(हे वाचणाऱ्यास विपश्यनेच्या दहा दिवसांच्या कोर्ससंबंधी अनुभवाने किंवा ऐकून वाचून माहिती असेल, असं गृहीत धरून लिहितोय.)
१. तर फारा वर्षांनी एकदाचा दहा दिवसांच्या सुट्टीचा जुगाड करून, पद्धतशीर बॅग वगैरे घेऊन, ट्रेनमधून उतरलो.
रिक्षातून विपश्यना सेंटरच्या दिशेने जाताना 'कदम बंधू बिअर शॉपी' असा एक ओझरता बोर्ड दिसला.
म्हटलं, कोर्स संपल्यानंतर आपल्यासारख्यांसाठी ह्या कदम बंधूंनी जवळच 'सोय' करून ठेवली आहे, हे एक बरंय.
रिक्षातून उतरलो तर सेंटरच्या गेटवरच्या छोट्याशा हॉटेल कम् टपरीमध्ये दोन समवयस्क तरूण सिगरेट ओढत उभे.