Skip to main content

छंदिष्ट, हरहुन्नरी, उद्योगी मिपाकर सध्या काय करत आहेत ? (एप्रिल २०२१)

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 15/04/2021 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, काही काळापासून मिपावर येत असलेल्या 'चालू घडामोडी', 'सध्या मी काय पाहतोय' वगैरे धाग्यांवर अनेक मिपाकर उत्साहाने सहभाग घेत आहेत. या धाग्यांमधून 'बाहेर'च्या जगातील लोक काय करत आहेत याची माहिती मिळत असली तरी खुद्द मिपाकर काय करत आहेत, हे कळत नाही. कसलातरी छंद जोपासणार्‍या, काहीतरी वेगळेच करण्याची आवड असलेल्या, आपण स्वतः काहीतरी झपाटून केले पाहिजे असे वाटत असलेल्या हरहुन्नरी, हौशी, छंदिष्ट मिपाकरांसाठी हा धागा आहे. आपण अगदी छोटेसे का होईना, पण हौशीने स्वतः काही करत असाल, नवीन काही शिकत असाल, कश्यात तरी सहभागी होत असाल तर ते इथे अवश्य लिहावे अशी सर्वांना विनंती आहे. तर आता सुरूवात स्वतःपासून करतो. मी रंगवत असलेली चित्रे घरात सर्वत्र लावत असलो, तरी त्यांना चौकटी करवून घेणे कधी जमले नाही. मला एक चित्र करायला जेवढा खर्च येतो, त्याच्या अनेक पटींनी एकेका चवकटीवर करावा लागेल, हे त्याचे मुख्य कारण. जुन्या बाजारात कधी कधी चांगल्या चवकटी असलेले जुने आरसे वा चित्रे मिळतात, पण आपले चित्र अगदी नेमक्या त्याच आकाराचे असेल, तरच त्या वापरता येतात. मध्यंतरी तूनळीवर अचानकच ' हौ टु मेक वुडन फ्रेम' असे काही बघायला मिळाले. असे बरेच विडियो बघितल्यावर आपण हे करून बघायला हवे असे वाटू लागले. मग बाजारातून काही लाकडे, सेट स्क्वेयर, चिमटे, कॉर्नर स्ट्रॅप, मायटर बॉक्स, करवत वगैरे आणून प्रयत्नाला लागलो. . . लाकूड कापताना ते अजिबात हलू नये म्हणून क्लँप वगैरे लावणे, करवत चालवताना हात स्थिर ठेवणे, मोजमाप अगदी अचूक करणे, हे अगदी आवश्यक असल्याचे थोड्या चुका झाल्यावर लक्षात आले. तसेच अनेक बारीकसारीक गोष्टी या विचार, प्रयत्न आणि जुगाडबाजी यातूनच साध्य होतात आणि असे करताना मोठेच समाधान लाभते, याची वारंवार अनुभूति येत गेली. योग्य त्या मापाचे तुकडे मायटर बॉक्सच्या सहाय्याने कापल्यावर ते बरोबर काटकोनात जुळवून आधी चिकटवताना कॉर्नर स्ट्रॅपचा चांगला उपयोग होतो. ... सुरूवातीला अगदी साधी फ्रेम बनवून बघितली. नंतर जरा रुंद आणि कारागिरी केलेल्या लाकडाची. त्याबरोबरच फ्रेमला वेगवेगळ्या प्रकारे रंगवणे आणि रंगातला भगभगीतपणा घालवण्यासाठी घासणे, खरवडणे, रंगावर रंग चढवणे वगैरे उद्योग करून बघितले. ... . याप्रकारे केलेल्या प्रयत्नातून थोड्या चित्रांना आता चवकटी लाभल्या आहेत आणि काही नवीनच रोचक काम करण्यातून मिळणारा आनंद आणि समाधान यांचा लाभ होत आहे. आता आणखी कठीण, उत्तम दर्जाच्या चवकटी करण्याचा बेत आहे. . अन्य मिपाकर पण आपापल्या उद्योगांबद्दल लिहून या धाग्यात भर घालत राहतील अशी आशा आहे.

वाचने 43871
प्रतिक्रिया 109

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

रेसिपी अशी वेगळी नसणार कारण तयार किट मिळते येथे त्याप्रमाणे करणार . तुम्ही आधी तुमच्या देशात असे करायला परवानगी आहे का बघा नाही तर वास सुटला तर वांदे होतील

In reply to by चौकस२१२

भारतात किट आहेत,पण तो फरमेंटेशन करायचा जार सहज नाही मिळत बहूतेक.तिकडचा जार -फोटो वा माहिती असेल तर द्यावी (ज्ञानात भर).

वेगवेगळी झाडे आणि कलम तयार करण्याचे प्रयत्न चालू केलेत गेल्या वर्षीपासून.. पेरू अंबा सीताफळ ड्रॅगन फ्रूट अंजीर अशी सगळी मिळून जवळपास 200 रोपे घरीच तयार केलेत. कलम करण्यासाठी लागणार्या फांद्या मित्रमंडळी कडून मिळवल्या. ड्रॅगन फ्रूट ची 2 रोपे 2 वर्षापूर्वी सोलापूर भागातून आणली होती. त्याच दोन झाडापासून हळूहळू 50 झाडे तयार केलीयेत. आता पावसाळा आला की सर्व झाडे गावी शेतात deploy करणार आहे. त्याचसोबत अजून काही फळझाडे जसे चिक्कू, फणस, 2-3 दुर्मिळ प्रकारचे आंबे, द्राक्ष, लीची इ विकत घेणार आहे.

चित्राला फ्रेम करणे पुण्यात पण महागच आहे. पाव इंपेरियल साइझच्या चित्रालाच ३०० रुपये सांगतात. ती पण अगदी साधी फ्रेम. आपण मस्त फ्रेमिंग केलेय चित्रगुप्तजी. चित्रांना फ्रेम मुळे आणखीनच उठाव येतो.

In reply to by चौथा कोनाडा

कॅम्पात क्लोवर सेंटर मध्ये एक दुकान आहे तेथील मोकळ्या फ्रेम ची किंमत ५००० रु च्य दरम्यान असते !

फ्रेम्स छानच दिसत आहेत. कोपरेसुद्धा सफाईदार जमलेत. काकांचा उत्साह तरूणांना लाजवेल असा आहे. आणखी चित्रांच्या फोटोंची वाट बाघतेय.

पॅन्डेमीक मुळे अजून किमान ८ महिने तरी घरूनच काम करावे लागणार (आणि मुलांची व्हरर्चुअल शाळा) असल्याने हे ड्राय इरेझ बोर्ड्स तयार केले. २ बोर्ड्स चा एकूण खर्च फक्त $३५.
  • पॉलिशड हार्ड बोर्ड - ८' - ४' - $१५
  • प्लस्टिक फ्रेम - $८
  • इंडस्ट्रियल स्ट्रेन्थ व्हेल्क्रो - $१०
  • मेटल अँगलस $२.
सगळ्या गोष्टी होम डेपो किंवा लोवेज मध्ये मिळतात, आणि बोर्ड्स पाहिजे त्या साईझ मध्ये कापून पण देतात, त्यान्च्या कडे गर्दी नसेल तर. whiteboard 6X4 whiteboard 2X4

माझे लॉकडाऊनचे उद्योग : चार दिवस जोडुन शनिवार रविवार आणि गुढीपाडवा अशी सुट्टी मिळाली म्हणुन वाळवणाचे काही प्रयोग करुन पाहिले : साबुदाणा बटाट्याच्या पापड्या: 1 2 3 4 भरलेल्या तळणीच्या मिरच्या : 5 5 ३. गव्हाच्या कुरडया : 7 8 9 10 आज्जीची फार आठवण आली . तिला प्रचंड कौतुक वाटलं असतं . आपं काय शिकलो ? : साबुदाणा पापड्या सोप्पा प्रकार आहे अगदीच कमी कष्टाचा. पण गव्हाच्या कुरडया मात्र वेळखाऊ आणि कष्टाचा प्रकार आहे . २ पातेली गहु भिजवुन सुध्दा खुप कमी प्रमाणात चिक निघाल्याने पुढे कुरडया करायचा घाट घातला नाही, तसाच खाऊन टाकला. तळणीच्या मिरच्या करताना मात्र घेताना एक गडबड झाली. कारण आम्हाला "मिरच्या आण " म्हणलं की आम्ही मिरच्या आणतो. भावनगरी, ब्याडगी , कश्मीरी, लवंगी हे प्रकार आम्हाला केवळ ऐकुन माहीत . समोर ठेवले तर ओळखताही येणार नाहीत. ( तसेही मला एक शेपु सोडला तर इतर पालेभाज्याही ओळखता येत नाहीत म्हणा. शेपु ओळखता येतो कारण त्याच्या वासाने मळमळते अन उलटी येते म्हणुन =)) ) ते असो. मोठ्ट्।या दिसल्या त्या मिरच्या आणल्या , चांगल्याच झणझणीत झाल्या आहेत !! हे सर्व करत असता असता मनात एकोनॉमिक्स वर चिंतन चालु होतेच : प्रिन्सिपल ऑफ मार्जिनल एफिशियन्सी (एखद्याला एखादे काम दुसर्‍या इतर कोणत्याही कामापेक्शा थोडेसे जरी जास्त चांगले जमत असेल तर त्याने फक्त तेच काम करावे आणि बाकीची कामे ऑटसोर करावी. हेच त्यच्यासाठी आणि ओव्हरॉल समजासठी बेस्ट असते ) किंव्वा अ‍ॅडम स्मिथ म्हणाला तसा इन्व्हिझिबल हॅन्ड ( म्हणजे कोणताही व्यवहार करताना , दोन्ही बाजुच्या पार्टी स्वत्:च्या स्वार्थाचा विचार करत असतात आणि स्वतःची युटीलिटी वाढवत असतात , सो नेट नेट दोघांचीही युटीलिटी वाढत असते आणि वेल्थ तयार होत असते . ) म्हणजे कसं की हे सगळे आपण करायच्या ऐवजी आपण आपले एकोनॉमिक्स , फायन्नास चे काम केले असते अन हे ऑट्सोर्स केले असते तर आपल्या वाचलेल्या वेळेची किंमत कैक पटीने जास्त आहे म्हणुन आपला फायदा झाला असता आणि बाहेर २-४ जणांना रोजगार मिळाला असता. सो नेट नेट आपण कामांचे जितके जास्त सॅग्रिगेशन करु शकु तितके स्वतःसाठी आणि ईकोनॉमीसाठी आणि समाजासाठी चांगले असेल ! असो. आमचे आपले सनातनी वर्णाश्रम व्यवस्था समर्थक स्वात्मरंजन. वगैरे वगैरे ! हे असले सगळे आयसोलेटेड पॉईंट्स जुळुन येताना पहायला खूप छन वाटतं ! एकुणच मजा आली . १. फोटो न दिसल्यास दिलगीर आहे २. फोटो अव्वच्यसव्वा आकाराचे दिसल्यसही दिलगीर आहे ( नक्की हाईट आणिविडथ काय ठेवावी बरें फोटो व्यवस्थित दिसण्याकरिता? )

In reply to by प्रसाद गोडबोले

इतके सगळे करत आहात तर एक सोपा प्रकार करा मुगवडे बिन कष्टाचा आणि कधीही कामाला येणारा प्रकार आहे कृती पण सोपी आहे पहाटे 5 वाजता मुगडाळ भिजत घालायची, एक मध्यम आकाराचा बाऊल चालेल... एक किलो मुगडाळीचे, भरपूर मुगवडे होतात...रोज केलेत तर, 15-20 दिवस लागतील ... 7 वाजता वाटायची एक ताट घेऊन, शेंगदाण्याच्या आकारा इतपत, गोळे बनवून टाकायचे.साधारण पणे, एक तास लागेल... 5-6 दिवस कडकडीत उन दाखवायचे... दमट हवा असेल तर खूप दिवस टिकत नाहीत, दसर्याच्या आत संपवून टाका... तळलेले मुगवडे, कुठल्याही फळभाजीची रंगत वाढवतात पण, हे खरे खुलतात ते वांग्याच्या भाजी बरोबरच .... वांग्याच्या भाजीची रेसिपी देतो .... https://misalpav.com/node/25590

In reply to by प्रसाद गोडबोले

तळणीच्या मिरच्या पाहिल्या आणि हसलो. पापड्यात वाटलेली हिरवी मिरची आणि चिंचकोळ घातल्यास फार छान लागतात, प्रमाण मात्र ट्रायलने ठरवावे लागेल. आणि फोटोंसाठी सरधोपट टेम्प्लेट <br />फोटो क्रमांक _*_<br /> <img src="लिंक" width ="80%" /><br /> फोटो क्रमांक _*_ आणि लिंक टाकून ते सर्व कॉपी करून लेखनात हवे तिथे टाकणे.

छान धागा हो चित्रगुप्त. माझे म्हणाल तर, गेले अनेक महिने आमच्या फार्महाउसवर राहून WFH चालू आहे. नेहमीप्रमाणे आवरून एक दीड तासाचा प्रवास करून ऑफिसला जाणे ह्याची गरज नसल्याने सगळे सुशेगात करायला वेळ मिळतोय. लहानपणी इच्छा असूनही खेळायला न मिळालेला एक खेळ म्हणजे बॅडमिंटन. सध्या रोज सकाळी ४५ मिनिटे बॅडमिंटन खेळतो. अधून मधून शेतातून चालत जाऊन कुठंतरी झाडाखाली जाऊन शांतपणे बसतो. घरापासून १ किमी वर कृष्णा माई वाहते. कधी कधी तिकडे चक्कर टाकतो. मोर, सुगरण हमखास दिसतातच. इतरही वेगवेगळ्या पक्षांचे निरीक्षण करणे चालूच आहे. शेतातील घर असल्याने दिवस रात्र कमालीची शांतता असतेच. तांबट, पोपट, घुबड, बुलबुल, आणि असंख्य प्रकारच्या चिमण्या घराबाजूच्या झाडांवर दिवसभर किलबिलाट करत असतात. अधून मधून घरात आत पण येतात. ५-६ वर्षांपूर्वी घराच्या बाहेरच्या सज्ज्यात एका चिमणीने घरटे बनवले होते ते अजूनही आहे. आतापर्यंत अनेक चिमण्यांची बाळंतपणे तिथे पार पडलेली आहेत. घरासमोर एक चिंचेचे झाड आहे. तिची अवीट गोडीची चिंच खायला माकडांची फौजच्या फौज येते. त्यांच्या तावडीतून जी थोडीफार वाचते ती आम्हाला खायला मिळते. घरापासून थोड्या अंतरावर एक जांभळाचे झाड हेरून ठेवले आहे. त्याची जांभळे पिकण्याची वाट बघतोय. करवंदाच्या जाळ्यांचा शोध घ्यायचा बाकी आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त तर निव्वळ अप्रतिम. एखाद्या चांदण्या रात्री गच्चीवर 'बसण्याचा' आनंद आणि सुट्टीच्या दिवशी विहिरीत पोहण्याचा आनंद पण मिळतोय. आता भाजीसाठी एक वाफा करून त्यात भाजी लावणार आहे. तर एकंदरीत आयुष्यात कदाचित कधीही अनुभवायला मिळाले नसते अशा वातावरणाचा आनंद घेणे चालू आहे.

In reply to by अभिजीत अवलिया

असे जीवन असावे असे अनेकांना वाटत असते पण ते लाभत नाही. तुम्ही ते प्रत्यक्षात जगत आहात हे फारच थोर.

In reply to by अभिजीत अवलिया

फोटू टाका राव माणसांचे नसले तरी चालतील पण जागेचे टाका ? आणि मग कामाचा के काय करता ? फार्म हाऊस प मोठ्या शहराचं जवळ आहे का?

In reply to by चौकस२१२

फार्म हाऊस कराड व सातारा यांच्या मधोमध आहे. फार्म हाऊस पेक्षा घर म्हणणे जास्त योग्य. फार्म हाऊस म्हटले की मुळशी, पवना परिसरातील फार्महाऊस नजरेसमोर येतात. त्यांच्या तुलनेत आमची झोपडीच. बाकी फोटो विकांताला टाकतो.

In reply to by अभिजीत अवलिया

हायला, हेवा वाटावा अशी स्थिती आहे. पावसाळ्यात कट्टा करावा वाटतोय. सगळं खर्च माझा. काय म्हणताय?

In reply to by अभिजीत अवलिया

छान वर्णन . फार्म हाऊस कराड व सातारा यांच्या मधोमध या वर्णनावरुन कोडोली , गोडोली , उंब्रज , भोर परिसर वाटतो आहे .

In reply to by अभिजीत अवलिया

सुंदर, असेच राहा निवांत तिकडेच. आणि इंजॉय करा. च्यायला, मी बॅडमिंटन खेळायला जात होतो नियमित खेळायला येणारे संसर्गाच्या भितीने येणे बंद झाले. नाय तर दोन तीन सेट म्याचेस झाल्या की दिवसभर नीट राहतो माणूस. :) -दिलीप बिरुटे

In reply to by अभिजीत अवलिया

उगाचच म्हणतोय .कृष्णाकाठचे घर कल्पनेनेच दिसत आहे. कराड ,पलुस, किर्लोसकरवाडी, औदुंबर भाग माहिती आहे. मोर असतातच शेतांंत, ओढ्यांंत. रम्य असते . कितीही सूर्य तापो झाडाखाली काय छान झोप येते. मोकळी हवा . मग अचानक वावटळ उठते दुपारी तिनाला. कुठून तरी ढग येतो. पाऊस पाडून जातो.

मला एक प्रश्न पडला आहे की सध्या मिपावर महिलांचा टक्का फार घसरला आहे. सुरुवातीची अनेक वर्षे अनेक मिपाकरणी उत्तम साहित्य निर्मिती करत होत्या, संवादांमधे हिरिरीने भाग घेत होत्या. आता २-३ नावे सोडली तर एकही जुन्या मिपाकरणी दिसत नाहित. की त्या 'अनाहिता' वरच आपला वेळ व्यतित करतात ?

हे पहा काही फोटो. घरातून दिसणारा एक डोंगर  सूर्योदय   चौकोनी विहीर (३५ फूट खोल आहे)   सुगरणीचे घरटे  अशीच एक सकाळ

In reply to by अभिजीत अवलिया

व्वा, अभिजीत अवलिया, सुंदर फोटोज ! ३५ फूटी खोल चौकोनी विहीर खुप आवडली. विहिरीला कुंपण भिंत नाही काय ? आत पडलो तर काय अशी भीती मला आताच वाटायला लागली आहे !

In reply to by चौथा कोनाडा

विहीरीला कुंपण वा भिंत नाही. पोहता न येणारी व्यक्ती आत पडली तर 'हे राम' म्हणायचे. @सौंदाळा साहेब, प्रयत्न करेन लेख लिहीण्याचा. पण या धाग्यावरील माझ्या पहिल्या प्रतिक्रियेतच मी जवळपास सर्व महत्त्वाचे वर्णन केल्याने फारसे काही अतिरिक्त लिहीण्यासारखे उरलेले नाही.

In reply to by अभिजीत अवलिया

फुकट कुंपण बनवायचे असेल तर, निवडुंग उत्तम, कोकणात निवडुंग 4-5 फूट उंच होतो पैसा हवा असेल तर, बांबूची रोपे लावा शिवाय बांबू रोपांना 100% सबसिडी आहे, तीन टप्प्यात आणि तीन वर्षांत मिळते, त्यामुळे हे सर्वोत्तम ... पांच वर्षांत शेता पुरता बांबू पण मिळेल आणि कुंपण पण तयार होईल...

अश्या ठिकाणी निवांतपणे रहाणे हे हल्लीच्या शहरी व्यक्तीसाठी स्वर्गसुखच. फोटो एकदम मस्त आहेत. Claude Monet ची चित्रेच जणू. अभिनंदन.