Skip to main content

फार्म हाऊस की नुसतीच हौस???????

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 04/07/2016 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : खालील लेख हा संपूर्ण काल्पनिक आहे.केवळ माझा वेळ जात नाही म्हणून लिहिला आहे.तुमचा वेळ जर अमुल्य असेल तर, खालील लेख नाही वाचलात तर फार उत्तम. ============================================ शेती करण्यापुर्वी बर्‍याच जणांचा सल्ला घेतला.त्यापैकी ज्यांनी खूप विरोध व्यक्त केला, ते सगळेच शहरातील.त्यातही बर्‍याच जणांचे मत असे पडले की, शेतीत पैसे घालवण्यापेक्षा , एखादे टूमदार फार्म हाऊस विकत घेतलेले परवडते.पुढे मग "फार्म हाऊस." ह्या संकल्पनेतील धोका लक्षांत यायला लागला आणि मी फार्म-हाऊस ही माझी नुसतीच हौस ह्या सदरांत मोडेल म्हणून तो विचार बाजूला सारला. पण गेल्याच आठ्वड्यांत आमच्या एका हितचिंतकाने, हा विचार परत मला ऐकवला म्हणून हा धागा प्रपंच. आमचा थोडक्यात संवाद असा. तो : तुम्ही शेत विकत घेताय म्हणे? मी : हो. तो : काय भावात पडले? मी : साधारणे सर्व खर्च वजा जाता एकरी २,५०,०००/- ला पडेल. तो : अरे.मग शेत घेण्यापेक्षा फार्म हाऊस विकत घ्यायचे.मी मागच्याच वर्षी एक विकत घेतले. मी : कितीला? तो : साधारण पणे ३०,००,०००/- खर्च झाले.जवळपास अर्धा एकर जागा आहे.शिवाय त्यात आंबा,नारळ इत्यादी झाडे पण आहेत. मी : अरे व्वा!!! मस्तच. तो : आता ६-७ वर्षांनी आम्ही तिथेच रहायला जावू. मी : मस्त. तो : सध्या आम्ही तिथेच एक कुटुंब ठेवले आहे.ते सध्या देखभाल करत आहेतच. मी : छान. तो : आता अजिबात शक्यच नाही झाले तर, ज्याने विकले आहे तो परत विकत घ्यायला किंवा विकायला मदत पण करणार आहे. मी : ओके. हे तर फारच उत्तम. तो : तुमच्या शेती पेक्षा, आमचे फार्म हाऊस फायदेशीर ठरणार बघ. मी : असे झाले तर फार उत्तम. तो : तू पण फार्म-हाऊसच विकत घ्यायला हवे होतेस. मी : हो ना.पण काय आहे, माझी जागे बाबतची संकल्पना फार वेगळी आहे.मी सामान्य माणूस असल्याने, अन्न-वस्त्र-निवारा, अशीच माझी चढती भाजणी आहे.शेतात जर अन्नच पिकत नसेल तर शेताचा उपयोग काय? तो : अरे, तू एकदा माझे फार्म हाऊस बघायला हवेस. मी : अरे हो.नक्कीच येईन.पण हे आहे कुठेशी? तो : अरे ते ढिकणेवाडीला आहे.म्हणजे फलाणेवाडी पासून साधारण १०-१२ किमी अंतरावर. मी : अरे व्वा!!!! मग कधी जावू या. तो : आता इतक्यात तरी काही शक्य नाही.ह्या डिसेंबरला त्या टलाण्या हॉटेल स्कीम मध्ये पैसे गुंतवले आहेत ना.ते थोडे वसूल करायला गोव्याला जाणार आहे.त्यामुळे उन्हाळ्यात नक्की जावू. मी : उन्हाळ्यात मला जमेल असे वाटत नाही.कारण ह्या उन्हाळ्यात शेतात बरेच खड्डे खणायचे आहेत. तो : बघ. ही शेती म्हटली की असे अडकायला होते.म्हणूनच फार्म हाऊस घ्यायचे.आपण मनांत आले की, लगेच निघू शकतो. मी : हो ना.पण ते जावू दे.मग उन्हाळ्यात तू नक्की जाणार ना? कारण वहिनी म्हणत होत्या की, इथला उन्हळा त्यांना झेपत नसल्याने तुम्ही ह्यावर्षी युरोपला किंवा कूलु-मनालीला जाणर म्हणुन. तो : हं.ते पण आहेच म्हणा.सध्या उकाडा इतका वाढला आहे की, एक स्वयंपाकघर सोडले तर प्रत्येक खोलीत ए.सी. मी : (मनांत.आता बाथरूम आणि संडासात पण ए.सी. लावतो की काय? असेल ही.) आता आजकाल उन्हाळा जरा जास्त्च वाढला आहे. तो : अरे ह्यावर्षी आम्ही नेमके उन्हाळ्यातच फार्म-हाऊस वर गेलो होतो.आमच्या फार्म हाऊसच्या इथे रेंज मिळत नाही.खूप प्रयत्न केला पण त्या आमच्या घरगड्याशी काही संपर्क होइना.घरी पोहोचलो तर घरी कुणीच नाही.आणि शेजारचे सगळेच बंगले रिकामे.मग काय? परत फलाणेवाडीला आलो आणि तिथल्याच एका हॉटेलमध्ये जेवलो आणि तिथेच राहिलो. मी : गूड.हे मस्त.शहर जवळ असल्याचा हा एक फायदाच की. तो : हो ना.मग दुसर्‍या दिवशी आम्ही तिथे गेलो तर काय.घरात बरीच घाण.दारे आणि खिडक्या बंद असल्याने घरात कोंदट हवा.शिवाय सध्या तिथे आसपास कुणीच नसल्याने, मुख्य टाकीत पाणीच न्हवते.रखवालदार पण नेमका उशीरा आला.तेंव्हा समजले की पंप जळालेला आहे आणि सोसायटीला अद्याप सेक्रेटरी नसल्याने, तो पंप काही दुरुस्त झालेला नाही.मग त्याच्या मदतीने कसे तरी संध्याकाळी वायरमनला गाठले.वायरमन म्हणाला आधी मागच्या कामाचे पैसे द्या.मगच हात लावतो.मग काय? वायरमनला पटवून त्या दिवसापुरता पंप चालू करून घेतला.चांगले ५००/-रु दिले. अर्थात सुरुवातीला ह्या अडचणी येणारच. पाणी सुरु होता-होता रात्र उजाडली तेंव्हा समजले की, घरातील काही ट्युब लाईट चालत नाही आहेत.खरे तर मागच्या वेळीच त्या बदलल्या होत्या पण आता परत बिघडल्या.रखवालदार म्हणाला की, तिथे लाईटचे फ्लक्च्युएशन जास्त असल्याने सगळ्याच घरातील ट्यूब लाईट जातात. कसे-बसे जेवण घेतले आणि झोपायची तयारी केली...तर काय? सगळ्या चादरींना कुबट वास आणि उंदरांनी पाडलेली भोके. आता घरी झोपायचा नाद सोडला आणि परत मुक्काम पोस्ट फलाणेवाडी. आता तिसर्‍या दिवशी माझी परत एक चक्कर फार्म हाऊसवर करायचा विचार होता.पण तो दिवस समुद्र किनार्‍यासाठी राखीव असल्याने मग सरळ समूद्र किनार्‍यावर गेलो.मुले तिथेच जास्त रमल्याने मग तिथेच २ दिवस राहिलो आणि मग परत मुंबईला आलो. आता परत एकदा फार्महाऊसवर जावे म्हणतो. मी : का रे? तो : अरे मागच्या वेळी, तो पंप दुरुस्त करण्याच्या वेळी, तो रखवालदार बोलता बोलता म्हणाला की, इथल्या एका सभासदाला त्याचे फार्म हाऊस विकायचे आहे.साधारण २-३ वर्षांपुर्वी त्याने २५ लाखाला विकत घेतले पण सध्या त्याला फारच आर्थिक अडचण असल्याने, तो २२ लाखाला पण द्यायला तयार आहे.बघ तुझी इच्छा असेल तर, आपण लगेच बोलणी करू. मी : बरे मला एक सांग.हे जर ३०,००,०००/- तू बँकेत ठेवले असतेस तर तुला ह्या वर्षी किती मिळाले असते. तो : आता फिक्स मध्ये ठेवले असते तर ह्या वर्षी २,५०,०००/- नक्की.पण का रे? मी : काही नाही.इतक्या व्याजाच्या पैशांत माझी आणि माझ्या बायकोची, एक १५-२० दिवसांची कंबोडिया ट्रिप नक्कीच झाली असती. तो : अरे कंबोडिया काय बघतोस? त्यापेक्षा आमचे फार्म हाऊस बघ. आता पुढे मला काही बोलवेना.

वाचने 63844
प्रतिक्रिया 135

प्रतिक्रिया

In reply to by टर्मीनेटर

जितक्या सहजतेने फ्लॅट विकल्या जातात, तितक्या सहजतेने, जागा विकली जात नाही... त्यापेक्षा, सोने, हिरे लगेच विकल्या जाते... जागेचे असे आहे ना... पहिली पिढी लागवड, दुसरी पिढी उपभोग आणि तिसरी पिढी विकून टाकते...

In reply to by टर्मीनेटर

बायको माझ्यासारखी अल्पसंतुष्टी नाही. ती रिअल इस्टेट ब्रोकर आहे व रिअल इस्टेट मधील वकील आहे.म्हणजे इनकम टॅक्स पेयर व्यावसायिक आहे. त्यामुळे अनेक संधी सतत खुणावत असतात. हौसे ला मोल नसले तरी कॉस्ट आहे व ती सोने मोडून, पीपीएफ काढून, एफडी मोडून, नातेवाईकांकडून उसने घेउन मोजावी का? हा कळीचा प्रश्न आहे. तू सूर्यास्तांपर्यंत जेवढे चालशील तेवढी तुझी जमीन ही बोध कथा आठवते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

बायको माझ्यासारखी अल्पसंतुष्टी नाही. ती रिअल इस्टेट ब्रोकर आहे व रिअल इस्टेट मधील वकील आहे.
ह्याचा अर्थ जागा घेण्याचा हा जो काही निर्णय आहे तो घाटपांडे काकुंच्या अखत्यारीतला आहे. जर तुम्हाला काकुंच्या निर्णयक्षमतेवर विश्वास असेल तर त्यांना निर्णय घेऊ द्यावा असे म्हणेन. कदाचित काकुंचीही तिच अपेक्षा असेल. कॅलक्युलेटेड रिस्क घ्यावी लागेल.

In reply to by कानडाऊ योगेशु

आमची पीपीएफ,एफडी, कौटुंबिक सोने अशी सुरक्षित व आपत्कालीन गुंतवणूक मोडून उत्साहाच्या भरात शेतजमीन घेणे हे तारतम्य गमावण्याचे लक्षण आहे असे मला वाटते. कुठल्याही भावनातिरेक हा तारतम्य गमावण्यास कारणीभुत ठरतो. मनोविकारांचा मागोवा- ले. डॉ श्रीकांत जोशी हे पुस्तक जरुर वाचावे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

त्या मालिका बघतात का? सामान्यतः, टीव्ही वरील बातम्या आणि मालिका, बघणारी माणसे, आत्मकेन्द्रित, चिडखोर आणि भावनेच्या भरात निर्णय घेतात, हे माझे निरीक्षण आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

बायको माझ्यासारखी अल्पसंतुष्टी नाही. ती रिअल इस्टेट ब्रोकर आहे व रिअल इस्टेट मधील वकील आहे.म्हणजे इनकम टॅक्स पेयर व्यावसायिक आहे.
कर्तुत्ववान महिला ! घाटपांडे काकुंना आंतरराष्ट्रिय महिलादिनाच्या विशेष हार्दिक शुभेच्छा !

In reply to by प्रकाश घाटपांडे

घाटपांडे काका आता पर्यंत तुम्ही तुमचे आयुष्य कसे व्यतित केले आहे त्याच्याशी प्रामाणिक राहा! आयुष्याच्या उत्तरार्धात उगाच अमिताबच्चन बनण्याची गरज नाही असे वाटते. बाकी तुम्हला उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा!

In reply to by कानडाऊ योगेशु

माझ्या अल्पसंतुष्टत्व मुळे,कमीत कमी रिस्क घेण्याची प्रवृत्ती मुळेच कुटुंबात या समस्या निर्माण झाल्या आहेत. वर्कहोलिक, कर्तुत्ववान, धडाडीने काम करुन अजून काही कमवण्याची जिद्द असलेल्या लोकांना माझे जगण्याचे तत्वज्ञान हे डिप्रेसिव्ह वाटते. ये जीना भी कोई जीना है! इससे अच्छा मरना है टाईप. वर लिहिले आहेच

In reply to by प्रकाश घाटपांडे

रिस्क ला मॅनेज करता आले तर उत्तम ! किंबहुना रिस्क टाळणे हा ही रिस्क मॅनेजमेंटचा भाग आहेच. वर्कहोलिक, कर्तुत्ववान, धडाडीने काम करुन अजून काही कमवण्याची जिद्द >> ह्यातल्या रिस्क मॅनेज करुन जरुर करावे, पण टैम म्हत्वाचा! आपल्या वयात अश्या रिस्क टाळणेच उत्तम.

In reply to by प्रकाश घाटपांडे

मी सुद्धा अल्पसंतुष्ट, फारशी महत्त्वाकांक्षा नसलेला, फारशी जोखीम न घेणारा आहे. आयुष्यात जी काही थोडीफार जोखीम घेतली ती विचारपूर्वक (calculated risk) घेतलेली जोखीम होती. अत्यल्प परतावा असलेल्या गोष्टीसाठी भरमसाट किंमत मोजणे मला मान्य नाही. नाव मोठं लक्षण खोटं अशी कीर्ति असलेल्या वस्तू, उपहारगृहे इ. कितीही नामवंत असली तरी मी ती टाळतो कारण नावाच्या बडेजावापेक्षा त्याची उपयुक्तता मी जास्त महत्त्वाची मानतो. अर्थात काही अपवादात्मक गोष्टींसाठी कितीही खर्च करण्याची माझी तयारी आहे व करतो. मी भविष्यासाठी पुरेशी तरतूद करूनच खूप लवकर स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

मी सुद्धा अल्पसंतुष्ट, फारशी महत्त्वाकांक्षा नसलेला, फारशी जोखीम न घेणारा आहे. आयुष्यात जी काही थोडीफार जोखीम घेतली ती विचारपूर्वक (calculated risk) घेतलेली जोखीम होती. अत्यल्प परतावा असलेल्या गोष्टीसाठी भरमसाट किंमत मोजणे मला मान्य नाही. नाव मोठं लक्षण खोटं अशी कीर्ति असलेल्या वस्तू, उपहारगृहे इ. कितीही नामवंत असली तरी मी ती टाळतो कारण नावाच्या बडेजावापेक्षा त्याची उपयुक्तता मी जास्त महत्त्वाची मानतो. अर्थात काही अपवादात्मक गोष्टींसाठी कितीही खर्च करण्याची माझी तयारी आहे व करतो. मी भविष्यासाठी पुरेशी तरतूद करूनच खूप लवकर स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

In reply to by शाम भागवत

शाम भागवत, मला हा प्रश्न केवळ आर्थिक व्यवस्थापनाचा वाटत नसून तो मानसिक व्यवथापनाचा देखील आहे असे वाटते. किंबहूना तो त्याचा अधिक आहे असे वाटते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

तुम्ही मानसिक व्यवस्थापनाबद्दल बोलताय म्हणून लिहितोय. "अमूक अमूक" अशी स्थिती असेल तरच मी सुखी, अन्यथा मी दु:खी अशी एक अट आपण स्वत:च स्वत:ला घालून घेतो. त्यातून मग हवे नको सुरू होते. मग मात्र आपले समाधान टिकणे न टिकणे हे परिस्थितीवर अवलंबून राहाते. शिवाय परिस्थिती सतत बदलत असते व तिच्यावर १००% टक्के नियंत्रण मिळवणे कोणालाच शक्य नसते. अगदी वेगळ्या पध्दतीने बोलायचे झाल्यास, "माझी बायको धडपड करते आहे. तिच्या पाठीमागे मी पूर्ण ताकदीनिशी उभा राहीन. त्यातूनच मला आनंद मिळेल." अशी एखाद्याने स्वत:ला अट घालून घेतली असेल तर तो कितीही कष्ट झाले तरी बायकोला पाठींबा देईल आणि सुखी व समाधानी राहील. 😀 मला वाटते आपले समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकणे महत्वाचे. त्यासाठी कोणत्याही अटी नसल्या पाहिजेत. तो माणूस निर्भय असतो. सुखी व आनंदी असतो. असो. 🙏

In reply to by शाम भागवत

पहिला परिच्छेद व दुसरा यात मला विसंगती दिसते. इथे आनंदाच्या कल्पनेत व्यावहारिक गोष्ट आलेली आहे. जवळपास ९० टक्के गुंतवणूक ही रिअल इस्टेट मधे आत्ताच आहे. १० टक्के फक्त एफडी पीपीएफ सोने अशा स्वरुपात आहे. दुसरा मुद्दा येतो जगण्याचे तत्वज्ञान. आपापल्या जगण्याचे तत्वज्ञान अंगीकारायची मुभा असती तर गोष्ट वेगळी आहे. नाहीतरी तू अल्पसंतुष्टी आहेस तर तुला मिळणारे पेन्शन बास झाले बाकीच तुला काय करायचे आहे? असा मुद्दा उपस्थित होतो आहे तार्किक म्हणून तो योग्यही आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

राहण्याचे ठिकाण आणि शेत जामीन ह्या मध्ये जास्तीतजास्त २ km वर अंतर नसावे.शक्यतो घराच्या जितक्या जवळ तितके चांगले. लांब असलेल्या जमिनी वर लक्ष ठेवता येत नाही.आणि कोणी बघायला नाही असे लक्षात आले की चोरी किंवा बाकी नुकसान लोक करतात.. तिथे वेल्हे मध्ये तर तुम्ही जावून राहणार नाहीं ना. मग नकोच तो उपत्याप.

In reply to by प्रकाश घाटपांडे

तुमचे ते कमलिनी कुटीर हे खरीव गावात आहे. गावची लोकसंख्या फक्त २९२ आहे आणि फक्त ५८ कुटंब आहेत. बस स्टँड खासगी आणि सरकारी दहा किलो मीटर वर आहे. जवळ पास कोणतेच महत्वाचे पर्यटन स्थळ नाही. गाव बहुतेक डोंगरात असावे पुण्या पासून५३ km वर आहे. Zp ची शाळा सोडली तर गावात दुसरी कोणती च सुविधा नाही. जमिनीच्या सिंचनासाठी पाण्या ची व्यवस्था नाही. चांगली कनेक्टिव्हिटी नाह. सिंचन व्यवस्था आणि उत्तम कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे शेती करणे महा मुश्किल आहे. कमलीनी कुटीर सारखा उद्योग चालू करण्याचे स्वप्न असावे . बाकी मी आता माझे ठाम मत सांगतो पैसे पडलेले असतील तरी त्या गावात गुंतवणूक करू नये.. त्या पेक्षा सासवड किंवा पुण्या शेजारी अनेक उत्तम गाव आहेत तिथे शेती बघावी.

In reply to by प्रकाश घाटपांडे

हौसेला मोल नसते याची आता मला भीती वाटू लागली आहे आपली भीती अतिशय रास्त आहे शेतजमीन भागीदारीने घेणे हि फार मोठी चूक ठरेल. कारण भागीदारीतील करार करणे त्यावर अंमल बजावणी करणे आणि उद्या आपली प्रकृती बिघड्ली तर त्याची उस्तवारी कोण करणार. त्यातून एखादा भागीदार डांबरट निघाला तर सुखाचा जीव दुःखात घालणे होईल. मुळात अशा जमिनीत असंख्य हिस्सेदार असतात आणि ते काही काळाने उगवतात आणि खटले भरतात. प्रलंबित खटल्यात सर्वात जास्त कज्जे हे जमिनी संदर्भात आहेत हे लक्षात घ्या. नातेवाइकांच्यात तर भागीदारी कधीच करू नये. कारण अवघड जागी दुखणं असतं. आपल्याला लोक/ बायको घाबरट पळपुटा म्हणाले तरी चालेल पण हे विकतचं दुखणं अजिबात घेऊ नका. आपल्या पत्नीला कोणीतरी शेंडी लावत आहे अशी शक्यता आहे, त्याचा शोध घ्या आणि मुळाशीच घाव घाला. बायकोला २० लाख रुप्याच्या व्याजात ( ६% दराने १० हजार रुपये महिना) दर महिन्याला एखाद्या रिसॉर्ट मध्ये घेऊन जाणे अगदी सहज परवडेल.

In reply to by सुबोध खरे

या ४ वर्षात या प्रकरणामुळे आयुष्याचाच ट्रॅक बदलला गेला. बर्याच घटना घडल्या. या टप्प्यावर वैवाहिक आयुष्याचा समतोल बिघडून गेला. माझ्या प्रतिक्रियांमधे त्याची बीजे आहेतच. मानसिक आरोग्य,शारिरिक आरोग्य, व्यवहार, नातेसंबध यावर सखोल परिणाम झाला

मुविकाका आता ५ वर्षे झाली. एक धागा शेतीबद्दलच्या अनुभवांचा पण येऊ देत. आनंद्/कष्ट, नफा/नुकसान, खरेदी/विक्री वगैरे सगळेच

वरती काही प्रतिक्रिया बघितल्या .... फार्म हाऊस पेक्षा पैसे FD त टाकावे वगैरे वगैरे ... स्वतःचे फार्म हाऊस असणे हा आनंदाचा भाग असतो .... मी तो मुक्तपणे अनुभवाला आहे ... मित्रांबरोबर FD certificate बघत बसायचे का ? ज्याला शक्य आहे त्याने जरूर फार्महाउस घ्यावे ... अर्थात त्यासाठी आर्थिक तसेच मानसिक ताकद लागते बाकी काय लिहू ... अंगी नाही बळ दारी नाही आड .... त्याने फुलझाडं लावू नये

In reply to by अमर विश्वास

कृपया प्रतिसाद नीट वाचा. फार्म हाउस घेउ नये असे म्हटलेले नाही. तुम्ही उपभोग घेणार असाल तर जरुर विकत घ्या, नपेक्षा डेड इन्वेस्ट्मेंट होईल हा मुद्दा आहे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

पानशेतला फार्महाउस होते .... १५ लाखाला घेतले ... सात वर्ष भरपूर आनंद घेतला आणि ३० ला विकले ... सात वर्षात दामदुप्पट ... FD पण देत नाही योग्य ठिकाणी घेतलेले फार्महाउस ही पण एक इनेव्हस्टमेन्ट आहे ... नीट प्लॅन करा नक्की फायदा होईल

हौसेला मोल नाही.आवड असेल तर व्यक्ती पैसे किती लागतील,फायदा होईल की नुकसान असला किरकोळ विचार करत नाही. नाही तर कर्ज काढून कार घेणारे पेट्रोल चे दर वाढले म्हणून कार चा वापरच करत नाहीत. आणि जे खरोखर हौसी आहेत ते असला हिशोब करत बसत नाहीत. लग्नाची हौस आहे तर बायको वर किती पैसे खर्च होतील असा विचार करणाऱ्या लोकांनी ह्या भानगडीत पडूच नये.

In reply to by Rajesh188

नीट उपभोग घेणार असाल तर त्या गोष्टीत हात घालावा--लग्न ही सुद्धा एक गुंतवणुकच आहे, आणि ती डोके जागेवर ठेवुन करावी आणि निभावावी लागते.

हौस ही जास्तीच्या पैशांमधून करायची असते ... जास्तीचा पैसा म्हणजे काय ? १. रोजच्या खर्चाची सोय २. liabilities कव्हर करायला लागणारा पैसा (यातच ऍसेट बनवण्यासाठी लागणारा पैसा पण आला ) ३. आपत्कालीन निधी ह्या तीन गोष्टी साध्य झाल्या कि उरलेला पैसा हा हौसेसाठी वापरायचा ... तेंव्हा अशी किती रक्कम खरेच खर्च करू शकता ते बघा आणि शक्य असेल तर बिनधास्त पुढे जा ... अनेकदा पुढील आयुष्याची तरतूद करायच्या नादात आज जगायचे राहून जाते ...

आमच्या खापरपणजोबा/पणजोबा/आजोबांची काही एकर जमीन होती म्हणे. १९४८ नंतर कुळाने ती धाक दाखवून बळकावली. परंतु सातबारा उताऱ्यावर आजोबांचे व त्यांच्या एका चुलतभावाचेच नाव होते. कालांतराने तिथे साखर कारखान्याची योजना येऊन आमची जमीन साखर कारखान्यासाठी राखीव झाली. साखर कारखान्याने जमिनीचे मूळ मालक शोधून त्यांना सभासद करून घेतले. त्यामुळे वडील व त्यांच्या चुलतभावाचे कुटुंब कागदोपत्री सभासद झाले. अनेक वर्षे कारखाना उभाच राहिला नाही. त्यामुळे शेवटी कारखान्यासाठी राखून ठेवलेली जमीन मूळ मालकांना परत दिली. तोपर्यंत आमची अनेक चुलत घराणी वाढली होती. एकूण ७-८ वारस होते. त्यातील प्रत्येकाला १ ते ३ एकर जमीन मिळाली. काही वर्षांपूर्वी जमिनीवर नाव लावून घेण्यासाठी सर्व वारस प्रयत्न करीत असताना मी वडीलांना त्यात न पडण्याचा सल्ला दिला. एक तर ती जमीन पुण्यापासून किमान १०० किमी दूर असलेल्या गावात आहे. वडील निवृत्त व काही आजार होते. जमिनीसाठी सतत तिथे जाणे खूप दगदगीचे होईल. ती जमीन अनेक दशके पडिक असल्याने लागवडीयोग्य नाही. मागील ३ पिढ्यांनी शहरात वास्तव्य केल्याने शेतीची शून्य माहिती आहे. वडिलांना निवृत्तीवेतन असल्याने पैशाची आवश्यकता नाही. नियमानुसार किमान १० वर्षे जमीन विकता येणार नाही. त्या ३ एकर जमिनीची किंंमत फारशी नसेल. परंतु जमीन मिळविणे व नंतर ती सांभाळणे यात प्रचंड दगदग आहे आणि आर्थिकदृष्ट्या त्याची गरज अजिबात नाही, हे वडिलांना पटले. जमिनीवर दावा करायलाच नको, म्हणजे पुढचे ताप होणार नाहीत हे सुद्धा पटले. परंतु इतर वारसांच्या प्रचंड आग्रहामुळे त्या गावात अनेक फेऱ्या मारून शेवटी जमीन मिळाली. नंतर एक स्थानिक माणूस घरी आला. मी तुमची जमीन कसतो, दरवर्षी ठराविक उत्पन्न, धान्य वगैरे देईन असे आमिष दाखविले. ती जमीन पडिकच राहू दे असे मी वडिलांना सुचविले. परंतु भावाने त्या प्रस्तावात रस दाखविला. मी शहाणपण दाखवून मला त्या जमिनीत अजिबात रस नाही हे सांगून टाकले. जमीन साफ करून लागवडीयोग्य करणे, विहीर खणणे, मोटार लावणे अशा कारणांंखाली त्या माणसाने सर्वांकडून बरेच पैसे उकळले. दर महिन्यातून एकदा भाऊ त्या गावाला चक्कर मारतो. मागील ५-६ वर्षात भावाने त्या जमिनीत भरपूर पैसे घालविलेत, पण एक रूपया सुद्धा परत मिळालेला नाही. जे शहरात राहतात व भविष्यात शहरातच राहणार आहेत त्यांनी गावाकडील शेती, फार्म हाऊस वगैरे भानगडीत पडून पैसे अडकवू नये, हे माझे वैयक्तिक मत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

ही कामे, जमीन भाड्याने घेणार्याने करायची असतात... फक्त पक्की भिंत बांधण्याचा खर्च, मालकाने करायचा असतो..... जमीन साफ करून लागवडीयोग्य करणे, विहीर खणणे, मोटार लावणे..... ह्याच साठी, किमान 25-30 वर्षांचा करार करायचा असतो ... सध्या एके ठिकाणी, अशीच भाड्याने शेती करण्याचा विचार करत आहे...कायदेशीर बाबी आणि आर्थिक बाबतीत, मी आणि जमिनीचे मालक, ह्यात चर्चा सुरू आहे... मी 99 वर्षांचा करार करायचा प्रयत्न करत आहे... कारण, जितका करार लांबेल तितका दोघांचाही फायदा होईल...

In reply to by मुक्त विहारि

आमच्या भागात दोन तीन वर्षाच्या वर कोणी शेती कसायला देत नाही.आणि कधी शेता मधून बाहेर काढण्याचा हक्क मालक राखून ठेवतो. तुम्हाला ३५ वर्ष भाड्याने शेती देणारा माणूस मिळाला आहे. वाचावे ते नवल च.

In reply to by Rajesh188

वाळवंट ते बर्फ, सगळे नमुने भेटतात... कधी शेता मधून बाहेर काढण्याचा हक्क मालक राखून ठेवतो.. ते पण आहेच, म्हणून तर, Long term agreement, करायचे असते... शेती ही लग्नासारखी गोष्ट आहे, जितकी जास्त दिवस टिकेल तितकी फळत जाते... दोन घडीच्या डावात, कुणालाच Long term benifits मिळत नाहीत...

In reply to by मुक्त विहारि

जे शहरात राहतात व भविष्यात शहरातच राहणार आहेत त्यांनी गावाकडील शेती, फार्म हाऊस वगैरे भानगडीत पडून पैसे अडकवू नये, हे माझे वैयक्तिक मत आहे. +१ दुकान भाड्याने दिले तर २० हजार महिना मिळेल असे वडिलानी सांगितले नी ह्या आशेवर मी खिशातले नी कर्ज काढून १५ लाख घालून दुकान नि घर बांधले. गेल्या ३ वर्षापासून वडिलांनी एकही भाडेकरू दुकानात घुसू दिला नाहीये, दुकान तसेच पडून आहे. नी वरचा मजला भाड्याने देऊन ६ हजार रुपये स्वत ठेवताहेत. मला मिळाले तर काही नाही पण गेली ३ वर्षे एचडीएफसी बँकेचा १०७८० रुपयाचा हफ्ता नियमित भरतोय. :(

मुविकाका मला टेरेस फार्मिंग बद्दल काही माहिती हवी आहे. तुम्हाला व्य् नि करतो. कृपया मार्ग दर्शन करावे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कुठे राहतोस? पुणे की नाशिक? दोन्ही ठिकाणी, आपलेच मिपाकर मदत करतात...

त्याची काही करणे देत आहे १), बाजारात कोणी किती दावे केले तरी शुद्ध बी वापरून बिलकुल रासायनिक खत ,कीटक नाशक न वापरता अतिशय उत्तम दर्जा चे अन्न धान्य उपलब्ध नाही. २) आपण व्यवहारीक विचार न करता(health is wealth) स्वतःच्या शेत जमिनीत आपल्याला जसे शुध्द अन्न धान्य हवं तसे उत्पादन घेवू शकतं ३) पैसे कमविणे शेती मधून हा हेतू ठेवून नाही करायचं ४) शेती मधून लाखो रुपये कमविणे खूप लोक आहेत (सर्व शेतकरी गरीब हे विसरा)पण त्या साठी आवड आणि कष्ट करण्याची तयारी हवी. घरात एसी मध्ये. बसून ते शक्य नाही. ५) शहरात ठरवून पद्धती चे जीवन जगणाऱ्या लोकांनी त्या नादाला लागू नये. नी स्वतः कोणता ही हिशोब न ठेवता वर्ष भर पुरेल एवढे ज्वारी,बाजरी,शेंगदाणे,हरभरा, मूग,उडीद,चवळी,घेवडा, मिरची,भात अगदी नैसर्गिक रित्या पिकवतो आणि तेच वापरतो . जीवन जगण्यासाठी आर्थिक गरज नोकरी आणि व्यवसाय मधून भागवली जाते. शेती फक्त आरोग्य वर्धक आहार साठी.

शेती पहावी करुन- श्रीनिवास पंडित शहरी माणसांना खेड्याबद्दल, शेतीबद्दल एक अनामिक आकर्षण असतं. मोकळी हवा, मोकळा ढाकळा निसर्ग, संथ जीवनशैली, डोलणारी शेतं, शेतावरचं चंद्रमौळी घर, रात्रीचं पिठूर चांदणं अशा अनेक आकर्षणामुळे अनेकांना खेड्यात जाऊन राहावं, शेती करावी, शहरातील चाकोरी मोडून जगावं असं वाटत असतं. नोकरी-धंदा करून हाताशी जादा पैसा आला की, तीव्र होत जाते. पण शेती करणं हे काय दिव्य असतं हे बहुतेकांना माहीत नसतं. एक शहरी माणूस आपल्या सर्व रोमँटिक कल्पनांसह शेती करू लागल्यानंतर काय काय घडतं, शहरी समज, कल्पना यांची कशी वासलात लागते? शेती करण्याच्या विचाराने हुरळून गेलेला माणूस नंतर कसा हबकून जातो ? या साऱ्या अनुभवाने त्यात काय बदल होतो? … लेखकाने संवेदनशीलतेने मांडलेला स्वतःचा अनुभव! संगीत, साउंड डिझाईन: अक्षय वैद्य, रेकॉर्डिंग स्टुडिओ: युफोनी स्टुडीओ, पुणे https://snovel.in/product-details/26/sheti-pahavi-karun

In reply to by प्रकाश घाटपांडे

शेती कशासाठी करत आहात? हे जाणून घेतले की त्रास कमी होतो

In reply to by मुक्त विहारि

शेती कशासाठी करत आहात? हे जाणून घेतले की त्रास कमी होतो
अगदी १००% सत्य ! मुळात पोटापाण्यासाठी शेती करावी , तेही शहरातील मस्त ए.सी. मध्ये खाऊन पिऊन सुखी दर महिन्याला सॅलरी देणारी नोकरी सोडून करावी हे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेण्यासारखे आहे ! आमच्या सातार्‍यात एक म्हण आहे - अती शिक्षण भिकेचे लक्षण ! =)))) मुळात गावाकडे जाऊन दोन वेळच्या मीठभाकरीची चिंता करावी लागत असेल तर त्यापेक्षा शहरात बसुन, मोबाईल वर ऑर्डर देऊन, क्रेडिट कार्ड ने बिल भरुन, पिझ्झा बर्गरची ऑर्डर अजुन कशी आली नाही ह्याची चिंता करणे खुप सोप्पे आहे ! गावाकडे जायची इच्छा आहे पण तिथे गेल्यावर काहीही ... अक्षरशः का ही ही करायची ईच्छा नाहीये , बस्स नुसते पडून रहाणे ... मीठभाकरीची चिंता नाही की डोक्यावर छपराची चिंता नाही ... देह जावो अथवा राहो | पांडूरंगी दृढभावो || असे काहीसे व्हायला हवे ! अर्थात त्यासाठी आधी शहरात राहुन पैशाची शेती करु गच्चम. कॉर्पोरेट पॉलिटिक्स् पाहुन, जातीय , विशेशः ब्राह्मणद्वेषाने भरलेले राजकारण पाहुन , कलेक्टर ऑफिस पासुन ते कोपर्‍याकोपर्‍यावरील आर.टी. ओ मध्ये भिनलेला भ्रष्टाचार पाहुन , शहरातील लोकांची स्वार्थी वृत्ती, अगदी भडजीपासुन ते भिकार्‍यापर्यंत , कामवाल्या बाई पासुन ते अगदी कोडर पर्यंत, सर्वांचीच स्वार्थी वृत्ती, विनाकारण चाललेला निरर्थक सव्यापसव्य पाहिला की उबग येतो, सगळं सोडून जावेसे वाटते, कोठेतरी एकांतात बसुन तुकोबांच्या सारखे नामस्मरणात तल्लीन होऊन जावेसे वाटते , अन नेमके तेव्हाच शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांना लिहिलेलया पत्रातील काही वाक्ये आठवतात अन धीर धरुन आहे हे रुटीन चालु ठेवतो - "हे कार्य करावयाचे दिवस हायेती . वैराग्य तो उत्तरवयीं कराल तो थोडे. आज पराक्रम करुन आम्हांस तमासे दाखविणे !" असो. तात्पर्य इतकेच की योग येईल तेव्हा गावाकडे जाईन हे निश्चित पण शेती बिती ची भानगड नाही हे ही काळ्या दगडावरची रेघ !

In reply to by प्रसाद गोडबोले

कोठेतरी एकांतात बसुन तुकोबांच्या सारखे नामस्मरणात तल्लीन होऊन जावेसे वाटते , अन नेमके तेव्हाच शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांना लिहिलेलया पत्रातील काही वाक्ये आठवतात अन धीर धरुन आहे हे रुटीन चालु ठेवतो - "हे कार्य करावयाचे दिवस हायेती . वैराग्य तो उत्तरवयीं कराल तो थोडे. आज पराक्रम करुन आम्हांस तमासे दाखविणे !" सहमत! एकदा धोंडा पाडून घेतलेली भक्ती!

In reply to by प्रकाश घाटपांडे

शेती पहावी करुन - श्रीनिवास पंडित हा मूळ लेख अनुभव मासिकातील आहे. तो समकालीन प्रकाशन चा. हे ऐकण्यासाठी स्नोवेल ऎप डाउनलोड करुन घ्यावे लागेल व त्याचे सदस्य व्हावे लागेल. पण स्नोवेल वर चांगली ऑडिओ बुक्स आहेत हा श्राव्य स्वरुपातील लेख मला आवडला. त्यात वेगवेगळे दृष्टीकोन घेतले आहेत.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आर्थिक, वेळ आणि कष्ट , वाया गेले तरी चालतील, ही मानसिक जडणघडण असेल तर आणि तरच, शेती हा पुर्णवेळ व्यवसाय म्हणून निवडला पाहिजे

In reply to by प्रकाश घाटपांडे

कारण, मला काय करायचे आहे? हे मला माहिती आहे ... शिवाय, आता खूप काही माहिती नको आहे... मी बरा आणि माझी हळद बरी

In reply to by मुक्त विहारि

मी त्या दृष्टीने म्हणत नाही. मला फक्त तुम्ही प्रतिक्रिया ही लेख वाचून/ ऐकून दिली आहे का हे जाणुन घ्यायचे होते बाकी काही नाही.

हा धागा वर आला वाटते ... सध्या जीवनात फारच स्थैर्य आल्यामुळे परत एकदा फॉर्महाऊस घ्यायचा किडा मूळ धरू लागला आहे .. बघूया काय होते ते...

"फक्त शेतजमीन घेउन त्यावर हौसेपोटी फार्महाउस बांधणे एवढेच अपेक्षित. त्यापासून कुठलेही उत्पन्न अपेक्षित नाही. हौसेला मोल नसतेचा मुद्दा" आणि "... धडाडीने काम करुन अजून काही कमवण्याची जिद्द असलेल्या ... " ह्यात विरोधाभास आहे. ९०% असेट १.५ कोटीच्या रो हाऊसमध्ये आहेत, आणि १०% (म्हणजे फक्त ~ १५ लाख ) सोने, ppf , FD ह्यात आहेत. साठवलेले सगळे पैसे, दागिने खर्च करून आणि नातेवाईकांकडून पाच लाख उसने घेऊन जागा घेणार? त्यावर फार्महाउस बांधण्यासाठी आणखी पैसे कुठून आणणार? हे सर्व कुठल्याही उत्पन्नही अपेक्षा ना करता फक्त हौसेसाठी? फार्महाउस बांधून झाल्यावर त्यातून उत्पन्न नसेल तर नातेवाईकांचे पैसे कसे फेडणार? फार्महाऊसच्या मेंटेनन्स चे पैसे कुठून भरणार? आणि सगळे पैसे संपवून, वर कर्ज घेऊन, त्या फार्महाऊसमध्ये बसले असताना हार्ट अटॅक आला किंवा इतर गंभीर आजार झाला तर दहा एक लाखांना फोडणी बसू शकते. ते कसे निस्तरणार? एक capital gain देणारी गुंतवणूक म्हणून सुद्धा ही इतक्या लांबच्या आडगावची जागा येत्या १५-२० वर्षात mutual fund वगैरेंपेक्षा जास्त रिटर्न्स देईल असे वाटत नाही. आणि जरी देत असेल तरी, ह्या वयात आपले सर्व liquid assets खर्च करून, वर कर्ज घेऊन त्यात घालणे शहाणपणाचे नाही. काकूंचं कुणीतरी जबरदस्त ब्रेनवॉशिंग केलं असावं. त्याशिवाय तारतम्य इतके गमावणे कठिण आहे. I hope तुम्ही ह्यातून हात जास्त पोळून घेतले नाहीत.

In reply to by अगम्य

व्यवहार होण्याच्या अगोदर मी घाई घाईत 19 मार्च 2021 रोजी सायकियाट्रिस्टची मदत घेतली पण काही उपयोग झाला नाही. सायकियाट्रिस्ट कडे मी खालील मुद्दे चर्चे साठी नेले होते 1) गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. आपल्या व्यवहारज्ञान असलेल्या मित्रमंडळी हितचिंतकांचा सल्ला घ्यावा. किमान 20 लाख ही रक्कम शेती व फार्महाउस साठी घालावी का? 2) 20 लाखाच्या व्याजातून वेगवेगळ्या फार्महाउसला तुम्ही भेटी देउन राहू शकता हा मुद्दा ही विचारात घ्यावा. 3) ज्यांनी शेतजमीन घेउन फार्महाउस बांधले आहे त्यांचे अनुभव काय आहेत याचा आढावा घ्यावा 4) ज्यांनी डेव्हलपरकडून फार्महाउस घेतले आहे त्यांचा ही सल्ला घ्यावा 5) या प्रस्तावातील Hard Liquidity चा विचार करावा 6) यातून आपल्याला उत्पन्न तर काहीच नाही उलट यावर खर्चच करायचा आहे. त्यामुळे ही असेट न ठरता लायेबिलिटी तर ठरत नाही ना? हा मुद्दाही विचारात घ्यावा. 7) हौसेला मोल नसते पण कॉस्ट असते त्यासाठी आपण काय किंमत मोजतो आहोत? 8) हा मुद्दा हौसेचा किती? प्रतिष्ठेचा किती? व महत्वाकांक्षेचा किती? 9) मला स्वत:ला यात काडीचाही रस नाही व मला त्यात आनंद नाही त्यामुळे माझा सहभाग असणार नाही हा मुद्दा 10) दिलिप कुलकर्णी या पर्यावरण प्रेमी ने केलेल्या शेतीत त्यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांच्याकडे महिनाभर राहून मग शेतजमीन विकत घेण्याचा विचार करावा 11) आत्ताच आपली अंदाजे 90 टक्के असेट हे रिअल इस्टेट मधे आहे व 10 टक्के सोने पीपीएफ एफडी अशा स्वरुपात आहे याचा विचार करावा 12) गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली अशा प्रकारे हा प्रस्ताव काम करेल का याचा विचार करावा 13) आपण आपली बेल्हे ता. जुन्नर येथील वडिलोपार्जित 16 एकर शेती व घर मेंटेन होत नाही व तोट्यात जाते तसेच भाउबंदकी व गावकी सांभाळणे जड जात असल्याने विकली आहे हे ही लक्शात असू द्यावे 14) उत्साहाच्या भरात यात अव्यवहार्यपणा होत नाही ना याचाही विचार करावा. 15) फार्म हाउस की नुसतीच हौस http://www.misalpav.com/node/36570 या मिसळपाव संकेतस्थळावरील लेख व चर्चा विचारात घ्यावी. मी ही चर्चा बायकोला अगोदरच दाखवली होती पण ती जमीन बायकोने घेतली व नंतर तिथे स्थानिकांनी पाय टाकू दिला नाही.तेथील गायकवाड नावाचा इसम ताबा घेउ देईना तुमचा व्यवहार हा बेकायदेशीर आहे. ही महार वतनाची जमीन आहे. आमची वहिवाट हक्क त्यात आहेत. तुम्ही वकील असलात तरी तुम्हाला फसवून हा व्यवहार केला गेला आहे. तुमचे माझे वैयक्तिक भांडण नाही पण आम्ही तुम्हाला कंपाउंड टाकू देणार नाही. त्याने पोलिस स्टेशनला लेखी तक्रार केली. ऎट्रॉसिटी लाउ अशीही धमकी दिली. शेवटी ज्या एजंटला 3 टक्के कमिशन देउन व्यवहार केला तो ही साथ देईना. मग दुसर्‍या गुंडवजा एजंट्कडून ती जमीनी त्याच्या क्लायंटला देउन त्याने जवळ 10 -12 किमि दुसरी दिली. अजूनही बर्‍याच भानगडी झाल्या. सध्या माझे वैवाहिक जीवन पणाला लागले आहे

In reply to by प्रकाश घाटपांडे

सध्या माझे वैवाहिक जीवन पणाला लागले आहे
बापरे. अवघड आहे. काळजी घ्या. ब्राह्मणांनी महाराष्ट्रात , विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात जमीन घेणे म्हणजे आपण इतिहासातून काहीच शिकले नसल्याचे द्योतक आहे ! मध्यंतरी मीही विचार करत होतो जमीन घ्यायचा पण मनुस्मृती की पराशर स्मृति मध्ये हा श्लोक वाचनात आला ब्राह्मणस्य हि देहोऽयं क्षुद्रकामय नेष्यते। कृच्छराय तपसे चेह प्रेत्यानन्तसुखाय च ॥ शेती , पशुपालन , संपत्ती संचय , देहोपभोग आदी तत्सम क्षुद्र कामांसाठी ब्राह्मणाचा देह नाही. आमची आपली अंधश्रध्दा ! तस्मात् मी शेतजमीन घेण्याचा विचार रहित केला. आता जमीन घेतली तर स्वतः खुद्द जातीनिशी तिथं जाऊन राहता येणे शक्य असेल तेव्हाच तेही अशी जमीन की जी कोणत्यातरी देवस्थानाच्या पुजाऱ्यांची असेल . कोणाचीतरी बळकावली , हिसकावून घेतलेली , घरे जाळून मिळवलेली , कोणाचाही तळतळाट लागलेली जमीन नकोच आपल्याला ! आणि तिथे गेलो तरी शेती पशुपालन नाही करणार हे मात्र ठाम निश्चित ! ते आपले कर्मच नव्हे.

In reply to by प्रसाद गोडबोले

हा आमचा पिढिजात व्यवसाय होता. आजोबा गावचे पाटील होते. त्यानंतर चुलते. माझे शिक्षण व संगोपन गावीच झाले. त्यामुळॆ शेती वर गडी माणसे व राबता होता. घराण्याचा व शेतीचा र्‍हास मी नंतर पहात आलो आहे. शेवटी भावकी व गावकी झेपेना म्हणून माझ्या वाटेची १६ एकर टप्प्या टप्प्याने विकली. पुण्यात आल्यावर तोट्यातील शेती झेपेना . घराण्यात कोर्ट केसेस जास्त. मग मी बाहेर पडलो यातून

In reply to by प्रकाश घाटपांडे

पुरेशी मसलपॉवर व मनीपॉवर नसेल तर आपण जेथे राहणार नाही तेथे घर, शेतजमीन, शेतघर वगैरे घेणे टाळावे. शहरात राहून आपण तेथे पुरेसे लक्ष देऊ शकत नाही व आपल्या अनुपस्थितीत तेथे काय होईल त्यावर आपले काहीही नियंत्रण नसते.

जे झालं ते काही चांगलं झालं म्हणता येणार नाही. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर तुमच्या एकूण asset पैकी फक्त १०% asset ह्यात गुंतले होते. इतका चढ उतार तर mutual fund मध्ये गुंतवलेल्या रकमेत सुद्धा येऊ शकतो. नशिबाने तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जागा मिळाली आहे. उलट मी तर म्हणेन की त्या जागेत बांधकाम वगैरेवर खर्च करायच्या आधीच तुम्ही थोडक्यात सुटलात. आता ती दुसरी जागा लवकरात लवकर विकून जितके पैसे हातात येतील ते घ्या, बुडलेले अक्कलखाती गेले असे समजा, अगदी सगळे गेले तरी हरकत नाही. आणि शेत, जमीन वगैरे बाबतीत कानाला खडा लावा. तुमचे रो हाऊस हा अतिशय उत्तम asset आहे. ती जागा नुसतीच विकू नका. ती जागा redevelopment ला दिली तर बिल्डरकडून तुम्हाला त्या जागे एवढेच चार फ्लॅट तरी मिळतील (माझा अंदाज चु भू दे घे) . त्यातले दोन विकून,त्या रकमेचे व्याज, आणि इतर दोन फ्लॅटच्या भाड्यावर तुम्ही अगदी चैनीत आणि भविष्याच्या चिंतेविना जगू शकाल. त्यामानाने हे वीस लाख म्हणजे दर्यामे खसखस. पुण्याच्या रचना रानडे बाईंचे financial planning चे youtube व्हिडिओज चांगले असतात. त्यांना भेटून किंवा त्यांच्याकडून कुठल्या चांगल्या financial advisor (जो फक्त सल्ल्याचे पैसे घेतो, त्या धनदा सारखा तुमचे पैसे स्वतः घेऊन गुंतवत नाही) चा contact घेऊन त्याला भेटा. वैवाहिक सहजीवनात दोघांकडून कुठल्या ना कुठल्या चुका होतातच. विल स्मिथ च्या बायकोने आणि हिलरी क्लिंटनच्या नवऱ्याने भलभलत्या चुका केल्या होत्या तरी ते एकत्र आहेत. त्यामानाने ही financial चूक काहीच नाही. वेळ आली असेल तर अंदाज पार गंडतो, भूल पडते, बुद्धी उलटीच चालते. हे भल्याभल्यांच्या बाबतीत होतं. मागे वळून बघताना आपण हा असा विचार केलाच कसा असं वाटतं. पण त्यावेळेला तसे होणे ह्याला पर्याय नसतो. हा निर्णय एक बौद्धिक/ मानसिक अपघात समजा आणि पुढे व्हा. तुमच्या वैवाहिक आयुष्याची नौका ह्यातून व्यवस्थित तरून पुढचं आयुष्य मजेत एकत्र जगाल अशी शुभेच्छा!

In reply to by अगम्य

ती जमीन घेतल्यावर 2023 साली रो हाउस 1सीआर 60 लाखला विकले. पैसे दोघांच्या नावावर निम्मे निम्मे केले. एक छोटा फ्लॅट व कॅपिटल गेन बॉंड मधे पैसे गुंतवले. कागदावर रो हाउस ची किंमत फक्त 8 लाख होती. कॆपिटल गेन प्रचंड होता. वस्त्तुत; भाडेकरु चांगले होते. त्यांची नर्सरी होती. भाडे त्यांना व आम्हाला परवडेल असे 25 हजार होते. उत्तम सांभाळत होते. ते जो पर्यंत आहे तो पर्यंत विकायचे नाही. त्यांनी नर्सरी बंद केली की विकायचे असे तत्वत: ठरले होते. पण बायकोने मागे लागून ते विकायला भाग पाड्ले. तसेही तीच ते सांभाळत होती.शेजारच्यानेच घेतले त्या मुळे त्याचाही स्वतंत्र मोठा बंगला झाला. बायकोच्या जगण्यातील मूल्यातच अलिकडेच मोठा फरक झाला आहे. समाजवादी विचारातून भांडवल वादी विचारांकडे अत्यंत वेगाने प्रवास झाला. उशीरा सुरु केलेल्या व्यवसायात खूप कमी वेळात भरभरुन पैसा मिळाल्यावर जगण्यातील मूल्यात फरक वेगाने पडला.समाजवादाच्या नादाला लागून मी उमेदीचे आयुष्य वाया घालवल असे ती म्हणू लागली. पैसा हेच सर्वस्व आहे व पैशावरच जग चालते हे मला आयुष्यात फार उशीरा कळाले असे ती आता म्हणू लागली. तू खेड्यात असला तरी संपन्न कुटुंबात जन्माला आल्याने तुला कमतरता ही काय चीज आहे हे माहीत नाही. आम्ही एका खोलीत दिवस काढलेत. म्हणजे थोडक्यात आयुष्याचा पसारा हा जगण्याच्या तत्वज्ञानाशी निगडीत आहे. कमतरतेचा सूड अतिरिक्त संचयाने घेतला जातो. लग्नानंतर 7 वर्षांनी तिने नोंदणी खात्यातील सरकारी नोकरी्चा राजीनामा दिला होता. पेन्शन मिळेपर्यंत तरी 20 वर्षे करायला हवी होती असे मत तिने अलिकडे व्यक्त केले. त्याबद्दल रुखरुख वाटू लागली. बरे झाले नोकरी सोडल्या नंतर काही काळाने तरी रिअल इस्टेटच एजन्सी चा व्यवसाय केला नुसते डॉक्युमेंटेशन रजिस्ट्रेशन केले असते तर एवढा पैसा मिळाल नसता. नोकरी च्या कितीतरी पट कमावले आहे यात ही वस्तुस्थिती पण तिने बोलून दाखवली खरे तर यावर एक स्वतंत्र मोठा लेख होईल त्यात मानसिक आरोग्य, वित्तीय आरोग्य, अनिश्चितता, शारिरिक आरोग्य असे विषय येतील. ही केवळ माझ्या घरातील समस्या नसून सामाजिक प्रश्न आहे पाहू या कसे जमते लिहायला. इथे फार त्रोटक लिहिले आहे

तुमच्या वैयक्तिक बाबतीत शिरत नाही. पण एक विचारसरणी म्हणून भांडवलवादी विचार काही गुन्हा नाही. मेहनत आणि बुद्धीचा वापर करून कर्तृत्त्व गाजवणे, कायदेशीरपणे भरपूर पैसे कमावणे आणि त्या पैशाचा उपभोग घेत सुखात राहणे ह्यात काही चूक नाही. एखाद्याला निष्क्रिय बसून गरीब राहण्यापेक्षा उद्योग करून श्रीमंत होऊन मजेत राहावेसे वाटत असेल, आणि त्या motivation मुले तो कष्ट, उलाढाली करत असेल तर it is a healthy mindset . पण motivation आणि greed आणि recklessness ह्यातली सीमारेषा पुसट, आणि व्यक्तिसापेक्ष असू शकते. ह्याउलट माझ्या माहितीतले गांधीवाद, classless society, oppression, bourgeoise वगैरे बाता मारणारे लोक आपल्या कर्तृत्त्वशून्यतेला समाजवाद, साधी राहणी उच्च विचारसरणी वगैरे मुलामा देतात. रेल्वेत AC डबा किंवा विमानात बिझनेस क्लास फ्री अपग्रेड मिळत असेल तर टुणकन घेतात! एक वास्तुपुरुष म्हणून मराठी सिनेमा आला होता. त्यात सदाशिव अमरापूरकरने केलेलं पात्र बघण्यासारखं आहे. असो. हा एक मूळ विषयापासून tangential फिलॉसॉफिकल फाटा झाला.

In reply to by अगम्य

पण motivation आणि greed आणि recklessness ह्यातली सीमारेषा पुसट, आणि व्यक्तिसापेक्ष असू शकते.
हाच तर तो कळीचा मुद्दा आहे. टॉलस्टायची गोष्ट माहित आहे ना! जेवढे धावशील तेवढी तुझी जमीन, बाकी सर्व मुद्दे मान्यच आहेत. माझा मनोनाट्य हा धागा वाचलात का? याच्याशीच संबंधीत आहे
तुमच्या वैयक्तिक बाबतीत शिरत नाही.
वर मी अगोदरच डिक्लिअर केले आहे की या कडे सामाजिक बाब म्हणून पहावे. अनेक सामाजिक प्रश्न हे सुरवातीला वैयक्तिक वा कौटुंबिक असतात. सामाजिक मानसिक आरोग्याचे प्रश्न असे कोंडी फोडूनच बाहेर आले आहेत. मानसिक आरोग्यातील स्टिग्मा हा लेख ही वाचा समाजवादी विचारसरणी ही सुरवातीच्या आयुष्याचे एक मूल्य म्हणून होते ही वस्तुस्थिती फक्त मी मांडली आहे. तीच कशी बरोबर व इतर चूक असे मी म्हटले नाही.

तुमचे हे लेख आधी वाचले नव्हते. आता वाचले. छान लिहिले आहे. >>समाजवादी विचारसरणी ही सुरवातीच्या आयुष्याचे एक मूल्य म्हणून होते ही वस्तुस्थिती फक्त मी मांडली आहे. तीच कशी बरोबर व इतर चूक असे मी म्हटले नाही. >> "समाजवादी विचारातून भांडवल वादी विचारांकडे अत्यंत वेगाने प्रवास झाला." ह्यातला "प्रवास" म्हणजे जणू तुम्हाला अधःपात वाटतो आहे असा माझा (चुकून) समज झाला. म्हणून मी विचारसरणी बाबत प्रतिक्रिया लिहिली. पण तुमचं बरोबर आहे. तुम्ही कुठल्या विचारसरणीला बरोबर/चूक असे म्हटले नाही.