Skip to main content

पूर्णब्रह्माचा अपमान!!

लेखक आनन्दा यांनी रविवार, 19/08/2018 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस पुण्यात एका नवीन हॉटेलची जाहिरात चालू होती.. त्या हॉटेलच्या मालकीण बाईंचा एक विडिओ पण बराच व्हाट्स अप वर देखील फिरत होता. विमानात veg food मिळालं नाही म्हणून तिने थेट रेस्टॉरंट टाकलं वगैरे. त्या प्रसिद्ध हॉटेलची फ्रेंचैझी पुण्यात चालू झाली होती, आणि बटाटेवड्यापासून पुरणपोळी आईस्क्रीमपर्यंत सगळं आहे असे कळलं. मग त्याचा आस्वाद घ्यायचा प्लॅन केला. अनायासे आज बिबवेवाडीत गेलो होतो. हॉटेल ला जायचं ठरवलं, पण रस्ता माहीत नव्हता, त्यामुळे गूगल मॅप वर सर्च केलं. आणि तिथूनच नाट लागायला सुरुवात झाली. मॅपवर 2 लोकेशन दिसली, एकाच भागात, त्यातलं एक निवडलं, आणि निघालो, तिथे पोचलो तर कळलं की हे हॉटेल या गल्लीत नाहीच, शेजारच्या गल्लीत आहे.. बरं शेजारची गल्ली म्हणजे कशी, तर सातारा रोड वर बाहेर यायचं, रांका पासून मार्केट यार्ड पर्यंत जायचं, आणि U टर्न मारून परत यायचं. आणि मग शोधत शोधत जायचं, रस्त्यावर बोर्ड नाही, एक बोर्ड होता तो झाडात लपलेला, कसाबसा तो मिळाला, आणि आम्ही आत गाडी टाकली. गाडी लावणे म्हणजे मोठे दिव्य होते. झाडांच्या मधून जागा शोधून गाडी लावायची, नो पार्किंग असिस्टंट. तिथे एक बाई होती ती आम्हाला बघून आत निघून गेली. बाहेर मेनू लावलेला होता पालकाची भाजी, लाल भोपळा, पुरणपोळी, कढी वगैरे. मेनू बघून आत जाऊ की नको असा प्रश्न पडला होता, पण केव्हातरी जायचेच आहे तर आताच जाऊया म्हणून गेलो. आत गेल्यावर पुणेरी पद्धतीने थंड स्वागत झालं, फक्त इतकंच कळलं की यांच्याकडे थाळी आणि इतर मराठी पदार्थ पण आहेत. एकंदर वातावरण बघून बायको तर परत जाऊया म्हणत होती, पण तिला थांबवलं. आणि मेनुकार्ड मागवलं. एका इंजिनीरिंग च्या पुस्तकाएव्हढं मेनूकार्ड होतं.. साधारण चाळल्या वर इतकं कळलं की आज 350 रु वाली महालक्ष्मी थाळी आहे. *लिमिटेड थाळी - 3 पोळ्या, एक पुरणपोळी, भोपळा, पालक, कढी, वरण, भात, लोणचे, चटणी, भजी, साबुदाणा वडा, पापड इत्यादी. थाळी लिमिटेड, किंमत 350 रु* . खरे तर शहाण्या माणसाने इथेच मागे फिरायला हवे होते, पण विनाशकाले विपरीत बुद्धी. आम्ही 2 थाळ्या ऑर्डर केल्या आणि बसलो. जेवण आलं, आता आपण लिमिटेड पदार्थांचा आस्वाद घेऊ. *साबुदाणा वडा -* मोठ्या पेढ्याइतक्या आकाराचे 2 वडे. टेस्ट ओके. काकडीची कोशिंबीर - फ्रीजमध्ये साठवलेल्या काकडीची कोशिंबीर असावी बहुतेक. ठीक म्हणावी इतपत. *पुरणपोळी 1 नग -* 100 टक्के फ्रोझन पोळी गरम करून दिली असणार. आम्ही त्याला एक फुलकाच समजत होतो, पण तो थोडा गोड होता, म्हणून त्याला पुरणपोळी म्हणणे भाग होते. जाड पापुद्रा, पुरणाचा अभाव, आणि खात जावे तशी चामट होत जाणारी. ज्यांनी अमेरिकेत मिळणारी फ्रोझन पोळी खाल्ली असेल त्यांना नक्की कळेल. पुण्यात त्या पदार्थाला पुरणपोळी म्हणण्याची हिंमत मी करु शकत नाही. *साधी चपाती -* 3 चपात्या, थोड्या जास्त भाजलेल्या, आणि गार होतील तश्या चामट होत जाणाऱ्या. या पण फ्रोझन असाव्यात. तिसरी चपाती, जी गार झाली ती चावतच नव्हती. एक गोष्ट सांगायची राहिलीच, पहिली चपाती अर्धी खाऊन झाल्यावर त्यांनी *वेलकम ड्रिंक* आणून दिले, guess what? एक कटिंग चहा इतके ताक!! म्हणे वेलकम ड्रिंक. हे वेलकम ड्रिंक बघून अक्षरशः डोळे पाणावले. फोटो काढायचा मोह कटाक्षानं आवरला. हं, तर पुढचे पदार्थ *भजी* - सुपारीच्या आकाराची 3 भजी. मीठ वाढतो तितकी शेंगदाण्याची चटणी आणि मेतकूट. *भोपळ्याची भाजी -* सालीसकट केलेली लाल भोपळ्याची भाजी, जी अर्धी मी बटाट्याचा रस्सा समजून खाल्ली, अर्ध्यात बायकोने आठवण करून दिली की तो भोपळा आहे! *पालक रसभाजी* - दाणे, खोबरं आणि मसाला घातला की काहीही खपतं असा त्यांचा बहुधा गैरसमज असावा. त्यात पालक शोधावाच लागत होता, पण त्यातल्या त्यात तीच चांगली लागत होती . *कढी -* आंबट दही तसेच घट्ट घुसळून त्याची कढी केलेली. ना आपण घरी करतो तशी मिरचीची फोडणी वगैरे असलेली होती, किंवा ना कढी खिचडी सारखी. मेस मध्ये असते तशी चव साधारण होती. आणि खारट! *वरण* - खारट! *आणि भात!!* तो सुंदर असणार, कारण त्यांनी तो दिलाच नाही. आम्ही पण मागायला गेलो नाही! इतकं सुंदर जेवण जेऊन पोट भरलं होतं!! आपण अन्न हे पूर्णब्रह्म म्हणतो, पण साडेतीनशे रुपयात असले जेवण विकणे हा त्या पूर्णब्रह्माचा अपमान आहे! परदेशात चालेल हे असले जेवण, पण पुण्यात तर नाहीच नाही! आता सर्विस बद्दल बोलूया - *अत्यंत मितभाषी स्टाफ* असणार! कारण *आम्हाला जेवण दिल्यावर कोणी ढुंकून सुद्धा बघितलं नाही* . हवं नको वगैरे फारच लांब राहिलं!! जेवण झाल्यावर बिलाचे पैसे द्यायची वेळ आली, बिलात 350 रु ची थाळी आणि वरती सर्विस टॅक्स बघून माझी सटकलीच होती.. *जी एस टी सकट 735 रु फक्त!* *बिल देताना विचारले, की आजच्या थाळीत भात होता का? तर फक्त सौजन्याने त्यांनी विचारले, तुम्हाला मिळाला नाही का? (सॉरी वगैरे जाऊदे, पण पुढे बोलणे पण नाही, किमान आतल्या माणसाला काय झाले आहे ते विचारावे इतकीच अपेक्षा होती)* केवळ मला भांडायची इच्छा नव्हती, त्यामुळे शांतपणे मी पैसे देऊन बाहेर निघालो होतो, पण तेव्हढ्यात त्यांनी कळ काढली!! मला त्या बाई पुढच्या वेळेस आलात तर डिस्काउंट कूपन देते म्हणून सांगू लागल्या!! मग मात्र माझी सहनशक्ती संपली. शांतपणे मी त्यांना म्हणालो, काळजी करू नका, मी परत येणार नाही!!

वाचने 85608
प्रतिक्रिया 194

प्रतिक्रिया

In reply to by माहितगार

खरे आहे.. सामान्यपणे मी तेच करतो. पण त्या दिवशी फसवणूक, अपमान, अपेक्षाभंग वगैरे अनेक भावना साठल्या होत्या ज्याचा परिपाक म्हणून सोशल मिडिया पोस्ट घडली. कधी वाटते मझे चुकले की काय. पण त्या दिवशी फेसबूक वर टाकल्यावर ज्या पोस्ट आल्या त्यातून असे जाणवले की पुण्यात तरी हॉटेलच्या मॅनेजमेंटने या गोष्तींचा विचारच केलेला नाही. असंख्य लोक त्यांना फीडबॅक देऊन आलेत, पण त्यांची क्वलिटी तशीच आहे. त्यामुळे त्याना कोणीतरी असा प्रसाद देणारच होते. योगायोगाने ते काम मझ्याकडुन घडले इतकेच. दुसरे म्हणजे, जेव्हा त्यानी सोशल मिडिया चा जाहिरातीसाठी वापर केला तेव्हा त्यानी हा विचार करायला हवा होता की जर आपण तो दर्जा देऊ शकलो नाही तर हे सारे प्रकरण आपल्या अंगाशी येऊ शकते. तेव्हाची मिळालेली गुड पब्लिसिटी चांगली आणि ही वाईट असे नाही चालणार. आणि तसेही बाइ मराठी मानसाना त्यांच्या चिन्धीगिरीसाठी शिव्या घालताना दिसतातच, त्यामुळे त्याना या साधनाच्या मर्यादा माहीत असाव्यात अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी. असो, हा माझ्यासाठी खुप मोठा लर्निंग अनुभव होता. लवकरच मी तो त्यांच्यासाठीच शब्दबद्ध करुन मांडणार आहे. शिव्या घालण्यापेक्शा काहीतरी कन्स्त्रक्टिव्ह करणे केव्हाही चांगले, नाही का?

In reply to by आनन्दा

असो, हा माझ्यासाठी खुप मोठा लर्निंग अनुभव होता. लवकरच मी तो त्यांच्यासाठीच शब्दबद्ध करुन मांडणार आहे. शिव्या घालण्यापेक्शा काहीतरी कन्स्त्रक्टिव्ह करणे केव्हाही चांगले, नाही का?
तुम्ही सोशल मिडियावर लिहिलेत त्या बद्दल काहीच म्हणणे नाही, पण सोबत त्यांच्या मुख्य मॅनेजमेंटला लिहिणेही उत्तम. हवे तर आता पर्यंत आलेल्या निवडक फिडबॅकची जंत्री बनवून दिल्यासही हरकत नाही. तो युट्यूब मधले सादरीकरण पाहून आभिमान आणि आत्मप्रौढी मधला फरकही कुणितरी नजरेस आणून देणे गरजेचे असावे असे मलाही वाटले. पण शेवटी कुणि मराठी उद्योजक प्रयत्न करताहेत तेव्हा आपण फुल न फुलाची पाकळी एकदा कल्पना देऊन पहावी एवढेच.

' तो ' व्हिडिओ पाहून सुद्धा त्या थंड बाईच्या थंड हॉटेल मध्ये थंड जेवण करायला धागा मालक गेलेच कसे ? हा मुख्य मुद्दा आहे . व्हिडिओ पहिल्या नंतर त्या ऍरोगंट बाईच्या हॉटेल मध्ये पैसे घालवून जेवण करणे शुद्ध मूर्खपणा आहे तरीपण बाकी मिपाकरांना सावध केल्या बद्दल धन्यवाद .

खरे तर परवा पूर्णब्रह्म वर पोस्ट टाकल्यावर इतका गदारोळ होईल अशी अपेक्षा नव्हती. बऱ्याच लोकांनी मला पाठिंबा दिला तर काही लोकांनी तू मुद्दाम नेट-पिकिंग करतोयस असे आरोपही केले. मी देखील स्वतःचे परीक्षण केले. कदाचित हे हॉटेल इतके खराब नसेल ही, किंबहुना ते तसे नसावे अशी मला देखील अपेक्षा आहे. म्हणून मग माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी अजून एक लेख लिहायचा निर्णय घेतला. साधारण 10 वर्षे मी पुण्यात वेगवेगळ्या मराठी रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेवत आहे. अगदी गिरीजा आणि आनंदी पासून मयूर, पंचवटी आणि सुकांता पर्यंत सगळ्या थाळ्या मी टेस्ट केल्या आहेत. आणि पूर्वी देखील कुठेतरी लिहिल्याप्रमाणे या सर्व थाळ्या एकसुरी आहेत, म्हणजे त्याच भाज्या, कोशिंबिरी, आणि मुख्य म्हणजे स्वीट चे तेच ते प्रकार. श्रीखंड, गुलाबजाम, फ्रुटसलाद किंवा बासुंदी. पुरणपोळी किंवा मोदक म्हणजे चैन अशी स्थिती काही दिवसांपूर्वी होती, सध्या थोडा फरक पडलाय. राजस्थानी असेल तर सोबत जिलबी आणि अन्य काही वेगळे स्वीट असतात. महाराष्ट्रात डेलिकेसी इतक्याच आहेत का? कोकणातच श्रावणात होणारे वेगवेगळे प्रकार बघितले तरी 10 तरी वेगळे पदार्थ मिळतील. पण कोणत्याही कारणाने का असेना हे पदार्थ इथे मिळतंच नाहीत, त्यामुळे या साऱ्या थाळ्या मध्ये एकप्रकाराचा एकसुरीपणा आहे. या पार्श्वभूमीवर अश्या प्रकारच्या वेगवेगळ्या डेलिकेसी देणारे एक मराठी रेस्टॉरंट सुरू करावे असे साधारण 3-4 वर्षे डोक्यात चालू आहे, पण इतर अनेक जबाबदाऱ्या आणि काही कारणाने ते जमत नाहीये.. पण त्याची रूपरेषा माझ्या डोक्यात होती.. योगायोगाने जयंती कठाळे यांचा स्वयं मधला व्हिडिओ कुठेतरी पाहण्यात आला, आणि कुठेतरी आत भिडला. असं जाणवलं की माझ्या स्वप्नात हे हॉटेल आहे, तेच या ताई प्रत्यक्षात आणत आहेत.. तेव्हाच ठरवलं होतं की केव्हातरी या नेमकं काय करतायत हे बघायला हवे. त्यावेळेस हा फ्रेंचैझी वगैरे प्रकार डोक्यात नव्हता, पण जयंती कठाळे या माझ्या रोल मॉडेल होत्या, या बाबतीत. पुण्यात जेव्हा यांचं उदघाटन झालं तेव्हा मी नेमका दुसऱ्या कामात स्वस्त होतो, आणि तसे बिबवेवाडी लांबही होते, त्यामुळे जाणे झाले नाही. म्हणून शेवटी एका रविवारी संध्याकाळी तळजाई आणि पूर्णब्रह्म असा प्लॅन केला. पण तिथे जाण्यापासून धक्क्यावर धक्केच बसत गेले आणि त्याची परिणती एका मोठ्या पोस्टमध्ये झाली, ज्याचा मला स्वतःलाच खूप त्रास झाला.. विचार करत गेलो तसे मला कळत गेले की कुठे काय चुकत गेले ते. नुसते जेवण खराब असते तर मला इतका त्रास झाला नसता. मी काउंटरवर सांगून बाहेर पडलो असतो की मला जेवण नाही आवडलं, पण यावेळेस योगायोगाने चेन ऑफ इनसिडेंट घडत गेली, ज्याने शेवटी कडेलोट झाला, त्यामुळे मी आता या सगळ्या गोष्टी एक एक करून घेणार आहे, काय चुकलं, आणि काय करता आले असते ते. या सगळ्या सांगण्यामध्ये एका मल्टिनॅशनल चेन माझ्या काय अपेक्षा होत्या ते ही मी विशद करीत जाणार आहे. सुरुवात झाली ती navigation पासून, गूगल मॅप वर दोन लोकेशन असणे हे धंद्याच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. विशेषतः जेव्हा येणाऱ्याला 4 सिग्नल फिरून यावे लागते तेव्हा. आणि हॉटेलच्या नावाचा साइन बोर्ड रस्त्यावर व्यवस्थित असणे आवश्यक आहे. हॉटेल शोधायला आम्हाला साधारण 25 मिनिटे लागली, यावरून ते किती कठीण होते याचा अंदाज येईल. पत्त्यामध्ये जवळची लँडमार्क असणे आवश्यक आहे. मला त्या हॉटेलात जायचेच होते म्हणून मी शेवटी ते हॉटेल शोधून काढले. पण आत गेल्यावर साधारण 20x20 च्या जागेत गाड्या लावायच्या होत्या, आणि त्यात मध्यभागी 2 आंब्याची झाडे होती. ती झाडे चुकवून माझी 4.25 मीटरची गाडी लावायची होती. आणि ती देखील अन्य कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन. बाहेर बसलेल्या एक ताई आमची गाडी बघून आत निघून गेल्या. मग मी थोडं मागे पुढे करुन गाडी लावली, ती बहुधा नीट लावली गेली नव्हती, पण माझा नाईलाज होता. यात काय सुधारणा करता येऊ शकते? आखलेले पार्किंग हा यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. आखलेले पार्किंग असते तर नेमकी कशी गाडी लावली की रस्ता अडणार नाही हे मला कळले असते. पुढची गोष्ट मेनू ची - माझ्या माहितीनुसार हे मुख्यतः a la karte रेस्टॉरंट आहे, मग थाळी ची जाहिरात का? लिमिटेड थाळी ही एक कोम्बो ऑफर आहे, पण हॉटेलचा USP वेगवेगळे पदार्थ हा आहे. पण बाहेर लावलेला खानावलीसारखा "आजचा मेनू" हा एका थाळी रेस्टो चा फील देत होता. मेनू मध्ये देखील थाळी ची व्हरायटी पहिल्या पानावर, आणि मग थाळी तुम्हाला नको असेल तर बाकीचे पदार्थ अशीच मांडणी होती, त्यामुळे आम्ही थाळी ऑर्डर करणे साहजिक होते. काय सुधारता येईल? तुमचा USP काय आहे ते आधी ठरवा, थाळी असेल तरच थाळी ठेवा, नाहीतर a la karte असेल तर ते हायलाईट करा. आधी तो बाहेरचा फलक काढून टाका, ते तुमच्या स्टॅंडर्ड ला शोभत नाही. आता कस्टमर एंगेजमेंट बद्दल- हे माझ्या आयुष्यातले पहिले रेस्टो होते जिथे जेवण दिल्यानंतर कोणीही काही विचारायला आले नाही.. सामान्यपणे एखादा कस्टमर आल्यावर आपण त्याला आपल्याकडील सर्वोत्तम ऑफर करतो.. मला बाहेर पडताना दिसले की हॉटेलमध्ये अतिशय सुंदर भारतीय बैठक होती. पण ती मला दिसलीच नाही. माझ्याकडे छोटी मुलगी होती, जिने टेबलावर धिंगाणा घातला. खरे तर अश्या वेळेस हॉटेलमालक स्वतः होऊन काय सुटेबल आहे ते सजेस्ट करतात. थोडेसे प्रोऍक्टिव्ह कस्टमर management करायला हवी.. त्याचप्रमाणे गिऱ्हाईकांचे पान रिकामे व्हायला लागले की नवीन पदार्थांची ऑर्डर मिळायची संधी असते. पण ते तितकेच लिमिटेड नाही, तर त्या निमित्ताने फीडबॅक पण मिळतो. जर तेव्हा मला कोणी ऑर्डर विचारायला आले असते तर मी तिथेच बोललो असतो की मला जेवण आवडले नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे, आणि मला वाटतं हा अप्रोच ठेवला तर माझ्यासारखे बरेच unhappy customers तिथेच mitigate होतील. आठवा, UPA2 का पडलं, त्यांना ऐकू जात नव्हतं.. बाकी जेवणाबद्दल अगोदरच बोलून झाले आहे, त्यामुळे परत बोलत नाही, फक्त काही गोष्टी नमूद करतो 1. फ्रीजमधली काकडी काढून किसणे, आणि संध्याकाळच्या कोशिंबिरीसाठी सकाळी काकडी किसून फ्रीजमध्ये ठेवणे, याने चवीत खूप फरक पडतो. 2. त्याचप्रमाणे फ्रिजमधून पुरण काढून पोळी लाटणे आणि सकाळी पोळी करून अर्धी भाजून मग संध्याकाळी पुन्हा गरम करणे, याने चवीत खूप फरक पडतो. असे जर तुम्ही करत नसाल तर पोळ्या का चामट होतात यावर अभ्यास केलाच पाहिजे. मी प्रामाणिकपणे सांगतो, शेवटची पोळी खायला आणि तोडायला त्रास होत होता. तुम्ही कदाचित 2-2 महिने फ्रीज करत नसाल, पण पोळी अर्धी भाजून ठेवल्याने पोळीची वाट लागते. परदेशामध्ये हेच करतात, आणि म्हणून तिथल्या तसल्या पोळ्या खाणाऱ्यांची पोटे बिघडतात. 3. मीठाचा वापर कमी असलेलाच बरा. कढी आणि वरण मी केवळ खारट असल्यामुळे खाऊ शकलो नाही. 4. मोठ्या वाट्या भरून लिमिटेड देण्यापेक्षा छोट्या वाट्या भरून द्या आणि परत सर्व करा. सर्व करायचे कष्ट वाचवायचे असतील तर भरलेल्या वाट्या टेबलावर ठेवा. लोक पाहिजे तर घेतील. पण केवळ पानात आहे म्हणून माझ्यावर वाटीभर वरण संपवायची सक्ती कशाला? असो, बोलण्यासारखे बरेचकाही आहे, पण किती बोलणार? फक्त आमच्या तुमच्याकडून थोड्या जास्त अपेक्षा आहेत हे कृपया ध्यानात घ्या आणि मुख्य म्हणजे पुण्यात तुमची स्पर्धा सरावना भुवनशी नसून श्रेयस पंचवटी कृष्णा सुकांता किंवा दुर्वांकुर बादशाही आणि स्वीकार शी आहे इतके लक्ष्यात असू द्या म्हणजे झाले. इत्यलम।

In reply to by आनन्दा

थोडक्यात 'व्हॅल्यू फॉर मनीचा अभाव' म्हणता येइल. हे पुर्ण्ब्रह्मा चेनचे स्वतःच्या मॅनेजमेंटकडुन चालवले जाणारे असल्यास फारच वाईट स्थिती म्हणावी लागेल. पण माझ्या अंदाजाने बढाईत बुडालेली मुख्य कंपनी प्रत्यक्षात सपोर्टला कमी पडते, सपोर्ट कमी झाला अथवा अपेक्षीत उत्पन्न हाती लागले नाही की फ्रँचाईझी इंटरेस्ट कमी होतो, मलातरी इनिशीयल इंटरेस्ट संपलेल्या फ्रँचाईजीची केस असण्याची शक्यता अधिक वाटतीए. असो.

In reply to by आनन्दा

आपल्या मुद्द्यांशी अगदी सहमत आहे. ग्राहक म्हणजे मी राजा आहे अशी वागणूक द्यावी अशी अपेक्षा नाही, पण सौजन्यपूर्वक बोलणे, अभिप्राय दिल्यास त्याची वेळीच दखल घेणं महत्वाचं आहे. उत्तम जेवण मिळावं ही अपेक्षा अगदीच रास्त आहे. त्यातूनही एखाद्या दिवशी काही अपरिहार्य कारणांमुळे काही वाईट अनुभव येऊ शकतो पण अशा वेळी ग्राहकांशी नीट संवाद ठेवणं अपेक्षित आहे असं वाटतं. पुण्यात बऱ्याच महाराष्ट्रीयन जेवणाच्या ठिकाणी अभिप्राय दिला तरी 'आमच्याकडे असंच असतं' असा आविर्भाव असतो, पण जवळपास सर्व ठिकाणी बहुतांश लोकांना आवडेल असे जेवण असते त्यामुळे चालून जातंय.

In reply to by आनन्दा

आनंदराव तुम्हाला त्या हॉटेलचा अनुभव सर्वतोपरी वाईट आला हि वस्तुस्थिती आणि त्याबद्दल तुम्ही मुद्देसूद लिहिले आहे मग त्याबद्दल तुम्ही स्वतःला दोषी वाटून घेण्याचे कारण नाही. त्या "ताई"नि जर आपलीच लाल म्हणून व्हिडीओ प्रसारित केला आणि सार्वजनिक न्यासावर आपली भलामण करणारे लेख लिहिले असतील तर त्याचा वाईट अनुभव सुद्धा प्रसारित होणारच आणि व्हायलाच पाहिजे. एकदा खिडकीत बसले कि खालून लोक शुकशुक करणारच, म्हणून कुणाला चिडण्याचे कारण नाही. असा अभिप्राय घेऊन त्या ताईंना सुधारायचे आहे कि इडली वाल्या कामतांच्या वाटेवर जायचे आहे हे त्यांनी ठरवायचे आहे. तुम्ही कुणाला आपल्या लेखनाचे समर्थन देण्याचे कारण नाही.तुम्ही दमड्या मोजल्या आहेत चिंचोके नाहीत. भिकार असेल तर भिकारच म्हटले पाहिजे उगाच मारुतीच्या बेंबीत बोट घालून इतरांना खड्ड्यात पाडण्यात हशील नाही.

नुकतेच सुरू झाले आहे, स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराकडून धनेश्वर कडे जाताना डाव्या हाताला जेमतेम पन्नास पावलांवर पहिल्या मजल्यावर आहे. रोज बदलता मेनू असतो, मिष्टान्न अमर्यादित तरी वाजवी दरात , अनुभव हीच खात्री, फक्त सोमवारी बंद, आणि हो चतुर्थी ला उकडीचे मोदक असतात अनुभवी नाखु

In reply to by नाखु

पंडित कुलकर्णींचे ना? चांदीच्या ताटात वाढतात ते? आम्ही वर्षानुवर्षे त्यांच्याकडून स्वयंपाक मागवतो..उत्तम चव! परवाच मासवडी, पुरणपोळी, मसालेभात वगैरे जेवण मागवलं होतं. छानच होतं. Ss

In reply to by पिलीयन रायडर

व्हाट्सऍप वरची पोस्ट बघून दोनच दिवसांपूर्वी ट्राय केले, खेदाने सांगावे वाटते अजिबात चांगले वाटले नाही जेवण. साधारणपणे आमच्या हापिसात असतात तसल्या पोळ्या, पिठले, मटार रस्सा, मसालेभात, कढी यापॆकी काहीच व्वा म्हणण्यासारखे नव्हते. खव्याच्या पोळ्या म्हणून जे काय होते ते बाहेरून आणलेले पेढे + बेसन असे काहीसे मिश्रण घातल्यासारखे वाटत होते. आणि ओल्या नारळाच्या करंजीत घालायचे सारण हा हि एक गोड पदार्थ असतो हे माहितीच नव्हते, नारळाचा हलवा कि काहीतरी नाव दिले होते. त्यांचे वैयक्तिक केटरिंग कसे असते ते माहिती नाही, पण थाळी नाही आवडली. अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव असू शकतो. सध्या चिंचवड मध्ये अगदी आवर्जून (माझ्यामते) खाण्यासारखी थाळी म्हणजे "रागा" थाळी. चिंचवड स्टेशन चौकात द्वारकादास शामकुमारच्या समोर, जस्ट कॅजुअल्स च्या बाजूला. छान व्यवस्था आणि छान जेवण. उगाच भरमसाठ पदार्थांचा भडीमार न करता ताटातले सगळे पदार्थ (आणि खासकरून भाज्या) खाता येतील असा मेनू. दोन स्वीट्सपैकी बरेच वेळेस उकडीचे मोदक + तूप हे एक असते. थरमॅक्स चौकातील संस्कृती डायनिंग हॉल पण ट्रे करण्यासारखा आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हो? अरेरे... मी स्वतः थाळी नाही खाल्ली जाऊन पण केटरिंग मात्र अनेक वर्ष झाले घेत आहोत.. डांगे चौकात रसरंग की असेच काही तरी नाव असलेले हॉटेल आहे. तिथे पण बरी थाळी मिळते असं आई म्हणत होती.

In reply to by पिलीयन रायडर

रसगंध नाव आहे. मी एकदा गेलो होतो. चांगले आहे पण अप्रतिम नाही. भाज्या ठीक वाटल्या , बाकी पदार्थ तुलनेने चांगले होते .नेमकं आठवत नाही पण बहूधा छोटे बटाटेवडे होते , ते चांगले होते. गोड पदार्थ काय होता आठवत नाही पण चांगला होता. पण अगदी आवडीने खावीशी वाटावी अशी एकही भाजी वाटली नाही त्यामुळे नंतर पुन्हा गेलो नाही. तरी अजून एखाद वेळेस जाईन कधीतरी.

बाईंनी मोठ्या घमेंडीत सांगितले की त्या हल्ली फक्त नऊवारीत वावरतात. पण नंतर बोलताना मुले त्यांना ममा की मामा असे म्हणतात असे कळले. नऊवारी साडी नेसलेल्या आईला आई म्हणणे मागासलेले वाटते का की पोरे तिला ममा म्हणणे पसंत करतात? बाईंची भाषाही अशुद्ध आहे. "मी गेली होती" "मी वापस गेली" वगैरे हे कुठले मराठी आहे? नागपूर? डी एस केंची काही भाषणे ऐकली आहेत त्यातही असाच एक अहंकार जाणवतो. पण थोडा सौम्य. बाईंचा अहंगंड म्हणजे त्यापुढे गगनही ठेंगणे!

In reply to by हुप्प्या

...बाईंची भाषाही अशुद्ध आहे. "मी गेली होती" "मी वापस गेली" वगैरे हे कुठले मराठी आहे? नागपूर?...
उर्वरीत टिका ठिक, पण अशुद्ध भाषाशास्त्राचे येथे प्रयोजन साशंकीत असावे किंवा कसे.

In reply to by हुप्प्या

अहंकारापाई त्या बाईने माती खाल्ली हे व्हिडिओ मध्ये दिसलेच होते . ' आमची कुठेही शाखा नाही ' नंतर आता असले व्हिडिओ म्हणजे स्वकौतुक करण्याचा नवीन प्रकार दिसतोय जे व्यवसायाला मारक आहे . स्वकौतुक करणारे कुठल्याही जातीधर्माचे किंवा गरीब , श्रीमंत असुद्या ते डोक्यातच जातात . कष्ट करून बांधकाम क्षेत्रात नाव कमावलेला डी एस के साळसूदपणे गुंतवणूकदारांचे पैसे अवैधरीत्या त्याच्याच वेगवेगळ्या कम्पन्या मध्ये फिरवत होता हे तपासात सापडले च ना ? बरं ही फिरवा फिरवी करताना वर परत अहंकाराचीच भाषा .

मी काय म्हणतो. महाराष्ट्रीयन लोक खास ठरवुन मराठमोळे जेवण देणार्‍या होटेलात का जातात? म्हणजे कधीतरी लहर आली थाळी खायची, बाहेर पडलोच आहोत, चला हॉटेलात असे म्हणुन महाराष्ट्रीयन थाळी खायला जायचे समजु शकतो किंवा घरी काही कार्यक्रम आहे, बरेच लोक येणार आहेत कुठे घरी करत बसणार म्हणुन थाळी पार्सल आणले समजु शकतो किंवा म्हातारे कोतारे असलेला ग्रूप आहे आणि त्यांना पार्टी द्यायची म्हणून महाराष्ट्रीय थाळी खायला गेलो हे पण कळु शकते. पण मुद्दाम ठरवुन, महाराष्ट्रीय जेवणाचा आस्वाद घ्यायचा म्हणुन २५ मिनिटे शोधत थाळी खायला जावेच कशाल? रोज घरी खाणारे पदार्थ खायला? असो. लेखाच्या निमित्ताने काही पुणेद्वेष्ट्या लोकांनी नेहमीप्रमाणे हात धुवुन घेतले आहेत. चांगली महाराष्ट्रीयन थाळी कुठे मिळते याची काही उत्तरे: १. फडके डायनिंग हॉल (शैलेश रसवंती जवळ, एसपी कॉलेजच्या समोरच्या गल्लीत. २. दुर्वांकुर ३. शबरी ४. श्रेयस ५. आशा डायनिंग हॉल ( थाळी म्हणाण्यापेक्शा राइस प्लेटला जवळची). ६. पुना बॉर्डिंग ७. पुणे गेस्ट हाउस वगैरे वगैरे वगैरे पुण्यात वर्‍हाडी, खानदेशी पदार्थ देणारी हॉटेल्स पण ढिगाने आहेत. अर्थात ती फार प्रसिद्ध नाहित कारण एवढा जळजळीत माल पुणेकरांना मानवत नाही. शिवाय मागणीप्रमाणे पुरवठा असतो. जर मुळात मासवडी खायची इच्छा होणारे लोकच हाताच्या बोटावर असतील तर हॉटेल वाला कश्याला तोट्यात जाण्यासाठी उफराटे धंदे करेल. शिवाय मला हे कळत नाही वळचणीतल्या कुठल्यातरी गावातुन येउन " च्यामारी आमच्या ***** सारखे ***** मिळत नाही पुण्यात" असले गळे काढुन काय उपायोग? पुणेरी (पद्द्धतीचे) जेवण तुझ्या गावात मिळते तरी का रे? बाकी पुण्याला खाद्यसंस्कृती शिकवणे म्हणजे सामान्य माणसाने देवाला धर्म, आनंदला बुद्धीबळ आणि तेंडुलकरला क्रिकेट शिकवण्याएवढे हास्यास्पद आहे.

In reply to by मृत्युन्जय

माझा विषय मुळातच वेगळा आहे - मी त्या हॉटेलला थाळी खायला गेलो होतो असे तुमचे म्हणणे असेल तर तसे मुळीच नाही - मी का गेलो होतो ते पहा -
साधारण 10 वर्षे मी पुण्यात वेगवेगळ्या मराठी रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेवत आहे. अगदी गिरीजा आणि आनंदी पासून मयूर, पंचवटी आणि सुकांता पर्यंत सगळ्या थाळ्या मी टेस्ट केल्या आहेत. आणि पूर्वी देखील कुठेतरी लिहिल्याप्रमाणे या सर्व थाळ्या एकसुरी आहेत, म्हणजे त्याच भाज्या, कोशिंबिरी, आणि मुख्य म्हणजे स्वीट चे तेच ते प्रकार. श्रीखंड, गुलाबजाम, फ्रुटसलाद किंवा बासुंदी. पुरणपोळी किंवा मोदक म्हणजे चैन अशी स्थिती काही दिवसांपूर्वी होती, सध्या थोडा फरक पडलाय. राजस्थानी असेल तर सोबत जिलबी आणि अन्य काही वेगळे स्वीट असतात. महाराष्ट्रात डेलिकेसी इतक्याच आहेत का? कोकणातच श्रावणात होणारे वेगवेगळे प्रकार बघितले तरी 10 तरी वेगळे पदार्थ मिळतील. पण कोणत्याही कारणाने का असेना हे पदार्थ इथे मिळतंच नाहीत, त्यामुळे या साऱ्या थाळ्या मध्ये एकप्रकाराचा एकसुरीपणा आहे. या पार्श्वभूमीवर अश्या प्रकारच्या वेगवेगळ्या डेलिकेसी देणारे एक मराठी रेस्टॉरंट सुरू करावे असे साधारण 3-4 वर्षे डोक्यात चालू आहे, पण इतर अनेक जबाबदाऱ्या आणि काही कारणाने ते जमत नाहीये.. पण त्याची रूपरेषा माझ्या डोक्यात होती.. योगायोगाने जयंती कठाळे यांचा स्वयं मधला व्हिडिओ कुठेतरी पाहण्यात आला, आणि कुठेतरी आत भिडला. असं जाणवलं की माझ्या स्वप्नात हे हॉटेल आहे, तेच या ताई प्रत्यक्षात आणत आहेत.. तेव्हाच ठरवलं होतं की केव्हातरी या नेमकं काय करतायत हे बघायला हवे. त्यावेळेस हा फ्रेंचैझी वगैरे प्रकार डोक्यात नव्हता, पण जयंती कठाळे या माझ्या रोल मॉडेल होत्या, या बाबतीत.
मी पार्टीसाठी सहसा थाळीमध्ये जात नाही. कारण तेच आपण नेहमी खातो, पण संकष्टीचा उपास सोडायचा असेल, किंवा सार्‍या कुटुंबाला झेपेल असे जेवण हवे असेल तर थाळीमध्ये जातो. पण तिथे पण इतका एकसुरीपणा आहे की त्याचा कंटाळा आलाय. या ताईंनी काहीतरी वेगळे केलय असे त्यांचे व्हिडिओ बघुन वाटले, म्हणून केवळ मी तिथे गेलो, २५ मिनिटे शोध घेऊन. समोरच बासुरीसारखे सुंदर रेस्तो असताना. अर्थात तिथे जाऊन सगळा विचका झाला हा भाग वेगळा

In reply to by मृत्युन्जय

बाकी पुण्याला खाद्यसंस्कृती शिकवणे म्हणजे सामान्य माणसाने देवाला धर्म, आनंदला बुद्धीबळ आणि तेंडुलकरला क्रिकेट शिकवण्याएवढे हास्यास्पद आहे.
Aur ye laga sixer!! Sandy

खेड शिवापूर आणि पुढेमागे इतकी, घरगुती, गावरान, चुलीवरची, तुपातली (चिकन, मटण, वांगी सर्व शुद्ध घरगुती तुपात, लोण्यात इ.)... अशी हॉटेल्स आहेत की घरगुती, गावरान शब्द आलटून पालटून नजरेसमोर स्क्रोल होत राहतात. तिथे कधीकधी विचारावंसं वाटतं "मला शहररान, बाजारगुती, डालडायुक्त जेवण हवं आहे, कुठे मिळेल का या भागात?" ;-)

In reply to by गवि

अगदी अगदी अस्संच होतं गवि सर.. मलातर नेहमी "मला हॉटेलातलं चिकन खायचंय हो, घरातलं नाही" असं ओरडायची इच्छा होते.

विडिओ बघितल्यानंतर एक ना एक दिवस अशा प्रतिक्रिया वाचायला मिळतील असे वाटलेच होते :) इतर राज्यांतील लोक ह्या असल्या पुरणपोळ्या खातात आणि मग हमारे स्वीट्स खाके देखो वगैरे बढाया मारतात :). कसलाही मोठेपणाचा ढोल न वाजवता चविष्ट नॉन-व्हेज थाळी देणारे दाजी (दाजीचा ढाबा, रावेत-वाल्हेकरवाडी रोडवर) लै धान्य म्हणावे लागतील :).

देवाला प्रश्न विचारायचा प्रमाद पत्करून विचारू इच्छितो
पुण्यात प्रॉपर पुण्याचा म्हणावा असा कुठला पदार्थ खायला मिळेल ?
खास स्पष्टीकरण १. मला पुणे द्वेष असण्याचे काहीच कारण नाहीये २. पुणे पुणेकर वगैरेंपैकी कोणीच माझे कुठलेच घोडे मारलेले नाहीये. ३. पुण्यात मिळणाऱ्या उत्तम थाळी पद्धतीच्या जेवणाला कोणीच नावे ठेवलेली मला तरी खपणार नाही. ४. भिकार खायच्या जागांना भिकार म्हणल्यावर जळफळाट होऊन पुणेरीपण जागृत व्हायचं प्रयोजन समजलं नाही.

In reply to by जेम्स वांड

पुण्यात प्रॉपर पुण्याचा म्हणावा असा कुठला पदार्थ खायला मिळेल ? म्हणजे शिक्रण, मटारउसळ, काकडी कोशिंबीर (खमंग काकडी) इ. का?

In reply to by गवि

पण मटार उसळ, काकडीची खमंग फोडणी घातलेली (काकडी नीट कोचवून) कोशिंबीर वगैरे पदार्थ कुळधर्म कुळाचारच नाही तर इतरही वेळी पूर्ण महाराष्ट्रात खाल्ला जातो, अर्थात ह्यापैकी काही पदार्थांवर जातीय शिक्के पडतात खरे पण भौगोलिक दृष्ट्या ते काही पुण्याचे प्रॉपर वाटत नाहीत. मटार उसळ (पाव), वडापाव, पावभाजी वगैरे पदार्थ तर थेट मुंबईच्या गिरणीसंस्कृतीच्या भरभराटीच्या काळात उगम पावलेले पदार्थ होत. बेनिफिट ऑफ डाउट म्हणून शिकरण खाशा पुणेरी खाद्य मांदियाळीत अंतर्भूत करावं म्हणलं तरी (किमान) पश्चिम महाराष्ट्रातील कित्येक गावात ते पिढ्यानपिढ्या खाल्लं जातंय (दळणवळण साधने तितकीशी नसताना) कोणी पुण्याला येऊन शिकून गेलं असेल अशी शक्यता नसतानाही.

In reply to by जेम्स वांड

...पुण्यात प्रॉपर पुण्याचा म्हणावा असा कुठला पदार्थ खायला मिळेल ?
तो रेस्त्राँमधला गोग्गोड दहीवडा पुण्याबाहेर सुद्धा मिळत असणे शक्य असल्यास मला व्यक्तिशः कल्पना नाही इतरत्र मिळत नसल्यास प्रॉपर पुण्याचा समजता येईल का ? दुसरे प्रत्येक पदार्थात साखर हे वैशीष्ट्य पेठ-प्रादेशिक की समुह विशेष हे नेमके माहित नाही. या व्यतरीक्त अमृततुल्य आतशा लोपपावत चाललेला हा सेवा विशेष होता. बाकी उर्वरीत महाराष्ट्राच्या आहारात नसलेला चितळेंच्या बाकरवडी व्यतरीक्त पुणेरी पदार्थाची कल्पना नाही. अजून असतील तर जाणून घेण्यास उत्सुक.

In reply to by माहितगार

सोमेश्वर तिसऱ्या राजाच्या काळातील मनसोल्लास मध्ये दहिवाड्याचे उल्लेख सापडतात. त्यामुळे तो पुणेरी ओरिजिनल असणे शक्य नाही. आता साखरेची चव घालणे हे "स्थानिक व्हेरियेशन" म्हणून नक्कीच गणले जाईल पण मूळ पदार्थ नाही गणल्या जाणार. अमृततुल्य कदाचित समाविष्ट होईल, पण त्याचा इतिहास एकदा चाळून पहावा लागेल (प्रा. पुष्पेश पंत फॅन) वांडो.

In reply to by जेम्स वांड

दहिवड्यात साखरेची चव घालणे हे "स्थानिक व्हेरियेशन"
अ‍ॅज व्हेरीएशन तरी पुण्यापुरते मर्यादीत आहे की कोल्हापूर सातारा अथवा कोकणातही गोग्गोड दहिवडा मिळतो . उत्तर कर्नाटकात बराच फिरलो पण दहिवड्याची चव शोधून पहाणे त्यावेळेस सुचले नाही.
सोमेश्वर तिसऱ्या राजाच्या काळातील मनसोल्लास मध्ये दहिवाड्याचे उल्लेख सापडतात.
माहितगारगिरीबद्दल __/\__ * बाकी बाकरवडी बद्दल आपले कन्फर्मेशन मिळाले नाही. ती महाराष्ट्रात आणखी कुठे होत असे का ?

In reply to by माहितगार

मूळ महाराष्ट्रीयन पदार्थ नाहीये, गुजराती पदार्थ आहे अर्थात व्यावसायिक प्रकारे कुरकुरीत बाकरवडी बनविण्याचे श्रेय चितळ्यांना जातेच.

In reply to by जेम्स वांड

जिथे जास्त एकवटलेली असेल तिथे बाकरवडी बऱ्यापैकी माहितीची असावी. उदाहरणार्थ सांगली मिरज कुपवाड जिथे व्यवसायानिमित्त खूप गुजराती मारवाडी लोक स्थायिक झालेले आढळतील. विदर्भात पण असावेत, मी त्या भागात जास्त फिरलेलो नाही त्यामुळे माझ्या माहीतीत नाही

In reply to by जेम्स वांड

ओह तर पदार्थातील साखरेचे व्हेरीएशन सोडले तर, पुणेरी खाद्यसंस्कृती आयातीतच म्हणायची ! आपण मृत्यूंजयरावांच्या वाक्याची पहाता पहाता विकेट घेतलेली दिसतीए ;) बघा बुवा पुणेकरांनो :) काही स्वतंत्र स्थानिक पदार्थ शोधता येतो का ते !

In reply to by माहितगार

मिसळ ही अस्सल पुणेरी म्हणावी लागेल. मिसळीचं सर्वात जुनं हॉटेल वैद्यबुवांचं, सुमारे १०० वर्ष उलटूनही आजही चालू आहे. ह्याच्यापेक्षा जुनं मिसळीचं हॉटेल ऐकिवात नाही. मिसळ पण नेहमीसारखी नाही, आलंयुक्त पांढर्‍या मसाल्याची.

In reply to by प्रचेतस

शेवपाव वगैरे लेटेस्ट पदार्थ पण पुण्यातच प्रथम सुरु झाले. मासवडी बहुधा पुण्याचीच असावी म्हणजे शहरातली नसून नारायणगाव, मंचर वगैरे खेड-आंबेगाव तालुक्याच्या भागातली.

In reply to by प्रचेतस

आचार्य अत्र्यांच्या आत्मचरित्रात माट्यांच्या मिसळीच्या हॉटेलाचा उल्लेख आहे. तो काळ म्हणजे साधारण १९१० ते २५. त्यांचे इनोव्हेशन म्हनजे भाज्याचे तुकडे, पोह्याचा चिवडा आणि मसालेदार उसळीचा रस्सा ह्याचे फर्मास मिश्रण असा मिसळीचा उल्लेख आहे. अल्पावधीतच पुणेकरांना ह्या मिसळीचा लळा लागला. (पुण्याच्या तत्कालीन एका हॉटेलात वेगवेगळ्या खोल्या , वेटरना युनिफॉर्म, चकचकित बिल्ले आदि सोयी सुरु झाल्या पण वस्ताद पुणेकरांनी त्या वेटरना थोडे पैसे देऊन कमी बिल लावायला लावणे आदी गैरप्रकारामुळे ते क्रांतीकारी हॉटेलाने लवकरच गाशा गुंडाळला असाही उल्लेख आहे.) सध्यकालीन मिसळीतला महत्त्वाचा घटक म्हणजे फरसाण आणि शेव, कांदा हे त्या काळात नाही वापरले जात. आणि त्याकाळच्या मिसळीसम भजी,शेव आणि भाजी हे कामगारांचे खाद्य म्हणून जेथे जेथे कामगार वस्त्या होत्या (मुंबई, सोलापूर, इचलक्रंजी) तेथे तेथे प्रचंड लोकप्रिय होते, अजूनही आहे. भज्याऐवजी काही ठिकाणी वडे किंवा सुशीला किंवा पोहे दिले जात इतकेच. तस्मात सध्यकालीन मिसळीवर आमचीच म्हणून अधिकार वापरु नये हि विनंती.

In reply to by अभ्या..

भज्याऐवजी काही ठिकाणी वडे किंवा सुशीला किंवा पोहे दिले जात इतकेच. >> सुशीला हा कोणता पदार्थ आहे? पहिल्यांदाच ऐकतोय.

In reply to by परिंदा

जसे आपण जाड पोहे भिजवून फोडणी देऊन पोहे करतो, तसं चुरमुरे भिजवून घ्यायचे आणि त्याला फोडणी द्यायची. काही ठिकाणी ह्यात दाळवं सुद्धा घालतात. पटकन होणारा मस्त पदार्थ आहे हा. फक्त चुरमुरे भिजवून म्हणजे पातेल्यात पाणी घेऊन त्यात चुरमुरे टाकायचे. त्यातून हवा जात असल्याचा आवाज येतो. तो आवाज थांबला की चुरमुरे हलके पिळून घेऊन फोडणीत टाकायचे.

In reply to by गवि

नाही ओ, अगदी साबुदाणा भिजवल्यागत नाही ठेवायचे. चुरर झाले की निथळून घ्यायचे. मराठवाड्यात सगळ्या टपऱ्या हाटेलात सुशीला मिळतो. त्यावर सांबर भाजी टाकून देतात. प्लस शेव. नळदुर्ग आणि अनदुराला दोन उडपी भावाची हाटेले आहेत. इडली स्पेशल. तिथे एकदम पातळ चटणी इडलीवर टाकून देतात. वर शेव. सांबर सेपरेट वाटीत. बरेच जण ते घेतही नाहीत. तिथे सुशिल्यावर चटणी घालून देतात.

In reply to by प्रचेतस

मिसळीचं सर्वात जुनं हॉटेल वैद्यबुवांचं, सुमारे १०० वर्ष उलटूनही आजही चालू आहे.
ह्या आधारावर "वैद्य मिसळ हॉटेल" हे आज अस्तित्वात असलेले सर्वाधिक जुने मिसळ हॉटेल आहे, इतपत विधान करता येईल. ते आजही सुरू असल्यामुळे त्याचे ट्रेस नीट होतायत मागे इतिहासात, पण कळीचा प्रश्न हा आहे की मिसळ एक खाद्यपदार्थ म्हणून रस्सा, शेव-भजी-मसाला इत्यादी एकत्र करून (नीट फरसाणाच्या तिखटपणाला जोडीला मापून बनवलेला रस्सा वगैरे) करून तंत्रशुद्ध मिसळीची पाककृती /पहिली प्लेट नेमकी वैद्यांनी(च) ११० वर्षांपूर्वी शोधून काढली होती का नाही हा निष्कर्ष कसा काढणार?

In reply to by प्रचेतस

आमच्या अमरावतीत गड्डा मिसळ नावाचे एक हॉटेल होते. आता बंद झाले बहुतेक. २० वर्षांपूर्वी त्यांची तिसरी का चौथी पिढी ते हॉटेल चालवत होती. या हिशोबाने शंभर वर्षे त्यांनापण झाले असतील. झालेच आहेत असा माझा दावा नाही.पण मिसळीचे उगमस्थान शोधण्याच्या स्पर्धेत अमरावतीची उमेदवारी मान्य करावी (नंतर डिपॉझिट जप्त झाले तरी हरकत नाही.) ता.क. गड्डा किंवा अमरावतीच्या कुठल्याही हॉटेलमध्ये मिसळीसोबत (किंबहुना मिसळ,भेळ,भजे या कोणहोसोबत) पाव मिळत नाहीत. मिसळ नुसतीच हादडायची अशी इथली पद्धत आहे. त्यामुळे स्पर्धा मिसळ -पाव या पदार्थाची असेल तर अमरावतीची उमेदवारी स्वीकारण्यात येऊ नये.

In reply to by चिनार

च्यायला, म्हणजे मिसळ आमची हा पुणेकरांचा दावा "पहिला सार्वजनिक गणपती आमचाच" ह्या दाव्याप्रमाणे बोगस निघाला की.

In reply to by अभ्या..

पण "गुळचट मिसळ" ह्या पदार्थाचे उगमस्थान पुणे हेच आहे. पुण्यातले बेडेकर गुळचट मिसळवाले ह्याचे शोधकर्ता. मिसळीत गोडवा आणून मिसळीच्या मूळ स्वभावालाच हरताळ फसल्याने ह्या प्रकाराला स्थानिक व्हेरिएशन ह्या गोंडस नावाखाली खपवून पुण्याचे श्रेय हिरावून नये ही आग्रहाची मागणी. "गुळचट मिसळ" हा नवीन पदार्थ म्हणून स्वीकारण्यात यावा.

In reply to by चिनार

मिसळीत गोडवा आणून मिसळीच्या मूळ स्वभावालाच हरताळ फसल्याने ...
पुणेकरांच्या स्वभावातला गोडवा मिसळीत उतरला असेल हो.

In reply to by अभ्या..

मुळचे पुणेकर की नवीन आलेले? मुळचे सुधरण्याच्या पलिकडे गेलेत आणि नवीन आलेले त्यांची स्पर्धा करतायेत .

In reply to by अभ्या..

अथर्व वेद किंवा यजुर्वेद मध्ये मिसळीचा उल्लेख आहे ना ? त्यावरूनच तो उल्लेख इतर धर्म ग्रंथात घेतला आहे हे खरे आहे ना ?

In reply to by चिनार

कोणीही गड्डा मिसळीची आठवण ईथे काढेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. वा! वा ! मिसळी सोबत पाव खायची पध्द्त तेंव्हा रुढ व्हायची होती. कटींग चाय (ऑरेंज) - मिसळ हे काँबो प्रचलीत होते. चहाला ऑरेंज म्हणणारे मला अमरावती सोडून कुठेच दिसले नाहीत. आठ्वणी ताज्या केल्याबद्दल धन्यवाद चिनार भाऊ.

In reply to by चिनार

कालच अमरावतीला चक्कर झाली.. थोड्या चौकशीअंती असे कळले की, अमरावतीस्थित गड्डा मिसळ हॉटेल १९६५ च्या दरम्यान सुरु झाले. आणि साधारण ५ वर्षांपूर्वी बंद झाले. त्यामुळे मिसळ पदार्थ हा मूळ अमरावतीचा नाही. अमरावतीची उमेदवारी मागे घेण्यात येत आहे.

In reply to by माहितगार

ही नम्र विनंती
आपण मृत्यूंजयरावांच्या वाक्याची पहाता पहाता विकेट घेतलेली दिसतीए ;) बघा बुवा पुणेकरांनो :) काही स्वतंत्र स्थानिक पदार्थ शोधता येतो का ते !
बरेच दिवस मनात असलेली चर्चा नीट घडणार असेल तर घडू द्या की चार क्षण. माझं काही मृत्युंजय साहेबांशी वैयक्तिक वैर नाही किंवा मी पुणेद्वेष्टाही नाही. फक्त एक वाक्य ट्रिगर पॉईंट होतं चर्चा सुरू करायला

In reply to by जेम्स वांड

वाक्याची विकेट लिहिलय, मृत्यूंजय रावांची नव्हे हो. भांडणे करु नयेत, पण वादावे जरुर !! - हा मराठी बाणा चालवण्यात भूषण !

In reply to by जेम्स वांड

देवाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आगाऊपणे स्वतः देण्याचा प्रमाद करू इच्छितो.
पुण्यात प्रॉपर पुण्याचा म्हणावा असा कुठला पदार्थ खायला मिळेल ?
उत्तर : अपमान !! (आणि हा भल्याभल्यांना गिळता येत नाही) (आणखी एक प्रमाद: धाग्याचा विषय "पुण्यातले भिकार हॉटेल्स किंवा रसातळाला गेलेली पुणेरी खाद्यसंस्कृती" यापैकी किंवा तत्सम नसताना हा उडणारा तीर आपल्या ***/ छातीत का घेण्यात आला हे अनाकलनीय आहे)

In reply to by चिनार

मग हा रुचकर चविष्ट गरमागरम अपमान जसं लोकांना वाढता येतो तसं लोकांनी वाढल्यावरही गिळता आला पाहिजे. इत्यलम. बाकी उडते बाण घेण्यात तुम्हीही शौकीन दिसताय. असो असो!

In reply to by चिनार

प्रॉपर मुंबई चा , प्रॉपर कोलकाता चा , प्रॉपर दिल्ली चा वैगेरे कुठल्याही शहराचे पदार्थ माझ्या ऐकवीत तर नाही मग तिथे पुण्याचा टेंभा मिळवण्यात काय हशील ? सर्वात जुने मिसळचे हॉटेल पुण्यात असले म्हणून काय झाले ? त्या हॉटेल मधील मिसळीच्या चवीवर आणि कार्यपद्धती वर यथेच्छ टीका करणारे सुद्धा पुणेकरच आहेत ते सुद्धा सदाशिव नारायण मधले . राहिला प्रश्न महाराष्ट्रीयन थाळी चा . किती हॉटेल मध्ये महाराष्ट्रीयन थाळी चवदार मिळते ? विचार करून ! करून !! हातावरील बोटां च्या संख्ये पुढे आकडा जात नाही , जी थाळी सहज कुठल्याही हॉटेल मध्ये उपलब्ध होत नाही , व ज्या थाळीला बहुसंख्य ग्राहकवर्गा चा पाठींबा त्या थाळी चा झेंडा फडकवण्यात अर्थ नाही .

In reply to by ट्रम्प

अगदी असेच नाही. काही केसेसमध्ये डीटेल्स उपलब्ध आहेत. १. रसगुल्ला प्रथम कलकत्त्यात बनवला गेला. (१८६८ साल) २. वडापाव प्रथम मुंबईत बनवला गेला. (नक्की साल माहिती नाही) १. रसगुल्ला प्रथम कलकत्त्यात बनवला गेला. २. वडापाव प्रथम मुंबईत बनवला गेला.

In reply to by बॅटमॅन

१. रसगुल्ला प्रथम कलकत्त्यात बनवला गेला. (१८६८ साल)
के दास यांनी प्रथम बनवला असे मानले जाते, हे खरे. परंतु, आताशा ओडिशानेदेखिल "माजा नंबर पयला" म्हणून जी आय टॅग साठी क्लेम केला आहे. खरे काय ते चौकशीअंती समजेलच!
२. वडापाव प्रथम मुंबईत बनवला गेला. (नक्की साल माहिती नाही)
७० च्या दशकात सुरुवातीला, दादरात! तसेही, वडा-पाव हा काही स्वतंत्र खाद्यपदार्थ नाही. बटाटेवडा महाराष्ट्राततरी तत्पूर्वीही बनत होताच. पोर्तुगीज्/ब्रिटिश्/इराणी कृपेमुळे, मुंबईत पावदेखिल उर्वरीत महाराष्ट्राच्या मानाने प्रथम आला. तेव्हा दोन्ही पदार्थ एकत्र करून एक स्वस्त आणि पोटभरू पदार्थ बनवला गेला, हे मात्र खरे. * पहिल्या बाजीरावाच्या काळात बटाटावडा बनवला गेल्याचे पुसटसे वाचले होते. नक्की आठवत नाही.

In reply to by सुनील

बंगाल आणि ओडिशा यांच्यामधील रसगुल्ल्याच्या भांडणासंबंधी मी जवळपास सर्व बातम्या इ. वाचले आहे. रसगुल्ल्याचा इतिहास सांगणारे एक बंगाली पुस्तकही वाचले आहे. त्याबद्दल लिहिलेही आहे ते यथावकाश प्रसिद्ध होईलच. मुख्य मुद्दा असा आहे की सध्या जो रसगुल्ला बनतो त्याची बेसिक कन्सेप्ट जुनी असली तरी दूध फाडायची पद्धत नवीन आहे. या नव्या पद्धतीमुळे केलेला रसगुल्ला अगोदरच्या तुलनेत जास्त काळ टिकतो. या नव्या पद्धतीने बनवलेला रसगुल्ला प्रथम १८६८ साली बनवला गेला. बाकी बटाटेवडा महाराष्ट्रात कधी आला? १७०० साली सुरत इथे अखिल भारतात प्रथम बटाट्याचे पीक घेतले गेले असे वाचले आहे. तेव्हा तुम्ही म्हणता ते खरे असूही शकेल, परंतु त्याला निश्चित पुरावा पाहिजे. मिळाला तर फार बेस्ट होईल.

In reply to by बॅटमॅन

शिवाय, दूध फाडून त्याचे गोळे बनवून ते साखरेच्या पाकात तळले की जे काही तयार होते त्याला रसगुल्ला हे नाव १८६८ सालीच देण्यात आले. त्याअगोदर हे नाव प्रचलित नव्हते.

In reply to by बॅटमॅन

रसगुल्याचा पूर्वज खीर मोहन असावा. ही एक ओडिया मिठाई असून रसगुल्याप्रमाणेच छेना चेंडू पाकात बुडवून बनवली जाते. पारंपरिक उडिया पद्धतीत पाक गुळाचा (केशरी रंगाचा) असतो. हे चेंडू गुळाच्या पाकात भिजवून नंतर निथळून घेतले का ते झालं खीर मोहन आणि तसेच विक्री होईस्तोवर गुळाच्या पाकात मुरू दिले की झाले ते सुप्रसिद्ध ओडिया "पाहला रसगुल्ला". टीप - जातिवंत खवय्ये एकदा खीरमोहन/पाहला रसगुल्ला तोंडी लावला का नंतर पांढरे गुलाबजल/केवडाजल शिंपडलेले रसगुल्ले ढुंकूनही पाहणार नाही. हल्दीराम-बिकाजी वगैरेचे डबाबंद गोडमिट्ट अत्याचार तर दूरच राहिले.

In reply to by जेम्स वांड

म्हशीच्या दुधाला फाडून बनवलेला रसगुल्ला एका घासात ओळखेल आणि 'उडी बोका' म्हणून पानावरुन उठेल. अस्सल रसगुल्ले, खीर मोहन, पाहला वगैरे कायम गायीच्या दुधाचेच असायला हवेत. म्हशीच्या दुधाची मिठाई बंगाली खाताना दिसणे बांबूची फुले पाहायला मिळल्यागत दुर्मिळ योग आहे.