प्रिय सचिन,
पुन्हा तो दिवस - पुन्हा तीच भावना. आता तर त्या भावनेला शब्दांचीही गरज वाटत नाही. तू निवृत्त होऊन ९ वर्षं झाली. आम्हीही थोडे (वयानी) मोठे झालो, वयानुरूप थोडीबहुत परिपक्वता, व्यावहारिकता आली. जे दिसतंय त्यापलिकडे बघायची नजर आली. तू खेळत असताना असलेली आमची क्रिकेट बघण्यातली बेहोषी आता कमी झाली. परिस्थिती बदलली, जग बदललं तसं क्रिकेटही अर्थातच बदललं. आम्ही अजूनही क्रिकेटवेडे आहोतच. आताही शुभमन गिलच्या शैलीवर, पंतच्या बेफिकीरीवर, डेवॉल्ड ब्रेविसच्या चौफेर फटक्यांच्या रेंजवर, शाहीन आफ्रिदीच्या वेगावर फिदा आहोतच. स्मृती मनधाना, हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मासारख्या मुलींबद्दलही कौतुक आहेच.