Skip to main content

आणीबाणीतले अनुभव

लेखक मराठी कथालेखक यांनी बुधवार, 27/06/2018 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
आणीबाणी लागू केली त्या दिवसाला नुकतीच ४३ वर्षे पुर्ण झाल्या निमित्ताने अनेक व्यासपीठांवर आणीबाणीचा विषय , त्याबद्दलची मते ई चर्चिली जात आहेत.या चर्चांत भाग घेणारे एकतर नेते, पत्रकार वा विचारवंत आहेत. पण सामान्य जनतेच्या दृष्टीकोनातून आणीबाणी नेमकी कशी होती हे जाणून घेण्याकरिता मी हा धागा काढला आहे. माझा जन्म झालेला नव्हता त्यामुळे माझे स्वतःचे काही अनुभव नाही. माझ्या आई-वडीलांकडून तरी मी आणीबाणीच्या फारशा काही आठवणी ऐकल्या नाहीत (चांगल्या/वाईट कोणत्याही). तरी इतर मिपाकरांनी स्वतःच्या वा जवळील व्यक्तींच्या (त्यांच्याकडून थेट ऐकलेल्या) आणीबाणीसंबंधित आठवणी इथे मांडाव्या ही विनंती. पत्रकार, लेखक मंडळींनी लिहिलेले अनुभव शक्यतो नकोत कारण ते राजकीय हेतुंनी प्रेरित असण्याची बरीच शक्यता वाटते.

वाचने 41880
प्रतिक्रिया 128

प्रतिक्रिया

आणिबाणी अनुभवलेली नाही .. पण ऐकिव लिखाणानुसार सरकारी चमचे, खुशमस्करे यान्नी अक्षरशः धुमाकूळ घातला होता .. लोकान्च्या वाईट कार्यपध्दती सुरुवातीला सुधारल्या( कामावर वेळेवर येणे ईत्यादी) पण नन्तर कथित उद्दिष्टान्पासून भरकटल्यामुळे विरोधी वातावरण तयार झाले. समाजवादी, जनसन्घ यान्नी कडाडून विरोध केला. तसेच अजून एक निरिक्षण म्हणजे उत्तर भारतात आणिबाणीला दक्षिणेच्या मानाने जास्त विरोध झाला.. प्रत्यक्ष अनुभवलेली नाही त्यामुळे जे ऐकण्यात, वाचनात आले ते लिहिले...

या विषयावर पूर्वी, माझ्या अंदाजाने, विकास यांचा सविस्तर प्रतिसाद एका धाग्यावर आला होता. त्यात त्यांनी संप, औद्योगिक आणि सरकारी कारभारात असणारी बेशिस्ती या मुळे एकूणच अस्थिर झालेले जीवन याचा चांगला उहापोह केला होता. हा सर्व प्रकार किती गंभीर होता हे सांगताना गुजरात मधील वैद्यकीय महाविद्यालयातील एका आंदोलनामुळे जो वणवा पेटला होता तो कसा देशभर पसरत चालला होता त्याची आठवण सांगितली आहे. विशेष म्हणजे आणीबाणीच्या सुरवातीच्या काळात तर जनतेत कमालीचे समाधानाचे वातावरण होते. बसेस, रेल्वे वेळेवर धावणे, सरकारी कार्यालयात एकूणच कामाच्या वेळेच्या बाबतीत झालेले सुधारणा या मुळे जनतेत समाधान होते. आजही रेशनिंगच्या दुकानात शिल्लक असलेला साठा लिहण्याची असलेली शिस्त हि आणीबाणीच्या दिवसांची आठवण आहे. मुंबईत फोर्ट भागात स्मगलिंगच्या वस्तू मिळणारे स्टाल्स पूर्णतः बंद पडले होते आणि लोक मोकळेपणाने फुटपाथवरून चालू शकत होते. आज जेंव्हा फ्लेक्स काढण्याची देखील कोणी इच्छाशक्ती दाखवू शकत नाही तेंव्हा मजबूत प्रशासन असल्याने काय चमत्कार होऊ शकतो याच्या केवळ दंतकथांवरच आपल्याला समाधान मानावे लागेल. मला वाटते आणीबाणीच्या दरम्यान कधीतरी, संजय गांधींना पुढे आणण्याचा भाग म्हणून, त्यांचा २० कलमी कार्यक्रम सरकारी पातळीवर राबवण्यात यायला लागला. त्यातील नसबंदी हा सर्वात जास्त बदनाम झालेला उपक्रम. यात सरकारी नोकरांना नसबंदीची उद्दिष्ट दिली गेली. यामध्ये जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांनी उद्दिष्ट सध्या करताना केलेली मनमानी यामुळे आणीबाणी (ज्याला सरकारी पातळीवर अनुशासन पर्व म्हटले जायचे) बद्दल लोकांच्या मनात घृणा निर्माण झाली. काँग्रेसच्या काळात सर्वच गोष्टी वाईट होत्या याचा लोक जेंव्हा म्हणून उल्लेख करतात तेंव्हा तेंव्हा त्यांचा निव्वळ विशेषणावर भर असतो. साठ वर्षाची घाण, लांगुलचालन वगैरे वगैरे. प्रत्यक्षात किस्सा कुरसिका प्रकरण, विद्याचरण शुक्ल नावाचे रंगढंगी मंत्री असे हातावरच्या बोटावर मोजता येतील इतकेच किस्से आहेत. काळाच्या ओघात त्यांना काही महत्व देखील राहिले नाही यावरून त्यांचा किरकोळपणा लक्षात यावा. प्रत्यक्षात बघाल तर संजय गांधींनी सुरु केलेला मारुती उद्योग आज गेली ३५ वर्षे एक महत्वाचा उद्योग म्हणून गणला जातो आणि सरकारला बरीच वर्षे त्याने चांगला महसूल मिळवून दिला आहे. सरकारी कामातील शिस्तीची घडी बरीच व्यवस्थित आहे आणि त्याला काही राज्यांमध्ये अधिक बळकटी आणली जात आहे. समाजाला शिस्त लावण्यासाठी परत कधीतरी आणीबाणी लावावी लागेल का? मला वाटते त्या आणीबाणीला १९७५ च्या आणीबाणीचे यश मिळणे शक्य नाही. २५-३० कोटींची बेशिस्त जनता आणि १२५ कोटींची बेशिस्त जनता इतका हा नुसता स्केलचा फरक आहे. त्यात राजकारण हा, ज्यांना काहीतरी वारसा आहे, त्यांच्यासाठी तर करिअरच झाली आहे. महागड्या गाड्या, स्टाईल स्टेटमेंट होईल अशी पोषाखाची पद्धत (कोणत्याही ऋतूत घोंगडी किंवा शाल पांघरुणे). राजकारणाची पकड सैल होणे आणि प्रशासन मजबूत होणे हाच एका चांगल्या राष्ट्राचा पाया होऊ शकतो आणि तो देण्याची आणि मागण्याची सध्यातरी आपल्या समाजात कुणाला गरज वाटत नाहीये.

In reply to by सर टोबी

त्या धाग्याचा दुवा किंवा धागा शोधण्याकरिता एखादी महत्वाची खूण (धागालेखकाचे नाव, धाग्यातील आठवत असलेले एखादे वाक्य) असे काही देवू शकता का ?

In reply to by सर टोबी

टोबी सर आपल्याला आणीबाणीचा किती अनुभव आहे हे मला माहिती नाही प्ररंतु आपण वर लिहिलेले हे एक अजेंडा मनात ठेवून लिहिलेले आहे. तेंव्हा सर्वांच्या मनात होती ती शिस्त नव्हे तर प्रचंड भीती होती. कारण मिसा कायदा. या कायद्याखाली कोणालाही विनाचौकशी कितीही दिवस अटकेत ठेवता येत असे. हा कायदा १९७१ साली पास झाला होता आणि हा घटनेच्या ९ व्या अनुसुची मध्ये टाकला होता ज्यामुळे या कायद्यावर न्यायालयीन प्रतिबंध टाकता येत नसे. (याच घटनेच्या ९ व्या अनुसुची मध्ये टाकून तामिळनाडू मध्ये ७० % आरक्षण आहे आणि हे प्रकरण न्यायालयात राजकारणामुळे प्रलंबित आहे). या कायद्यात आणीबाणी मध्ये अनेक वेळा पाहिजे तसे बदल केले गेले होते. या कायद्याचा गैरवापर झाल्याने लोकांत प्रचंड भीती होती.या पण काम केले नाही तर आपल्याला कधीही अटक होईल या भीतीने सरकारी कर्मचारी कामे करत असत. पण केंव्हा कोणाला काय कारणासाठी अटक होईल हे माहित नव्हते. गाडी उशिरा आली तर मोटरमनला अटक होत असे एस टी नीट चालवली नाही तर चालकाला चौकशीला बोलावले जात असे. आणि एकदा माणूस चौकशीसाठी गेला तर तो केंव्हा परत येईल याची कोणालाही खात्री नव्हती. स्मगलिंग हातभट्टी इ बंद होते कारण आपण कारवाई केली नाही तर आपल्यालाच अटक होईल या भीतीने पोलिसांनी सर्व संशयग्रस्तांना अटक करून आत टाकले होते. सार्वजनिक सोयीच्या गोष्टी चांगल्या चालत होत्या याचे कारण प्रचंड भीती हे होते याला तुम्ही जनतेत कमालीचे समाधानाचे वातावरण होते म्हणताय बढिया है रेशन च्या दुकानात धान्य मिळत असे हा गैरसमज आहे पण त्याबद्दल कोणी ब्र काढायची बिशाद नव्हती. साधे "वीस" कलमी कार्यक्रम च्या मागे कुणीतरी चारशे लिहून चारशे वीस केले तर गिरगावात पोलीस आठवडाभर फिरून येणाऱ्या जाणारी पोरांना फटकावत असत. कारण हे असे करणारा सापडला नाही तर आपली नोकरी जाईल/ तुरुंगात टाकले जाईल हि पोलिसांनाच भीती होती. इंदिरा गांधी यांनी ढवळाढवळ केली नाही असे एकही सरकारी खाते नव्हते ज्यात सर्वोच्च न्यायालय आणि घटना सुद्धा सामील आहे. आपल्या मर्जीतील लोकांना न्यायाधीश नेमण्यापासून ते मर्जीतील न्यायाधीशांना "ए एन रे" सरन्यायाधीश करण्यापर्यंत मजल गेली. https://en.wikipedia.org/wiki/A._N._Ray मग या सरन्यायाधिशानी इंदिरा गांधी यांचा लाळघोटेपणा इमानदारीत केला. https://www.indiatimes.com/news/india/the-darkest-hour-in-indian-judici… How it led to the making of draconian law Chief Justice A N Ray, beholden to Mrs. Gandhi for his appointment as the Chief Justice after superseding other senior judges, chose to disregard the unanimous conclusion advanced by all the other high courts of the country on the same question. They all agreed that, even in the darkest period of political turmoil, a citizen could approach the high courts under Art. 226 of the Constitution for appropriate remedy through writ jurisdiction. CJI Ray chose to overrule all those judgments and closed the gate of the courts to the ordinary citizen of the country demanding justice in very unjust times. निदान आपण विकी मधील आणीबाणी बद्दल लेख तरी वाचायला हवा होता https://en.wikipedia.org/wiki/The_Emergency_(India) https://en.wikipedia.org/wiki/Kesavananda_Bharati_v._State_of_Keralaकाय… अभ्यासकांनी आयुष्यभर लक्षात ठेवावी अशी हि केस आहे. मारुतीची एकंदर कहाणी "एकाधिकार शाही राबवून मारुतीला कसे वर आणले गेले आणि इतरांना कसे खच्ची केले गेले" आपण वाचलीत तर आपले मत "कदाचित" बदलू शकेल. हा सर्व काळ माझ्या उत्तम स्मरणात आहे.

तेंव्हा आणीबाणीचे समर्थन करणारा कुणी असेल तर एक तर त्याने आणीबाणी पाहिलेली नाही किंवा तो काँग्रेसचा अंध भक्त आहे असे स्पष्ट आहे

.

In reply to by सुबोध खरे

अजेन्डा दिसण्यामध्ये आणि काँग्रेस भक्त दिसण्यामध्ये काय वाईट आहे? माझ्या प्रतिसादातील 'साठ वर्षांची घाण' आणि 'लांगूलचालन' हि शब्द रचना तर तुम्हालाच डोळ्यासमोर ठेऊन केली आहे. इतकी घाण असणारा देश जेंव्हा भाजपच्या ताब्यात आला तेंव्हा लगेच महिन्याभरात फेकुन्ना मंगळ मोहिमेचे उदघाटन करण्याची संधी मिळाली. तेंव्हा आपल्या प्रतिसादात तारतम्य असावे हि अपेक्षा आहे. जेंव्हा भाजपा विरुद्ध काँग्रेस हा वाद अहमिहिकेने लढविला जातो तेंव्हा एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल ती म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठणारा युक्तिवाद आणि विशेषणांचा भडीमार करणारी भक्तांची मानसिकता. आणि मारुतीला जीवदान दिले ते जनता सरकारने. आणि एकाधिकारशाही राबवून इतरांचे खच्चीकरण कसे काय झाले ते सविस्तर लिहाना. वरती मी म्हटलेच आहे कि नुसता विशेषणांचा भडीमार. आजमितीला निदान दहा कंपन्या, प्रत्येकी ५ वाहनांचा पोर्टफोलिओ घेऊन व्यवसाय करीत आहेत. त्यातील सर्वात तरुण कंपनी निदान वीस वर्षांची आहे. खच्चीकरण करून अशी वृध्धी होते का?

In reply to by सुबोध खरे

भीतीए मुळे का होईना लोक शिस्तीने काम करीत होते. भारतीय लोकाना शिस्त लावायला भीती हेच योग्य साधन आहे. ज्या दिवशी स्वयंस्फूर्ती ने पुण्यात ट्राफीक ला शिस्त लागेल तो दिवस सुवर्ण दिवस म्हणता येईल. गणपतीची मिरवणूक कमी काळात संपणे हे हल्ली कायद्याचा बडगा असूनही शक्य होत नाहिय्ये. साधी हेल्मेट सक्ती केली तरी ती लोक झुगारून लावतात. लोकांना सरळ करायचे असेल तर बडगाच हवा.

की त्या काळातील अनंत चतुर्दशीची पुण्यातली मिरवणूक कशी गुमान ८ तासांत संपली होती! आणीबाणी जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी 'सकाळ'ने त्यांची अग्रलेखाची जागा ठळकपणे कोरी ठेवली होती.

म्हणजे आणीबाणी चांगली होती म्हणायची. मी इंदिरा गांधींचा आधीच फॅन. त्यात आणीबाणी मध्ये लोकांना शिस्त लागली हे वाचून बरं वाटलं. ह्या देशातील जनतेला कायदे लावल्या शिवाय सुधारणा होत नाही. असल्या लोकांना आणीबाणी मुळे शिस्त लागली असेल तर आणीबाणी हे खरंच अनुशासन पर्व म्हणून साजरे व्हावे.

आणीबाणी हा काळ खरोखर अनुशासन पर्व म्हणावा लागेल. सर्वसामान्य लोकांना काही त्रास जाणवला नाही. नाही म्हणायला आमच्या शाळेतील काही शिक्षक हे राजकीय कारणासाठी अटकेत होते. माझे एक नातेवाईक देखील राजकीय कैदेत होते. त्याना एकदा भेटायला गेलो होतो त्यावेळेस ते सर्व जेलमधे आनंदात दिसले. हसत खेळत गप्पा मारत होते. या काळात रेशनवर धान्य आले नाही , मोर्चे , दगडफेक , बंद हे काहीच आढळत नव्हते. लोक टॅक्स चुकवेगिरी न करता प्रमाणीक पणे भरत होते. एक चांगला कणखर नेता काय करु शकतो हे दिसून आले. देशाला अशा आणिबाणीची खरोखरच पुन्हा एकदा गरज आहे. विशेषतः हिंदी न्यूज चॅनल्स वर आणिबाणी ची जास्त गरज आहे.

आणिबाणीच्या अगोदर जयप्रकाश नारायण यानी पोलीस दले , निमलकष्करी दले आणि सैन्य दले यानी उठाव करावा असे आवाहन केले होते. असे आवाहन करणे हे किती मूर्खपणाचे आहे याची आत्ता जाणीव होते. इंदीरा गांधी इतका कणखर आणि निर्णय घ्यायला न डरणारा नेता या देशाला त्या नंतर कधी मिळालाच नाही. मोदी त्या मार्गाने प्रगती करत आहेत. ही सुदैवाने चांगली गोष्ट आहे.

आंणीबाणीत स्वात:ला आलेले अनुभव असे कोणी का लिहीत नाही .? मी आणीबाणी काळात फार धमाल केली . ती शिस्त मला तर काही लागली नाही . अक्षरश: धुमाकूळ घालायचो असे म्हणा ना त्या काळात . त्यावेळी माझे वय दीड वर्षे होते . फार मस्ती करायचो मी....

In reply to by रानरेडा

अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी, तुरुंगवास याची कणभरही भीती न बाळगता माझी आणीबाणीविषयक मतं मी खुद्द आणिबाणीतही उच्चारवाने आणि स्पष्टपणे सतत मांडत असे. पण प्रत्येक वेळी मी काहीही विरोधी मत कंठशोष करून मांडू लागलो की कोणीतरी येऊन दुपटं चेक करून जात असे किंवा पळीभर बडीशेपेचे पाणी तोंडात घालून मला उभे धरून ढेकर आणवीत असत. आणीबाणीने त्यांची आकलनशक्ती नष्ट केली होती.

Please excuse me; transliteration is not working on my laptop so compelled to use English. A less known fact: the Maharashtra govt (most likely fearing that the vari would be used for instigating people against emergency) banned the annual Pandharpurchi vari in the year 1976. So it did not happen. So much for the great, uninterrupted tradition of a few hundred years. When the chips are down, Vitthal does not matter. And that's how it would always be. Aadhi potoba, mag vithoba!

In reply to by एमी

पत्रकार, लेखक मंडळींनी लिहिलेले अनुभव शक्यतो नकोत कारण ते राजकीय हेतुंनी प्रेरित असण्याची बरीच शक्यता वाटते.

आणीबाणी आणि त्यानंतरची काही वर्षे हे एक दु:स्वप्न होतं. डीटेल्स सांगून उगाच कशाला जुन्या जखमा जागवायच्या? आणीबाणीने एक मात्र झालं. आपण आदर्श मानलेली सर्वपक्षीय नेतामंडळी ही किती क्षुद्र आणि पोरकट आहेत हे आणीबाणी आणि त्यानंतरच्या काही वर्षांतच समजलं. थोडक्यात आमच्या श्रामोंच्या शब्दात सांगायचं तर "आम्ही मोठे झालो!" :(

In reply to by पिवळा डांबिस

नेमकं! खपली न काढणं चांगले! ७ व्या वर्षी बरंच भोगावे लागले. आठवणी नको वाटतात! बाकीचे विषय आहेत की.. एंजॉय!!

वेळेवर येत आणि कामही करीत. एकदा विक्रीकर भवन चे दरवाजेच सकाळी ९.३० ला बंद केले आणि नंतर आलेल्या कर्मचार्‍यांना आणि अधिकार्‍यांना गैरहजर मांडले होते. मी तेव्हा विक्रीकर खात्यात नोकरीला होतो. सरकारी कामे पटापट होत आणि छोट्या कामांसाठी सरकारी माणसांनी पैसे खाणे जवळजवळ नष्ट झाले होते. मूंबईच्या आरटीओ कार्यालयात आणि जकात नाक्यावर देखील. नंतर कधीही एवढी शिस्त दिसली नाही. परंतु भारत बचाओ म्हणून एक सरकार पुरस्कृत मानला गेलेला निधी मात्र जमा करीत. पंचाईत झाली होती ती बिनबुडाच्या बातम्या, सरकारविरोधात काहीही आवाज उठवणार्‍यां पत्रकारांची. फालतू बकबक करणार्‍या विरोधी पक्षातल्या राजकीय नेत्यांची. पण संजय, शुक्ला, बन्सी अशा बगलबच्चाची अफाट तोडपाटीलकी चालत असे आणि ही नावे खाजगीत शिव्या म्हणून वापरली जात. दादा कोंडकेंच्या एका चित्रपटात या शिव्या वापरल्या आहेत. यात बरेवाईट काय होते याबद्दल मी आणखी कोणतेही मत मांडू इच्छित नाही. आपला आपण निष्कर्ष काढावा.

आणिबाणीत काय चालत होते याचे बर्‍यापैकी वर्णन "Indu Sarkar" या चित्रपटात पाहायला मिळेल. बर्‍याच लोकाना आणिबाणीच्या विरोधात बोलण्याची भीती वाटत असल्यामुळे अनेक युक्त्या योजल्या गेल्या. एक नमुना - Obituary for Democracy - इथे पहाता येईल https://www.scoopwhoop.com/Obituary-Of-Democracy-Emergency-1975/#.meiua… पुण्यात तुरुन्गात डाम्बलेल्या लोकानी त्यान्चा कैदेतला काळ वेगवेगळ्या अभ्यासात घालवला. युक्रान्द च्या कुमार सप्तर्षीनी याबद्दल लिहिले आहे.

शिस्त, अनुशासन पर्व वगैरे सामान्य माणसाला समाधान देणार्‍या गोष्टी घडल्या तर मग ह्याच सामान्य माणसांनी त्यांना परत निवडुन का दिले नाही ?

In reply to by मराठी_माणूस

माझ्या आठवणीप्रमाणे त्यावेळी लोकसत्ताचे संपादक विद्याधर गोखले होते. 77 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळचे इंदिरा गांधींच्या हुकूमशाहीविरुद्ध लिहिलेले जळजळीत अग्रलेख आठवतात. लोकसत्ता त्यावेळी मुंबईत सर्वाधिक खपाचे मराठी दैनिक होते .

In reply to by मराठी_माणूस

माझ्या आठवणीप्रमाणे त्यावेळी लोकसत्ताचे संपादक विद्याधर गोखले होते. 77 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळचे इंदिरा गांधींच्या हुकूमशाहीविरुद्ध लिहिलेले जळजळीत अग्रलेख आठवतात. लोकसत्ता त्यावेळी मुंबईत सर्वाधिक खपाचे मराठी दैनिक होते .

In reply to by मराठी_माणूस

मग ह्याच सामान्य माणसांनी त्यांना परत निवडुन का दिले नाही ? असे प्रश्न विचारायचे नसतात नाही तर तुमच्या वर "प्रतिगामी, भक्त" असे शिक्के बसतील

आणीबाणी ही फक्त युद्ध असले की असते असा गैरसमज होता . काही पत्रकारांनी अग्रलेख मुददाम कोरा ठेवला होता की की तो सेन्सर झाला होता ई समजायला वाव नव्हता . आणीबाणीत एकूण नोकरशाही वर्ग व समाज याना शिस्त लागली होती हे खरे ! आज लोक अघोषित आणीबाणी आहे असे म्हणतात पण खरी परिस्थिती उलट आहे . मोदी ना लोक हुकुमशहा म्हणतात पण माझे मते हुकुम्शाहाचे काय अधिकार त्याना आहेत ? काहीच नाही . आजची सरकारे , सरकारी मंडळी, राजकारणी , नोकरशहा यांची कर्तुते पाहिली की या तथाकथित हुकुम्शाहाचा कुणाला धाक आहे असे वाटत नाही . लेखक , विचारवंत या मध्ये काही लोक सरकारने पदे , पुरस्कार देऊन विकत घेतलेले असतात व काही न दिलेले रहातात . जे रहातात हे भुंकत रहातात मग सरकार कोणतेही येवो . आणीबाणी त संघ परिवाराच्या अनेकाना मात्र सुडाने वागविण्यात आले यात शंका नाही. संघवाला व मटका किंग यांच्यात काही फरक करण्यात आला नाही हा मोठा लोकाशाहीवरचा डाग आहे. तरीही आणीबाणी व बाबरी मशीद हे दोन्ही विषय राजकारणी व विचारवंत आपल्या स्वार्थासाठी निष्कारण चघळत असतातच !

आणीबाणीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य , मूलभूत स्वातंत्र्य यांची पायमल्ली झाली असे त्यावेळच्या बातम्या मधून समजते . अनुशासन , शिस्त यासाठी स्वातंत्र्यचा बळी देउ शकत नही

चौकटराजा म्हणतात "आणीबाणीत एकूण नोकरशाही वर्ग व समाज याना शिस्त लागली होती हे खरे ! आज लोक अघोषित आणीबाणी आहे असे म्हणतात पण खरी परिस्थिती उलट आहे . मोदी ना लोक हुकुमशहा म्हणतात पण माझे मते हुकुम्शाहाचे काय अधिकार त्याना आहेत ? " मी काँग्रेस चा कट्टर विरोधक आहे पण आणिबाणी बद्दल जे काही वाचलंय तेंव्हा पासून काँगेस च्या फक्त इंदिरा गांधी चा फॅन आहे . मी तर म्हणेन आपल्या भारत सारख्या लोकसंख्या चा स्फोट झालेल्या देशाला एक तर हुकूमशाहीचीच गरज आहे असं वाटतंय . कुठे ही कचरफेकने , रस्त्यावर पान तंबाखू खाऊन पाचपच थुंकणे , भारतात राहून पाकिस्तान वरील प्रेमाचे जाहीर प्रदर्शन करने , सामान्य गरीब लोकांना सार्वजनिक ठिकाणी व सरकारी ऑफिस / दवाखान्यात तुच्छ वागणूक देणे , सरकारी कार्यालयात पैसे सरकावल्या शिवाय कुठलेही काम न होणे मग तो गरजू किती ही गरीब असो या गोष्टी लोकशाही मध्ये सर्रास चालतात . लोकशाही मध्ये भ्रष्ट्राचार दूर होऊन किमान स्वछता , आरोग्य शिक्षण व्यवस्थित भेटेल याची काही शक्यता वाटत नाही . शेतकऱ्यांना किमान दर प्रत्येक कामगारांना किमान वेतन अजून ही दिवास्वप्न च आहेत मग काय पेटवायची का असली लोकशाही ?

मग काय पेटवायची का असली लोकशाही ? उद्वेगाने आपण हे म्हणता आहेत हे ठीक आहे. पण एक उदाहरण म्हणून सांगतो नाणार प्रकल्पाला विरोध असणाऱ्या सर्व स्थानिक लोकांना विनाचौकशी तुरुंगात टाकून प्रकल्प पूर्ण केलेला चालेल का? किंवा बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी जमीन देण्यास नकार देणाऱ्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या ऐवजी तुरुंगात खितपत टाकले तर चालेल काय? आणीबाणी अगदी हेच झाले. Turkman gate demolition and firing was an infamous case of political oppression and police brutality during the Emergency when the police shot and killed people protesting against demolitions of their houses ordered by Indira Gandhi's government in 1976 to cleanse Delhi of slums and force poor residents to leave Delhi and move to distant settlements. https://www.indiatoday.in/magazine/indiascope/story/19780115-sanjay-gan…

अहो , पण चीन च्या कम्युनिस्ट हुकूमशाही मध्ये प्रकल्प विरोधकांना कुठं सरसकट जेल मध्ये टाकतात ? त्यांच्या हुकूमशाही मुळे झालेली प्रगती सर्वांनी पहिली अनुभवली असेल . आणि त्यांचा दरारा पहा चीन वर डोळे वाटरण्या अगोदर अमेरिका दहा वेळा विचार करते . आणि आपल्या लोकशाही पुरस्कृत सरकार ला पाकिस्तान , मालदीव, मलेशिया , बांगलादेश , नेपाळ , श्रीलंका हे आपले शेजारी देश आपल्याला भीक ही घालत नाही . कारण आपल्याला अजून आपले भारतातील बेसिक प्रॉब्लेम च सुटलेले नाहीत तर आपण चीन अमेरिका सारखी जागतिक हवालदाराची भूमिका कधी करणार ?

In reply to by सोमनाथ खांदवे

चीन च्या कम्युनिस्ट हुकूमशाही मध्ये प्रकल्प विरोधकांना कुठं सरसकट जेल मध्ये टाकतात ? तुम्ही हे विनोदाने म्हणत आहात का ? चीन चा इतिहास आपण थोडा हि वाचला नाही का ? https://www.independent.co.uk/arts-entertainment/books/news/maos-great-… https://en.wikipedia.org/wiki/Mass_killings_of_landlords_under_Mao_Zedo… http://www.nybooks.com/daily/2018/02/05/who-killed-more-hitler-stalin-o…

In reply to by सोमनाथ खांदवे

मी स्वतः चीनमध्ये राहुन आलोय.....तिथे सरकार सगळ्यात मोठ्ठा गुंड आहे....सरकारबद्दल अवाक्षर काढणार्या व्यक्तीला सरकार कधी/कसा गायब करेल कोणाला थांगपत्तासुद्धा लागणार नाही....दडपशाही आहे तिथे...आणि जो काही विकास दिसतो तो फक्त बाहेरच्या जगाला दाखवण्यासाठी ठरावीक शहरे सज्ज करुन केलेला देखावा आहे

In reply to by सोमनाथ खांदवे

एकदा तियानमेन चौकात कसे कम्युनिस्टांनी स्वतःच्याच पुढल्या पिढीवर रणगाडे घातले होते ते वाचून घ्याच. "तुझ्या प्लॉट वर ३०० मजल्याची टोलेजंग इमारत बांधून घेऊन पण तू तिच्याकडे पाहिलेस तरी तुला बुडावर फटके देऊ" हा विकास तुम्हाला आवडत असेल तर शुभेच्छा. मला स्वातंत्र्य अनमोल वाटते. हा जो "पेटवायची का असली लोकशाही?" विचारायचा जो हक्क आहे तो अमूल्य आहे जाता जाता आणीबाणी म्हणलं की भलेभले उजव्या विचारसरणीचे लोकही थेट लिबरल मूल्यांचा हवाला देऊ लागतात, ते पाहणे बडे मजेशीर असते. एकंदरीत इतिहासात कम्युनिस्टांनी मारलेल्या कुविख्यात "कम्युनिस्ट कोलांटी" इतकेच मजेदार.

आणीबाणी का लावली यावर कोणीच काही बोललं नाहीये. १९७१ मधील रायबरेलीची निवडणूक इंदिरा गांधी जिंकल्या होत्या. त्यांनी राज नारायण यांना पराभूत केले होते. राज नारायण यांनी हा विजय चुकीच्या मार्गाने मिळवलेला आहे अशी केस कोर्टात दाखल केली. यात असं म्हणलं होतं की श्रीमती गांधींचे निवडणूक सहाय्यक यशपाल कपूर हे सरकारी नोकर होते. म्हणजेच त्यांनी सरकारी यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लावली. जज सिन्हा यांनी या प्रकरणात श्रीमती गांधींना संसदसदस्यत्व रद्द केलं आणि ६ वर्ष निवडणूक लढवायला बंदी घातली. यावेळी इंदिरा गांधी स्वतः कोर्टात उपस्थित होत्या. इंदिरा गांधींनी या निर्णयाविरोधात जे अपील केलं ते जस्टीस कृष्णा ऐयर यांच्या समोर सुनावणीला आलं. त्यावेळेला जस्टीस ऐयर हंगामी जज म्हणून काम पाहत होते. २४ जून १९७५ ला जज ऐयर यांनी जज सिन्हांच्या या निर्णयाला स्थगिती दिली पण संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यास आणि संसद सदस्य म्हणून पगार घेण्यास मनाई केली. या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू करून विरोधी नेत्यांची आणि त्यांच्या सदस्यांची धरपकड करून तुरुंगात टाकायला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर नन्तर १९७६ मधे काँग्रेसच्या रॅली मध्ये गायला नकार दिला म्हणून प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्यावर ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन वर गाण्यास बंदी घातली, जी आणीबाणी संपेपर्यंत कायम राहिली. तसेच जनता पार्टीचे संसद सदस्य अमृत नाहटा यांच्या "किस्सा कुर्सी का" या १९७७ मध्ये बनलेल्या चित्रपटावरही बंदी घालण्यात आली. यात संजय गांधी आणि तत्कालीन सूचना, दूरसंचार मंत्री व्ही. सी. शुक्ला आणि काही काँग्रेस कार्यकर्ते यांच्यावर या फिल्मच्या मूळ प्रतीसहित इतर सर्व प्रती नष्ट केल्याबद्दल कोर्ट केस करण्यात आली. बाबू लोक वगैरे वेळेवर कामाला यायला लागले कारण कोणत्याही कारणावरून केवळ नोकरी जाईल याचीच नव्हे तर कुठलीही कारवाई होईल याची भीती होती. तसेच सरकारच्या किंवा काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याविरुद्ध तसेच नितीविरुद्ध कोणी जरा जरी काही बोललं तरी लगेच कारवाई होत होती. व्यक्तिस्वातंत्र्य गेल्या ४ वर्षात नष्ट झालंय म्हणून जे गळा काढत आहेत त्यांना खरंच तसं होणं म्हणजे काय याची कल्पनाही नाही. इथे मिपावर तरी विद्यमान सरकारच्या बाजूने बोलणारे गायब झालेत. आणि विरोधात बोलणारे मात्र मोदींवर अगदी वैयक्तिक टीका करून वर व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होतीये आणि मोदी एकाधिकारशहा आहेत म्हणतात. आहे की नाही गंमत!

वर इतरांनी सांगितल्या प्रमाणे तरुण-भारत च्या अग्रलेखाची जागा कोरी होती. सेन्सार केला गेला असे कळले. आमच्या परिचयाचे एक संघाचे प्रचारक होते ते भुमिगत झाल्याची अफवा होती. एका परिचीतांना रातोरात अटक झाली असावी असा संशय होता. नाक्यावर, थेटरमधे टोळक्यांनी होणारी वासुगीरी दुसर्याच दिवसापासून बंद झाली. आमच्या घराजवळच्या मैदानात संघाची शाखा भरत असे, ती बंद झाली. ( पुढे काही दिवसांनी कुणाच्या घरी, गच्चीवर वगैरे लपून छपून भरत असे). पहीले दोन तीन दिवस कुणाला काहीच कळत नव्हते, पुढे हळुहळू लोक सरावायला लागले. सगळी कडे, विशेषतः सरकारी कामकाजात शिस्त दिसू लागली, आमच्या कालेजातले सगळे प्राध्यापक वेळेवर हजर राहायला लागले, चीरीमिरी टाईपचा भ्रष्टाचार पूर्ण बंद झालेला दिसत होता. हे सगळे आम्हाला अनपेक्षित पण सुखावह वाटत होते. लोकांमधे दोन तट झाले होते. पहीला आपल्याला असेच हुकुमशाही , सरळ करणारे सरकार हवे असे मानणारा, तर दुसरा हा बळजबरीचा रामराम फार दिवस चालणार नाही व नंतरची अनागोंदी कल्पनेच्या बाहेर असेल व म्हणून विरोध करणारा. ४-५ महिन्यानंतर बर्याच गोष्टी हळुहळू बाहेर येवू लागल्या. जबरीची नसबंदी, शिक्षकांना नसबंदीचे दिलेले टारगेट, तुर्कमान गेट प्रकरण झाले, संजय गांधींच्या सुरस व चमत्कारीक कथा. आम्हा लोकांत इंदीराजी ह्या संजय व त्याच्या चांडाळ चोकडीच्या हातातले बाहुले बनल्या आहेत हा विचार पक्का होत होता. ह्या सगळ्याचा परिणाम हळुहळू आम्हा लोकांचे मत बदलण्यात व्हायला लागला. लवकरच, आपल्याला अन्न, वस्त्र व निवार्या बरोबरच वैचारिक स्वातंत्र्य आवश्यक असल्याची जाणीव व्हायला लागली. मग जेंव्हा निवडणुका जाहीर झाल्या तो पर्यंत आमच्या कालेजातले संपूर्ण जनमत इंदीराजींच्या विरुध्द गेलेले होते.

लोकहो, माझ्या खाती एक ऐकीव अनुभव आहे. ऐकीव अशासाठी की देशातल्या आणीबाणीच्या काळी अस्मादिकांची आणीबाणी चड्डीत साजरी होत असे. त्या काळी तांदूळ मिळायची मारामार होती. आमच्या वडिलांनी टिटवाळ्याहून कुठूनसे दहा किलो तांदूळ पैदा केले व ठाण्यास घरी आणले. रेलवे स्थानकावरून घरी एव्हढं वजन आणता येणारं नव्हतं. म्हणून रिक्षा केली. रिक्षावाल्यास कळलं की तांदूळ आहेत. त्याने उतरतांना जास्त पैशाची मागणी केली. आमचे वडील म्हणजे साक्षात जमदग्नी! त्यांनी सरळ नकार देऊन पिशवी खाली उतरवली. रिक्षावाल्याने तक्रार करायची धमकी दिली. आमच्या तेर्थरूपांनी त्याच्या सणसणीत कानाखाली भडकावली. वर म्हंटलं की, जा आणि करायची तिकडे कर तक्रार माझी. पुढं काही झालं नाही. आणीबाणीस बाळासाहेब ठाकऱ्यांचा पाठिंबा होता. वडील शिवसेनेतल्या अनेकांना ओळखायचे. काही गडबड झाली असती तर निस्तरणं अवघड पडलं नसतं बहुतेक. आ.न., -गा.पै.

वरती ॲमी यांनी लिंक दिलीच आहे, संक्षिप्त रूपात पुन्हा थोडेसे. आणीबाणीचा पूर्ण काळ हे खरेच अनुशासनपर्व होते. प्रथमार्ध तर उत्तमच होता. पुढेपुढे संजय आणि त्याच्या भाटांनी अतिरेक केला. मुंबईत आणीबाणीच्या काळातल्या दोन पावसाळ्यांत कुठेही पाणी तुंबले नाही की लोकल गाड्या एक मिनिटसुद्धा उशीरा धावल्या नाहीत. बेस्ट बसेससुद्धा वक्तशीर होत्या, इतकेच नव्हे तर रस्त्याच्या कडेच्या अगदी एक फूट इतक्या जवळ थांबायच्या. लोक शिस्तीत रांग लावून उभे असायचे. आजूबाजूला पोलीस फारसे नसत पण वातावरणात दरारा होता. आणिबाणी नकोशी होण्यात नसबंदीचा अतिरेक ही बाब जास्त कारणीभूत झाली. मुळात सरंजामी उत्तरेकडे पुरुषांना अमर्याद लैंगिक स्वातंत्र्य असते. नसबंदीमुळे आपल्या लैंगिक सुखावर घाला येईल असे त्यांना वाटले. संततिनियमनासाठी बायकांवरच्या हिस्टेरोक्टॉमी या शस्त्रक्रियेपेक्षा पुरुषांची नसबंदी कितीतरी सोपी. कमी खर्चाची,कमी त्रासाची. तरीही पुरुष लोक या शस्त्रक्रियेला तयार नसत. अजूनही नसतात. इंदिरा गांधी स्वत: एक बाईमाणूस. त्यांनाच हे कळू शकले. म्हणून बायकांच्या शस्त्रक्रियांऐवजी नसबंदीला त्यांनी प्राधान्य दिले. पण यामुळे बिमारू राज्ये, जिथून सर्वाधिक खासदार संसदेत जातात, ती खवळून उठली. कधी नव्हे ते हिंदूमुस्लिमांत कॉमन कॉझ होऊन हातमिळवणी झाली. दक्षिणेत फारसा विरोध झाला नाही. नंतरच्या निवडणुकीत दक्षिणेने दिलेले पाठबळ उत्तरप्रदेशातल्या तुफानी झंझावातापुढे कमी पडले. कॉंग्रेसची पार वाताहत झाली. आणीबाणीमागची कारणे, परिस्थिती, परिणाम यावर लिहिण्यासारखे खूप आहे. समाजवाद्यांनी सुरू केलेल्या आणि प्रामुख्याने चालवलेल्या या आंदोलनाचा जनसंघाला अतोनात फायदा झाला. त्यांना व्यासपीठ मिळाले. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे महत्त्व लोकांना कळले वगैरे पुष्कळ मुद्दे आहेत. माझ्या दृष्टीने एक सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे संततिनियमन हा विषय राजकीय अजेंड्यातून कायमचा बाहेर पडला. त्याचे नावही नको म्हणून कुटुंबकल्याण हे नवे नाव दिले गेले इतकी नावड त्या शब्दाविषयी निर्माण झाली. असो. इथे सगळ्या मुद्द्यांचा परामर्ष घेता येण्याजोगा नाही. ते फार विस्तृत प्रकरण होईल.

In reply to by राही

माझ्या दृष्टीने एक सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे संततिनियमन हा विषय राजकीय अजेंड्यातून कायमचा बाहेर पडला. त्याचे नावही नको म्हणून कुटुंबकल्याण हे नवे नाव दिले गेले इतकी नावड त्या शब्दाविषयी निर्माण झाली.
अगदी समर्पक. आता लोकसंख्या वाढीविषयी वा संततीनियमनाविषयी कोणीच बोलायला तयार नाही. वोट बँक सांभाळायची आहे

In reply to by राही

मुंबईत आणीबाणीच्या काळातल्या दोन पावसाळ्यांत कुठेही पाणी तुंबले नाही हायला इंदिराजी एवढ्या

पावरबाज

होत्या कि वरुणराजावर पण त्यांनी आणीबाणी लावावी? उदो उदो असावा पण म्हणून

उंदराला ऐरावत

म्हणायचं म्हणजे फार झालं. माझ्या आठवणीत मुंबईत पाणी तुंबलं नाही असं गेल्या पन्नास वर्षात एकही वर्ष झालेलं नाही. कारण ज्याला मुंबईची उत्तम माहिती आहे त्याला एवढं मूलभूत ज्ञान आहेच कि भरतीच्या वेळेस तुफान पाऊस झाला कि पाणी तुंबतंच. पौर्णिमा अमावास्येला साधारण दुपारी आणि रात्री बारा वाजता पूर्ण भरती असते. रात्री पाऊस झाला तर कळत नाही पण सकाळ पासून संततधार लागली कि १२ वाजेपर्यंत मुंबईची तुंबई होते आणि भरती संपली कि पाण्याचा निचरा होतो. तुम्ही काय वाटेल ते करा. आमचे आजोबा १९२५ साली मुंबईत मॅट्रिक झाले तेंव्हा लोकसंख्य फारच कमी होती आणी "आताची मुंबई महापालिका" नव्हती तरी पाणी तुंबतच असे. आता-- या निचरा होणाऱ्या गटाराच्या व्यवस्थेत आपण बेसुमार प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकून त्यात अडथळे आणतो आहोत आणि जेथे तेथे सिमेंटीकरण केल्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याऐवजी थेट गटारात जाते आणि त्या यंत्रणेवर बेसुमार भार पडतो.

In reply to by सुबोध खरे

इंदिरा गांधींनी वरुणराजावर आणीबाणी लादली असे नव्हे तर मुंबई मनपाचे कमिशनर भालचंद्र देशमुख यांनी सर्व नोकरशाही आणि कचरा उचलणारे ठेकेदार यांना कामाला लावले. भालचंद्र देशमुख हे अत्यंत शिस्तप्रिय व स्वच्छ अधिकारी होते. आणि आपले कर्तव्य न करण्याबाबत कोणताही राजकीय दबाव त्यांच्यावर नव्हता म्हणून ही धडाडी ते दाखवू शकले.

एकंदर माझ्या लक्षात आला आहे कि ज्यांनी आणीबाणीतील दहशत प्रत्यक्ष पाहिलेली नाही त्यांना त्यातील भयामुळे येणाऱ्या शिस्तीचे प्रचंड आकर्षण आहे. शिस्तीचा अतिरेक किती असू शकतो या गोष्टी ज्यांनी पाहिलेल्या नाहीत किंवा अनुभवलेल्या नाहीत त्यांना हे आकर्षण असणे कदाचित नैसर्गिक असेल पण हे आकर्षण दोन वर्षे देश लष्कराच्या ताब्यात द्या असे म्हणणाऱ्या लोकांसारखेच आहे. पण "घी देखा लेकिन बडगा नाही देखा" हि स्थिती आहे. लोकांना चीनच्या "शिस्तीबद्दल" आकर्षण वाटते हि गोष्ट जास्त गंभीर आहे. आणि काही लोक केवळ भाजप ला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या कोणत्याही गोष्टीला चांगले म्हणायला तयार आहेत हि गोष्ट फारशी चांगली नाही. शिस्तीचा अतिरेक म्हणजे काय हे मी लष्करात अनेक वर्षे अनुभवलेले आहे आणि सत्ता लष्कराच्या हातात दिली तर काय होईल हेही माहिती आहे. सुदैवाने "भारतीय लष्करी अधिकारी" याना लोकशाही काय आहे याची संपूर्ण जाण आहे. त्यामुळे आपल्याकडे ७० वर्षाच्या कालावधीत एकही वर्षे (लष्करी) हुकूमशाही आलेली नाही. त्याच दिवशी स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानची स्थिती पहिली तर हि गोष्ट आपल्या लक्षात यायला हरकत नाही. असो. यापुढे याबद्दल काही लिहिणे हा केवळ कालापव्यय असेल. इति लेखनसीमा

In reply to by सुबोध खरे

अगदी सहमत आहे कल्याणकारी मर्यादित हुकुमशाही अशा काहीशा संकल्पनेचे आकर्षण लोकांना वाटते. शेवटी शिस्तीमधे स्वातंत्र्याचा संकोच होतच असतो.

In reply to by सुबोध खरे

भारतीय लष्कराने लोकशाहीचा नेहमीच सन्मान केला आहे. कधिहि राजकीय परीस्थीतीचा फयदा न घेता कायम सपोर्ट करत लोकशाही मजबूत करायल मदत केलि अहे . आपल्या देशात प्रत्येक चांगली गोष्ट दुसर्‍ञाने करावी असे वाटते . शिस्त सुद्धा स्वयंशिस्त न पाळता दुसर्‍यने लावावी असे वाटते

मुठभर लोकांच्या सत्तेच्या हव्यासापायी , असंख्य निष्पाप आणि निरागस नागरिक भरडले गेले. सगळ्या देशाल हे काही काळाने लक्षात आले . ज्यांचा राजकारणाशी दुरान्वयेही संबंध नव्हता (कलाकार, साहीत्यीक इ.) तेही मग विरोधात उतरले आणि आलेल्या निवडणुकीतुन लोकांनी आपले योग्य ते मत दिले.

राही यांच्या धाग्यावर मिपासदस्य अरविंद कोल्हटकर यांचा प्रतिसाद बोलका आहे.
खनिज तेलाच्या किंमतीतील अनपेक्षित वाढ, दुष्काळ, बांगलादेशी निर्वासितांचा भार अशांमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडायला आली होती, त्यातच जयप्रकाशसारख्यांचे देशाला निर्नायकतेकडे न्यायचे प्रयत्न ह्यांच्यावर उतारा म्हणून आणीबाणी अपरिहार्य ठरली असे म्हणणे म्हणजे शुद्ध कांगावा आहे. माझ्या स्मृतीनुसार देशाची आर्थिक स्थिति इतकी नाजूक झाली नव्हती की आणीबाणी आणि इंदिरानेतृत्व हेच त्यावर इलाज आहेत असे वाटावे. तसे पाहिले तर स्वातन्त्र्य मिळाल्यापासून देशाचे हे ना ते आर्थिक प्रश्न होतेच आणि दरिद्री दीनवाण्या लोकांची जेथे प्रचंड संख्या आहे अशा देशात ते असणारच. दुष्काळ पूर्वीहि येऊन गेले होते, उदाहरणार्थ १९६१-६२ सालातहि पाऊस खूपच उशीरा सुरू झाल्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. तरीहि 'देश नाकाला सूत लावलेल्या स्थितीत आहे' असे आमच्या सारख्यांना १९७५ मध्ये आणीबाणीच्या समर्थकांनी सांगेपर्यंत कधीहि जाणवले नव्हते. पूर्वी आर्थिक संकटांमधून देश तरला होता, आताहि तरला असता. पण 'मीच ह्या देशाची तारणहार आहे' अशा megalomania मधून आणीबाणीचा उगम झाला असे माझे वैयक्तिक मत आहे. २५ जून १९७५ ह्यादिवशी रामलीला मैदानावर प्रचंड जनसमुदायासमोर जयप्रकाशांनी इंदिरा गांधींना पंतप्रधानपदापासून पायउतार होण्याचे जाहीर आवाहन केले आणि त्याचा परिणाम म्हणजे २६ जानेवारीला फक्रुद्दिन अली अहमद ह्या रबरस्टँप राष्ट्रपतींनी आणीबाणी (Internal Emergency) च्या घोषणेवर सही केली.
दरवर्षी आणिबाणीचे समर्थक हे तुणतुणं सुरू करतात की आणिबाणि गरजेची होती अमुक अमुक कारणांमुळे.

In reply to by अनुप ढेरे

प्रतिसाद तेव्हाही पटला नव्हता. १९७४ मधल्या जॉर्ज फर्नॅंडीस यांच्या प्रचंड यशस्वी (जवळ जवळ महिनाभर १००% अनुपस्थिती) अशा रेल्वे संपामुळे झालेले अतोनात हाल अजूनही स्मरणात आहेत. ऱेल्वे बंद असल्यामुळे रस्तेवाहतुकीवर प्रचंड ताण पडला. कितीतरी अपघात झाले. ट्रक्समधून प्रवासी वाहतूक होऊ लागली. वैयक्तिक सांगायचे तर एक जवळचे नातेवाईक स्कूटर अपघातात जायबंदी झाले. असे अनेक. संपाच्या योग्यायोग्यतेविषयी मतभेद असतील पण धाकदपटशाद्वारे जनतेला इतके वेठीस धरणे तेव्हाही पटले नव्हते आणि आताही नाही. खरे म्हणजे आमचे कुटुंब आणि गोतावळा कट्टर समाजवादी होता. माझ्यासारखे अनेक टीन एजर्सनी उसळत्या रक्ताला स्मरून विद्रोहात उडी घेतली होती. सरकारचे अनुशासनपर्व आणि युवा- पौगंडांचे विद्रोहपर्व. तरीही आणीबाणीचे पहिले पर्व भारतालस अतिशय सुखाचे आणि शिस्तीचे गेले असे मी आताही म्हणेन. पुढे कदाचित लिहीन इथेच.

In reply to by राही

तरीही आणीबाणीचे पहिले पर्व भारतालस अतिशय सुखाचे आणि शिस्तीचे गेले असे मी आताही म्हणेन. पुढे कदाचित लिहीन इथेच. लिहाच. भले राजकीय स्वार्थ साधण्यासाठी त्यावेळी आणिबाणीचा निर्णय घेतला असेल, दडपशाहीचा अतिरेकही झाला असेल, परंतू विरोधकांच्या विध्वंसक हालचाली बघता शॉर्ट टर्म दडपशाहीचा वापर केला गेला असावा. विरोधकांच्या कृतीबद्दल मात्र कोणी फारसे बोलताना दिसत नाही.

प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे आभार.. . कोणतीही गोष्ट..खासकरून इतक्या गुंतागुंतीच्या घटनेचे फक्त 'चांगली वा वाईट' असे वर्गीकरण करणे कदाचित कठीण असेल.. प्रत्येकाचा अनुभव आणि दृष्टीकोन वेगळा पण अनुभवांची देवाण घेवाण झाली हे महत्वाचे. धन्यवाद

आपले म्हणणे समर्थन करण्यासाठी अतिशयोक्ती होत आहे असे वाटते. रेलवे चा संप हा माझ्या स्मरणात आहे. तासाभरात एखादी लोकल जात असे. रस्ते वाहतुकीवर प्रचंड ताण पडला होता हि वस्तुस्थिती. ट्रक टेम्पो खाजगी वाहनांना लोकांना नेण्याची सरकारने परवानगी दिली होती. मी स्वतः दादर ते घाटकोपर खाजगी बसने नंतर घाटकोपर ते भांडुप ट्रकच्या मागे बसून आणि पुढे मुलुंड पर्यंत टॅक्सीने प्रवास केल्याचे आठवत आहे. लोकांचे फार हाल झाले हि वस्तुस्थिती आहे हे कोणीच नाकारत नाही. पण संप का झाला आणि कशा तर्हेने अत्यंत कठोरपणे तो दडपला गेला होता हेही वाचून घ्या. The strike lasted from 8 to 27 May 1974.[1] The 20 day strike by 1.7 million (17 lakh) workers is the largest recorded industrial action in the world. The strike was held to demand an eight hour working day for locomotive staff by All India Loco Running Staff Association and a raise in pay scale, which had remained stagnant over many years, in spite of the fact that pay scales of other government owned entities had risen over the years.[6] Furthermore, since British times the Railways termed the work of the locomotive staff as "continuous", implying that workers would have to remain at work as long as the train ran on its trip, often for several days at a stretch. The independence of India did not change this. The eight hour work day had not been implemented in Indian railways by the Railway Board, a quasi government bureaucracy despite having become a free country in 1947, this had led to dissatisfaction among labour, especially locomotive Pilots.[7] Traditional railway union leaders too were starting to get distant from worker demands and closer instead to politicians, thus leading to further discordThe spread of diesel engines and the consequent intensification of work in the Indian Railways since the 1960s resulted in continuous working hours being extended by days, creating much resentment among the workers.[9] The Railways, although government-owned, remained an organization in which the accepted worldwide standard of an eight-hour working day was violated with impunity.[10] When the crafts unions raised the issue, they demanded a 12-hour working day for loco running staff. This led to railway strikes by rail workers across the country in 1967, 1968, 1970 and 1973, finally leading to the 1974 strike which was participated in by 70% of the permanent work force of railways https://en.wikipedia.org/wiki/1974_railway_strike_in_India INDIA: Strangulating Strike http://content.time.com/time/magazine/article/0,9171,944832,00.html या संपामुळे आणीबाणी पुकारली गेली हे म्हणणे हास्यास्पद आहे. २७ मे १९७४ ला हा संप संपला आणि पुढे एक वर्षाने म्हणजे २६ जून १९७५ रोजी आणीबाणी पुकारली गेली. आणीबाणीत ज्यांची धरपकड झाली आणि विनाचौकशी तुरुंगात टाकले त्यांचे हाल काय झाले हे त्या लोकांनाच माहिती आहे. रा स्व संघाचा द्वेष करणाऱ्या लोकांना आता द्वेषापोटी आणीबाणीचे समर्थन करताना पाहिले तर अतिशय आश्चर्य वाटते. कारण कम्युनिस्ट आणि समाजवादी हे दोन्ही जनसंघ आणि रा स्व संघाचा द्वेष करणारे पक्ष लोकशाहीच्या रक्षणासाठी स्वतंत्र भारताच्या इतिहासात जनसंघाबरोबर एकदाच एकत्र आले होते. इंदिराजींचे नेत्या म्हणून आपले गुण आहेत पण त्यामुळे आणीबाणी चे समर्थन करता येत नाही. कोणत्याही कायद्याच्या अभ्यासकाला विचारा स्वातंत्र्य समता सारख्या अत्यंत मूलभूत लोकशाही मूल्यांची अक्षरशः पायमल्ली झाली होती. सामान्य माणसाला १९९१ च्या उदारीकरणाच्या शष्प फरक पडला नव्हता म्हणून ते उदारीकरण सपशेल फसले याचा उलट युक्तिवाद आपण करता आहात असेच खेदाने म्हणावे लागेल. बाकी आणीबाणी चे समर्थन करणारे कोणतेही दावे स्पष्टपणे खोटे ठरले होते. आता लोकांच्या विस्मरणामुळे बऱ्याच गोष्टी धुतल्या जात आहेत एवढेच म्हणेन.

१९७१च्या डिसेंबरमध्ये पाकवर निर्णायक आणि खणखणीत विजय मिळवल्यामुळे समाजात इंदिरा गांधी आणि इंदिरा कॉंग्रेसविषयी जनतेत आत्यंतिक प्रेम आणि आदर निर्माण झाला होता. अमेरिकेच्या दबावाला आणि रोषाला न जुमानल्यामुळे इंदिरा गांधींचा आंतरराष्ट्रीय दबदबाही वाढला होता. पण विजयी युद्धानंतर युद्धाच्या खर्चाचा बोजा १९७२ मध्ये समाजावर पडला. महागाई वाढू लागली. त्यातच १९७२च्या भीषण दुष्काळाने अन्नधान्य परिस्थिती फार बिकट झाली. मग पार्ट्या किंवा लग्नमुंजीच्या जेवणावळींवर निर्बंध घालावे लागले. जास्तीत जास्त पन्नास माणसांनाच जेवण वाढण्याचा नियम केला गेला. शिवाय तांदुळाच्या पदार्थाला मनाई होती. मग काही लोकांनी वरईचा भात वाढला. पन्नास पेक्षा जास्त लोकांसाठी जेवण शिजले आहे अशी शंका आली तरी ते जप्त करून नेले जाई. हे प्रत्यक्ष पाहिलेले आहे इतके दुर्भिक्ष्य आले होते. मात्र लोकांनी हे निर्बंध पाळले पण राजकीय पक्षांनी असंतोष फुलवला. क्रमशः

In reply to by राही

तुम्ही सांगताय ते सगळं आणीबाणीच्या लागू करायच्या बऱ्याच आधी घडलेलं आहे. जरी या सर्व घटनांची थोडीफार पार्श्वभूमी आणीबाणीच्या निर्णयाला असेल असं म्हणलं तरी मुख्य कारण मात्र कोर्टाने इंदिरा गांधींवरचे निवडणुकीत गडबड केल्याचे आरोप ग्राह्य मानले हेच असणार. सुप्रीम कोर्टाने इंदिरा गांधींना संसदेच्या कामकाजात भाग घेण्याची परवानगी नाकारली म्हणल्यावर पुढील धोके नक्कीच त्यांच्या लक्षात आले असणार आणि त्यात परत इगो सुद्धा दुखावला असणार. म्हणून लगेच दुसऱ्याच दिवशी आणीबाणी जाहीर केली गेली. इतकी टोकाची कृती केल्यावर त्याला सपोर्ट मिळायला म्हणून या सगळ्या आधीच्या घटनांचा पद्धतशीरपणे उपयोग करून विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्याची संधी साधली गेली असावी. तसेच वृत्तपत्रे, दूरदर्शन आणि त्यावेळेला जी कुठली माध्यमे असतील त्यातून सक्तीने आणीबाणी कशी योग्य आहे हेच पसरवायला लावलं असणार. कारण विरोधात बोलायची सोयच नव्हती. बाकी लोकांनी ऑफिसला वेळेत जाणं, कामं व्यवस्थित करणं हे आणीबाणीमुळे झालेले समांतर फायदे (collateral benefits) म्हणता येतील. पण त्यामुळे आणीबाणी लावण्याचा निर्णय योग्य होता किंवा त्यामुळे समस्त लोकांचा फायदा झाला असं कसं म्हणता येईल? सरकारला तेवढ्यापुरती अनिर्बंध सत्ता मिळाली तसेच जे सरकारसमर्थक होते त्यांना बराच फायदा मिळाला असावा. जे सामान्य लोक कधीच कशात नव्हते त्यांना फारसा फरक पडला नसावा किंबहुना collateral benefits मिळाले असावेत. पण जे सरकार विरोधक होते त्यांचे मात्र हाल झाले. आता यात फक्त विरोधी नेते आणि राजकारणीच नव्हते तर सरकारच्या धोरणांवर टीका करणारी माध्यमे किंवा राजकीयदृष्ट्या ऍक्टिव्ह (पण राजकारणात नसलेले) लोक पण होते. उदा. द्यायचं झालं तर त्याकाळात मिपा असतं तर श्रीगुरुजींना आणि अजून २-४ जणांना नक्कीच अटक झाली असती. किंवा सरकारच्या आणीबाणीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना पण कारवाईला सामोरं जावं लागलं. त्यामुळे तुम्ही कुठल्या भूमिकेतून आणिबाणीकडे बघताय त्याप्रमाणे ती घटना दिसेल.

In reply to by ट्रेड मार्क

माध्यमांतून आणीबाणीची भलामण फारशी झाली नाही. उलट अनेक क्लृप्त्या वापरून मूक निषेध आणि विरोध प्रगट केला गेला. सरकारी बातम्या आणि जाहिराती असत पण त्या आजच्यापेक्षा खूप कमी प्रमाणात होत्या. टाईम्स ग्रूप सहसा सरकारच्या विरोधात नसतो तसा तो तेव्हाही नव्हता. पण भलामण मात्र नव्हती. माध्यमे मध्यम डावी समाजवादी होती. त्यांचा कॉंग्रेस सरकारला आधीपासूनच विरोध होता. शिवसेना आणि काही कम्यूनिस्ट गट आणीबाणीच्याबाजूने होते.

In reply to by राही

माध्यमांतून आणीबाणीची भलामण फारशी झाली नाही काय सांगताय? २० कलमी कार्यक्रम आणि विविध गाणी यांची मांदियाळी होती मला आजही आठवतंय मां तेरे बीसों सपने साकार करेंगे हम असे पालुपद असणारे गाणे सगळ्या शाळा सरकारी कार्यक्रमात वाजवले जात असे. राष्ट्रसंत विनोबा भावे यांचे दूरदर्शन, त्यांचा उपा,, मौनव्रत आणि मौनव्रतातून बाहेर आल्यावर बाबा आनंदला म्हणून स्वतःच टाळ्या पिटणे पासून आणीबाणीला अनुशासन पर्व पर्यंत सर्व गोष्टींचा भरपूर उदो उदो झाला होता. लांगूल चालनाची पातळी इतकी खाली गेली होती कि ९१ वर्षे जुन्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष देवकांत बरुआ यांनी जाहीर सभेत

India is Indira, and Indira is India

असे म्हणून दाखवले. हजारो वर्षांच्या दैदिप्य्मन संस्कृती आणि इतिहास असणाऱ्या देशाला एका नेत्याच्या दावणीस बांधण्याचा अत्यंत हीन प्रयत्न पाहून आजही अंगाचा तिळपापड होतो. It was the culture of sycophancy that reduced men of achievement and stature to grovelling caricatures. No better example exists to this day than Dev Kant Barooah, Congress president, declaring at the height of the Emergency in 1976 that "India is Indira, and Indira is India". His oily obsequiousness would be matched by another President-of the country, no less. राष्ट्रपती असेलल्या ज्ञानी झैलसिंह यांनी श्रीमती इंदिरा गांधी यांच्यासाठी मी जमीन झाडायला तयार आहे असेही म्हटले होते. राष्टपती पदाला काळिमा फासणारी वक्तव्ये करताना या लोकांना जराही लाज वाटल्या नाहीत? आजही संताप होतो आणि इथे लोक आणीबाणीचे गुणगान गात आहेत. Zail Singh, eternally grateful to his leader for giving him the occupancy of Rashtrapati Bhavan, announced that he would gladly "sweep the ground" that Indiraji walked upon. It was a case of crawling when being asked to bend. There would be more crawlers emerging from the woodwork when Sanjay Gandhi and later, brother Rajiv, made their political debut. https://www.indiatoday.in/magazine/cover-story/story/20051226-india-is-… बाकी विरोध करणारे पत्रकार पासून सर्वच विनाचौकशी तुरुंगातच होते. ज्या वेळेस निवडणूक जाहीर झाल्या त्यावेळेस सर्व राजकीय नेत्यांची सुटका झाली यानंतर या विरोधाला उधाण आले आणि त्यात इंदिराजी आणि त्यांची काँग्रेस वाहून गेले. मी वर म्हटलं आहे ना कि लोक बऱ्याच गोष्टी विसरले आहेत.

In reply to by सुबोध खरे

माध्यमांतून आणीबाणीची भलामण फारशी झाली नाही काय सांगताय? २० कलमी कार्यक्रम आणि विविध गाणी यांची मांदियाळी होती मला आजही आठवतंय मां तेरे बीसों सपने साकार करेंगे हम असे पालुपद असणारे गाणे सगळ्या शाळा सरकारी कार्यक्रमात वाजवले जात असे. मी तेव्हा आठवीत-नववीत होतो. ७७ च्या निवडणुकीच्या वेळेस नववीत होतो. वर तुम्ही म्हणालात तशी गाणी वगैरे प्रकार सरकारी पातळीवर होते. त्यावेळी माध्यमे म्हणजे रेडिओ टीव्ही* आणि वृत्तपत्रे-साप्ताहिके इतकीच होती. सरकारी माध्यमांत आणि काही सरकारच्या सहानुभूतीदार वर्तमानपत्रात आणीबाणीची भलामण चाले. आमच्या घरी तेव्हा नवशक्ति येत असे. तो सामान्यपणे काँग्रेसी पेपर होता. (मुंबईत मिळणार्‍या वर्तमानपत्रांपैकी) लोकसत्ता हा काँग्रेसविरोधी पेपर होता. सेन्सरशिप असूनही त्यात आणीबाणीची भलामण असलेला काहीही मजकूर येत नसे. तसाच पुण्यात सकाळ तरूण भारत हे विरोधी पेपर होते. त्यात कधी भलामण झाली नसणार. *दूरदर्शन हे सरकारी माध्यम आहे त्यामुळे ते सरकारचा "प्रचार" करते असा आरोप लोक पूर्वी करत असत. पण त्यातल्या अनेकांना दूरदर्शन हीच एक संतुलित वाहिनी असल्याचा साक्षात्कार २०१४ नंतर झाला हा भाग अलाहिदा !! ;)

In reply to by नितिन थत्ते

आपले महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया या सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्रांबद्द्ल विस्मरण झाले आहे असे दिसते. शिवाय सर्व सिनेमा थिएटर मध्ये दाखवले जाणारे "भारतीय समाचार वृत्त" यात भारत कसा जगाच्या पुढे आहे हे सिनेमाच्या अगोदर दाखवले जात असे. आपल्याला त्यांच्या प्रचाराच्या आणि लांगूलचालनाच्या चित्रफिती पाहायच्या असतील तर खालील दुवा उघडून पहा. https://scroll.in/article/668111/watch-indira-gandhis-emergency-era-pro… रेडिओ वर रोज दर तासाला श्रीमती इंदिरा गांधी काय म्हणाल्या यांनी कुठल्या भारताला प्रगती पथावर नेणाऱ्या उपक्रमाचे उदघाटन केले आणि माहिती आणि नभोवाणी मंत्री श्री विद्याचरण शुक्ल यांनी श्रीमती इंदिराजी या जगाचे नेतृत्व करायला कशा लायक आहेत हेच रोज सांगत असत. He was Minister of State under Prime Minister Indira Gandhi from 1967 to 1977 including as Minister of State with Independent Charge of Information and Broadcasting. Despite a versatile career, Shukla’s role as Information and Broadcasting Minister during the Emergency period had got him some odium as propagandist for Indira Gandhi’s government. His ministry attracted adverse attention for the media censor policy during that period when Freedom of speech was under attack. The Justice Shah Commission of Inquiry which went into the Emergency excesses,was stunned when V. C. Shukla owned entire responsibility for the functioning of his ministry. As minister for information and broadcasting, Shukla not only cut power supply to printing presses but also used to monitor almost each and every story printed. When Indira Gandhi became prime minister in 1966, she chose him as a minister in her Cabinet. Shukla was also very close to Sanjay Gandhi. It was said, that following poor coverage of Indira Gandhi's rally at Boat Club on 20 June 1975, Sanjay Gandhi removed Inder Kumar Gujral and appointed Shukla as minister of I&B. He had banned Kishore Kumar’s songs on All India Radio because Kishore Kumar had refused to sing at an Indira Gandhi rally. He was known for his iron-fist handling of the media during the Emergency. गाण्याच्या दोन तीन ओली आठवत आहेत त्या अशा मां तेरे बीसों सपने साकार करेंगे हम बेकारोंको काम मिले और सस्ती हो कुछ रोटी मजदूरो को सम्मान मिले और मिले बराबर हिस्सा काँग्रेसचा हा काळ भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात "काळा कुट्ट" कालावधी होता याची सध्याच्या कालावधीशी तुलना करणे म्हणजे स्वतःलाच फसवणे होईल याबद्दल तिळमात्रहि शंका नाही.

In reply to by सुबोध खरे

रेडिओ आणि टीव्ही ही सरकारीच माध्यमे होती त्यातून सरकारचा प्रचार होणार यात काही संशय नाही. तीच गोष्ट वृत्त चित्राची. जी माध्यमे सरकारच्या ताब्यात नव्हती वृत्तपत्रे, साप्ताहिके वगैरे त्यातल्या कोणी आणीबाणीची भलामण केली नाही. (त्यात पुन्हा जी वृत्तपत्रे काँग्रेसजनांच्या मालकीची होती त्यात आणीबाणीचा प्रचार होणारच होता). महाराष्ट्र टाइम्स हे तेव्हा तरी सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र होते असे वाटत नाही. मुंबईतील सर्वाधिक खपाचे लोकसत्ता आणि पुण्यातील सकाळ हे तर आणीबाणी विरोधीच होते. तरीही आणीबाणीचा हा काळ भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात "काळा कुट्ट" कालावधी होता हे मान्य आहे. >>याची सध्याच्या कालावधीशी तुलना करणे म्हणजे स्वतःलाच फसवणे होईल याबद्दल तिळमात्रहि शंका नाही. सध्या तेव्हासारखी रेडिओ आणि टीव्ही केवळ सरकारीच माध्यमे आणि थोडीच वृत्तपत्रे असती तर "अच्छे दिन" २७ मे २०१४ रोजीच आलेले असते. तर ते सोडाच.

In reply to by नितिन थत्ते

"अच्छे दिन" २७ मे २०१४ रोजीच आलेले असते. तर ते सोडाच.>> ==>> हाहाहा...!! ==== बाकी आणीबाणी बाबत मान्यवरांकडून रोचक माहिती मिळत आहे.

In reply to by नितिन थत्ते

म्हणजे आता अच्छे दिन येणार नाहीत हे तुम्ही मान्य केलंय ना? मग झालं तर. आता आम्हाला अच्छे दिन केंव्हा येणार याचे उत्तर द्यायला लागणार नाही. पण मग उगाच

"आणीबाणी मध्ये सामान्य माणसं आनंदात होती आणीबाणीचा पूर्ण काळ हे खरेच अनुशासनपर्व होते. प्रथमार्ध तर उत्तमच होता".

हे विधान धादांत असत्य आहे एवढं मान्य केलं कि झालं.

In reply to by सुबोध खरे

मान्य नाहीच. कारण प्रत्यक्ष्यानुभव. त्या काळाइतकी लोकांमधली शिस्त आणि समाजातली सुव्यवस्था आजतागायत कधीही अनुभवलेली नाही. राष्ट्रीयीकरणानंतर बॅंक कर्मचाऱ्यांच्या संपांना ऊत आला होता आणि १९७५पर्यंत तो कळसाला पिचला होता. आणीबाणीमध्ये हे सगळे ताबडतोब थांबले. वक्तशीरपणा ९९% वाढला. गोदींमध्ये चोऱ्यामाऱ्या , दिरंगाई या सगळ्याला ऊत आला होता. व्यापारी जहाजाला बर्थ मिळणे, मालाची चढ उतार होणे यात महिना महिना जाई. डेमरेज वाढे. आणीबाणीत तीन चार दिवसांत जहाजे मोकळी झालेली आहेत. ही सांगोवांगीची गोष्ट नाही. घरातली माणसे व्यापारी आणि भारतीय नौदलात होती. त्यांचे प्रत्यक्ष अनुभव आहेत. ही शिस्त आणि सुव्यवस्था नव्हे का? असं बरंच काही लिहिता येईल. वरती श्री प्रकाश देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही शिस्तपालनात स्वातंत्र्याचा संकोच होतच असतो. तेव्हा आणीबाणीत लोकांमध्ये शिस्त आणि समाजामध्ये सुव्यवस्था होती या विधानाविषयी मी ठाम आहे. अर्थात अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधित ठेवून सुव्यवस्था आणता आली असती तर ते सोन्याहून पिवळे झाले असते. तसे त्या काळी का करता आले नाही याचे अनेक अंदाज करता येतील. तो खूप मोठा विषय आहे . असो.

In reply to by सुबोध खरे

प्रत्यक्ष अनुभवाला मी बिलीफ म्हणू शकत नाही आणि false तर नक्कीच नाही. आमचे कुटुंब आणि गोतावळा सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या जागरुक होता. घरी कडाक्याच्या चर्चा चालत. मीटिंगा असत, शेजारपाजारी, नातेवाईक जमत. अनुभवांची देवाणघेवाण होई. लहानपणापासूनच वाचनाची आवड असल्याने मला ते ऐकायला, त्यात भाग घ्यायला , स्वत:ची मते मांडायला आवडे. घरी खूप मोकळे वातावरण असे. तेव्हा सगळे अभिव्यक्तिस्वतंत्र्याच्या गळचेपीविरुद्ध कडाडून बोलत. पण आता इतक्या वर्षांनी बराच ऊहापोह झाल्यावर आणीबाणीच्या चांगल्या बाजू आणीबाणीनंतरच्या पार्श्वभूमीवर अधिकच ठळकपणे जाणवतात. काही वैयक्तिक गोष्टी नाइलाजाने लिहाव्या लागल्या. क्षमस्व.

In reply to by राही

हे म्हणजे एक महिला मला सांगत होती कि सगळ्या मुलींना १६ व्या वर्षी पाळी सुरु होते असे आहे. कारण तिला १६ व्या वर्षी पाळी आली होती.तसे आहे मी लिहिले आहे त्यातील एकतरी मुद्दा तुम्हाला खोडता आला आहे का? जेवढे सगळे लिहिलेले आहे ते सगळे सार्वजनिक न्यासावर कुणालाही उपलब्ध आहे.

In reply to by सुबोध खरे

त्यावेळी एक नावाजलेला तमाशा (लोकनाट्य) होता. गावोगावी त्यांचे जत्रेच्या काळात खेळ चालत. त्यांच्या वगनाट्यातील एका गाण्याच्या ओळी मला अजून आठवतात. त्या काहिश्या अशा होत्या... एक लाजरा न साजरा मुखडाच्या चालिवर गाणे होते. "गेले काळे धंदे पाण्यात जिव माझा भुलला गं ! शेतकर्‍या भिऊ नका, इंदिराच्या ऐका हाका का ?? कायदा !! गेले काळे धंदे पाण्यात जिव माझा भुलला गं !! "

In reply to by सुबोध खरे

काय गम्मत ना!!
रेडिओ वर रोज दर तासाला श्रीमती इंदिरा गांधी काय म्हणाल्या यांनी कुठल्या भारताला प्रगती पथावर नेणाऱ्या उपक्रमाचे उदघाटन केले आणि माहिती आणि नभोवाणी मंत्री श्री विद्याचरण शुक्ल यांनी श्रीमती इंदिराजी या जगाचे नेतृत्व करायला कशा लायक आहेत हेच रोज सांगत असत.
आजकाल देखील असेच आपले चमचे घेऊन स्वतःलाच चान चान विशेषणे लावून घ्यायची फ्याशन आली आहे म्हणे! पण अर्थातच त्यात मात्र केवळ सत्य असणार आहे कारण देशात केवळ एकच माणूस निःस्वार्थी आहे ना!

In reply to by शब्दबम्बाळ

तरीही आणीबाणीचे पहिले पर्व भारतालस अतिशय सुखाचे आणि शिस्तीचे गेले असे मी आताही म्हणेन. पुढे कदाचित लिहीन इथेच. माध्यमांतून आणीबाणीची भलामण फारशी झाली नाही "आणीबाणी मध्ये सामान्य माणसं आनंदात होती आणीबाणीचा पूर्ण काळ हे खरेच अनुशासनपर्व होते. प्रथमार्ध तर उत्तमच होता". लोक कायद्याला न जुमानीतसे झाले. या सर्व विधानांचा परामर्श घेताना लिहिलेली ती विधाने आहेत. विषय आणीबाणीचा चालू आहे. मोदींचा विषय कुठे तरी आला आहे का? त्याचा मोदी यांच्या प्रचार तंत्राशी काय संबंध आहे? आणि मार्मिक गोडसे यांनी दोन वेळेस विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सापडली असल्यास देता का? आणीबाणीत मिसा कायदा आणण्याची गरज का पडली? सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीचा फटका शेतकरी वर्गाला बसला का? समजा नसेल बसला तर निवडणुकीत इतका मोठा वर्ग सत्ताधारी पक्षाच्या विरोधात का गेला? बाकी -- सध्या आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे म्हणणार्यांना एकच विचारणे आहे कि किती लोक विनाचौकशी तुरुंगात आहेत याची काही सांख्यिकी मिळेल का? अंधद्वेष असु नये.