सुर्याची लेकरे

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
22 Jul 2015 - 12:43 pm

एवढ्यात महाभारताशी संबंधित काही लेख वाचत होतो. जाणकारांमध्ये महाभारत कालासंदर्भात बरेच मतभेद असले तरी एका बाबतीत एकवाक्यता आढळते की महाभारताचे युद्ध ऑक्टोबर महिन्यात घडले. (त्यावेळेस ख्रिस्ती कालगणना अस्तित्वात नव्हती पण लोकांना नीट समजावे म्हणुन ऑक्टोबर लिहिण्याची पद्धत आहे.) महाभारत मुळात घडले की नाही ही चर्चा आपण तुर्तास बाजुला ठेउयात. पण बाकीच्या तारखांबद्दल एकुणात गोंधळच आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट इतक्यात वाचली की कृष्णाचा जन्म २७ जुलैचा. ही तारीख काढण्यामागची अनेक कारणे त्या लेखात दिली होती. मला त्यात फारसा रस नव्हता पण तो लेख वाचता वाचता महाभारतावर एक लेख लिहायचा विचार पक्का केला. नेहमीच्या पात्रांबद्दल अथवा घटनांबद्दल लिहिण्यापेक्षा थोडे अज्ञात असलेले वृषसेनाचे पात्र डोक्यात होते पण मग नंतर कर्णाच्या सगळ्याच मुलांवर एक लेख लिहावा असा विचार केला (फोकस तरीही वॄषसेनावर आहे) :). कर्ण सुर्यपुत्र म्हणुन मग ही सगळी सुर्याची लेकरे :)

कर्ण स्वतः महाभारतातल्या सर्वात प्रभावी पात्रांपैकी एक. कर्णाभवतालचे वलय खरे सांगायचे तर कृष्णार्जुन वगळता इतर सर्वच पात्रांना झाकोळुन टाकते. किंवा आपण असे म्हणुयात की कृष्ण, अर्जुन आणि कर्ण ही तीन पात्रे मिळुन महाभारतावर राज्य करतात. त्यामुळे इतर पात्रांना उणॅपण येते असे नाही पण या तीन पात्रांची प्रभा इतर सर्वांना थोडेफार तरी झाकोळुन टाकते. अर्जुनाच्या वलयातुन बाहेर पडुन अभिमन्युने स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला दिसतो पण त्यातही 'अरेरे बिचारा कोवळा जीव ६ लोकांनी मिळुन मारला' अशी हळहळच जास्त दिसते. घटोत्कच सुद्धा कर्णाच्या शक्तीमुळे जास्त भाव खाउन जातो. त्यामानाने एका साध्या बाणाने मारला गेलेला वृषसेन किंवा भानुसेन मात्र त्या मानाने कमी प्रसिद्धी पावतात.

त्यामुळेच अश्या कमी माहितीतल्या कर्णपुत्रांसाठी हा लेख. महाभारतानुसार कर्णाला ५ मुले:
१. वृषसेन
२. भानुसेन
३. चित्रसेन
४. सुषेन
५. सत्यसेन

शिवाजी सावंतांनी मृत्युंजय मध्ये सुदामन नावाच्या अजुन एका मुलाला जन्म दिला आहे. मला इतर कुठल्या प्रतीत मात्र हा सुदामन दिसला नाही. सावंतांनुसार द्रौपदी स्वयंवरात सुदामन भीमार्जुनांकडून मारला गेला. नंतर कर्णाने दिग्विजया दरम्यान द्रुपदाला नतमस्तक करुन सुदामनाची समाधी बनवुन घेतली असा उल्लेख सावंतांनी केल्याचे आठवते. कर्ण युधिष्ठिरापेक्षा १६ वर्षांनी मोठा होता असे म्हणतात (हे देखील माझ्यामते एक अनुमानच आहे. स्पष्ट उल्लेख बहुधा कुठेही नाहित). त्यामुळे द्रौपदी स्वयंवराच्या वेळेपर्यंत कर्णाचे लग्न होउन त्याचा एक मुलगा तरी हाताशी आला असावा असा तर्क करुन कदाचित सावंतांनी हे पात्र उभे केले असावे किंवा कदाचित कुठल्यातरी कमी ज्ञात आवृत्तीमध्ये त्याचा उल्लेख असावा.

अजुन एका मुलाचा उल्लेख काही कथांमध्ये येतो. नेमक्या पुराणाचे नाव मला आत्ता आठवत नाही पण बहुधा जैमिनी भारतात वॄषकेतुचा उल्लेख येतो. हा कर्णाचा सगळ्यात धाकटा मुलगा. युद्धाच्यावेळेस हा खुपच लहान असल्याने याने युद्धात भाग घेतला नव्हता. कर्णाच्या सर्व मुलांमध्ये दैवी अंश असलेला किंवा दैवी कार्यसंपादनासाठी जन्मलेला हाच एक. शैशवावस्थेत असताना कृष्णाने याच्याकरवी एका दैत्याचा वध घडवला. या दैत्याला कुठल्याही पुरुष अथवा स्त्री कडुन अथवा कुठल्याही शस्त्राने मरण येणार नाही असे अभय होते. शैशव अवस्थेतील मुले म्हणजे स्त्री अथवा पुरूष नाहित असा कुठलासा धर्माचा आधार घेउन वृषकेतुच्या हातात मंतरलेल्या दर्भाची काडी देउन कृष्णाने त्या दैत्याचा वध करवला अशी कथा मला पुसटशी आठवते. अर्थात मान्य प्रतींमध्ये हा उल्लेख कुठेच नाही. मुळात वॄषकेतुचा उल्लेखच जैमिनी भारत सोडून इतर कुठेही नाही. जैमिनी भारतानुसार वृषकेतु अर्जुनाबरोबर अश्वमेध यज्ञाच्या युद्धांमध्ये सहभागी होता आणि बर्याच ठिकाणी त्याने शौर्य दाखवले. बभ्रुवाहनाबरोबर त्यांचे जे युद्ध झाले त्यात अर्जुनाबरोबर वॄषकेतु देखील मारला गेला. मात्र नंतर अर्जुना बरोबर त्यालादेखील परत जिवंत केले गेले. जैमिनी भारताचे केवळ अश्वमेध पर्व सध्या अस्तित्वात असल्याने युद्धोत्तर काळात वृषकेतुचे काय झाले आणि राज्य त्याला न मिळता परिक्षिताला का मिळाले याबद्दलचा कुठलाही संदर्भ सापडत नाही.

कर्णाच्या इतर पाचही मुलांनी महाभारत युद्धात भाग घेतला होता. महाभारताच्या युद्धापुर्वी युद्धाचे काही नियम ठरवले गेले होते. ठराविक अंतराने जवळजवळ सगळ्याच नियमांना दोन्ही बाजुंनी तिलांजली दिली गेली. युद्धाच्या अनेक नियमांपैकी एक नियम होता की एका यौद्धाशी एकाच यौद्धाने लढावे. लढाईच्या पहिल्याच दिवशी काही मिनिटांमध्येच अनेक यौद्ध्यांनी भीष्मावर हल्ला करुन या नियमाला तिलांजली दिली. दुसरा नियम असा होता की कुणीही इशारा न देता दुसर्या यौद्ध्यावर हल्ला करु नये. या नियमालाही लवकरच तिलांजली दिली गेली. त्यामुळे बहुतेक प्रमुख यौद्धांना मारण्यासाठी कुठुनही कसाही हल्ला होउ शकतो हे लक्षात घेउन सगळ्याच प्रमुख यौद्धांचे रक्षण आजुबाजुला राहुन इतर दुय्यम दर्जाचे यौद्धे करत असत. स्वत: कृष्ण ज्याचा सारथी होता त्या अर्जुनाच्या रथाचे रक्षण त्याचे दोन मेव्हणे उत्तमौजा आणि युधामन्यु करायचे (हे दोघे शिखंडी, दॄष्ट्यद्युम्नापेक्षा धाकटे म्हणजे अर्थात द्रौपदीपेक्षादेखील लहान) तर कर्णाच्या रथाचे रक्षण पुढच्या बाजुने सुषेण आणि चित्रसेन करायचे आणि मागील बाजुने वॄषसेन करायचा. वॄषसेन वगळता कर्णाच्या सर्व मुलांनी कर्णाच्या आजुबाजुला राहुन युद्ध केले याचा एक अर्थ असाही काढता येइल की ते कदाचित युद्धात वॄषसेना इतके निपुण नव्हते. अर्थात सुषेण आणि चित्रसेन युद्धनिपुन होते असा उल्लेख काही ठिकाणी दिसतो.

कर्णार्जुनाची जेव्हा तुलना होते तेव्हा एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवते की अर्जुनाच्या उपस्थितीत फार कमी प्रमुख यौद्ध्यांचे बळी गेले. त्याने जवळजवळ सर्वांना वाचवले. कधी पुढुन बाण मारुन तरी कधी मागुन अधर्माने बाण मारुन. कर्ण मात्र आपल्या उपस्थितीत आपल्या मुलांना वाचवु नाही शकला किंवा कदाचित त्याला तितका वेळ नाही मिळाला. त्याच्या दोन किंवा तीन मुलांना पांडवांनी त्याच्या उपस्थितीत मारले. सर्वप्रथम बळी गेला भानुसेनाचा. त्याला भीमाने मारले. त्याच वेळेस सुषेणाचा देखील बळी जायचा मात्र ऐनवेळी वृषसेनाने भीमापासुन त्याला वाचवले आणी स्वतः भीमाशी युद्ध सुरु केले. सत्यसेन आणि चित्रसेन मात्र इतके सुदैवी नव्हते. या दोघांनाही नकुलाने मारले. चित्रसेन हा एक कसलेला धनुर्धर होता. त्याने नकुलाचे धनुष्ञ तोडले, रथ मोडला, घोडे मारले. मात्र त्यानंतर नकुल त्याच्या आवडत्या शस्त्रानिशी चित्रसेनावर तुटुन पडला. नकुलाने तलवार हातात घेउन चित्रसेनाच्या रथावर उडी मारली आणि तलवारीने त्याचा शिरच्छेद केला. कर्ण आणि वृषसेनाच्या मृत्युनंतर देखील शेवटच्या दिवशी चित्रसेन आणि सत्यसेन जिवंत होते. दोघांनाही नकुलानेच मारले. सुषेण होता की नाही याबाबत गोंधळ आहे.

सुषेणाच्या मृत्युसंदर्भात बराच सावळागोंधळ आहे. एकतर सुषेण हे नाव त्या काळातले निखिल, सचिन किंवा अमित होते. १० पात्रांपैकी एकाचे नाव तरी सुषेण असायचेच. धृतराष्ट्राच्या एका मुलाचे नाव देखील सुषेण होते (एकाचे कर्ण आणि एकाचे चित्रसेन देखील होते म्हणा. १०० वेगळीवेगळी नावे कशी आठवावीत. ही मुले जेव्हा गांधारी धृतराष्ट्राला भेटायला जात असतील तेव्हा कदाचित सांगत असतील की मी तुमचा ३३ वा मुलगा नंदक बरंका. आठवते का आपण साडेतीन वर्षापुर्वी भेटलो होतो वगैरे. कसे ना लक्षात राहणार सगळे आणि त्यांची नावे). तर सुषेण नावाबद्दल खुप गोंधळ आहे. एक तर खुप सुषेण होते. त्यातले बरेच राजे, एक धृतराष्ट्राचा मुलगा, दोन्हीकडच्या राजांची नावे सुषेण. या गोंधळात व्यासांनी या सुषेणाबद्दल गोंधळ केला. हा एक निष्णात धनुर्धर परंतु कसा मारला गेला याबद्दल गोंधळ आहे. एकेठिकाणी व्यास म्हणतात की शेवटच्या दिवशी चित्रसेन, सत्यसेनापुर्वी नकुलाने त्याला देखील मारला तर दुसरीकडे हेच व्यास म्हणतात की त्याला उत्तमौजाने कर्णाच्या डोळ्यादेखत मारला (आणि मग पळुन गेला). नक्की काय कळत नाही.

पण ही मुले म्हणजे कर्णाचे कवच होते. जोपर्यंत ती जिवंत होती तोपर्यंत कर्ण सुरक्षित राहिला. मात्र एक एक करत त्याचे विश्वासु संरक्षक मारले गेले. अंतिम युद्धापुर्वी वृषसेन मारला गेल्यावर त्याचे मुख्य संरक्षक कवचच तुटले. तसे अर्जुनाच्या बाबतीत कधीही झाले नाही. अर्थात हे संरक्षक अंतिम कर्णार्जुन युद्धात असेही कुचकामीच ठरले असते. कारण महाभारतात लिहिल्याप्रमाणे ते युद्ध इतके भीषण झाले की त्यांच्या जवळपासच्या प्रत्येक यौद्धाला त्या दोघांनी मिळुन टिपुन काढले. त्या दोघांच्या आसपास लढाई करायची म्हणजे मृत्युला आमंत्रण द्यायचे हे ओळखुन इतर सर्व यौद्धे लांब जाउन थांबले. अंतिम काही पळांमध्ये तर आजुबाजुच्या सैनिकांनी युद्ध पुर्णपणे थांबवले होते. तिथे वृषसेन असता तरीही फारसा फरक पडला नसता.

इतर सर्व प्रमुख यौद्ध्यांसमोर वृषसेन थोडासा झाकोळला गेला आहे. परंतु महाभारताने त्याचे शौर्य वेळोवेळी मान्य देखील केले आहे. युद्ध्याच्या सुरुवातीला दृष्ट्यद्युम्नाने जेव्हा यौद्ध्यांची वाटणी केली तेव्हा एकेका यौद्ध्याला त्याने कौरवपक्षातील एकेका यौद्ध्याला मारण्याची जबाबदारी दिली. त्यात अर्जुन - कर्ण, भीम - दुर्योधन अशी वाटणी झाली तेव्हा अभिमन्यु - वृषसेन अशी देखील वाटणी झाली. दृष्ट्यद्युम्नाच्या मते अभिमन्यु अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होता हे लक्षात घेता वृषसेनाचे महत्व जाणवते. भीष्माने देखील त्यांच्या पक्षातल्या यौद्ध्यांचे मुल्यमापन केले तेव्हा कर्णाला युद्धभूमीपासुन दूर ठेवण्याच्या हेतुन जाणुनबुजुन त्याची अर्धरथी अशी संभावना केली मात्र वृषसेनाला त्यांनी महारथी असल्याचे प्रशस्तीपत्रक दिल्याचे दिसते.

एकप्रसंगी कर्ण युद्धभूमीपासुन दूर असताना शल्याला भीमाने घायाळ केले तेव्हा त्याला घेउन कृतवर्मा युद्धभूमीपासुन दूर गेला असता एकट्या वृषसेनाने सर्व पांडवांना सळो की पळो करुन सोडले. त्याने भीमाला निरस्त्र केले, नकुलाच्या मुलाला शतानिकाला तो मारणारच होता इतक्यात इतर पांचाल वीर आणि द्रौपदीपुत्र मध्ये पडले म्हणुन तो वाचला. चक्रव्युहामध्ये देखील द्रोणांनी जयद्रथाला इतर पांडवांना द्वारातच रोखण्यासाठी नियुक्त केले होते (जयद्रथाला तसा वर मिळाला होता) तर त्याच्यामागे लगेच वृषसेनालाच ठेवले होते. अभिमन्यु चक्रव्युहात शिरताच त्याला सामोरा गेलेला पहिला यौद्धा वृषसेनाच होता आणि तो शौर्याने लढला मात्र अभिमन्युने त्याला बेशुद्ध केले आणी पुढे शिरला. यथावकाश अभिमन्युचा बळी गेल्यावर अर्जुनाने जयद्रथाला मारण्याची प्रतिज्ञा केली तेव्हा जयद्रथाच्या रथाचे रक्षण करण्यासाठी द्रोणांनी ज्या सहा यौद्धांना नियुक्त केले होते त्यात एक वृषसेन होता. इतर जण होते कर्ण, अश्वत्थामा, भूरिश्रवा, शल्य आणि कृपाचार्य. थोडक्यात सांगायचे तर द्रोणाचार्यांनी त्यांचे सर्वोत्तम योद्धे त्याच्या आजुबाजुला ठेवले.

पंधराव्या दिवशी खुद्द द्रोणांच्या संरक्षणाची जबाबदारी ज्यांच्या शिरावर होती त्या लोकांमध्ये वृषसेन एक होता. त्याने आख्ख्या द्रुपद सैन्याला खिळवुन ठेवले होते. स्वतः द्रुपद जो तोवर फार कमी लोकांकडुन हारला होता तो देखील वृषसेनासमोर निष्प्रभ ठरला आणि बेशुद्ध झाला. नंतर दृष्ट्यद्युम्नाने द्रोणांना मारल्यावर मात्र तो पळुन गेला.

द्रुपद, पांडव, सात्यकी, अर्जुन यापैकी सर्व महत्वाच्या यौद्ध्यांबरोबर वृषसेन लढला. अश्या या शूर यौद्धाचा अंत देखील त्याला साजेसा झाला. भीम ऐन भरात असताना त्याने कौरवांची दाणादाण उडवली होती. स्वतः कर्ण पळुन जायच्या तयारीत होता. त्यावेळेस एकटा वृषसेनच काय तो भीमाला तोंड देण्यासाठी उभा राहिला. त्याच्याकडे बघुन कर्ण देखील परत फिरला. त्यानंतर त्या युद्धभूमीवर सर्वात घनघोर युद्ध लढले गेले. भीमाच्या मदतील नकुल आला. वृषसेन एकटा
त्या दोघांशीही लढत होता. नकुलाने पराक्रम गाजवला देखील मात्र वॄषसेनाने प्रथम त्याचे चिलखत आणि मग त्याचे धनुष्य तोडले आणि मग त्याचे घोडे देखील मारले. कर्णाच्या दुसर्या मुलाने चित्रसेनाने देखील हा पराक्रम नंतर केला मात्र तेव्हा नकुलाने तलवारीने युद्ध करुन चित्रसेनाला मारले . वॄषसेनाने मात्र नकुलाची तलवार देखील बाणांनी तोडली. हतबल झालेला नकुल अखेर भीमाच्या रथावर चढला आणि तिथुन त्या दोघांनी परत वॄषसेनाशी युद्ध सुरु केले. वृषसेनाचे आक्रमण इतके धडकी भरवणारे होते की भीमाने नकुलाला वाचवण्यासाठी थेट अर्जुनाची मदत मागितली. अर्जुन येइपर्यंत वॄषसेनावर द्रौपदीची पाच मुले, द्रुपदाची पाच मुले आणि स्वतः सात्यकी (भीम नकुल वेगळेच) अश्या ११ यौद्ध्यांनी हल्ला केला. इतर कौरव यौद्धेदेखील मग वॄषसेनाच्या मदतीला गेले. नेहमीप्रमाणे थोड्याच वेळात युद्ध करणार्या लोकांच्या जोड्या पडल्या.

वॄषसेनाने जणू नकुलाला मारण्याचा विडाच उचलला होता. तो वारंवार त्याला निशस्त्र करुन मारु इच्छित होता. अखेर अर्जुनाने वृषसेनाला स्वतः मारण्याचे ठरवले. याखेपी भीम, अर्जुन, नकुल आणि शतानिक (नकुलाचा मुलगा) असे चार प्रमुख यौद्धे वॄषसेनाशी लढत होते. वॄषसेनाने त्या सर्वांना आपल्या बाणांनी विद्ध केले. त्याच्या या पराक्रमावर खुष होउन कौरव सैन्य त्याला उत्तेजन देत होते. तिथेच घात झाला. जखमांनी चवताळलेल्या अर्जुनाने अतिशय प्रखर युद्ध करत अखेर त्याचे दोन्ही हात बाणांनी छाटुन मग त्याचे शिर उडवले. इतर कुठल्याही यौद्ध्याच्या मृत्युपेक्षा जास्त दु:ख कर्णाला वॄषसेनाच्या मृत्युवर झाले. त्याच दिवशी लढल्या गेलेल्या महाभारतातल्या सर्वात भीषण युद्धात अखेर अर्जुनाने रथाचे चाक जमिनीत घुसलेल्या कर्णाचे देखील शीर उडवले. राधासुताचा सर्वात निष्णात शूर पुत्र युद्धाच्या सतराव्या दिवशी पडला. जैमिनी भारताकडे दुर्लक्ष केल्यास असे म्हणता येइल की युद्धाच्या १८ व्या दिवशी चित्रसेन आणी सत्यसेनाच्या मृत्युसरशी राधासुताचा वंश पुर्णपणे संपला.

संस्कृतीधर्मइतिहासलेख

प्रतिक्रिया

पैसा's picture

22 Jul 2015 - 1:12 pm | पैसा

महाभारतातील इतर दुय्यम महत्त्वाच्या पात्रांपैकी फार कोणाची नावे लक्षात रहात नाहीत. पण मराठी कादंबरीकारांमुळे कर्णाच्या मुलाचे नाव निदान माहीत असते. इतर सर्वांच्या मुलांप्रमाणेच तोही भारतीय युद्धात मारला गेला. हे असेच होणार होते. पांडवांचीही सर्व मुले मारली गेलीच. केवळ कृष्णामुळे त्यांचा वंशविच्छेद झाला नाही.

टवाळ कार्टा's picture

22 Jul 2015 - 1:36 pm | टवाळ कार्टा

मस्तय :)

संदीप डांगे's picture

22 Jul 2015 - 1:40 pm | संदीप डांगे

खूप छान लिहलंय...
का कुणास ठावूक पण कर्णाबद्दल फार हळवा कोपरा आहे मनात. लोक म्हणतात त्याने जे केले ते भरले. तो फक्त कौरवांसोबत होता म्हणून बदनाम झाला असेल का?

मृत्युन्जय's picture

22 Jul 2015 - 1:44 pm | मृत्युन्जय

बदनाम होण्यासाठी कर्णाने स्वतः देखील पुरेसे प्रयत्न केले. बिचार्‍या कौरवांना दोष नका देउ त्याचा,

टवाळ कार्टा's picture

22 Jul 2015 - 1:45 pm | टवाळ कार्टा

येस्स...तो स्वतःच मिथुन झाला :)

जबराट रे, बरेच दिवसांनी काहीतरी झकास वाचायला मिळालं

प्यारे१'s picture

22 Jul 2015 - 2:01 pm | प्यारे१

+१
असेच म्हणतो

माझीही शॅम्पेन's picture

23 Jul 2015 - 1:58 pm | माझीही शॅम्पेन

भन्नाट लेख ......पु ल म्हणतात त्या प्रमाणे कर्ण हा समहाउ आपला वाटतो , त्याच्या पुत्रांबद्दल नवीनच माहिती समजली ,

पद्मावति's picture

22 Jul 2015 - 2:01 pm | पद्मावति

महाभारतातल्या फारच कमी माहीत असलेल्या व्यक्तिरेखेची अतिशय माहितीपूर्ण ओळख. सुंदर.

एस's picture

22 Jul 2015 - 3:24 pm | एस

फार छान लेख आहे. कर्णाबद्दल हळवा कोपरा असल्याने वृषसेनाच्या पराक्रमाचा आनंद वाटला. तसेच मृत्यूबद्दल हळहळदेखील!

कपिलमुनी's picture

22 Jul 2015 - 6:59 pm | कपिलमुनी

वृषसेनाच्या पराक्रम. तसेच मृत्यू

सगळ खोट्ट आहे हो .. चांदोबासारखा !

फार हळहळू नका :)

द-बाहुबली's picture

22 Jul 2015 - 7:03 pm | द-बाहुबली

कर्णाबद्दल हळवा कोपरा असल्याने बर्‍याच लोकांच्या मनी ही भावना असल्याचे अनुभवला येते. हा कर्णाबद्दलचा हळवा कोपरा नक्कि काय भानगड आहे हो ? जरा स्पश्ट होइल का ? इथे नको, दुसर्‍या लेखात अथवा खवत.

संदीप डांगे's picture

22 Jul 2015 - 10:17 pm | संदीप डांगे

कुडमुड्या ज्योतिषासमोर बसा. तो जे तुमचे वर्णन करेल तेच कर्णाचे आहे. म्हणून हळवा कोपरा आहे समदु:खींसाठी.

अजून जास्त सान्गू का?

द-बाहुबली's picture

23 Jul 2015 - 12:20 pm | द-बाहुबली

इथे नको, दुसर्‍या लेखात अथवा खवत.

हे वाच्लं नाही का ?

संदीप डांगे's picture

23 Jul 2015 - 2:33 pm | संदीप डांगे

हे वाच्लं नाही का ?
>> म्हणजे खरंच अजून जास्त काही सांगायची आवश्यकता आहेच का?

"तुम्ही इतरांसाठी खूप करता पण तुमच्या करण्याची लोकांना किंमत नाही, तुम्ही मनाने फार चांगले आहात पण तुमच्या स्पष्ट बोलण्यामुळे लोक नाराज होतात, तुम्हाला सगळ्यांना खुश ठेवावं असं वाटत असतं, तुमच्यात क्षमता आहेत पण त्या सिद्ध करायला तुम्हाला संधी मिळत नाहीये, तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला जॉब्/नोकरी/काम/पद्/अधिकार्/मान मिळत नाहीये."

आप कन्विन्स हो गये या मैं और बोलू?

द-बाहुबली's picture

23 Jul 2015 - 3:22 pm | द-बाहुबली

ओके इनफ, लेट्स स्विच टु स्क्रॅपबुक अँड हॅव धिस कॉनवरसेशन लाइक ग्रोवनप्स...

संदीप डांगे's picture

23 Jul 2015 - 4:09 pm | संदीप डांगे

अहो एवढं गहन आणि विचार करण्यासारखं काय आहे त्यात?

कर्णाचं कॅरेक्टर हे वर दिलेल्या वाक्यांमधून जसं व्यक्तिमत्व उभं राहतं त्याप्रमाणेच आहे. प्रत्येकाला आपल्यात क्षमता असून योग्य संधी न मिळाल्याची खंत असतेच. जे कर्णाचं झालं महाभारतात तेच कमीअधिक प्रमाणात सर्वांचंच होत असतं. कित्येकदा संधी असून ऐनवेळी चाक संसाराच्या/व्यवस्थेच्या चिखलात फसतं आणि योग्यतेचा अमानुष/धर्मबाह्य बळी जातो. चांगुलपणाच नडतो. हे अनुभव आपण कर्णाच्या चरित्राशी रीलेट करू शकतो ना? पात्र असून योग्य सन्मान/संधी न मिळण्याचं शल्य प्रत्येक हृदयात असतंच. हे फक्त व्यवसायिक नाही तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रात. म्हणजे एखादा यशस्वी झाला तरी घरच्यांकडून मान-सन्मान मिळेलच असं नाही. लोक फायदा काढून घेतात आणि तुमची वेळ आली की पाठ दाखवतात. कधी हातून उगाच चुका झालेल्या असतात, ज्या आयुष्यभर सतावत असतात. असं आणि बरंच काही.

द-बाहुबली's picture

23 Jul 2015 - 4:25 pm | द-बाहुबली

मित्रा धागा काढ अथवा खवत ये.. कर्ण-गेट प्रकरण आणी लोकभावना एक गहन मजेशीर विषय आहे. इथे उगा पोराच्या धाग्यावर बापाचा धिंगाणा नको ? कसे ? संपादकांनी यथाशक्ती यथामती हा सबथ्रेड अद्रुश्य केला तर मुख्य विषयावर चर्चेला जास्त स्पेस मिळेल अशी याचना आहे.

संदीप डांगे's picture

23 Jul 2015 - 4:49 pm | संदीप डांगे

काढा की तुम्हीच धागा... इतर जाणकारही लिहितीलच.

द-बाहुबली's picture

23 Jul 2015 - 5:03 pm | द-बाहुबली

सध्या फक्त इतर जाणकारांनी इथेच चर्चा-प्रतिवाद थांबवायचे मनावर घेतले तरी उत्तम आहे.

कर्णाबद्दलचा हळवा कोपरा हा प्रत्येकाचा वेगवेगळ्या कारणांमुळे असू शकतो. कर्ण, एकलव्य, माधवी इत्यादी सर्वच पात्रांबद्दल मला जास्त सहानुभूती वाटते कारण ह्या महाकाव्यांकडे मी तत्कालीन आर्थिक-सामाजिक परिस्थितीचा सर्वसाधारण आरसा म्हणून पाहतो. आजही त्यातील शोषणात, अन्यायात फरक पडलेला नाही याचे वैषम्य आहे.

बॅटमॅन's picture

24 Jul 2015 - 11:45 am | बॅटमॅन

अता ही माधवी कोण?

तुषार काळभोर's picture

24 Jul 2015 - 1:45 pm | तुषार काळभोर

विश्वामित्रांना ८०० "शुभ्र घोडे विथ १ काळा कान" हवे होते. त्यांनी त्यांच्या एका शिष्याला ते शोधून आणायला पाठवले. खूप शोधूनही न सापडल्यावर तो ययातिकडे गेला. ययातिकडेसुद्धा असे घोडे नव्हते. मग ययातिने त्याला आपली मुलगी माधवी दिली व सांगितले की हिला कोणाकडे तरी देऊन बदल्यात घोडे घे. तो ३ राजांकडे तिला घेऊन जातो. प्रत्येक जण तिला काही काळासाठी ठेऊन घेतो व तिच्यापासून एक मुलगा झाल्यावर तिच्यासहित २०० घोडे त्या शिष्याला परत देतो. आता शिष्याकडे ६०० घोडे आहेत. त्याला आणखी २०० घोडे नाही मिळत. मग तो ६०० घोडे व माधवी विश्वामित्रांना देतो. विश्वामित्र तिला ठेवून घेतात आणि त्यांनाही तिच्यापासून एक मुलगा होतो. त्यानंतर ते माधवीला तिच्या वडीलांकडे पाठवून देतात.
त्यानंतर ययाति माधवीचे स्वयंवर आयोजित करतो ज्यात अनेक वर हजेरी लावतात. पण संसारातून (किंवा पुरुषांतून) मन उठलेली माधवी वनात जाते व उर्वरित आयुष्य ब्रह्मचर्यात व्यतित करते.

टवाळ कार्टा's picture

24 Jul 2015 - 1:50 pm | टवाळ कार्टा

#$%#%^&&%#&*^#$%^&*#$%^*(

अद्द्या's picture

24 Jul 2015 - 3:19 pm | अद्द्या

हे इतकं तप आणि ज्ञानार्जन करून " ऋषी " झालेले लोक पण असा पांचटपणा का करायचे ?

अस्वस्थामा's picture

24 Jul 2015 - 3:27 pm | अस्वस्थामा

कदाचित तेच तर "ज्ञान" त्यांना प्राप्त झालंय म्हणून ते संसारातून मुक्त होत असतील आणि आपल्यासारखे सामान्य लोक "संसारी" म्हणून रहात असतील.. ;)

बॅटमॅन's picture

24 Jul 2015 - 5:04 pm | बॅटमॅन

च्यायला. हे आणि काय नवीनच. पूर्ण नवीन माहिती, अनेक धन्यवाद!

पैसा's picture

24 Jul 2015 - 5:14 pm | पैसा

वाचली आहे ही कथा.

इरसाल's picture

24 Jul 2015 - 5:48 pm | इरसाल

हे काय नवीन ?
हेचा अर्थ ह्योच की आम्ही वाचेल महाभारत हे महाभारत नाय !

मृत्युन्जय's picture

24 Jul 2015 - 6:26 pm | मृत्युन्जय

माधवीची कथा उद्योग पर्वात येते. पुर्ण कथा फारच चीड आणणारी आहे तद्वतच स्त्रीच्या तत्कालीन समाजातल्या अवस्थेबद्दल अप्रत्यक्षरीत्या फार सूचक भाष्य करते. महाभारत म्हणजे अश्या शेकडो कथांची गुंफण आहे. वेळोवेळी वेगवेगळी पात्रे काही मेसेज देण्यासाठी अथवा आपला मुद्दा पटवण्यासाठी वेगवेगळ्या कथांची साक्ष काढते. माधवीची कथा त्यातलीच एक. इतके खोलात जाउन महाभारत कुणीच वाचत नाही. आणि तसे बघता ही कथा मूळ महाभारत कथेचा भाग नाही तर त्या अनुषंगाने पात्रांमध्ये झालेल्या संवादात उद्धृत केलेली कथा आहे,

बर्‍याच लोकांना हे ही माहिती नसेल की रामायणाची कथा महाभारतातदेखील येते. मार्कंडेय ऋषी ही कथा युधिष्टिराला ऐकवतात. गंमत म्हणजे जी कथा आपण ऐकतो आणि जी कथा मार्कंडेय ऋषी सांगतात त्यात २-३ नजरेत येणासारखे फरक आहेत.

माधवीच्या कथेसाठी एक वेगळा धागा पाडावा काय?

पैसा's picture

24 Jul 2015 - 6:34 pm | पैसा

जरूर!

रामाची संक्षिप्त पुन्हा एकदा द्रोणपर्वात अभिमन्यूवधानंतरच्या षोडशराजकीय आख्यानात येते. अभिमन्यू वधाचे दु:ख विसरण्यासाठी नारद पूर्वी मृत्यु पावलेल्या १६ महान राजांचा परिचय युधिष्ठिराला करून देतात.

तुषार काळभोर's picture

25 Jul 2015 - 8:21 am | तुषार काळभोर

नेकी और पुछ-पुछ?

छान वाचनिय लेख.कर्णाच्या मुलांबद्दल प्रथमच वाचले.

धन्यवाद, नीट सावकाश वाचतो.

gogglya's picture

22 Jul 2015 - 2:54 pm | gogglya

आणी माहीतीपुर्ण लेख.

नाखु's picture

22 Jul 2015 - 3:09 pm | नाखु

च्यानेल बों(लभां)ड्यां धाग्यात एक झुळूक !!!!!!!

दुरून्दर्शक नाखुस

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Jul 2015 - 3:17 pm | कैलासवासी सोन्याबापु

क्या बात है मृत्युंजय भाऊ!! आवडले!! तूफ़ान आवडले, कर्णाचा विलक्षण अन मृत्युंजय चा अतिविलक्षण प्रभाव असलेले आम्ही, न आवडते तर काय!!!

अद्द्या's picture

22 Jul 2015 - 4:46 pm | अद्द्या

आवडेश

पुढल्या भागाच्या प्रतीक्षेत

कविता१९७८'s picture

22 Jul 2015 - 6:10 pm | कविता१९७८

मस्त माहीतीपुर्ण लेख

उगा काहितरीच's picture

22 Jul 2015 - 6:25 pm | उगा काहितरीच

जब्राट ! लिखते रहो .

जयद्रथाला तसा वर मिळाला होता

रच्याकने याच्याबद्दल थोडी माहिती द्याल का ?

द-बाहुबली's picture

22 Jul 2015 - 6:28 pm | द-बाहुबली

भलतेच रोचक विवेचन.

मी-सौरभ's picture

22 Jul 2015 - 6:36 pm | मी-सौरभ

तुमच्या कीर्तीला साजेसे लेखन :)

और भी आंदो...

प्रचेतस's picture

22 Jul 2015 - 7:59 pm | प्रचेतस

लिहिता झालास. :)

बोका-ए-आझम's picture

22 Jul 2015 - 8:39 pm | बोका-ए-आझम

सर्वप्रथम, लेख आवडला. एकदम ओघवता लिहिलेला आहे. खूप पूर्वी मृत्युंजय वाचलंय त्यात सत्यसेन हे कर्णपत्नी वृषालीच्ता भावाचं नाव होतं असं काहीसं वाचल्याचं आठवतंय आणि कर्णाच्या मुलांपैकी एकाचं नाव वृषकेतूऐवजी वृषकेत वाचल्याचं आठवतंय. नक्की काय आहे?
शिवाय धृतराष्ट्राचा मुलगा विकर्ण होता माझ्या मते. कर्ण नावाचा कोणी मुलगा धृतराष्ट्राला होता असं वाटत नाही.
सुषेण हे फारच अमित, निखिल टाईप नाव होतं - हे भारीच.
रामायणात संजीवनी आणायला सांगणारा वैद्यही मला वाटतं कोणीतरी सुषेणच होता.

मृत्युन्जय's picture

22 Jul 2015 - 9:03 pm | मृत्युन्जय

सत्यसेन कर्णाच्या मुलाचेच नाव आहे. एके ठिकाणी हेच नाव सत्यसन्ध असे देखील लिहिले आहे.

वृषकेत आणि वृषकेतु आलटुन पालटुन वापरत असावेत बहुधा. ज्याला मूळ प्रत मानले गेले आहे त्या प्रतीत वृष्केतु चे नावच नाही. वृषकेतु फक्त जैमिनी भारतात आढळतो. हा वृषकेतु वेगळा आणि वृषसेन वेगळा. केवळ एका ठिकाणीच मला महाभारतात वृषसेनालाच वृषकेतु म्हटलेले आढळले.

धृतराष्ट्राच्या एका मुलाचे नाव विकर्ण होते. तो वेगळा. एका मुलाचे नाव कर्ण सुद्धा होते. हा तोच कर्ण ज्याने द्रोणाला गुरुदक्षिणा देताना केलेल्या युद्धात भाग घेतला होता. सगळ्या १०० कौरवांची नावे महाभारतात एका ठिकाणी २ वेळा आली आहेत. त्या पैकी एका ठिकाणी या कर्णाचे नाव २ वेळा आले आहे :)

योगी९००'s picture

22 Jul 2015 - 8:57 pm | योगी९००

लिखाण आवडले.. आता महाभारत खरे की खोटे ते माहित नाही पण हे लिखाण मात्र आवडले...!!

यावर एक छान सिरीयल होऊ शकेल..."सुर्याची लेकरे किंवा पिल्ले" म्हणून..!!

चुकलामाकला's picture

22 Jul 2015 - 9:42 pm | चुकलामाकला

वा! खूप छान लेख!

सुबोध खरे's picture

23 Jul 2015 - 10:27 am | सुबोध खरे

+१००

सविता००१'s picture

22 Jul 2015 - 10:02 pm | सविता००१

लेख वाचायला मिळाला

बोका-ए-आझम's picture

23 Jul 2015 - 10:12 am | बोका-ए-आझम

'मृत्युंजय' मध्ये कर्णाच्या या दोन्हीही पत्नींचा उल्लेख आहे. या मुलांमध्ये वृषसेन आणि वृषकेत किंवा केतू - हे वृषालीचे पुत्र असतील हे तर कळतंच. बाकीच्यांबद्दल काय माहिती आहे?

मृत्युन्जय's picture

23 Jul 2015 - 12:15 pm | मृत्युन्जय

कर्णाच्या वायकांबद्दलची माहिती शोधावी लागेल. माझ्या मते तरी काही संदर्भ मिळत नाही.

बाकी वृषाली शब्दाचा एक अर्थ "शूद्र स्त्री" असा आहे.

बोका-ए-आझम's picture

23 Jul 2015 - 10:35 pm | बोका-ए-आझम

मला कामधेनू असा सांगण्यात आला होता. हा जो तुम्ही अर्थ सांगितलात, त्याचा काय संदर्भ आहे?

मृत्युन्जय's picture

24 Jul 2015 - 10:41 am | मृत्युन्जय

महाभारताचे इंग्रजी भाषांतर किसारी मोहन गांगुली यांनी केले आहे. भाषांतर करताना त्यांनी अनेक ठिकाणी टिप्पण्या दिल्या आहेत. त्या खुपच इंटरेस्टिंग आहेत. एके ठिकाणी त्यांनी लिहिले आहे की कर्णाने "असुरी प्रतिज्ञा केली होती" आता असुरी प्रतिद्ना म्हणजे काय तर दारु न पिण्याची. तसेच त्यांनी एके ठिकाणी वॄषालीपती हा शब्द वापरला आहे (हा शब्द कर्णाच्या संदर्भात नाही). त्या शब्दाच्या अर्थ त्यांनी असा दिला आहे:

Vrishalipati literally means the husband of a Sudra woman. By actually marrying a woman of the lowest order, by marrying before the elder brother, by marrying a girl that has attained to puberty, and by
certain other acts, a Brahmana comes to be regarded as a Vrishalipati

ही संज्ञा आता नक्कीच कालबाह्य आणि अदखलपात्र आहे. आता १८ च्या आत मुलींची लग्ने होतच नाहित आणि जातीपातीच्या भिंती सुद्धा ढासळत चालल्या आहेत. पण त्या काळात जेव्हा महाभारत घडले असेल किंवा जेव्हा ते लिहिले गेले तेव्हा वृषालीपती या शब्दाचा अर्था हा असा होता. Vrishalipati = the husband of a Sudra woman आणि पति = Husband हे लक्षात घेता वृषाली = शूद्र स्त्री अशी फोड मी केली. चूभूद्याघ्या.

बॅटमॅन's picture

24 Jul 2015 - 11:49 am | बॅटमॅन

किसारी मोहन गांगुली यांनी ज्या प्रतीच्या आधारे भाषांतर केलेय ती प्रत म्हणजे महाभारतावरचा फेमस टीकाकार नीलकण्ठ चतुर्धर याने वापरलेली होय. नीलकण्ठी टीकेचाही त्यांनी कैक ठिकाणी आधार घेतलाय असे वाचले आहे.

हा नीलकण्ठ चतुर्धर एक मराठी माणूस होता, शिवकालीन होता. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे राहणारा. आईचे नाव फुल्लाम्बिका (हे अर्थात संस्कृतीकरण असावे असे आपले माझे मत), वडिलांचे नाव विसरलो. १६५० नंतर काशीस स्थायिक झाला, तिथेच त्याने ती समग्र महाभारतावरची अवाढव्य टीका लिहिली, जवळपास साडेपाच हजार पानी आहे. त्याची पीडीएफच साडेचारशे एमबी आहे.

लिंक इथे बघा.

https://archive.org/details/mahabharata_nk

इतके अवाढव्य काम एका मराठी माणसाने एकहाती केलेय ही गोष्ट अतिशय भूषणावह आहे.

पैसा's picture

24 Jul 2015 - 12:04 pm | पैसा

फुल्लाम्बिका हे नाव तेव्हा असू शकेल. आत्ता माझ्या ओळखीची एक शारदाम्बा बँकेत मॅनेजर आहे. मात्र ती हुबळीकडची आहे.

बॅटमॅन's picture

24 Jul 2015 - 12:07 pm | बॅटमॅन

कदाचित, पण प्रदेश बघा. अहमदनगर साईडला ब्राह्मणांत म्हटले तरी अशी नावे प्रचलित असण्याची शक्यता कमीच वाटते. त्यात परत संस्कृत ग्रंथ लिहिताना नावांचे संस्कृतीकरण करणे हे सर्रास चालायचे, उदा. शिवभारतकार परमानंद हे मालुसरे = मल्लसूरी, घाटगे = घंटक, इ. शब्दयोजना करतात. त्यामुळे तसे वाटले इतकेच.

अर्थात नीलकण्ठाची आई बाय एनी चान्स कर्नाटकाकडची असेल तर तसे असूही शकेल म्हणा.

प्रचेतस's picture

24 Jul 2015 - 12:06 pm | प्रचेतस

हेच म्हणतो.

बाकी नीळकंठाची प्रत सुद्धा महाभारतातील भर इ.स. १५/१६ व्या शतकापर्यंत नेते. नीळकंठाने महाभारताच्या उत्तरी आणि दक्षिणी प्रतींचा जबरदस्त अभ्यास करुन प्रचंड संकलन केलेय.

नीळकंठीप्रती पेक्षाही अधिक संशोधित प्रत म्हणजे भांडारकर संशोधीत आवृत्ती. भांडारकरप्रतीत महाभारतातील जे काही आहे ते सर्व इ.स. १० व्या शतकाच्या आधीचेच आहे असे नि:संशयपणे म्हणता येते.

बॅटमॅन's picture

24 Jul 2015 - 12:14 pm | बॅटमॅन

भांडारकर प्रतीबद्दल असे म्हणतात की महाभारतातले अनेक गाजलेले श्लोक तिच्यात नाहीचेत. मज्जाच आहे एकूण. हे जरा पाहिले पाहिजे.

भांडारकर प्रतीत वगळलेला बहुधा सर्वात ठळक उल्लेख म्हणजे द्रौपदी वस्त्रहरणप्रसंगीचा कृष्णाचा धावा आणि कृष्णाने वस्त्रे पुरवून केलेली सोडवणूक.

त्यांच्या संशोधनाप्रमाणे कृष्णाचा धावा ही १० व्या शतकानंतरची भर आहे असे मानता येते.

बॅटमॅन's picture

24 Jul 2015 - 12:51 pm | बॅटमॅन

हाण तेजायला.

बाकी नीलकण्ठाबद्दलचे डीटेल्ड विवेचन इथे वाचता येईल. अगदी तपशीलवार पूर्ण विवेचन आहे.

https://books.google.co.in/books?hl=en&lr=&id=qcq22n9NT7sC&pg=RA1-PA225&...

इथे पान क्र. २२५ ते २५३ पर्यंत लेख आहे.

ओझरतं पाहिलं. जबराटच दिसतंय. डिट्टेलवार वाचतो रात्री.

मृत्युन्जय's picture

24 Jul 2015 - 1:18 pm | मृत्युन्जय

बाबारे तु प्रचंड अभ्यस केलेला दिसतोस या सगळ्याच गोष्टींचा. विंटरेंस्टिंगा अहे तो लेख देखील. पुर्ण वाचला नाही अजुन. वाचेन.

बॅटमॅन's picture

24 Jul 2015 - 1:53 pm | बॅटमॅन

नै बा. तुमच्यासारखे पूर्ण महाभारत वगैरे नै कधीच वाचले. फक्त नीलकंठ या विषयात जरा इंट्रेस असल्याने शोधाशोध केली होती इतकेच.

सतीश कुडतरकर's picture

24 Jul 2015 - 4:11 pm | सतीश कुडतरकर

आता तुम्ही हा नवीन (अथात जुनंच) किडा सोडून दिलात. च्यामारी असला माणूस इथे होऊन गेला आणि त्याचा कुठेच कधी कोणाकडून उल्लेख झाला नाही. भारी दिसतंय. वाचतो. ___/\___

सतीश कुडतरकर's picture

24 Jul 2015 - 4:19 pm | सतीश कुडतरकर

संस्कृत आहे :-(

बॅटमॅन's picture

24 Jul 2015 - 5:07 pm | बॅटमॅन

अहो असूद्यात संस्कृत. मूळ टीकाच वाचायची असे कोण म्हटलेय? अन वाचू म्हटले तरी जन्म पुरणार नै....वेल पुरेल, पण लै दिवस लागतील अन तुफान बोअरही व्हाल. त्यापेक्षा नीलकंठाबद्दल जे लिहिलेय तेवढे वाचा फक्त- पुलं म्हणतात तसे पेढा करण्याच्या कसबापेक्षा हलवायाची मैतरकी अधिक गोडीची. अनेक लोकांनी डोक्याचा भुगा पाडून बरेच काही लिहिले आहे, आपण किमान त्यांच्याबद्दलचे लिखाण तरी नक्कीच वाचू शकतो नै का?

पैसा's picture

24 Jul 2015 - 6:02 pm | पैसा

मुळात तो जय नावाचा इतिहास असेल तर त्यातले सर्व चमत्कार हे प्रक्षिप्तच असतील ना?

प्रचेतस's picture

24 Jul 2015 - 6:41 pm | प्रचेतस

अगदी असंच काही सांगता येत नाही.
इतिहासलेखनातही अतिशयोक्ती असतेच. अगदी व्यासांनी लिहिलेल्या मूळ कथानकातही काही चमत्कार निश्चितपणे असतील. पण सर्वसाधारणपणे कृष्णाला जे विष्णूअवताराचे स्वरूप दिलेय हे व्यासांनी नव्हे तर इतर प्रक्षिप्तकारांनी.

ह्याच न्यायाने श्रीभगवान उवाच असे सुरुवातीपासून उल्लेख असलेली भगवदगीता सम्पूर्ण प्रक्षिप्त ठरते.

पैसा's picture

24 Jul 2015 - 6:48 pm | पैसा

दोन्ही सैन्ये समोरासमोर उभी असताना कृष्ण १८ अध्याय सांगू शकेल का? मग त्याने इतरांना योगनिद्रेत नेले वगैरे स्पष्टीकरण द्यावे लागेल. १८ श्लोक सांगणेही खरे तर कठीण दिसते.

मृत्युन्जय's picture

24 Jul 2015 - 6:54 pm | मृत्युन्जय

गीतेचा भाग प्रक्षिप्तच असावा. मात्र ७०० श्लोक घडाघडा पाठ बोलुन दाखवायला वेळ तो असा कितीक लागणार? होउ शकेल की तासा दोन तासात. तितका वेळ इतर लोक स्वस्थ कसे बसले हा प्रश्न मात्र आहे.

प्रचेतस's picture

24 Jul 2015 - 7:10 pm | प्रचेतस

गीता नक्कीच संपूर्णपणे प्रक्षिप्त आहे.
भगवद्गीता उपपर्वाच्या आधी युद्ध सुरु होण्यापूर्वी धर्मार्जुनांचा संवाद आहे. हयात धर्माला विषाद होऊन त्यास अर्जुन युद्ध करण्यासाठी उद्युक्त करतो. लगेचच पुढच्याच २/३ अध्यायात अर्जुनालाच विषाद कसा उत्पन्न होईल?

अजून एक ग्रांथिक पुरावा म्हणजे धृतराष्ट्र गीतेच्या आदल्या अध्यायात युद्ध कसे सुरु झाए ते विचारतो आणि लगेचच पुढच्या गीतेमधील अध्यायात परत धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे करत पुनरुक्ती करतो.

भगवदगीता पूर्ण म्हणायला दीड दोन तास पुरेसे आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ऐन धुमश्चक्रीमध्ये दोस्त राष्ट्रांनी बैठका घेतल्या होत्या त्यामुळे असा युद्धभूमीवर शांत राहता येतं का वगैरे गौण ठरावं. (युद्धाचा format बदलला वगैरे मान्य केलं तरी मध्ये रथ नेऊन ठेव सांगणारा आणि त्याचं ऐकून तसं करणारा दोघेही महापराक्रमी असल्यानं अगदीच टिवल्याबावल्या करायला आले नसतील ही खात्री सगळ्यांना असणार ;)
बाकी आपलाच राजा (कृष्ण) विरुद्ध बाजूनं शांत बसून का होईना युद्धात सहभागी होतो म्हटल्यावर यादवसेनेने किती जोरकस आणि मन लावून युद्ध केलं असेल असा मनात प्रश्न निर्माण झाला आहे. की ही देखील कृष्णानीती च होती?

प्रचेतस's picture

26 Jul 2015 - 5:47 am | प्रचेतस

कृष्ण राजा नव्हता. वसुदेव होता.

यादवांमधेही अंधक, भोज विरुद्ध वृष्णी, शिनी अशी गटबाजी पहिल्यापासून होती.

कृष्ण राजा नव्हता हे तांत्रिक दृष्टया बरोबर आहे.
वसुदेव मनमोहनसिंगांची प्राचीन आवृत्ती आहे. ;)

मृत्युंजय चं शतकी धाग्यासाठी हार्दिक अभिनन्दन!

कौरवांशी मैत्री म्हणजे 'शतका'ची खात्री असा काही प्रवाद 'तेव्हाच्या' मिपा मध्ये होता का? (शंभर कौरवांचा एक एक प्रतिसाद मिळून )

मृत्युन्जय's picture

24 Jul 2015 - 6:51 pm | मृत्युन्जय

महाभारतात बर्‍याच ठिकाणी कृष्ण आणि अर्जुनाचा उल्लेख नारायण आणि नर म्हणुन येतो. नर आणि नारायण दोन्ही विष्णुची रुपेच.

मात्र काही ठिकाणी कॄष्ण विष्णुचाच अवतार असल्याचे उल्लेख सोकॉळ्ड वरिजिनल महाभारतात देखील आहेतच की

प्रचेतस's picture

24 Jul 2015 - 6:57 pm | प्रचेतस

नक्कीच आहेत.
फार कशाला अगदी भांडारकरप्रतीत देखील आहेतच. पण भांडारकर प्रत फ़क्त १० शतकापूर्वीच्या महाभारतापर्यंत आपणास नेते. विष्णूचे उल्लेख साधारण इ.स. पूर्व तिसऱ्या शतकापर्यंत खेचले जाऊ शकतात. तर शुद्ध मानवी स्वरुप बुद्धपूर्व काळातील मानावे लागते.

मृत्युन्जय's picture

24 Jul 2015 - 12:07 pm | मृत्युन्जय

ही नविनच माहिती आहे. धन्यवाद.

प्रीत-मोहर's picture

23 Jul 2015 - 10:28 am | प्रीत-मोहर

मस्तच लिखाण . आवडले

स्वाती दिनेश's picture

23 Jul 2015 - 12:11 pm | स्वाती दिनेश

छान लेख..
सावकाशीने परत एकदा वाचायला वा खू साठवते आहे.
स्वाती

इशा१२३'s picture

23 Jul 2015 - 12:52 pm | इशा१२३

महाभारत अत्यंत गहन.(खरे खोटे हा वेगळा मुद्दा)तरिहि आवडिचे.कर्ण आणि कृष्ण हे तर आवडिचे पात्र.कर्ण आणि त्याच्या मुलांची खूप कमी माहिती मिळते वाचायला.(त्यातल्या त्याय मृत्युंजयमधेच जास्त)बाकी वृषसेनाचा उल्लेख काहि ठिकाणी वाचलाय.इतर मुल दुर्लक्षितच.
त्यामुळे या विषयावर लिहिलेला लेख आवडलाच.

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

23 Jul 2015 - 11:07 pm | अरवीन्द नरहर जोशि.

अत्यंत उत्तम व रोचक विषय असून फारच चांगले लिहिले आहे .

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Jul 2015 - 6:58 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

खुप छान लेख. फार पुर्वीपासुनच कर्णाच्या बाबतीमधे हळवा कोपरा आणि सहानुभुती आहे. वास्तविक पाहता हा जेष्ठ पांडव कुंतीच्या चुकीमुळे (चुक म्हणवी का विधी का विधान ह्याबद्दल अंमळ गोंधळामधे असल्यानी सद्ध्या चुक असचं म्हणतो) आयुष्यभर स्वकियांकडुनचं हिणावला गेला. ज्याने हस्तिनापुरावर राज्य करावे त्याला दुर्योधनाने दिलेल्या राज्यावर समाधान मानावे लागले. एक जन्माने आणि कर्माने क्षत्रिय असुनही द्रौपदीकडुन सुतपुत्र म्हणुन हिणवले गेले (ह्या बैका ना अश्याच पुर्वीपासुन ;) ). जर का कवचकुंडलांची कथा खरी असेल तर इंद्राने कपटाने त्याच्याकडुन ती काढुन घेउन अधर्मचं केला. जर का कपटाने ती कवचकुंडलं काढुन घेतली नसती तर पांडवांचा त्याच्यासमोर टिकाव लागला असता काय? असे अनेक खटकणारे मुद्दे आहेत.

एक खुप सुंदर लेख लिहिल्याबद्दल मृत्युंजयांचे आभार :)

जुइ's picture

24 Jul 2015 - 7:13 am | जुइ

महाभारतातील वेगळ्या पात्रावरील माहिती नविनच कळाली.

मृत्युन्जय's picture

24 Jul 2015 - 10:43 am | मृत्युन्जय

सर्व वाचक आणि प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार. धाग्याचे काश्मीर न केल्याबद्दल सूज्ञ वाचकांचे डब्बल आभार :)

प्रसाद१९७१'s picture

24 Jul 2015 - 10:51 am | प्रसाद१९७१

महाभारताचा खरा हिरो भीम आहे. पण काय कारण असावे की तो दुर्लक्षीत केला गेला आहे?
भीमानी द्रॉपदीची कधीही साथ सोडली नाही. अज्ञातवासात असताना द्रौपदीला वाचवायला भीमच उभा राहीला.
धर्माच्या द्युतात द्रौपदीला बेट म्हणुन लावण्याला भीमानेच फक्त विरोध केला, बाकी अर्जुन वगैरे मुग गिळुन बसले होते.
द्युतात युधिष्टीर हरल्यावर दुर्योधना ने द्रॉपदीला त्याच्या मांडीवर बसायला सांगीतल्यावर द्रौपदीने पांडवांची निर्भत्सना केल्यावर भीमानेच प्रतिज्ञा केली दुर्योधनाला मारण्याची. तेंव्हा युद्ध होणार हे माहीतीपण नव्हते.

द्रौपदीला कदाचित हे सर्व नंतर जाणवल्यामुळे, ती मरताना भीमाला तिने पुढ्च्या जन्मी "थोरला हो" असे सांगीतले.

मृत्युन्जय's picture

24 Jul 2015 - 11:21 am | मृत्युन्जय

द्रौपदीला कदाचित हे सर्व नंतर जाणवल्यामुळे, ती मरताना भीमाला तिने पुढ्च्या जन्मी "थोरला हो" असे सांगीतले

हे रोचक आहे. पण महाभारतात असे कुठे लिहिलेले मला आढळले नाही. मरताना द्रौपदी काहिच म्हणाली नाही. ती फक्त मेली. संपुर्ण स्वर्गारोहण पर्वाला तसा फारसा अर्थ नाही. ते नंतर घुसडले आहे असे तज्ञांचे मत आहे. तरीही "थोरला हो" असे ती कुठेही भीमाला म्हणताना दिसत नाही. तिला म्हणायचेच झाल्यास ती कदाचित त्याला "अर्जुन हो" असे म्हणाली असती.

असो. भीम शूर आणी बलवान असला तरी तो महाभारताचा होरो त्याच कारणाने होउ शकत नाही ज्या कारणाने दुर्योधन होउ शकत नाही. तो क्रोधिष्ट, संतापी आणि अविचारी होता. अर्जुनातल्या नम्रतेचा त्याच्यात अभाव होता आणि कृष्ण, दुर्योधन आणि युधोष्टिर यांच्यातील मुत्सद्देगिरीचाही त्याच्यात अभाव होता. सर्वांचे सर्व गुण अंगी असलेला कृष्ण म्हणुनच महाभारताचा हिरो आहे. तो नम्र, सज्जन, दयाळु, शूर, धैर्यशील आणि बलवान तर होताच पण त्याशिवाय उत्तम मुत्सद्दी, राजकारणी आणी विद्वान देखील होता. महाभारतात राजा एकच कृष्ण. बाकी सगळी केवळ प्यादीच.

प्यारे१'s picture

24 Jul 2015 - 12:19 pm | प्यारे१

>>>>सर्वांचे सर्व गुण अंगी असलेला कृष्ण म्हणुनच महाभारताचा हिक्यूरो आहे. तो नम्र, सज्जन, दयाळु, शूर, धैर्यशील आणि बलवान तर होताच पण त्याशिवाय उत्तम मुत्सद्दी, राजकारणी आणी विद्वान देखील होता. महाभारतात राजा एकच कृष्ण. बाकी सगळी केवळ प्यादीच.

एक नंबर!
(तुझं आवडतं नाव घेतोस की काय असं उगाच वाटलं. ;) )

प्रसाद१९७१'s picture

24 Jul 2015 - 11:33 am | प्रसाद१९७१

हे रोचक आहे. पण महाभारतात असे कुठे लिहिलेले मला आढळले नाही. मरताना द्रौपदी काहिच म्हणाली नाही. ती फक्त मेली. संपुर्ण स्वर्गारोहण पर्वाला तसा फारसा अर्थ नाही. ते नंतर घुसडले आहे असे तज्ञांचे मत आहे. तरीही "थोरला हो" असे ती कुठेही भीमाला म्हणताना दिसत नाही.

हे मी ऐकलेले आहे, महाभारतात कुठे आहे वगैरे माहीती नाही. तज्ञ सांगु शकतील. "थोरला हो" म्हणण्या मागे कारण असे होते की युधीष्टीर थोरला असल्यामुळे त्याचे विचार कोणाला पटले नाहीत तरी ते ऐकायला लागायचे. द्युताच्या वेळी जर भीम थोरला असता तर तो युधीष्टीराला ओव्हरराईड करु शकला असता. वस्त्रहरणाचे शल्य द्रौपदीला कायमच जाचत असणार म्हणुन थोरला हो असे म्हणले असावे.

तो क्रोधिष्ट, संतापी आणि अविचारी होता

ह्याची काय उदाहरणे?

कृष्ण, दुर्योधन आणि युधोष्टिर यांच्यातील मुत्सद्देगिरीचाही त्याच्यात अभाव होता

युधीष्टीराची कुठली मुत्सद्देगीरी?

मृत्युन्जय's picture

24 Jul 2015 - 11:45 am | मृत्युन्जय

भीमाच्या अविचारी संतापाची अनेक उदाहरणे सांगता येतील. भर सभेत, द्युत हारलेले असताना आणि स्वतः दास झालेले असताना (कुरुसभेतील सर्व ज्येष्ठांनी त्यांचे दास्यत्व मान्य केले होते) दुर्योधनाला धमकी देणे हा अविचार होता. पांडव कौरवांमध्ये अतीव द्वेषाची पहिली ठिणगी देखील भीमाच्या दांडगाईने पडली. युद्धात आपल्या शत्रुचे रक्त पीणे हा देखील आततायीपणा होता. हतबल झालेल्या दारुण अवस्थेतील आपल्या अंध काकाला जाणुनबुजुन सर्वांसमोर त्याच्या मुलाला कसे मारले हे सांगुन हिणवण्याच्या प्रकार भावनाहीन आणि विवेकशून्य होता. भीमाला राग प्रत्येक प्रसंगी इतरापेक्षा लवकर आणि अधिक यायचा आणि अनावर व्हायचा. त्याचे ते धसमुसळे वागणे कदाचित द्रौपदीला आवडत असावे पण एक राजा किंवा राजकुमार म्हणुन ते अनुचित आणु अयोग्य होते म्हणुनच भीम महाभारताचा हिरू होता होता राहिला.