Skip to main content

वाटणी - एक लघुकथा

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 29/08/2018 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
त्या माणसाने स्वतःच्या मनाशी ठरवले - हीच मोठी लाकडी पेटी न्यावी. उचलण्याचा प्रयत्न केला तर पेटी एक इंचही हलली नाही. अवजड पेटीशी झटापट करत असतांना दुसरा त्याला बघत होता. ह्या दुसऱ्याला स्वतःसाठी काही सापडले नव्हते. - 'मी मदत करू का तुला?' त्याने पहिल्याला विचारले. पहिला तयार झाला. मजबूत हातांनी पेटी उचलून पाठीवर ठेवली. पहिल्याने फक्त हात लावला जरासा. दोघे बाहेर निघाले. पेटी फारच जड होती. उचलणाऱ्याच्या पाठीला कळ लागत होती. त्याचे पायही दुखू लागले. पण पेटीत असलेल्या घबाडातून मिळणाऱ्या वाट्याच्या अपेक्षेमुळे तो त्रास सहन करायला तयार होता. त्याच्यापेक्षा पहिला माणूस अगदीच कमकुवत होता, पेटीला नुसता हात लावून तो मागेमागे चालत होता - स्वतःचा हक्क कायम ठेवत. दोघे सुरक्षित स्थानी पोचले. पेटी खाली ठेवून दमलेल्याने विचारले - आता बोल, मला ह्यातील किती माल देणार? - पाव भाग तुझा, रुपयात चार आणे. - खूप कमी होतात. - कमी नाही, उलट खूप जास्त देतोय. पेटीवर आधी मीच हात टाकला होता ना? - ते ठीक आहे, पण हे धूड इथवर उचलून कोणी आणले? - ठीक आहे. दोघांत अर्धे-अर्धे वाटून घेऊ. बोल, मंजूर? - मंजूर. उघड पेटी. पेटी उघडली. त्यातून हाती तलवार घेतलेला एक माणूस बाहेर पडला. तलवारीनी सपासप वार करत त्याने दोन वाटेकऱ्यांची चार तुकड्यात वाटणी केली ! (सआदत हसन मंटो ह्यांच्या 'तक़सीम' ह्या मूळ उर्दू कथेवर आधारित.) * * * ज्यांनी इथवर वाचलंय त्यांच्यासाठी :- तक़सीम ही कथा प्रसिद्ध झाली १९४८ साली. पण तेंव्हा मंटोंना 'साहित्यकार' मानायला कोणी तयार नव्हते. अनेक लोकांना तर मंटोंना वेड लागलंय असा दाट संशय होता. पुढे वीसेक वर्षानंतर त्यांच्या साहित्याला लोकप्रियता मिळाली. मला स्वतःला ही कथा प्रतीकात्मक वाटते. भाषान्तरातले न्यून ते माझे समजावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10025
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

खरी कथा एवढीच लहान आहे की मोठी आहे. जर अनुवाद करत असाल तर पुर्ण करा म्हणजे वाचायला मजा येइल. आवडली

In reply to by खटपट्या

मंटोंची मूळ कथा छोटीशीच आहे, जेमतेम २४० शब्दांची. खऱ्या अर्थाने 'लघु'कथा.

ही कथा सुद्धा आधी वाचनात आली नव्हती. छान अनुवाद केला आहेत, धन्यवाद.

In reply to by टर्मीनेटर

होय, आधीच मराठीत आलेल्या मंटो कथा वगळतो आहे. प्रतिसादाबद्दल आभार.

थोडक्यात पण सुंदर लघु कथा. म्हणताना "घागर में सागर". अनेक अार्थ सांगून जाणारी अल्प शब्दातील नाविन्य असणारी लघु कथा. सुंदर अनुवाद. आणखीन वाचायला आवडेल.

@ Sanjay Uwach, आभार ! मी यापूर्वी मंटोंची कथा 'करामत' इथे मिपावर प्रसिद्ध केली आहे. आणखी काही लघुकथांचे मराठी भाषांतर करीत आहे. अनिंद्य