पद्मावत: खिलजी वि. उसूल

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
13 Oct 2020 - 4:50 am

इतिहासातील राजे वा राण्या यांच्यावरचे सगळे चित्रपट एकत्र केले तर हे सिद्ध होते की पुढच्या २००-३०० वर्षांत भारतावर जी परकीय आक्रमणे झाली त्याबद्दल त्या त्या चरित्रनायकाला सगळी कल्पना होती. मुघलांची रणनीती, ब्रिटिशांचे कारस्थान, भारतातील सगळे राजे एक झाले तर वगैरे वगैरे. पण प्रत्येक वेळेस "इतर" राजांना ते समजले नाही. म्हणून देश पारतंत्र्यात गेला.

या चित्रपटाने उसूलांची सर्व रेकॉर्ड्स मोडली आहेत. पूर्वी ७० च्या दशकात एका चित्रपटात फार फार तर २-३ उसूल असत. इथे उसूलांमधून इतर संवाद शोधावे लागतात. यातले बरेचसे उसूल दिग्दर्शकाने शाहिदच्या कॅरेक्टरला वेळोवेळी वापरायला दिले आहेत. मधेअधे जर खिलजी हातात सापड्ला तर ते वापरायचे. व्हिडिओ गेम्स मधे लोक "लाइव्ह्ज" वापरतात तसे इथे उसूल कामी येतात.

पण त्याव्यतिरिक्त या पिक्चरमधल्या लोकांचा एक अंब्रेला उसूल असा आहे की कोणतीही गोष्ट करताना किंवा न करताना राजपूत लोक ती का करतात किंवा करत नाहीत हे करारी चेहर्‍याने सांगणे. ते ही मुळात आजूबाजूला सगळे राजपूतच असताना. त्यापेक्षा चितौडच्या गडावर राजपूत लोकांबद्दल चांगली माहिती असलेलेच लोक का नेमत नाहीत हे लोक? म्हणजे प्रत्येक वेळेला असले कॉमन नॉलेज एकमेकांना ऐकवायला नको.

एरव्ही सुद्धा हे लोक असेच बोलत असतील का? म्हणजे दासीने येउन सांगितले की "बडी राणीसा ने बैंगन खाने से मना कर दिया है", की लगेच "राजपूत रानीयाँ अपने चितौड के उगे हुए बैंगन खाने से कभी मना नही कर सकती". स्वतःबद्दल बोलतानाही अनेकदा हे लोक थर्ड पर्सन मधे बोलतात. तो त्यांच्या करारीपणाचा भाग आहे, की सीनमधे इतरांनी त्यांच्याबद्दल म्हणायचे संवादही हेच म्हणून टाकत आहेत कळत नाही. त्यांना अशी वाक्ये बोलता यावीत म्हणून आजूबाजूचे लोक अनेकदा प्लाण्ट केलेले प्रश्न विचारत असतात.

थोरल्या राणीचा एक मोत्यांचा हार रावळ रतन सिंग चुकून कोणालातरी देउन टाकतो.. तो म्हणे फक्त लंकेत मिळणार्‍या स्पेशल मोत्यांचा असतो. आता लंकेतून मोती आणायचे म्हणजे एखाद्या विश्वासू नोकराला किंवा मंत्र्याला पाठवणे शक्य नसल्याने रावळ स्वतःच जातो तेथे. ते ही राणीला म्हणेल चल जरा लगे हाथो बीच वर जाउन येउ वगैरे नाही. एकटाच जातो. तेथेही चितौडचा फेमस राजा आलेला आहे याचा पत्ता राजकन्येला नसतो. ती जंगलात डिजिटल हरणाची शिकार करण्यात मग्न असते. हाही मोती शोधायला घनदाट जंगलात फिरत असल्याने साहजिकच एक बाण चुकून याला लागतो. मग पुढे थोडा वेळ "शिकार" आणि "मोती" यावरच्या विविध उपमांचा मारा आपल्यावर होतो. तीर सही निशानेपर लगा, लंकेतील सर्वोत्तम मोती आता मी घेउन जाणार वगैरे वगैरे (तेथे दीपिकाचे सुसंस्कृत वागणे पाहून खरे म्हणजे तिला कल्चर्ड मोती म्हणावे लागेल). मग ते चितौडगडावर येतात. पूर्वी कोणी त्यांच्या गावाहून मुंबईत आलेले दाखवायला एक रॅण्डम रेल्वेगाडी दाखवायचे. तसे यात त्या चितौड च्या किल्याच्या तटबंदीवरून जाणारी किंवा येणारी एक वरात दाखवली की हे लोक किल्ल्यात आले किंवा तेथून गेले हे समजायचे.

लग्न करून परत आल्या आल्या रावळ तिला राजगुरू कडे घेउन जातो. तो म्हणजे एक जीता जागता मल्लूअ‍ॅप्स असतो. म्हणजे फेबुवर जसे दहा प्रश्न विचारून तुम्ही कोणत्या जागतिक नेत्यासारखे आहात वगैरे निकाल येतो तसे तो राजगुरू त्या अ‍ॅप इतकेच काहीतरी तात्त्विक प्रश्न विचारतो, प्रेम म्हणजे काय आहे, सुख म्हणजे काय आहे वगैरे.

- "जीवन का वर्णन, तीन शब्दोंमे?"
- "अमृत, प्रेम और त्याग"

ते प्रश्न व त्याची उत्तरे म्हणजे लॅटिन चे भाषांतर पोर्तुगीजमधे केल्यासारखे आहे. एकतर राणी ला लागणार्‍या कौशल्याचा त्या प्रश्नांशी काहीही संबंध नाही. दुसरे म्हणजे एकूणच त्या राजगुरू चे लॉजिक असे, की पहिले विचारायचे प्रेम म्हणजे काय. मग त्याच्या उत्तरातील एखादा शब्द घेउन मग ते म्हणजे काय. असे करत करत प्रत्येक उत्तर म्हणजे एक व्हॉट्सअ‍ॅप पोस्ट होईल अशा पद्धतीने हे चालते. काहीतरी प्रेम म्हणजे अश्रू. अश्रू म्हणजे सुख व दु:ख यांचे काहीतरी. मग सुख म्हणजे अमुक. एकूण तू जास्त अगम्य प्रश्न विचारतोयस की मी जास्त अगम्य उत्तर देते याची एक जुगलबंदी होते. यातून ती राणी हुशार आहे हे सिद्ध होते.

दीपिकाचे दागिने शब्दशः नाकापेक्षा मोती जड टाइपचे आहेत. तिचे डोळे पाणीदार दाखवायचे असल्याने पुलंच्या भाषेत ग्लिसरिनचा वायसर निघाल्यासारखे सतत दिसतात.. करारीपणा दाखवण्याकरता तिची मान पिक्चरभर कायम ताठ दाखवली आहे. जराही खालतीवरती होत नाही. म्हणजे तलवार भिंतीवरून काढायची असेल तर आधी ती वर उचलायची आणि मग पुन्हा सरळ होत रोबॉटिक स्टाइलने इतर एकही अवयव न हलवता पूर्ण वळून रावळकडे द्यायची असला प्रकार.

भाषेच्या बाबतीत भन्साळी येथे मनमोहन देसाई स्कूल मधून आलेला आहे. धरमवीर मधे जसे वेगवेगळ्या काळातील व वेगवेगळ्या प्रदेशांतील कपडे एकाच वेळी एकाच राज्यातील लोक वापरत होते, तसे इथे भाषेचे झाले आहे. कधी ते राजस्थानी, तर कधी इंदौर-लखनवी अदब दाखवतात ("आप है यहाँ के राजगुरू"), तर कधी उर्दू बोलतात, तर कधी शुद्ध हिंदी. तसेच यमकाच्या गरजेकरता भाषेच्या कन्सिस्टन्सीची पर्वा हे लोक करत नाहीत. चितौडच्या राजा व राणीतील प्रेमगीत हे सुफी स्टाइलने चालते. घूमर घूमे, प्रीत, मन भावे बरोबरच रूतबा, कुर्बान, रूह-ए-साज, नब्ज वगैरे मंडळी खेळीमेळीने नांदतात.

आम्हाला इतक्या वर्षांत इथे अजून स्केज्युल अचूक म्हणायला जमत नाही, आणि ही एका दिवसातच जन्मापासूनच चितौड मधे असल्यासारखी लहेजा, स्थानिक शब्द व उच्चार आत्मसात करते, ते ही दिवसभर त्या किल्ल्यात पडद्याआड बसून.

मग एकदा हे दोघे एकत्र असताना तिला शंका येते की तेथे कोणीतरी लपून बघत आहे. “एकत्र असताना” हे त्या प्रसंगाचे पीजी-१३ वर्णन नव्हे. म्हणजे पुढे तसा काहीतरी प्लॅन असेल, पण कपडे आणि दागिने काढण्यातच सकाळ होईल असे कॉस्च्युम आहेत. त्यामुळे स्क्रीनवर फुलेही आपटायची गरज नाही.. कोणीतरी बघत आहे म्हंटल्यावर तेथे रावळ एकदम एक चाकू मारतो. पण कोणी दिसत नाही. वास्तविक ती भिंत किंवा पार्टीशन जे काही असेल तेथे त्या बाजूचा माणूस लख्ख दिसेल असा उजेड व मोकळा भाग असतो.

पण त्या चाकूला लागलेल्या रक्तातून तिला "चंदन की खूशबू" येते. और ऐसी खूशबू पूरे चित्तौड मे एकही आदमी लगाता है! राजगुरू राघव चेतन! आणि ही माहिती हजारो मैलांवरून नुकत्याच आलेल्या नवीन राणीला उपजत माहीत असल्यासारखी दाखवली आहे. तिला काय कोणत्या प्रजेच्या अंगाला कसले वास येत असतात याचे ओरिएण्टेशन दिले गेले होते का?

राजा व राणीचे जे अंतःपूर का काय असेल ती जागा जरा बंदिस्त, बाहेर पहारा असलेली हवी ना? कोणी तेथे रंगे हाथ दिसला नाही तरी वाटेत कोठेतरी शिपायांना कोणी येताना किंवा जाताना दिसला का विचारावे? पण हा प्रकार अनेकदा दिसतो. चितौडच काय पण दिल्लीची सुद्धा सगळी फौज रिस्ट्रेनिंग ऑर्डर असल्यासारखी कायम सीमेवरच असते. कोणाच्याही महालात कोणीही जाउ शकतो. रावळच्या बेडरूम मधे राजगुरू, खिलजीच्या महालात "किसी को आने न दिया जाय" ऑर्डर लागू असून सुद्धा शत्रूचा बंदी राजा रावळ. टोटल ओपन ऑफिस प्लॅन.

बरं तो राजगुरू आहे. त्याला अंतःपुर किंवा जे काही असेल तेथपर्यंत थेट प्रवेश आहे. तर तो आला तर किमान कशासाठी आला होता वगैरे काही विचारा? थेट शिक्षा. त्या अपमानाचे प्रतीक म्हणून तो बाजूच्या मशालीतील थोडी आग खाउन दाखवतो. म्हणजे रिव्हर्स द्रकारिस. आग खाण्यापेक्षा त्याच्या उलटे करून राज्ये बळकावता येतात हे त्याला माहीत नसते. त्याला तेथून हाकलले जाते. तो जातो थेट दिल्लीला.

अल्लाउद्दिन खिलजीला मुंडकी जमा करायचा शौक असतो (आणि सिंहासनावर बसून डुलक्या मारणे ही एक फॅमिली ट्रेट). चित्रपट ३डी असल्याने एका सीन मधे तो काही कारण नसताना एक शहामृग घेउन येतो. त्याची मुख्य कामगिरी म्हणजे मंगोल टोळ्यांविरूद्धच्या युद्धात सगळे सैनिक लढाईत गर्क असताना हा लांबवर उभा असतो त्या रणधुमाळीकडे पाहात. मग एकाच फटक्यात आत घुसतो ते एक मंगोल मुण्डके घेउनच परत. आपल्याला ते सगळे मंगोल सारखेच दिसतात पण याला त्या धुळीतूनही योग्य डोके बरोब्बर सापडते. मग पुढे काका जलालउद्दीन, मेवाडचा राजगुरू अशी अनेक मुंडकी त्याच्या संग्रही जमा होतात. गेम ऑफ थ्रोन्स मधल्या त्या हॉल ऑफ फेसेस मधे त्यातले काही अल्लाउद्दीनने दान केल्याचा उल्लेख नक्की असेल.

त्याची बेगम कधी मलिका-ए-जहाँ असते, तर कधी मलिका-ए-हिंद. बहुधा अधूनमधून मलिका-ए-आउटर जमना पार ही असेल. माहीत नाही.

एका रात्री खिलजी बेगमबरोबर असताना सर्वत्र शांतता असते. त्यामुळे खिलजी ला दूरवर बासरी ऐकू येते. खेडेगावात एखाद्या लग्नातील लाउडस्पीकर ची गाणी जशी मधूनच अगदी मैलभर लांब ऐकू येतात तशी. मग ती वाजवणार्‍याला म्हणजे त्या राजगुरूला बोलावले जाते. तो याला सांगतो की तू सिकंदराप्रमाणे जग जिंकणार आहेस (सिकंदरला अर्धा भारत सुद्धा न जिंकता परत जावे लागले होते हे दोघांच्याही लक्षात येत नाही), पण त्या करता तुला "ती" ची गरज आहे. ती कोण? तर ती म्हणे साक्षात माया आहे. खिलजी हा वेदांचा प्रकांडपंडित असल्याने "माया" चा कन्सेप्ट त्याला लगेच समजतो.

तो रावळला दिल्लीला यायचे आमंत्रण देतो. पण रावळ ते धुडकावतो. त्यामुळे खिलजी जंग का ऐलान करून चितौडवर हमला करायला येतो. मग तो व त्याची फौज किल्ल्यासमोर तळ ठोकून बसतात. बरेच दिवस होतात. राणीच्या म्हणण्यानुसार तो म्हणे "तपते रण मे" सहा महिने थांबलेला असतो. दिवाळी ते होळी हा काळ. चितौड त्याकाळात बहुधा दक्षिण गोलार्धात असावे.

मग बराच काळ तिढा सुटत नाही म्हणून मग खिलजी रावळला भेटायला येतो तह करायला. पण तेथे तो पद्मावतीला भेटायची मागणी करतो तहाची अट म्हणून. या भेटीपर्यंत तो फक्त युद्ध किंवा तह करायला आलेला दुसरा एक राजा असतो. त्याने राणीला भेटायची इच्छा व्यक्त केल्यावर रावळ प्रचंड संतापणे व बाजूच्या शिपायांनी खिलजीच्या गळ्यापर्यंत भाले आणण्याइतके काय होते माहीत नाही. तेव्हा काय राजे व राण्या इतर राजे व राण्यांना भेटत नव्हते? राजनैतिक प्रोटोकॉल वापरून, घूँंघट, पडदा जे काय असेल त्याच्यासकट भेटत असतीलच की. हा जणू काही पुढच्या गोष्टी आधीच माहीत असल्यासारखा त्याला दुश्मन म्हणूनच वागणूक देतो. पण राणीने आग्रह केल्यामुळे कोठूनतरी राणीचे प्रतिबिंब दाखवले जाते.

मग खिलजी याला बोलावतो. त्याची फौज सगळी म्हणे परत गेलेली असते. त्यावर रावळही विश्वास ठेवतो. इतकेच नव्हे तर वाळवंटाच्या मध्यभागी असलेल्या तंबूत त्याला भेटायला जाताना यांचे लोक एकाच बाजूला पहारा देत उभे राहतात. तेथून त्याला खिलजी कैद करून दिल्लीला घेउन जातो. आता पेच उभा राहतो. राजपुतांबद्दलची माहिती राजपुतांना कोण सांगणार, समोर शत्रू तळ ठोकून बसल्यावर युद्धाची तयारी करा हे सेनापतीला कोण सांगणार असा प्रश्न पडतो. त्यामुळे खिलजीने बोलावल्याप्रमाणे राणी दिल्लीला जाणार असे ती स्वतः ठरवते.

मग राणी तिकडे जाते व त्याला खिलजीच्या बेगमच्या मदतीने सोडवते. त्याची बेगम जेव्हा पद्मावती व रावळ ला पळून जायला मदत करते तेव्हा खिलजी तिच्याकडे बघून मोठ्ठा डॉयलॉग मारतो "हमारे अपनोंनेही हमे जख्मी कर दिया"! त्याआधी त्याने स्वतःच्या काकाला व पुतण्याला -म्हणजे तिच्या वडलांना व भाच्याला त्या आधी मारलेले असते. मग तिलाही बंदी करून टाकतात व दुप्पट फौज घेउन व रोमन साम्राज्यातील उखळी तोफांसारखी काही शस्त्रे घेउन खिलजी पुन्हा चितौडवर चालून येतो. तेथेही एकदा खिलजीच्या बाजूने उसूल ऑलरेडी तोडलेला असताना यांचे सैनिक त्याला मारण्याची संधी सोडून देतात. आणि मग पुढची कथा आपल्याला माहीत आहे.

त्यामुळे त्यापेक्षा दिग्दर्शकाचे डीटेलिंग बघू.

यांची हेरयंत्रणा इतकी भारी असते की इकडे खिलजीच्या फौजा दिल्लीहून निघाल्या आहेत ही खबर सेनापतीला मिळते तोवर तिकडे अंतःपुरात सगळे हादरू लागते टी-रेक्स येत असल्यासारखे. लगेच उठून राणी व राजा तटाकडे जातात तर तिकडून धुळीचे लोळ दिसतात लगेच एक दोन मैलावर. राजाला गडावरून जे सहज दिसेल ते किमान एखादा दिवस आधी हेराने सांगणे आवश्यक आहे वगैरे नाही. सगळे झटपट.

गडाच्या तटावरून बाण मारणार्‍यांचे कौशल्य मात्र जबरी आहे. खिलजीच्या सेनेच्या दिशेने आडव्या रेषेत मारलेले बाण मधेच कोणीतरी एक्सेल मधे पिव्हट केल्यासारखे तेथे जाउन उभ्या रेषेत पडतात. तसेच त्यांच्या तटावरून थेट खिलजी झोपला आहे त्या जागेवर बाण मारता येउ शकतो. पण ८-१० महिन्यांच्या काळात ते तो मारत नाहीत. का ते विचारू नका, कारण काहीतरी "राजपूत अपने दुश्मनको..." चालू होईल. आणि त्याचे आधीचे आवाहन नाकारल्यावरही यांची युद्धाकरता सगळी तयारी खिलजी चितौडच्या दारात आल्यावर सुरू होते. लोकांना किल्ल्यात बोलवा, धान्य वगैरे भरून ठेवा ई.ई.

बाकी हे चितौड चे महाराज असोत किंवा सल्तनत-ए-हिंद चे सुल्तान. त्यांचे सरसेनापती अगदीच कामचलाऊ असावेत. त्यांच्याकडे कोणी शत्रूचे लोक येउ लागले की राजाला विचारायचे "इसे काट दूँ बॉस?" मग राजाने काहीतरी युद्धनीती ऐकवत त्याला थांबवायचे. अरे इतकी बेसिक माहिती जर राजाने सांगावी लागत असेल तर तुझे काय काम. एकूणच राजनैतिक प्रोटोकॉल वगैरे कोणी काही पाळताना दिसत नाही. खिलजी रावळला भेटायला येताना जुन्या गावातील बोळकांडीतून फिरवून आणल्यासारखा त्याला आणतात. नंतर रावळ त्याच्याकडे जातो तेव्हा व्हिलनच्या अड्ड्यात हीरो घुसतो तसा पडदे झटकत जातो त्याच्या शामियान्यात.

त्या दिल्लीहून सुटकेच्या सीनचे असेच. तेथून पळून यायच्या आधी हा तेथून एकटाच घुसतो खिलजीच्या महालात. सगळे सैनिक नमाज अदा करत असतात, पण ते याला माहीत नसते. तेथेही खिलजी त्याला तलवार देतो मला मार म्हणून. पण तेथे तो "घायल आदमी पर" उसूल वापरून त्याला सोडून देतो.

मूळ कथेचा अंत ठरलेला आहे. पण मधे नाट्यमय प्रसंग तर व्हायला हवेत. अडीच तीन तासांचा चित्रपट बनवताना जे युद्धप्रसंग लिहीले जातात त्यात मधेच जर रावळ च्या हातात खिलजी सापड्ला तर तो मरेल. अशा वेळेस ते नाट्यपूर्ण प्रसंग बदलण्याऐवजी एखादा उसूल वापरायचा आणि खिलजीला सोडून द्यायचे. कधी तो याच्याकडे "घर आये मेहमान पर" सिच्युएशन मधे, तर कधी हा त्याच्याकडे. कधी तो निहत्ता असतो म्हणून, तर कधी घायल असतो म्हणून. कधी त्याच्या तंबूवर जळते बाण टाकले जातात पण खिलजीला मारले जात नाही. तेव्हा आपल्या लक्षात येते की त्याला न मारण्याचे खरे कारण उसूल बिसूल नसून पिक्चर इतक्यात संपावायचा नाही हे आहे.

विनोदमौजमजाचित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

13 Oct 2020 - 6:04 am | विजुभाऊ

आहा हा ह.
सकाळी सकाळी एक धमाल लेख वाचायला मिळाला.

(तेथे दीपिकाचे सुसंस्कृत वागणे पाहून खरे म्हणजे तिला कल्चर्ड मोती म्हणावे लागेल).

ही खरी मिपाकराची कॉमेंट.
बरे झाले हा सिनेमा पाहिला नाही. पण आता मुद्दाम पाहीन विनोदी सिनेमा म्हणून
मस्त लिवलय हो फारएंड भाउ. म्हारा जिवडा ने मजा आ गया.

रुपी's picture

13 Oct 2020 - 6:37 am | रुपी

हा हा! फारच भारी. खरं च कल्चर्ड मोती ला वेड्यासारखी हसले. या कोविडच्या काळात अशी परीक्षणे अजून असती तर वेळ जरा तरी सुखावह गेला असता :)

जबरदस्त लेख खूप काळाने. ह ह पु वा.

अजून येऊ देत परीक्षणे. भरपूर कच्चा माल पडला आहे.

आनन्दा's picture

13 Oct 2020 - 8:13 am | आनन्दा

एक नंबर परीक्षण..

चित्रपटाची चिरफाड करावी तर तुम्हीच!!

शा वि कु's picture

13 Oct 2020 - 8:18 am | शा वि कु

भारी लिवलंय एकदम.
मला पण एक वाटायचं, एका प्रसंगात खिलजी आणि रावळ युद्ध टाळायला का अशाच कशासाठी मॅन टू मॅन झुंझतात. अर्थात रावल हिरो असल्यामुळे खिलजीला भारी पडतो पण खिलजीच्या सैन्यातून रावळला बाण मारतात.
रावळ तर पडला आहे, खिलजी बाणांच्या टप्प्यात आहे (दोघे सैन्यांच्या मध्ये भेटले असतात) तर राजपूत सैन्याने पण खिलजीला बाण मारायचे की. तर नाही. "आक्रमण !" नाही, ते कराच. पण एक स्टेप नंतर.

उन्मेष दिक्षीत's picture

13 Oct 2020 - 8:54 pm | उन्मेष दिक्षीत

उसूल के खिलाफ असतं !

सोत्रि's picture

13 Oct 2020 - 9:20 am | सोत्रि

झक्कास!

एकदम फारएन्ड टच!!

- (फारएन्ड पंखा) सोकाजी

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Oct 2020 - 9:29 am | ज्ञानोबाचे पैजार

कसला अब्यास, कसला अब्यास,
पदमावत इतका लक्षपूर्वक तर भन्साळीने सुध्दा पाहिला नसेल.
पैजारबुवा,

योगी९००'s picture

13 Oct 2020 - 9:56 am | योगी९००

जबरा... हा चित्रपट दोनदा बघितला पण हे लक्षात आले नव्हते..

ते राजगुरू व दिपिकाचे इन्ट्रोला संवाद, जास्त अगम्य कोण बोलतंय याची चिरफाड मस्त केलीत. चित्रपट पहाताना हा प्रसंग मला खटकला होता. तेवढ्या चार प्रश्नावरून ती एक असामान्य बाई आहे हे कसे काय कळते राजगुरूला कोणास ठावूक?...बाकी तो राजगुरू एकदम ठरकी आहे हे त्याच्या चेहर्‍यावरूनच जाणवत होते तरी रावळ का बरे त्याच्या नव्या राणीला त्याच्यासमोर घेऊन जात होता ?

बाकी एक गोष्ट जाणवली की पद्मवती झालेल्या दिपिकेपेक्षा खिलजीची बेगम (आदिती राव हैदरी) जास्त सुंदर दिसते. जर खरोखर असे असते आणि खिलजीने जर पद्मावतीला पाहिले असते तर खिलजीने "याच साठी केला का हा अट्टाहास" असे बोलून स्वतःचेच डोळे फोडले असते.

बाकी हे उसूल मात्र जाम डोक्यात जातात. हे असले सगळे हिंदू राजे असल्या नतद्रष्ट उसूलांमुळेच संपले. बाकीच्यांनी कसे ही वागावे पण आपण मात्र उसूल पाळत स्वतःची व राज्याची वाट लावायची. याबाबत आपले छ. शिवाजी महाराज फारच पुढारलेले होते. समोर शत्रू होता तर फार उसूल वगैरे पाळत बसले नाही. नाहीतर मराठी साम्राज्य नंतर एवढे पसरले नसते. अजून एक प्रकार डोक्यात जातो म्हणजे बर्‍याच चित्रपटात कोणी पहाडावरून आले की "बहोत पुरानी कहावत (या चाल) है हमारे पहाडोंकी" असले काहीतरी डायलॉग असतात.

त्या खिलजीच्या बॉयफ्रेंडवर काही प्रकाश पडला नाही या लेखातून... त्यावर एक आख्खा चित्रपट (व तुमचा लेख) होईल एवढे मटेरियल आहे ते..

कानडाऊ योगेशु's picture

13 Oct 2020 - 10:31 am | कानडाऊ योगेशु

बाकी हे उसूल मात्र जाम डोक्यात जातात. हे असले सगळे हिंदू राजे असल्या नतद्रष्ट उसूलांमुळेच संपले. बाकीच्यांनी कसे ही वागावे पण आपण मात्र उसूल पाळत स्वतःची व राज्याची वाट लावायची. याबाबत आपले छ. शिवाजी महाराज फारच पुढारलेले होते. समोर शत्रू होता तर फार उसूल वगैरे पाळत बसले नाही. नाहीतर मराठी साम्राज्य नंतर एवढे पसरले नसते.

तंतोतंत सहमत. लेख विनोदी अंगाने लिहिला आहे आणि तो आवडलाच पण हा गांभीर्याने घ्यायचा विषय आहे.
पृथ्वीराज चौहानाने घौरीला पहिल्यांदाच ठेचले असते तर इतिहास काही वेगळा असता.
छत्रपतींच्या जागी कोणी असाच राजा असता तर अफजुलखानासमोर अतिथी देवो भव चा जाप करत मातेरे केले असते.

वीणा३'s picture

13 Oct 2020 - 10:57 am | वीणा३

धमाल परीक्षण !
ओ फारएंड दादा, लॉकडाऊन मध्ये अजून लिहा ना जरा, घरीच आहोत, असे लेख आले कि दिवस बरा जातो.
तुम्ही एकदम सूक्ष्म निरीक्षण करून त्यात विनोद शोधता. तुमच्याकडे चांगले यू ट्युबर होण्यासाठी चांगला कन्टेन्ट आहे, आणि बराच पैसा कमावलं फक्त चित्रपट परीक्षण करून.

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

13 Oct 2020 - 1:12 pm | सौ मृदुला धनंजय...

हा हा हा !!! जबरदस्त परिक्षण.

वगिश's picture

13 Oct 2020 - 1:29 pm | वगिश

अतिशय उत्तम.. मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपट मी का बघत नाही ह्या च्या समर्थनार्थ मी हा लेख इतराना वाचायला सांगेन.
( वाचायचा संयम त्यांच्यापैकी कुणात असेल असे वाटत नाही.. मला bollywood आवडत नाही म्हटल्यावर लगेच मला देशप्रेम, भाषाप्रेम वैगेरे डोस मिळतात.. अरे पण मराठी, मल्याळम, बंगाली, कन्नड, इंग्रजी ईत्यादी अनेक भाषेत उत्तम निर्मिती होते आहे आणि bollywood आवडत नाही म्हणजे लगेच आम्ही इंग्रजांचे पाईक झालो असा नव्हे)

Rajesh188's picture

13 Oct 2020 - 10:03 pm | Rajesh188

सिनेमातील सर्व पात्र कार्टून वाटतात.
अजिबात बघावासा वाटत नाही..त्या मुळे 25 min वर बघूच शकलो नाही.

टर्मीनेटर's picture

15 Oct 2020 - 2:17 pm | टर्मीनेटर

झकास परीक्षण!
संजय लीला भंसाळीचे चित्रपट त्यांच्या पूर्वप्रसिद्धीसाठी वाद निर्माण करण्याच्या मोडस ऑपरेंडी मुळे मी कधीही थेटरमध्ये जाऊन पहात नाही. तसेच त्याचे दिग्दर्शन आणि दीपिका पदुकोण ह्यांतले (जर काही असलेच तर) सौंदर्य समजून घेण्याएवढी उच्च अभिरुची माझ्या ठायी नाही त्यामुळे त्याच्या बॅनरखाली निर्मित/दिग्दर्शित काही चित्रपट ऑनलाईन किंवा टोरंट वरून डाउनलोड करून पहिले असले तरी दीपिका नायिकेच्या भूमिकेत असल्याने पद्मावत सहित गोलीयोंकी रासलीला आणि बाजीराव मस्तानी हे चित्रपट पाहण्याचे कष्ट घेणारही नाही. असे असले तरी त्याच्या चित्रपटांताली गाणी मात्र नेहमीच प्रेक्षणीय आणि श्रवणीय वाटत आली आहेत पण त्यालाही अपवाद हा पद्मावत चित्रपट आहे, त्यांतले एकही गाणे दुसऱ्यांदा (युट्युब वर)पाहावे किंवा ऐकावे असे वाटले नाही!
असो तुम्ही फार सूक्ष्म निरीक्षण करून ह्या चित्रपटाचे जे परीक्षण लिहिले आहेत ते फार आवडले 👍
धन्यवाद.

चिगो's picture

15 Oct 2020 - 2:59 pm | चिगो

लै दिवसांनी फारएन्डरावांचे धमाल चित्रपट परीक्षण पहायला मिळाले. एकापेक्षा एक जबराट कोट्या केल्यायत राव. अक्षरशः मोत्यांची (कल्चर्ड मोत्यांसकट) बरसात..

हा चित्रपट पाहील्यावर मलापण प्रश्न पडला होता की ह्याच्या विरोधात करणीसेनावाल्यांनी एवढी प्रदर्शने का केली होती? कदाचित भंसाळीने राजपूत लोकांना अत्यंत मुर्ख असल्याचं दाखवलं म्हणून असेल. ;-) ह्या 'गर्व हैं हमें' टायपातल्या लोकांना त्यांनी किती च्यु!# बनवलं जातंय, हे कळतं की नाही, कुणास ठाऊक?