वर्षूनवर्षे चालू आहे ... कोणीच धुतलाय तांदळा सारखा स्वच्छ नाही , प्रत्येक पक्षाच्या जर कामगार संघटना आहेत तर हे होणारच दुर्दैव आहे .. त्यात एस टी म्हणजे एअर इंडिया सारखा.. फायदा नाही तरी तोटा तरी होऊ नये आणि झालाच तर माफक प्रमाणात व्हावा हे कोणत्ययी काँग्रेस आणि समाजवादी गटाने एवढी वर्षे पहिले नाही आणि जर भाजप आता त्यात काही सुधारणा करू लागला तर "खजिग खाजगी म्हणून आरडाओरडा .. काँग्रेस ने अतिशय देश विघातक आश्या खलिस्तानी घुसलेल्या शेतकरी आंदोलनं पाठिंबा दिला तर ते चालत आणि ज्यात देशाला फार धोका नाही त्या परिवहन मंडळाच्या सापात मात्र राजकारणात हि चालून आलेली राजकीय संधी भाजपने घेतली तर ते मात्र निषेधार्त ! वा रे वा "एसटीच्या खूप जागा आहेत त्यात गाळे काढून ते भाड्याने देणे, निगा राखणे, व्यवसायीकरण वगैरे करून त्यावर भर दिला तर एसटीचा आर्थिक स्त्रोत वाढेल असे वाटते" मग ते खाजगी करण चालट वाटत .. काही करून भाजप कसा चुकतंय हे रेकॉर्ड असो राजय तिघाडीचे आहे सोडवा " खलिस्तानी घुसलेल्या " या विधानावर जे विश्वास ठेवणार नाहीत त्यांनी जरा जगभरातील शीख संस्थांचे विडिओ आणि झालेलया घटना बघा आणि मग बोला

सर्वच कामगार संघटना संप करतात. रेल्वे कर्मचाऱ्यांनीही १९७४ मध्ये अयशस्वी संप केला. मुद्दा असा आहे की पगारवाढीसाठी मागण्या, मग काही आंदोलनं, आणि नंतर जिल्हा कामगार कार्यालयातून एक मिटवण्याची हालचाल असे स्वरूप असते. सेवा जर अत्यावश्यक असेल तर वेगळा नियम लागतो. कामगार संघटनेचे नेते आणि कायदेविषयक सल्लागार यांच्या भूमिका महत्त्वाच्या असतात. तसेच अशीच प्रकरणं आणि देशातला इतिहास लक्षात घ्यावा लागतो. प्रकरण कोर्टात नेलेले आहे. उद्या निकाल आहे. निर्णय मनासारखा झाला नाही तर मग वरच्या कोर्टात जावे लागेल. तोंंडावर पडायचीच वेळ आली तर कुणी पडायचे आणि कसे लपवायचे हे सुद्धा शोधून ठेवावे लागेल. अन्यथा ज्यांना या मध्ये लोणी मिळणार ते मिळतच राहणार.

एस टी कधी काळी महाराष्ट्राची लाईफ लाईन म्हणून ओळखली जात होती. माझ्या आठवणी प्रमाणे प्रसन्न ट्राव्हलस खाजगी वाहातुक संस्था पहिल्यांदा अस्तित्वात आली असावी. पुणे नागपुर बरेच वेळा प्रवास केला कारण एकुलती एक महाराष्ट्र एक्सप्रेस खुप फिरून जात असे. के एस आर टी सी ने पुणे बेगंलुर सुद्धा बरेच वेळा प्रवास केला. एकदा शिवनेरी ने प्रवास करत असताना फक्त बस मधे आठ प्रवासी होते तर के एस आर टी सी बावन्न प्रवासी भरून घेऊन चालली होती. एस टि ने प्रवाशांना योग्य सेवा,त्यांची बदलती मानसिकता, बदलते तंत्रज्ञान, खाजगी ट्राव्हलस ,रेल्वे चे वाढते जाळे यानी निर्माण केलेली स्पर्धा याची दखल न घेतल्याने आजची स्थिती निर्माण झाली. गाड्यायांची दुरावस्था, नेते, व्यवस्थापन आणी स्वताः कर्मचारी वर्ग जबाबदार आहे. आज प्रवासी के एस आर टी सी मधुन जाणे जास्त पसंत करतात बशर्ते शिवनेरी. प्रत्येक शिवनेरी ट्रिप महामंडळाला नुकसान होत असताना सुद्धा चालू ठेवण्याचा आट्टहास सारखे निर्णय महामंडळाच्या सद्यस्थिती ला कारणीभूत आहे. सरकार, महामंडळाने यावर विचार करणे जरूरी आहे. विलीनीकरण करून एस टि चे पुनर्जीवित करणे जरूरी आहे नाहीतर खेड्यापाड्यातील गरीब प्रवाशांचे काय हाल होतील सांगता येत नाही. राजस्थान, करनाटक परीवाहन संस्था जर फायदा मधे आहेत तर महाराष्ट्र कुठे कमी पडतो याचा विचार होणे आवश्यक आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

फक्त..
प्रत्येक शिवनेरी ट्रिप महामंडळाला नुकसान होत असताना सुद्धा चालू ठेवण्याचा आट्टहास सारखे निर्णय महामंडळाच्या सद्यस्थिती ला कारणीभूत आहे.
याबाबतीत थोडासा साशंक आहे, माझ्या माहितीप्रमाणे एसटीची शिवनेरी सेवा फायद्यात आहे/होती. निदान मुंबई-पुणे मार्गावरील तरी...

In reply to by सॅगी

या महामंडळाच्या निधीतून विकत घेऊन खासगी कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या खरेदीची किंमत आणि तिकिटांची आवक यात काहीही ताळमेळ बसणार नव्हताच. तरीही तो व्यवहार उरकण्यात आला.

In reply to by सॅगी

बेगंलुर पुणे शिवनेरी, संध्याकाळी चार च्या बसचे तिकीट पंधरा दिवस पहीले बुक केले. वेबसाइट आजीबात फ्रेण्डली नव्हती. जेव्हां बस मधे चढलो तेव्हा फक्त चारच लोक, चालक, वाहक आणी आम्ही दोघे पती पत्नी. पत्नी म्हणाली आपण नको जायला रात्रीचा प्रवास आहे. तरी पर्याय नव्हता आणी दुसर्‍या दिवशी ड्युटी वर जायचे होते नाईलाजाने बसून राहीलो. पुढे शहर सोडताना आणखी चार प्रवासी बस मधे चढले. सर्व मीळून आठ झाले. पुढे चार दावणगेरे का कुठलेसे गाव होते तीथे उतरले. पुन्हा आम्ही चारच. चालक महामंडळाला आई माई वरून शिव्या देत होता त्याला शेवटी समज द्यावी लागली की बाई माणूस आहे जरा तोंड आवरा. सर्व प्रवासात वाहकाने प्रत्येक खेपे मागे महामंडळाला किती उणे फायदा होतो त्याचे गणीत समजावत आपली व्यथा मांडली. बाकी पुणे खारघर एक वर्ष दर शुक्रवारी रात्री व सोमवारी सकाळी प्रवास केला शिवनेरी हाऊसफुल्ल असायची.

In reply to by कर्नलतपस्वी

सर्व प्रवासात वाहकाने प्रत्येक खेपे मागे महामंडळाला किती उणे फायदा होतो त्याचे गणीत समजावत आपली व्यथा मांडली.
परवडत नाही म्हणूनच बहुदा शिवशाही या नावाने (या नावाला काळीमा फासणारी) नवी सेवा सुरू केली असावी. लाँचींगच्या वेळेस शिवनेरीच्याच एका स्कॅनिया बसला शिवशाहीचे वेष्टन लपेटले आणि प्रत्यक्षात टाटा/लेलँडच्या बसेस आणल्या. एसटीची प्रतिमा मलीन करणाऱ्या घाणेरड्या अवस्थेतील शिवशाही बसेस | MSRTC Shivshahi Buses इतर राज्यांच्या वोल्व्हो/स्कॅनिया सेवेला उत्तर काय तर टाटा/लेलँडच्या बसेस असणारी शिवशाही...कसे तगणार स्पर्धेत???

In reply to by सॅगी

बेगंलुर पुणे शिवनेरी, संध्याकाळी चार च्या बसचे तिकीट पंधरा दिवस पहीले बुक केले. वेबसाइट आजीबात फ्रेण्डली नव्हती. जेव्हां बस मधे चढलो तेव्हा फक्त चारच लोक, चालक, वाहक आणी आम्ही दोघे पती पत्नी. पत्नी म्हणाली आपण नको जायला रात्रीचा प्रवास आहे. तरी पर्याय नव्हता आणी दुसर्‍या दिवशी ड्युटी वर जायचे होते नाईलाजाने बसून राहीलो. पुढे शहर सोडताना आणखी चार प्रवासी बस मधे चढले. सर्व मीळून आठ झाले. पुढे चार दावणगेरे का कुठलेसे गाव होते तीथे उतरले. पुन्हा आम्ही चारच. चालक महामंडळाला आई माई वरून शिव्या देत होता त्याला शेवटी समज द्यावी लागली की बाई माणूस आहे जरा तोंड आवरा. सर्व प्रवासात वाहकाने प्रत्येक खेपे मागे महामंडळाला किती उणे फायदा होतो त्याचे गणीत समजावत आपली व्यथा मांडली. बाकी पुणे खारघर एक वर्ष दर शुक्रवारी रात्री व सोमवारी सकाळी प्रवास केला शिवनेरी हाऊसफुल्ल असायची.

आर्यनचे ड्रग प्रकरण, समीर वानखेडेंच्या वडिलांचे नाव, त्यांचा धर्म, त्यांच्या शाळा सोडायच्या दाखल्यावर नाव काय आहे वगैरे वगैरे खूप जास्त महत्वाच्या प्रश्नांवर विचार करायला राज्य सरकारकडे वेळ आहे. त्यामुळे आणि त्यापुढे एस.टी कर्मचारी आणि त्यांचे प्रश्न म्हणजे अगदीच क्षुल्लक. मरू देत ना एस.टी कर्मचारी. राज्य सरकारला काय त्याचे? महाराष्ट्रात असे नाकर्ते सरकार यापूर्वी कधी बघायला मिळाले नव्हते.

मग नाकर्तेपणांत अधिक नाकर्ते कोण यात सरशी होऊन एकदाचे सरकार बसले आणि निवडणुकांवरचा आणि मतदानावरचा विश्वास उडाला.

एसटीच्या सध्याच्या परिस्थितीला एसटी कर्मचारी तसेच आजपर्यंतची सर्व राज्य सरकार सारखीच जबाबदार आहेत. कर्मचाऱ्यांचे उद्दाम वागणे , डेपोमधील भ्रष्टाचार इ. सर्वज्ञात कारणे प्रत्येक राज्य सरकारने स्वार्थासाठी जाहीर केलेल्या भरमसाठ सवलती (जर महामंडळ स्वायत्त आहे तर सरकार अशी सवलतींची जबरदस्ती कोणत्या नियमानुसार आणि कशी करू शकते? आणि त्या सवलतींपोटी / अनुदानापोटी होण्याऱ्या खर्चाची पूर्तता न करणे. (केंद्र सरकार जीएसटी परतावा देत नाही म्हणून बोंबलणे आणि स्वतः एसटी / शाळांच्या अनुदानाची रक्कम दाबून ठेवणे / हडपणे असा दुटप्पीपणा ), टोलमध्ये पुढाऱ्यांच्या गाडयांना सवलत देणे पण एसटीला सवलत नाकारणे इ. इ. या शिवनेरी / शिवशाही गाड्यांचा कंत्राटदार नक्की कोणता वजनदार व्यक्ती आहे ज्याच्या फायद्यासाठी हि सेवा चालू ठेवली जात आहे. परिवहन मंत्री सोडून तिन्ही पक्षाच्या कोणत्या प्रमुखाने (उद्धव ठाकरे / शरद पवार / बाळासाहेब थोरात ) आंदोलन कर्त्यांबरोबर प्रत्यक्ष चर्चेची तयारी दाखवली? यांना माध्यमांकरवी विनंत्या करणे सोपे आणि महत्वाचे वाटते. सहानुभूती दोन्ही पक्षांना नाही पण सर्वसामान्य जनतेचे दरवर्षी ऐन सणासुदीच्या वेठीस धरले जाणे सहन होत नाही. दर दिवाळीत एसटी आणि ऊस उत्पादकांच्या संपाचा आता वीट येऊ लागला आहे.

माणसांना (आणि सामानाला, for that matter) एका गावाहून दुसऱ्या गावी घेऊन जाणे हे शासनाचे काम असू शकत नाही. तत्वतः एकेकाळी असेलही, पण आज नक्कीच नाही. एअर इंडिया प्रमाणे रा प महामंडळाचे तातडीने एका कंपनीत रूपांतर करावे. ज्यांची लायकी आहे असे सर्व संबंधित (stakeholders) सुखी होतील.

In reply to by वामन देशमुख

ज्यांची लायकी आहे असे सर्व संबंधित (stakeholders) सुखी होतील. कोणाची लायकी काय हे कोण ठरवणार अन ठरवणाऱ्याची लायकी काय आहे हे कोण लायक माणूस ठरवणार ?

धाग्यावर आणि प्रतिसादांत सरांच्या भाषेत शेठ चा, रागा चा आणि संरा चा उल्लेख चर्चेत नसल्यामुळे धागा शतक पार करेल असे वाटत नाही :)

एसटी चे म्हणाल तर सर्व मोक्याच्या ठिकाणी मोठमोठी आगारे आणि अवाढव्य जागा आहेत. ठाण्यात खोपट, वंदना टॉकीज, ठाणे रेल्वे स्टेशन जवळ मोठमोठ्या जागा आहेत. ह्या जागा व्यवस्थित विचार करुन तिथे ८-१० माळ्याचे टॉवर बांधून भाड्याने दिले तरी बराचसा खर्च निघण्यासारखा आहे. व्यवस्थित नियोजन केले तर मोठ्या शहरांत नफा कमावून खेडोपाडी नुकसान / किंवा ना नफा ना तोटा तत्त्वावर व्यवसाय करुन स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधता येण्यासारखे आहे. मात्र सदर खात्याची ती मानसिकता नाही हा खरे दुखणे आहे. एकदा मानसिकता तयार झाली तर भविष्य नक्कीच प्रगत आहे. आज ज्या गोष्टि गळ्यातील धोंड वाटतात त्या नक्कीच भविष्यात गुंतवणूक म्हणून कामाला येतील. सध्याच्या सरकार मधे नक्कीच असा कोणीतरी नेता असेल त्याच्याकडे ह्या कामाची धुरा सोपवावी. आदित्य ठाकरे या कामासाठी एकदम योग्य आहेत. त्यांनी मुंबईचे नाईट लाईफ चालू करायची अफलातून कल्पना मांडली होती. त्यांना संधी दिली तर ते या संधीचे सोने नक्कीच करु शकतील. ग्रीन बिल्डींग बांधणे, हरितउर्जेवर वाहने चालविणे, प्रदुषण कमी करणे असे अनेक आवडते प्रयोग यातून त्यांना करुन बघता येतील. मी तर म्हणतो त्यांना एक संधी नक्की द्यावी.

In reply to by धर्मराजमुटके

आदित्य ठाकरे या कामासाठी एकदम योग्य आहेत.
बोंबला.

In reply to by धर्मराजमुटके

. मी तर म्हणतो त्यांना एक संधी नक्की द्यावी. आदित्य ठाकरेंना नक्की कोणी संधी द्यायला पाहिजे? पवारांनी की स्वतः ठाकरेंनी. गेल्या सरकारपासून महामंडळ सेने कडेच आहे. आदित्य ठाकरे आदेश देऊन परबांकडून काम आत्ताही करून घेऊ शकतात. ज्यांच्याकडे स्वतः ची गाडी नाही त्यांचे अतिशय हाल होत आहेत. दोन्ही बाजूनि एक एक पाऊल मागे घेऊन संप मिटवायला पाहिजे.

In reply to by धर्मराजमुटके

रिमोट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री शरद पवार यांचेकडे असणार, नाही का? त्यात आश्चर्यकारक काहीच नाही.

In reply to by धर्मराजमुटके

एकदा मानसिकता तयार झाली तर भविष्य नक्कीच प्रगत आहे. एशियाड ला बस पुरवून त्यातून थोडा खर्च वसूल करून मग त्या बस ची मुंबई पुणे एशियाड सेवा सूर करण्यामागे मित्राचे वडील त्या वेळी परिवहन मंडळात मला वाट्ते १-२ क्रमांक चे अधिकारी होते ... तेवहा त्यांनी विचार करून असा काहीसा प्रयत्न केला होता .. अर्थात त्यावेळीस खूप राजकारण सोसावे लागले होते त्यांना पण अश्या सरकारी उपक्रमांकडे केवळ फुकट द्या अशी विचारसरणीने पाहणे सगळ्यांनीच सोडले पाहिजे ... मग ते काँग्रेस असो कि भाजप

एसटीचा संप : विलणीकरण एकच मार्ग ?
आजच्या घडीला विलणीकरण हाच उपाय दिसत असला तरी

तुकाराम मुंढे

TM12345 function at() { [native code] }हा

श्रीकर परदेशी

dfety3452 या सारखे कार्यक्षम आणि कठोर अधिकारी नेमल्या आणि सुज्ञ राजकिय नेतृत्वाने खंबीरपणे पाठीशी उभा राहिल्या शिवाय या वर दीर्घकालीन उपाय सापडणार नाही !

In reply to by चौथा कोनाडा

प्रामाणिक अधिकारी = पाढंरा हत्ती पोसणे शक्य नसल्याने फुटबॉल सारखे पास करत सारखी उचलबांगडी चालू असते. पण जेवढा वेळ आशा अधिकार्यांना मिळतो तेवढ्या वेळातच ते आपले पगमार्क सोडून जातात. श्रीकर परदेशी हे एक उत्तम उदाहरण.

In reply to by कर्नलतपस्वी

श्रीकर परदेशी यांची पिंपरी चिंचवड पालीकेची कारकिर्द आणी IGR and Controller of stamps मधील GRAS सारखे कार्य बघितल्यास त्यांची वर्णी PMO मधे का लागली हे वेगळ सांगणे नलगे.

बरेच पैलू आहेत आणि माझा अभ्यास कमी. एसटी गावागावात जाते. विलिनीकरणाने ती तशीच जात राहील अशी आशा आहे, पण खाजगीकरण हा जो पर्याय येतोय त्यानुसार मात्र कमी उतारु असलेल्या अशा रुट्सवर खाजगी कंपन्या बसेस तोट्यात चालवत राहतील का? शंका आहे.. मग असे दूर किंवा दुर्गम मार्ग पूर्णपणे अनियंत्रित वडापसदृश व्यवस्थेच्या हाती जातील. यात बहुधा सुरक्षितता आणि भाडे या दोन्हीवर फक्त स्थानिक पातळीवरचे विस्कळीत नियंत्रण राहील. कितीही भाडे मागणे, स्वत:ची एकाधिकारशाही, इतर कोणाला तिथे व्यवसाय करु न दिल्याने आम्ही ठरवू ते भाडे आणि आम्ही ठरवू तितक्या शिटा कोंबून बसवणे, जुनाट वाहने असे बरेच अनिष्ट होऊ शकते. मार्केट फोर्सेसना काम करु द्या हे तत्व सर्व पातळ्यांवर समाजहिताचे आहे का? याबद्दल शंका आहे. जे तत्व हवाई कंपनीला तेच तसेच्या तसे तळागाळातील स्तरांना वाहतूक सोय उपलब्ध करुन देणार्या एसटीला लावता येईल का? शंका आहे. एस्टीचे रूट्स, त्यावरील फेर्यांची आणि स्टाफची संख्या (काही नॉन स्टॉप किंवा कमी गर्दीच्या रूटवर चालक हाच वाहक), बसेसचे आकार (रूटनुसार मोठी बस ते छोटी फोर्स ट्राव्हेलर यांची योजना) यांवर अभ्यासपूर्ण निर्णय घेऊन त्यात एफिशियंसी आणणे/ अतिरिक्त खर्च वाचवणे याबाबत कशी कार्यपद्धती असते हे माहीत नाही. एकूण रेव्हेन्यूतील पगारासाठी ठेवलेला वाटा, पगाराचे एकूण बजेट फार जास्त बदलणे कोणत्याही व्यवस्थापनाला कठीण असते. ही ठराविक टक्के रक्कम, त्यात जितके जास्त वाटेकरी तितके प्रत्येकाच्या वाट्याला कमी येते. त्यामुळे असलेल्या कर्मचार्यांना नोकरी चालू राहण्याची हमी द्यावी, फक्त नवीन भरती करताना काळजी घ्यावी. प्रत्येक नव्या भरतीमागे योग्य ते जस्टिफिकेशन असावे. हे असे होते की नाही, कल्पना नाही. अशा वेळी इतकेच म्हणावेसे वाटते की दळणवळणाची सर्वात बेसिक सोय सर्वांना मिळावी. ती देताना जनतेचा पैसा जितका वाचवता येईल तितका नियोजन करुन वाचवावा. पण इतर सरकारी खाती आणि बसखाते यात बसखाते तांत्रिकदृष्ट्या निमसरकारी म्हणून त्या कर्मचार्यांचे पगार इतके कमी ठेवू नयेत. अत्यंत जोखमीची आणि कष्टाची कामे आहेत, विशेषत: चालक, वाहक ही. त्यांना व्यवस्थित मोबदला द्यावा. पगारासाठी आणि देय रकमेसाठी ते सहकुटुंब उघड्यावर बसलेले बघून मनात कालवते.

In reply to by गवि

गविसेठ प्रतिसाद आवडला. सविस्तर जरा सवडीने लिहितो. तो पर्यन्त ही पोच. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

ग वि शेठ आपला प्रतिसाद आदर्श असून बहुसंख्य शासकीय खात्याना लागू आहे. परंतु तो कधीही अमलात आणला जाणार नाही याची मला १०० % खात्री आहे

खाजगीकरण हा जो पर्याय येतोय त्यानुसार मात्र कमी उतारु असलेल्या अशा रुट्सवर खाजगी कंपन्या बसेस तोट्यात चालवत राहतील का? शंका आहे..
आणि एस.टी ते एक शेड्युल असत.खाजगी वाहनांनी ताटकळत रहावे लागणार. ग्रामीण भागाची लाईफ लाईन आहे.खुप विचारपूर्वक सरकारने प्रकरण हाताळावे _/\_

In reply to by हस्तर

राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब आणि राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्यात.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

माननीय शरद पवार यांच्या हातात आहे, असे वाटते ..... बाळासाहेब ठाकरे यांनी, रिमोट कधीच सोडला न्हवता...

आणखी एक महिना सरकार मजा बघणार काय?

In reply to by कंजूस

सरकार दुसरं काय करतंय आतापर्यंत? फोटू काढानू केंद्र मा गाली देवानू पत्रकारपरिषद घेवानू फेसबुक लाईव्ह करानू कोमट पाणी घेवानू हरबल तमाखू ओढानू मज्जानी लाईफ

In reply to by कंजूस

कंजूसकाका, सरकारकड़े त्या शिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. मा.न्यायालयाने संपक-यांच्या मागण्या ऐकण्यासाठी त्रिसदस्यीय समितीला सांगितलेले आहे. प्रत्येक संघटनेचे म्हणने न्यायालय ऐकणार आहे त्याचबरोबर उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे तुम्ही एसटी सेवा सुरु ठेवा. तसेच संप करायचा असेल तर संपक-यांना तर तेही करू द्या. आणि जे कर्मचारी एसटी सेवेच्या कामावर येऊ इच्छितात त्यांना संरक्षण द्या. असेही म्हटलेले आहे. विलीनीकरणाबाबत समितीने अहवाल दिला तर तो आम्ही स्वीकारु असे परिवहन मंत्री यांनी म्हटले आहे. काका नुसते विलीनीकरणामुळे हा प्रश्न सुटेल याबाबतीत ठोस कोणी बोलत नाही. सध्या एकूण परिस्थिती पाहता महिनाभर तरी प्रवाशांचे आणि कर्मचा-यांचे हाल होणार आहेत असेच दिसते. -दिलीप बिरुटे

एसटीचा संप : विलणीकरण एकच मार्ग ? विलणीकरण ह शब्द मराठी भाषेत आहे? याची शंका वाटते. merger याचा अर्थ विलीन करणे आणि या प्रक्रियेला मराठीत विलिनीकरण हा प्रतिशब्द आहे. विलणीकरण हा शब्द प्रत्येक वाक्या गणिक आणि शीर्षकामध्ये न निवडलेल्या तांदुळाच्या भाताच्या प्रत्येक घासातील खड्यासारखा टोचतो आहे. तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे

In reply to by गवि

गवि माझ्याकडे जेवायला या भात खाताना १० वेळेस( मोजून) घासात खडे आले तर आपले श्रीमुख कसे दिसेल हे पाहण्याची आतुरता लागून राहिली आहे . हलके घ्या

In reply to by सुबोध खरे

विलीनीकरण अर्थ : एका गोष्टीचे दुसर्‍या गोष्टीत सामावून जाण्याची क्रिया. उदाहरणे : मृत्यूनंतर आत्म्याचे परमात्म्यात विलयन होते असे म्हटले जाते. अवांतर: दोन भिन्न मतावलंबी आत्म्यांचे एकाच परमात्म्यात विलीनीकरण/ विलणीकरण होते की कसे?

In reply to by सुबोध खरे

नको नको.. डीबीसर.. विलणीकरणाचे विलीनीकरण करा लवकर. माझे धड चालू शकणारे दात वयोमानानुसार तसेही कमी उरलेत. डॉ खरेंच्या भातातले खडे परवडणारे नाहीत. ;-) बाकी डॉ खरे यांसी : अहो दुर्लक्ष करा अशासाठी म्हटले की प्रा डॉ सर आपले थोडेच ऐकतात?

In reply to by गवि

छे छे असं कसं? घेऊनच जा हो खरे काका गविंना घरी, आणि चांगलं पातेलंभर खडेवाला भात खाऊ घाला अन् मग त्यांचा फोटो पण टाका इथे. अम्हालापण बघायचाय.

In reply to by गवि

कोपिनेश्वर हा शब्द भातातल्या खड्यासारखा बोचतोय. कौपिनेश्वर म्हणा हो. कौपिन म्हणजे अंगावरील लहानसे वस्त्र. ते पांघरतो म्हणून शिवाला कौपिनेश्वर म्हणतात.

In reply to by प्रचेतस

आता तो शब्द एकदा लिहीला म्हणजे लिहीला वल्लीशेठ. बाकी आपल्या मताचा आदर आहेच. - प्रा डॉ ग.वि. चिरुटे.

In reply to by प्रचेतस

प्रा डाँनी कट्टा पार्टी दिल्यास "विलणीकरण" ही शुद्धलेखन चुक माफ ! ....... आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटून एसटीचा संप संपल्यावर एसटी स्टॅण्डवर जाहीर सत्कार !

In reply to by गवि

असं कसं हो गविशेठ दुसऱ्या कुठल्या व्यक्तीकडून चूक झाली तर समजू शकतो पण ते मराठी आणि त्यातून डॉ. प्रो. म्हणजे लेखनं चूक व्हायला नको. एकदा झालेली टँकलेखनची चूक समजू शकतो पण तो शब्द वारंवार तसाच लिहिला गेलाय ते कसं चालेल?

"विलणीकरण" हा शब्द महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अधिकृत मराठी शब्दकोशात नाही. Merger विलीनीकरण (न.) cf.Absorption कोश: शासन व्यवहार कोश

In reply to by सुबोध खरे

व्हिलनीकरण बसतं का बघा.. संपवाले आणि सोबतचे राजकारणी यांना व्हिलन ठरवायचे, म्हणजेच व्हिलनीकरण. अपभ्रंश विलणीकरण! मराठीत नवे शब्द यायलाच हवेत.

शब्दांचा पाडू कीस महिनाभर. पण परिस्थिती फार गंभीर आहे. शाळा सुरू करायची हाक तर सरकार देऊन बसलं आहे. आता खेडेगावातून तालुक्याला शाळेत जाण्याची पंचाईत. वडापवाले पंचवीस जणांना कोंबून नेत आहेत. आता ते माडणी करतील की वडापची अधिकृत प्रवासी संख्या वीस करा. म्हणजे तीस नेता येतील. इकडे सर्व.बसेसचे टायर ट्रेड अगोदरच जाऊन गुळगुळीत होईपर्यंत चालवलेले आहेत. ,ब्याटऱ्या चार्ज न होण्याइतक्या उतरतील त्या बदलाव्या लागतील. आणखी कायकाय होईल ते वाहनमाहितगार सांगतीलच. म्हणजे वितळणीकरणाच्या पलिकडे बसेस जातील.

In reply to by कंजूस

>>> शब्दांचा पाडू कीस महिनाभर. होय...! =)) कंजूसकाका विलनीकरण होईपर्यंत आणि कर्मचा-यांचे प्रश्न सुटेपर्यंत आपण हा धागा धगधगत ठेवू. बाकी, शाळा,महाविद्यालये सुरु झाले आहेत आणि विद्यार्थ्यांंचे हाल सुरु आहेत. बाकी वितळणीकरणाच्या मूद्याशी सहमत. -दिलीप बिरुटे

खूप महसूल निर्माण व्हहायला हवा. तरी कर्जाच्या ओझ्यापलिकडे काही नाही. थोडक्यात वैयक्तिक खिसे भरत आहेत. तिजोरी रिकामी आहे. लठ्ठ प्याकेजे जाहिर झाली आहेत. पुतळे उभे करायचे आहेत, ते पाहायला येणाऱ्या पर्यटकांची सोय लावायची आहे. पक्ष्यांना/पक्षांना थंड ठेवायचे आहे. डहाणूपासून बांद्यापर्यंत दोन मार्ग व्हायचे आहेत, अगोदरचा पहिला जुना नवीन करायचा आहे. तारकर्ली पर्यटनास, वॉटरस्पोर्टस करण्यास परदेशी देशी प्रवासी चिपीला हवेतून उतरणार आहेत त्यांची सोय लावायची आहे. नागपूरहून पालघरला समुद्रस्नानासाठी लोंढे येणार आहेत. वारकरी पूर्वी इट्टल इट्टल करत अडिचशे किमी चालत येत ते आता मर्सिडीज मधून येणार. तो रस्ता करायचं मात्र केंद्राने अंगावर घेरलंय . नाहीतर ती एक जबाबदारी होती. निवृत्तांचे वेतन दहाव्या आयोगाप्रमाणे वेळेवर द्यायचंय. लशी द्यायच्या आहेत. शाळा घरापर्यंत पोहोचवणे परवडणारे नव्हते, आता मुलांना शाळेपर्यंत पोहोचवणे त्याहून महाग झालंय. सुकुमाली नुम्ब थुमा एसटी तुम सबसे प्यारी हो एसटी

उपोषण करणारे नेते आणि संपकरी कर्मचारी यांची सरकारबरोबर चर्चा झाली, साधारणपणे ४१ % वेतन वाढीचा प्रस्ताव सरकारच्या वतीने ठेवण्यात आला. त्याचबरोबर वेतन प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला करु असे सांगितले पण कर्मचारी सध्या तरी विलीनीकरण करावे याच मुद्यावर ठाम आहेत त्यामुळे अजुन तरी एसटी कर्मचा-यांचा संप मीटेल असे चिन्ह दिसत नाही. कर्मचा-यांच्या बाजूने असलेले विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते एवढ्यात तरी संपातून मार्ग काढू देतील असे वाटत नाही. -दिलीप बिरुटे