दक्षिण घळ - भाग १

Primary tabs

ज्योति अलवनि's picture
ज्योति अलवनि in जनातलं, मनातलं
9 Jan 2017 - 9:38 pm

गूढ भाग १
गाव सोडून गेल्यापासून यशवंताला तीच ती स्वप्न सारखी पडत होती. परंतु जोवर फक्त स्वप्न होती तोवर ठीक होत. अलीकडे मात्र त्याच्या स्वप्नात त्याचा परागंदा झालेला मोठा भाऊ आप्पा सारखा येत होता. त्यामुळे यशवंता खूपच अस्वस्थ झाला होता. रोजच आयुष्य जगण त्याला अवघड झाल होत. म्हणूनच पडणाऱ्या स्वप्नाचा सोक्ष-मोक्ष लावण्यासाठी यशवंता गावाकडे परतला होता. गावात आल्यानंतर तो त्याच्या पूर्वीच्या मित्राकडे, कृष्णाकडे, गेला होता आणि कसतरी त्याने कृष्णाचं मन वळवल होत वेतोबाच्या देवळापर्यंत जायला. लोकांची नजर चुकवून ते दोघे तिथे गेले होते.

"यस्वन्ता मी न्हाई येत तुझ्या संगती यापुढ. बा म्हन्लाय परत तिथं गेलू तर तंगड तोडेल. तुझ बर हाय रे. आता एकुलता एक मालक हाईस आयुष्याचा. घरी कोणी सवाल करणार न्हाई. त्यात दाजींचा पोरगा. आतापूर्वी सारखे रायले नसले तरी त्यांची पुन्याई हाई की तुझ्यासंगट. आम्हाला कोन इचारतो." कृष्णा वेतोबाच्या पारावर थांबून यशवंताला मागे खेचत होता.

यशवंताची नजर मात्र त्या घळीकडे लागली होती. त्याला तिथे जायचच होत. तिथे जाण ही त्याची गरज होती. पण ते तो कृष्णाला सांगू शकत नव्हता. त्यामुळे एक कटाक्ष घळीकडे टाकून तो परत कृष्णाला आर्जवी आवाजात म्हणाला,"अस काय रे करतोस? चल की जरा. थोडंच पुढे जाऊ. त्या घळीत काय आहे ते बघू आणि माग फिरू. आजवर मी वेतोबापर्यंत पण आलेलो नाही. प्रत्येकजण फक्त सारख म्हणतो ती अस्पर्श घळ आहे. तिथ म्हणे पाय काय नजर पण नाही टेकवायची."

"आर तुला म्हाईत हाय ना हे सार? मंग कशाला? तुला गावातल्या शान्या सुरत्यानी तिथलं अनुभव सांगितल्यात नव्ह? मंग का म्हून मला बळीचा बकरा करतुया? मी न्हाई यायचा. आन तू बी गेलास ना तर उलटा बोंब मारीन गावात जाऊन. आर ऐक माझं. सांजची येळ झाली गड्या. परत माझा बा मारायला उठल मी तुला हित घिऊन आलो ते कळल तर." कृष्णाने यशवंताचा हात धरून त्याला गावाकडे ओढायला सुरवात केली.

यशवंताला कृष्णाचा राग आला होता. पण त्याला त्या घळीकडे एकट्याने जायची हिम्मत नव्हती. दाजीनी प्राण सोडताना फक्त 'दक्षिण घळ आणि दरवाजा' असा उल्लेख केला होता. त्यावेळी यशवंता खूप घाबरलेला आणि गोंधळलेला होता. त्यामुळे त्याला दाजी काय सांगत होते ते कळल नव्हत. मात्र गाव सोडून गेल्यानंतर प्रत्येक रात्री त्याला दाजी जिन्यावरून पडले ते स्वप्न पडायचं आणि त्यांचे शब्द ऐकायला यायचे. यशवंता दचकून उठायचा आणि मग उरलेली रात्र जागून काढायचा. अलीकडे तर आप्पादेखील स्वप्नात दिसायला लागला होता. याचा अर्थ जरी सारा गाव तिथे जायला भीत असला तरी तिथले गूढ गुपित दाजीना आणि न जाणो आप्पाला देखील माहित होते; हे यशवंताला लक्षात आले होते. तेच गुपित त्याला स्वस्थ जगू देत नव्हते. पण त्याक्षणी त्याचा नाईलाज होता, कारण कृष्णा त्याच ऐकायला तयारच नव्हता. त्यामुळे मग शेवटचा कटाक्ष घळीकडे टाकून तो कृष्णाबरोबर मागे फिरला.

गावाच्या दक्षिणेला वेस ओलांडली की लगेचच वेतोबाच मंदिर होत. आणि त्याच्या पुढे अर्ध्या फर्लांगावर एक मोठ जुनं वडाच झाड होत. त्याचा पार देखील तसाच जुना होता. चिरेबंदी दगडांनी बांधलेला. आता पार मोडकळीला आला होता. पण तो पार दुरुस्त करून घ्यावा अस कोणत्याही गावकऱ्याला कधीच वाटल नाही. कारण त्या पारावर बसायला कधी कोणी गावकरी आले नाहीत. खर तर अमावस्येच्या संध्याकाळी एक दिवा लावणे आणि गावातलं कोणी देवाघरी गेल की एकदा वेतोबाला जाणे किंवा पितृ पक्ष आणि असेच काही ठराविक दिवस वेतोबाच्या मंदिरात दिवा बत्ती करण्याव्यतिरिक्त त्याबाजुच्या वेशीच्या दाराकडे कोणी जात नसे. गेलच तर मंदिराच्या पुढे एक पाउल नाही. अगदी पारापर्यंत सुद्धा नाही. तशी सक्त ताकीद होती दाजींची असा गावकऱ्यांचा समज होता. कारण प्राण सोडताना त्यांनी फक्त दरवाजा आणि दक्षिण घळ इतकाच उल्लेख केला होता. त्यांचा शब्द मोडण्याची हिम्मत आणि इच्छा कोणत्याही गावकऱ्याची नव्हती. सारा गाव दाजीना मानत होता. अर्थात त्याच कारणही तसच होत म्हणा.

दक्षिण वेशीबद्दल सांगायचं तर पूर्वी बायकांची हागणदरी त्या बाजूला होती. पण मग आप्पाच ते तस झाल आणि दाजींनी प्राण सोडताना दक्षिण वेस बंद करून टाकली नेहेमीच्या वावरासाठी.

दाजी म्हणजे गावाचा प्राण होते आणि त्यांच्यासाठीसुद्धा गाव आणि गावची माणस म्हणजे त्यांचे प्राण होते. एकवेळ ते घराकडे आणि घरच्या माणसांकडे दुर्लक्ष करतील... पण गावात कधी काही चुकीच होऊ देणार नाहीत; अशी त्यांची ख्याती होती. गावातला प्रत्येक भांडण-तंटा दाजींच्या वाड्यावर येऊनच मिटायचा. आप्पा म्हणजे दाजींचा मोठा मुलगा. तो देखील दाजिंसारखाच स्वभावाने होता. त्यामुळे मुलगा असावा तर असा. अस प्रत्येक गावकरी म्हणत असे.

तो स्वातंत्र्य संग्रामाचा काळ होता. प्रत्येकजण घरावर तुळशीपत्र ठेवून देशसेवेसाठी बाहेर पडत होता. तरुण आप्पाला देखील देशासाठी खूप काही कराव अस वाटत होत. अलीकडे त्याचा जीव देशासाठी काहीतरी कराव म्हणून तळमळत होता.

दाजीना अजून एक मुलगा होता. यशवंता!. दाजीना यशवंता उतार वयात झालेला. उतारवयातल हे बाळणपण सहन न होऊन त्यांची पत्नी त्यातच निवर्तली होती. दाजींनी आणि आप्पाने मिळूनच यशवंताला मोठा केला होता. कायम त्याचे लाड केले होते दोघांनी. परंतु त्याच्या हातात कधीच कोणता अधिकार आला नव्हता. त्यामुळे यशवंताला जवाबदारी म्हणजे काय ते माहीतच नव्हते. दाजींचा पैसा उडवायचा आणि गावभर चकाट्या पिटत फिरायचे एवढेच आयुष्य होते त्याचे. म्हणूनच कदाचित् तो दाजी आणि आप्पाहून खूप वेगळा होता. आजवर दाजींनी फक्त आणि फक्त गावाचा आणि गावकऱ्यांचा विचार केला होता. आप्पाने देशसेवेसाठी स्वतःला झोकून दिल होत. यशवंता मात्र फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करणारा होता.

यशवंता लहान असल्याने दाजींची सगळी भिस्त आप्पावर होती. म्हणूनच मनात गाव सोडून जाऊन स्वातंत्र्य संग्रामात भाग घ्यावा अस असूनही आप्पा गप्प होता. पण दाजी देखील त्याला ओळखून होते. आपल्या समोर गप्प असणारा आप्पा शांत बसलेला नसणार याची त्याना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे अप्पाच्या नकळत त्यांनी आप्पावर नजर ठेवली होती. असेच दिवस जात होते. एकदिवास आप्पा घरात नसताना त्यांनीच आल्या प्रसंगाला तोंड दिल होत. संध्याकाळी अप्पा घरी परतला आणि दाजींनी त्याला लगोलग आपल्या खोलीत बोलावून घेतल होत.

"आप्पा सध्याचा काळ कठीण आहे बाबा. सगळीकडे होळी पेटली आहे. महात्माजींनी शेवटची हाक दिली आहे प्रत्येक देशवासियाला." दाजी बोलत होते. आणि आप्पा चुळबुळ करत एकत होता. "कित्तीकानी आपले प्राण दिले आपल्या देशासाठी." आप्पाला अजूनही दाजींच्या बोलण्याचा रोख लक्षात येत नव्हता. "काय म्हणतो आहे मी आप्पा?" दादाजींनी त्याला प्रश्न केला. नकळून आप्पा "होय दाजी." एवढंच म्हणाला.

"आपण देखील काहीतरी केल पाहिजेच की रे देशासाठी." दाजी आप्पाकडे बघत म्हणाले आणि आप्पाचा चेहेरा उजळला. मग मात्र तो उत्साहात म्हणाला, "तेच म्हणतो मी दाजी. आपण खूप काही करू शकतो. बस... मनात असल पाहिजे." त्याच्या मते त्याने दाजीना कळू न देता आपल्या परीने काम सुरु केलेच होते. भूमिगत होणाऱ्या क्रांती वीराना तो मदत करत होता. त्याशिवाय बॉम बनवण्याचे तंत्र त्याने शिकून घेतले होते. त्यामुळे निरोप येईल त्याबरहुकूम असे गोळे तयार करण्याचे काम तो अत्यंत गुप्तपणे करत होता. मात्र अनेकदा अनेकांनी सांगूनही गाव सोडून या कामात पूर्णपणे झोकून द्यायला त्याच मन होत नव्हत. दाजींसारख्या गावासाठी जीव टाकणाऱ्या माणसाला दुखावून आप्पा जाणार नव्हता. म्हणूनच ज्याक्षणी दाजीच स्वतःहून म्हणाले की आपण काहीतरी केले पाहिजे तेव्हा आप्पा मनातून आनंदाला.

"काल रात्री परसदारी तिघे आले होते आप्पा. त्यातली एक व्यक्ती जख्मी होती." दाजी स्थिर नजरेने आप्पाकडे बघत म्हणाले. आप्पाने चमकून त्यांच्याकडे बघितले. "दाजी?" "काळजी करू नकोस पोरा.... घरातच वरती आपल्या पोटमाळ्यावर आहेत ते. पण तुला या गोष्टीची खबर नव्हती का? बर तेही जाऊ दे... घरात त्याना ठेवणे योग्य नाही. कारण सक्काळीच पोलीस ठाण्याचा माणूस येऊन गेला दारावर. म्हणाला सावध राहा... गावात कोणी दरोडेखोर घुसले आहेत. मी त्याला ठीक आहे म्हणून पिटाळून लावला. त्याना इथून हालवाव लागेल आप्पा. मला तर काही सुचत नाही. काय करणार आहेस तू?"दाजींनी आप्पाकडे बघत त्याला सवाल केला. त्यांच्या एकूण बोलण्यावरून आप्पाला लक्षात आल की त्याने कितीही लपवलं तरी त्याच्या दाजीना तो काय करतो आहे याची पूर्ण कल्पना आहे. मग मात्र शांतपणे त्याने दाजींकडे बघितल आणि म्हणाला,"दाजी तुमचा फक्त आशीर्वाद असू दे. मी बघतो बाकी सगळ."

क्रमश:

कथा

प्रतिक्रिया

ज्योति अलवनि's picture

10 Jan 2017 - 12:01 am | ज्योति अलवनि

गूढ भाग१: ह्या कथेचे मूळ नाव दक्षिण घळ असे आहे. अनावधानाने गूढ असे लिहिले गेले, पुढील भागात कथेचे मूळ नाव देईन.

पुणेकर भामटा's picture

10 Jan 2017 - 7:58 am | पुणेकर भामटा

पुभालटा ।

एस's picture

10 Jan 2017 - 8:37 am | एस

वाचतोय. पुभाप्र.

छान लिहीलय, पण पुढील भाग लवकर टाका.

स्नेहांकिता's picture

10 Jan 2017 - 4:28 pm | स्नेहांकिता

छान सुरुवात !

सिरुसेरि's picture

10 Jan 2017 - 5:46 pm | सिरुसेरि

छान सुरुवात . वाचतोय. पुभाप्र.

छान लिहीलय, पण पुढील भाग लवकर टाका.

Ranapratap's picture

10 Jan 2017 - 7:21 pm | Ranapratap

छान लेखन. पुभाप्र

अॅस्ट्रोनाट विनय's picture

14 Jan 2017 - 11:54 am | अॅस्ट्रोनाट विनय

पाचव्या भागावरून इथे उडी मारली. आता पहिला ते पाचवा सलग वाचतो.हा भाग जमलाय चांगला

पैसा's picture

15 Jan 2017 - 12:44 pm | पैसा

छान सुरुवात!

बबन ताम्बे's picture

15 Jan 2017 - 1:24 pm | बबन ताम्बे

सुंदर कथा .