मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वादळ (शतशब्दकथा)

रातराणी · · जनातलं, मनातलं
एक एक काडी आणून चिमणा चिमणी घरटं बांधत होते. त्यांच्या लगबगीचं हिला फार अप्रूप. "अरे ही काडी इथे लावायची होती ना ?" "आधी नाही का सांगायच?" "आता सांगितल ना?" त्यांच्या चिवचिवाटाला तिचे शब्द. काल रात्री पावसानं धुमाकूळ घातला. तिनं खिडकीतून पाहिलं तर घरटं चिखलात पडलं होतं. एक एक काडी वेगळी झाली होती. सकाळी स्वच्छ ऊन पडलं होतं. झाडाखाली अस्ताव्यस्त घरट्याभोवती चिमणी चिवचिवाट करत होती. तो तिच्या मागे फिरत होता. काही दिवस सगळच विस्कळीत. एक दिवस अंगणात गजबज जाणवली. पुन्हा एकदा चिमणा चिमणीला काड्या आणून देत होता. कितीतरी वेळ तिनी दोघांची लगबग पाहिली. भानावर आल्यावर त्याला फोन केला. "मला परत यायचंय, आपल्या घरी."

वाचने 6581 वाचनखूण प्रतिक्रिया 29

मनीषा Sat, 09/05/2015 - 19:51
चांगलीय कथा .. तिने फोन केला .. इथपर्यंत अर्धा भाग झाला. त्यावर त्याने काय आणि कसे उत्तर दिले .. यावर पुढचा भाग लिहा की

रातराणी गुरुवार, 09/10/2015 - 09:31
सर्वांचे खूप आभार. :) सध्या हापिसात लयीच धूनी धूवायला लागत असल्यामुळे उत्तरार्ध लिहणे जमेल की नाही शंका आहे. :) आपल्यापैकी कुणी ही कथा पूर्ण केलीत तर माझी काहीच हरकत नाही. उलट आवडेल दुसऱ्या कुणाच्या द्रुष्टीकोनातून लिहलेला उत्तरार्ध वाचायला.:)