पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग३

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
9 Aug 2018 - 9:48 pm

आधीच्या भागांची लिंक
https://www.misalpav.com/node/43088
https://www.misalpav.com/node/43118
मागील प्रकरणात आपण बिस्मार्क, जर्मनीचे एकीकरण, जर्मन राष्ट्र उभारणी, कैसर विल्हेल्म दुसरा ह्याचे जर्मनीच्या राजकीय क्षितिजावर आगमन एवढा भाग पाहिला. इथून पुढे घडत जाणाऱ्या घटना ह्या युरोपियन राष्ट्र आणि सत्ताधार्यांची मानसिकता कशी होती आणि ती कशी बनत/ बदलत गेली त्यावर प्रकाश टाकतात ....
पहिले महायुद्ध!
प्रकरण १ भाग३

विल्हेल्म गादीवर आला तेव्हा बिस्मार्क चान्सेलर होता आणि जर्मन राष्ट्रपिता असल्याने त्याचा जर्मनीच्या राजकरणात तसेच त्याच्या धोरणी मुत्साद्देगीरीमुळे युरोपातही दबदबा होता. पण हेकट आणि आपलेच म्हणणे खरे करून दाखवायचा स्वभाव असलेल्या अननुभवी तरुण कैसरला हे पचणे शक्य नव्हते. बदलत्या काळाचे वारे बिस्मार्कालाही जाणवू लागले होते. जर्मनी संपन्न आणि बलाढ्य होत होता पण फार जास्त वेगाने आणि त्याला युरोपातल्या प्रभावशाली राष्ट्रात मानाचे स्थान हवे होते.(Germany’s rightful place in the Sun), त्याकरता अत्यंत संयम आणि धोरणी वागणुकीची गरज होती जी बिस्मार्क कडे खासच होती. पण जर्मनीत आपले स्थान बिस्मार्क पेक्षा दुय्यम आहे आणि आधुनिक लोकसत्ताक पण नावाला राजेशाही मिरवणाऱ्या देशात ते तसेच राहणार आहे हे कैसरच्या पचनी पडणे शक्य नव्हते.त्याच सुमारास जर्मन खाण कामगारांनी सार्वत्रिक संप पुकाराला त्यावरून कामगार कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावात कैसराने हस्तक्षेप करून आणि ऐनवेळेस बिस्मार्कला एकटे पाडून आपण अजोबाप्रमाणे गादीवर फक्त शांत बसणार नसल्याचे, तर राज्य करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले .७५ वर्षाच्या वृद्ध बिस्मार्कने मान तुकवली , राजीनामा दिला आणि राजकीय विजनवासात गेला.इथून पुढे जर्मनीची भरभराट जरी थांबली नाही तरी प्रगतीची दिशा युद्धाकरता तयारी आणि अटळ विनाशाकडेच जाणारी असणार होती हे कैसरच्या सर्वाधिकारी होण्यामुळे अधोरखित झाले. बिस्मार्क रिटायर्ड झाला तरी त्याकाळी जर्मनीला भेडसावणारे प्रश्न तसेच होते . नकाशा पहिला तर समजून येईल कि पश्चिमेला फ्रांस , पुर्वेकडे रशिया , दक्षिणेला ऑस्ट्रिया आणि उत्तरेला इंग्लंड अशा चार साम्राज्याने तो वेढलेला होता. फ्रांस तर त्यांचा पिढ्यान पिढ्यांचा शत्रू, पण रशियाचे तसे नव्हते, इंग्लंड हे सदा सावध होते आणि ऑस्ट्रिया नावाला मोठा असला तरी आतून बंडाळ्या अलगाववाद ह्यांनी पोखरला गेलेला होता.
१८९० साली जर्मनी रशिया मैत्रीकराराची मुदत संपत होती आणि तो सहा वर्षांसाठी renew करावा असे रशियाला वाटत होते पण कैसरने आणि त्याच्या सांगण्यावरून बिस्मार्कच्या जागी आलेला चान्सेलर थिओ फोन काप्रीफी ह्याने तो प्रस्ताव फेटाळला. फ्रांसने ही संधी साधली आणि रशियाशी मैत्री करार केला.खरेतर झार आणि त्याच्या पराकोटीच्या राजेशाही शासन व्यवस्थेला प्रजासत्ताक असलेल्या फ्रांस चे वावडे होते. ह्या फ्रान्सशी ते ह्याच १९व्या शतकात दोन युद्धे खेळले होते. त्यात त्यांची चांगलीच हानी ही झाली होती. फ्रांस च्या मनात ही रशियाबद्दल फार काही जिव्हाळा वगैरे नव्हता. जर्मन लेखक लुडविग रायानार्सने म्हटल्याप्रमाणे रशियात मार्सेली ह्या फ्रेंच राष्ट्रागीताची धून एखाद्याने अगदी शिट्टी वाजवून आळवली तरी त्याला तुरुंगात टाकत पण पक्क्या हाडवैरी असलेल्या दोघांचा संभावित शत्रू आता बलाढ्य होऊ घातला होता. १८९० पर्यंत जर्मनी एक संपन्न आणि बलाढ्य देश झाला होता त्यामुळे रशियाला त्याच्या बदललेल्या नेतृत्वाबद्दल अन बदलत्या धोरणाबद्दल रास्त शंका वाटत होती.फ्रान्सच्या मदतीने रशियाने औद्योगीकरण करणे , लष्करी कुवत वाढवणे, सर्व देशभर लोहमार्गाचे जाळे वाढवून दळणवळण आणि संदेशवहन प्रणालीत सुधारणा करणे सुरु केले. १८९४ साली तसा करारही केला गेला.रशियाचा आकार आणि मागासले पण पाहता त्याला वेळ लागणार होता पण ते कधीनाकधी ते एक प्रबळ प्रतिस्पर्धी होणारच होते.
आतापर्यंत बिस्मार्काचा कटाक्ष होता कि काय वाट्टेल ते झाले तरी इंग्लंडला डीवचायचे नाही. पण कैसरने नादानपणाचे एकावर एक विक्रम करायला सुरुवात केली.जर्मनीला लाभलेला सागर किनारा कमी लांबीचा आणि व्यापाराकरता तुर्कस्तानमधून जाणारा जुना पारंपारिक मार्ग सोयीचा. त्यांचे तुर्कस्तानचे संबंधदेखिल तसे बरे होते त्यामुळे त्याने, हे संबंध दृढ करावे आणि व्यापाराला चालना मिळावी, दार्दानेल्सची सामुद्रधुनी, काळा समुद्र, क्यास्पियन समुद्र इथून व्यापार सुरळीत करता यावा म्हणून १८९८ साली तुर्कस्तानाला भेट दिली, ह्यात गैर काहीच नव्हते पण तिथे जाऊन केलेल्या जाहिर भाषणात त्याने स्वत:ला जगातल्या सर्व मुसलमानांचा मित्र आणि हितरक्षक असल्याचे सांगितले. आता इंग्लंडच्या साम्राज्यात जगातला जवळपास सगळ्यात मोठा मुस्लीम समाज राहत होता. ह्या कैसरच्या विधानाने इंग्लडला एकूणच त्याच्या बद्दल शंका यायला सुरुवात झाली.एवढे पुरेसे नव्हते म्हणून कि काय कोण जाणे पण कैसरने दुसरी फार मोठी चूक केली ती म्हणजे जर्मन नाविक दलाची निर्मिती. आणि नुसती निर्मिती नव्हे कारण जर्मनीकडे नाविक्दल होतेच पण त्यात वाढ करून ते इंग्लंडच्या आरमाराला तोडीसतोड नव्हे त्यापेक्षा वरचढ करण्याच्या दृष्टीने जोमात प्रयत्न सुरु केले. इंग्लंड हे एक बेट आहे आणि ते युरोपच्या मुख्य भूमीशी कुठूनही साध्या चिंचोळ्या भूपट्टीने देखील सांधले गेलेले नाही. जगभर पसरलेले त्यांचे साम्राज्य,त्याचे रक्षण, त्यांचा व्यापार, समुद्री संचार नव्हे इंग्लंडची जीवन वाहिनी म्हणजे म्हणजे त्यांचे अद्वितीय आरमार. त्या अर्थी सुसज्ज आणि सर्वात बलाढ्य आरमार ही त्यांची गरज होती आणि आहे. इतिहासात त्यांच्या वर आलेली (फ्रांस स्पेन, डेन्मार्क कडून) परचक्रे ह्या बलाढ्य आरमाराच्या मुळे ते परतवू शकले होते. युरोपातील कोणत्याही दोन राष्ट्रांचे एकत्रित आरमार हे इंग्लंड पेक्षा जास्त प्रबळ असता कामा नये असे त्यांचे त्याकाळी धोरण होते. आता त्यालाच हा कैसर आणि त्याची जर्मनी गंभीर आव्हान देऊ लागले. खरेतर अजूनही जर्मनी आरमारी शक्ती बाबत इंग्लंडच्या खूप मागे होता. आणि तसेही इंग्लंडनेदेखील आपले सागरी सामर्थ्य वाढवायला सुरुवात केली. ड्रेडनॉटप्रकारच्या महाकाय शक्तीशाली नौकाचा ताफा त्यानी आपल्या आरमारात समाविष्ट केल्या, कोळशावर चालणारी जहाजे बदलून तेलावर चालणारी जहाजे आणायला सुरुवात केली ही जहाजे अधिक वेगवान असत, इंधन म्हणून कोळशाच्या मानाने जहाजावर तेलाचा साठ कमी करावा लागतो, कमी धूर ओकत असल्याने शत्रूला दुरून त्यांचा ठाव ठिकाणा लागणे अवघड होते. ह्यावर जर्मनीने देखील अशाच प्रकारच्या सुधारणा केल्याच शिवाय पाणबुड्यान्च्या निर्मितीवर भर दिला. इंग्लंडच्या नाविकदलाचे तत्कालीन मंत्री विन्स्टन चर्चिल ह्यानी म्हटल्या प्रमाणे जर्मनीची नौसेना इंग्लंडला युद्धात हरवायच्या दृष्टीने खूपच लहानशी होती पण जर्मनीच्या हेतू/ इराद्या बद्दल इंग्लंडच्या मनात शंका आणि संशय निर्माण करण्यैतपत मोठी नक्कीच होती. तसेही आधुनिक प्रबळ नौसेना जर्मनीकरताचैनीची बाब होती पण इंग्लंडकरता मात्र तो जीवन मरणाचा प्रश्न होता.
साहजिक आता इंग्लंड, फ्रांस आणि रशियाच्या बाजूने झुकू लागले.आता रशिया फ्रांस आणि इंग्लंड ही तीन बलाढ्य राष्ट्रे आपल्या विरोधात एकत्र येताहेत, त्याने आपली कोंडी होऊ शकते तर आपण काही शिष्टाई करून, सामोपचाराने मार्ग काढावा, मुत्सद्देगिरीने हि कोंडी फोडावी, कि अधिक जोमाने आरमार/शस्त्रास्त्र निर्मिती करून त्याना अधिक जवळ यायला कारण पुरवावे?पण बिस्मार्कच्या ठिकाणी असलेली मुत्सद्देगिरी कैसर कडे नव्हतीच पण त्याच्या आसपासही कोणी ह्या तोलाचा माणूस नव्हता. औट घटकेचा राजा बनलेला त्याचा बाप फ्रेडरिक ह्याने मरणासन्न असताना चिंतेने बिस्मार्कला सांगितले होते कि संयम आणि शहाणपणाचा अभाव असलेल्या ह्या उर्मट युवराजा पासून परराष्ट्र खाते लांबच ठेव.नाहीतर जर्मनीला त्याचे अनिष्ट परिणाम भोगायला लागतील. पण नेमके तेच झाले.
खरेतर इंग्लंड आणि फ्रांस चे काही बरे नव्हते तसे रशिया इंग्लंडचे ही वैरच होते पण १९०४-५ च्या सुमारास घटना अशा काही घडल्या कि त्यापाहता नियतीचे दानदेखिल युद्धाच्या अंगाने पडले असे म्हणावे लागते. १९०४-५च्य सुमारास रशिया आणि जपानमध्ये युद्ध सुरु झाले. इंग्लंड सारख्या मोठ्या भिडूला ग्रेट गेम मध्ये दमवणारा रशिया जपानला सहज चिरडेल असे वाटले पण जपान भलताच चिवट निघाला. त्याने रशियालाच जेरीला आणले. फ्रांस आणि रशिया मैत्री करार असल्याने फ्रान्सला आता काही करणे भाग होते पण जपान आणि इंग्लंडचे व्यापारी संबंध होते आणि भारत तसेच चीन मधील आपल्या वसाहतीबाबत इंग्लंड हळवे असणारच हे ओळखून फ्रांसने इंग्लंडला वाटाघाटीला बोलावले. दोघानी मिळून रशिया आणि जपान ला समजावून सामोपचार घडवून आणला. खरेतर रशियाचा ह्या युद्धात दारूण पराभव झाला होता पण अब्रू वाचवत माघार घेता आल्याने तो शांत बसला आणि एक छोटेखानी आशियायी साम्राज्य प्रथमच ह्या सत्तास्पर्धेत चमकले म्हणून जपान खुश झाले. मोठ्या भावाची भूमिका घेऊन आपण मोठी हानी टाळतो आणी आपले हितसंबंध ही त्याने सुरक्षित राहतात हे लक्षात आल्याने आता इंग्लंड देखिल फ्रान्सशी असलेले जुने वैर जरा बाजूला ठेवून सकारात्मक दृष्टीने फ्रांस आणि रशिया मैत्री कराराकडे आणि युरोपच्या जर्मनीमुळे बिघडत चाललेल्या सत्तासमतोलाकडे बघू लागले. आणि मग १८९४ साली झालेल्या फ्रांस आणि रशियाच्या करारात १९०४ साली इंग्लंड ही भागीदार झाले. जर्मनी विरुद्ध तीन मोठी राष्ट्रे एकत्र आली. त्याला त्रीराष्ट्र संघ(Triple entente)असे संबोधले गेले. दोस्त राष्ट्रे/ किंवा allied nations हे नामाभिधान नंतरचे. अमेरिका आल्यानंतरचे
ह्याच सुमारास आणखी एक नाटक घडले ज्यामुळे फ्रांस-इंग्लंड युती आणि जर्मनी मध्ये असलेली अविश्वासाची खाई रुंदावली/
मोरोक्को हा उत्तर आफ्रिकेतला एक देश.तसा जवळपास सगळा आफ्रिका युरोपियन सत्तांच्या वसाहतींनी व्यापलेला पण हा मोरोक्को मात्र कुठल्याही युरोपियन सत्तेकडे नव्हता. त्याला कारण होते – ह्या युरोपियन सत्ता काही फार कनवाळू होत्या म्हणून नाही तर खालचा नकाशा पहिला तर लक्षात येईल कि भूमध्य समुद्रातून पश्चीमेकडून बाहेर पडून अटलांटिक महासागरात प्रवेश करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अगदी चिंचोळी अशी जिब्राल्टरची सामुद्र धुनी, ह्या मोरोक्को जवळ होती त्यामुळे जो देश ह्या मोरोक्कोचा ताबा घेईल तो ह्या समुद्र मार्गाचे ही नियंत्रण करेल पण अशा देश विरुद्ध इतर देशही लगेच एकत्र येणार म्हणून सगळ्यानी मिळून समजुतीने हा देश अजून गिळंकृत केलेला नाव्ह्या.( तसा ह्या जिब्राल्टरच्या सामुद्र धुनीचा उत्तरेकडचा किनारा स्पेन कडे होता पण १९व्या शतकात स्पेन अगदीच कमकुवत राष्ट्र होते आणि त्यांचा युरोपातल्या मोठ्या देशांना दुखवायचा कोणताही हेतू नव्हता) अर्थात नकाशा वरून समजून येईल कि ह्यात इंग्लंडचे हितसंबंध किंवा व्यापारी सम्बन्ध फारसे धोक्यात येत नसत फक्त युरोपातल्या सत्ता समतोलच्या संघर्षात ते ह्या भागाचा प्यादे किंवा चाल म्हणून वापर करत. जर्मनीचे तसे नव्हते. खाली दाखवलेल्या दुसरया नकाशात जर्मनीच्या आफ्रिकेतल्या वसाहती दाखवल्या आहेत. त्यांच्याशी संपर्क ठेवायाचा तर जर्मनीकरता जिब्राल्टरची सामुद्र धुनी हा एकमेव समुद्री मार्ग होता. पूर्वेकडचा सुवेझ कालंवा आणि इजिप्त इंग्लंड कडे होते.पण रुसो जपानी युद्धानंतर एकत्र आलेल्या इंग्लंड फ्रान्स्मुळे समीकरण बदलू लागले. इजिप्त आधी नेपोलियनच्या साम्राज्याचा भाग पण नंतर त्याचा कब्जा इंग्लंडने घेतला होता आणि इजिप्त आणि सुवेज कालवा त्यांच्या ताब्यात होता पूर्वेकडील देशांशी व्यापार आणि त्याच्या पूर्वेकडील आणि महत्वाच्या वसाहतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते महत्वाचे होते पण त्याला फ्रांस ने कायम आक्षेप घेतला होता. आता फ्रांस ने मोरोक्कोचा कब्जा केला तर इंग्लंड त्याला हरकत घेणार नव्हते.त्याबदल्यात फ्रांस इजिप्त आणि सुवेज बद्दल गप्प बसणार होते म्हणजे जर्मनीचे डोळे पांढरे करायची उत्तम संधी, उत्तरेकडून इंग्लंड फ्रांस रशिया हे तीन देश प्रत्यक्ष अन दक्षिण, पूर्व , पश्चिमेकडून त्यांच्या वसाहती अशी ही अभूतपूर्व कोंडी होणार होती. जर्मनी शांत थोडीच बसणार होता.
मोरोक्को-टँजियर-अगादिरचा तिढा(१९०५-१९११)

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
१८७८च्य बर्लिन कॉंग्रेस समोर भाषण करताना बिस्मार्क म्हणाला होता कि आजचा युरोप म्हणजे दारूगोल्याने भरलेले अत्यंत स्फोटक असे कोठार बनले असून मोठे मोठे नेते त्याच कोठारात बसून चिरूट ओढत आहेत.हे फार काळ शांत राहणार नाही, राहू शकत नाही. भडका नक्की कधी आणि कसा उडेल हे मला सांगता येणार नाही पण मी एवढे नक्की सांगू शकेन कि त्या कोपऱ्यातल्या बाल्कन देशात घडलेली एखादी लहानशी घटना , कुणाचे तारे एखादे वेडगळ कृत्य हा वणवा पेटवायला पुरेसे ठरेल. आणि खरोखर ३६ वर्षानंतर ह्याच दूरवरच्या कोपऱ्यातल्या एका बाल्कन प्रदेशात ऑस्ट्रियाच्या युवराजाच्या खुनावरून इतके महाभयंकर युद्ध पेटले.आता बिस्मार्कच्या दूरदृष्टीचे कौतुक/आश्चर्य वाटावे कि ह्याच बाल्कन प्रदेशात २०व्या शतकच्या सुरुवातीला घडलेल्या तीन अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर घटनांनी महायुद्ध पेटले नाही , सामोपचाराने मार्ग निघाला ह्याचे आश्चर्य वाटावे हे सांगता येणे कठीण आहे.
ह्या तीनही घटना मध्ये नक्की काय घडले ( आणि मुख्य म्हणजे काय घडले नाही) ज्याने शांतता टिकून राहिली ते पाहणे उद्बोधक ठरावे. ह्या तीन पैकी १९०५,१९११ साली घडलेल्या दोन घटना मोरोक्कोशी संबंधीत आहेत. वर सांगितल्या प्रमाणे २०व्या शतकाच्या सुरुवातीला मोरोक्को हा कुणाही बड्या युरोपीय देशाची वसाहत नव्हता.तेथे इसविसनाच्या ८ व्या शतकापासूनच हसन घराण्याच्या सुलातानांची सत्ता होती आणि १९०५ मध्ये मोरोक्कोचा सुलतान होता अब्दुल हफीझ. १९०४ साली झालेल्या त्रीराष्ट्र संघ करारामुळे (Triple entente cordial)फ्रान्सचा धीर वाढला. स्पेनला चुचकारून, त्याना मोरोक्कोच्या शिकारीतला थोडा तुकडा देऊन गप्प करायचे आणि उर्वरीत मोरोक्को आपण गिळायचा हे पक्के झाले. त्या दृष्टीने त्यांची पावले पडू लागली पण जर्मनीने त्यात कोलदांडा घातला. जर्मनीला मोरोक्कोच्या स्वातंत्र्याची फार चाड होती अशातला भाग नव्हे, त्याना स्वत:ला मोरोक्कोचा घास हवा होता असेही नाही पण मागच्या वर्षी झालेला त्रीराष्ट्र संघ(Triple entente)करार किती दृढ आहे हे पाहणे आणि जमल्यास त्यात खिंडार पाडणे हे त्यांचे अंतस्थ हेतू होते. अर्थात बिस्मार्कासारखा मुत्सद्दी साथीला नसल्याने त्यानी केलेले कृत्यही फारसे आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचे उत्तम उदहरण ठरेल असे नव्हते उलट आदर्श आंतरराष्ट्रीय धसमुसळेपणा कसा असतो ते दाखवणारेच होते.कसे ते पाहू.
तर झाले असे कि भूमध्य समुद्रात नौका विहार करण्यासाठी निघालेला कैसर विल्हेल्म आपला शाही जहाजांचा ताफा घेऊन अचानकच मोरोक्कोच्या उत्तरसीमेवरील आणि जिब्राल्टरच्या सामुद्र धुनीजवळील टँजियर ह्या बंदरावर उतरला तेथे त्याने सुलतानाची भेट घेतली आणि जर्मनीचा मोरोक्कोच्या स्वतंत्र राष्ट्र असण्याच्या हक्काला उघड मान्यता दिली. आपण मोरोक्कोच्या स्वातंत्र्य अन सार्वभौमत्वाचे संरक्षक असून जर्मनी मोरोक्कोशी व्यापार वाढवण्याठी उत्सुक असल्याचे जाहीर पणे सांगितले. झाले ह्यामुळे फ्रांस आणि इंग्लंड मध्ये खळबळ माजली. लवकरच जर्मनी मोरोक्कोच्या सुलतानाला फशी पडून मोरोक्कोत एखादा नाविक तळ उभारणार अशा अफवा पसरल्या. इंग्लंड आणि फ्रान्सच्या वृत्तपत्रांनी तशा बातम्या देणाऱ्या आणि जर्मनीची निंदा करणाऱ्या बातम्या देण्याचा सपाटा लावला ह्याला तितकेच तिखट उत्तर जर्मनीच्या वृत्तपत्रातून दिले गेल. तणाव एवढा वाढला कि आता लवकरच १८७१ प्रमाणे फ्रांस आणि जर्मनीत एखादे युद्ध होणार अशी हवा तयार झाली . ह्यावेळी १८७१ प्रमाणे आपण तटस्थ न राहता फ्रान्सला पाठींबा देऊ, मदतही करू अशी भूमिका रशिया आणि इंग्लंड दोघांनी घेतली. आश्चर्य म्हणजे आधीच चुचकारल्या मुळे म्हणा किंवा धमकावल्यामुळे म्हणा स्पेन, पोर्तुगाल आणि इटलीनेही त्यांच्या सुरात सूर मिसळला. फक्त काहीशा नाराजीने ऑस्ट्रिया जर्मनीच्या बाजूने उभा राहिला. एकंदरीत हा जर्मनीचा डावपेचात्मक पराभव होता. ह्यावेळी जर्मनीचा चान्सेलर होता प्रिन्स फोन ब्युलो. ब्युलोला जसे वाटले तसे फ्रांसला एकटे पाडणे, जमल्यास इंग्लंड आणि फ्रान्सच्या नव्यानेच झालेल्या मैत्रीत खिंडार पडणे तर राहिले दूरच, उलट जर्मनीच एकटा पडला. हा जर्मन मुत्सद्देगिरीचा अन परराष्ट्र धोरणाचा सपशेल पराभव होता. शिवाय ह्यामुळे जर्मनी बद्दल उतर युरोपीय राष्ट्राना वाटणारा संशय उघड झाला नव्हे बळावला.
फ्रांसने त्याच्या सैनिकांच्या रजा तडकाफडकी रद्द करून सैन्य दलांची जर्मन सीमेजवळ जमवाजमव सुरु केली. जर्मनीनेही तसेच केले शिवाय राखीव सैनिकाना सेवेत रुजू व्हायचे आदेश काढले, (तेव्हा अनेक देशाच्या नागरिकाना सक्तीची सैन्य सेवा करावी लागत असल्याने, दोन -पाच वर्षे अशी सेवा करून निवृत्त झालेले सैनिक राखीव म्हणून गणले जात अन त्याना वेळ पडली कि त्यांच्या रेजिमेंट मध्ये रुजू व्हायला सांगितले जात असे.) शेवटी मोरोक्कोच्या सुलतानानेच कोंडी फोडली त्याने अंतरराष्ट्रीय लवाद बोलावला आणि त्यात आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आणि सर्वाभौमत्वाला युरोपियन देशांनी मान्यता देण्याची मागणी केली. स्पेनचे शहर अल्जेसिरास येथे हि परिषद जानेवारी ते एप्रिल १९०६ अशी चालली. त्यात सुलतानाची मागणी मान्य केली गेली पण त्याबदल्यात फ्रांस आणि स्पेनला मोरोक्कोत व्यापाराचे विशेष हक्क प्रदान केले गेले. ह्यात जर्मनीलाला काही मिळाले नाही पण त्यानी दिलेली मोरोक्कोच्या स्वातंत्र्य अन सार्वभौमत्वाची ग्वाही मान्य करून त्याची जबाबदारी सगळ्यानी उचलली. अशाप्रकारे कसाबसा जर्मनी ह्यातून आपली अब्रू वाचवून बाहेर पडला. युद्ध टळले आणि बाकीच्यानी सुटकेचा नि:श्वास टाकला.ह्या कराराला अल्जेसिरास करार म्हणतात ह्या राजकीय नाट्याचा दुसरा अंक रंगला १९११ साली.
जुलै१९११ मध्ये मोरोक्कोमधील काही टोळ्यांनी सुलातानाविरुद्ध बंड केले. आणि चक्क सुलतानाला त्याच्या राजवाड्यातच कैद केले.त्याना तशी फूस फ्रान्सनेच दिली होती हे उघड होते. मोरोक्कोत गृहयुद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली तव्हा तेथील फ्रेंच लोकांचे व्यापारायंचे , अधिकाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि फ्रान्सचे व्यापारी संबंध सांभाळण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी चक्क २० हजार फ्रेच सैनिक तेथे उतरवले. हा सरळ सरळ १९०६च्या अल्जेसिरास कराराचा भंग होता. जर्मनीने परत डोळे वटारले आणि आपली panther ही युद्ध नौका अगादिर ह्या मोरोक्कन बंदरात पाठवली. त्यानी कारण दिले कि फ्रांसने सैन्य पाठवणे हा १९०६च्य अल्जेसिरास करारातील मोरोक्कोच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्याच्या कलमाचा भंग होता आणि त्यानाही मोरोक्कोतील जर्मन लोकांचे, व्यापाऱ्याचे, अधिकाऱ्यांचे संरक्षण करणे प्राप्त आहे. प्रत्यक्षात तिथे एकही जर्मन माणूस तैनात नव्हता.खरेतर अशी चाल करण्या आधी विशेषत: १९०५-६ चा अनुभव लक्षात घेता, त्यानी इतर सहकारी देशांशी तरी विचार विनिमय करायला हवा होता पण तसे न केल्याने जर्मनीचेच हे कृत्य मवलीपणाचे, गुंडगिरीचे समजले गेले. फ्रान्सच्या सैन्य पाठवण्या मुळे खरेतर इंग्लंड नाराज झाले होते पण जर्मनीच्या ह्या आततायी कृत्याने त्याना नाईलाजाने फ्रान्सला पाठींबा जाहीर करावा लागला. त्याहून पुढे जाऊन त्यानी चक्क त्यांच्या नाविक दलाच्या जहाजांचा एक ताफा जिब्राल्टर इथे पाठवला. रशियाने ही परत एकदा फ्रान्सला पाठींबा आणि मदत देणार असल्याचे जाहीर केले.झाले पुन्हा एकदा युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि ह्यावेळी ही जर्मनी एकटाच पडला होता हे उघड झाले. इतर युरोपीय देश गप्प होते किंवा त्यांच्या विरोधात तरी होते.
ह्याचा अर्थ जर्मनीला मोरोक्कोसारख्या देशाच्या स्वातंत्र्याची फार काळजी होती असा नव्हे तर ह्या निमित्ताने त्याना युरोपात आपला दबदबा निर्माण करता आला तर हवा होता. आमच्या मतालाही किंमत आहे. आम्ही आता काही लिंबू टिंबू नाही राह्यलो. असे सांगण्याचाच हा प्रयत्न होता. असो तर आता १९०५ प्रमाणेच पेच प्रसंग उत्पन्न झाला आणि तणाव वाढून युद्ध सुरु होते कि काय असे वाटू लागले. जर्मन जनता ह्याला तयार नव्हती म्हणा किंवा हे फ्रांसने घडवून आणले असा जो आरोप जर्मनीने केला होता त्यात तथ्य होते म्हणा, पण जर्मन शेअर बाजार कोसळला. इतका कोसळला की लोकांनी आपला पैसा देखील बँकेतून काढून घ्यायला सुरुवात केली, एका महिन्यात शेअर बाजार ३० टक्के इतका कोसळला आणि जर्मन बँकेतला सोन्याचा साठा एक तृतीयान्शाने कमी झाला. जर्मन जनता, सरकार, लष्कर, स्वत: कैसर ह्याला तोंड द्यायला तयार नव्हते. जर्मन जनमत ही विरोधी बनू लागले. एका आफ्रिकन देशाच्या स्वातंत्र्यासाठी एवढा त्याग(!). काही गरज आहे का? काय फायदा त्यातून? असे प्रश्न जर्मन वृत्तपत्रातून विचारले जाऊ लागले.
अखेर नोवे.१९११ ला फ्रांसच्या राजधानी परिस इथे जर्मनीने फ्रेन्चान्शी समझोता केला. अल्जेसिरास येथे केलेला करार मोडून जर्मनीने दिलेल्या आश्वासनाची पायमल्ली केली म्हणून त्याना कामेरून इथे वसाहतींचे हक्क फ्रांस ने दिले आणि मोरोक्को हे फ्रेंचांच्या संरक्षणाखाली राहील म्हणजेच तिथे कायमच फ्रेंच फौजा असतील हे जर्मनीने मान्य केले म्हणजेच फ्रांस ने मोरोक्कोचा घास घेतलाच अगदी जर्मनीच्या नाकावर टिच्चून (एकदा पाठवलेल्या फौजा परत बोलावयाचा तसाही फ्रांसचा अजिबात इरादा नव्हताच म्हणा) ह्या कराराला फेज करार म्हणून ओळखले जाते. ह्या एकंदर प्रकरणात जर्मनीला पुन्हा एकदा अगदी नामुष्कीची हार (डावपेचात्मक)पत्करावी लागली.
युद्धानंतर उघड झालेल्या कागदपत्रावरून हे सिद्ध झाले कि १९०५ आणि १९११ च्या ह्या दोन्ही प्रसंगी जर्मनीचा चान्सेलर प्रिन्स फोन ब्युलो आणि परदेश सचिव ह्यांनी कैसर ला तसेच जर्मन सैन्य यंत्रणेला, जनतेलाही अंधारात ठेवून ही आगळीक केली होती. नाईलाजाने कैसरला दोन्ही वेळेस त्याना साथ द्यावी लागली आणि युरोपात त्याची प्रतिमा त्यामुळे डागाळली गेली.शिवाय शेपूट घालून परत यावे लागले ह्याचे हसे झाले ते वेगळेच.
१९०८ साली म्हणजेच ह्या दोन पेच प्रसंगांच्या मध्ये अजून एक मोठा पेचप्रसंग घडला होता त्यावेळी देखील जग युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले होते. इतिहासात हा पेच प्रसंग बोस्नियन तिढा म्हणून प्रसिद्ध आहे.

बोस्नियन पेच(१९०८)

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

१९०८च्य सुमारास बोस्नियाचा पेच प्रसंग उद्भवला. जुनाट आणि खिळखिळ्या झालेल्या ओट्टोमान साम्राजायाताल्या जहाल राष्ट्रवादी लष्करी अधिकाऱ्यांच्या गटांनी यंग टर्क्स ह्या नावाची एक संघटना उभारून ओट्टोमान साम्राज्यात, त्यांच्या राज्य शासनात काही मुलभूत बदल व्हावेत म्हणून चळवळ उभारली. इतर युरोपीय राष्ट्रांप्रमाणे त्यानाही जनतेला मताधिकार, लोकनियुक्त सरकार, संविधान, कायदेमंडळात लोकांचे प्रतिनिधित्व अशा गोष्टी हवा होत्या. त्याला अर्थातच राजेशाहीने नकार दिला आणि गृहयुद्ध सुरु झाले ह्यामुळे ओट्टोमान साम्राज्यात बरीच अनागोंदी माजली. ह्याचा फायदा त्यांच्या जुन्या प्रतिस्पर्धी अशा दोन मोठ्या साम्राज्यांनी घ्यायचा प्रयत्न केला नसता तरच नवल. हे दोन देश होते ऑस्ट्रिया आणि रशिया. त्यापैकी ऑस्ट्रियाचा डोळा होता त्याना अगदी खेटून असलेला पण तुर्की साम्राज्याचा एक भाग असलेला बोस्निया-हर्जेगोवानिया ह्या प्रांतावर( हे एकाच प्रांताचे नाव आहे, दोन वेगळे प्रांत नाहीत) तर रशियाला अनेक शतकांपासून काळ्या समुद्रातून इस्तंबूलच्या जवळच्या बास्पोरास,दार्दानेल्स आणि गालीपोली इथल्या खाडीतून भूमध्य समुद्रात प्रवेश करायचा अधिकार हवा होता. तसे पाहू जाता १८७८ पासूनच ऑस्ट्रियाचा बोस्निया-हर्जेगोवानियावर लष्करी अंमल होता पण त्यानी अजून अधिकृतपणे त्याभागावर आपला मालकी हक्क सांगीतला नव्हता.पण ह्या यंग टर्क्स चळवळीने थोडा घोळच झाला. अजून अधिकृत रीत्या हा बोस्निया-हर्जेगोवानियाचा भाग ओट्टोमान साम्राज्यात येत असल्याने तेथील लोकांना ही तुर्कस्तान्च्या नव्याने स्थापन होणाऱ्या संसदेत प्रतीनिधीत्व मिळणार होते. १८७८ पासून बोस्निया-हर्जेगोवानिया मध्ये ऑस्ट्रियाने बराच खर्च आणि गुंतवणूक केली होती. आता काहीतरी त्वरेने करणे भाग होते. तसा हाभाग स्लाव वंशीयांचे प्राबल्य असलेला आणि त्याभागावर १८३० पासून स्वतंत्र झालेला आणि सर्व स्लाव वंशीयांचे एक संघराज्य उभारून त्याचे नेतृत्व करायची मनीषा बाळगून असलेला सर्बिया देखील नजर ठेवून होता. रशिया त्यांचा पाठीराखा त्यामुळे काही गडबड केली तर ओट्टोमान साम्राज्य डिवचले जाऊन युद्ध प्रसंग उत्पन्न होऊ शकतो ही भीती होतीच पण सर्बिया आणि मुख्य म्हणजे रशिया सुद्धा चवताळून अंगावर येऊ शकतो ही भीती असल्याने ऑस्ट्रिया शांत होता. पण आता ह्या यंग टर्क्सच्या चळवळीने माजलेल्या अनागोंदी/ गोधाळाचा फायदा घ्यायचे ऑस्ट्रिया आणि रशिया दोघानीही ठरवले . सप्टे. १९०८ मध्ये रशियाचा परराष्ट्र सचिव अलेक्झांडर इझ्लोव्स्की आणि ऑस्ट्रियाचा पराष्ट्र मंत्री अल्वा अरेन्थाल ह्यांच्यात मोराविया इथल्या बुख्लोवील राजवाड्यात (सध्या हा झेक रिपब्लिक मध्ये येतो)गुप्त करार झाला त्याप्रमाणे रशियाच्या इस्तंबूल जवळच्या बास्पोरस आणि दार्दनेल्स खाडीतून भूमध्य समुद्रात मुक्त संचाराला ( व्यापारी आणि लष्करी जहाजांच्या) ऑस्ट्रिया हरकत घेणार नाही अन त्याबदल्यात रशिया ऑस्ट्रियाने आपल्या साम्राज्यात सामील करून घेतलेल्या (म्हणजे बळकावलेल्या) बोस्निया-हर्जेगोवानिया प्रांताला तो त्यांच्याच साम्राज्याचा एक भाग आहे म्हणून मान्यता देईल. असे ठरले. अर्थात अलेक्झांडर इझ्लोव्स्कीला त्यांचा मुख्य सहकारी आणि बोस्निया-हर्जेगोवानियाचा ध्यास धरून बसलेल्या सर्बियाची समजूत काढायला वेळ हवा होता तसेच त्याला रशियातही ह्या करताची मोर्चे बांधणी करावी लागणार होती. त्याकरता त्याला थोडा वेळ हवा होता
इथ पर्यंत सगळे ठीक चालले होते.पण तुर्कस्तानमध्ये चालू असलेल्या गृहयुद्धाचा/अनागोदीचा फायदा घेत ५ ऑक्टोबर १९०८ रोजी बल्गेरियाने ओट्टोमान साम्राज्यापासून आपले स्वातंत्र्य घोषित केले अन बल्गेरिया प्रमाणे बोस्निया-हर्जेगोवानियामध्ये गडबड सुरु होऊ शकते किंवा सर्बिया काही गडबड करू शकतो अशा गुप्तचर विभागाच्या खबरा मिळाल्याने ऑस्ट्रिया उतावीळ झाला (खरेतर बोस्निया-हर्जेगोवानियाचा लष्करी ताबा त्यांच्याकडे होता)त्यामुळे त्यानी ६ ऑक्टो १९०८ रोजी कुणाला कुठलीही पूर्व सूचना न देता बोस्निया-हर्जेगोवानिया अधिकृत रीत्या आपल्या साम्राज्यात सामील करून घेता असल्याची घोषणा केली. ह्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. अगदी त्यांचा साथीदार जर्मनीलाही. रशियात तर ह्याची तिखट प्रतिक्रिया उमटली. इझ्लोव्स्कीची सगळी योजना धुळीला मिळाली. सर्बियाने तर युद्धाची तयरी करून रशियाकडे पाठीम्ब्याची मागणी केली आणि रशियाने तो त्यांना दिला. कैसर विल्हेल्मला खरेतर ऑस्ट्रियाच्या ह्या आततायी पणाचा रागच आला होता पण युरोपात ऑस्ट्रिया त्यांचा एकमेव साथीदार होता त्यामुळे रशियाने सर्बियाला पाठींबा देताच त्यानी ऑस्ट्रियाला आपला पाठींबा दिला आणि रशियाला धमकावले कि ऑस्ट्रियावर कोणतीही कारवाई केली तर युद्धच सुरु होईल. ज्यांच्या साम्राज्याचे लचके कुणी तोडून घ्यायचे ह्यावर वादंग चालू होते तो तुर्कस्तान मात्र हतबल होता. एकीकडे तो सैन्य आणि इतर लष्करी तंत्रज्ञानात मागे होता , घरातच गृह युद्धाने गांजला होता वर आणि बल्गेरीयाच्या बंडाळीचे पारिपत्यकरण्यात गुंतला होता. तसेही बोस्निया-हर्जेगोवानिया आता त्यांच्या करता बराच दुरचा भाग होती त्यामुळे दोन चार निषेध खालीते पाठवण्य पलीकडे तो फार काही करू शकला नाही.
जर्मनीच्या धमकी मुळे रशिया सटपटला. नुकताच १९०४-५ च्या सुमारास जपानबरोबरच्या युद्धात त्यानी मानहानीकारक पराभव स्वीकारला होता आणि नंतर झालेल्या क्रांतीमुळे शासनाची अवस्था नाजूक होती. त्यातून घटना इतक्या अनपेक्षित पणे घडल्या की त्यांचा सहकारी फ्रांसदेखील गडबडला. त्यानीही रशियाला फक्त तोंडी पाठींबा दिला. त्यापेक्षा जास्त काही मदत् करायला असमर्थता दर्शवली. तसाही बोस्निया-हर्जेगोवानियाचा प्रश्न त्याना तितका महत्वाचा वाटत नव्हता. इंग्लंडही त्याच्या आशियातल्या साम्राज्याला किंवा आरमारी हितसंबंधाला ह्यातून काही फार धोका नसल्याने फार खळखळ न करता शांत बसले. शेवटी रशियाला चक्क शेपूट घालून गप्प बसावे लागले आणि त्यामुळे सर्बियादेखील चडफडत गप्प बसला.
अशाप्रकारे मोरोक्कोच्या १९०५ आणि १९११ च्या वेळी फ्रांस इंग्लंड आणि रशियाच्या दादागिरी आणि कुटील सामंजस्याने जर्मनी गप्प बसला तर १९०८च्या बोस्निया-हर्जेगोवानियाचा पेचावेळी जर्मनीच्या मवालीपण पुढे रशिया गप्प बसला. अर्थात रिवाजाप्रमाणे आंतरराष्ट्रीय परिषद बोलावली गेली, ऑस्ट्रियाचा बोस्निया-हर्जेगोवानियाचा ताबा घेणे बिनबोभाट मान्य केले गेले, रशियाने आपली इस्तंबूल-बस्पोरस आणि दार्दानेल्स मधून भूमध्य समुद्रात प्रवेश मिळवण्याची इच्छा जाहीर केली पण तुर्कस्तान ने विरोध केला म्हणून ती मान्य झाली नाही.
ह्या तीनही घटनांच्या वेळी युद्ध भडकले असते पण अशावेळी कुणीतरी एकंदर परिस्थिती पाहता नाईलाजाने का होईना पण माघार घेण्याचे शहाणपण दाखवले त्यामुळे युद्ध टळले.
जर्मन राजकारणी आणि मुत्साद्द्यांवर कैसर विल्हेल्म कमालीचा नाराज झाला आणि त्याने इथून पुढे जर्मन राजकारण्यांवर भरवसा न ठेवता सैन्य आणि सेनापतीवर तो ठेवायचा अशी खूण गाठ बांधली. १९०५ आणि १९११ च्या ह्या दोन्ही वेळेसही खरेतर युद्ध पेटायचे पण जर्मनीने माघार घेतल्या मुळे ते ह्या दोन्ही वेळेस टळले. हा जर्मनीचा समजूतदारपणा नव्हता तर आपण एकटे पडलो आहोत हे ओळखून,आणि पूर्ण तयारी केल्याशिवाय असे वेडे धाडस करायचे नाही हे तो शिकला. युरोपात रशिया फ्रांस आणि इंग्लंड हे आता आपले शत्रू असून ते आपल्या विरुद्ध एकत्र येऊन कट कारस्थान करताहेत ही त्यांची धारणा आता अगदी पक्की झाली. आता रशिया इंग्लंड आणि फ्रांस अशा तीन बलाढ्य शत्रूंशी एकाच वेळी अनेक आघाड्यावर लढायची तयारी त्यानी सुरु केली.इजा झाला बिजा झाला असे दोन वेळा माघार घेतली पण आता इथून पुढे माघार नाही ही खूणगाठ त्यानी मनाशी बांधली. तर आपल्याला जर्मनीपासून धोका नको असेल तर आपण फ्रांस आणि इंग्लंडच्या पंगतीला बसले पाहिजे अशी खूण गाठ रशियाने बांधली.सर्बिया सारख्या आपल्या युरोपातल्या एकमेव सहकाऱ्याला अजून दुखावून चालणार नाही हे देखील रशियाने ताडले तर जर्मनीला आपल्या शिवाय कुणी सहकरी नसल्याने आपले कसलेही वेडे साहस पाठीशी घालून जर्मनी आपल्या बरोबर उभा राहणार असा अर्थ ऑस्ट्रियाने काढला. म्हणजे एकंदरीत पुन्हा असा पेच प्रसंग उभा राहील तेव्हा कुणीतरी माघार घेईल आणि गोष्टी हाताबाहेर जाणे टळेल ह्याच्या शक्यता धूसर झाल्या . ह्याउलट ...
रशिया, फ्रांस आणि इंग्लंडने विशेषत: इंग्लंडनेही नव्यानेच उदयाला येऊ घातलेल्या जर्मनी सारख्या प्रगत राष्ट्राच्या अकांक्षाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले. जमेल तेवढे त्यांना दाबण्याचे, एकटे पडायचे राजकारण केले. असे वारंवार करून आपण हवे ते साध्य करू शकतो आणि त्याने काही फरक पडणार नाही असा अत्माविश्वास इंग्लंड फ्रांस चा दुणावला. अशा गोष्टी तात्कालिक फायदा करून देतात पण अंती त्याची जबर किंमत द्यावी लागते हे त्याना लवकरच समजणार होते अगदी भयानक रितीने.
ऑस्ट्रो – हंगेरियन संयुक्त साम्राज्य

इतके विवेचन झाल्यावर ऑस्ट्रिया - हंगेरीबद्दल थोडी माहिती सांगणे क्रमप्राप्त आहे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

१९व्या शतकाच्या सुरुवातीला युरोपात प्रबळ अशी चार साम्राज्य नांदत होती. फ्रांस, ऑस्ट्रिया- हंगेरीचे संयुक्त साम्राज्य (घराणे हाप्स्बर्ग), रशियाची झार शाही आणि तुर्कस्तानचे ओट्टोमान साम्राज्य.(इंग्लंड आणि इंग्लिश लोकाना ह्यातून मुद्दाम वगळले आहे कारण ह्याकाळात त्यांची मुख्य युरोपात इंचभरही जमीनीवर सत्ता नव्हती अन्यथा तेव्हा जगात सगळ्यात मोठे, प्रबळ साम्राज्य त्यांचेच होते.)
आपण जरी ह्याला ऑस्ट्रो हंगेरियन साम्राज्य म्हणून ओळखत असलो तरी ते होते युरोपातील हाब्सबर्ग ह्या एका पुरातन घराण्याचे साम्राज्य. १५व्या १६व्या शतकात म्याक्सिमिलीयन ( पहिला) ह्याने ह्या साम्राज्याची स्थापना केली. त्यांची राजधानी विएन्ना हे युरोपातील एक अत्यंत महत्वाचे शहर आणि युरोपची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते, अगदी आजही.फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी गिलोटीनवर चढलेली राणी आंत्वानेट ही त्यांचीच राजकन्या. पुढे नेपोलीयनने त्यांच्या साम्राज्याची अगदी धूळदाण केली. पण लवकरच १८१५ साली नेपोलीयनचा पराभव झाल्यावर त्यानी परत एकदा आपले राज्य उभे केले.
फ्रांझ जोसेप्फ
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

१८ ऑगस्ट १८३० साली जन्माला आलेला फ्रांझ जोसेप्फ हा ऑस्ट्रीयन साम्राज्याच्या गादीवर आला १८४८ साली. त्यासुमारास युरोपचा आसमंत समाजवादी आणि राष्ट्रवादी चळवळी आणि राजेशाही विरोधी बंडाळ्यानी दुमदुमलेला होता. फ्रांस मध्ये ह्या बंडाळ्या झाल्या तशाच प्रशियाताही झाल्या आणि त्या सैन्याच्या मदतीने मोडून काढत तिथे परत राजेशाही कायम झालेली तरुण फ्रांझ जोसेप्फ ने पाह्यली. त्यांच्या ऑस्ट्रो हन्गेरिअयन साम्राज्यात ही हे लोण पसरले आणि इथेही ते लष्कराच्या मदतीने मोडून काढले गेले.लष्कराच्या मदतीने आपण निरंकुश सत्ता राखू शकतो,ती मिळवू,वाढवू आणि गाजवूही शकतो अशी त्याची धारणा झाली असल्यास नवल नव्हते मात्र ह्या धारणेला १८५९ साली फ्रांस बरोबर झालेल्या युद्धाने धक्का बसला. हे युद्ध तो हरला आणि मग साम्राज्य वाचवण्यासाठी आणि भक्कम करण्यासाठी त्याने पूर्वेकडील नाराज गालेशिया आणि हन्गेरी ह्या भिन्न वांशिक गटांशी समझोता केला. त्याच्या काळातच ऑस्ट्रियाचे साम्राज्य ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्य बनले आणि त्याचा बराच भूविस्तारही झाला. पण १९व्या शतकातली झपाट्याने बदलत चाललेली परिस्थिती त्याने कधी समजून घेतली नाही. ओउद्योगिक क्रांती, भांडवलशाही, जागतिक व्यापार, आंतरराष्ट्रीय संबंध , नव्याने आलेले समाजवाद, साम्यवाद, लोकक्रांत्या ह्यामुळे पारंपारिक राजसत्तेसामोरील आव्हाने किते बिकट होत चालली आहेत हे त्याच्या लक्षात आले नाही. ज्या लष्कराच्या जीवावर आपण हे सगळे उलथून टाकू असा विश्वास त्याला वाटत होता त्या लष्कराच्या आधुनीकीकारानासाठी त्याने काहीही केले नाही. तरीही तो एक नृशंस आणि दमनकारी शासक नव्हता. त्याने साम्राज्याताल्या इतर भाषा वंश आणि मूळ वेगळे असलेल्या समाजगटाना बरेच स्वातंत्र्य आणि अधिकार दिले. इतर कुणीही नाही पण युरोपात ज्यू लोकाना, प्रथम त्यानेच नागरिकत्वाचे अधिकार दिले त्यामुळे त्याच्या प्रदीर्घ अशा ६८ वर्षाच्या कारकीर्दीत त्याला जनतेचे प्रेम बरेच लाभले. पण ह्याबरोबरच त्याचे साम्राज्य हे भाषा वंश चालीरीती धर्म अशा नेक बाबतीत भिन्नता असलेल्या १० एक समाजगटांचे कडबोळे बनेले. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच शोकांतिका झाल्या. त्याची बहीण आणि दोन भाऊ तरुनापणीच वारले तर बायको सीसी ( बवेरीयाची राजकन्या एलिझाबेथ ) हिचा इटलीतील क्रांतीकारकाने खून केला त्याचा मुलगा रुडोल्फ ह्याने आत्महत्या केली आणि त्यानंतर युवराज आणि सिंहासनाचा उत्तराधिकारी बनलेला फ्रांस फर्डिनांडह्याचाही खून झाला. तो जिवंत असताना ही त्याचे एकूणच आंतराष्ट्रीय संबंध धोरणं आणि साम्राज्यातील प्रजेचे अधिकार ह्याबाबत फ्रांझ फर्डिनांडशी पराकोटीचे मतभेद होते.
जर्मन्भाषक असूनही त्याचे प्रशिया आणि बिस्मार्काशी कधी जुळले नाही. १० समाजगटांचे कडबोळे घेऊन राज्य करणाऱ्याआणि लष्करी दृष्ट्या कर्तृत्वहीन असलेल्या पण आकाराने, संख्येने मोठ्या अशा ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्याचा जर्मन राष्ट्रात अंतर्भाव व्हावा असे बिस्मार्कला वाटत नव्हते आणि त्याने कुटीलपणाने ऑस्ट्रो हंगेरियन साम्राज्याला खड्या सारखे बाहेर काढले . . ह्यावर उपाय म्हणून फ्रांसशी संगनमत करून तो जर्मनीवर दबाव टाकू शकला असता पण फ्रांस विषयी वाटणारी घृणा आणि संशय त्याच्या मध्ये आली.नाहीतर युरोपचा इतिहास काही वेगळा असता ...असो
त्याचा डोळा तुर्कस्तानच्या जोखडातून मुक्त होत असलेल्या बाल्कन देशावर होता. त्याना चुचकारून धमकावून हर प्रयत्नाने साम्राज्यात समावून घेवून दक्षिण युरोपात प्रबळ असे ऑस्ट्रो हंगेरियन साम्राज्य उभे करण्याची मनीषा, अंती त्याच्या करता आणि साम्राज्याकरता घातक ठरली. लोकांचे त्याच्यावर असलेले प्रेम हेच खरेतर ऑस्ट्रो हंगेरियन साम्राज्याला एकत्र बांधून ठेवत होते आणि ही बाब त्याच्या लक्षात आली नाही. त्यामुळे जेव्हा महायुद्ध ऐन भरात असताना १९१६सालि वयाच्या ८६व्या वर्षी तो वारला तेव्हा ती त्याच्या ऑस्ट्रो हंगेरियन साम्राज्याचीही मृत्यूघन्टा ठरली.
...असो तर पुढील भागात आपण युरोपला पहिल्या महायुद्धाकडे घेऊन जाणारया कटकटी ज्या बाल्कन देशात/प्रदेशात होत होत्या त्या बाल्कन देशांबद्दल आणि तुर्कस्तानच्या ओट्टोमान साम्राज्याबद्दल थोडी माहिती घेऊयात.
क्रमश:
---आदित्य

इतिहासलेख

प्रतिक्रिया

अनन्त अवधुत's picture

9 Aug 2018 - 11:38 pm | अनन्त अवधुत

नवीन आणि तपशीलवार माहिती मिळत आहे. लगे रहो.

शाम भागवत's picture

10 Aug 2018 - 12:28 am | शाम भागवत

मस्तच चाललीय लेखमाला. वाचायला सुरवात केल्यावर घड्याळाकडे लक्षच रहात नाही.

वाचत आहे। अत्यंत माहितीपूर्ण!

ट्रम्प's picture

10 Aug 2018 - 10:28 am | ट्रम्प

एका दमात पूर्ण लेख वाचून काढला , पहिल्या महायुद्धा अगोदरची आंतरराष्ट्रीय परिस्थिती काय होती हे लक्षता येत आहे .

रागो's picture

10 Aug 2018 - 1:17 pm | रागो

माहितीपूर्ण

संजय पाटिल's picture

10 Aug 2018 - 1:20 pm | संजय पाटिल

पुभाप्र.

कपिलमुनी's picture

10 Aug 2018 - 1:58 pm | कपिलमुनी

पुभाप्र.

तुषार काळभोर's picture

10 Aug 2018 - 2:30 pm | तुषार काळभोर

लेखमाला अतिशय छान चालली आहे.

पुभाप्र

टवाळ कार्टा's picture

10 Aug 2018 - 3:28 pm | टवाळ कार्टा

भारी

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2018 - 4:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक आणि माहितीपूर्ण !

रंगीला रतन's picture

10 Aug 2018 - 4:43 pm | रंगीला रतन

हा भाग सुद्धा आवडला!

लोनली प्लॅनेट's picture

13 Aug 2018 - 1:11 pm | लोनली प्लॅनेट

दुसरा आणि तिसरा भाग एकदम वाचले
खूपच आवडले, तुम्ही हे लिहिल नसतं तर कधीच माहित झालं नसतं
धन्यवाद

विवेकपटाईत's picture

14 Aug 2018 - 6:50 pm | विवेकपटाईत

वाचतो आहे, मालिका आवडली.

नया है वह's picture

13 Sep 2018 - 11:07 am | नया है वह

+१

उपेक्षित's picture

13 Sep 2018 - 12:47 pm | उपेक्षित

वाचतोय ...