✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गोरक्षनाथ गड प्रदक्षिणा

B
Bhakti यांनी
Wed, 11/27/2024 - 21:42  ·  लेख
लेख
अ नाथ संप्रदायाचे महत्त्व,हठयोग,उपासना भारतभर अनेक ठिकाणी नित्यनेमाने होत असते.त्यातही महाराष्ट्रात गोरक्षनाथ गड (ता. नगर) ते डोंगरकिन्ही (ता. पाटोदा) या दरम्यान ही डोंगररांग गर्भगिरी नावाने ओळखली जाते.अधिकतर नाथांची समाधी स्थळं इथे आहेत हे विशेष आहे.नगरमध्ये कानिफनाथ यांची समाधी मढीमध्ये आहे.त्याचबरोबर प्रथम नाथ मच्छिंद्रनाथ -गोरखनाथ ही गुरू शिष्याची जोडगोळीच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली आहे. डोंगरगण जवळील मांजरसुंभा डोंगरापुढे गोरक्षनाथ गड आहे. याबाबत कथा अशी - नवनाथाच्या कथेनुसार भ्रमंती करीत असताना मच्छिंद्रनाथ फिरत फिरत स्त्री राज्यात गेले. तेथेच त्यांनी निवास केला. तेथील राणीने त्यांना आपल्या महलात ठेवून घेतले. मात्र, आपल्या गुरूंना मूळ रूपात आणण्यासाठी गोरक्षनाथ तेथे गेले. त्यांनी गुरूंना आपल्या मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केले. तेथून निघताना राणीने त्यांना सोन्याची वीट दिली. भ्रमंती करीत असताना गुरूंच्या झोळीत गोरक्षनाथांना वीट दिसली. त्यांनी ती वीट फेकून दिली. तो परिसर म्हणजे नगर जिल्ह्यातील इमामपूर घाटाचा भाग होय. हे करीत असताना गोरक्षनाथांनी संपूर्ण डोंगरच सोन्याचा केला. मात्र, नंतर यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून तो डोंगर पुन्हा जसा होता तसा केला. हा डोंगर म्हणजेच गर्भगिरी डोंगर आहे. नाथपंथाचे अभ्यासक टी.एन. परदेशी म्हणतात, ही जातक कथा आहे. परंतु याकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर सर्व नाथ हे सिद्ध पुरूष होते. त्यांना रसायनशास्त्राचा अभ्यास होता. त्यांची संपूर्ण ठाणी पाहिली तर ती उष्णोदकाशेजारी आहेत. तेथे गरम पाण्याचे झरे आढळतात. भारतातील पहिला रसायनशास्त्रज्ञ नागार्जुन याच परिसरात होऊन गेला. त्याची प्रयोगशाळा शेवगाव तालुक्यात आहे. आजही मच्छिंद्रनाथांच्या गडावर स्थानिक लोक वनौषधी घेऊन बसलेले असतात. त्या कोणत्याही रोगावर उत्तम इलाज करतात. मात्र, त्याचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास झाला पाहिजे. गर्भगिरी डोंगर सोन्याचा झाला, याचा दुसरा अर्थ तेथील विपुल प्रमाणात सापडणाऱ्या वनौषधीमुळे तसा घेतला जातो.(संदर्भ सकाळ वृत्तपत्र अशोक निंबाळकर १ सप्टेंबर २०२०) तर अशा या आध्यात्मिक क्षेत्रास नगरकर वर्षातून अनेकदा भेटी देतात.उंच डोंगरावर असलेले नाथ मंदिर अतिशय शांत , स्वच्छ, उत्तम प्रकारे बांधलेले आहे.वाहन थेट पर्यंत मंदिरापर्यंत जाते. पण यंदा नगर ट्रेकेथॉन-३ ने गोरक्षनाथ गड प्रदक्षिणा हा उपक्रम घेतला.यासाठी ट्रेक कॅम्प ने अनेक महिने मेहनत घेतली.यासाठी डोंगर खाच खळग्यांतून ,दाट दाटीतून ,अनवट वाटेवर अनेक रिबीन,ध्वज लावून प्रदक्षिणेसाठी वाट सज्ज केली.यासाठी ७५०+ लोकांनी रजिस्ट्रेशन केले. आ उत्साहाने १७/११/२०२४ ला पहाटे ६ वाजता गोरक्षनाथ गडावरून पांढऱ्या रंगाचे एकसारखे टी शर्ट घातलेले ट्रेकर यांची शुभ्र लाटच उसळत होती.आधी डोंगर उतरून सपाट माळरानावर पोहचायचे होते.आता हळूहळू तांबडा फुटलं होतं.जसजसे पुढे जात होतो .तसतसा सूर्यही डोंगराहून घरंगळत येतोय असं मोहक दृश्य होते.रस्त्याने बोरीची झाडं लागली.झाडाला गदगदा हालवून बोरी गोळा करण्याचा लहानपणीचा इवलासा आनंद परत मिळाला.आंबट चिंबट बोरांच्या चवीसह इतरत्र शमीचे झाडं अनेक त्यांच्या अनोख्या चपट्या वाळलेल्या लाल शेंगा पहिल्यांदाच पाहत होतं.कुठतरी अजूनही पाण्याच्या थोड्याशा ओघळाने शेवाळ होते.थोडीफार फुलं होती पण ती पाहताना प्रकर्षाने सह्याद्रीच्या डोंगरांची,भटकंती आठवण येत होती.सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्याची तोड कशालाच नाही,हे मात्र खरं आहे. द ई ऊ ए आता पुन्हा थोडी चढाई परत उतरण लागली.चार किलोमीटर मध्यावर प्रदक्षिणा आली होती.आता शेतं लागली.तुरीच्या शेंगांनी लगडलेली तुरीची पिकं लागली.हिरव्यागार कांद्याची पात दूरवर पसरली होती. ओ ओ शेतांना मागे टाकत दाट जंगलासारख्या दाट झाडीतून जातांना अनेकांना मोरपिस सापडले.परत एकदा एनर्जी ड्रिंक,फळांची पुरवणी घेत प्रदक्षिणेच्या शेवटच्या टप्प्यात पोहचलो.यात पूर्वी गडावर चढण्यासाठीचा पायऱ्यांची वाट बनवली गेली होती.आता ती अधिक वापरात नाही. मधोमध पायऱ्या आणि दोन्ही बाजूला दाट झाडी यातून चालताना सुरुवातीला स्वर्गारोहण करतोय असं वाटतं होतं.मात्र या पायऱ्या चढावर आणि संपतच नव्हत्या आधीच ६ किमीची पायी चालणं झालं होतं.त्यात ही सरळ चढाई दमछाक करणारी ठरली. आयोजक ट्रेकर उत्साह वाढवायला,मदतीचा हात पुढे करत उभे होतेच.अखेर विश्रांतीला थांबत चढत असं करत पुन्हा गडाच्या मुख्य पायऱ्यांपाशी पोहचलो.गडावर चढले. प मंदिराच्या गाभाऱ्यात गोरखनाथांचे दर्शन घेऊन कृतार्थ वाटले.८ किलोमीटरची गोरक्षनाथ गड प्रदक्षिणा ३ तासात जवळपास पूर्ण झाली. ग हा उपक्रम पहिल्यांदा राबविण्यात गेला.आम्ही पहिले ट्रेकर आहोत ज्यांनी गोरक्षनाथ प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. फिनिशर मेडल मिरवत घरी कूच केलं, आयुष्यात अजून एक सुंदर रविवार संपन्न झाला होता. घ -भक्ती
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
प्रवास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
5310 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

खुप छान

यश राज
गुरुवार, 11/28/2024 - 01:50 नवीन
छान माहिती आणि फोटोज पण मस्त
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

Bhakti
गुरुवार, 11/28/2024 - 12:21 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यश राज

सुंदर ट्रेक

कर्नलतपस्वी
गुरुवार, 11/28/2024 - 05:06 नवीन
घर,नवरा,मुले बाळं,नोकरी,दुनिदारी सांभाळून स्वांनंदाचचे क्षण शोधणाऱ्या भक्ती उर्फ दुर्गेश नंदिनी आपले ट्रेक पुर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. सुंदर प्रची आणी माहीती. नाथ संप्रदायातील सन्यासी पुर्वी खुप दिसायचे. संप्रदायातील प्रत्येक नाथांची जन्म कथा आणी कार्य विलक्षण आहे. पुण्यात बोपदेव घाटात कानिफनाथ यांचे सुंदर मंदिर आहे. जैववैविध्य प्रचूर असल्याने बरेच लोक जातात. पण संध्याकाळ नंतर मात्र तो भाग असुरक्षित आहे. लेख आवडला.
  • Log in or register to post comments

बोपदेव घाटात कानिफनाथ यांचे

Bhakti
गुरुवार, 11/28/2024 - 12:21 नवीन
बोपदेव घाटात कानिफनाथ यांचे सुंदर मंदिर आहे. जैववैविध्य प्रचूर... पाहायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

चांगली केली प्रदक्षिणा.

कंजूस
गुरुवार, 11/28/2024 - 11:17 नवीन
चांगली केली प्रदक्षिणा. मी पंधरा वर्षांपूर्वी गेलो होतो गोरखगडावर. म्हणजे अर्धीच चढाई करता आली. हरिहर / कलावंतिण गडासारख्या उभ्या पायऱ्यांची वाट आहे. वर गुहा आहेत. पण चक्कर येऊ लागली मग खाली आलो. (मच्छिंद्रगड याहूनही अवघड आहे म्हणतात. ) काही लोक वर जात होते ते म्हणाले मदत करतो या वर. पण विचार केला एकट्यानेच जाणार , वर राहणार आणि दुसरे दिवशी खाली येणार हे काही जमणार नाही. परावलंबीपणा नकोच.
  • Log in or register to post comments

होय ,गोरखगड,हरिहर गड अवघड

Bhakti
गुरुवार, 11/28/2024 - 12:17 नवीन
होय ,गोरखगड,हरिहर गड अवघड आहेत.सरळ सरळ गड चढाई,सुरेक्षेसाठी पुरेशी उपाययोजना नसल्याने कठिणच वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

तुम्ही म्हणताय तो गोरखगड हा

प्रचेतस
गुरुवार, 11/28/2024 - 12:39 नवीन
तुम्ही म्हणताय तो गोरखगड हा नव्हे, तो उभा पायऱ्यांचा गोरखगड आहे कशेळे जवळ. सिद्धगड, गोरख आणि मच्छिंद्र सुळका. ह्या गोरखगडावर गुहा आणि शेवटी अवघड सुळकेवजा शिखर आहे. भक्ती म्हणतायत तो गोरखगड नगर जिल्ह्यातला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

त्या सिद्धगडावरही जायचा

कंजूस
गुरुवार, 11/28/2024 - 12:52 नवीन
त्या सिद्धगडावरही जायचा प्रयत्न केला होता. वाटेत एक गुहा आहे तिथे एक साधू ( संसारी साधू, कल्याणचा ) राहतो. त्याला भेटलो. त्याने मला सावध केले. वाट सोपी आहे पण धोकादायक आहे. कशी? तर वाटेच्या एका बाजूस कडा आणि दुसऱ्या बाजूस दरी. वाटेवरचे दगड गोटे हे मातीत आहेत आणि कातळखडकातले नाहीत. पाय ठेवल्यावर गोटा मातीतून निसटतो आणि गोट्यासह आपण दरीत कोसळतो. मी थोडे वर जाऊन या गोष्टीचा अनुभव घ्यायचे ठरवले. पायाने धोंडे हलवून पाहिले. ते निसटून खाली पडायचे, वाटेला भगदाड पडायचे. परत गुहेत आलो. साधूचा पाहुणचार घेतला. रात्री डाळ भाताचं जेवण, पेटी वाजवून त्याने केलेलं गायन आणि सकाळी चहा बिस्कीटे. आंघोळीसाठी गरम पाणी. मजा आली. एकूण तिन्ही नाथगड घातकी आहेत. ते योगीच चढू जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मस्त भटकंती.

प्रचेतस
गुरुवार, 11/28/2024 - 12:40 नवीन
मस्त भटकंती.
  • Log in or register to post comments

तुमची भटकंतीची आवड पाहून

कंजूस
गुरुवार, 11/28/2024 - 13:00 नवीन
तुमची भटकंतीची आवड पाहून सुचवतो - माथेरान. मी बऱ्याचदा जातो आणि या https://youtu.be/DIYR3xDY0R8?si=cDJxnXXwrmG-LWZ- विडिओतून चानेलने चांगला आढावा घेतला आहे. शनिवार रविवार सोडून जाणे हे मात्र खरे आहे. यातून ८०% माथेरान सादर केलं आहे. तसं एकाच भटकंतीत सर्व करूच नये. पुन्हा जावे आणि नवीन जागा पाहाव्यात. परत परत जाण्यासारखे हिल स्टेशन नक्कीच आहे. तिन्ही ऋतूत वेगळे आणि जाण्यासारखे. थोड्याच जागा पण निवांतपणे फिरण्यात गंमत आहे.
  • Log in or register to post comments

अरे वा!

मार्गी
Sun, 12/01/2024 - 11:51 नवीन
अरे वा! वेगळाच ट्रेक. अभिनंदन. नवीन परिसराची‌ व क्षेत्रांची माहिती मिळाली. आधी प्रश्न पडला की, गोरखगड तर किती‌ दुर्गम, त्याला परिक्रमा किती दुर्गम असेल. मुरबाड जवळचा गोरखगड वाटला आधी. पण नंतर कळालं की हे स्थान व हा रूट वेगळा आहे.
  • Log in or register to post comments

छान उपक्रम सुरू आहे, Bhakti.

वामन देशमुख
Sun, 12/01/2024 - 12:46 नवीन
छान उपक्रम सुरू आहे, Bhakti. कदाचित आम्हालाही कधीतरी असं करण्याची प्रेरणा मिळेल!
  • Log in or register to post comments

भारी झाली 'ट्रेकेथॉन'...

टर्मीनेटर
Sun, 12/01/2024 - 18:26 नवीन
भारी झाली 'ट्रेकेथॉन'...👍 एप्रिल २०२२ मध्ये (आपला नगर कट्टा झाला होता तेव्हा) इथे गेलो होतो तेव्हा मंदिराच्या आतल्या भागाच्या आणि पायरी मर्गाच्या डागडुजीचे काम सुरु होते! Image removed. आता लेखातल्या पहिल्या फोटोत रंगरंगोटीचे काम पुर्ण झाल्यावर आणि वरच्या 'ॐ शिव गोरख' मधली गळालेली अक्षरेही लावल्यावर मंदिर अजुन छान दिसत आहे...
  • Log in or register to post comments

हो, आयुष्यात सातत्याने

Bhakti
Sun, 12/01/2024 - 21:28 नवीन
हो, आयुष्यात सातत्याने नाविन्य पाहिजे ;) सर्वांचे खुप खुप आभार!
  • Log in or register to post comments

खूपच छान

गोरगावलेकर
Tue, 12/03/2024 - 16:35 नवीन
ट्रेक आवडला. फोटोंमधुन माझीही गोरक्षनाथ गड प्रदक्षिणा झाली .
  • Log in or register to post comments

मस्त

मुक्त विहारि
Sat, 12/07/2024 - 17:12 नवीन
लेख आणि फोटो, दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा