मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नथ.............भाग-८-शेवटचा

जयंत कुलकर्णी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ.......भाग-२ नथ.........भाग-३ नथ........भाग-४ नथ........भाग-५ नथ........भाग-६ नथ.........भाग-७ नथ..........भाग-८ नशिबाने वलिखान व खैरुनबेगमने मला मुलगी मानले असल्यामुळे मुल्ला मौलवींचे त्यांच्या पुढे काही चालले नाही व पुढचा प्रसंग टळला. उलट त्यांनी माझी व माझ्या मुलांची सोय त्यांच्याच हवेलीत केली व संपत्तीचा अर्धा वाटाही आम्हाला दिला. जे काही आयुष्य उरले होते ते तेवढ्या संपत्तीत आम्ही सुखाने राहू शकत होतो. वलिखानने माझ्या मुलांचा ताबा घेतला व त्यांचे शिक्षण अफगाणी परंपरेने चालू झाले. मी त्यांना माझ्याच घरी राहण्याची जबरदस्तीच केली ज्यामुळे त्यांना थोडीफार मराठा व ब्राह्मण संस्कृतीचीही ओळख झाली.... पाच सहा वर्षानंतर अहमदशाबाबाने परत एकदा हिंदूस्थानावर स्वारी केली. ही त्याची हिंदूस्थानवर शेवटची स्वारी होती. यावेळी त्याने कुर्दी सरदारांचे सैन्य उभे केले होते. या मोहिमेचाही विचकाच उडाला. (कार्लेकर : हे साल बहुदा १७६९ होते) अहमदशाबाबाची तब्येतही वेगाने ढासळत होती. त्याने त्याच्या राजपूत्राला तैमूरला त्याचा वारस नेमल्यावर सुलेमानच्या बाजूच्या सरदारांनी त्यांचा राग प्रकट केला. वलिखान सुलेमानच्या बाजूने ठामपणे उभा राहिला. शहा अजूनही खुदादादला विसरला नव्हता. वलिखानकडे तो माझी व माझ्या मुलांची चौकशी करत असे. शेवटी वलिखान मुलांना दरबारात घेऊन गेला. तीन वर्षांने अहमदशाचे नाक झडू लागले. बहुदा त्याला महारोग झाला होता. त्याचे नाक कापून त्याजागी चांदीचे नाक बसविले गेले. त्याच वर्षी अहमदशाचे बोलणे समजेनासे झाले व त्याच आजारात त्याचा मृत्यु झाला. अफगाणीलोकांचा आधार गेला. ज्याने या देशाला अकार दिला त्याच्या मृत्यु झाल्यावर अफगाणीस्थानवर शोककळा पसरली. नंतर जे राजकारण व लढाया होणार होत्या त्या टाळण्यासाठी वलिखान मुलांना घेऊन डोंगरात निघून गेला व त्या भल्या मोठ्या हवेलीत मी एकटी राहिले. अर्थात वलिखानने माझ्या संरक्षणाची पूर्ण व्यवस्था केली होती. त्यानंतर माझी व वलिखान व खैरुनबेगमची गाठ पडली नाही. माझी मुलेही त्यांच्याबरोबर गायब झाली. कोणी म्हणतात ते तुर्कस्थानला गेले कोणी म्हणतात ते इराकमधे गेले. शेवटी मी एकटी पडले. मी कोण होते हे अफगाणीस्थानमधे सगळ्यांना माहीत असल्यामुळे मला भुरटे चोर सोडल्यास विशेष त्रास झाला नाही. अहमदशहा अब्दाल्लीचे दफन झाल्यावर वातावरणातील ताण जरा कमी झाल्यावर मी अफगाणीस्तान बघण्याचे ठरविले व प्रथम बामियानसाठी प्रस्थान सोडले...... कार्लेकर : पुढे बाईंच्या सफरीचे वर्णन आहे. ते तुम्ही नंतरही वाचू शकता.) आर्य : काका पण या बाई वेळासच्या कुठल्या घराण्याच्या होत्या त्याचा काही पत्ता लागलाच नाही. श्री. कार्लेकर : पुढे वाचल्यावर ते तुम्हाला कळेल. पण बामियानच्या सफरीवर असताना बाईंनी, बुद्धाच्या मूर्तींबरोबर अजूनही काही चित्रे रेखाटली आहेत. त्या चित्रात समुद्र दिसतो त्यामुळे ती वेळासची असावीत असे मला वाटते. ही बघा आणि सांगा ही जागा कुठली आहे ! ती चित्रे पाहिल्या पाहिल्या सगळ्यांच्या तोंडून बाहेर पडले, ‘‘ब्राह्मण खाई’’ ! आणि ते दिसते ते घर श्रीधरभटाचे आहे. ब्राह्मणखाईत फक्त त्यांचीच वाडी आहे. ते ऐकल्यावर सगळेजण मागे बसलेल्या यमूकडे पहायला लागले. ती बिचारी बुजून उठली आणि उठून आत पळाली. ’’चला आता उशीर झाला. उद्या आपण समाध्या व वृंदावने पहायला जाऊ. तेथेच बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल.’’ आर्य म्हणाला. यमू श्रीधर भानू.... आता हे काय लचांड आमच्यामागे लागले ? याने आमची बदनामी होईल का ? आता ते मुसलमान येथे पोहोचल्यावर वेळास काय म्हणेल ? कुठे राहतील ते ? मी व बाबा पहाटे उठलो व इंदीराकाकूंकडे गेलो. तेथे कार्लेकरकाकाही भेटले. मी माझ्या सर्व शंका त्यांना व आर्यला विचारल्या. ‘‘यमे तू काळजी करु नकोस. इस्माईल व वलिखान ही उमदी व सभ्य माणसे आहेत व हे त्यांच्या आईजानचे गाव आहे याचे भान त्यांना निश्चितच असणार्. तू बघशील ते या मातीशी किती नम्रपणे वागतील ते’’ आर्य म्हणाला. मी, बाबा, आर्य, कार्लेकरकाका, इंदिराकाकू, मानसीताई व इतर जण नदीकिनारी समाध्यांपाशी गेलो. आमच्या घरातील जी समाधी होती त्यावरील नाव कार्लेकर काकांनी मोठ्याने वाचले ‘’सिताबाई ’’. ‘‘चला वलिखानचे स्वप्न पूर्ण झाले म्हणायचे’’ आर्य म्हणाला. ‘‘सिते, राणीचे आयुष्य जगलीस ग ! नाहीतर इथे काय करणार होतीस शिंचे’’ इंदिराकाकू पुटपुटल्या.. पुढच्या आठवड्यात आर्य इस्माईल व वलिखानला वेळासला घेऊन आला. त्या सतीच्या वृंदावनासमोर आम्ही डोके ठेवल्यावर त्यांनीही डोके ठेवले. बराच वेळ झाला ते दोघेही उठले नाहीत. उठले तेव्हा त्या धिप्पाड पठाणांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. त्यांनी आम्हाला विनंती केली की समुद्राकाठी असलेल्या घरात त्यांची राहण्याची सोय करता येईल का ? आईजान तेथेच रहात होत्या ना? आम्हाला उरलेले दिवस तेथेच रहायचे आहे. त्यांना अर्थातच नाही म्हणणे अशक्यच होते. रात्री त्या घरात गप्पांचा मोठा फड जमला त्यात बरेच गावातील प्रतिष्ठित माणसे हजर होती. ती गेल्यावर आमच्या घरातील माणसांची मैफील जमली.... तेवढ्यात वलिखान उठला व आत गेला. बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात एक चांदीची डबी होती. त्यातून एक सुंदर नथ काढून त्याने माझ्या हातात दिली. ‘‘आईजानची वस्तू तिच्याच घरी जाते आहे याचे मला समाधान आहे.’’.........अणि ते दोघे एकदम ढसाढसा रडायलाच लागले................... उपोद्घात : इस्माईल तालीबानच्या हल्ल्यात ठार झाला व एक अघटित घडले - त्याचा शोक वेळासमधे पाळला गेला. यमू अमेरिकेत उच्च शिक्षण घेते आहे. तिच्या शिक्षणाचा खर्च तिच्याच वलिखानचाचाने उचलला आहे. वलिखान : वेळासहून अफगाणिस्थानला परत गेल्यावर आईजानच्या आठवणीसाठी त्याने एक छोटीशी शेंडी ठवली आहे. श्रीधर भानूचा भाव गावात वाढला आहे. आर्य व मानसी परत अमेरिकेला गेली व नंतर त्यांची बदली कोरियाला झाली. इंदिराकाकू आता थकल्या. त्यांची स्मरणशक्ती त्यांना दगा देते. परवाच त्यांनी कोणालातरी ‘‘कोण इस्माईल चाललाय का ? असा प्रश्न विचारला. श्री. कार्लेकरांनी ‘‘सिताबाई सदाशीव भानू’’ या नावाने एक पुस्तक लिहिले. त्यात तुम्हाला सिताबाईंची पूर्ण कहाणी वाचायला मिळेल व त्यांनी काढलेली रेखाचित्रेही बघायला मिळतील. बामियानचे बुद्ध : तालिबानने हे तोफा डागून फोडले त्यामुळे सिताबाईंनी लिहिलेल्या वर्णनाला व चित्रांना बरेच महत्व प्राप्त झाले आहे. दोन वर्षातून एकदातरी वलिखान व त्याचे कुटुंबीय वेळासला वृंदावनाच्या दर्शनाला येतातच येतात व त्याच वाडीत राहतात. सिताबाई सदाशीव भानू........... यांचे काय झाले ? याची उत्सुकता असेल ना तुम्हाला ? या बाई शेवटी वाराणसीमधे एका आश्रमात मृत्यु पावल्या. त्या तेथे कशा आल्या यासाठी तुम्हाला ते पुस्तक वाचावे लागेल किंवा मी लिहिलेले त्या पुस्तकाचे परिक्षण ! || लेखनसीमा ||. जयंत कुलकर्णी या लिखाणातली सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कुणाला इतर हयात वा मृत व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.

वाचन 20115 प्रतिक्रिया 44