दक्षिण घळ भाग ४

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
12 Jan 2017 - 11:41 pm

दक्षिण घळ भाग १

दक्षिण घळ भाग २

दक्षिण घळ भाग ३

दक्षिण घळ भाग ४

दाजींच्या मस्तकात तिडीक गेली . ते यशवंतावर धाऊन गेले. परंतु उतार वयातली त्यांची शक्ती आणि तारुण्यात पाय ठेवणाऱ्या यशवंताची शक्ती यात फरक तर होताच. त्यात बरोबर असलेल्या पोलिसांनी दाजीना धरले. दाजींचे डोळे आग ओकत होते. हात मोकळे असते तर एव्हाना त्यांनी यशवन्ताचा गळा दाबला असता, याची यशवंताला कल्पना आली. दाजीच्या चेहेऱ्याकडे बघितल्यावर यशवंताला कल्पना आली की दाजी काही बोलणार नाहीत. तो त्या इंग्रज अधिकाऱ्याकडे वळला आणि म्हणाला,"साहेब, तुम्ही काळजी करू नका. या दोन हवालदारांना माझ्याबरोबर सोडा. आज रात्री आप्पा नक्की येणार आहे. मला दाजी तस म्हणाले आहेत. मी काय ते बघून घेतो. तुम्ही गेलात तरी चालेल."

त्यावर ते मान्य करून तो अधिकारी तिथून निघाला. त्याने निघताना यशवंताला जवळ बोलावले आणि म्हणाला,"मी जातो आहे ते तुझ्यावर विश्वास ठेऊन. त्यामुळे उद्या एकतर तुझा भाऊ जेल मध्ये असेल किंवा तू. त्यामुळे जे काही करशील ते निट विचार करून कर." अस म्हणून एकदा दाजींकडे कटाक्ष टाकून तो निघून गेला. तो गेल्यावर यशवांताने परत एकदा दाजींशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी तोंड उघडायला नकार दिला. एका बाजूला दाजी बसले होते आणि दुसऱ्या बाजूला यशवंता येरझाऱ्या घालत होता. मिनिटामागून मिनिट आणि तासामागून तास सरकत होते. मध्य रात्र होत आली. ते दोन पोलीस डुलक्या घेत होते. मात्र दाजीना आप्पाच्या काळजीने आणि यशवंताला स्वतःच्या काळजीने झोप नव्हती. आता दाजी व्हरांड्यात येरझाऱ्या घालत होते. यशवंता दाजीसमोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला,"दाजी जे झाल ते झाल. अहो आप्पाला पोलीस काही करणार नाही आहेत. ते फक्त त्याला स्थानबद्ध करणार आहेत अस म्हणाले आहेत. खरच! मी काय केल तर तुमचा माझ्यावर विश्वास बसेल.?"

दाजी डोळ्यातून आग ओकत फक्त त्याच्याकडे बघत होते. ते एक अक्षर बोलले नाहीत. पण त्यांच्या मनात विचार चालू होते. आप्पा आज रात्री परत आला आणि न जाणो त्याच्या बरोबर कोणी महत्वाची व्यक्ती असली तर आपल्या आणि त्याच्या आयुष्याला कायमचे गालबोट लागेल. त्यामुळे मग थोडा वेळ जाऊ देऊन त्यांनी यशवंताला म्हंटले,"यशवंता तू जे केलेस ते वाईट केले आहेस. आप्पाला ते काही करणार नाहीत यावर माझा विश्वास नाही. पण ते जर खर असेल तर आपण एक करू शकतो. मी आप्पाच्या खोलीत जाऊन बसतो. तो आला की मी त्याच्याशी मोठ्या आवाजात बोलेन. मग तू पोलिसाना घेऊन आत ये. कारण जर आप्पाला थोडा जरी संशय आला तर तो इथे येणारच नाही; आणि तो जर आला नाही तर उद्या तो इंग्रज अधिकारी तुझी पाठ सोलल्या शिवाय राहाणार नाही."

तसा यशवंता वयाने लहान असल्याने त्याला दाजींनी घातलेली भिती पटली होती. त्याने दाजींचे एकले आणि त्यामुळेच आप्पा येताच दाजी त्याला कपाटाच्या आत लपवण्यात यशस्वी झाले होते. यशवंता आणि ते दोन्ही पोलीस फुलपात्र पडल्याचा आवाज एकून खोलीत आले परंतु खोलीत एकट्या दाजीना बघून गोंधळले. त्याना वाटले होते की आप्पा आला याची खुण म्हणून दाजींनी फुलपात्र खाली पाडल असावं. त्याना आत आलेलं बघून दाजी म्हणाले;"अरे चुकून भांड पडल. अजून आप्पा आला नाही. आणि मला तर वाटत तो आजही यायचा नाही. यशवंता मी दमलो आहे. इथेच झोपतो. तू पण जाऊन झोप जा."

यशवंताला दाजींचे वागणे नेहेमीचे वाटले नाही. तो त्याना म्हणाला;"मी थांबतो इथे दाजी. तुम्ही जा खाली. तुम्हाला त्रास नको. आणि जर आप्पा आला नाही तर उद्या मी जिवंत राहाणार नाही आहे याची मला कल्पना आहे. त्यामुळे मी तर इथेच जागता पाहारा देणार आहे."

यावर आपण अजून काही बोललो तर यशवंताला संशय येईल म्हणून दाजी काही न बोलता खोलीतून बाहेर पडले. भिंतीतले कपाट मोठे होते पण बाहेरचा आवाज आत गेला असेल याची दाजीना कल्पना होती. खोलीतून बाहेर पडताना दाजींच्या मनात आले, 'आप्पा अजून काही तास तिथे काढू शकेल... सकाळ झाली की हे पोलीस यशवंताला घेऊन जातील हे नक्की. मग आप्पाला बाहेर काढता येईल. पण आता पोलीस असताना अजून काही संशय येईल असे व्हायला नको.' .

दाजी विचारांच्या नादात जिना उतरत होते आणि त्यांच्याही नकळत त्यांचा पाय एका पायरीवरून घसरला. काही कळायच्या आत दाजी जिन्यावरून धाड धाड गडगडत खाली आले. झालेल्या मोठ्या आवाजाने यशवंता धावत जिन्याकडे आला. त्याने जिन्याच्या शेवटाला दाजीना पडलेले बघितले आणि तो खाली धावला. तो दाजिंजवळ पोहोचला आणि त्याना आधार द्यायला गेला. दाजींनी त्याचा हात हातात घेतला आणि शब्द उच्चारले;"यशवंता काय झाल रे हे. तो दरवाजा... तो.... दक्षिण घळ.......... दक्षिण घळीत...... दरवाजा....." बस... आणि दाजी गतप्राण झाले होते.

आता मात्र यशवंता खरच खूप घाबरला. त्याला काय करावे सुचेना. त्या दोन पोलिसांपैकी एकजण तिथेच थांबला आणि दुसरा त्या इंग्रज अधिकाऱ्याला झालेल्या घटनेची वर्दी देण्यासाठी गेला. यशवंता दाजींच्या शेजारी बसून धाय मोकलून रडायला लागला. हे अस काही होईल याची त्याला सुतराम कल्पना नव्हती. आत्म केन्द्री यशवंता आता भानावर आला होता. पण त्याला खूप खूप उशीर झाला होता. त्याला त्याक्षणी आप्पा जवळ हवां होता आणि आप्पा खर तर जवळच होता. पण यशवंताला ते माहित नव्हत... आप्पाला देखील बाहेर काय होत आहे याची कल्पाना नव्हती. त्यामुळे दाजी आपल्याला सकाळीच बाहेर काढू शकतील एवढंच त्याच्या लक्षात आल होत. सकाळची वाट बघत तो कपाटात स्वस्थ बसला होता. कपाट मोठं आणि शिसवी जाड दाराच होत. त्यामुळे आप्पाला बाहेर जिन्याखाली काय झाल ते काही एकू येत नव्हत.

सकाळी दाजींच्या अंत्य यात्रेला पुरा गाव लोटला. आप्पाचा पत्ता नव्हता. त्याची वाट बराच वेळ बघितली गेली. पण मग भडजी म्हणाले असे कलेवर ठेऊन नाही चालणार. आता अंत्यविधी करणे आवश्यक आहे. मग गावातल्या मोठ्या लोकांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की यशवंता सगळे सोपस्कार करेल. यशवंता तर काही विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हताच. त्याला जे आणि जसे सांगितले जात होते ते आणि तसे तो करत होता. सगळे सोपस्कार उरकून तो घरी आला.

एका रात्रीमध्ये सगळे होत्याचे नव्हते झाले होते. यशवंता आता गळून गेला होता. आप्पा कुठे गेला याचा कोणालाच पत्ता नव्हता. यशवंता तसा लाहान असल्याने त्याला सोबतीला म्हणून गावातील मोठे दोघे- तिघे थांबले. रात्र चढायला लागली होती. अचानक दूर कुठूनतरी दरवाजा ठोठावल्याचा आवाज यायला लागला. अगदी क्षीणसा.... कोणालाही काही कळेना. सगळे कान देऊन ऐकायचा प्रयत्न करत होते. एकाने म्हंटले आवाज वरून येतो आहे. हे एकताच यशवंताचे धाबे दणाणले. तो काही केल्या वर जायला तयार होईना किंवा कोणालाही जाऊ देईना आणि त्याच्या या वागण्याचे कारण ही सांगेना. त्याला फक्त दाजींचे शेवटचे शब्द आठवत होते...........'दक्षिण घळीत........दरवाजा.....' रात्र तशीच गेली. यशवंताच्या त्या विचित्र वागण्यामुळे त्याच्या सोबतीला थाबलेल्या लोकांना विचित्र वाटले. पण घरात घडलेल्या दु:खी प्रसंगामुळे यशवंता घाबरला असेल असा विचार करून ते शांत राहिले.

सकाळी मात्र दिवसाच्या उजेडात यशवंताला जीवात जीव आला. त्याने गावकऱ्याना एकत्र केले आणि दाजींचे शेवटचे शब्द सांगितले. मात्र त्याने स्वतःच्या वडिलांशी केलेली गद्दारी लपवली होती. त्या इंग्रज अधिकाऱ्याने देखील एकूण गावातील परिस्थिती बघून गप्प रहाणेच शहाणपणाचे मानले होते. त्यामुळे गावकऱ्यांचा असा समज झाला की दाजी जीना उतरून येत असताना पडले आणि गेले. त्याना मृत्यू समयी कदाचित दक्षिण घळीतून गावाच्या दक्षिण दरवाजातून गावावर येणार संकट दिसले असेल. तसेही दक्षिण घळ भूता-खेतांची जागा म्हणून गावात माहिती होती. म्हणून मग मृत्यू समयीचा दाजींचा शेवटचा शब्द आदेश मानून गावात फतवा काढला गेला की यापुढे दक्षिण दरवाजा फक्त वेतोबाच्या देवळात जाण्यासाठी वापरात येईल. मुख्य म्हणजे त्या घळीकडे कोणीही जाणार नाही.

असेच दिवास जात होते. मात्र यशवंता घरात असला की त्याला सारखे कोणीतरी दार वाजवते आहे असा भास होऊ लागला. त्यामुळे तो कायम अस्वस्थ राहू लागला. त्याला खाणे-पिणे सुचेना की झोप येईना. बर घाबरण्याचे कारण देखील तो सांगू शकत नव्हता. शेवटी त्याने निर्णय घेतला आणि वाड्याला कुलूप लावून कोणालाही काहीही न सांगता तो गाव सोडून तडका फडकी निघून गेला.

दिवस जात होते. यशवंता का आणि कुठे निघून गेला याची गावातल्या लोकांना कल्पाना नव्हती. त्यांना यशवंताचे असे जाणे विचित्र वाटले. मात्र गावातल्या लोकांनी दाजींचा आदेश म्हणून दक्षिण दरवाजा वापरातून काढून टाकला. त्यानंतर कोणी चुकला-माकला जर दक्षिण घळीच्या दिशेने गेलाच तर त्याला कोणी एक स्त्री तिथे फिरताना दिसली होती. अगोदर लोकाना कल्पना नसल्याने ते कोण स्त्री आहे ते बघण्यास जात. ती त्याना फक्त एकच प्रश्न विचारात असे;"आप्पा आले नाहीत तुमच्याबरोबर?" आणि मग दु:खी चेहेऱ्याने निघून जात असे. हळू हळू ती कोणी स्त्री नसून कोण्या स्त्री चा आत्मा असल्याची चर्चा गावात सुरु झाली... आणि मग मात्र खरच दक्षिण दार आणि ती घळ म्हणजे अस्पर्श जागा झाली. ती स्त्री केवळ आप्पा असल्याबद्दल विचारायची त्यामुळे आप्पानेच तिला काहीतरी केले असावे आणि म्हणून तो परागंदा झाला असावा असा विचार गावकऱ्यांनी केला.

क्रमश:

कथा

प्रतिक्रिया

बापरे! अनपेक्षित ट्विस्ट. जबरदस्त. पुभालटा.

राजाभाउ's picture

13 Jan 2017 - 2:36 pm | राजाभाउ

+१

सगळे भाग एका दमात वाचून काढले. जबरदस्त कथानक! पुभाप्र.

पैसा's picture

15 Jan 2017 - 1:08 pm | पैसा

बापरे! आप्पा गेला तर बिचारा घरात कपाटातच!