OLX बद्दल सल्ला हवाय..

चिगो's picture
चिगो in काथ्याकूट
6 Sep 2018 - 3:18 pm
गाभा: 

मिपाकरांनो, नमस्कार.. OLX वरुन विक्रीसंबंधात आपली मदत हवी आहे.

सुमारे दोन वर्षांपुर्वी सफरचंदाच्या मोहात पडून मी एक MacBook Pro (A1502) 13-inch लेपटॉप घेतला. मात्र विंडोज वापरण्याची सवय, यत्र-तत्र-सर्वत्र ऑफीसात विंडोज असल्याने, आणि मॅकबूकमधल्या आयओएसशी जुळवता न आल्याने, जवळपास शुन्य वापरानंतर तो परत त्याच्या डब्यात जाऊन विसावला.

मग त्यावर विचार केल्यावर उमगले की आता ह्यास विकून थोडा अडका जोडावा. (लोनच्या EMIचा मॅसेज हा फारच प्रेरणादायी असतो बघा.. ;-) ). म्हणून मग काल त्याला विकण्यासाठी OLX वर अ‍ॅड दिली. त्याला आज लगेच एका व्यक्तीचा रिप्लाय आला. सदर व्यक्तीशी व्हॉट्सॅप चॅटले असता कळले की त्याचे व्हॉट्सॅप मधे बिजनेस अकांऊट आहे. ( हा ही एक नवीनच शोध) भाऊंनी मी सांगितलेली किंमत (रु. ७५ हजार ) लगेच कबूल करुन मला सांगितले की हा लॅपटॉप त्यांना त्यांच्या मित्रास भेट द्यायचा असून, ते मागितलेली रक्कम अधिक वर ३००० रुपये 'कुरीयर चार्जेस' म्हणुन द्यायला तयार आहेत. आणि मला माझं पुर्ण नाव, बँक डीटेल्स, फोन नंबर, इमेल वगैरे द्यायला सांगितलं. मित्राचा पत्ता विचारला असता एक नाव गाव पत्ता आणि मोबाईल नंबरवाला मॅसेज पाठवून 'त्याच्याशी बोलू नका हं.. मला त्याला सरप्राईज द्यायचंय' अशी गळ घातली..

आता ह्यात मला असलेल्या शंका आपणासमोर मांडतो.

१. OLX वरील खरेदी-विक्रीकर्ते verified असतात का? अ‍ॅड पोस्टवतांना मला तरी काहीही विचारण्यात आले नव्हते.
२. माझ्याकडे असलेल्या स्पेसिफीकेशन्सचा नवाकोरा मॅकबूक सिंगापूरात जवळपास ९५ हजारात मिळतो. भाऊ मला ७८०००/- द्यायला तयार आहेत. भाऊंनी किंमतीच्या बाबतीत यत्किंचींतही घासाघीस केली नाही.. शंकास्पद आहे.
३. फंड ट्रांसफरसाठी फोन नंबर आणि इमेलची काही गरज आहे का? मला तरी आजपर्यंत गरज भासली नाही, एटीएम वापरुन फंड डिपॉजीट सोडल्यास. त्यातही फक्त मोबाईल नंबर लागतो. इमेल आजपर्यंत कधीच वापरावा लागला नाही.
४. OLX किंवा तत्सम साईट्स वापरुन केलेल्या कारभारामधे काय काय काळजी घ्यावी? कुणास काही वाईट अनूभव?

आपल्या सल्ला / मदतीसाठी आभारी असेन.

प्रतिक्रिया

मला फेक वाटतोय तो. माझा अनुभव नंतर शेअर करेन. ब्लॉक करून टाका त्याला. पण olx किंवा दुसरीकडे कुठे विकताना त्या व्यक्तीला भेटून व्यवहार करणे योग्य ते ही पब्लिक प्लेस मध्ये.

श्वेता२४'s picture

6 Sep 2018 - 3:34 pm | श्वेता२४

मी OLX वर विक्री केली होती पण व्यवहार रोख केला होता. क्विकर वर पण विक्री केली होती त्यावळी क्विकर या साईटवर मी माझे अकाऊंट डिटेल्स फीड केले होते. खरेदीदाराशी नव्हे. खरेदीदाराशी केवळ एकदाच फोनवर बोलून बाकी सगळा व्यवहार क्विकर मार्फत झाला होता. क्विकरवाले विक्रेत्याकडून वस्तु घेऊन ती खरेदीदाराला घरपोच देतात पण ही सुविधा OLX वर माझ्या माहितीप्रमाणे नाही. तुमच्या केसमध्ये जर त्या खरेदीदाराल तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत तर केवळ तुमचे अकाऊंट डिटेल्स पुरेसे आहेत. फोन नंबर व ई मेल देण्याची अजीबात गरज नाही. OLX वर विक्री करणारे Verified असतात व त्याच्या प्रोफाइलवर तस दिसतंही पण खरेदीदाराबाबत तस काही सांगता येत नाही. सावधगीरी बाळगलेली बरी

आज काल लोक १० रुपयांचा चहा पण मित्राला द्यायला काचकूच करतात ७५००० ची भेट थोडा जास्त होतंय .
आताच्या युगात अगोदरच खबरदारी घेतलेलीच चांगली.

संजय पाटिल's picture

6 Sep 2018 - 4:18 pm | संजय पाटिल

फोन नंबर (बँक अकाऊंटशी लिंक केलेला असेल तर) अजिबात देवू नका, इमेल पण सेकंडरी असेल तर द्या..
आधी रक्कम ट्रान्सफर करायला सांगा, आणी नंतर कुरीयर करा!
OLX वर मी टूव्हिलर विकली होती. समोरासमोर भेटून व्यवहार केला. ट्रान्सफर्चा खर्च त्याने करायचा या अटीवर पैसे घेऊन गाडी व सह्या केलेले पेपर्स दिले. सर्व रक्कम रोख घेतली.

साखरेचा दाणा's picture

6 Sep 2018 - 4:49 pm | साखरेचा दाणा

आधी रक्कम ट्रान्सफर करायला सांगा, आणी नंतर कुरीयर करा!

आजकाल खोटे SMS पाठवता येतात भुरट्याना, जे बँकेच्या SMS सारखेच वाटतात ...म्हणून जर व्यवहार करत असणार तर बँकेत पैसे जमा झालेले आहेत हे तपासून घ्याल आणि SMS वर अवलंबून राहू नका.

चिगो's picture

6 Sep 2018 - 5:49 pm | चिगो

माझ्या माहितीतल्यांनी ज्यांनी पण OLX/ Quikr वर व्यवहार केले आहेत, त्यांनी एकत रोख व्यवहार केले आहेत, किंवा आमोरासामोर भेट घेऊनच मग केलेले आहेत. हा भाऊ पार फारेनातून त्याच्या केरळातल्या एका मित्राला वाढदिवसाची भेट देण्यासाठी लॅपटॉप घेतोय, हे मलाही संशयास्पदच आहे.

प्रतिसादकर्त्यांचे आभार..

Olx वर फक्त दहाबारा किलोमीटर मधील ग्राहक हा एक पर्याय निवडू शकता , जेणेकरून जवळ असलेल्या ग्राहकाला तुम्ही प्रत्यक्ष भेटून व्यवहार करू शकता .
आणि व्हेरिफाईड च्या गोष्टी करण्यात अर्थच नाही , औरंबगाबाद महिन्या पूर्वी olx वरून पन्नास एक तलवारी मागवण्यात आल्या होत्या .

लौंगी मिरची's picture

6 Sep 2018 - 8:57 pm | लौंगी मिरची

रोख व्यवहार करत असाल तर उत्तम आहे . बरेच फेक आयडी आणि फसवणुक होते .

मास्टरमाईन्ड's picture

6 Sep 2018 - 10:12 pm | मास्टरमाईन्ड

१) फक्त तुमचं नांव आणि बॅन्क अकाउन्ट नंबर द्या.
२) मोबाईल नम्बर आणि ईमेल मात्र बॅन्क अकाऊन्ट ला न जोडलेलेच द्या.
३) शक्यतो असं बॅन्क अकाऊन्ट द्या की ज्यात फारसे पैसे तुम्ही ठेवत नसाल.
४) पैसे जमा झालेला SMS आला की प्रथम पैसे withdraw करा किंवा एटीएम वापरुन तुमच्या दुसर्या बॅन्केतल्या अकाऊंट्ला ट्रान्स्फर करा (कुरियरला जाता जाता).

संजय पाटिल's picture

7 Sep 2018 - 11:32 am | संजय पाटिल

+१

सतिश पाटील's picture

7 Sep 2018 - 11:25 am | सतिश पाटील

भाऊ सरळ दुसरं गिर्हाईक बघा, शेपाचशे कमी आले तरी चालतील. कशाला टेन्शन घ्याचं? कसं ?

मराठी कथालेखक's picture

10 Sep 2018 - 2:28 pm | मराठी कथालेखक

सहमत.. साधा सोपा उपाय आहे.

चिगो's picture

7 Sep 2018 - 1:09 pm | चिगो

आपणां सर्वांचे पुनश्च धन्यवाद..

ह्या सगळ्या प्रपंचात आणि प्रतिसादांवरुन ध्यानात आलं की माझा इ-मेल आयडी आणि फोननंबर, जे की दोन्ही सर्वस्वी वैयक्तीक आहेत आणि असावेत, ते नोकरीपायी पारच पब्लिक झालेत. आणि मी ह्यांनाच वापरुन बँकींग करत होतो. त्यामुळे आता पहील्यांदा ते दोन्ही बदलायला/ अपडेटायला टाकलेयत आता..

धन्यवाद..

अभ्या..'s picture

7 Sep 2018 - 1:25 pm | अभ्या..

ओएलेक्स चा एक जुना अनुभव.
ज्यावेळी फ्लिपकार्टावर काही मोबाईलचे फ्लॅश सेल असायचे(अजुनही असतात पण आता क्रेझ कमी झालीय) त्यावेळी त्या सेलात नंबर लागला नाही की तेच फोन ८ दिवसांनी ओएलएक्स वर विकायला असायचे. डिस्क्रीप्शन मध्ये बॉक्स पॅक असा उल्लेख असायचा. किंमत त्या सेल पेक्षा २००-५०० ने जास्त असायची. एका फोन साठी एका पुण्यातल्या नितीन नामक प्रोफाईलला कॉल केला असता तो नियाझ निघाला. त्याने प्रॉपरली बोक्स पॅक मोबाईल पाठवला. थोड्या दिवसांने माझ्या एका मित्राला दुसर्‍या सेल मधला मोबाईल मिळाला नाही. त्याने ओएलएक्सवर हुडकले असता तोच नियाझ दिपक नावाने मोबाईल देत होता.फोन नंबर सेमच होता. तो कोणताहे सेलमधला मोबाईल चार पाचशे ऑन मनी घेऊन फोन उपलब्ध करुन देत होता. त्याचे मोबाईलचे बारीकसे दुकान होते पण असे ऑनलाईन भरपूर फोन विकत होता. मी शेवटी विचारले त्याला तर तो हेच काम करतो हे त्याने कबूल केले. नाव का बदलतो असे विचारल्यावर तो सरळ म्हणला की मुस्लीम नांव असले की लोक डील करत नाही म्हणून हिंदू नांव घेतो.

विनिता००२'s picture

7 Sep 2018 - 4:00 pm | विनिता००२

मी काही दिव्सापूर्वीच OLX वर मुलाची सायकल विकली. अ‍ॅड पाहून बरेच मेसेज आले. काही फोन आले. जे व्यवस्थित वाटले, त्यांना मी पत्ता दिला. पण ते काही आले नाहीत. एकजण फोनवर बोलला आणि सायकल बघायला आला. कॅश देवून लगेच सायकल घेवून गेला.

OLX चा हा पहिलाच अनुभव होता. पण चांगला वाटला. :)

चौथा कोनाडा's picture

7 Sep 2018 - 6:11 pm | चौथा कोनाडा

मी दोन वर्षांपुर्वी माझी टू व्हीलर याच पद्धतीनं प्रत्यक्ष भेटून, रक्कम रोख घेऊन (सगळे आयडी प्रूफ व त्याच्या नोकरीच्या आयडी कार्डची झेरोक्स घेवुन ) ओएलएक्स वर विकली.
समाधानकारक अनुभव.

अमित खोजे's picture

7 Sep 2018 - 8:55 pm | अमित खोजे

हि फार सोपी गंडवण्याची केस आहे. तुमच्या अनुभवावर सांगण्यापेक्षा माझा अनुभव सांगतो.

अमेरिकेत नुकतेच शिक्षण झाले होते. नोकरीचा शोध चालू होता. तोपर्यंत घरखर्च चालावा म्हणून क्रेग्सलिस्ट वर काही कॅश पैशांचे काम आहे का ते बघत होतो. तेथे एक जाहिरात दिसली कि कॉम्पुटर वर OS टाकून हवी आहे. आम्ही १० लॅपटॉप व १० windows CD तुमच्याकडे पाठवू. तुम्ही फक्त त्या install करून आम्ही सांगतो त्या पत्यावर सांगतो त्या माणसाला पाठवून द्या. 'कुरियर चार्जेस' आम्ही देऊ. मी ठीक आहे म्हणून त्या जाहिरातीला संपर्क केला. म्हटले सगळे पैसे देत आहेत तर बघुयात काय करताहेत ते. त्या माणसाला संपर्क केला. दुसऱ्या देशातील काहीतरी नंबर वरून त्याने फोन केला. विचारल्यास उत्तर आले कि तो व्यवसायासाठी फिरत असतो. म्हटले ठीक आहे. माझ्या कामाचे पैसे मी त्याला USD ३०० सांगितले. तो ठीक आहे म्हणाला. ( नाहीतरी इथे मला गंडवण्याची शंका आलीच होती पण म्हटले बघू तरी कसे आहे हे scam . )

तो म्हणाला कि मी तुला चेक पाठवतो. US $५०००. त्यातील तुझे कामाचे पैसे कापून घेऊन उरलेले पैसे अमक्या अमक्या ठिकाणी Western Union ने ट्रान्सफर कर. मी ओके म्हणालो. आता फक्त $३०० साठी $५००० चा चेक का पाठवायचा? बघुयात. काही दिवसांनी गावातील USPS मधून फोन आला कि तुमचे पार्सल आलेले आहे. मी जाऊन सही करून ते घेतले. त्यात ५००० चा चेक होता. तो मी माझ्या खात्यात भरला. खात्यात लगेच USD ५००० रक्कम दिसू लागली. (इथपर्यंत अगदी तुमच्या केस सारखे चालू आहे.)

चेक भरल्या भरल्या २ तासात त्याचा फोन की चेक भरला का? मी हो म्हणालो. तो म्हणाला की मग लगेच जाऊन western union मधून पैसे ट्रान्सफर कर. मी मनात म्हटले घाई काय आहे? भरतो की. मला कळेना. काहीतरी गोची आहे आणि मला ती समजत नाही आहे. पैसे तर खात्यात दिसत आहेत. मग माझे पैसे काढून घेऊन त्याला उरलेले पैसे देण्यात काहीच गैर वाटत नव्हते. तरीही म्हटले कि एक दिवस थांबूयात. रात्री परत त्याचा फोन की पैसे पाठवले का? मला western union चा ट्रान्सफर कोड दे. त्याला उत्तर दिले की अजून नाही. आज मला वेळ नाही झाला उद्या पाठवेन. मग तो भडकला. म्हणाला कि पोलिसांना सांगेन. तू चेक भरला आहेस आणि पैसे देत नाही आहेस म्हणून. लवकरात लवकर मी सांगितलेल्या पत्त्यावर पैसे पाठव. मी ऐकून घेतले.

दुसऱ्या दिवशी माझ्या खात्यातून ४७०० काढले व western union मध्ये गेलो. तेथे पैसे कॅश भरावे लागतात. फॉर्म वगैरे भरला. तिथल्या माणसाने फॉर्म घेत असताना विचारले की तुम्ही ज्याला पैसे पाठवत आहात त्या माणसाला ओळखताना? कारण येथे बरेच असे scam झालेले आहेत. मी नाही म्हटले. मग तो म्हणाला कि आम्ही पैसे नाही पाठवू शकत. मी गपचूप पैसे घेऊन परत आलो. त्या माणसाचा परत फोन. झाले का काम? मी त्याला काय घडले ते सांगितले. मग तो म्हणाला कि दुसऱ्या western union सेंटर ला जा आणि भर. आणि यावेळेस पाठवणाऱ्या माणसाला ओळखतो असे सांग. मी ठीक आहे म्हटले.

अजूनही मला काळात नव्हते कि गडबड काय आहे. पैसे तर खात्यात आहेत. मग पाठवायला काय हरकत आहे? संध्याकाळी परत दुसऱ्या सेंटर ला गेलो. तेथे परत प्रश्नावली झाली व या वेळेला मी पैसे पाठवले. ट्रान्सफर कोड मी त्या माणसाला टेक्स्ट करून कळवून टाकला.

घरी परत जात असताना म्हटले परत एकदा बघुयात खात्यात नक्की पैसे आहेत ना ते. बँक ऑफ अमेरिका च्या ATM सेंटर ला गेलो व कार्ड आत घालू खात्याचा बॅलन्स बघितला आणि पायाखालील जमीनच हादरली. त्याचा चेक बाउंस झाला होता. म्हटले हे कसे शक्य आहे? गेले दोन दिवस खात्यात पैसे तर दिसत होते. तेथेच बँकेत गेलो आणि विचारले तेव्हा कळले की

चेक मधील पूर्ण पैसे यायला ३ दिवस लागतात. त्या ३ दिवसा आत पाठवणारा माणूस चेक कॅन्सल करू शकतो. त्याला चेक कॅन्सलेशनचे चार्जेस पडतात परंतु तो करू शकतो.

आणि इथे मी माझ्या खात्यातील ४७०० त्या अनोळखी माणसाला western union ने कॅश पाठवले होते. ताबडतोब western union ला गेलो व ती ट्रान्सफर रद्द केली. ट्रान्सफर रद्द करण्याचे मला चार्जेस पडले. माझ्या चेहऱ्याकडे बघून तेथील कर्मचाऱ्याला शंका आलीच. त्याने विचारले तुम्ही फसवले गेला आहेत का? मी हो म्हणालो. त्याने मला पोलिसात तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला. मी student visa वर असल्याने या फंदात न पडण्याचा निर्णय घेतला.

थोड्या वेळाने त्या माणसाचा फोन आला. ट्रान्सफर कॅन्सल का केली म्हणून. माझा संतापाने तिळपापड झाला होता. त्याला फक्त सांगितले कि तू चेक कॅन्सल करायला घाई केलीस आणि फोन ठेऊन दिला.

काही अधिक माहिती
https://computertutorflorida.com/2009/10/my-very-own-craigslist-scammer/
https://www.reddit.com/r/legaladvice/comments/4ol8vy/is_this_a_craigslis...

---------------------------------------------------------------------------

तर तुमच्या केस मध्ये तो माणूस तुम्हाला इकडे तिकडे पैसे पाठवायला सांगेल. कदाचित तुमच्या खात्यात पैसे पाठवेल सुद्धा. तुम्ही लॅपटॉप शिप केला रे केला कि खात्यातून पैसे गायब. म्हणूनच अजिबात घासाघीस ना करता तो तयार झाला आहे. अजिबात संपर्क करू नका.

माझा सल्ला तोच जो मास्टरमाइंड आणि शलभ सांगतात ...

लॅपटॉप रोख किमतीमध्येच आणि प्रत्यक्ष भेटीतच विका. या व्यवहारासाठी मॉल सारखी वर्दळीची जागा निवडावी.

मास्टरमाईन्ड's picture

9 Sep 2018 - 5:28 pm | मास्टरमाईन्ड

पण तुमच्या केसमध्ये चेक पेमेन्ट असल्यानं चेक कॅन्सल करायला वाव होता आणि कदाचित तुमचा अनुभव २०१० च्या आधीचा असावा. कारण गेली ४ वर्ष तरी मला या ३ दिवसांच्या नियमाचा फायदा झालेला नाही.
माझ्या माहितीप्रमाणं तुम्ही NEFT किंवा IMPS केलेला व्यवहार जर beneficiary च्या अकाऊंटला रक्कम जमा झालेली असेल तर कॅन्सल करता येत नाही.
बाकी हा Western Union फ्रॉड प्रसिद्ध आहे त्यामुळं माहिती आहे.

अमित खोजे's picture

10 Sep 2018 - 8:19 am | अमित खोजे

माझा हाच तर प्रश्न होता की माझ्या खात्यात जर पैसे मला दिसत असतील तरीही पाठवणारा माणूस चेक कॅन्सल कसा करू शकतो? तर 'बँक ऑफ अमेरिका - न्यू जर्सी' ने उत्तर दिले कि चेक भरल्या भरल्या तुम्हाला पूर्ण रक्कम तुमच्या खात्यात दिसते. परंतु ती सर्व रक्कम तुम्हाला काढता येत नाही. पाठवणाऱ्याच्या बँकेमधून माझ्या बँकेत ती रक्कम येण्यासाठी ३ business days लागतात. मग ती रक्कम मला काढता येते. म्हणजे माझ्या केस मध्ये मी कमीत कमी ४ दिवस थांबायला हवे होते.

बाकी अर्थात त्या चोराला हे सर्व माहिती होते म्हणूनच तर तो चेक भरल्या भरल्या लगेच माझ्या मागे लागला - पैसे पाठव म्हणून.

हि घटना २०१२ ची आहे.

अमित खोजे's picture

7 Sep 2018 - 9:12 pm | अमित खोजे

आणि हो! त्या येणाऱ्या लॅपटॉपचे काय झाले असा प्रश्न कुणाला पडला असेल तर


असे लॅपटॉप कधीच येत नाहीत.

चौथा कोनाडा's picture

7 Sep 2018 - 9:26 pm | चौथा कोनाडा

खतरनाक केस आहे, असा थरारक किस्सा प्रथमच वाचला !

टवाळ कार्टा's picture

8 Sep 2018 - 3:12 am | टवाळ कार्टा

असे किस्से येऊंदेत...इथली ममा yz आहेत...फक्त फुकट राजकारणावर एकमेकांच्या उरावर बसतात

भक्त प्रल्हाद's picture

9 Sep 2018 - 10:58 pm | भक्त प्रल्हाद

Create a throwaway account and get a new SIM card for this sale. Use it until the sale is completed.sale in cash.

चित्रगुप्त's picture

10 Sep 2018 - 12:58 am | चित्रगुप्त

हा लॅपटॉप मिपाकरांपैकी कुणाला घ्यायचा असेल तर विचारा.

चिगो's picture

10 Sep 2018 - 2:17 pm | चिगो

हा सल्ला तर भारीच, काका..

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Sep 2018 - 10:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

आणि ता सुरक्षेत अजून भर घालायची असली तर, एक मिपाकट्टा आयोजित करून मिपाकरांच्या साक्षीने व्यवहार करा... काय बिशाद आहे फसवणूक होण्याची ! ;) :)

टवाळ कार्टा's picture

11 Sep 2018 - 12:59 pm | टवाळ कार्टा

झेड+ ग्यारंटी हवी असेल तर दंबूक पाटलांना पण बोलवा ;)

चिगो's picture

10 Sep 2018 - 2:21 pm | चिगो

साला, हे ऑनलाईन विक्री प्रकरण लैच भारी दिसतंय. अमित, तुमचा अनुभव तर भलताच थरारक आहे. २०१२ मध्ये जर ४७०० डॉलर्सचा चुना लागला असता तर? बाब्बौ..

मला तरी त्या भाऊने पुन्हा विचारणा केली नाहीये. कदाचित माझ्याकडून प्रतिसाद नसल्याने त्यालाच शंका आली असावी.

उगा काहितरीच's picture

10 Sep 2018 - 6:38 pm | उगा काहितरीच

तो मिपा वाचत असावा कदाचित् ;-)

अमित खोजे's picture

11 Sep 2018 - 11:48 pm | अमित खोजे

ते सुद्धा मला नोकरीसुद्धा नसताना. नुकताच कॉलेज करून बाहेर पडलो होतो. खात्यात १००० - १२०० डॉलर होते. आणि त्या ५००० मधलेच ४७०० देतोय असे समजून देत होतो. परंतु मी ते पैसे पाठवले असते तर माझ्या खात्यात वजा शिल्लक पडली असती. मग तर फारच वाईट परिस्थिती झाली असती.