दक्षिण घळ भाग ३

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
11 Jan 2017 - 11:55 pm

दक्षिण घळ भाग १

दक्षिण घळ भाग २

दक्षिण घळ भाग ३

आता उगवतीकडे आकाशाचा रंग बदलायला लागला होता. आप्पाला उशीर होत होता. पण विजयाला एकटे टाकून जाणे शक्य नव्हते. मग मात्र त्याने निर्णय घेतला आणि तो तिच्याजवळच थांबला. बाहेर उजाडत असताना विजया थोडीशी कण्हली आणि तिच्या त्या क्षीणशा कण्हण्याने देखील आप्पाच्या जीवात जीव आला. त्याने तिला बसती केली आणि हळू हळू करून थोड पाणी पाजल. तिने डोळे उघडले आणि आप्पाकडे बघितल.

"मी आज मऊ भात आणला होता. पण तो आता गार झाला असेल. इथे चूल मांडता येईल पण जर धुराकडे कोणाच लक्ष गेल तर मात्र अवघड होईल." तिला निट जाग आलेली आहे हे बघून आप्पा म्हणाला.

"आप्पा तुम्ही जे आणल आहे ते तसच द्या. मला फक्त बर व्ह्यायचे आहे हो. गरम गार असले चोचले आपल्याला परवडणार नाहीत. मला लवकरात लवकर इथून निघायचं आहे. बस!" विजया म्हणाली. आप्पाने तिच्या समोर भात ठेवला. पण त्याच्या लक्षात आले की ती स्वतः खाउच शकत नाही. तेवढी शक्ति तिच्यात नाही. मग तिच्या जवळ बसून त्याने तिला भात भरवला. तिच खाऊन झाल आणि मग तिच्या लक्षात आल की चांगलच उजाडल आहे. म्हणजे आप्पा आता परतु शकणार नाही. तिने बाहेर बघत काळजीने आप्पाला म्हंटल,"आता तुम्हाला जाणे शक्यच नाही. पोलिसांकडून वाड्यावर चौकशी झाली होती अस दाजी म्हणाले होते. याचा अर्थ वाड्यावर पाळत असणार पोलिसांची. तुम्ही दिसला नाहीत तर गजहब होऊ शकतो. याचा काही विचार केला आहात का तुम्ही?"

त्यावर आप्पा हसून म्हणाला;"तुम्ही चिंता करू नका. आमचे दाजी सांभाळून घेतील ते. बस तुम्ही लवकर बऱ्या व्हा. एक एक दिवस महत्वाचा आहे. बाहेर वातावरण तापल आहे. ही शेवटची लढाई आहे अस प्रत्येकजण म्हणतो आहे. आपला खारीचा वाटा चुकायला नको अस वाटत मला." विजयाने देखील मान डोलावली. मात्र तिच्या अंगात अजिबात त्राण नव्हत. परत ती ग्लानीत गेली. दिवसभर आप्पा तिची शुश्रुषा करत होता. मधूनच तिला जाग येत होती आणि परत ती ग्लानीत जात होती. एकदा जेव्हा ती जागी झाली त्यावेळी आप्पा तिची जखम परत बांधत होता. तिने एकवेळ त्याच्याकडे बघितले आणि खोल आवाजात म्हणाली,"आप्पा तुम्ही माझी खूप सेवा करता आहात. माझ्यामुळे तुम्हाला खूप लोकाना आणि प्रश्नांना तोंड देखील द्यावे लागणार आहे; हे मला कळत आहे. तुमचा जीव तुम्ही धोक्यात घालून माझे प्राण वाचवता आहात. मी तुमचे उपकार कधीच विसारणार नाही." एवढ बोलेपर्यंत ती परत दमली आणि तिला ग्लानी आली. रात्र चढायला लागली होती.

रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी आप्पा वाड्यावर परतला. सगळीकडे काळोख होता. त्यामुळे त्याच्या हालचाली कोणाला कळणे शक्य नव्हते. परसाकडच एक झाड आप्पाच्या खोलीच्या खिडकीवर वाकल होत. त्यावर चढून तो त्याच्या खोलीत उतरला. तो आत आला आणि खोलीत समोरच दाजीना बघून दचकला.

दाजीनी आत आलेल्या आप्पाला ओठावर बोट ठेऊन न बोलण्याची खुण केली आणि जवळ बोलावल. "आप्पा तू काल रात्री गेलास ते आज आता येतो आहेस. मी काय समजायचं यातून?" त्यांनी आप्पाला अगदी हळू आवाजात सवाल केला. त्यांचा आवाज अगदी बारीक कुजबुजता होता.

"दाजी विजयाच बरच रक्त गेल आहे. ती पूर्ण ग्लानीत होती काल रात्रीपासून. अजूनही तिच्या अंगात बराच ताप आहे. तिला एकट सोडण शक्य नव्हत म्हणून मी तिथेच थांबलो होतो. आतासुद्धा मी केवळ तिच्यासाठी जेवण न्यायला आलो आहे. परत तिच्याकडे गेल पाहिजे मला. पण तुम्ही हे असं हळू आवाजात का बोलता आहात? काय झाल दाजी? तुमच्या आवाजात काळजी आहे." आप्पा दाजिंजवळ जात हळू कुजबुजत्या आवाजात म्हणाला.

"आप्पा तू दिवसभर नव्हतास. तुझ्यासाठी दोन वेळा पोलीस येऊन गेले. मी तुला बर नाही म्हणून सांगून त्याना पिटाळून लावले. तू तर म्हणतो आहेस की तुला परत जायचे आहे. अजून ती मुलगी बरी देखील झालेली नाही. त्यामुळे आता मात्र काय करायचे ते तू सांग." दाजी त्याचा हात हातात घेऊन म्हणाले. अजूनही त्यांचा आवाज कुजबुजल्या सारखा होता. आणि ते जरी आप्पाशी बोलत असले तरी त्यांची नजर सारखी खोलीच्या दाराकडे वळत होती. आप्पाने दाजींकडे बघितले. दाजींची नजर पहिल्यांदाच अस्थिर झाली होती. त्यांनी परत एकदा दरवाज्याकडे बघितले आणि खुर्चीतून उठत आप्पाला खुण केली. डाव्या बाजूला भिंतीतले एक मोठे कपाट होते. दाजींनी आप्पाला त्या कपाटात जाण्याची खुण केली आणि म्हणाले,"आप्पा, थोडावेळ तू इथे थांब. खूप मोठी गडबड झाली आहे पण मी ते सांभाळून घेईन. मात्र मी येऊन दार उघडेपर्यंत इथून बाहेर पडू नकोस. कोणाला संशय येऊ नये म्हणून मी बाहेरून हे कपाट बंद करून घेतो आहे. तू काळजी करू नकोस. मी आलोच." आप्पाचा दाजींवर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे दाजीना काही न विचारता आणि आवाज न करता तो त्या कपाटात शिरला. दाजींनी कपाटाला कुलूप घातले आणि परत आपल्या जागेवर येऊन बसले. त्यांनी बाजूच्या मेजावरचा तांब्या उचलला आणि ते पाणी प्यायले. मग मुद्दामच त्यांनी ते फुलपात्र खाली पडले. त्याचा आवाज त्या आडवेळी खूप मोठा झाला. त्या आवाजासरशी दाराबाहेर उभा असलेला पोरसवदा यशवंता आणि दोन पोलीस शिपाई आत आले.

आजवर आप्पा जे काम करत होता ते कोणाच्याही लक्षात न येता. परंतु ज्या रात्री वाड्यावर त्या तिन सावल्या आल्या होत्या; त्या रात्री यशवंता जागा होता. त्याने दाजीना त्या तिघाना आत घेताना बघितले होते. त्यानंतर काय झाले याची त्याला कल्पना नव्हती. परंतु त्या व्यक्ती येण्यामागे आपला मोठा भाऊ आप्पा असावा असा संशय यशवंताला आला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पोलीस घरी येऊन गेल्यानंतर यशवंता हळूच चोरून जाऊन पोलीस स्टेशन मधील मुख्य इंग्रज अधिकाऱ्याला भेटला होता. यशवंताचा आत्मकेंद्री स्वभाव त्या इंग्रज अधिकाऱ्याला लक्षात आला. त्याने यशवंताला पैशाचे आमिष दाखवले आणि सापळा रचला होता.

पहिले दोन दिवस आप्पा कसा आणि कुठे जातो ते यशवंताला कळत नव्हते. पण त्या दिवशी आप्पा घरी आला नाही याचा फायदा घेत त्याने दाजीना प्रश्न केला. "दाजी आप्पा दिसत नाही. कुठे गेला तो?" आपला मुलगाच आहे असा विचार करून दाजींनी त्याला एकूण घटनांची कल्पना दिली. ते म्हाणाले,"यशवंता आपला आप्पा देशाचे काम करतो आहे. कुठे आहे ते मला माहित नाही. पण मला खात्री आहे तो रात्री त्याच्या खोलीत नाक्की येणार. तू चिंता करू नकोस."

यशवंताला हेच अपेक्षित होते. त्याला त्या इंग्रज अधिकाऱ्याने एकच सांगितले होते की आप्पाला पकडून द्यायला मदत कर, आम्ही तुला तू जे मागशील ते देऊ. त्यामुळे यशवंताने लगेच पोलिसात जाऊन आप्पाची खबर दिली.

रात्री दाजी आणि यशवंता जेवून बाहेरच्या खोलीत आले तो समोर दोन पोलीस उभे. त्याना बघून दाजी चमकले. पण चेहेरा शांत ठेऊन त्यांनी विचारणा केली. "काय राव इथे आमच्या वाड्यावर कसे या आड वेळी?"

थोडा मागे अंधारात उभा असलेला तो इंग्रज अधिकारी आता पुढे आला. दाजींकडे विजयी मुद्रेने बघत तो म्हणाला,"तुमच्या यशवंतालाच विचारा दाजी. त्याने आम्हाला बोलावून घेतले आहे."

त्याचे उत्तर एकून दाजी कमालीचे चमकले. त्यांनी गर्कन वळून यशवंताकडे बघितले. तो अधिकारी आपले नाव घेईल याची अजिबात कल्पना नसलेला यशवंता क्षणभर गडबडला. परंतु त्याचा आत्मकेंदी स्वभाव उफाळून आला आणि त्याने दाजींवर आवाज चढवत म्हंटले,"दाजी, मला कल्पना आहे आप्पा नक्की काय करतो आहे. तरीही तुम्हाला तोच प्रिय आहे. मी देखील तुमचाच मुलगा आहे. पण तुम्ही कधी मला कोणताही अधिकार दिला नाहीत. मला माझा हक्क हवा आहे. मला पैसा हवा आहे. मुख्य म्हणजे मला या साहेबांनी सांगितल आहे की आप्पाला पकडून जेल मध्ये ठेवणार आहेत काही दिवस. त्याला कोणताही त्रास नाही देणार आहेत. तुम्ही ती काळजी करू नका. ते आपल्याला भरपूर पैसा देणार आहेत. त्यामुळे आप्पा आला की त्याला यांच्या हवाली करून टाकूया आपण. तुम्ही देखील माझ ऐका दाजी. यात सगळ्यांच भलं आहे."

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

हाही भाग उत्कंठावर्धक. पुभाप्र. योग्य ठिकाणी भाग संपवताय हे कसाब वाखाणण्याजोगे आहे.

लाडू's picture

12 Jan 2017 - 9:23 am | लाडू

छान आहे, वाचतेय

एकनाथ जाधव's picture

12 Jan 2017 - 11:57 am | एकनाथ जाधव

वचतोय.

टवाळ कार्टा's picture

12 Jan 2017 - 12:22 pm | टवाळ कार्टा

मस्त

बरखा's picture

12 Jan 2017 - 4:04 pm | बरखा

वाचते आहे. पुढचा भाग लवकर येउद्या.

Ranapratap's picture

12 Jan 2017 - 7:21 pm | Ranapratap

हि कथा वाचताना मास्तर ह्या कथेची आठवण झाली. लेखक कोण हे आठवत नाही पण स्वातंत्र पूर्व काळातील कथा होती. हा भाग पण छान जमलाय, पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

पैसा's picture

15 Jan 2017 - 1:05 pm | पैसा

उत्कंठावर्धक!