✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!

प
पाषाणभेद यांनी
Sun, 06/23/2019 - 03:29  ·  लेख
लेख

पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!

कलाकारः सुत्रधार आणि दोन सहकारी कलाकार (दोघांकडे एक एक वाद्य असेल तर उत्तम.) (शक्य असल्यास पथनाट्य सादरीकरणाआधी स्थानिक जनतेच्या अवलोकनार्थ, वातावरण निर्मीतीसाठी पाण्याच्या अपव्ययाचे, दुष्काळाचे प्रातिनिधीक छायाचित्रे असलेला फलक लावावा.) एक सहकारी कलाकार (पाणीवाल्याच्या भुमिकेत ): पाणी घ्या पाणी, पाणी घ्या पाणी! दुसरा सहकारी (स्त्री भुमिकेत): अरे ए पाणीवाल्या कसे दिले पाणी? पाणीवाला: शंभर रुपयाचा एक ग्लास पाणी, पाणी घ्या पाणी. स्त्री: काय! शंभर रुपयाला एक ग्लास! अरे बाबा काल तर होते स्वस्त, आज लाव थोडे रास्त. काल होता ग्लास नव्वदला! आज अचानक का भाव वाढवला? पाणीवाला: बाई, अहो आज मोठ्या मार्केटमध्ये पाण्याचे टँकर आले होते कमी. आम्ही तर साधे पाणीविक्रेते, आम्हाला स्वस्त मिळण्याची कसली हमी? हे पाणी विकून तुम्हाला पोटाला मिळायला पाहीजे आम्हाला. स्त्री: बरं बरं बाबा दे चारच ग्लास पाणी दे. आज कसेतरी घेवू धकवून. पण उद्या नक्की ये. सुत्रधार: मंडळी तुम्ही आम्ही पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आताच विकत घेतो. पण ते प्रवास करतांना, बाहेर जातांना. पाण्याची अशीच परिस्थीती असेल तर भविष्यात पाणी आपल्याला ग्लासच्या मापात अन भाजीसारखे विकत घ्यायला लागेल हे सत्य आहे. आता मंडळी या बातम्या ऐका. ए गोंद्या वाच जरा या बातम्या. (सहकारी कलाकार बातम्या वाचतो) पाण्यासाठी दोन गावात मारामारी. जिल्ह्यात पाण्याचे टँकरांची शंभरी गाठली. पिण्याच्या पाण्यासाठी धरणाचे दरवाजे बळजबरी उघडले. दुष्काळामुळे गावकर्‍यांचे शहराकडे रोजगाराठी स्थलांतर. गावात पाण्याचे नळ नसल्याने मुलांची लग्ने होत नाहीत. गावात पाण्याचे स्त्रोत आटले, विहीरी आटल्या. ५ किमीवरून पाणी आणण्यात महिलांचा दिवस जातो. ३०० लिटर पाणी चोरीची तक्रार पोलीसठाण्यात दाखल. सुत्रधार: तर मंडळी, या अन अशा बातम्या आपण रोज वाचतो. वाचतो की नाही? सहकारी (एका सुरात): हो वाचतो सुत्रधार: रोज टिव्ही वर पाहतो. सहकारी (एका सुरात): हो पाहतो. सुत्रधार: दररोज वाचता, दररोज पाहता मग यातून काही बोध घेता का? सहकारी (एका सुरात): नाही. सुत्रधार: बघा मंडळी, पाण्याच्या बाबतीत किती उदासीनता आपण बाळगून असतो. सहकारी एक: अहो या बाई पहा. राहतात वरच्या मजल्यावर अन वरून सडा मारतात खालच्या रत्यावर. सहकारी दोन: हे गृहस्थ पहा, गाडी सरळ नळाच्या पाण्याला नळी लावून धुवत आहेत. सहकारी एक: अन या बाई पहा. दररोज सकाळ संध्याकाळ घरासमोरील अंगण धुतात. स्वच्छता पाहीजे त्यांना. सहकारी दोन: या मावशी पहा, किती तरी पाणी कपडे धुण्यासाठी चुकीचे वापरत आहेत. सहकारी एक: ते भाऊ पहा, सरळ नदीतच त्यांची जनावरे धुवत आहेत. सुत्रधार: मंडळी, असे पाणी वाया घालवू नका. पाणी महत्वाचे नैसर्गीक वरदान आहे. सर्व सजीवांना पाण्याची आवश्यकता आहे. जितका मानवाचा पाण्यावर हक्क आहे तितकाच हक्क इतर सजीवांचा पाण्यावर आहे. कित्येक विकसनशील देशांत जनावरे जे पाणी पितात तेच पाणी तेथल्या नागरीकांना नाईलाजाने प्यावे लागत आहे. त्याने तेथील रोगराईदेखील वाढली आहे. सहकारी एक: पाणी जपुन वापरा, पिण्याचे पाणी इतर कामासाठी वापरू नका. सहकारी दोन: सडा मारू नका. वाहन कमी पाण्यात धुवा. धुणी भांडी स्वच्छ करतांना पाणी कमी वापरा. सहकारी एक: नळाच्या तोट्या बंद करा. पाणी वाया जावू देवू नका. सहकारी दोन: पावसाचे पाणी अडवा, जिरवा. तरच पाण्याची समृद्धी येईल. सहकारी एक: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची! सुत्रधार: चला मित्रांनो, आज आपण पाणी बचतीचा संकल्प करू. आपल्या मुलाबाळांच्या पुढच्या पिढीसाठी पाणी राखून ठेवू. (सुत्रधार अन सहकारी रांगेत हात जोडून उभे राहतात अन गीत गातात) नका वाया घालवू पाणी वाया घालवाल तर होईल पाणीबाणी || धृ|| नका मारू सडा होईल राडा रोडा नका पाणी फेकू नका शिळे पाणी टाकू नका धुवू घोडा अन गाडी तसे केले तर होईल पाणीबाणी||११|| पाणी शिळे होत नसते पाणी वरदान असते पाणी जीवन अनमोल तुम्ही जाणा त्याचे मोल ऐका तुम्ही पाषाणाची वाणी वाया घालवाल तर होईल पाणीबाणी ||२|| - पाषाणभेद २३/०६/२०१९
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नाट्य
कविता
समाज
जीवनमान
राहणी
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
आस्वाद
लेख
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
11964 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

मस्त

वरुण मोहिते
Sun, 06/23/2019 - 05:14 नवीन
आणि उत्तम संदेश ही
  • Log in or register to post comments

धन्स

vcdatrange
Sun, 06/23/2019 - 06:30 नवीन
अति उत्तम प्रसवले. . सादरीकरणाला थोडे लांबवावे लागेल बहुदा.
  • Log in or register to post comments

छान !

हेमंतकुमार
Sun, 06/23/2019 - 10:47 नवीन
महत्वाचा विषय. पु ले शु
  • Log in or register to post comments

खूप छान

श्वेता२४
Sun, 06/23/2019 - 11:02 नवीन
पथनाट्य आवडले. महत्वाच्या प्रश्नावर बोट ठेवले आहे
  • Log in or register to post comments

चांगले पथनाट्य. एखाद्या

यशोधरा
Sun, 06/23/2019 - 11:12 नवीन
चांगले पथनाट्य. एखाद्या पथनाट्य सादर करणाऱ्या पथकाला द्या.
  • Log in or register to post comments

चांगलं लिहिलंय.

टर्मीनेटर
Sun, 06/23/2019 - 11:22 नवीन
चांगलं लिहिलंय. वाचताना सादरकर्ती मंडळी मनःचक्षूंसमोर उभी राहिली.
  • Log in or register to post comments

ईतके जागरण करुन लिहीलयं ते

दुर्गविहारी
Sun, 06/23/2019 - 12:37 नवीन
ईतके जागरण करुन लिहीलयं ते सार्थकी लागले. ;-) र.च्या.क.ने पाणी प्रश्न खुप महत्त्वाचा आहे. हे पथनाट्य तुमच्या नावावर रजिस्टर करुन ठेवा नाही तर दुसरा एखादा श्रेय घेऊन जायचा.
  • Log in or register to post comments

एकदम मस्त

दीपक११७७
Sun, 06/23/2019 - 15:14 नवीन
एकदम मस्त, पण पाणी नासवलचं नाही तर, पुन्हा निसर्गात आणि तिथुन ढगात आणि मग पावसात, मग नदीत असा प्रवास कसा होईल. असं पाणी वाचवुन पाणी वाढणार नाही, पाण्याचे मुख्य स्त्रोत म्हणजे पाऊस का कमी होतोय किंवा uneven पडतोय हे पाहणे महत्वाचे आहे. पाणी कितीही कमी वापरा किंवा उपसा तरी उन्हाळ्यात स्त्रोत कोरडे पडतातचं. प्रचंड लोकसंख्या हे पण एक कारण आहे सध्या एवढेचं
  • Log in or register to post comments

मेक सेन्स

जॉनविक्क
Sun, 06/23/2019 - 20:25 नवीन
ज्या पृथ्वीवर महाप्रचंड पाण्याचासाठा अस्तित्वात आहे तेथे पाणी वाचवण्यापेक्षाही ते योग्य प्रकारे फिरवले जाणेच एकमेव उपाय आहे. पाणी सोन्यासारखे दुर्मिळ असते तर गोष्ट वेगळी होती. अर्थात प्राप्त परिस्थितीनुसार मिळालेले पाणी पुरवून वापरणेही आवश्यक आहे पण ती तात्पुरती मलमपट्टीच होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७

सहमतं

दीपक११७७
Mon, 06/24/2019 - 10:07 नवीन
अगदी बरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

जबराट

नाखु
Sun, 06/23/2019 - 18:06 नवीन
लिहिले आहे परदेशात कुठेशीक हाँटेलमध्ये अन्न वाया घालवलै तर दंड वसूल केला जातो असं वाचलं होतं तसं पाण्याची नासाडी करणाऱ्या लोकांना अद्दल घडविली पाहिजे महाविद्यालयीन जीवनात पथनाट्य सादर करण्यात सहभागी नाखु पांढरपेशा
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय.

आनन्दा
Sun, 06/23/2019 - 20:15 नवीन
छान लिहिलंय. नाटक म्हणून वाचायचा बराच वेळ आळस केला होता . पण वाचल्यावर आवडलं
  • Log in or register to post comments

वाह, भारी लिहिलंय पाषाणभेद

चौथा कोनाडा
Sun, 06/23/2019 - 21:13 नवीन
वाह, भारी लिहिलंय पाषाणभेद साहेब ! एक नंबर ! आवडलं ! आता पर्यंत कुठं सादर केलं गेलं आहे का ?
  • Log in or register to post comments

वेळ निघून गेली आहे

Rajesh188
Sun, 06/23/2019 - 23:42 नवीन
पाणी इथून पुढे दुर्मिळ होईल . आणि खूप पावूस पडून सुद्धा कारण पाण्याला व्यापारी महत्व आले आहे . पैसे नामक कागदाचे तुकडे पाणी दुर्मिळ करतील
  • Log in or register to post comments

मस्त

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 06/24/2019 - 11:27 नवीन
जबरा लिहिले आहे, थोडे अजून मोठे चालले असते पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

छान लिहिले​ आहे,

भीमराव
Mon, 06/24/2019 - 22:57 नवीन
छान लिहिले​ आहे,
  • Log in or register to post comments

छान!

लई भारी
Wed, 06/26/2019 - 12:14 नवीन
महत्वाचा विषय. छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा