दक्षिण घळ भाग 6

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
15 Jan 2017 - 1:07 am

दक्षिण घळ भाग 1

दक्षिण घळ भाग 2

दक्षिण घळ भाग 3

दक्षिण घळ भाग 4

दक्षिण घळ भाग 5

दक्षिण घळ भाग ६

"अहो... मी इथे अडकून पडले आहे. कोणी मदतीला नाही आहे. मला इथून बाहेर पडायचे आहे पण रस्ताच माहित नाही. माझी तब्बेतही ठीक नाही. कृपा करून मला मदत करता का? इथे कोणी माणूसही दिसत नाही की मी कोणाची मदत घेऊ शकेन. तुम्ही अगदी देवासारखे आला आहात हो." ती तरुणी म्हणाली.

यशवंता आता पुरता गोंधळाला होता. कोण असावी ही तरुणी? इथे कशी आली? आपण थांबावं की जाव? तो संभ्रमात पडला आणि विचार करत उभा राहिला. लोकांनी सांगितलेले अनुभव होते की कोणीतरी स्त्री फक्त आप्पाबद्दल विचारते. पण ही तर निट बोलत होती. त्याला थांबलेला बघून ती तरुणी उभी राहिली आणि त्याच्या दिशेने चालू लागली. तिला जवळ येताना बघून यशवंता घाबरला. तो मागे सरकणार होता पण तेवढ्यात ती तरुणी अचानक खाली कोसळली. तिला पडताना बघून तो तिच्याकडे धावला आणि त्याने तिला धरले. ती अत्यंत अशक्त झाली होती. अंग पावसामुळे चिंब भिजलेले होते. बहुतेक अंगात ताप असावा अस वाटत होत. तिला ग्लानी येत होती. "मला इथून घेऊन चला हो... सोडवा मला...." एवढ म्हणून ती बेशुद्ध पडली.

आता मात्र यशवंता धर्म संकटात पडला. आपण विचारांच्या तंद्रीत उगाच इथे इतके आत आलो. त्याच्या मनात येऊन गेले. पण आता त्या विचाराचा काही उपयोग नव्हता. म्हणून मग त्या तरुणीला उचलून कसा बसा तो घळीतून वर आला. मात्र चालताना त्याला सारख वाटत होत की कोणीतरी त्याच्या मागून येत आहे. पावसानंतरच्या गारव्यामुळे कोणीही घराबाहेर पडले नसावे आणि पाखर देखील आडोशाने बसली होती असे दिसात होते. कारण अगदी चिडीचूप शांतता होती. आपल्याला भास होत असावा अस त्याला वाटल त्यामुळे त्याने तिथे दुर्लक्ष केल.

घळीत असताना त्या तरुणीच अंग गरम लागत होत पण आता बहुतेक ती थंड पडायला लागली होती. यशवंता खर तर खूप दमला होता. तो देखील पूर्ण भिजलेला होता. पण तिला तिथे टाकून जाण आता त्याला शक्य नव्हत. म्हणून मग तसच तिला उचलून हळू हळू चालत त्याने पार ओलांडला आणि मग वेशिमधून आत आला. अजूनही कोणीतरी त्याच्या मागे होत... पण यशवंता मागे वळून बघत नव्हता. गाव शांत होता. कोणी म्हणजे कोणीच नव्हत की त्याची थोडी तरी मदत यशवंताला झाली असती. दमलेला यशवंता त्या तरुणीला घेऊन एकदाचा घरी पोहोचला. त्याने दारातूनच भिकुला हाक मारली.

काही काम नसल्याने भिकू आत माजघरात आडवा पडला होता. तो कधीही यशवंताला प्रश्न करत नसे. कारण यशवंताचा विचित्र स्वभाव त्याला कधी कळत नसे. उगाच आपण काहीतरी विचारावे आणि त्याला पसंतीस नाही पडले तर आपल्याला घराबाहेर काढायचा हा. परत बेवारस होऊन गावात पडेल ते काम करत कधी भुकेल तर कधी अर्ध पोटी झोपावं लागेल या भितीने तो घरातली काम उरकून एका बाजूस पडून राही. यशवंताची हाक एकून तो उठून बाहेर आला. यशवंताने तोवर त्या तरुणीला आत आणून समोर ओट्यावर ठेवले होते.

"जी मालक?" भिकू समोर येऊन म्हणाला.

"अरे तोंड काय बघतो आहेस? दिसत नाही का या आजारी आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. जा जाऊन बाजूच्या विठाकाकुना बोलाव. आपल्याकडे कोणी स्त्री नाही. काय मदत करणार आपण?" यशवंता म्हणाला तशी भिकू धावत जाऊन विठा काकुना बोलावून आला. यशवंताने बोलावले आहे म्हंटल्यावर विठा काकूसुद्धा लगोलग आल्या.

"काय झालं रे यशवंता?" त्यांनी वाड्याच्या दारातून आत येत विचारले.

"काकू मी जरा बाहेर पडलो होतो. गावात आज कोणीच नव्हत. थोड लांबवर पाय मोकळे करून येत होतो तर ही मुलगी दिसली. मदत हवी म्हणाली आणि बेशुद्ध पडलली. तसच कस सोडून याव म्हणून घेऊन आलो आहे. पण मी आणि भिकू काय मदत करणार हिला.... म्हणून तुम्हाला बोलावून घेतल." यशवंता म्हणाला. तो नक्की कुठे गेला होता आणि ती तरुणी कुठे भेटली ते मात्र त्याने सांगितले नाही. कारण एकतर विठा काकू घाबरून तशाच माघारी गेल्या असत्या. आणि नंतर गावातल्या लोकांना त्यांनी सांगितल असत तर मग आपण त्या घळीत का गेलो त्याच उत्तर यशवंताला द्यावं लागल असतं... ते त्याला नको होत.

"अगदी बापा सारखा आहेस हो यशवंता. दाजीदेखील आल्या-गेल्याची मदत करायचे. जसा बाप तसा बेटा. तुझा मोठा भाऊ असाच निघेल अस वाटल होत हो यशवंता. पण आप्पा कसा आणि कुठे उलथला कोण जाणे. तोंड काळ केल त्याने कुठेतरी. दाजी देखील त्याच धक्याने गेले असतील." विठा काकूंच्या तोंडाचा पट्टा चालू झाला.

त्यांच्या बडबडीला कंटाळून यशवंता म्हणाला;"काकू त्या मुलीला मदत करता न? तुमच्या घरी न्यायचं का?"

"आमच्या खोपटात काय मदत करणार रे मी तिची. असुदे इथेच. या भिकुच्या मदतीने आता माजघरात नेते. ती शुद्धीत आली की बघू." अस म्हणून काकुनी भिकुला तिला उचलायला सांगितले आणि त्या माजघराकडे वळल्या.

यशवंता खूप खूप दमला होता आणि भिजला देखील होता. वाड्यावर तो पोहोचला आणि कोणीतरी मागून येत आहे असा होणारा भास देखील गेला. त्यामुळे त्याने त्या विचाराकडे दुर्लक्ष केल. तो त्याच्या खोलीकडे गेला. जाताना त्याने भिकुला अंघोळीसाठी गरम पाणी आणून द्यायला सांगितले. गरम पाण्याने अंघोळ करून यशवंता झोपून गेला. खूप दमला असल्याने त्याला गाढ झोप लागली होती. किती वेळ तो झोपला होता कोण जाणे. पण जेव्हा त्याला जाग आली तोवर पार अंधारल होत. तो खोलीबाहेर आला आणि त्याने भिकुला हाक मारली.

"काय रे कुठे होतास?" यशवंताने भिकू समोर येताच विचारले.

"माजघरात होतो जी. त्या बाई झोपल्यांत नव्ह तिथ बसलो होतो. विठा काकू संगुनशान गेल्यात की त्यांना खूप बर न्हाई. तवा त्या जाग्या होईपर्यंत त्यांच्या जवळ बसायला हव." भिकू म्हणाला.

"बर.. बर... मला खूप भूक लागली आहे. जेवण केल आहेस ना? की विठा काकुनी सांगितल म्हणून नुसता बसून राहिलास?" यशवंता उगाच भिकुवर डाफरला.

'जी केलय की. वाढू का?" भिकू म्हणाला.

"हो वाढ. आणि हे बघ... ती मुलगी.... कशी आहे ती आता?" यशवंताने विचारले.

"बरी आहे म्हन. विठा काकुनी त्याचं लुगड आनून तिला गरम पान्याने साफ केल जी. आनी त्याचं लुगड नेसवून दिल. काकू म्हन्ल्या जवा उठल तवा खाईला दे आन मग मला बोलाव. आन म्हनल्या रातीची येळ असेल तर उद्याचाला बोलाव." भिकुने इतम्भूत माहिती दिली.

यशवंताने थोडा विचार केला आणि भिकुला म्हणाला;"ठीक आहे. मला वाढ आणि त्या मुलीसाठी मऊ भात करून ठेव. जाग आली तिला की गरम गरम दे. समजल?"

"होय जी." अस म्हणून भिकू आत वळला. त्याने यशवंताला जेवायला वाढल आणि मऊ भात शिजायला टाकला. यशवंताच जेवून झाल आणि तो तोंड धुवून परत आपल्या खोलीकडे गेला. अजूनही त्यला दमल्यासारख झाल होत. त्यामुळे तो झोपायच्या विचारात होता. पण तेवढ्यात भिकू खोलीच्या दाराजवळ आला.

क्रमश:

कथा

प्रतिक्रिया

सुखी's picture

15 Jan 2017 - 11:20 am | सुखी

छान चाललीये

एस's picture

15 Jan 2017 - 11:48 am | एस

वाचतोय. पुभाप्र.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

15 Jan 2017 - 12:36 pm | अॅस्ट्रोनाट विनय

छान बेअरींग पकडलंय की. पुभालटा

पैसा's picture

15 Jan 2017 - 1:12 pm | पैसा

पुभाप्र. पुढे कशी जाईल कथा याचा आता अंदाज येऊ लागला आहे. लवकर लिहा!

बबन ताम्बे's picture

15 Jan 2017 - 1:43 pm | बबन ताम्बे

सुंदर कथानक . पुढील भागांची उतकंठा . ,

पुणेकर भामटा's picture

16 Jan 2017 - 12:56 am | पुणेकर भामटा

उत्कंठा वाढलीय!

ज्योति अळवणी's picture

16 Jan 2017 - 12:56 am | ज्योति अळवणी

आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!