महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

दक्षिण घळ: भाग २

Primary tabs

ज्योति अलवनि's picture
ज्योति अलवनि in जनातलं, मनातलं
11 Jan 2017 - 12:14 am

दक्षिण घळ : भाग १

"म्हणजे नक्की काय बघणार आहेस तू आप्पा?" दाजींनी त्याला विचारल.

"दाजी आपली दक्षिण वेसेकडची घळ आहे ना तिथल्या दरीत मी एक लहानसं खोपट केलं आहे. तसंही गावकरी त्याबाजूला जात नाहीत. उगाच तिथे भुताचा वावर आहे अस कधीतरी कोणीतरी पिकवून दिल आहे. त्याचा फायदा घेऊन मी तिथली जागा निवडली आहे. काल कोण कोण आलेत मला माहित नाही. कारण त्याची वर्दी मला नव्हती. पण तुम्ही काळजी करू नका. आपल्या गावात कोणालाही माझ्या या कामाची खबर नाही. त्यामुळे आज रात्री मी त्याना तिघाना त्या खोपटाकडे हलवतो." आप्पा म्हणाला.

"आप्पा माझा तुझ्यावर विश्वास आहे. पण एक समजून घे. देशाला जशी तरुण रक्ताची गरज आहे तशी आपल्या गावाला देखील तुझी गरज आहे. आता मला हा सगळा कारभार झेपत नाही. यशवंता अजून तसा बराच लहान आहे. त्यामुळे तुझ्यावरच सगळी जवाबदारी आहे. जे करशील ते विचार करून कर. एक लक्षात ठेव बेटा, चुकीच उचललेल एक पाउल पुढे अनेक योजन आपली वाट बदलून टाकत. जवाबदारीने वाग. मी आहेच तुझ्या पाठीशी." दाजी एवढ म्हणाले आणि चावडीवर जायला निघाले.

त्या रात्री दाजींच्या वाड्याच्या परसदाराकडून तीन आकृत्या बाहेर पडल्या. घोंगड पांघरलेल्या त्या तिघांपैकी एकाच्या पाठीवर काहीतरी ओझ असावं अस वाटत होत. ना दिवटी, ना कंदील... साधी चिमणी सुद्धा नव्हती त्यांच्या बरोबर. एकमेकांच्या आधाराने ते वेगात बाहेर पडले. सर्वात पुढे आप्पा होता. ओझ त्याच्या पाठीवर होत. पण आखाड्यात कमावलेलं शरीर असल्याने त्या ओझ्याच वजन त्याला वाटत नव्हत. तो भराभर गावाच्या दक्षिणेकडून बाहेर पडला आणि समोरच्या घळीकडे निघाला.

घळीच्या आत खोल एक खोपट उभ केल होत. ताडपत्री आणि झाडांच्या फांध्यांचा वापर करून. खोपटात येताच समोरच्या घोंगडीवर आप्पाने ते मुतकुळ ठेवल. बाकीचे दोघे देखील आत येऊन बसले. तिघे एकमेकांकडे बघत होते. एक बापुडवाणी चिमणी एका कोपऱ्यात अगदी आडोसा करून लावली होती. तिचा उजेड जेमतेमच पडत होता.

"पुढे काय आप्पा?" त्यातल्या एकाने प्रश्न केला.

"काय म्हणजे? मी काय सांगू? माझी जवाबदारी निरोप येईल तसे बॉम्ब बनवून तयार ठेवणे आणि भूमिगत होणाऱ्याना इथे लपवून ठेवणे एवढीच आहे. त्यात हा असा प्रसंग कधी आला नाही. मी फक्त एकून होतो की या संग्रामात स्त्रिया देखील पूर्णपणे उतरल्या आहेत. पण त्याचा काही अनुभव मला नाही. त्यामुळे तुम्हीच सांगा काय करायचं ते." आप्पा अस्वस्थपणे म्हणाला.

"योगेश मला वाटत आपण दोघांनी इथून निघाल पाहिजे. आजच... किंबहुना आत्ताच." त्या दोघांच ऐकणारा तिसरा शांतपणे म्हणाला.

"भाऊ आपण निघायला हव हे खर. पण मग.............." योगेश एकदा आप्पाकडे आणि एकदा घोंगड्यावर असलेल्या त्या व्यक्तीकडे बघत म्हणाला.

"आप्पा बघेल काय ते. काय आप्पा?" भाऊ म्हणाला.

"मी? भाऊ तुमचा निर्णय शेवटचा. पण मी काय करू? अहो ह्याना मी ओळखतसुद्धा नाही. त्यात त्या एक स्त्री आहेत आणि त्याना गोळी लागली आहे. गावातून मदत मिळणे अशक्य. कोणावरही विश्वास ठेवता येणार नाही. अशा वेळी मी एकटा कसकाय बघणार?" आप्पाने गोंधळून म्हंटल.

"हे बघ आप्पा, विजया आत्ता आजारी असली तरी ती आपल्या पहिल्या फळीतली झुंजार विरांगना आहे. ती उत्तम प्रकारचे बॉम्ब गोळे बनवते. त्यात तिचा हात धरणारा कोणी नाही. ती बरी होईपर्यंत इथे राहील. तू तेवढ्यात तिच्याकडून नवीन गोळे बनवायचे कसब शिकून घे. आणि प्रश्न फक्त काही दिवसांचा आहे. एकदा ती बरी झाली की तिच्यासाठीचा निरोप येईलच." भाऊने आप्पाला समजावले.

"अहो भाऊ अडचण दुसरीच आहे. इथे दिवसभर कोणाचाही वावर नसतो. ही दक्षिण घळ भूता-खेताची आहे अशी आवई आहे गावात. त्यामुळे मी इथे असा रात्रीच येऊ शकणार आणि ते ही तांबड फुटायच्या आत मला जाव लागणार. दिवसभर या इथे अशाच आजारी पडून रहाणार. जर त्याना काही गरज लागली मदतीची तर कस करायचं?" आप्पाने त्याची अडचण बोलून दाखवली.

"अ.....अ..... मी राहीन दिवसा. बस एकवेळ येऊन गेलात तुम्ही तरी चालेल. आणि तशी जखम खोल नाही. बरी होईन मी ८-१० दिवसात." पहिल्यांदाच घोंगडीवर पडून असणारी विजया म्हणाली.

त्यावर तिच्याकडे हसून बघत भाऊ म्हणाले,"झाल तर मग. निर्णय झाला. आप्पा आम्ही निघतो. तुला पुढचा निरोप येईपर्यंत तू विजयाला बर करून टाक. ठीक?" अस म्हणून भाऊने योगेशला खुण केली आणि आप्पा अजून काही बोलायच्या आत खोपटातून ते दोघे वेगाने बाहेर पडले आणि अंधारात दिसेनासे झाले.
आता नक्की काय कराव या संभ्रमात आप्पा तिथेच बसून राहिला. विजयाला उजव्या मांडीजवळ बंदुकीची गोळी चाटून गेली होती. त्यामुळे जखम फार खोल नव्हती. परंतु तिला प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे ती ग्लानीत होती. तिला शुद्ध येते का याची थोडावेळ वाट बघून आप्पाने बरोबर आणलेली भाकरी तिच्या डोक्याशी ठेवली आणि बाजूला असणाऱ्या कळशीत पाणी भरून तो उजाडायच्या अगोदरच तिथून बाहेर पडला.

दिवसभर आप्पाच कशातच लक्ष लागत नव्हत. तो आज शेतावर गेला नाही की दाजींशी किंवा यशवंताशी काही बोलला देखील नाही. दाजींच्या हे लक्षात आल पण त्यांनी आप्पाला छेडल नाही. रात्रीचा दुसरा प्रहर सुरु झाला आणि आप्पा दक्षिण दाराकडे निघाला. खोपटात पाउल ठेवताना त्याचा उर धपापत होता. विजया ठीक असेल ना याची काळजी त्याला लागून राहिली होती. विजया घोंगडीवर पडून होती. काल आप्पा तिला जस सोडून गेला होता तशीच. डोक्याजवळ ठेवलेली भाकरी देखील तशीच होती. आप्पा घाबरला. त्याने तिच्या नाकाजवळ हात नेला आणि श्वासोच्छ्वास सुरु आहे ना याची खात्री केली. तिचा श्वास मंद होता पण चालू होता. आप्पाला बरोबर आणलेली हळद आणि औषधी पाल्याचा लेप विजयाला लावायचा होता. पण जखम मांडीवर होती. त्यामुळे काय कराव हे आप्पाला सुचत नव्हत.

त्याने विजयाला हलवलं. "अहो... अहो... उठता का? मी तुमच्यासाठी औषध आणल आहे. तुम्ही काल ठेवलेली भाकरी देखील खालेली नाही. तुम्ही उठलात तर मी काही मदत करू शकेन." आप्पा विजयाला उठवायचा प्रयत्न करत होता. थोड्या वेळाने त्याच्या प्रयत्नांना यश आल. विजयाने डोळे उघडले. तिने एकदा आप्पाकडे बघितल आणि ती क्षीणस हसली.

"पाण्यात भिजवून भाकरी द्या. मी खाते. खायलाच हव. मला लवकर बर व्हायचं आहे." ती कण्हत म्हणाली.

"देतो की. पण हे औषध? ते तुमच तुम्ही लावून घेता का?" आप्पाने औषध तिच्याकडे सारत म्हंटल.

"माझ्यात उठण्याचे देखील त्राण नाहीत. तुम्हीच लावाल का?" विजयाने आर्जवी आवाजात म्हंटल.

"मी? मला कस जमेल? आणि खर तर मला लगेच निघाल पाहिजे. एक काम करतो... इथे ठेवतो हा लेप; तुमच्या हाताशी. जमेल तेव्हा लावून घ्या. मी परत रात्र झाली की येतोच. इथे या घळीत आतपर्यंत नाही येत कोणीही. खूपच बदनाम आहे ही जागा भूतबाधेसंदर्भात. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सांभाळा स्वतःला..... बर मी येऊ?" आप्पाला औषध लावायला अवघड वाटल म्हणून मग त्याने विजयाला खाण दिल आणि तिथून काढता पाय घेतला. मात्र त्यादिवशी देखील वाड्यावर असताना त्याचा जीव थाऱ्यावर नव्हता. आपण औषध न लावून चूक तर नाही ना केली अस सारख वाटत होत त्याला. त्यात त्याने भाकरी नेली होती. तिला भाकरी खाण शक्य होणार नाही हे त्याच्या लक्षातच आल नव्हत. रात्र व्हायला लागली तसा त्याने स्वतःच्या हाताने मऊ भात बनवून घेतला आणि लगोलग दक्षिण घळीकडे निघाला.

आप्पा खोपटात पोहोचला आणि विजयाला बघून घाबरून गेला. तो तिला काल ज्या परिस्थितीत सोडून गेला होता ती तशीच पडून होती. ना तिने काही खालेलं होत ना ती उठली होती. आप्पाने परत एकदा तिच्या नाकाजवळ हात नेला; श्वास चालू होता मंद. त्याने तिला हाक मारून बघितले. पण आज मात्र विजया पूर्ण ग्लानीत होती. तिच्या जखमेतून खूप रक्तस्त्राव झालेला दिसत होता. आता मात्र सगळी भीड बाजूला ठेवून आप्पाने तिची जखम स्वच्छ केली आणि तिथे औषध लावले. विजया तापाने फणफणली होती. त्याने तिच्या कपाळावर पाण्याच्या घड्या ठेवायला सुरवात केली. बराचवेळ तिच्याजवळ तो बसला होता.

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

पुणेकर भामटा's picture

11 Jan 2017 - 12:31 am | पुणेकर भामटा

छान लिहीताय .

एकनाथ जाधव's picture

11 Jan 2017 - 11:57 am | एकनाथ जाधव

छान आहे हा ही भाग.

भारी आहे. वाचतोय. पुभाप्र.

पिनाक विष्णुगुप्त चाणक्य's picture

11 Jan 2017 - 2:31 pm | पिनाक विष्णुगुप...

छान लिहिताय

Ranapratap's picture

11 Jan 2017 - 7:28 pm | Ranapratap

पुभाप्र

जेपी's picture

11 Jan 2017 - 8:27 pm | जेपी

आवडल..

पैसा's picture

15 Jan 2017 - 1:03 pm | पैसा

मस्त!