Skip to main content

एसटीचा संप : विलीनीकरण एकच मार्ग ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 21/11/2021 10:19 या दिवशी प्रकाशित केले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात आपली सर्वांची लालपरी, एसटी याची सेवा देणा-या कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करावे या एकमेव मुद्द्यावर आंदोलन सुरू असून गेली काही दिवसांपासून ऐन दिवाळीत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सुरू झालेले काम बंद आंदोलन आजही सुरू आहे.

maha-st
बोधचिन्ह

आघाडी सरकार असो की मागील सरकार असो दोन्हीही सरकारांनी विलीनीकरण शक्य नाही अशा भूमिका घेतलेल्या होत्या. आणि मा.न्यायालयानेही याबाबतीत समिती नेमून निर्णय घ्यावा असे म्हटलेले आहे. एसटी तुलनेने स्वस्त आणि सुरक्षित आहे, म्हणून एसटी सर्वांसाठीच वेगळा विषय आहे, म्हणून हा काथ्याकूट.

एक नजर टाकूया एसटीच्या इतिहास भूगोलोकडे- देशातील सर्वसामान्य जनतेला दळणवळणासाठी किफायतशीर दरात' ना नफा ना तोटा' या तत्त्वावर राष्ट्रीयकरणाच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेसाठी केंद्रसरकारने मार्ग परिवहन अधिनियम-१९५० तयार केला आणि त्या अन्वये राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्थापन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC ही संस्था एष्टीचा कारभार चालवते. ही एक स्वतंत्र संस्था असून त्यास सरकार काही प्रमाणात अनुदान देतं आणि बाकी पैसा एसटी उभी करते. सरकारचे परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष असतात. एसटीची तिकिटं, गाड्या भाड्यावर देणे यातून एसटीला उत्पन्न मिळतं. एसटी कर्मचारी हा सरकारी कर्मचारी आहे, परंतु तो निमसरकारी आहे. एसटी कर्मचा-यांचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे, नसता एकदा की तिची चाके रुतून बसली की पुन्हा मग त्यातून बाहेर पडणे अशक्य आहे असे वाटते. एसटीचा प्रवास आणि सुविधा आपल्या सर्वांचाच हळवा विषय आहे, आपण सर्वच एसटीने प्रवास करून मोठे झालेलो आहोत आणि काही तर, एसटीची वाट पाहणारे कायम प्रवासी आहेत. आपल्या सर्वांचाच तो जिव्हाळ्याचा विषय आहे.

ST-bus
आपली एसटी

एसटीचे शासनात विलीनीकरण झाले तर कर्मचा-यांचे प्रश्न सुटणार आहेत का ? वेतन वाढणार आहेत का ? सध्याचे त्या कर्मचा-यांचे वेतन फारच तुटपुंजे आहे असे व्यक्तीगत मत आहे. दहा वर्षाच्या सेवेनंतर चालक वाहक यांचे वेतन सतरा हजाराच्या जवळपास जाते. मला वाटते प्रदीर्घ सेवेनंतरही मिळणारे वेतन आजच्या काळात कमी आहे.

एसटी गेली अनेक वर्ष कायम तोट्यात असल्याच्या बातम्या वाचनात येत असतात. लॉकडाऊन काळात तर एसटी जवळजवळ बंद अवस्थेत होती त्यामुळे तोट्यात असलेल्या एसटीच्या नुकसानीत अजूनच भर पडली. एसटीचे आर्थिक स्त्रोत वाढविण्यावरही भर दिला पाहिजे असे वाटते, एसटीच्या खूप जागा आहेत त्यात गाळे काढून ते भाड्याने देणे, निगा राखणे, व्यवसायीकरण वगैरे करून त्यावर भर दिला तर एसटीचा आर्थिक स्त्रोत वाढेल असे वाटते. प्रवाशांना वेगवेगळ्या दिल्या जाणा-या सवलती कमी केल्या पाहिजेत. तरच एसटीची अवस्था सुधारेल असे वाटते. आर्थिक चणचणीवरचा उपाय म्हणून नुकतेच तिकीट दरामधेही सतरा टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. अपुरे आणि वेळेवर न होणारे पगार.आगारांमधील वाईट परिस्थिती, एसटीच्या अनेक कर्मचा-यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचनात येतात.

ऑक्टोबर अखेरीस कर्मचा-यांनी राज्यभर बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे, राज्य सरकारने महागाई भत्ता बारा टक्क्यावरून अठ्ठावीस टक्के केला आहे, असे असले तरी एसटी कर्मचारी यावर नाखुष असून एसटी महामंडळाचं शासनात विलणीकरण करण्यात यावे हीच त्यांची मुख्य मागणी आहे. कोणत्याही संघटनेच्या नेतृत्वाशिवाय हे आंदोलन सुरू आहे.

एसटी शासनाच्या ताब्यात गेल्यावर सर्व प्रश्न सुटतील असे या एसटी कर्मचाऱ्यानं वाटते. एसटी विलीनीकरण कसे होऊ शकते ? एसटी महामंडळाची निर्मिती ही Road Transport corpaoration Act 1950 नुसार झालेली आहे. हा केंद्र सरकारचा कायदा आहे त्यामुळे या कायद्याखालचं महामंडळ बरखास्त करून ते राज्य शासनात विलीन करण्याची प्रक्रिया असेल. राज्य परिवहन महामंडळ कायदा १९५० अन्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अस्तित्वात आलेले आहे, त्यावेळी राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे भाग भांडवल यात गुंतविण्यात आलेले होते. कायद्यातील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्वायत्त राज्यसरकारची कंपनी किंवा राज्यसरकारचा विभाग म्हणून राहू शकतो. विलणीकरणासाठी केंद्रसरकारची परवानगी घेणे आणि त्यांचे भागभांडवल परत करणे आवश्यक असेल त्यानंतर महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाने ठराव करुन आपला स्वायत्त दर्जा संपुष्टात आणून राज्याचा विभाग म्हणून राज्य सरकारने मान्यता द्यावी असा ठराव मंजूर करून राज्य सरकारला विनंती करणे गरजेचे आहे, अशावेळी महामंडळाची आताची रचना संपुष्टात येईल.

विलीनीकरणानंतर, एसटी कर्मचा-यांचे सर्व वेतन भत्ते सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे शासनावर आर्थिक भार पडेल. ( पडला तर पडू द्या) एसटीचे ९२ हजार कर्मचारी आहेत, त्यांची एकदा मागणी मंजूर झाली की इतर महामंडळाच्या कर्मचाऱ्याचीही मागणी पुढे येईल. देशात एकूण ५० पेक्षा अधिक परिवहन महामंडळे आहेत, केवळ आंध्रप्रदेश परिवहन महामंडळाचे राज्यशासनात विलणीकरण झालेले आहे, बाकी मंडळे अशी तशी आधारावर चालू आहेत.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे, एसटी कर्मचा-यांचे वेतन सुधारले पाहिजे. नव्या बसेस खरेदी केल्या पाहिजेत. भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे. प्रवाशांच्या मार्गावर नियमित वेळेवर बसेस आल्या गेल्या पाहिजेत. कर्मचाऱ्यांची अरेरावी कमी होऊन नम्रपणा आला पाहिजे वगैरे मतं मांडण्यासाठी हा धागा.

काथ्याकूट विस्कळीत असला तरी, मुख्य विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या विचारांचे स्वागत आहे. वीस बावीस वर्ष नियमित एसटीने प्रवास करीत राहीलो आहे. प्रवाशी संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या आंदोलनात प्रवाशांच्या बाजूने उभा राहीलो आहे. बाकी, काथ्याकूट माहिती संदर्भ आणि छायाचित्रे जालावरील चालूघडामोडी इतर संकलन यातून केलेले आहे, ते बरोबरच असू शकते असा दावा नाही. (चुभूदेघे)


वाचने 72665
प्रतिक्रिया 253

प्रतिक्रिया

In reply to by कंजूस

ते काय का असनां, सर्वसामान्यांना किफायतशीर दरात कार्यक्षम सेवा मिळायला हवी ...... पण आपले राज्य या बाबतीत पडले भुरटे लुटारू यांच्या तावडीत !

In reply to by मुक्त विहारि

"आजारी" माणासकडून जास्त सोडूनच द्या पण काय अपेक्षा करणार ?

मा.न्यायालयाने जी समिती नियुक्त केली होती. आणि समितीने जो अहवाल मा.न्यायालयात सादर केला. त्यात एसटी विलिनीकरण याबद्दल एक शब्दही मला दिसला नाही. हा जर अहवाल वाचला तर लक्षात येते की संपकरी संघटना आंदोलनातून बाहेर का पडल्या आणि गुणरत्ने सदावर्ते यांना आता संप सुरु नसून दुखवटा सुरु आहे असे म्हणावे लागत आहे. (मला एसटी कर्मचा-यांच्या फेसबुक पानावर अहवालाची दोन पाने मिळाली त्याचं text रूपांतर करून इथे डकवतो आहे)
शासन निर्णय, गृह विभाग क्रमांक, एसटीसी-११२१/प्र.क्र.३०२/परि-१, दिनांक ८.११.२०२९ अन्वये गठीत केलेल्या समितीचा प्राथमिक अहवाल प्रस्तावना : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (यापुढे याचा उल्लेख महामंडळ असा करण्यात आला आहे) कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी स्थापन केलेल्या कृती समितीने " महामंडळाला" त्यांच्या प्रलंबित मागण्या जसे की, १. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असल्याप्रमाणे महागाई भत्ता १२% वरुन २८ % इतका करण्यात यावा व महागाई भत्त्याची थकबाकी देण्यात यावी. २. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शहरांच्या वर्गीकरणाप्रमाणे लागू असलेला ८%. १६% किंवा २४ % इतका घरभाडे भत्ता लागू करण्यात यावा. ३. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वार्षिक वेतनवाढीचा दर सध्याच्या २% ऐवजी ३% इतका करण्यात यावा. यासाठी विविध कर्मचारी संघटनांच्या कृती समितीकडून दिनांक २७.१०.२०२१ पासून बेमुदत उपोषण करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने सदर संघटनांच्या कृती समितीने दिनांक २७.१०.२०२१ पासून आमरण उपोषण आझाद मैदान, मुंबई येथे व राज्यात वेगवेगळ्या विभागीय कार्यालयात सुरु केले. सदर संघटनांच्या उपरोक्त मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महामंडळाचे अध्यक्ष तथा मा. परिवहन मंत्री, अॅड. श्री. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली उपरोक्त कृती समितीसोबत दिनांक २८.१०.२०२१ रोजी बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत महामंडळाच्या कर्मचान्यांचे महागाई भत्त्याचे दर १२% वरुन २८% इतके त्याचप्रमाणे घरभाडे भत्त्याचे दर राज्य शासकीय कर्मचान्यांप्रमाणे वाढविण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला. वार्षिक वेतनवाढीचा दर २% वरुन ३% करणेबाबतचा निर्णय हा दिवाळी नंतर घेण्यात येईल असे ठरविण्यात आले. याशिवाय दिवाळी सणाची भेट म्हणून दरवर्षीप्रमाणे प्रत्येक कर्मचाऱ्यास रु.२५००/- व अधिकान्यांना रु.५०००/- इतकी रक्कम देण्यात यावी असाही निर्णय घेण्यात आला. त्यासंबंधीचे आदेश महामंडळातर्फे निर्गमित करण्यात आले. आदेशात नमूद केलेला संपूर्ण कालावधी समितीस देण्यात यावा अशी विनंती न्यायालयाला करण्यात येत आहे. मात्र महामंडळाची सध्याची प्रवासी वाहतूकीची स्थिती लक्षात घेता व कोविड-१ महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता महामंडळाचे उत्पन्न त्यांचा सर्व खर्च भागविण्याइतप होण्याकरीता काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. या कालावधीत महामंडळाच् कर्मचाऱ्यांचे वेतन विहीत दिनांकास होण्याच्या दृष्टीने शासन सध्या देत असलेले आर्थिक अनुदा महामंडळाची आर्थिक स्थिती त्याचा स्वतःचा खर्च भागविण्याइतपत होईपर्यंत चालू ठेवण आवश्यक आहे असे समितीचे मत आहे.
पत्राखाली त्रीसदस्यीय समितीची नावे आणि स्वाक्ष-या आहेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरेरे ! एकंदरीत विलिनीकरण फाट्यावर मारणार हे स्पष्ट होत आहे. या साठीच प्रचंड विलंब सुरू आहे. काही लोक स्वत्:ची वाहने वापरत आहेत, जीप, बस याही सेवा देत आहेत. पण तळागाळातील जनतेचे हाल होत आहेत ! खुप दुर्दैवी आहे हे !

In reply to by चौथा कोनाडा

हेच वाटतय. सध्या (संप चालू झाल्यापासून) कर्मचार्‍यांना पगार मिळतोय का पुर्ण बंद आहे? निर्णय काहीही लागो पण लवकरात लवकर एस.टी कर्मचार्‍यांची रोजीरोटी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर होवो.

समितीला कर्मचा-यांच्या मागण्यांवर समितीने अहवाल द्यावा असे होते. आणि समीतीने शासनाने काय काय केले आहे, दिले आहे असे अहवालात सांगितलेले दिसते. विलीनीकरणाच्या बाबतीत आम्हाला अभ्यास करावा लागेल, वेळ कमी पडतो, असे सर्व काही पाहिजे होते असे वाटते. अजून वेळ मागितली त्यात विलीनीकरणाचा विषय कदाचित येऊ शकेल पण आज तरी त्यात नवे काही दिसत नाही. सध्या कर्मचा-यांना काम नसल्यामुळे वेतन नाही. अधुन-मधून एखाद्या दोन बसेस डेपोतून सुटतात. शिवशाही अधुमधून दिसतात. तेवढीच एसटी आगारात हालचल. चहा टपरीवर काल एका कर्मचा-याची भेट झाली. घरी तरी काय करावे म्हणून डेपोत येऊन बसतो म्हणाला. आज खिशात काहीच पैसे नाही. शेती नाही, मुलाचे शिक्षण आणि मुलीचे लग्न करता येईल, असे थोडे फार तरी पगार वाढले पाहिजे असा म्हणाला. सगळ्याच गप्पांमधून त्याला गलबलून आले. भाऊक होऊ नका मार्ग निघेल असे म्हणालो. साहेब, आता एसटी सुरु झाली पाहिजे. ड्यूटीला जावे वाटते पण सगळेच संपात आहे तर आपण तरी कसे कामावर जायचं, अशी एक भावना त्यांच्या बोलण्यातून दिसली. आपल्या खासगी वाहनाने आपण जेव्हा प्रवास करतो, तेव्हा शाळा कॉलेजात पायी जाणारी मुले-मुली दिसतात. अनेकदा सायंकाळी उशीरा या त्या वाहनाला हात करणारे प्रवाशीही दिसतात. अधुन मधुन एसटी डेपोच्या कर्मचा-यांशी गप्पा मारायला जातो. सुनावणी असते त्या दिवशी सर्व मोबाईलवर अपडेत पाहतांना दिसतात. आशादायी काहीतरी होईल. पगारात काही सुधारणा होईल. विलीनीकरणाने वेतन वाढेल आणि समाधानाने जगता येईल अशा सर्व गोष्टी आतून गलबलून टाकणा-या आहेत. -दिलीप बिरुटे (इमोशनल)

महामंडळाचे विलीनीकरण हे शक्य नाही याची कारणे दिलेली आहेतच. काही युनियन प्रकरण फारच ताणून धरत आहेत. उद्या यांची स्थिती गिरणी कामगारांसारखी झाली तर दोष त्यांचाचअसेल. उगाच उमाळे गहिवर काढून काहीही होणार नाही तरी बरं सध्या महाराष्ट्रात तिघाडी सरकार आहे अन्यथा श्री फडणवीस आणि श्री मोदींच्या नावाने ख्रिसमस ऐवजी शिमगा झाला असता. बाकी चालू द्या

उद्या यांची स्थिती गिरणी कामगारांसारखी झाली तर दोष त्यांचाचअसेल.
वेळोवेळी त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ते निष्कर्षाप्रत आलेत की विलिनीकरण झाले तरच आपल्याला न्याय मिळेल, त्यामुळे कामगार एकटेच दोषी नसतील. किंबहुना काही घटक टपूनच बसले असतील की एसटी कर्मचार्‍यांची अवस्था गरणी कामगारांसारखी कशी करता येईल, त्यात त्यांचे वेगवेगळे इन्टरेस्टस दडलेले असतील !

काही घटक टपूनच बसले असतील एस टी आगारांच्या भूखंडाचे श्रीखंड खायला टपलेले राजकारणी आहेतच कि. पण एस टी कर्मचाऱ्यांच्या हातात काय आहे? एस टी आगार काही त्यांच्या मालकीचे नाहीत कि त्यांनी त्यावर आपला हक्क सांगावा. आहे त्या स्थितीत आपल्या जास्तीत जास्त मागण्या पदरात पडून घेऊन संप मागे घेणे हेच शहाणपणाचे ठरेल. अन्यथा गिरणी कामगारांसारखी अवस्था होईल.

STचं विलिनीकरण डोक्यातून काढा - अजित पवार हा माणुस आपल्याला मनापासुन आवडतो, एकदम कॅपिटॅलिस्ट, सरळ बोलणार , स्पष्ट बोलणार , करुन दाखवणार . __/\__

सल्लागारांना विचारायला पाहिजे. आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा विचार संघटनेच्या नेत्यांनी ( कर्मचारी असलेल्या) करायला हवा.

कोविडचे रुग्ण वाढू लागले आणि या संपाविषयी येणार्‍या बातम्या, चॅनेल न्युज, व्हिडीओज हे हळूहळू कमी होत गेले. .... आजच मटाला दोन बातम्या वाचल्या आणि एसटी प्रेमी म्हणून दु:ख झाले ! १. संपामुळे एसटीचे ६०० कोटी रू चे नुकसान ! ५५,००० संपकरी कर्मचार्‍यांना नोटीस बजवण्यात आली. संपकरी अजुनही कामावर हजर होत नसतील तर कठोर कारवाई करणार. सेवानिवृत्त वाहक, चालकांना करार पद्धतीने नेमणार. परिवहन मंत्र्यांनी दिली माहिती. २. आता पर्यंत आमच्या ६७ सहकार्‍यांनी आत्महत्या केलेली आहे, आम्हालाही स्वेच्छामरणाची परवानगी द्या - पाथर्डी आगारातील २३१ संपकरी एसटी कर्मचार्‍यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून केली मागणी. मध्यंतरी एक कथा ऐकण्यात आली. सध्याच्या संपाशी को-रिलेट करणारी वाटली ! कथा ऐकून तुम्हीच ठरवा, कोण बगळे, कोण मोठे मासे अन कोण छोटे मासे !

विलीनीकरणाच्या मुद्यावर सुरु असलेला संप अडीच महिण्यांपासून सुरुच आहे. न्यायालयीन तारखांवर तारखाही सुरु आहेत. संपक-यांचा संपही सुरु आहेत तर काहींचा दुखवटा सुरु आहे. कालच्या बातमीनुसार परिवहन मंत्री यांच्या आवाहनानुसार संपक-याकडून मिळालेल्या प्रतिसादातून एसटीच्या बातमीनुसार जवळ जवळ सत्तावीस हजार कर्मचारी एसटी आगारात रुजू झालेले आहेत, त्यामुळे गुरुवारी २१५ आगारातून एसटी सुरु झाल्या आणि जवळपास आठहजार एसटीच्या फे-यातून चार लाख प्रवाशांनी प्रवास केल्याचा दावा एसटीच्या वतीने केला आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या मदतीने, कंत्राटी पद्धतीने चालक नेमून एसटी प्रशासनाने सुरु केल्या आहेत. कामावर न येणा-यांवर कार्यवाही सुरु आहे. एकूणच कर्मचा-यांचा संप फोडण्याचा प्रयत्न हळुहळु यशस्वी होतांना दिसत आहेत. आज आमच्याकडेही शहरातून तुरळक प्रमाणात एसटीच्या फे-या सुरु झालेल्या दिसत होत्या. प्रवासी कमी असले तरी एसटीचा प्रवास हळुहळु सुरु होतांना दिसत आहे. कामावर येत नसलेल्या कर्मचा-यांना वेतन मिळत नसल्यामुळे आणि आंदोलनाची पुढील दिशा निश्चित नसल्यामुळे संपकरी कर्मचारी द्वीथा अवस्थेत दिसत आहे. १९ ता. पुन्हा न्यायालयात सूनावणी आहे, जर त्यादिवशी काही मार्ग निघाला नाही तर कर्मचारी अधिक संखेने कामावर येतील असे वाटते. राहीलं प्रवाशांचा प्रश्न तर प्रवाशांनी आपले प्रवासाचे पर्यायी मार्ग निवडले असल्यामुळे प्रवाशांची अडवणूक करुन आपण आपल्या मागण्या मान्य करु असे जे कर्मचा-यांना वाटत होते, त्यांच्या दुर्दैवाने त्यात त्यांना यश आलेले दिसत नाही. एकूणच मा.न्यायालयातल्या सुनावणीवर एसटीचे आंदोलन आणि एसटीचं भवितव्य अवलंबून राहील असे वाटते. एसटीची जशी ताटकळत वाट पाहतो तसे याही सुनावणीची वाट पाहण्याशिवाय दुसरा मार्ग आज तरी कोणता दिसत नाही. -दिलीप बिरुटे

काढलेल्या कर्मचाऱ्यांना परत घेणार नाहीत. आणि कामावर आलेले त्यांच्या बाजूने राहणार नाहीत मग एकी गेली कुठे? जवळपास साठ हजारांना नोटिसा गेल्या आणि त्यांचे पगार ३०-४० हजार असतील तर त्यांना काढून एसटी महामंडळाला फायदाच झाला. तिशीच्या आतल्यांना नोकरी मिळेल दुसरी आणि फार नुकसान होणार नाही. संपकऱ्यांनी ओळखले नाही की आपले किती आणि सोडून पळणारे किती. एकमेकाशी भांडतील. कर्नाटक आणि केरळ एसटीचा हाच प्रश्न आहे पण त्यांनी संप करून पायावर धोंडा पाडून घेतला नाही हे आमचे कर्मचारी शिकले नाहीत. बाकी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देणारे गेले कुठे?

In reply to by कंजूस

परिस्थिती दारूण आहे. यंत्रणा निगरगट्ट आहे, त्यांना काही देणे घेणे नाही. गाड्या,बॅनर, सहली, बंगले यावर कोट्यावधी रूपये उडवतील, पण कर्मचार्‍यांची योग्य पगारवाढ करताना यांच्या इस्टेटीतुन दिल्यासारखे देणार नाहीत ! शेवटी नुकसान एसटी कर्मचार्‍यांचेच आहे, त्यांचे हाल कुत्रं खाणार नाही !

संप संपला !! https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/st-stike-news-more… महाराष्ट्र टाईम्स मधील वरील बातमी नुसार - तीन महिन्यांनंतर २७ हजार संपकरी कर्मचारी कामावर परतले आहेत. या कर्मचाऱ्यांसह खासगी चालकांच्या मदतीने गुरुवारी राज्यभरात एकूण आठ हजारांहून अधिक फेऱ्या मार्गस्थ करण्यात आल्या; तसेच २५० पैकी २४० आगार चालू झाल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. निर्बुध्द आणि अव्यावहारिक मागण्यांना धरुन सुरु झालेला भाजपा प्रणित संप अतिषय चातुर्य दाखवुन रीतसर मोडीत काढल्याबद्दल अनिल परब आणि महाविकास आघाडीचे हार्दिक अभिनंदन ! जसे शेतकरी आंदोलना समोर केंद्रातील भाजपा सरकार झुकले आणि सरळ लोटांगण घालत कायदे मागे घेतले तसले क्लैब्य महाराष्ट्र शासनाने केले नाही ह्याचे खरेच कौतुक आहे ! चला किमान एक तरी कौतुकास्पद गोष्ट आहे आहे शिवसेनेच्या कार्यकाळात घडलेली की जी राजकीय यश म्हणुन नोंदवून ठेवण्यात येईल !

In reply to by प्रसाद गोडबोले

दोन्ही गोष्टींची तुलना अयोग्य आहे.
जसे शेतकरी आंदोलना समोर केंद्रातील भाजपा सरकार झुकले आणि सरळ लोटांगण घालत कायदे मागे घेतले तसले क्लैब्य महाराष्ट्र शासनाने केले नाही ह्याचे खरेच कौतुक आहे
शेतकरी आंदोलनाला बाहेरुन भरपुर पाठींबा मिळाला होता. सर्वसामान्य लोकांना सरळपणे कोणाताही त्रास नव्हता. महामंडळाचा संपाला सुरवातीला सहानुभुती होती, जेव्हा सरकारने पगारवाढ जाहिर केली, तेव्हाच लोकांची सहानुभुती संपली. अगदीच तुलना करायची तर, जेव्हा केंद्रसरकारने कायदे मागे घेतले आणि काही शेतकरी नेत्यांनी नवीन मागण्या केल्या तेव्हाची परीस्थिती आणि आताची एसटीची परिस्थिती याची तुलना होऊ शकते.

योग्य सल्ला आणि इतर राज्या्तला इतिहास पाहिलाच नाही. . -------- बाकी जाहीर केलेली ४१% पगारवाढ खरी होती का? चार पाचशे किंवा हजार कंत्राटी कर्मचारी भर्ती करून काम झाले? सत्तर हजार+ कर्मचारी होते .

एस टी चा संप सुरु होऊन तीन महिन्याचा काळ लोटला. केंद्राने ज्या प्रकारे शेतकरी आंदोलन हाताळले त्याच मार्गाने राज्य सरकार एस. टी. चा प्रश्न हाताळते आहे असे चित्र दिसते. ते म्हणजे दुर्लक्ष करणे. दुर्दैवाने दोन्ही ठिकाणी नुकसान आंदोलकांचेच झाले आहे. त्यामुळे अमुक एक राजकीय पक्ष कसा चुकीचा / असंवेदनाशील आहे असे बोलायची सोय राहिली नाही. गावाकडे अजूनही म्हातारी माणसे, लहान मुले, ज्यांच्याकडे वाहतूकीचे साधन नाही अशांचे हाल होत आहेत. काळी पिवळी / खासगी गाड्यांचे चांगभल झाले आहे. जो तो आपापल्या परीने मार्ग शोधत आहे. जनता सरकार भरोसे जास्त दिवस बसणार नाही. आणि निर्णय घेण्यासाठी खूप वेळ लागला आणि दान कोणाच्याही बाजूने पडले तरी एस. टी. अजूनच खड्यात जाणार हे आता स्पष्ट दिसते आहे. कारण एकदा प्रवाशांनी प्रवासाचे दुसरे मार्ग चोखाळले तर ते परत पहिल्या मार्गाकडे वळण्याची शक्यता फार कमी. एस. टी. कामगारांचा गिरणी कामगार होणार हे आताशा स्पष्ट दिसते आहे.

In reply to by धर्मराजमुटके

एस टी कामगारांनी आडमुठेपणाचा मार्ग स्वीकारला आहे त्याला कोणी काहीही करू शकत नाही. महामंडळाच्या कर्मचार्यांना सरकारी सेवेत समाविष्ट करणे हे कायद्याने शक्य नाही हे स्पष्टपणे सांगून सुद्धा त्यांचे नेते त्यांना खड्ड्यात टाकणार आहेत आणि जर कामगार मेंढरांप्रमाणे त्यांच्या मागे जाणार असतील तर ते दुर्दैव म्हणावे लागेल. पगारवाढ मिळाल्यावर भाजपने आता संप करण्याचे कारण उरलेले नाही असे सांगून आपला सहभाग काढून घेतलेला आहे. एस टी कामगार एक गठ्ठा मतदान करू शकत नाहीत, त्यांना कोणताही राजकीय पाठिंबा नाही, कायद्याची साथ नाही आणि सामान्य जनते चे हाल होत असल्याने त्यांच्याकडून संपाला पाठिंबा नाही उरते फक्त कोरडी सहानुभूती.

In reply to by सुबोध खरे

पगारवाढ मिळाल्यावर भाजपने आता संप करण्याचे कारण उरलेले नाही असे सांगून आपला सहभाग काढून घेतलेला आहे.
होय. कमीत कमी ह्या मुद्द्यावर भाजपाने आपली राजकीय प्रगल्भता दाखविली हे बरे झाले. नुकतेच गावी जाणे झाले. तिकडील बर्‍याच मंडळींची अपेक्षा पगारवाढ स्वीकारुन कामावर यावे अशी होती. मात्र तुटेपर्यंत ताणायचे नसते हे बहुतेक कामगारांना कळत नाहिये. खरे तर संप यशस्वी करण्याचा राजमार्ग म्हणजे संप करतो, संप करतो असे म्हणायचे किंवा फार फार तर एक दोन दिवस चक्का जाम करायचा, बातम्यांमधे गवगवा होऊ द्यायचा, थोडे थोडे पदरात पाडून घ्यायचे ही उत्तम रणणिती आहे. काय होत की एकदा कोंबडं मेलं की ते आगीला भित नाही. (कोंबड्याची उपमा सरकार, जनता, कामगार सगळ्यांना लागू होते.) मी अगोदर ज्या कंपनीत कामाला होतो तिकडचे मालक नेहमी म्हणायचे की कंपनी / आस्थापना चालवणे म्हणजे बैलगाडी चालवण्यासारखे आहे. गाडीवानाला बैलाचा कधी कासरा आवळायचा, कधी ढिला सोडायचा, कधी चाबूक मारायचा ते जमले पाहिजे. फार आवळायचे नाही, फार ढिल द्यायची नाही आणि नेहमी नेहमी चाबूक उगारायचा नाही. तरच गाडी व्यवस्थित मुक्कामाला पोहोचायची हमी असते.

In reply to by सुबोध खरे

महामंडळाच्या कर्मचार्यांना सरकारी सेवेत समाविष्ट करणे हे कायद्याने शक्य नाही हि भानगड मला काही कळली नाही .... महामंडळ हे जर १००% राज्य सरकारच्या मालकीचे आहे तर महामंडळाचे नोकरदार हे "आपोआप "शासकीय कर्मचारीच होत नाहीत का? राजय सरकारचा कर्मचारी कोणत्याही खात्यातील असू शकतो ! शिक्षण असो कि पाटबंधारे तसेच वाहतूक! असा तर्क मी लावत आहे

In reply to by चौकस२१२

नाही. महामंडळे ही स्थापन करतानाच ज्या अटी शर्ती घातल्या गेल्या आहेत त्यात महामंडलांचे नोकर हे राज्य सरकारचे नोकर नसतील हे ठरवले गेले होते. राज्य सरकारचे नोकर हे डायरेक्ट कामावर घेतले जात नाहीत. ते MPSC सारख्या परीक्षांच्या तर्फे घेतले जातात. महामंडळांना हा नियम लागू नसावा. ती ती महामंडळे त्यांच्या त्यांच्या परीक्षा घेतात ज्यांचा प्रवेश दर्जा MPSC पेक्षा बराच कमी असतो.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

त्याला जगाचा, देशाचा इतिहास भुगोल काय करायचा? कंडक्टरला वाहतुक नियम, पोलीस कंम्प्लेंट, प्रवाशांचे हक्क, सवलतीचे तिकिट माहिती ठीक आहे. राज्यातले पर्जन्यमान, मंत्रीमंडळ बदल, बँकांचे कारभार काय करायचेत? -------- बस बिघडल्यास डेपोलो निरोप पाठवणे अपेक्षित. ती दुरुस्त करणे, टायर बदलणे, ब्याट्री बदलणे अपेक्षित नाही. सरकारी नोकराने नेमून दिलेले कामच करायचे असते इतर बेकायदा असते.

In reply to by कंजूस

फक्त तेवढाच फरक नसावा. सगळ्या ड्रायव्हर्स ना कंडकटर्स ना सरकारी अधिकारी करणे म्हणजे एखादया कॉलेजमधल्या शिपायाला प्रोफेसर च्या पदाईतका पगार देणे असे होईल. ते अपेक्षित ही नाही आणि योग्य ही नाही. प्रोफेसर हा स्किल्ड जॉब आहे. शिपाई हा अन्स्कील्ड जॉब आहे. अगदी तसंच ड्रायव्हर कंडकटर्स हा जास्त वेळ न घालवता शिकला जाणारा जॉब आहे. त्या जॉब ला सरकारी अधिकारी जॉब करणे हास्यास्पद आहे.

In reply to by कंजूस

१ हजार जागांसाठी ८० हजार अर्ज येतात. मग नक्की कोणत्या निकषावर नोकरी द्यायची?

In reply to by कंजूस

बाकीची राज्ये ह्या बाबी कशा हाताळतात या विषयी कुतूहल आहे. या विषयी फारसे वाचण्यात आलेले नाही. ड्रायव्हरचे काम मोठे जोखमीचे असते. डोक्यात तेल घालून गाडी चालवावी लागते. ग्रामीण भागात, गर्दीच्या ठिकाणी वाहकाचे काम देखील तितकेच किचकट.

In reply to by चौकस२१२

पाटबंधारे खात्यात कनिष्ठ, दुय्यम, उप आणि राजपत्रित ग्याझेटेड अधिकारी आहेत. शिक्षण खात्यात आहेत. परिवहनातही आणा. मोजक्याच बस चालवा. बाकीच्या जाऊदेत खासगी. नैतर कर्नाटक सरकारला द्या चालवायला.

In reply to by कंजूस

सदर बाबीतील बारकावे अथवा तपशील फारसा माहीत नाही. तरीही असे वाटते की सत्तेवरील पक्ष आपल्या लोकांना म्हणजे आमदारांना मंत्रीपदे देतो तसेच महत्त्वाच्या कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या सरकारी महामंडळांवर नियुक्त्या करतो. अशा नियुक्त (उदा. अध्यक्ष इ.) व्यक्तींना तदनुषंगिक सर्व लाभ पदकाल असेपर्यंत तर नक्कीच मिळत असणार. (कदाचित काही लाभ हे पद गेले तरीही मिळत असतील.) मग महिन्याच्या पगाराव्यतिरिक्त असे फायदे म्हणजेच एसटी कामगार मागत असलेले विलीनीकरणाचे फायदे असावेत (प्रत्यक्ष सरकारी नोकरीत मिळणारे) असे वाटते. मग असे जर असेल तर कामगारांची मागणी अवाजवी कशी ठरते? माहीतगार खुलासा करतील काय?

जाहीर झाली तरी कामगार कामावर जात नाहीत अशी लोकांची समजूत झाली. पण ४१ टक्के कोणत्याही हिशेबात नाही हे स्पष्ट आहे. अगदी १२हजारवाल्यांना पाच, तीसवाल्यांना चार हजार आणि चाळीसवाल्यांना अडीच देऊ केले. ---------- कामगारांनी चांगले सल्लागार पाहिले नाहीत. -------- कामगारांसाठी असलेल्या समन्वय अधिकाऱ्याकडे गेले नाहीत. पायावर धोंडा पाडून घेतला आहे. ------- आणि इकडे सरकार वाटच पाहाते आहे - एसटी मोडते कधी आणि खाजगी वाहने सुरू करतो कधी. शिक्षणाचा खेळ केला तसाच याचाही होणार. बस कंत्राटदारांकडून कमिशन मिळवायचे आहे.

पगारवाढ ४१ % .... जाहीर झाली तरी कामगार कामावर जात नाहीत अशी लोकांची समजूत झाली. पण ४१ टक्के कोणत्याही हिशेबात नाही हे स्पष्ट आहे. अगदी १२हजारवाल्यांना पाच, तीसवाल्यांना चार हजार आणि चाळीसवाल्यांना अडीच देऊ केले.
हे तपशिल बाहेर कुठे वाचायला मिळत नाहीत. याची बोंबाबोंब करण्यास कर्मचार्‍यांना जमले नाही असेच म्हणावे लागेल. माध्यमे देखिल या विषयी बातम्या तपशिलात दाखवत नाहीत असे दिसते (कदाचित राजकिय पक्षांनी त्यांना मॅनेज केले असावे) संपाचे निमित्त करून एसटीचे खासगीकरण करुन संबंधित लोक मलिदा खाऊन टाकतील ही भीती अस्वस्थ करत आहे !

एसटी च्या कर्मचारी ,अधिकारी लोकांनी एसटी पाहिले उत्तम चालवावी. गाड्यांचा दर्जा,लोकशी असलेले संबंध,वेळापत्रक काटेकोर पाळणे. अशी सर्व सुधारणा करून एसटी फायद्यात आणावी नंतर पगार वाढ झाली पाहिजे ही मागणी करावी. विलगी करणं करा म्हणजे आम्ही एसटी ची वाट लावतो पण जनतेच्या कराच्या पैशातून आम्हाला पोसा. फालतू मागणी आहे. त्या पेक्षा एसटी ला होणाऱ्या फायद्यात इतके टक्के कर्मचारी लोकांच्या पगार वर खर्च करा. अशी मागणी हवी होती आठवण भाटिया म्हणून ऑफिसर होते त्यांनी कामचोर ,taladhi,ग्रामसेवक ह्यांचे निलंबन केले होते. जय ललिता ह्यांनी काम चोर सरकारी नोकरांना निलंबित केले होते. तेच सरकार नी करावे . काम न करता,आस्थपणा ला फायदा होईल जी वृत्ती नसताना फक्त पगार ध्या ही मागणी फेटाळून लावली जावी खासगी बसेस ना अनुदान देवून ,नियम बनवून प्रवासी लोकांची अडचण दूर करावं

मुख्यमंत्र्यांना एसटी कामगारांविषयी काहीच वाटत नाही ? अहवालावर त्यांची सही का नव्हती ? आज मंगळवारी विलीनीकरणा संबंधी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्रिसदस्यीय समितीच्या अहवालावर मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय असल्याचे सांगण्यात आले, परंतु त्यावर त्यांची स्वाक्षरी नाही, त्यमुळे कोर्टाने अहवाल अमान्य करत सुनावणीसाठी पुढची तारीख दिली आहे. ही सुनावणीसाठी येत्या शुक्रवारीची तारिख देण्यात आली आहे

In reply to by चौथा कोनाडा

तर तो पुढे पाठवता येईल. पण सही नसलेला / स्विकृत नसलेला का दिला? ती एक खेळी असावी.

एकदाचा त्रीसदस्यीय अहवाल मा. न्यायालयात सादर झाल्याचे वाचनात आले. मात्र त्यावर मुख्यमंत्री यांची स्वाक्षरी नाही, तर अधिका-याची स्वाक्षरी आहे त्यामुळे या अहवालास मा.मुख्यमंत्र्यांची मान्यता आहे का किंवा दाखवून सादर केला आहे काय ? असे मा. न्यायालयाकडून विचारण्यात आले. आणि कर्मचा-यांचे वकिल गुणरत्ने यांनी तो अहवाला मिळावा म्हणून मागणी केली आहे अशी विलनीकरणाच्या घडामोडीत वाचले आहे. आता प्रश्न असा आहे की १) विलीनीकरण करावे असे म्हटले आहे २) विलीनीकरण शक्य नाही असे म्हटले आहे. या दोनच प्रश्नांभोवती हे आंदोलन सुरु आहे, वृत्तपत्रीय बातम्यांधे एसटी कर्मचा-यांच्या वेतनासंबंधी सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत असे म्हटले आहे, त्यामुळे सरकारतर्फे कर्मचा-यांचे आम्ही सर्व प्रश्न सोडवले आहेत असा त्याचा अर्थ असेल तर विलीनीकरण या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले असावे असे वाटत आहे, किंवा ते शक्य नाही असे काही घडामोडींवरुन वाटत आहे. तसे असेल तर मग पुढे काय ? एसटी कर्मचारी दुखवट्यात आहे त्यामुळे हा संप चालू आहे, असे एक कारण सांगितल्या जात आहे. दुखवटा किती काळ चालू शकेल ? हाही एक प्रश्न आहे. दुसरे असे की जर विलनीकरण अहवालात नसेल तर कर्मचा-यांचे वकिल त्याचीच मागणी करतील आणि सरकार ते शक्य नाही असे म्हणेल तर, हा एसटी संप अजून पुढेही सुरु राहील की मा. न्यायालय कर्मचा-यांना रुजू व्हा म्हणून आदेश काढेल की कसे ? याकडे सर्वांचेच आता लक्ष लागले आहे. प्रवाशांनी पर्यायी वाहनांचा वापर केल्यामुळे एसटी बंदची तीव्रता तितकीशी दिसत नाही पण जे लोक केवळ एसटीवरच अवलंबून आहेत त्यांचे आजही प्रवासाचे वांधेच आहेत. काही प्रमाणात एसटी रस्त्यावर दिसत असली तरी त्याचे प्रमाण कमी आहे. आता एसटी संप फारसा लांबवल्या जाऊ नये असे वाटते. प्रश्न सुटले पाहिजेत. विलीनीकरणामुळे जर कर्मचा-यांचे प्रश्न सुटून एसटीला आणि त्यांच्या कर्मचा-यांना चांगले दिवस येत असतील तर ते व्हावेत असे म्हणू या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरे आहे. एस टी कर्मचारी अति लांबलेल्या संपामुळे काकुळतीला आहे. "विलिनीकरण= हो किंवा नाही" हे लवकर तडीस लावा अशी आर्ट मागणी आहे!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१) विलीनीकरण करावे असे म्हटले आहे २) विलीनीकरण शक्य नाही असे म्हटले आहे. विलीनीकरण ??? हि काय भानगड आहे कोणी समजावून सांगेलं काय ? राजय परिवहन महामंडळ जर १००% राज्य सरकार मालकीचे आहे तर आपोआप त्याचे कर्मचारी सरकारी कर्मचारी होतात ना? का नाही ? जसा एम पी एस सी अधिकारी आज आरोग्य खात्यात असेल तर उद्या शिक्षण खात्यात ! शेवटि सरकारी कर्मचारीच ना ? माझ्य वरील प्रश्नाचा हेतू केवळ " सिस्टीम " सामावून घेणे हा आहे , सरकार / विरोधी कोण काय याचा संबंध नाही

शेठचे सरकार गरीबान्वर/शेतकर्यान्वर अन्याय करते आहे म्हणणारे, राज्य सरकार ला कसे काय धारेवर धरत नाहीत?

In reply to by सुखीमाणूस

दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ पाहणाऱ्यांना स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही म्हणतात ते हेच

खूप जुना संबंध आहे एसटी चा. खेड्यात,निर्जन ठिकाणी जाणारी एकमेव प्रवासी सेवा. वेळेवर नाही धावणार पण अपघात वैगेरे झाला तर सपोर्ट सिस्टीम असणारी एक मेव प्रवासी सेवा. एसटी स्टँड. प्रवासी लोकांचे हक्काचे निवारा मिळण्याचे ठिकाण. पक्की इमारत, कॅन्टीन,सुरक्षा देणारे ठिकाण. खूप छान छान एसटी चे अनुभव. आता म्हणजे अगदी वीस वर्ष पासून किंवा त्याच्या अगोदर pasun. लोकांची सेवा करण्यासाठी ही सेवा आहे हेच कर्मचारी विसरले . स्टॉप असून दहा फुटावर जरी प्रवासी असेल तरी त्याला न घेता पुढे एसटी पळवणारे ड्रायव्हर कंडक्टर. कच्च्या रस्त्यावर गाडी ल नुकसान होवू नये म्हणून कोणतीच काळजी न घेता ,cluse, ब्रेक ह्याचा वापर न करता गाडी पळवणार ड्रायव्हर डेपो इन्चार्ज. गाड्यांची वेळ पाळण्यासाठी कोणतेच प्रयत्न न करणारे कर्मचारी. लोकांना कोणतीच माहीत द्यायची नाही हेच ब्रीद असणारे pro. एसटी फायद्यात येण्यासाठी ,दर्जा राख ने हे आपले कर्तव्य आहे ह्याची बिलकुल जाणीव नसणारे.कर्मचारी आणि प्रशासन कर्मचारी पगार,गाड्यांची देखभाल ह्याचा खर्च पण वसूल होणार नाही अशी स्थिती हे पगार वाढ करण्याची मागणी कोणत्या बेसिस वर करत आहेत .विळगिकरण ह्याचा अर्थ दीन रुपये कमवू नका पण जनतेच्या टॅक्स मधून ह्यांना पगार ध्या. कोण मान्य करेल. कर्नाटक ची बस सेवा उत्तम चालली आहे. कर्मचारी प्रवासी मिळावेत म्हणून कष्ट घेतात. अनुभव वरून हे लिहाले आहे

In reply to by sunil kachure

अगदी !
कर्नाटकची बस सेवा उत्तम चालली आहे.
यांचे दर महाराष्ट्रातील ( मविआ स्पॉन्सरड् ) खासगी बसेस पेक्षा किफायतशीर असल्याने प्रवासी कर्नाटक सेवेला प्राधान्य देत आहेत ! कसली शोकांतिका आहे ना महाराष्ट्राची ! जे कर्नाटक बस सेवेस जमते ते महाराष्ट्राला का जमू नये ?

In reply to by चौथा कोनाडा

जे कर्नाटक बस सेवेस जमते ते महाराष्ट्राला का जमू नये ?
हे असे का आहे? मला काहीच समजत नाही. साधारणतः २०-३० वर्षांपुर्वी एसटी चांगली चालली होती. भुखंडाचे श्रीखंड, मलिदा असला काय प्रकार आहे का?

In reply to by Trump

साधारणतः २०-३० वर्षांपुर्वी एसटी चांगली चालली होती.
सहमत. हे अनुभवले आहे. १९९० च्या सुमारास भांडवलदार आणि रजकिय नेतृत्व एकत्र आले आणि या संस्था हळूहळू शिथिल करण्यास आणि नंतर खिळखिळ्या करण्यास सुरुवात झाली. नाममात्र विकास कामे (फक्त दाखवण्यासाठी) केली ती फक्त मलिदा खाण्यासाठी (यात सगळेच पक्ष आले) त्यामुळे दिखाऊ इमारती, बसेस्, बोर्ड्स ई. तयार झाले पण सेवेचा आत्माच हरवत चालला ! पुणे नगर वाहतुकी (पीएमपी) मध्ये देखिल हेच झाले ( बीआरटी मध्ये प्रचंड पैसा ओतुन (पक्षी: खाऊन) त्याचे फलीत फक्त १०-२०%) या पार्श्वभुमीवर आपण सगळे सामान्य हतबलच ! ;

श्रीखंडबासुंदी वर अनेक जन लक्ष ठेवून आहेत मुंबई ,पुणे किंवा बाकी मोठ्या शहरात एसटी च्या मालकीच्या खूप मोठ्या जागा आहेत. त्या जागा बळकावणे हे राजकीय पक्ष म्हणता येणार नाही पण त्यांच्या कथित ,विश्वासू कार्यकर्त्या लोकांची इच्छा आहे. त्या साठी एसटी बंद पडली पाहिजे हा गुप्त हेतू आहेच आणि हे लक्षात इथे सर्व पक्षीय एक मत आहे. फुटकळ मुद्द्ये राजकीय पक्ष उचलत आहेत पण मना पासून एसटी विषयी कोणताच राजकीय पक्ष योग्य भूमिका घेत नाही. आमदार चे पगार ,अनुदान वाढवायला कसे सर्व पक्षीय एक मत असते तसा प्रकार आहे. ही एक बाजू झाली . पण बोट घालायला संधी कर्मचारी लोक च देत आहेत हे पण सत्य आहे.

Best,रिक्षा,टॅक्सी ह्यांच्या युनियन चे नेतेतृत्व एकच व्यक्ती करायचा. गर्दी च्या वेळी बस सोडायच्या नाहीत. त्या मुळे कंटाळून लोक रिक्षा वापरायचे. फायद्या मध्ये बेस्ट चालावी म्हणून नियोजन शून्य. हे खूप प्रकार लोकांस माहीत आहेत सारखे संप. लोक वैतागली. आज बेस्ट कोणत्या स्थिती मध्ये आहे. कोण जबाबदार.

आज दिनांक २५ फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर मा.न्यायालयांनी आता पुढील सुनावणी ११ मार्च २०२२ ठेवली आहे. अहवालाबाबत महाराष्ट्र मंत्रीमंडळाने निर्णय घ्यावा व त्याबाबत दोन आठवड्यांनी अहवाल सादर करावा असे म्हटले आहे. सरकारतर्फे, कर्मचा-यांचे विलीनीकरण सोडून सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आता कर्मचा-यांनी रुजू व्हावे, शाळकरी मुले आणि इतर सर्व प्रवाशांना या संपाचा फटका बसतो आहे. अशी नोंद केली. कर्मचा-यांवर अजूनही आम्ही कडक कार्यवाही केली नाही. तसेच, एसटी विलीनीकरणाचा अहवाल जाहीर करता येणार नाही अशी भूमिका राज्यसरकारने घेतली. अहवाल जाहीर करण्यासाठी मंत्रीमंडळाची मंजुरी आवश्यक असे सरकारने न्यायालयात सांगितले. समितीचा अहवाल त्यातील मान्य केलेल्या मागण्या आर्थिक बाबी लक्षात घेता त्याच्या मंजूरीसाठी कॅबीनेट समोर अहवाल ठेवण्यासाठी सरकारने दोन आठवड्याची मूदत मागितली आहे. आता पुढील सुनावणी ११ मार्चला आहे. सरकार विलीनीकरणाचा निर्णय घेईल असे वाटत नाही. कारण सरकारची भूमिका त्याबाबत तशी अनेकदा दिसली आहे, त्यात कर्मचा-यांचे वाढीव वेतन, राहीलेले करार त्या अनुषंगाने या गोष्टी असतील असे वाटते. आज एसटी कर्मचा-यांचे वकील गुणरत्ने साहेब, मोठमोठ्याने हसत बाहेर येऊन सरकारला विलीनीकरण करावेच लागेल असे म्हणत होते. अर्थात पुन्हा दोन आठवडाभर कर्मचारी आणि प्रवाशांना वाट पाहणे आले. -दिलीप बिरुटे

बंद होईल कामगार नेते त्यांचा हिस्सा घेवून ऐश मध्ये जगतील.कामगार रोजगार शेतात कामाला जातील. राजकीय नेते जागा विकून मालामाल होतील. हे असेच काहीसे घडेल हे असले निर्णय कोर्टात होवूच शकत नाहीत. राज्याची आर्थिक स्थिती नाही म्हणून सरकार कोर्टाचे निर्णय मानायला नकार देईल.

बातमी: एस टी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी मुख्य सचिवांच्या समितीने फेटाळली. ९० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण व्यावहारिक नसून, त्यातून चुकीचा पायंडा पडेल, असा निष्कर्ष समितीने काढला. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालाची नोंद घेण्यात आली. त्यानुसार संप मिटला नाही तर टप्प्याटप्प्याने एसटीचे खासगीकरण करण्यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. विलीनीकरणाचा प्रस्ताव बासनात गुंडाळला गेल्याने आता एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन कामावर रुजू होण्यासाठी त्यांना काही दिवसांची संधी द्यावी. तोपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नये, तसेच आता महामंडळात कोणतीही भरती न करण्याबाबतही बैठकीत निर्णय झाल्याचे समजते. पण याने एस टी कर्मचार्‍यांना न्याय मिळेल का ?

In reply to by चौथा कोनाडा

ऐन दिवाळीपासून आंदोलन करणा-या संपक-यांच्या पदरात काय पडले असा विचार केला तर संपाचे परिणाम हे काही प्रमाणात चांगले होत असतील पण ते झाले नाही तर त्याचे परिणाम वाईटच होतात. संपक-यांनी वाढीव वेतन, मागे राहीलेले करार, वेतन-फरक, राज्यसरकाराप्रमाणे वेतन आयोग लागू करुन संपातील मागण्या करुन घ्यायला हव्या होता. यातल्या काही मागण्या पूर्णही करीत असल्याचे आश्वासन राज्यसरकारांनी कर्मचा-यांना दिले होते दुर्दैवाने संपक-यांना कुठे थांबायचे हे भावनेच्या भरात कळलेच नाही असे वाटायला लागले आहे. राहील्या मागण्या पुढे संप करुनही मागण्या रेटता आल्या असत्या. पण आता एसटी कर्मचा-यांचे विलीनीकरण करु नये असे असा अहवाल असेल आणि त्यावर जर शिक्कामोर्तब होणार असेल तर आता संपातला मूख्य विषयच गुंडाळण्यात आला आहे, असे दिसते. प्रवाशांची सुरुवातीला संपकर्मचा-यांबद्दल सहानुभूती होती. प्रवाशांनी खासगी वाहनांचा वापर केला त्यामुळे प्रवाशांचा प्रचंड खोळंबा झाला असे चित्र काही निर्माण झाले नाही. विलीनीकरणामुळे एसटी प्रवाशांचा कसा फायदा होईल वगैरे अशाही सांगोवांगीच्या गोष्टी प्रवाशांच्या माथी मारण्याचा प्रयत्न झाला त्यात काही तथ्य नव्हते, पण संपक-यांना सहानुभूती देणारे दुर्दैवाने वाढले नाहीत. गेली तीनचार महिण्यापासून विलीनीकरणा-च्या भरवाशावर बसल्यामुळे वेतन संपकरी कर्मचा-यांच्या पुढे आर्थिक प्रश्न उभे राहीले आहेत. संपात सहभागी कर्मचा-यांची बडतर्फी मागे घेऊन कर्मचा-यांना रुजू करुन घेतील असे वाटते बाकी. एक तर वेतन अपूरे आणि त्यात संप त्यामुळे प्रश्न इथेच संपत नाही. सतत तोट्यात असणा-या बसचे खासगीकरण होणार असेल तर हा आणखी एक फटका एसटी कर्मचा-यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेतन मिळेलच, वेळेवरच मिळेल, किती मिळेल, मिळेल की नाही. एसटीचा नवा चेहरा भविष्यात पुढे येईल किंवा नाही हे काळ ठरवेल पण आज तरी 'बाबा गेला आणि दशम्याही' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, इतकेच खरं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संप, आंदोलन करून मिळते असा काही गैरसमज झाला होता काय ? दिल्लीचे शेतकरी आंदोलन - हे काही नोकरी करत नव्हते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत प्रा.डॉ.दिलीप बिरुटे. विलीनीकरण करणार नाही याचा अंदाज आल्यावर संपक-यांनी माघार घेणे इष्ट होते. कुणी तरी त्यांना छातीठोक पणे "विलीनीकरणाची " खात्री दिली असावी (गाजर) / अथवा अंतर्गत दहशतवाद असावा. इतर वाहनांची मोठी उपलब्धता या मुळे मोठा खोळंबा झाला नाही, होत नाहीय हा विचार संपकर्‍यांनी का केला नसावा. असो, जे झाले ते झाले (किंवा जे होईल ते होईल) एस टी कर्मचार्‍यांना योग्य प्रमाणात पगारवाढ आणि बाकीच्या सोयीसवलती मिळाव्या ही सामान्य प्रवासी नागरि़क म्हणून माझी मनापासून इच्छा आहे. आज पुन्हा ही गोष्ट आठवली: https://www.youtube.com/watch?v=GJOVYfB8NF0

राज्य सरकारने पगरवाढीमध्ये अजून थोडी वाढ करून संपकर्यांना संप माघे घ्यायला काहीतरी कारणं करुण द्यायला पाहिजे.

तर उद्याच संप माघार घेवून एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे . एसटी विसरले लोक आता.जास्त काही फरक पडला नाही. नेत्यांच्या नादाला लागू नये.

एसटी विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल कोर्टात दिल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी नुकतीच दिली त्याच बरोबर एसटी महामंडळाचं राज्य सरकारमधे विलीनीकरण करणे शक्य नाही असा त्रीसदस्यीय समितीचा अहवाल परिवहन मंत्र्यांनी विधानसेभेत पटलावर ठेवला त्यामुळे आंदोलनाचं पुढे काय होणार अशी चर्चा चालू असतांना आमदार गोपिचंद पडळकर यांनी पुन्हा आंदोलन करु असे म्हटले आहे. त्यामुळे संप अजून चिघळणार असे वाटत आहे. एसटी कर्मचा-यांनी १० मार्चच्या आत कामावर रुजू व्हावे अन्यथा सर्व पर्याय खुले आहेत या परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या इशा-यानंतर आता पुन्हा एसटी आंदोलन कधी संपेल हे तरी आता सांगता येणार नाही अशी अवस्था एसटी कर्मचारी आणि प्रवाशांची झाली आहे. -दिलीप बिरुटे

त्या कर्मचार्यांचं आहे जे रिटायरमेंटला आले आहेत. तीस पस्तीस वयाचे दुसरीकडे नोकऱ्या धरतील.इकडचे बुडीतच आहे.पण पन्नास पंचावनवाले काय करणार?

चा इतिहास माहीत असून पण एसटी कामगार राजकीय पक्षांचे नेते आणि कामगार नेत्यांच्या आहारी गेले आहेत संप माग घेवून मागण्या पण लावून धरता येतील . पण कामगार नी आता संप मग घ्यावा. त्या मध्ये त्यांचे भल आहे. आता अशी अवस्था आहे ड्रायव्हर दहा पंधरा हजार रुपये पगार देवून पण खूप उपलब्ध आहेत. यूपी,बिहारी तर दहा हजार मध्ये पण ड्रायव्हर ची नोकरी करत आहेत मुंबई मध्ये.

काल दिनांक ११ मार्चला, मुंबई उच्च न्यायालयात जी सुनावणी सुरु आहे त्यात एसटी महामंडळाचे राज्य शासनामधे विलीनीकरण करुन घेणे किंवा महामंडळाचे शासनामधे पूर्णपणे विलीनीकरण करुन महामंडळाचा प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय शासनातर्फे चालविणे शक्य नसल्याचा त्रीसदस्यीय अहवाल स्वीकारला किंवा नाही या विषयीची भूमिका २२ मार्चला स्पष्ट करा असे निर्देश मा.उच्चन्यायालयाने दिले त्याचबरोबर आजपासून ते २२ मार्चपर्यंत कोणत्याही कर्मचा-यावर शिस्तभंगाची कार्यवाही करु नये असे उच्चन्यायालयाने म्हटले आहे. एसटी संप बेकायदा ठरविल्यानंतरही विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी महामंडळाचे कर्मचारी मागील चार महिन्यापासून संपाव असल्याने महामंडळने केलेल्या न्यायालय अवमान याचिकेवरही काल सुनावणी झाली. राज्यसरकार अहवालावर निर्णय कधी घेणार तर अधिवेशनामुळे तो निर्णय घेता आला नाही असे सरकारी वकिलांनी सांगितले. आता पुढील निर्णयासाठी २२ मार्चपर्यंत वाट पाहणे आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता पुढील निर्णयासाठी २२ मार्चपर्यंत वाट पाहणे आहे.
वेळ काढत समोरच्याला जेरीस आणायचे हाच डाव आहे शासनाचा ! ... आणि १० हजार कंत्राटी कामगारांची भरती करण्याची ही एसटी महामंडळाने घोषणा केली आहे
आधी कंत्राटीकरण आणि मग ( सर्व शोषण झाले की) खासगीकरण)
संबंधीत लुटारू याचीच वाट पहात होते. सगळी कंत्राटं आपल्या बगलबच्च्चांना द्यायची , कामगारांच्या तोंडचा घास पोटभरल्या कंत्राटदारांच्या घश्यात घालायचा हाच डाव असणार. सर्व शोषण झाले म्हंजे काहीच शोषण्यासारखे राहिले नाही स्वस्तात महामंडळ विकून टाकायचे (ते ही आपल्याच बगलबच्च्चांना ) अवघड आहे !

In reply to by चौथा कोनाडा

स्वस्तात महामंडळ विकून टाकायचे (ते ही आपल्याच बगलबच्च्चांना ) जसे केंद्र सरकार कंपन्या विकत आहे तसेच का हो ? की लगेच तिकडे भूमिका वेगळी असते?

In reply to by कपिलमुनी

केंद्र सरकार आपल्या बगलबच्च्यांनाच कंपन्या विकत आहे, असे आपले म्हणणे आहे काय? तसे केले असेल तर कंपन्या विकतांना जे काही प्रोसिजर असते, त्याला त्यांनी चाट मारली, व हेराफेरी केली असे झाले की. ह्याबद्दल काही ठोस माहिती तुमच्याकडून येथे मिळाली तर वाचावयास आवडेल.

कारण सोयी शहरातच मिळतात. डोक्यावर ओवरब्रिजचे छप्परही मिळते. पाणी वीज मिळते. गावाची एसटी गेल्याने आणखी एक कारण वाढले गाव सोडण्याचे. आता सरकारी समिती मंडळ परदेश दौरा करणार का लंडनचा.?परिवहनाचा आढावा घेण्यासाठी? मग नवीन अहवाल सादर करणार? कोकणासाठी कटामरान सुरू? महाराष्ट्रात आतमध्ये हेलिकॉप्टर सेवा?

परप्रांतिय युपी बिहार मधे भाजपा ला मत देऊन रेल्वेमधून महाराष्ट्रात येतात. त्यांना महाराष्ट्राच्या मुख्य शहरातच रोखून धरायचे. गावागावात पसरून द्यायचे नाही म्हणून तर एस.टी. बंद केली नसेल ना ?

होय.

चार महिने संप चालू आहे.ह्यांची एकच मागणी एसटी महामंडळ चे सरकार मध्ये विलशिकरण करा. ही मागणी आघडी सरकार च काय कोणत्याही राजकीय पक्षाचे सरकार आता असते तरी मान्य कारणे शक्यच नाही. कामगार ना भडकावून चार महिने संप करण्यास भाग पाडण्यात bjp च मोठा हात आहे . नुकसान मात्र कामगार चे च होणार आहे पगार वाढ करा ,किंवा बाकी सुविधा ध्या ह्या मागण्या ठीक आहेत. पण महामंडळ नीट चालवा. प्रवासी लोकांस आस्था वाटेल अशी सेवा ध्या. खासगी गाडी चे प्रवासी एसटी कडे परत वळतील असे नियोजन करा. महामंडळ फायद्यात आले तर कोणतेही सरकार चांगला पगार देईल च आता तरी थोडे शहाणपण असेल तर नेत्यांना फाट्यावर मारून कामावर हजर व्हावे.

किती BJP शासित राज्यात एसटी महामंडळ अस्तित्त्वात आहेत आणि महाराष्ट्र पेक्षा चांगल्या स्थिती मध्ये आहेत,महाराष्ट्र पेक्षा जास्त पगार तेथील कामगार नी bjp शासित सरकार देत आहेत. कर्नाटक चे उदाहरण देवू नका ते राज्य पहिल्या पडूनच प्रगती करणारे आहे आताच्या तेथील bjp सरकार चा त्या प्रगती शी काही संबंध नाही. योगी महाराज चे गोडवे गात असता. यूपी मध्ये st महामंडळ आहे का? असेल तर काय स्थिती मध्ये आहे पगार तरी मिळतो का . थोडाफार तरी कामगार ना ते पण सांगत जा. बिहार,विषयी तर न बोलले बर.

काल म्हणजे २२ मार्चला मा.न्यायालयासमोर सुनावणी होती. काल मा. न्यायालय म्हणाले, विलीनीकरणाच्या प्रश्नावर राज्य सरकारचा निर्णय नकारात्मक असल्यास तुम्हाला त्याविरोधात दाद मागण्याची मुभा आहे. हा विषय तसाही सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तुमची मागणी सरकारकडून मान्य झाली तर प्रश्नच मिटेल; परंतु सरकारचा याविषयी अंतिम निर्णय होईपर्यंत तुम्ही परिस्थिती आणखी गंभीर करण्याऐवजी कामावर रुजू का होत नाही ? आत्महत्या करुन प्रश्न सुटणार आहे का ? असा परखड सवाल मुंबई उच्चन्यायालयाने मंगळवारी संपकरी एसटी महामंडळ कर्मचा-यांना केला. राज्यसरकारकडून निर्णय घेण्यासाठी चालढकल केली जात आहे आजपर्यंत १०७ कर्मचा-यांनी आत्महत्या केल्या आहे, निराशेपोटी कर्मचारी आत्महत्येसारखा टोकाचे पाउल उचलत आहेत असे संपकरी कर्मचा-यांच्या वतीने अ‍ॅड. गुरणरत्न सदावर्ते म्हणाले. आत्महत्त्या करुन प्रश्न सुटणार नाही. औद्योगिक न्यायालय व उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवलेला आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे स्थापन झालेल्या समितीचा अहवालही आलेला आहे. त्यामुळे कर्मचा-यांनी कामावर रुजू होणे आवश्यक आहे. बसेस उभ्या असल्याने महामंडळाचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान. दुसरीकडे प्रवाशी जनतेच हाल होत आहेत. असे एसटी महामंडळाचे वकिलांनी आपले म्हणने मांडले. हा प्रश्न न्यायालयासमोर आहे आणि आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. मग सरकारचा अंतिम निर्णय होईपर्यंत तुम्ही (कर्मचारी ) कामावर रुजू झालात तर आभाळ कोसळणार आहे का ? आत्महत्या सत्रसुरु ठेवून प्रश्न सुटणार आहे का असेही खंडपिठाने म्हटले आहे. बाकी, कर्मचा-यांच्या व्यथा समजून घेऊन एक समिती स्थापन करुन त्या समितीला निर्णय घेण्याचे सांगावे अशी आणखी एक मागणी एसटी कर्मचा-यांचे वकिल गुणरत्ने यांनी केली. काय समिती आहे, त्याची कागदपत्रे सादर करा, मग आम्ही ठरवू असेही मा.न्यायालयाने सांगितले. एसटीच्या विलीनीकरणाचा अहवाल स्वीकारला का नाही अजून त्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी सरकारी वकिलांनी मागितला होता पण खंडपिठाने एक एप्रीलपर्यंत माहिती देण्याचे सांगितले. बाकी, काल, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमधे विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट करणारा मुख्य सचिवांच्या अध्यक्षेतेखाली त्रीसदस्यीय समितीचा अहवाल राज्य मंत्रीमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत स्वीकारण्यात आला त्यामुळे विलीनीकरणाची शक्यता संपुष्टात आली आहे. अगली तारीख ५ एप्रील. (माहिती संकलन : मटा, सकाळ, लोकमत. वृत्तचित्रवाहिन्या यावरुन साभार) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आर्थिक दाव्यात वकील लोक टक्केवारीत पैसे आगाऊ घेतात असे ऐकून आहे. जाणकारांनी प्रकाश पाडावा. ((आमच्या ओफिसातल्या एकाने नोकरी सोडल्यावर मला पैसे कमी मिळाले तर तीन लाख रुपयांचा दावा लावण्यासाठी तीस हजार रु आगावू घेतले होते.))